फुलपाखरांचे छायाचित्रण

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:16

फुलपाखरांचे छायाचित्रण

फुला-फुलांवर स्वच्छंदी उडणारी रंगीबिरंगी फुलपाखरे सर्वांनाच आवडतात. त्या फुलपाखरांचे छायाचित्रण करायलासुद्धा म्हणूनच आपल्याला आवडते. फुलपाखरांची सुंदर छायाचित्रे काढून ती सोशल मेडियावर टाकून ‘वॉव’ मिळवायला तर प्रत्येकालाच आवडते. पण अनेकांना असा अनुभव आला असेलच की फुलपाखरे काही स्वस्थ बसत नाहीत. ती आपल्याला दिसतात तेव्हा फुलांवर पिंगा घालीत असतात. पंख फडफडवीत असतात. त्यामुळे त्यांना कॅमेर्‍यात कैद करणे सहजी सोपे नसते.

फुलपाखरांचे छायाचित्रण करायचे असल्यास फुलपाखरांबद्दल थोडी माहिती जाणून घेतली तर अनेक गोष्टी सोप्या होतात. फुलपाखरे शीतरक्ताचे प्राणी असून सकाळी त्यांना सूर्यप्रकाशात पंख शेकून घेतल्याशिवाय उडता येत नाही. म्हणजे सकाळी कोवळे उन्हं पडलेले असताना बरीच फुलपाखरे पंख उघडलेल्या ‘सूर्यस्नान’ घेतानाच्या स्थितीत चित्रबद्ध करता येतात. विशेष म्हणजे फुलपाखरांना कान नसतात, त्यामुळे आपण केलेल्या आवाजाने ते घाबरून उडून जात नाहीत. पण त्यांचे डोळे मात्र हजारो सूक्ष्म भिंगांपासून बनलेले ‘संयुक्त नेत्र’ असतात. त्यामुळे त्यांना चटकदार रंग आणि सूक्ष्म हालचाल खूप चटकन दिसते. अर्थात त्यांच्या जवळ जायचे असेल तर निसर्गात मिसळून जाणार्‍या रंगाचे कपडे घालणे ऊचित ठरते. भडक कपडे घातल्यास ती बिचकून जातात. तसेच हळुवार हालचाल केल्यास त्यांच्या जवळ पोचता येते. फुलपाखरांना दात नसतात त्यामुळे ती केवळ द्रवरूपातील आहार ‘स्ट्रॉ-प्रमाणे’ सोंडीने शोषून घेतात.

अनेक प्रजातीच्या फुलपाखरांना फुलातील मधुरस चाखायला आवडते. तसेच गुच्छेदर फुले असलेल्या वनस्पतीवर ती पुन्हा पुन्हा येतात. त्यामुळे अशा फुलांच्या ताटव्याजवळ वाट बघितल्यास अनेक फुलपाखरे जवळ येतात. पण सर्वच फुलपाखरांना फुलातील मधुरस आवडतो असे नाही. अनेक फुलपाखरे तर केवळ दुर्गंधी सुटलेल्या कुजकी फळे, मृत खेकडे, मासे, वन्य प्राण्यांची विष्ठा, मलमूत्र इ. वरच गुजराण करतात. त्यामुळे अशी फुलपाखरे कधीही फुलांवर येत नाहीत. अशा फुलपाखरांची छायाचित्रे काढायची असल्यास थोडी दुर्गंधी सहन करावी लागते! काही प्रजातीची नर फुलपाखरे चिखलावर मोठ्या संख्येत जमतात व त्यातील त्यांना आवश्यक असलेली द्रव्ये चिखलातून शोषून घेतात. आणखी काही प्रजातीची नर फुलपाखरे तर विशिष्ट वनस्पतींच्या पानांमधुन स्त्रावणारी रासायनिक द्रव्ये प्राशन करतात. त्यात खुळखुळा तसेच हस्तीशुंडी ह्या वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे ह्या वंनस्पतींवर ‘मिल्कविड’ फुलपाखरांची छायाचित्रे काढणे सोपे असते.

फुलपाखरांची छायाचित्रे काढण्यासाठी कॅमेरा तसेच आजकाल आलेले स्मार्टफोन सुद्धा वापरता येतात. कॅमेर्‍यामध्ये डिजिटल आणि एसएलआर असे दोन पर्याय असून एसएलआर कॅमेर्‍यात उच्च दर्जाचे छायाचित्रण करता येते तसेच अधिक सुविधा असतात. पण एसएलआर कॅमेर्‍याला वेगवेगळी मॅक्रो भिंगे (लेंसेस) लावून छायाचित्रण करावे लागते. त्यामुळे सर्व साहित्याचा खर्च सुद्धा वाढतो. भिंगांमध्ये १०० मिमीचे भिंग स्वस्त आणि मस्त मानले जाते. बजेट जास्त असेल तर १८० मिमीचे भिंग उत्कृष्ट समजले जाते. ते भिंग वापरल्यास फुलपाखराच्या खूप जवळ न जाता सुद्धा उत्कृष्ट छायचित्र टिपता येते. ऑटो तसेच स्पोर्ट मोड वापरुन सुद्धा फुलपाखराच्या अनेक हालचाली चित्रबद्ध करता येतात. खूप जास्त डेप्थ हवी असेल तर मात्र जास्तीचे फ्लॅश लावता येतात. तसेच कॅमेर्‍याचे विशेष सेटिंग वापरुन अशी छायाचित्रे मिळविता येतात.

काही जणांना फुलपाखरांच्या जीवनचक्राची, म्हणजे अंडी, सुरवंत, तसेच कोशीताची छायाचित्रे घ्यायची असतात. त्याकरिता मॅक्रो लेंसेस आवश्यक असतात. डिजिटल कॅमेर्‍यांमुळे व दिवसेंदिवस त्यात वाढत चाललेल्या सुविधांमुळे कुठलेही छायाचित्रण अगदीच सुलभ झाले आहे. कारण अशा कॅमेर्‍यांमध्ये (तसेच अनेक स्मार्ट फोन व अँड्रॉइड फोन मध्ये सुद्धा आजकाल) ‘मॅक्रो’ फोटोग्राफी सुविधा दिलेली असते. त्यावर कॅमेरा सेट केला की इतर सर्व गोष्टी कॅमेराच ठरवितो आणि आपण बिनदिक्कत छायाचित्रण करू शकतो. फुलपाखरू अगदीच जवळ असेल तर मोबाईल फोनमधून काढलेल्या छायाचित्रात मागील अधिवास सुद्धा फोकस मध्ये दिसतो. त्यामुळे ‘वाईड अॅंगल’ चा आनंद मिळतो. पण मोबाईल फोनमधून फुलपाखराचे छायाचित्र काढणे सोपे नसते. कारण मोठी फुलपाखरे एकदा उन्हं तापले की सहजी आपल्याला जवळ येऊ देत नाहीत. त्यासाठी धिराने त्यांचा पिच्छा पुरवून हळुवारपणे जवळ जावे लागते. तेव्हा कुठे सुंदर ‘वॉव’ मिळवणारे छायाचित्र मिळते.

डॉ. राजू कसंबे
पक्षीशास्त्रज्ञ,
सहाय्यक संचालक – शिक्षण,
बॉम्बे नचरल हिस्ट्री सोसायटी,
मुंबई -४००००१
दूरध्वनी: ९००४९२४७३१.

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सामना, मुंबई. दि. २७ जुलै २०१९)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे सकाळी कोवळे उन्हं पडलेले असताना बरीच फुलपाखरे पंख उघडलेल्या ‘सूर्यस्नान’ घेतानाच्या स्थितीत चित्रबद्ध करता येतात. >>>

चांगली क्लूप्ती सांगीतलीत. धन्यवाद

आज प्रभातफेरीच्या वेळी फुलपाखरांवर लक्ष ठेवले होते. ढगाळ वातावरणामुळे नेहमी दिसणारी फुलपाखरे दिसली नाहीत. हे कवडी फुलपाखरु एकटेच बागडत होते.
23C0462B-F5A4-44E0-B42D-6D18754697D7.jpeg
.
9581425E-EA30-42BC-9C53-51D0B2DDA4AC.jpeg

@कपकेक,
फुलपाखराचे नाव आहे कवडी. (Tarucus प्रजाती)