बिरादरीची माणसं - गोविंद काका

Submitted by लोकेश तमगीरे on 20 June, 2019 - 01:07

बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका". लोक बिरादरी प्रकल्पाचे सर्वात पहिले कार्यकर्ते म्हणून ते आजही बिरादरीत ओळखले जातात.

‘गोविंद बेचंद यादव’ हे त्यांचे पूर्ण नाव. १९५२ साली, बेचंद आणि दुखणी यादव या शेती आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या गवळी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गोविंद काका हे मुळचे बिहारचे. बालपण अगदी मजेत गेलं, पण पुढे तरुण वयात त्यांना कुष्ठरोग झाल्याचे कळले. कुष्ठरोग्यांच्या आनंदवनाची महती आता भारतातल्या काना-कोपऱ्यात पोहोचली होती. अशीच खबर बिहारच्या पटना जिल्ह्यातील मुर्गीयाचक नावाच्या गावी असणाऱ्या आमच्या गोविंद काकांपर्यंत पोहोचली. शिवाय त्यांच्याच गावातील एक जवळचा माणूस आनंदवनात कुष्ठरोगाची ट्रीटमेंट घेत होता.

govind kaka - Kerwanti Kaku.jpgगोविंद काका व केरवंती ताई

हे साल होत १९६४ चं, महारोग्याची पूर्ण चिकित्सा आनंदवन मध्ये मोफत होते ही माहिती मित्राकडून कळल्यावर गोविंद काका ३-४ कुष्ठरोग्यांसोबत सर्वप्रथम वर्धा येथील दत्तापूर या गावी आले. इथे सुद्धा कुष्ठरोगाची उत्तम ट्रीटमेंट होत होती आणि आनंदवनाशी ते संलग्न होते. पण अतिरिक्त बेड आणि राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे डॉक्टरांना त्यांना नकार द्यावा लागला. दत्तापूरला बिहार मधीलच सागर नावाची व्यक्ती गोविंद काकांना भेटली. दत्तापूरला व्यवस्था न झाल्यामुळे तो गोविंद काकांना आनंदवन, वरोरा येथे घेऊन आला. एक रात्र आनंदवन मध्ये काढल्यावर गोविंद काकांना कळले की सोमनाथ प्रकल्पामध्ये काही बिहारचे लोक कार्यरत आहेत. आपल्याला आपल्याच गावाच्या लोकांचा आधार मिळेल आणि मुख्यतः भाषेचाही प्रश्न सुटेल म्हणून गोविंद काकांनीच स्वतः सोमनाथ मध्ये काम करायची इच्छा दर्शवली. सोमनाथ प्रकल्प जंगल भागामध्ये असल्यामुळे तिथे काम करायला लोकं सहसा तयार नाही व्हायची आणि गोविंद काकांनी स्वतःहूनच तिथे जातो म्हटल्यावर आनंदवनातील कार्यकर्ते खूप खुश झाले. शिवाय कुष्ठरोगाचा इलाज आणि राहण्या-खाण्याची व्यवस्था मोफत होणारच होती. आणि त्याहूनही मोठं म्हणजे आपलं मानणाऱ्या बऱ्याच लोकांचा सहवास मिळणार होता. मग दुसऱ्याच दिवशी ट्रॅक्टरमध्ये बसून गोविंद काका सोमनाथला रवाना झाले.

सोमनाथला पोहोचल्यावर जेव्हा पहिली गाठभेट झाली, तेव्हा बाबांनी तिथे काम करणाऱ्या जगदीशला गोविंद काका आणि सोबतच्या अन्य लोकांबद्दल विचारले, “जगदीश, ही पोरं कशी आहेत?” जगदीश हा बिहारचाच असल्यामुळे त्याला या सर्वांबद्दल माहिती होती. जगदीश बाबांना म्हणाला, “बाबा, समाजाने वाळीत टाकलेली हे सर्व कुष्ठरोगी आनंदवनाच्या शोधात बिहारहून थेट सोमनाथपर्यंत पोहोचले. आपल्याशिवाय यांना कुणीही स्वीकारणार नाही. हे निश्चितच चांगलं काम करतील.” आणि नंतर बाबांनी सर्वांना आपल्या कार्यात सामील करून घेतलं. बाबांनी स्वीकारल्यामुळे गोविंदकाका खूप खुश झाले. बाबांनी गोविंद काकांना शेतीची कामे दिली. ४ ते ५ वर्ष सोमनाथला गोविंद काकांनी शेतीची कामे आवडीने केली.

दरम्यान अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावामध्ये संस्थेच्या कामासाठी शासनाकडून जागा मिळाली. नागेपल्लीला शेती विकसित करण्याच्या दृष्टीने बाबांनी १५-२० लोकांना येण्यास सांगितले, त्यात गोविंदकाका सुद्धा होते. नागेपल्लीला ६ महिन्यांचा मुक्काम झाला. तिथे सर्व सहकाऱ्यांसोबत गोविंदकाकांनी विहीर खोदली, अनेक राहण्यायोग्य झोपड्या बनवल्या, शेत जमीनी तयार केल्या.

पुढे १९७३ पासून गोविंद काका लोक बिरादरीलाच स्थायिक झाले. काही महिन्यानंतर त्यांची भेट झाली केरवंती ताईशी. केरवंती ताई म्हणजे गोविंद काकांची अर्धांगिनी. कुष्ठरोगाच्या उपचारासाठी भिवापूर गावातून त्या आनंदवनला पोहोचल्या. एक वर्ष आनंदवनला शेती कामे केल्यानंतर त्या लोक बिरादरीला आल्या. गोविंद काकांच्या भेटीनंतर पुढे बिरादरीतच लग्न झाले.

त्याकाळी भामरागड म्हणजे फक्त घनदाट जंगल, नद्या-नाले यांनी वेढलेला भाग. कित्येकदा पावसाळ्यामधे लोक दवाखान्यात येऊ शकत नव्हते. तेव्हा त्यांना त्यांच्याच गावात ट्रीटमेंट मिळावी या उद्देशाने प्रकाशभाऊंनी आणि मंदाकाकूंनी कोठी, कुडकेली, येचली, नेलगुंडा, हिदूर, लाहेरी, नागेपल्ली या सात गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु केली. गोविंद काकांना सुरुवातीला नेलगुंडा आरोग्य केंद्राची जबाबदारी दिली. नेलगुंडा हे बिरादरीपासून २७ किलोमीटर अंतरावर. जाण्यासाठी फक्त जंगल रस्ता. अशा या दुर्गम भागी गोविंद काका आणि केरवंती ताई जायला तयार झाले. सामान्य, परंतु उपचार न केल्यास जीवघेणे आजार जसे मलेरिया, कुठलाही ताप, पोटदुखी, अंगदुखी, जुलाब, जखमा इत्यादी विषयक ट्रेनिंग त्यांनी वहिनी-भाऊंकडून घेतली होती. दिवसातून १०-१२ पेशंट्स असायचे. औषधे ही गोळ्या आणि इंजेक्शन स्वरूपात असायची. नंतर एक वर्ष कोठी आरोग्य केंद्र बघितले आणि मग १६ वर्षे हिदूर केंद्र सांभाळले. या संपूर्ण प्रवासामध्ये गोविंद काकांची पत्नी केरवंती त्यांच्या सोबत होती. कुठलंही शिक्षण नसतांना भाऊ-वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सोबतीने १८ वर्ष रोग्यांची सेवा करण्याची संधी गोविंद काकांना मिळाली याचे निश्चितच त्यांना समाधान आहे.

एकदा घडलेला किस्सा गोविंद काका मोठ्या आठवणीने सांगतात. एके वेळी भाऊ, वहिनी, पिल्लू दादा, रेणुका आत्या, विलास भाऊ हे सर्वजण बेजूरला फिरायला गेले होते. बेजूर हे गाव हेमलकसाहुन साधारणतः ५ किलोमीटर अंतरावर आहे. बेजूर जंगलात फेर-फटका मारत असतांना अचानक कुण्या एका गावातील मुलाने मधमाशांच्या पोळ्याला दगड़ फेकुन मारला. सर्व मधमाश्या उडू लागल्या. सर्वजण अगदीच जवळ असल्याने मधमाशा त्यांना चावू लागल्या. सर्वजण होईल तसा बचाव करत होते. पिल्लू दादाला [डॉ. दिगंत आमटे] रेणुका आत्याने कापडामध्ये झाकले. सर्वात जास्त मधमाश्या मंदावहिनींना चावल्या. ही बातमी बिरादरीत कुणीतरी पोहोचवली. इतर कार्यकर्त्यांसोबत गोविंद काका सुद्धा पळत बेजुरच्या जंगलात गेले. आणि डोली मध्ये बसवून मंदा काकूंना बिरादरी पर्यंत घेऊन आले. योग्य उपचार झाल्यावर आणि सर्वांची प्रकृती व्यवस्थित झाल्यावर कुठे सर्वाच्या चेहेऱ्यावर समाधान झळकले.

घनदाट जंगल, वीज नाही, अन्य कुठलीही करमणुकीची साधने नाही मग वेळ घालवायचा तरी कसा. शिवाय पूर्ण कपडे घातलेल्या लोकांना बघून अर्धनग्न माडिया आदिवासी पळून जायचे. मग बाबा सर्वांचे मन ठेवण्यासाठी नेहमीच म्हणायचे, "कोंबडा बाजार बघून या .... नदीवर जेवण करायला जा. म्हणजे तुमचा वेळ चांगला जाईल". एकदा तर बाबांनी सर्वांना शपथ घ्यायला लावली. बाबा म्हणाले, “माड़िया आदिवासींच्या उत्थानासाठी सुरू केलेला लोक बिरादरी प्रकल्प आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय पुढे जाणार नाहीं. तेव्हा तुम्ही सर्वजण शपथ घ्या की कुणीही प्रकाश भाऊंना सोडून जाणार नाही." बाबांना दिलेली शपथ आजही आम्हाला जिद्दीने काम करायला प्रोत्साहित करते, असे गोविंद काका अभिमानाने सांगतात.

गोविंद काका प्रकाश भाऊंबद्दल आदराने सांगतात की, "आज पर्यंत प्रकाश भाऊ-मंदा वहिनी सर्वांना सोबत घेऊनच चालत आले आहे. त्यांनी आम्हाला कधीच वेगळं समजलं नाही. आरोग्य केंद्रावर काम करत असतांना बऱ्याचदा प्रकाश भाऊ स्वतः आम्हाला राशन आणून द्यायचे. कुठल्याचं कामाला त्यांनी कमी लेखलं नाही. लोकांना सोबत घेऊन काम करायचे एक जिवंत उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय प्रकाश भाऊ." पुढच्या पिढीबद्दल सुद्धा काका तेव्हढ्याच आत्मीयतेने सांगतात की, “आता अनुदादा (श्री. अनिकेत आमटे) आणि दिगंत दादा (डॉ. दिगंत आमटे) सुद्धा बिरादरीचे कार्य तेव्हढ्याच जिद्दीने पुढे नेत आहे. पहीले बाबा, मग प्रकाश भाऊ आणि आता अनिकेत - दिगंतदादांसोबत काम करायला मिळाल्याचं मला खूप समाधान आहे.”

असे हे आमचे गोविंद काका. बाबांना दिलेल्या शपथेला ध्यानात ठेऊन गोविंदकाकांचे कार्य आजही अविरत सुरु आहे. म्हणूनच लोक बिरादरीच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याला म्हणजेच आमच्या गोविंदकाकांना ‘बिरादरी’ चा सलाम!!

शब्दांकन:
डॉ. लोकेश व डॉ. सोनू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
पक्षी धाग्यावर लिहील तसं, नावावरून हेमलकसातील माणसांवर लेख आहे काही कळाले नव्हते. आता वाचला.
खरतर अ‍ॅडमिनने लेखमाला बनवून मुखपॄष्ठावर लिंक द्यायला हवी.

@चैत्रगंधा:
मनस्वी धन्यवाद ...!
प्रकाश भाऊ आणि मंदा वहिनी यांच्या प्रेरणेने एका झोपडी पासून सुरुवात करून आजची आधुनिक बिरादरी घडवणाऱ्या या लोक बिरादरीच्या जुन्या कार्यकर्त्यांबद्दल आपल्या सर्वांना माहिती मिळावी ... हा एकमात्र उद्देश.
आदरणीय प्रकाश भाऊंचे मनस्वी आभार.

तुमच्या लेखांमधुन अशा मनापासुन काम करणार्या लोकांची माहिती होतीये.नाहीतर कळणारही यांच्याबद्दल.

@Chaitrali:
चैत्राली आम्ही पण अगदी त्याच उद्देशाने सुरु केलं ..... मनस्वी धन्यवाद ...!