कॅलिग्राफी पेन (DIY)

Submitted by हरिहर. on 18 May, 2019 - 04:05

माझ्या मित्राच्या कथांचा संग्रह प्रकाशित करायचे ठरले. मग काय, घरचे कार्य असल्यासारखा मला उत्साह आला. कथांची निवड, थोडेफार एडिटींग, कथासंग्रहाचे नाव या पासुन ते मुहूर्त कधीचा आणि प्रमुख पाहुणे कोण येथपर्यंत सगळ्या गोष्टींची धांदल उडाली. एकदा असच घरी बसलो असताना त्याच्या कथासंग्रहाचे नाव सुचले. मग नावाबरोबरच एक रफ स्केच काढुन मित्राला टेलेग्राम केले. त्याला नाव तर आवडलेच पण त्या स्केचवर तो खुप खुश झाला. त्यानंतर त्याने माझ्या मागे तगादाच लावला की कसेही होवो पण मुखपृष्ठ तुच करायचे. घरचेच पुस्तक आणि घरचेच प्रकाशन असल्याने मीही उत्साहात मुखपृष्ठ तयार केले. त्यावेळी प्रथमच माझी आणि सुलेखनाची म्हणजे कॅलीग्राफीची ओळख झाली. तसे माझ्या मित्रांमध्ये एक दोघे अत्यंत नावाजलेले कॅलीग्राफर आहेत. पण माझी भुमिका नेहमीच रसीक प्रेक्षकाची असायची. पण जेंव्हा मी स्वतः कॅलीग्राफीसाठी ब्रश हातात घेतला तेंव्हा जाणवले की हा कलाप्रकार आपल्याला जमो अथवा न जमो, पण हा प्रकार मन रमवणारा आणि उत्तम स्ट्रेस बस्टर असा आहे. यात मी सुट्टीचा पुर्ण दिवस न कंटाळता घालवू शकतो. सुरवात आयपॅडवर अॅप्पल पेन्सीलने लहान मोठी सुलेखने करण्याने झाली. पण त्यात काही मनासारखे काम जमेना. मग मार्केटमधुन काही डिप पेन, काही हाय क्वालीटीचे पेन आणले आणि वेगवेगळे प्रकार करायला सुरवात केली. तरीही मला काही काही स्ट्रोक मनासारखे रेखाटता येईनात. ड्राय ब्रश इफेक्ट साठी मी स्पंज वापरुन पाहीला, आईस्क्रिमच्या स्टिक वापरुन पाहील्या, पारंपारीक बांबूचे बोरु वापरले, नाईफ वापरले. कामात मजा यायला लागली. तरीही मला रफ स्ट्रोक मारण्यासाठी काही टुल मिळेना. शेवटी युट्युबवर सर्च केले आणि घरच्या घरी करता येईल असा विनाखर्च टुल करायची पध्दत मला सापडली. मग काय, सगळी कामे सोडुन मी सर्व साहित्य जमा केले आणि तासा दिडतासातच पेन तयार करुन पेपरवर मला हवा तसा पहिला रफ स्ट्रोक मारला. तेंव्हा कुठे जीवाला चैन पडली.

तर पाहुयात हा कॅलिग्राफी पेन कसा करायचा ते. यासाठी तुम्हाला लागेल
१. कोल्ड्रींकचे किंवा बिअरचे टिन कॅन
२. आईस्क्रिमच्या स्टिक
३. कात्री, फाईन पॉलीशपेपर आणि सेलोटेप.
४. मार्किंगसाठी स्केचपेन, इंक आणि पेपर

2019-05-18 13.09.03.jpg

१. दिवस उन्हाळ्याचे असल्याने या निमित्ताने बिअरचे कॅन घरी आणता येतात. पण मी कोकचे कॅन घेतले. प्रथम कॅन रिकामे करुन कात्रीने त्याचा वरील आणि खालील भाग बाजुला करा. म्हणजे तुम्हाला एक आयताकृती शिट मिळेल.

२. या शिटमधुन तिन इंच रुंद व चार इंच लांब असा तुकडा कापुन घ्या. या तुकड्यावर खालील आकृतीत दाखवलेला आकार आखुन घ्या. सुरवातीला हा आकार तुम्हाला कॅलीग्राफी करण्यासाठी सोपा जाईल. नंतर तुमच्या गरजेनुसार फ्लॅट, ग्रुव्ह्ज असलेला वगैरे आकार तुम्ही घेवू शकता.

2019-05-18 13.09.56.jpg

३. आता हे शिट मधोमधो हलक्या हाताने फोल्ड करा. त्याला जास्त प्रेस करु नका. कारण फोल्ड केल्यानंतर एकमेकांसमोर येणाऱ्या पाकळ्यांमधील जागेत इंक साठून राहते आणि तुम्हाला एकाच डिपमधे जास्तीत जास्त स्ट्रोक मारता येतात.

४. आता हा तुमचा निब तयार झाला. या फोल्ड केलेल्या निबमध्ये आईस्क्रिम स्टिक सरकवा आणि टेपने ती घट्ट करा. आईस्क्रिम स्टिक ऐवजी तुम्हाला ज्याची ग्रीप जास्त चांगली वाटेल अशी कोणतीही गोष्ट घ्या. जसे जुना पेन, चॉपस्टिक वगैरे.

2019-05-18 13.09.39.jpg

५. आता एक स्वच्छ पेपर घ्या, एका भांड्यात इंक घ्या. निब इंकमध्ये बुडवून तुम्हाला हवा तसा स्ट्रोक मारा. अर्थात स्ट्रोक मारताना तुम्ही जितक्या काळजीपुर्वक आणि हळुवार माराल तितका तुमचा स्ट्रोक चुकत जाईल. त्यामुळे प्रत्येक स्ट्रोक हा हलकेसे झटके देत फर्राटेदार पध्दनीने मारले तर त्याला सुंदर वजन मिळेल. यात मग तुम्ही अनेक प्रयोग करु शकाल. कधी कधी ब्लॅक आणि रेड इंकमधे निब डिप केला तर स्ट्रोकला छानसा ब्लेंडींग इफेक्टही मिळेल. तुम्हाला कॅलीग्राफीत फारसे स्वारस्य नसले तरी सध्या सुट्या सुरु असल्यामुळे मुलांसाठी हा उपक्रम अतिशय चांगला आणि नविन काहीतरी शिकवणारा आहे. अर्थात हा प्रकार फार सुंदर वाटला तरी प्रचंड पसारा करणारा आहे हे लक्षात ठेवूनच करा.

2019-05-18 13.09.33.jpg

अजुन एक रफ स्ट्रोक मारुन काढलेले सुलेखन.

2019-05-18 13.09.44.jpg

गॉथिक स्टाईलने सुलेखन करण्यासाठी पायलट पॅरलल पेन अगदी उत्तम.

2019-05-18 13.09.20.jpg

तसेच ब्रास डिप पेन सुध्दा छान रिझल्ट देतात.

2019-05-18 13.09.13.jpg

(आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली या चालीवर “कॅली जमली तर जमली नाही तर बिअर पदरात पडणारच आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A आणि ओंम फार आवडले मला ....
बाकीचे ही मस्तच

कॅली जमली तर जमली नाही तर बिअर पदरात पडणारच आहे. - हे नाहीतर ते काय???

सुरेखच आहे हो

फक्त कॅलिग्राफी यायला हवी Happy

ऎशूला पाठवते लिंक. तिच्या कामाची आहे.

जपानचा चानेल nhkworld यावर एकदा पाहिलं आहे शाई कशी करतात ते. एक झऱ्यात शाईचे दगड ( peat) मिळतात हे जळतातसुद्धा.

बिअर कॅनच्या कागदाने ॐ ? शातम् पापम् ! Wink

झकास आहेत सगळेच स्ट्रोक्स. रात्री आणि ॐ तर खासच आहेत!

कॅलिग्राफी शिकण्यासाठी काही पुस्तकं आहेत का ? मराठी अथवा इंग्रजी काहीही चालेल. पुण्यात मिळत असल्यास उत्तम.