गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी

Submitted by 'सिद्धि' on 21 July, 2019 - 06:51

आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येक घरी एक विशिष्ट प्रकारचा मसाला वापरात असतोच. कांदा-खोबर मसाला,तिळकुट,गरम मसाला,घाटी पद्धतीचा मसाला, मालवणी मसाला, कोंकणी मसाला वगैरे वगैरे. असे मसाल्याचे खुप प्रकार आहेत आणि त्यांचा वापर ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण ऐनवेळी पाहुणे वैगरे आले आणि एखादा मसाला करायचं झालं तर वेळ जास्त लागतो आणि जेवणासाठी उशीर होऊ शकतो.
यासाठी मी आईनेच शिकवलेल्या पद्धतीने गोडा मसाला नेहमी तयार ठेवते. आपल्याला माहितच असेल की गोडा म्हणजे प्रत्यक्ष गोड चव नसुन हे त्याचं एक नाव आहे. हा नेहमी च्या वापरातला एक कॉमन मसाला आहे. कॉमन यासाठी कारण कडधान्य उसळी पासून ते तिखट आमटी, सुक्क चिकन,मटण, खेकड्यांचा रस्सा तसेच मच्छी चे कालवन/ तिखल अश्या सगळ्या प्रकारच्या स्वयंपाकासाठी आपण हा मसाला वापरू शकता. रेसिपी झटपट होते. उदा. चण्याची भाजी करायची असेल तर आपण करत असलेल्या फोडणी मध्ये नेहमी प्रमाणे मोहरी,थोडा कांदा आणि टोमॅटो, यामध्ये हा गोडा मसाला ३-४ चमचे तुमच्या अंदाजाने घाला, आणि त्यानंतर हळद, मिरची पावडर, मिठ, गरम मसाला पावडर घालून मस्त रसरशीत चण्याची भाजी होते.
1563607570749.jpg

तर याची पाककृती पुढील प्रमाणे आहे.

साहित्य:- मिडियम आकाराचे ९ कांदे, सुख खोबरं २ वाटी आणि ओल खोबर १ वाटी, (तीन कांद्यासाठी एक वाटी खोबरं हे प्रमाण. ओल किंवा सुख कोणत्याही प्रकारे खोबरं वापरु शकता)
३ लसुण चे कांदे, बोटभर आदरक स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घ्यावेत, एक वाटी पुदीना व एक वाटी कोथिंबीर स्वच्छ करून घ्यावी. २-३ चमचे तेल. १ मोठा चमचा मीठ.
1563607157638.jpgकृती:-
प्रथम कांदे उभे पातळसर कापुन घ्या. गॅस लावुन मंद आचेवर कढई मध्ये २-४ चमचे तेल आणि मीठ घालून त्यात सर्व कांदे मस्त मऊ, एकजीव आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्या. जास्त करपु देउन नये, थोडंफार चालेल. मध्ये मध्ये कालथ्याने ढवळुन घ्यावे. हे डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या.
नंतर किसुन घेतलेलं खोबरं कढई मध्ये घालून सारखे व्यवस्थित ढवळून घ्या. तांबुस सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करावा व हे देखील थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या. ओल व सुख दोन्ही खोबरं वेगवेगळ भाजून घ्या.
आता थंड झाल्यावर कांदे,खोबरं मिक्सर मधून बारीक करून घ्या. आदरक व लसूण एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी, तसेच पुदीना आणि कोथिंबीर यांची देखील मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
1563607190760.jpg
शेवटी वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. आत्ता हा मसाला तयार आहे.
डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
1563607599462.jpgटीप:-
* पानांबरोबर कोंथिबीरी चे कोवळे देठ देखील टाकून न देता या मध्ये वापरता येतात.
*ओल खोबर भाजायला सुक्या खोबऱ्याचा तुलनेने जास्त वेळ लागतो. एकत्र केल्यास कच्च राहू नये म्हणून ते वेगवेगळे भाजून घ्यावेत.
* वरिला प्रमाण घेऊन अर्धा ते पाऊण किलो मसाला तयार होतो. अर्थात कांदे आणि खोबर वैगरे चां आकार कमी जास्त असु शकतो म्हणून थोडासा फरक पडू शकतो.
*तुमची मसाल्याची पाककृती नक्की शेअर करा.

एक आठवण-
पाणी अजिबात वापरले नसल्याने मसाला महिनाभर आरामात टिकतो. खराब होत नाही किंवा चविमध्ये बदल होत नाही.
आई सांगत असते "पुर्वी गावी फ्रीज नसायचे त्या वेळी याच मसाल्या (सुख खोबरं वापरून आणि पुदीना नाही असा केलेला) मध्ये मसाल्याच्या १/४ लाल मिरची पावडर आणि ५-६ चमचे मीठ घालून ठेवायचे. १०-१५ दिवस हा मसाला फ्रीज चा बाहेर ठेवला तरीही खराब होत नाही".
साधारण तीन वर्षापूर्वी मी पुण्याला होते तेव्हा ची गोष्ट. पि.जी. राहत असल्याने माझ्या रुम मध्ये फ्रीज न्हवता. त्या वेळी आई असा मसाला बनवुन मला देत असे. जेव्हा मेस च्या भाजीचा कंटाळा यायचा तेव्हा पोळी किंवा भाकरी वरती छोटा मसाल्याचा गोळा असाच ठेवून खाण्यात वेगळाच आनंद होता.

(अपेक्षीत लेखनाच्या दुरुस्ती नक्की सांगा!)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारात मिळणारा गोडा मसाला असाच असतो का?

आई उसळींसाठी ऐनवेळी कांदा, खोबरं, लसूण यांचं वाटण करत आलीय. मी त्यातच सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी, लवंग , दालचिनी हेपण घालतो. आलं किसून फोडणीत वेगळं.
तसंच आमच्याकडे मुगाच्या उसळीला हिरवी मिरची आणि आलं यांशिवाय दुसरं काही घालत नाहीत. सोमवारच्या उपासाला मुगाची उसळ ठरलेली असे, त्यामुळे आता कोणत्याही वारी केली तरी अशीच करतो.

मटकी, काळा वाटाणा यांच्यासाठी हे वरचं वाटण. मुगाशिवाय बाकी उसळींना तिखट किंवा वाटणातच लाल मिरच्या.
छोले आणि चवळीच्या उसळीत मी टमाटो वापरतो. पण त्यात विकतचा गरम मसाला जातो.

तुम्ही दिले ल्या कृतीने मसाला करून पाहीन.

तुम्ही लेखनात दुरुस्ती विचारलीच आहे तर
वैगरे - वगैरे

बाजारात मिळणारा गोडा मसाला असाच असतो का?
- काही कल्पना नाही. घरी तयारच असतो त्यामुळे विकतचा केव्हा आणला नाही.

भरत धन्यवाद दुरूस्ती केली आहे.
पण युग,मटकी,काळे किंवा पांढरे वाटाणे, चणे यांची भाजी आम्ही हाच मसाला वापरून करतो.

" उपासाला मुगाची उसळ" या पद्धतीने पण केली जाते पण मी करत नाही... करुन बघेन.
- आई करते आणि भाजी पोळी बरोबर न खाता ती आम्ही अशीच वाटीभर घेऊन खातो.

वा, मस्त रेसिपी! नक्की करून पहाणार.अर्धे प्रमाण घेऊनच.एक शंका : कोथिंबीर,आले,लसणाच्या पेस्टमुळे खराब नाही का होत? तू, तळटीपेत दिले आहेसच तरीही विचारते.

बाजारात मिळणारा गोडा मसाला असाच असतो का?>>>>> नाही. तो वेगळा असतो.त्यात कांदे,लसूण वगैरे नसतात.

कोथिंबीर,आले,लसणाच्या पेस्टमुळे खराब नाही का होत?
देवकी ताई - नाही होणार खराब. हे सगळं पाणी न वापरता करायचं आहे.
ट्राय म्हणुन तुम्ही १ वाटी खोबरं आणि ३ कांदे प्रमाण घेऊन करून बघा.

मी परवाच गोडा मसाला बेडेकर ह्यांचा पावडर विकत आणला. तुम्ही जे लिहीले आहे त्याला आम्ही वाटण म्हणतो. गोडा मसाला पावडर पुणेरी स्वयंपाकात वापरतात.

सुके खोबरे, आदरक च्या ऐवजी आले, करपू ढवळून

तुम्ही दिलेली बेसिक वाटणाची कृती पण उपयोगाची आहे. भरली वांगी तसेच रस्से छान करता येतील. सध्या आमच्या बाईंनी एक मालवणी
मसाला दिला आहे तो घालून चिकन व प्रॉन्स मस्त कालवणे होतात.

छान आणि उपयुक्त आहे रेसिपी. पण हा गोडा मसाला नाही. याला वाटण म्हणता येईल. गोड्या मसाल्यात पुदिना कोथिंबीर आले लसून असे काही नसते.

वाटण म्हणजे आमच्याकडे फक्त ओला नारळ, कांदे, लसुण यात पाणी घालून ऐनवेळी केलेल थोड पातळसर वाटप.
याला आमच्याकडे ओल वाटप म्हणतात. (माझ्या कडे सध्या फोटो नाही म्हणून नेट वरून हा फोटो घेतला आहे.)
IMG_20190721_192443.png

मी दिलेली कृती गोडा मसाला आहे अजिबात पाणी न वापरता केलेला. यामध्ये तेल वापरले आहे, त्यामुळे थोडा ओलसर दिसत आहे. पण तेल न वापरता अगदी सुका चटणी प्रमाणे होतो.
कोणी कोकणातील चिपळूण ते देवरुख च्या आसपास चे गाववाले असतील तर त्यांना हा मसाला माहित असणार आणि नाव ही.

BLACKCAT,अमा- भरली वांगी करता येतात. आम्ही पण करतो.

maitreyee बरोबर पण काही शब्द प्रादेशिक असतात. परदेशा नुसार बदलतात.

हो हे खरंय Happy विदर्भातल्या माझ्या साबा गरम मसाल्याला काळा मसाला म्हणतात आणि आम्ही गोड्या मसाल्याला काळा मसाला म्हणतो !

मै ने लिहिल्याप्रमाणे आमच्याकडे जो गोडा मसाला भाजी, आमटी, उसळींकरता वापरला जातो त्यात कांदा, कोथिंबीर, पुदिना हे जिन्नस नसतात. त्यालाच काळा मसाला म्हणतात पण गोडा मसाला हे नाव जास्त प्रचलित आहे.

त्यालाच काळा मसाला म्हणतात पण गोडा मसाला हे नाव जास्त प्रचलित आहे. >>> आणि तो वर्षभर टिकतो Wink

माझ्या आईचं माहेर चिपळूणचं. पण तिने किंवा आजीने अश्या प्रकारचा गोडा मसाला केलेला पाहिला नाही. घरच्या चिंच गुळाच्या भाज्यांना साठवणीचा गोडा मसाला व ओलं खोबऱ्याचाच रस व चव असते. कधी ओल्या खोबऱ्याऐवजी दाण्याचं कूट. कधी पोळी ताटलीत पसरून त्यावर गोडा मसाला व कच्चं तेल घालून पसरवून गुंडाळी करून खायची.. मस्त लागते.

तुमच्या पद्धतीचा गोडा मसालाही छानच लागेल.

मसाला रेसिपी मस्त आहे. सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे मसाला वांग्याची किंवा भरल्या परवलची भाजी इ करताना हे 'वाटण' यम्मी लागेल.

पण परत नावातली controversy Lol माझ्यासाठी हा गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि ऐन वेळी करतात ते फ्रेश वाटण यांचं मिक्सचर आहे.

गोडा मसाला हा उन्हाळ्यात वर्षभरासाठी टिकाऊ करतात. केप्र, प्रवीण, प्रकाश इ मसाल्याच्या नावाजलेल्या कंपनीज जो गोडा मसाला म्हणून विकतात तो टिकाऊ आणि ज्याला मी गोडा मसाला म्हणून ओळखते तोच. यात कांदा लसूण नसतो त्यामुळे नैवेद्य किंवा कार्यात वापरला जातो. बाकी पदार्थाच्या गरजेनुसार आलं लसूण कोथिंबीर ओलं खोबरं ऐन वेळेस वाटून गोड्या मसाल्याच्या बरोबरीने ऍड केलं जातं. Happy

अश्विनी के अन् मीरा.. धन्यवाद.
चला रेसिपी आवडली त्या बद्दल सगळ्यांचे आभार.
कुणाला या रेसिपी चा काही उपयोग झाला तर उत्तम.
अगदी भरून पावले.;) Wink Wink

मी माझं नवीन नवीन रेसिपी टाकण्याचं काम चालू ठेवते.
बाकी controversy शोधण्यासाठी मा.बो. कर आहेतच त्यांच नेहमी प्रमाणे स्वागत आहे.

माझी आई गोडा मसाला तयार करताना कांदे चिरुन उन्हात वाळवुन नंतर तेलात गुलाबीसर परतते.(कांदा उन्हात वाळवल्यामुळे लवकर परतल्या जातो.)
सुकं खोबरे,हावरे तीळ,धने,जीरे,बडीशेप,आलं-लसुण मंद आचेवर भाजुन घेते.नंतर मिक्सरला बारीक वाटुन घेते.[नेमकं प्रमाण माहीती नाही.]

छान आहे कृती.
भरत, कांदा, दालचीनी वगैरे सगळ्याबरोबर कच्चेच वाटायचे का?

सिद्धी छान रेसिपी!
आणि तुझ्या पद्धतीने केलेलं पुडिंग छान झालं होतं हेही आवर्जून इथेच सांगते!

सुनिधी, कांदा उभा चिरून तेलावर खरपूस भाजून घ्यायचा. ओलं खोबरं असेल तर तेही चांगलं शेकायचं. बाकीचे जिन्नसही शेकून घ्यायचे.
मी धणे लिहायला विसरलो. तसंच आमच्याकडे १ मध्यम कांद्याला नारळाची एक कवड (वाटी) असं प्रमाण असतं.

सहज फ्रिज मध्ये डब्बा होता म्हणुन फोटो काढला.
IMG_20190722_075323_HDR.jpg

मिसेस पोफळी गावची, चिपळूण पासुन तासाच अन्तर. घरोघरी तयार असणारा मसाला, ती ही गोडाचा मसाला म्हणते.
फार उपयोगी. चवी बरोबर वेळ वाचतो. भाजीमध्ये consistency च काम उत्तम करतो.
अंडा भरीत तसेच थोडा शेंगदाणे कूट टाकुन वांगी भरीत भारी होत.

मीरा यानी "मिक्सचर आहे" असे म्हटले आहे. तर मिक्शर केल्याशिवाय मसाले तयार होत नाहीत, नाहीतर सगळ्या ठिकानच्या जेवनाची टेस्ट सारखी असती.

मस्त आहे हा मसाला.मी नक्की करुन बघेन. हे टीकावु वाटणं च झालं एक प्रकारचं.
कोकणात याला गोडा मसाला म्हणतात का ?
आमच्या कराड , सातारा, कोल्हापुर साईड ला गोडा मसाला मधे कांदा लसुण अजिबात नसतो. सगळे खडे मसाले भाजुन डंखावर कुटुन तो मसाला बनवतात. चिंच गुळाची आमटी, भाज्या , उसळी ई साठी तो मसाला आम्ही रोज वापरतो . तो मसाला नैवेद्याच्या भाज्या आमट्यांसाठी वापरतात.आणि वर्षभर फ्रीजशिवाय टिकतो.
कांदा लसुन घातलं की तो कांदा-लसुण मसाला होतो Happy
कांदा उन्हात वाळवुन मग तळुन ई ई करुन तो बनवतात. आणि तो सुद्धा फ्रिजशिवाय वर्षभर राहतो.
असो. तुमचा हा मसाला मस्त आहे पण. कोथिंबीर आणि पुदीना कोरडा करुन थोड्या तेलावर परतुन मिक्सर वर फिरवला तर अजुन जास्त टिकु शकेल.

हा तर वाटलेला मसाला.
माझा नेहमीच असतो. आठवड्यासाठीचा वाटुन ठेवते. उसळी, चिकन, मटण, मासे सगळ्यासाठी.
ह्याला गोडा मसाला नाही म्हणत आम्ही.
ओलं खोबरं, लसुण, आलं, कोथिंबीर वाटुन गोडा मसाला होतो. हा मसाला घातलेली गोडी डाळ भारी होते.

मीही ह्याला वाटण म्हणते. नवऱ्याला ऍसिडिटीचा टोकाचा (extreme)त्रास असल्याने राजमा, पांढरीं चवळी ह्यासाठी तुमच्या पद्धतीने वाटण बनवते. कारण ह्यात टोमॅटो नाहीय. छान लागतात ह्या वाटणानी केलेल्या उसळी.

सुनिधीताई धन्यवाद.

महाश्वेता-दी तुमच्या लिखाणा मधून वेळात वेळ काढून रेसिपी केली. आणि माझ्यावर विश्वास ठेवला या बद्दल मनापासुन आभार.... आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

A आदि- फोटो मस्त. Bw
अंडा भरीत मी विसरले होते. बर केलंत आठवण करून दिली.

स्मितादी- धन्यवाद.
जास्तीत जास्त महिनाभर टिकतो हा मसाला.
"कराड , सातारा, कोल्हापुर साईड ला गोडा मसाला मधे कांदा लसुण अजिबात नसतो".तो मसाला वर्ष वर्ष टिकतो असं ऐकुन आहे.
वेळ मिळाला तर कोणीतरी वरिल रेसिपी सांगा.

स्मिता दी धन्यवाद.
"ओलं खोबरं, लसुण, आलं, कोथिंबीर वाटुन गोडा मसाला होतो"- हा माझ्यासाठी वाटणाच्या डाळीचा मसाला.

me_rucha- धन्यवाद.

'सिद्धि' ,आज माझी बाई म्हणत होती की आम्ही याला घाटी मसाला म्हणतो.तीही बराचसा तुझ्या मसाल्यासारखा करते.मी आज करतेय तो सांगितलेला मसाला.

'सिद्धि' ,आज माझी बाई म्हणत होती की आम्ही याला घाटी मसाला म्हणतो.
देवकी ताई- आता हे माझ्यासाठी नविन नाव झाल. Lol Lol Lol
- पण नाव काहीही असो, मसाला केल्यावर टेस्ट कशी आहे नक्की कळवा आणि जमल तर फोटो ही द्या.

IMG_20190722_122901~2.jpg

फोटोत पिवळा दिसत असला तरी तसा नाही.फ्लॅश पडला म्हणून असेलही.अर्धे प्रमाण घेतले होते.वापरल्यावर सांगेन.

मस्त वाटतोय.
आम्ही याला वाटण म्हणतो. आमचा गोडा मसाला पावडर स्वरुपात असतो.

देवकी ताई-
फोटो छान आहे. बादवे पुरावा म्हणून नाही हा. Lol
फोटो बघून समाधान मिळत मला.

शालीदा tnx.

Pages