प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते म्हणतात. ‘कटी पतंग’ बघायचा आहे हा धोशा मी स्वत:शी ही मालिका लिहायला घेतल्या दिवसापासून लावलाय. तसं मातृकृपेने कथानक अथपासून इतिपर्यंत ठाऊक आहे. पण तरी हा चित्रपट पहायचा होताच. काही महिन्यांपूर्वी युट्युबवर उपलब्ध असलेली प्रत पाहिली तर त्यात कृष्णजन्माच्या रात्रीपेक्षा भयाण अंधार. तेव्हा तात्पुरता बेत स्थगित केला. दोन आठवड्यांपूर्वी राजेश खन्नाचा ‘आनंद’ पाहायचा ठरवलं पण सर्दी आणि तिची पाठ धरून नेमेचि येणारा खोकला मुक्कामाला आले. सगळाच ‘आनंदीआनंद’. तेव्हा तोही बेत बारगळला. पुन्हा माणसांत आल्यावर युट्युबवर ‘आनंद’ शोधायला गेले, सहज म्हणून ‘कटी पतंग’ शोधला आणि चक्क ५ महिन्यांपूर्वी अपलोड केलेली सुरेख प्रत मिळाली. जाते थे जापान पहुंच गये चीन. मग आज ह्या चित्रपटाची गोष्ट सांगते. ‘आनंद’ ला पुन्हा कधीतरी भेटू, चालेल ना?

सुरुवातीलाच एक वरात एका वाड्यात शिरताना दिसते. वाजंत्री, मुंडावळ्यानी तोंड झाकलेला नवरदेव, मुलीच्या घरात चाललेली लगबग, सगळीकडे सुरेख आरास, हसण्या-खिदळण्याला आलेला ऊत. पण हे काय? नवरीमुलगी माधवी उर्फ मधु मात्र खुश दिसत नाही. तिच्या खोलीत बसून ती तिच्या प्रियकराने, कैलाशने, तिला लिहिलेलं शेवटचं पत्र वाचते. त्यात नेहमीच्या ‘मला विसरून जा’ वगैरेसोबत ‘जालीम’ दुनियावाल्याच्या नावाने केलेला शंख असतो. मधु ते पत्र वाचून फार अस्वस्थ होते. पण हा कैलाश नीच माणूस आहे हे आपल्याला अगदी पुढच्याच शॉटमध्ये कळतं. तो आपल्या घरी आपल्या शबनम (उर्फ शब्बो) नामक आयटमसोबत दारू पीत बसलेला असतो. एव्हढ्यात दार वाजतं. आता एव्हढ्या रात्री कोण आलं म्हणून कैलाश दरवाजा उघडायला जातो आणि शब्बोबाई लपतात तिथल्या एका पडद्यामागे.

दारात मधूला पाहून कैलाश हैराण होतो. आपण लग्नघर सोडून पळून आल्याचं ती त्याला सांगते. अर्थात मधु अशी ऐन लग्नातून निघून आल्यामुळे तिचे मामा तिला ‘तमाम जायदादसे बेदखल’ करणार हे तो पुरेपूर जाणून असतो. आणि ‘मधु वजा पैसा’ हे समीकरण त्याला मानवणार नसतं. म्हणून तो तिला कसंबसं पटवून तिथून कटवायच्या मागे लागतो. पण हाय रे दैवा! शब्बो (तिच्या कपड्याहूनही!) तोकड्या पडद्यामागे लपल्यामुळे मधूला तिचे पाय दिसतात. ‘आपके पाव बहोत हसीन है’ वगैरे काही न बोलता ती फर्रकन तो पडदा सारते आणि शब्बोला तिथे पाहून तिच्या डोक्यात (एकदाचा!) प्रकाश पडतो. कैलाशला शिव्यांची लाखोली वाहात ती तिथून पळत सुटते ती थेट परत मामाच्या वाड्यावर येते. एव्हाना वरात परत गेलेली असते आणि रिकाम्या लग्नघरात लोक तिला दूषणं देत असतात. कशीतरी लपतछपत ती आपल्या खोलीत जाते तर तिथे खुर्चीत तिचे मामा बसलेले असतात. ती रडून रडून त्यांची माफी मागायला लागते तरी ते काहीच बोलत नाहीत - कारण मानसिक धक्क्याने त्यांचा मृत्यू झालेला असतो. ते दृश्य पाहून मनस्वी हबकलेली मधु तिथून निघते ती थेट गंगापूर रेल्वे स्टेशनवर पोचते. आता वाट फुटेल तिथे जाणं एव्हढा एकच पर्याय तिच्यासमोर असतो.
स्टेशनवर एक मवाली तिला ओळखून तिच्याशी लगट करायला लागतो तेव्हा ती वेटिंग रूममध्ये शिरते. तिथे एक गोंडस छोटा मुलगा खेळत असतो. त्या मुलाची आई आतल्या खोलीतून दुधाची बाटली घेऊन येते आणि मधूला पाहून थबकते. ती असते मधूची लहानपणापासूनची मैत्रीण पूनम. पूनमच्या नवर्याने त्याच्या आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी लग्न केलेलं असतं. सहा महिन्यांपूर्वी त्याचा एका जीप अपघातात मृत्यू झालेला असतो. तेव्हा सासर्यांनी तिला पत्र लिहून झालं-गेलं विसरून नातवाला घेऊन नैनितालला आमच्याकडे निघून ये असं कळवलेलं असतं. ते पत्र ती मधूला दाखवते. तिच्या नवर्याचा, शेखरचा, फोटो दाखवते. अर्थात तिच्या सासू-सासर्यांनी तिला कधी पाहिलेलं नसतं आणि तिच्याबद्दल त्यांना फारशी माहितीसुध्दा नसते. मधुची कर्मकहाणी ऐकून ती ‘तू माझी बहिण म्हणून माझ्यासोबत तिथे चल, आपण दोघी मिळून माझ्या मुलाचा सांभाळ करू’ अशी गळ घालते. मधूकडे दुसरा पर्याय नसल्याने तीही तयार होते.
पण मधुचं दुर्दैव पुन्हा एकदा आड येतं. त्यांच्या ट्रेनला अपघात होतो. त्यात पूनमचे दोन्ही पाय कापले जातात. एका अपंग स्त्रीला सासू-सासरे कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत असंच ती मनाने घेते. ‘माझ्याऐवजी तू पूनम म्हणून जा आणि माझ्या मुलाचा सांभाळ कर’ असं वचन ती मधूकडे मागत राहते. मधूला अर्थातच असं वचन देणं शक्य नसतं. पण पूनम मरण पावल्यावर विधवेचा वेश धारण करून छोट्या मुलाला घेऊन पूनम म्हणून नैनितालला निघण्याशिवाय तिला आता गत्यंतर नसतं.
टॅक्सीत बसून नैनितालला जाताना वाटेत मुलाच्या दुधासाठी ड्रायव्हरला पैसे द्यायला मधु पर्स उघडते तेव्हा आतले पैसे पाहून त्या ड्रायव्हरची नियत फिरते. तो गाडी भलत्या मार्गाने नेऊ लागतो. त्या मुसळधार पावसात मधूने केलेला मदतीचा धावा ऐकून उलट दिशेने जाणारी एक जीप यु-टर्न घेऊन येते. आणि त्यातला तरुण त्या ड्रायव्हरशी झटापट करून तिची पर्स तिला परत मिळवून देतो. हा असतो कमल. तो एक फॉरेस्ट ऑफिसर असतो आणि तिथून जवळच त्याचं घर असतं. पावसामुळे रस्ते बंद असल्याने आजची रात्री माझ्याकडे रहा, उद्या सकाळी मी तुम्हाला जिथे जायचंय तिथे सोडतो असं तो म्हणतो तेव्हा मधु मुलासोबत त्याच्या घरी जाते.
तिथे गेल्यावर कमल तिला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं असं म्हणतो तेव्हा ती क्षणभर चरकते. मग तो तिला तुम्हाला कोणाकडे जायचं आहे हे विचारतो. जेव्हा ती दिवान दिनानाथचं नाव सांगते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मधु (उर्फ पूनम) आपल्या मित्राची, शेखरची, पत्नी आहे. कमल जर्मनीला ट्रेनिंगसाठी ५ वर्ष गेलेला असतो तेव्हढ्या काळात शेखरचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे त्यानेही पूनमला पाहिलेलं नाहीये हे लक्षात येताच मधूचा जीव भांड्यात पडतो. अर्थात कमलला ट्रेन अपघाताबद्दल माहित असल्याने तिला जिवंत पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तिच्या जेवण्याची नीट सोय करायला तो आपल्या नोकराला, रघुकाकाला, सांगतो. त्याला एका पार्टीला क्लबात जायचं असतं. जेव्हा रघुकाका त्याला ‘रात्रीचा एव्हढ्या पावसात बाहेर जाऊ नकोस’ म्हणतात तेव्हा तो त्यांच्यावरच डाफरतो. तो गेल्यावर मधु रघुकाकाना ‘कमल रोज बाहेर जातो का’ म्हणून विचारते. ते म्हणतात तो रोज बाहेर तर जातोच पण विलायतेत राहूनसुध्दा ज्या दारूला कधी स्पर्श केला नाही ती रोज पितो. मधु अर्थातच ह्याचं कारण विचारते तेव्हा ते सांगतात की त्याच्या वडिलांनी त्याचं त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लग्न ठरवलं होतं. न बघताच त्याने होकारही दिला होता पण ती मुलगी लग्नाच्या दिवशी पळून गेली. मधुला संशय येतो. ती कुठल्या गावात लग्न ठरलं होतं म्हणून विचारते. आणि जेव्हा रघुकाका ‘गंगापूर’ हे गावाचं नाव सांगतात तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. आपलं लग्न कमलशीच ठरलं होतं हे तिला कळून चुकतं. नियतीने फिरून पुन्हा तिला त्याच्याकडेच आणून सोडलेलं असतं. फक्त एका वेगळ्या रुपात.

सकाळी कमलला यायला उशीर झाल्याने मधुच्या विनंतीवरून रघुकाका तिला एका ट्रकमध्ये बसवून तिच्या सासरी रवाना करतात. ती घरी पोचते तेव्हा तिचे सासू-सासरे तिला पाहून अवाक् होतात कारण त्यांनीही त्या ट्रेन अपघाताबद्दल ऐकलेलं असतं आणि त्यात आपली सून आणि नातू दोघे दगावले अशी त्यांचीही समजूत झालेली असते. पण ती जेव्हा सासर्यांनी लिहिलेली चिट्ठी दाखवते तेव्हा ते तिचं आनंदाने स्वागत करतात. हळूहळू मधु तिथे रुळू लागते. तिच्या नवर्याचा मित्र असल्याने कमलचं तिथे येणं-जाणं असतंच.
अशीच एक दिवस काही सामान आणायला मधु तिथल्या किराणा मालाच्या दुकानात जाते तेव्हा तिथला एक नोकर तिला ‘मधु’ अशी हाक मारतो. ती ओळख दाखवत नाही तेव्हा तो तिला आपण एकाच कॉलेजात होतो असं सांगतो. तेव्हढ्यात तिथे कमल येतो आणि तो 'एकासारखी एक दिसणारी माणसं असतात' असं म्हणतो तेव्हा मधूला हायसं वाटतं. ती तिथून सटकते. एव्हाना ती आणि कमल एकमेकांकडे आकर्षित होऊ लागलेले असतात. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तर त्यावर जणू न बोलता शिक्कामोर्तबच होतं.
पण सरळ वाटेने जाईल ते नशीब कुठलं? कमलच्या वडिलांनी ‘लग्न कर’ म्हणून त्याच्यामागे टुमणं लावलेलं असतं. ते कमलला एक पत्र पाठवतात ज्यात 'एक मुलगी आपल्या आईसोबत नैनितालला येतेय तिला कमलने भेटावं' असं सुचवलेलं असतं. ‘मला लग्न करायचं नाही’ हा कमलचा हट्ट असतो. तेव्हा मधुचे सासूसासरे तिला कमलसोबत त्या मुलीला आणि तिच्या आईला भेटायला एका हॉटेलात पाठवतात. तिथे डान्सचा कार्यक्रम चालू असतो आणि तो डान्स करत असते शब्बो. ती गाण्याच्या माध्यमातून आपण मधूला ओळखल्याचं सूचित करते. शब्बोचं वागणं पाहून कमललाही संशय येतो आणि तो खोदूनखोदून मधूला उर्फ पूनमला विचारतो की तुझ्यासारखी दिसणारी आणखी कोणी आहे का.

शब्बोला मधूचा सुगावा लागलाय म्हटल्यावर कैलाश नैनितालमध्ये दाखल व्हायला फारसा वेळ लागत नाही. पुनमचा दुरचा नातेवाईक म्हणून तो तिच्या घरी भेटायला येतो, तिच्या सासरयांशी आणि कमलशी ओळख करून घेतो आणि मधूला ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करतो. इथे मधु आणि कमल एकमेकांत गुंतत चाललेले असतात. पण आपल्यामागे सुनेचं काय होणार ह्याची काळजी लागलेल्या तिच्या सासऱ्यांना जेव्हा त्यांचे डॉक्टर मित्र ‘तिचं दुसरं लग्न करून द्या’ असं सांगतात तेव्हा ते जाम खवळतात. तर कमल ‘पूनम हीच आपली पसंती’ असल्याचं आपल्या धाकट्या बहिणीला सांगतो तेव्हा तीही पूनम तुला आपल्या जाळ्यात ओढतेय असा आरोप करते. तेव्हढ्यात पूनमच्या नवऱ्याच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पेपर्स नैनितालच्या पत्त्यावर येतात आणि तिचे सासरे मधूला त्यावर सही करायला सांगतात. आता आपलं बिंग फुटणार अशी भीती मधूला वाटू लागते. शेवटी कमलला सारं सांगून टाकावं म्हणून ती एक पत्र लिहून इन्शुरन्स पॉलिसीच्या पेपर्ससोबत त्याच्याकडे पाठवते पण ते पत्र नेमकं तिच्या सासऱ्यांच्या हातात पडतं आणि......
आणि पुढे काय होतं ते प्रत्यक्ष तुम्हीच पहा. बरेचसे हिंदी चित्रपट ‘सुखांत’ ह्या सदरात मोडतात त्यापैकी हा आहे. त्यामुळे शेवट काय होणार ह्याची नव्हे तर कथा तिथवर कशी पोचते ह्याची उत्सुकता प्रेक्षकांना जास्त असते. फारसं पाल्हाळ न लावता, अधिक रडारडी न करता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदी चित्रपटातल्या रस्ता किंवा रेल्वे रुळावरच्या प्रसिद्ध मॅरेथॉनला फाटा देऊन हा चित्रपट संपतो. आधी म्हटल्याप्रमाणे युट्युबवर सध्या उपलब्ध असलेली प्रतही उत्तम आहे. त्यामुळे जुन्या हिंदी चित्रपटांची आवड असल्यास नैनितालच्या निसर्गरम्य परिसराची झलक दाखवणारया शक्ती सामंताच्या ह्या चित्रपटात अडीच-पावणेतीन तासांची गुंतवणूक करण्यास हरकत नसावी.

चित्रपटातली गाणी प्रसिद्ध असल्याने नायक आणि नायिका कोण हे जवळपास सार्यांनाच माहित असणार. माधवी उर्फ मधु झालेय आशा पारेख. हिच्या आवाजाचं आणि माझं कधी जमलं नाही. तेव्हढा भाग सोडला तर ही भूमिका तिने ठीकठाक वठवली आहे. पण कमल झालेल्या राजेश खन्नाच्या मानाने ती बरीच थोराड वाटते. गंमत म्हणून दोघांचा जन्म कधी झाला ते गुगलून पाहिलं तर ती दोन महिने मोठी आहे फक्त. राजेश नेहमीप्रमाणेच क्युट दिसलाय पण तो अजिबात फॉरेस्ट ऑफिसर वाटत नाही. त्याचे ‘महबुबा’ आणि ‘राज’ पाहिले असल्याने त्याचा अभिनय एकाच साच्याचा वाटला. एखाद्या भूमिकेला एखादी वेगळी लकब द्यावी असा विचार त्याकाळी नायकांपैकी कोणी केला होता का? नायिकाप्रधान चित्रपट फारसे नसल्याने नायिकांना हा वाव क्कचितच मिळत असावा नाही? तसं बघायला गेलं तर हा चित्रपट बराचसा नायिकाप्रधानच म्हणता येईल. पण निदान मी तरी आशाला गतधवेच्या भूमिकेत प्रथमच पाहिली. त्यामुळे तोही अभिनय साचेबध्द असू शकतो. असो. व्हिलनगिरीचं डिपार्टमेंट प्रेम चोप्रा (कैलाश) आणि बिंदू (शब्बो) दोघांनी यथास्थित सांभाळलं आहे.
इतर कलाकारांत नझीर हुसेन (पूनमचे सासरे), सुलोचना (पूनमची सासू), नाझ (पूनम), सत्येन कप्पू (पूनमच्या सासऱ्यांचे डॉक्टर मित्र), मदन पुरी (कमलचे वडिल), डेझी इराणी (नोकराणी रमय्या), ज्युनियर महमूद (रमय्याचा धाकटा भाऊ) आणि हनी इराणी (कमलला दाखवायला आणलेली मुलगी) दिसतात. हनी आणि डेझी ह्या दोन्ही बहिणींना तरुण रुपात मी प्रथमच पाहिलं. विकीपिडियावर पूनमच्या छोट्या मुलाचं काम ऋषी कपूरने केलंय असं म्हटलं आहे. ते चुकीचं आहे कारण ऋषी १९७१ मध्ये एव्हढा लहान नक्कीच नव्हता. आणि हो, चित्रपटात नैनितालच्या घरात पूनमच्या नवऱ्याचा फोटो ठेवलेला असतो तो सुजितकुमारचा दाखवलाय. बाकी मला तरी चित्रपटात सुजितकुमारचा एकही सीन दिसला नाही. विकिवरही त्याचं नाव नाहीये. मी कुठेतरी वाचलं होतं की तो राजेश खन्नाचा मित्र होता आणि त्यामुळे राजेशच्या अनेक चित्रपटांत दिसत असे. तरी फोटोपुरता एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपटात असल्याची आणखी उदाहरणं असतील काय हा प्रश्न मनात आलाच.
गाण्यांबद्दल वेगळं काय लिहू? ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता है, ये जो मोहब्बत है (ह्यातल्या बंगल्याच्या तर मी आजन्म प्रेमात आहे), जिस गलीमें तेरा घर आणि टायटल सॉंग ना कोई उमंग है असंख्य भारतीयांच्या ऑल-टाईम favorite list मध्ये असतील. अर्थात आर.डी, किशोरकुमार, मुकेश, लता आणि आशा असल्यावर दुसरं आणखी काय होणार म्हणा. बिंदू मधूला पुन्हा बघते त्यावेळचं ‘मेरा नाम है शबनम’ चित्रपटातला turning point आहे. ती ‘तुम्हारा नाम क्या है’ म्हणते तेव्हा मधुसोबत आपल्यालाही घाम फुटतो. ‘आज ना छोडेंगे’ गाणं दर होळीला वाजतंच
खरं विचाराल तर ह्यातली मधूची predicament मला पटली नाही. पूनमच्या मृत्यूनंतर तिच्या सासरी गेल्यावर तिने आपली खरी ओळख तिच्या सासू-सासर्यांना द्यायला हवी होती. त्यांनी काही लगेच तिला घराबाहेर काढली नसती. तसंच कैलाश नैनितालमध्ये आलाय म्हटल्यावरच तिने कमलला प्रत्यक्ष भेटून सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं होतं. आपण माधवीला माफ केलंय असं कमलने तिला सांगितलेलं असतंच की. अर्थात मग पुढचा चित्रपट कसा झाला असता, नाही का?
चित्रपटातल्या काही गोष्टी पटत नाहीत. ज्या ट्रेनने पूनम आणि तिचं बाळ येणार असतात तिला झालेल्या अपघाताबद्दल पूनमचे सासू-सासरे आणि कमल तिघांनाही माहित असतं. मग तिचा आणि बाळाचा शोध घ्यायला त्यांच्यापैकी एकही जण जात नाही? कमल आपल्या जीवलग मित्राच्या बायकोला आणायला जाणार नसतो? इतकंच काय तर मधु बाळाला घेऊन सासरी पोचते तेव्हा पूनमची सासू चक्क देवासमोर बसलेली दाखवलेय. सून आणि नातू अपघातात गेलेत म्हटल्यावर सुतक नको लागायला? एका चिठ्ठीच्या भरवश्यावर ते मधूचा पूनम म्हणून स्वीकार करतात. दुसर्या कोणीही लग्नाचा किंवा आणखी फोटो पुरावा म्हणून मागितले असते, नाही का? दुकानातल्या माणसापाठोपाठ शब्बो पूनमच्या रूपातल्या मधूला ‘मधू’ म्हणून हाक मारते तेव्हा कमल तिला विचारतो की तुझ्यासारखी दिसणारी आणखी कोणी होती का कारण माझं लग्न ठरलं त्या मुलीचं नावही मधूच होतं. आता एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असतात. त्यामुळे हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. त्याने मुलीला न बघता लग्नाला होकार दिलेला असतो मग मधूला बघताच मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय असं तो का म्हणतो? प्रेम चोप्राच्या एका चित्रपटातला डायलॉग वापरायचा झाला तर ‘वगैरा, वगैरा, वगैरा’
सौ बातकी एक बात काय तर बंगाली मिठाईप्रमाणे गोड दिसणार्या राजेशसाठी बघा, उत्तम संगीत-मिठ्ठास स्वरसाज-अर्थपूर्ण शब्द-सुरेख चित्रीकरण असा दुग्धशर्करा योग जुळून आलेल्या अर्धा डझनभर गाण्यांसाठी बघा नाहीतर नैनितालच्या वेड लावणाऱ्या ‘कालप्रवाही वाहून गेलेल्या’ अनुपम निसर्गसौंदर्यासाठी बघा. पर दोस्त, एक बार ये पिक्चर देखना जरूर.
---
*** Spoiler Alert *** (चित्रपटाचा शेवट)
मधूने कमलला लिहिलेल्या पत्रात ती पूनम नसून त्याचं जिच्याशी लग्न ठरलं होतं ती माधवी आहे हे वाचताच पूनमच्या सासर्यांना धक्का बसतो. कमलशी तिची वाढती सलगी त्यांना आवडत नसते. ते पत्र दाखवून ते तिला जाब विचारतात की पैश्याच्या मोहाने तू इथे आली होतीस का? तेव्हा ती म्हणते की मला पैश्याचा मोह नाही पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता आणि पूनम माझी मैत्रीण होती. ती घर सोडून जायला निघते पण ते म्हणतात की आम्ही किती जीव तोडून सांगितलं की ती आमची सून नव्हती तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. आमची बदनामी होईल. तेव्हा तुला इथेच राहायला हवं. नंतर ते कमलच्या वडिलांना कमल आणि मधुचं लग्न लावून द्यायची विनंती करतात. एक मूल असलेल्या विधवेशी आपल्या मुलाचं लग्न लावून द्यायला अर्थातच कमलचे वडील तयार होत नाहीत तेव्हा पूनमचे सासरे त्यांना मधूने लिहिलेलं पत्र दाखवतात. ते वाचल्यावर कमलचे वडीलहे लग्न लावून द्यायला आनंदाने तयार होतात.
पण तेव्हढ्यात कैलाश पूनमच्या सासर्यांच्या दुधात विष मिसळतो. त्यांच्या खुनाचा आळ मधुवर येतो आणि तिला पोलीस अटक करतात. शब्बो आपणच पूनम असल्याचा दावा पोलिसांकडे करते. सुदैवाने शब्बो आपलं अॅबॉर्शन करून द्यायची विनंती करायला ज्या डॉक्टरांकडे गेलेली असते ते पूनमच्या सासर्यांचे मित्र असतात. ते तिला पूनमच्या घरी आलेली पाहतात आणि ती एक खोटारडी बाई आहे असा निर्वाळा देतात. कमलचे वडील त्याला मधूने लिहिलेलं पत्र दाखवतात. तेव्हा कमल घरातल्या काम करणाऱ्या मुलीला, रमैय्याला खडसावून विचारतो. ती कबूल करते की त्या रात्री ती पूनमच्या सासर्यांसाठी दूध तयार करत असताना तिथे कैलाश आला होता. कमल एक नाटक करून पोलिसांसमोर शब्बो आणि कैलाश कडून सत्य वदवून घेतो. त्यांना अटक होते. मग ‘अग अग म्हशी’ सारखी मधु निघून जायचं नाटक करते. आता मॅरेथॉन सुरु होणार म्हणून आपण वैतागतो पण १-२ मिनिटांतच कमल तिला गाठतो. गाण्याच्या दोनेक ओळी म्हणतो. ती पाघळते आणि चित्रपट संपतो
*** Spoiler Alert ***
आनंद आणि अटी पतंग दोन्ही
आनंद आणि कटी पतंग दोन्ही पाहीले आहेत. अर्थातच युटुब वरती. अप्रतिम कलाकृती.
‘आनंद’ ला पुन्हा कधीतरी भेटू, चालेल ना?
- स्वप्नाताई नक्की आवडेल. कारण मुव्ही पाहण्यापेक्षा ईथे तू जे लिहीते ते वाचायला जास्त मजा येते.
यातली गाणी अनेक वेळा पाहिली
यातली गाणी अनेक वेळा पाहिली आहेत, पण सिनेमा पाहिला नव्हता. स्वप्ना, तू मस्त लिहितेस. लगेच तो सिनेमा बघायची उत्सुकता वाटते. तुझी लेखन शैली मस्त आहे.
नेहमीप्रमाणे छान लिहिले आहेस
नेहमीप्रमाणे छान लिहिले आहेस स्वप्ना ! मी राजेश आणि गाण्यांसाठी अनेकवेळा पहिला आहे. बाकी सगळी गाणी किशोर च्या आवाजात आणि जिस गलीमें फक्त मुकेश च्या आवाजात का असेल असा विचार दर वेळी येतो. पण गाणे खूप छान आहे मात्र.
‘मेरा नाम है शबनम’
‘मेरा नाम है शबनम’ चित्रपटातला turning point आहे. >>> आत्ता या गाण्याचा संदर्भ लक्षात आला. पूर्वी हे गाणे या संदर्भाशिवाय ऐकायचो तेव्हा अजिबात कळायचे नाही की असे का रचले आहे.
राजेश खन्ना ५ वर्षांच्या ट्रेनिंगला जर्मनीला - फॉरेस्ट ऑफिसर च्या? एकूण जंगले आणि वैविध्य धरले तर जर्मनीच्या लोकांनी भारतात यायला हवे
मस्त लिहीलं आहेस, स्वप्ना.
मस्त लिहीलं आहेस, स्वप्ना. आता हा सिनेमा पहावासा वाटायला लागला
छान. आनंद व कटी पतंग
छान. आनंद व कटी पतंग दूरदर्शनवर पाहीले आहेत व आवडलेत सुध्दा. यातील गाणी तर निव्वळ अप्रतीम.
नेहमीप्रमाणे मस्त लिहले आहे.
नेहमीप्रमाणे मस्त लिहले आहे.
कटी पतंग फार पूर्वी टीव्हीवर पाहिला आहे. तेव्हा बऱ्यापैकी आवडला होता आणि लेख वाचून लक्षात आलं की अजूनही बऱ्यापैकी आठवतोय. गाणी मस्तच आहेत यातली.
हे असे फॉल्स आयडेंटिटी घेऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन राहण्याचे सिनेमे भरपूर आहेत त्या काळातले.
> पण कमल झालेल्या राजेश खन्नाच्या मानाने ती बरीच थोराड वाटते. गंमत म्हणून दोघांचा जन्म कधी झाला ते गुगलून पाहिलं तर ती दोन महिने मोठी आहे फक्त. > शक्यतो बायका नेहमी मोठ्या दिसतात समवयीन पुरुषांपेक्षा. म्हणूनच हिरोईनची कारकिर्द ३०-३५ त संपते आणि हिरो ४५-५० चे झाले तरी नायक म्हणून काम करतात आणि हिट देतात.
> प्रेम चोप्राच्या एका चित्रपटातला डायलॉग वापरायचा झाला तर ‘वगैरा, वगैरा, वगैरा’ > प्रेम चोप्राचा डायलॉग आहे होय हा

खूप दिवसांनी आला लेख. आजच
खूप दिवसांनी आला लेख. आजच बघतो हा चित्रपट ....
प्रेम चोप्रा यांना अनेकदा भेटलो आहे.... एक व्यक्ती म्हणून खुप छान आहेत.
छानच लेख. काही काही गाणीच
छानच लेख. काही काही गाणीच छान आहेत. पण मेरे जीवन साथी पेक्षा कण भर कमी. आशा पारेखच्या सिनेमातले क्राय्सिस साधारण अश्याच स्वरुपाचे असतात. तकलादू. ये शाम मस्तानी. ये जो मोहोब्बत है.
पण तो हिच्या प्रेमात पडेल असे वाटत नाही. ती लग्न पण न झालेली कुमारिका, विवाहित स्त्री, एक नव माता व आता एक नव विधवा ह्या सर्व अवस्थांची इमोशनल रेंज दाखवू शकेल असे दिग्दर्शकाला वाटले कसे. हाय काँफिडन्स. खू खू ख्या ख्या
नेहमी प्रमाणे मस्त लिहिलंय
नेहमी प्रमाणे मस्त लिहिलंय.पिक्चर पाहिला नाही.गाणी खूप ऐकली आहेत.
अरे हो, qatl बद्दल लिहिशील का? खूप अहेड ऑफ टाईम पिक्चर आहे.
इथे मिळाला
https://youtu.be/xyg6-RKJ-J4
मस्त चित्रपटओळख. यातली सगळी
मस्त चित्रपटओळख. यातली सगळी गाणी ऑटाफे. ना कोई उमंग है चा माझा पती करोडपती चित्रपटात मजेशीर वापर करून घेतलाय. मी आधी माझा पती पाहिला होता. त्यामुळे त्या गाण्याचा संदर्भ लागला नव्हता.
ह्या विकांताला नक्की बघेन..
ह्या विकांताला नक्की बघेन.. तू ओळख करून दिल्यावर चित्रपट जास्त जवळचे वाटतात आणि बोर होत नाहीत हा अनुभव आहे
हो, एकदम हेच म्हणायचं होतं
हो, एकदम हेच म्हणायचं होतं.पिक्चर एका नव्या नजरेने पाहाता येतात.मी इथे वाचून टिंगू बरोबर गुमनाम पाहिला आणि आमच्या टिंगू ला चक्क गुमनाम आवडला.
छान झालाय लेख. बघावासा वाटतोय
छान झालाय लेख. बघावासा वाटतोय आता. यातले गाणी तर ऑल टाइम फेवरेट आहेत. राजेश खन्ना खरंच भारी दिसलाय यात.
छान लिहीलस ग.. दुदवर कटी.
छान लिहीलस ग..
दुदवर कटी. पाहिला तेव्हा लोभस राख, आपाच्या कृत्रिम अभिनयासकट आवडला होता..
'सिद्धि', मीरा.. , सरि,rmd,
'सिद्धि', मीरा.. , सरि,rmd, सूर्यगंगा, अॅमी,अमा, A M I T, किल्ली, mi_anu, भाग्यश्री१२३, अनघा. मनापासून आभार
>>राजेश खन्ना ५ वर्षांच्या ट्रेनिंगला जर्मनीला - फॉरेस्ट ऑफिसर च्या? एकूण जंगले आणि वैविध्य धरले तर जर्मनीच्या लोकांनी भारतात यायला हवे
>>प्रेम चोप्रा यांना अनेकदा भेटलो आहे.... एक व्यक्ती म्हणून खुप छान आहेत.
अरे वा मस्तच. काही आठ्वणी असतील, किस्से असतील तर सांगा ना. मला ह्या व्हिलन लोकांविषयी बरीच उत्सुकता आहे. प्रेम चोप्रा हे शर्मन जोशीचे सासरे म्हटल्यावर शर्मन जोशीबद्दल उगाच आदर वाटू लागला म्हणजे काय डेअरिंग आहे वगैरे
अमरीश पुरीही एक उमदे गृहस्थ होते असं ऐकून आहे. त्यांची बायको महाराष्ट्रीयन. मला वाटतं दिवेकर तिचं माहेरचं आडनाव.
>>अरे हो, qatl बद्दल लिहिशील का? खूप अहेड ऑफ टाईम पिक्चर आहे.
पाहेन नक्की.
अग तू मागेही बोलली होतीस ह्याबद्दल. पण त्याचं पोस्टर पाहून थोडं दचकायला होतंय. म्हणजे अचाट आणि अतर्क्य असा काहीतरी पिक्चर असेल असं वाटतं ते पाहून
छान लिहिलं आहेस. 'मेरा नाम है
छान लिहिलं आहेस. 'मेरा नाम है शबनम ' चा संदर्भ मला पण आत्ता वाचल्यावर कळला.आता तुनळी वर बघेन . आनन्द बघितलाय तुनळीवर . तुझ्या शैलीत वाचायला नक्की आवडेल.
त्या काळात नायिका म्हणजे
त्या काळात नायिका म्हणजे साडी नेसणारी, कुमारिका, वाटलेच तर थोडीशी फॅश् न करणारी, मैत्रीणींना बरोबर घेउन बसने काश्मीरला जाउन तिथे परत आणि पिकनिकला जाणारी अशी होती मग तिथे जाउन रिंग खे ळायचा त्यांचा प्लॅन असे. मग मध्येच डॅडींच्या गळ्यात पडणे, बर्थडे केक कापणे, प्राण प्रेम चोप्रा वगिअरे लोकांशी वडिलांनी लग्न ठरवल्यास लपून छपू न काळजी करणे पण खुला विरोध न करणे अशी कामे असत. कार चालवत असे पण मध्येच हिरो आडवा गेला तर ही कार बंद पडे व कॅन घेउन हिरो ला पाण्याच्या शोधात जावे लागे. बॅगेचा पट्टा तुटणे, पाय मुरगळणे असे बारके एकत्र आणणा रे गो ड अपघात होत.
तीन चार गाणी मग बारका क्रायसिस की वडी ल मान जात व लग्न गोड शेवट. मनोरंजनात्म क मामला. व व्हँप नावाची कॅटेगरी होती ती म्हणजे शॉर्ट ड्रेसेस, विग , कापलेले केस मोना सोना असली नावे, अंगाला हिसके देत नाचणे, थाय हाय बूट्स वगैरे फॅशनेबल प्रकार घालणॅ असे असे.
ह्या नेहमी हीरोवर असफल प्रेम करत किंवा व्हिलन बरोबर असत.
मस्त लिहिलेस, स्वप्ना
मस्त लिहिलेस, स्वप्ना
पण तरी हा चित्रपट पहायचा होताच. काही महिन्यांपूर्वी युट्युबवर उपलब्ध असलेली प्रत पाहिली तर त्यात कृष्णजन्माच्या रात्रीपेक्षा भयाण अंधार. तेव्हा तात्पुरता बेत स्थगित केला. दोन आठवड्यांपूर्वी राजेश खन्नाचा ‘आनंद’ पाहायचा ठरवलं पण सर्दी आणि तिची पाठ धरून नेमेचि येणारा खोकला मुक्कामाला आले. सगळाच ‘आनंदीआनंद’. तेव्हा तोही बेत बारगळला. पुन्हा माणसांत आल्यावर युट्युबवर ‘आनंद’ शोधायला गेले, >>>>>>>>>
सहज म्हणून ‘कटी पतंग’ शोधला आणि चक्क ५ महिन्यांपूर्वी अपलोड केलेली सुरेख प्रत मिळाली. >>>>>>>>>>> अस म्हणतात की तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर अख्खी 'कायनात' तुम्हाला ती मिळवून देते.
चित्रपट पाहिलाय. छान आहे.
तरी फोटोपुरता एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपटात असल्याची आणखी उदाहरणं असतील काय हा प्रश्न मनात आलाच. >>>>>>>>> अजय देवगणच्या 'राजूचाचा' मध्ये मृणाल कुळकर्णी फक्त फोटोपुरती होती एका सीनमध्ये, ऋषी कपूरची दिवगन्त झालेली बायको म्हणून.
हे असे फॉल्स आयडेंटिटी घेऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन राहण्याचे सिनेमे भरपूर आहेत त्या काळातले. >>>>>>>> 'आन मिलो सजना' मध्ये सुद्दा आशा पारेख खोटी ओळख घेऊन दुसर्यान्च्या घरी जाते अस दाखवलय.
नेहमीप्रमाणे मस्त
नेहमीप्रमाणे मस्त
अमा, हिलारीयस ☺️☺️
अमा, हिलारीयस ☺️☺️
यात पिकनिक ला हिरो जास्त लाईन मारायला लागल्यावर हिरोला गंडवून नदी किंवा तळ्यात पाडण्याचा एक सीन पण असतोच.
छान परिक्षण. हा सिनेमा गुलशन
छान परिक्षण. हा सिनेमा गुलशन नंदा ह्या प्रसिद्ध लेखकाच्या 'कटी पतंग' कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट बनवतांना अगदी पुस्तकाप्रमाणेच केला आहे. फक्त गाणी additional. गुलशन नंदा ह्यांच्या कादंबऱ्यांवरील आणखी सिनेमे म्हणजे दाग, खिलौना असे खूप आहेत.
अमा, एकच पुस्तक छातीशी घट्ट
अमा, एकच किंवा दोन पुस्तक छातीशी घट्ट कवटाळून कॉलेजात जाणारी तरुणी राहिलीच तुमच्या वरच्या लिस्टीत. त्यात पण हिरोशी टक्कर होवून पुस्तक खाली पडणॅ आहेच.
——————
बाकी, माझ्या आत्याचा असाच एक फोटो सुद्धा आहे, दोन पुस्तके छातीशी कवटाळून, एका खांद्यावरून ओढलेला पदर, कानाला दिसणारी फुलं. बहुधा तेव्हाचा असलेला प्रभाव असेल. आत्याने अगदी स्टुडियोत जावून काढलेला आहे. जवळ्पास ६०-६२ काळ असेल ती कॉलेजात असताना.
पण माझी आई म्हणते तसं , त्यावेळी अशी हातातच घेवून जात पुस्तकं.
स्वप्ना, छान लिहिलयस.
स्वप्ना, छान लिहिलयस.
कटी पतंग छान आहेच. मला आवडतो कटी पतंग.
सगळीच्या सगळी गाणी हिट. स्टोरी पण योगायोगाची, ट्वीस्ट्स ची वळणं घेत योग्य स्टेशनावर येते.
आनंद बघ आणि जरुर लिहि. आनंद माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे.
मस्त लिहिलंय! यावेळी स्पॉयलर
मस्त लिहिलंय! यावेळी स्पॉयलर अलर्ट देऊन शेवट लिहीला नाहीस का!
कटी पतंग आवडला होता. गाणी फारच सुंदर आहेत.
स्वप्ना, वक्त जरूर बघ. छान आहे तोही.
स्वप्ना, नेहमीसारखे सुरेख
स्वप्ना, नेहमीसारखे सुरेख लिहिले आहेस ग. पिक्चर कसाही असला तरी तुझ्या शैलीत वाचायला मजा येते.
बाकी तेव्हाच्या कल्पना आता राहिल्या नाहीत, ती मूल्ये कापरासारखी उडाली त्यामुळे आता ते चित्रपट पटत नसले तरी मला गाण्यांसाठी व माझ्या लाडक्या हिरोंसाठी परत परत पाहावेसे वाटतात. राजेश खन्ना तर दिल की धडकन!!!! त्यामुळे हा चित्रपट जरी तेव्हा दूदवर पाहिला होता तरी हल्लीच परत यु ट्यूबवर पाहिलेला. तुझ्या लिखाणातून पुनप्रत्ययाचा आनंद घेतला.
आशा पारेख चुडीदारमध्ये सुसह्य वाटायची. या चित्रपटात विधवेच्या सफेद साडीत आणि गेटपमध्ये ती मात्र ती भयंकर दिसते, राजेश खन्नपेक्षा 10 वर्षांनी तरी मोठी वाटते.
ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता है..... राजेश खन्ना सगळ्या गाण्यात तुफानी दिसतो. त्याला अभिनय करायची काहीही गरज नव्हतीच.. आणि त्यानेही अभिनय व फिटनेस ह्या गोष्टी कधी मनावर घेतल्या नाहीत. या चित्रपटातील एक दृश्य आठवते, आशा पारेखला अटक करून नेत असताना राजेश तिथे येतो. ती जात असताना तिच्याकडे बघत असतानाच्या दृश्यात तो पोट सुटलेला जाडजूड फद्या दिसतो. पण जाऊदे, जिथे चांगले दिसायचे तिथे ती गरज तो व्यवस्थित पूर्ण करतो.
त्या काळच्या बहुतेक हिरोईनी सलवार सूट, चुडीदार सूट नाहीतर साडी ह्या अवतारात असल्या तरी डिझाइन्समध्ये फारसे नावीन्य नसायचे. मुमताज किंवा शर्मिलासारखे मोजके अपवाद, चांगल्या कट्सचे कपडे वापरणारे. त्या मानाने राजेश खन्ना, संजय खान, शशी कपूर, फिरोज खान, विश्वजित, सुनील दत्त यांचे कपडे एकदम देखणे असायचे. ही मंडळी मुळातच देखणी, त्यात कपड्यांमुळे अजून भर....
तुझे परीक्षण वाचताना कधीतरी कुठेतरी वाचलेले एकदम आठवले. कोणी लिहिले होते माहीत नाही. लिहिणार्याला एकदा इटालियन की कुठलातरी चित्रपट पाहताना त्याची स्टोरी सेम टू सेम कटी पतंगची कॉपी असल्याचे लक्षात आले. शेवट थोडा बदललेला. भारतीय सगळे चोर ह्या निष्कर्षाला तो येणार होताच पण नशिबाने त्याआधीच चित्रपट कटी पतंगच्या बराच नंतरचा आहे हे त्याच्या लक्षात आले

गुलशन नंदाच्या मराठीत अनुवादित कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. अजून खूप चित्रपट त्याच्या नावावर जमा आहेत.
काल अंदाज बघितला. नर्गिस, राज
काल अंदाज बघितला. नर्गिस, राज व दिलीप या त्रयीचा सुपरहिट चित्रपट विथ सुपरहिट गाणी. जमल्यास अवश्य बघ.
अमा, तुमच्या लिस्टीत
अमा, तुमच्या लिस्टीत राजेन्द्रनाथ, मेहमूद, शोभा खोटे प्रभुतीन्चा आचरटपणा राहिला की.
त्या काळच्या बहुतेक हिरोईनी सलवार सूट, चुडीदार सूट नाहीतर साडी ह्या अवतारात असल्या तरी डिझाइन्समध्ये फारसे नावीन्य नसायचे >>>>>>> मला आवडतात त्यान्चे कपडे
हा सिनेमा गुलशन नंदा ह्या प्रसिद्ध लेखकाच्या 'कटी पतंग' कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट बनवतांना अगदी पुस्तकाप्रमाणेच केला आहे. फक्त गाणी additional. गुलशन नंदा ह्यांच्या कादंबऱ्यांवरील आणखी सिनेमे म्हणजे दाग, खिलौना असे खूप आहेत. >>>>>>>> मानसकन्या, छान माहिती दिलीत. हे माहित नव्हत. त्यान्ची हिन्दि किव्वा मराठीत अनुवादित पुस्तके शोधून काढावी म्हणते आता.
काल अंदाज बघितला. नर्गिस, राज व दिलीप या त्रयीचा सुपरहिट चित्रपट विथ सुपरहिट गाणी. >>>>>>>> सन्गमचा ओरिजिनल
अंदाज हा संगमचा ओरिजिनल नाही.
अंदाज हा संगमचा ओरिजिनल नाही. अंदाज हा प्रेमत्रिकोणावरील सगळ्यात पहिला चित्रपट. प्रेम त्रिकोण हे अंदाज व संगम मधले साम्य व हे साम्य इथेच संपते, बाकी दोन्ही कथा वेगळ्या आहेत.. प्रेमत्रिकोणावर आधारित भरपूर चित्रपट नंतर आले.
शाहरुख, सलमान, माधुरीचा एक चित्रपट आलेला जो अंदाजच्या कथेची भ्रष्ट नक्कल म्हणता येईल. नक्कल इतकी भ्रष्ट की नक्कल करणाऱ्याला अंदाज कळला नाही असे म्हणावे लागेल.
हम तुम्हारे है सनम
हम तुम्हारे है सनम
मला हा पाहून माधुरी चे दात पाडावे वाटतात.
Pages