रिपरिप (मुक्तछंद)
तुझे बंद ढगाळ डोळे अन्
त्यांतून सरणारा पाऊस
आता ओळखीचा झालाय.
पण एक खरं सांगू का,
पावसाच्या अमाप सरींनंतर
तुझ्या ओठांवर पडणारं,
फिक्कट गुलाबी इंद्रधनु,
मला खरंतर जास्त आवडतं!
तुझ्या मनाच्या या आभाळाला
कुठला असा काठच नाहीये!
अपरिमित अथांग आहेस तू.
म्हणून कधीकधी अवघड जातं
तुझं मन पूर्ण समजून घेताना.
फेसाळत्या अथांग समुद्रालाही
कुठेतरी किनारा लागून असतो.
त्यामुळं तू सागराहून गूढ आहेस.
सुखमय दिखाव्यांच्या चौकटी
न आखल्यामुळेच कदाचित,
तुझे डोळे रिपरिपत असावेत.
कारण आयुष्याच्या सारीपाटात
तुला काही लपवणं जमत नाही.
तू स्वैर, मुक्त, स्वच्छंदी आहेस.
पण आज मात्र सांगावंच लागेल,
तुझ्या मनाचा हा उघडपणा कधी
मला असा आत भावलाच नाही ;
कारण मुक्तत्व ल्यालेल्या अभ्र्यात
खरंतर धुमसत आहेस कायमच!
तुला वाटतं तू अप्राप्य आहेस.
क्षितिजाशी जरा ओठंगून तुला
पहायला आवडतं शूद्र जग,
टपोऱ्या निळ्याशार डोळ्यांनी.
कोणीच तुला गाठू शकत नाही,
हा खोटा विश्वास जोजवत.
पण तुलाही जगाची गरज आहे
हे तुला लक्षातही नसतं कधी.
तुझे टपोरे अश्रू सामावून घ्यायला
लांबवरचं जगच समोर येतं ना!
कधीकाळी तुला या असण्याचा,
अहंकारही भरुन आला असेल.
पण मला तुझं पारदर्शी मन
स्फटिकासारखं वाचता येतं.
तुझ्या या एकाकी असण्याचा
खरंतर तुला फार वीट आलाय.
तुला तुझ्या मनाच्या पोकळीत
एखादं स्थिर अस्तित्व भरायचंय.
पण सगळे व्यग्र असतात स्वतःत
अन् याचाच त्रास होतो तुला, खूप!
आज ना खरं सांगून टाक मला,
याचसाठी तुला टपोऱ्या अश्रूंनी
जग भिजवून टाकावं वाटतं ना?
तू कधी कोणाशी बोलत नाहीस.
मूकपणे सोसत राहतं तुझं स्वपण.
तुझे उनाड दिशाहीन विचार मात्र
करतात कधीमधी मोठा गडगडाट.
पण त्यांवरही करवादतं मन तुझं.
खरंतर तुझा कंठ पाझरु लागला,
तर सारं जग चूप होईल कायमचं
आपापल्या माना खाली घालून.
पण तो तर तुझा स्वभावच नाही.
जगानं वेगळ्या पारड्यात तोललं,
तरी मला काही त्याची पर्वा नाही.
माझ्या नजरेत तू सामान्य आहेस.
आयुष्याच्या उजाडपणात जगताना
तुलाही झळा सोसाव्या लागतात.
तूही तुझ्या अश्रूंचा पाऊस पाडतेस
मनाचे साचले ढग ओथंबून गेले की.
अखेर कोणी आपलं नाही मानून
तूही थंड होत जातेस शेवटी.
याला असामान्यत्व का म्हणू?
- © द्वादशांगुला
(शीर्षक बदलले आहे (३ वेळा ) .. क्षमस्व )
जुई मला अजुन दोन तिनदा वाचूदे
जुई मला अजुन दोन तिनदा वाचूदे मग देतो प्रतिसाद.
ढगाळ डोळे, रिपरीपणारे डोळे, पाझरणारा कंठ वाचून भारी वाटलं.
खूपच छान ! जुया पु.क.शु.
खूपच छान ! जुया
पु.क.शु.
DD प्रतिसादासाठी शब्द कमी
DD प्रतिसादासाठी शब्द कमी पडताएत. पु.क.प्र!
वाह जुईले!! एकच नंबर..
वाह जुईले!! एकच नंबर..
शब्दांची पेरणी अफाट आहे
ढगाळ डोळे, रिपरीपणारे डोळे,
ढगाळ डोळे, रिपरीपणारे डोळे, पाझरणारा कंठ वाचून भारी वाटलं. >> धन्स
मेघातै, मन्या, खूपसारे धन्स
किल्लीतै धन्नु
बरी आहे कविता.
बरी आहे कविता.
बरं अक्की, धन्स
बरं अक्की, धन्स
चांगली भलीमोठी आहे कविता.
चांगली भलीमोठी आहे कविता.
अन शब्दरचना ही मस्त जुळून आली आहे.
धन्यवाद सिद्धीजी
धन्यवाद सिद्धीजी
ही पण कविता छान आहे.
ही पण कविता छान आहे.
तुम्ही शब्दसंपन्न आहात.
तुम्ही शब्दसंपन्न आहात.
ओठंगून हे याआधी एकदाच, तेही कवितेतच वाचल्याचं आठवत़य. तिथेही क्षितिजच होतं बहुतेक.
कविता खूप पोक्त , समंजस आहे. पावसाचं रूपकही जमलंय.
अभ्र्यात की अभ्रात?
आवडली.
परत एकदा धन्स अक्की
परत एकदा धन्स अक्की
भरतजी धन्यवाद
भरतजी धन्यवाद
तुम्ही शब्दसंपन्न आहात. >> कौतुकाबद्दल धन्स
वाचण्यात आलेले शब्द लिहीताना आठवतात इतकंच..
ओठंगून हे याआधी एकदाच, तेही कवितेतच वाचल्याचं आठवत़य. तिथेही क्षितिजच होतं बहुतेक. >> 'ओठंगून' हा माझ्या आवडत्या शब्दांपैकी एक शब्द आहे.. हा शब्द तीन-चार वर्षांपूर्वी आठवी/ नववीत बालभारतीमध्ये माझ्या अभ्यासक्रमात एका कवितेतच आला होता. शांता शेळके किंवा पद्मा गोळेंची कविता असावी..
कविता खूप पोक्त , समंजस आहे. पावसाचं रूपकही जमलंय.>> धन्स.
अभ्र्यात की अभ्रात? >> बहुतेक अभ्र्यात वाचलेलं आठवतंय..
मूळ शब्द अभ्र की अभ्रा?
मूळ शब्द अभ्र की अभ्रा?
अभ्र असणार. त्याचं सामान्यरूप अभ्रा होईल. अभ्रा चं अभ्र्या.
छान आहे कविता, आवडली . मी
छान आहे कविता, आवडली . मी शीर्षक वाचूनच आत आले वाचायला.
मूळ शब्द अभ्र की अभ्रा? >>
मूळ शब्द अभ्र की अभ्रा? >> दोन्ही शब्द आहेत ना.. अभ्र (ढग) आणि अभ्रा (आच्छादन). मला या कवितेत 'अभ्र' अभिप्रेत होता.
'अभ्र' चं सप्तमी एकवचन 'अभ्रात' होईल की 'अभ्र्यात' याबद्दल घोळ झालाय.. 'अभ्रात' असा़वं असं वाटतं...
छान आहे कविता, आवडली . >>
छान आहे कविता, आवडली . >> धन्यवाद धनुडी जी
मी शीर्षक वाचूनच आत आले वाचायला. Happy >> तीनवेळा डोकं (शीर्षक) बदलून हे वालं बरोबर बसतंय तर
अप्रतिम....
अप्रतिम....
बापरे इतके लिहायला खुप
बापरे इतके लिहायला खुप stamina असावा लागतो अन ते हि छान
बापरे इतके लिहायला खुप
बापरे इतके लिहायला खुप stamina असावा लागतो अन ते हि छान >> धन्यवाद
माझ्या मते लिहिणं हेच खूप एनर्जेटिक आहे.. 
खुप छान.
खुप छान.
>>>मूळ शब्द अभ्र की अभ्रा? >>
>>>मूळ शब्द अभ्र की अभ्रा? >> दोन्ही शब्द आहेत ना.. अभ्र (ढग) आणि अभ्रा (आच्छादन). मला या कवितेत 'अभ्र' अभिप्रेत होता.
'अभ्र' चं सप्तमी एकवचन 'अभ्रात' होईल की 'अभ्र्यात' याबद्दल घोळ झालाय.. 'अभ्रात' असा़वं असं वाटतं...<<<
अभ्र असेल तर अभ्रात होईल...
आणि उशांचे अभ्रे असतात त्यात काही भरायच असेल तर 'अभ्र्यात भरुन ठेव' असं म्हणतील, असं वाटतंय..
कविता तर आवडलीच पण त्यात उभं
कविता तर आवडलीच पण त्यात उभं केलेलं व्यक्तीमत्व, त्याचं कळलेलं मन याबाबतचा विचार जास्त आवडला...
अतिशय प्रगल्भ विचार..
धन्यवाद सचिनजी, निरुजी
धन्यवाद सचिनजी, निरुजी
अभ्र असेल तर अभ्रात होईल...
अभ्र असेल तर अभ्रात होईल...
आणि उशांचे अभ्रे असतात त्यात काही भरायच असेल तर 'अभ्र्यात भरुन ठेव' असं म्हणतील, असं वाटतंय.. >> हम्म बरोबर वाटतंय..
'अभ्र्यात' हा शब्दपण बरोबर बसलाय, म्हणून आहे तसंच ठेवते