जर बायकोला घटस्फोट नको असेल तर नवरा जबरदस्ती मिळवू शकतो का?

Submitted by निल्सन on 8 April, 2019 - 08:38

नमस्कार!

जर बायकोला घटस्फोट नको असेल तर नवरा जबरदस्ती मिळवू शकतो का? याबद्दल आणि घटस्फोट कायद्याबद्दल थोडी माहिती हवी होती.
पण त्याआधी पुर्वपरिस्थितीची माहिती देते. इथे मी कोणाचीही नातेवाईक म्हणून नव्हे तर न्युट्रल माहिती सांगते त्यामुळे तुम्हीही दोन्ही पक्षाच्या बाजुने माहिती देऊ शकता.
तर, दोघांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. मुल नाही. नवरा/मुलगा गॅरेज चालवतो (त्याच्या वडिलांच्या नावाने आहे व धंदा खूप कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे) घर म्हणजे बंगला आहे (आजोबांच्या नावाने आहे) तीन पिढ्या एकत्र राहत आहेत. घरात कामाला कुणीच नाही. इन्कम सोर्स - २-३ घरे भाड्याने दिलीत त्यांचे भाडे येते.
बायको/मुलगी - दहावी शिक्षण. housewife. no income.

सहा महिन्यांपुर्वी अजितने अनुला (नावे बदलली आहेत) तिच्या माहेरी आणुन सोडले. आणि २ दिवसांपुर्वी घटस्फोटासाठी नोटीस पाठविली आहे.
मुलाची बाजू -
१) अनुने लग्नाच्या सुरवातीच्या ४ वर्षे शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला.
२) ती सतत त्याच्यावर संशय घेऊन त्याला शिवीगाळ करते. तिच्या या संशयामुळेच तो वैतागून बाहेरख्यालीपणा करू लागला असे त्याचे म्हणणे आहे.
३) त्याचा मोबाईल चेक करते/ गुपचुप त्याच्यावर पहारा ठेवते.

मुलीची बाजू -
१) अजितचे बाहेर संबंध आहेत. याआधीही तीने ३ वेळा त्याला पकडले आहे. आता ४ थे प्रकरण सुरू आहे आणि हे सर्व त्याच्या घरातही माहित आहे.
२) तो घरी आल्यावरही तिच्याशी नीट बोलत नाही त्यामुळे संबंध तर दूरच राहिले (३ वर्षापूर्वी तिची एक छोटीशी शस्रक्रिया झाली तेव्हापासून त्यांचे शारिरीक संबंध सुरू झाले होते)

आता हे सगळं वाचल्यावर बरेचजण या दोघांनी घटस्फोट घेणेच योग्य आहे अशी बाजू मांडतील आणि अर्थातच तेच योग्य आहे पण अनु आणि तिची आई मात्र यासाठी तयार नाहीयेत (कारणे बरीच आहेत)

कोर्टाबाहेर सेटलमेंटसाठी मुलाकडील तयार होते पण मुलीकडच्यांनी नकार दिल्यामुळे कोर्ट नोटीस पाठविली.
सेटलमेंट रक्कम २ ते ३ लाख देतील असे मुलाच्या वकीलाने सांगितले होते. (मुलाचा वकील त्यांचा मित्रपरिवारातील असल्यामुळे मुलीलाही ओळखतो)
मुलीकडे वकील नेमायला पैसे नाहीयेत.

तर मला विचारायचे आहे की वरील कारणांमुळे अजितला घटस्फोट मिळू शकतो का?
जर अनु तयार नसेल तर पुढे काय करावे लागेल?
६ महिन्यांसाठी एकत्र राहून कॉन्सिलरची मदत हे कोणत्या केसमध्ये शक्य असते?
आणि जर अनु घटस्फोटासाठी तयार झालीच तर तिला पोटगी काय आणि किती मिळू शकते व त्यासाठी काय करावे लागेल?
आता जरी ती घटस्फोटासाठी तयार नसली तरी आलेल्या नोटीसचे उत्तर द्यावेच लागेल ना?

तुम्ही म्हणाल हे सगळे इथे सांगण्यापेक्षा चांगला वकील गाठा पण आधीच सांगितल्याप्रमाणे महिना १५ हजार कमावणार्‍या मुलीच्या बापाला वकील कसा परवडणार. तरीही वकील शोधावा तर लागेलच पण त्याआधी उपयुक्त माहिती आणि कायद्याचे नियम माहित व्हावेत यासाठी हा खटाटोप चालला आहे.

कॄपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही म्हणाल हे सगळे इथे सांगण्यापेक्षा चांगला वकील गाठा पण आधीच सांगितल्याप्रमाणे महिना १५ हजार कमावणार्‍या मुलीच्या बापाला वकील कसा परवडणार. }}}

घटस्फोट टाळायचा असेल तर अवघड आहे. पण घटस्फोट घ्यायचाच असेल तर दोन पर्याय आहेत - नवरा देतोय तितके किंवा थोडे अधिक पदरात पाडून घेता येतील. त्याला घटस्फोट हवा आहे म्हणजे त्याला लवकर मिळवायचा असेल तर तो वेळ वाचवायला थोडे जास्त देऊ शकतो. या पर्यायात मुलीला वकील न करता कमी खर्चात झटपट पैसे मिळतील. अर्थात ते कमीच असतील. जास्त रक्कम हवी असल्यास वकील % वर लढणारे मिळू शकतील. म्हणजे जितकी जास्तीत जास्त पोटगी वकील मिळवून त्याच्या काही % तो वकील त्याची फी खटला जिंकल्यावर घेतो अशीही पद्धत असते. तेव्हा या दोन्हींपैकी कुठलाही एक पर्याय अनु आजमावून पाहू शकतात.

किमान मैत्रीत तरी वकीलाला विचारणे योग्य राहील. इथे जर कुणी वकील असेल तर योग्य सल्ला मिळू शकेल.

मी वकील नाही. माझ्याकडे आता संदर्भ नाही. तसेच बरेच वर्षापूर्वीची माहिती आहे. आता पडताळण्यासाठी वेळ नाही. पण दिशा मिळावी म्हणून केवळ देत आहे.
मी एका कौटुंबिक न्यायालयातल्या केस मधे ओळखीतल्या मुलीसाठी दीड वर्षे हेलपाटे घातले आहेत. नवरा - बायको दोघांचीही संमती असेल तर पूर्वी वर्षभर वेगळे राहून कौन्सिलिंग असे काहीसे होते (निरणय बदलला तर म्हणून हा कालावधी). आता सहा महीने झाले असतील तर ठाऊक नाही.

दोघांपैकी एकाला घटस्फोट हवा असेल व दुसरी पार्टी ठाम असेल तर न्यायालयात घटस्फोट हव्या असलेल्या पार्टीला तसे पटवून द्यावे लागते. तशी तयारी त्या पार्टीने केली असेल आणि दुस-या पार्टीकडे वकील नसेल तर मग काय होईल हे सांगता येत नाही.

कृपया अचूक माहितीसाठी पडताळून पहावे.

> अनु आणि तिची आई मात्र यासाठी तयार नाहीयेत (कारणे बरीच आहेत) > काय कारणे आहेत?

> जर बायकोला घटस्फोट नको असेल तर नवरा जबरदस्ती मिळवू शकतो का? > हो. न्यायालयाला मान्य होतील अशी कारणं, पुरावे द्यावे लागतील.

> मुलाची बाजू -
१) अनुने लग्नाच्या सुरवातीच्या ४ वर्षे शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला. > शरीरसंबंधास नकार देते म्हणून तेव्हाच घटस्फोट घेता आला असता.

> २) ती सतत त्याच्यावर संशय घेऊन त्याला शिवीगाळ करते. तिच्या या संशयामुळेच तो वैतागून बाहेरख्यालीपणा करू लागला असे त्याचे म्हणणे आहे. > संशयग्रस्त आहे आणि मानसिक छळ करते हे कारण सांगून आता घटस्फोट मिळेल.
===

> नवरा देतोय तितके किंवा थोडे अधिक पदरात पाडून घेता येतील. त्याला घटस्फोट हवा आहे म्हणजे त्याला लवकर मिळवायचा असेल तर तो वेळ वाचवायला थोडे जास्त देऊ शकतो. या पर्यायात मुलीला वकील न करता कमी खर्चात झटपट पैसे मिळतील. अर्थात ते कमीच असतील. > +१

एकरकमी पैसे घेऊन घटस्फोट दिला तर मुलीला पोटगी (दरमहा रक्कम) मिळेल काय.
बहुतेक वेळा अशा प्रकरणात घटस्फोट होतो किंवा सवतीबरोबर संसार करावा लागतो. मुलाचे आईवडील मुलाच्या बाजूने असतील तर घटस्फोट घेतलेलाच ठिक राहील.

अजितचे बाहेर संबंध आहेत. याआधीही तीने ३ वेळा त्याला पकडले आहे. आता ४ थे प्रकरण सुरू आहे आणि हे सर्व त्याच्या घरातही माहित आहे.》हे जर खरे असेल आणि ह्याचे पुरावे असतील तर मुलीला संशयग्रस्त का म्हणावे? आणि असे आधी झालं असेल तर मोबाईल चेक करणे किंवा गुपचुप पहारा देणे ह्यातही चुकीचं काय आहे?

अशा केसमधील स्त्रियांना मार्गदर्शन करायला संस्था /हेल्पलाईन असतात. गुगल करून आपल्या शहरातील संस्थेची/हेल्पलाईनची माहिती घ्यावी, तिथे मोफत / कमी दरात वकिली मदत मिळू शकेल. त्या लोकांना अशा केसेसचा भरपूर अनुभवही असेल.
एका पार्टीला नको असेल तर डिव्होर्स घेणं कठीण आहे त्यामुळे अजित त्याच्या बायकोला असं सहजासहजी डम्प करू शकत नाही.

<<< अजित त्याच्या बायकोला असं सहजासहजी डम्प करू शकत नाही >>>
नक्कीच करू शकतो. महिना १५ हजार कमावणार्‍या मुलीच्या वडिलांना वकील पण परवडणार नाहीये. गोडीगुलाबीने सेटलमेंट घेऊन घटस्फोट घ्यावा, हा शहाणपणाचा मार्ग आहे. Otherwise it can get really ugly. Time to move on.

अश्या केसस .माज्या पण बघण्यात आहेत .
घटस्फोट ची case ठराविक वेळेत निकाली काढावी असे काही बंधन court वर नाही .
त्यमुळे न्याय मिळण्यास उशीर लागतो .
खूप दिवस लढाई लढण्याची तयारी असावी लागते

अश्या केसस .माज्या पण बघण्यात आहेत .
घटस्फोट ची case ठराविक वेळेत निकाली काढावी असे काही बंधन court वर नाही .
त्यमुळे न्याय मिळण्यास उशीर लागतो .
खूप दिवस लढाई लढण्याची तयारी असावी लागते
+१११११११११

महिना 15,000 मुलीची बहीण कमावतेय काय?

दोघेही एकत्र सुखाने राहू इच्छित नाहीत तर का दूर होत नाहीत? घटस्फोटाला दोघातला एकजण तयार नसेल तर ती केस कितीही वर्षे चालू शकते. त्यात जज वगैरे बदलला की अजून दिरंगाई होते - हे सध्या आमच्या ऑफिसात एकाचे घटस्फोट प्रकरण सुरू आहे त्यावरून मिळालेले ज्ञान आहे. Happy Happy त्याच्या केसला आता 2 वर्षे झालीत. निकाल लागण्याची चिन्हे अगदी दुरवरही दिसत नाहीयेत त्याला. केस दाखल केली तेव्हा 6 महिन्यात सुटणार याची खात्री होती त्याला. वकिलाचा मीटर मात्र चालू आहे.

त्यामुळे जितके मिळताहेत तितके घेऊन, शक्य असल्यास अजून थोडे पदरात पाडून घेऊन वेगळे व्हावे हे उत्तम.

नव-याचं लफडं असेल तर त्याला बायकोपासून लवकर मुक्ती हवी असणार पण तिला जर का पुढे लग्न वगैरे करायचं नसेल तर ती लटकवून ठेवेल त्याला.

इथे लिहिलेय त्यापेक्षा कितितरी अधिक एखाद्या नात्यात असू शकते (कान्गोरे) त्यामुळे इतक्या वरवर आपण काही बोलणे वावगे ठरेल.
* दोघांपैकी एकासच घटस्फोट हवा असेल आणि त्या व्यक्तिने वकिलातर्फे नोटिस पाठवली असेल तर कोर्ट एकूण ३ नोटिस पाठवते, तिन्ही ला उत्तर आले नाही तर कोर्टाचा माणूस खुद्द त्या दुसर्‍या पार्टिच्या पत्यावर कोर्टाचे समन्स घेऊन जातो आणि जातीने त्या व्यक्तिला घेऊन कोर्टात येतो. त्या केस मध्ये दुसरी पार्टी कोर्टात आली तर केस पुढे सुरू होऊ शकते (परिस्थिती आणि इच्छा महत्वाची.) जर समन्स च्या वेळी दुसरी पार्टी 'गायब' असेल तर कोर्ट अजून वाट पाहून केस ला 'एक्स पार्टी' केस म्हणून डिक्लेअर करते. त्यात अजून काहि महिने वाट पाहून, ज्याने केस दाखल केली त्याच्या बाजूने निकाल लागतो.
एकेक लोकांना वाटते मी सही केलीच नाही तर त्याला/तिला घटस्फोट मिळणारच नाही. तसे नसते. हे अज्ञान आहे. हे ज्ञान असलेले आणि सुडाने पेटलेले लोक मग कोर्टात शिरतात ना स्वतः नीट जगतात ना दुसर्‍याला जगू देत. मध्ये वकिलांचे उखळ पांढरे होते, वर्षानुवर्ष लोक खेटे घालतात.
ज्याला घटस्फोट हवा असतो त्याला दुसरी पार्टी कायच्या काय मागण्या करतात. (मोठी रक्कम, घर, शेती मागून)
पुर्ण घटस्फोट झाला आणि जर पोटगी (वन टाईम सुद्धा) देऊनही नंतर सुद्धा एखादी स्त्री कोर्टात जाऊन जास्तीच्या पोटगीसाठी केस दाखल करू शकते बहुधा (मुलं असतील तर नक्कीच)
दर महिन्याची पोटगी असेल, आणि एखाद महिना चुकली तरिही केस दाखल होऊ शकते.

- आता वरच्या केस मध्ये मुलाने केस दाखल केली आहे आणि मुलिची परिस्थिती नसेल तर तिने ताणून न धरता सहसंमतीने घटस्फोट द्यावा (जे मिळेल ते पदरात पाडून घेऊन)

जास्त रक्कम हवी असल्यास वकील % वर लढणारे मिळू शकतील. म्हणजे जितकी जास्तीत जास्त पोटगी वकील मिळवून त्याच्या काही % तो वकील त्याची फी खटला जिंकल्यावर घेतो अशीही पद्धत असते.
>>>

हे भारतात करता येते? माझ्या माहितीप्रमाणे टक्केवारीवर फी आकारता येत नाही वकिलांना भारतात.

भारतात वकिलांनी किती फी घ्यायची यासाठी काही नियम आहेत का? तसे नसतील तर वकिलाने आकारलेली फी टक्केवारीवर आहे की कसे हे कसे समजणार? अशील/वकील यांनी फी उघड करावी हे बंधन आहे का? तो जर खासगी व्यवहार असेल तर काहीच कळणार नाही.

वरच्या प्रश्नांची उत्तरे मला माहित नाही. कोणाला माहीत असल्यास द्यावीत.

'टक्केवारीने फी आकारणे', हे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे, वकिलीच्या एथिक्स च्या विरुद्ध आहे आणि बेकायदेशीर आहे. तरीसुद्धा जर एखादा वकील आणि त्याचा अशिल यांच्यात काही ठरले असेल तर ते बाहेर येणे जवळ जवळ अशक्य आहे.

काही वेळा वकील फुटण्याची (विरुद्ध पार्टीकडून तुमच्या नकळत काम करत असण्याची) शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. म्हणून शक्यतो नात्यातील किंवा ओळखीचा वकील शोधणे जास्त योग्य ठरते.

खरं तर दोघांपैकी एकाला जरी लग्न नको असेल तर दुसर्याने अट्टाहासाने धरून का ठेवायचं? उगीच अडवणुक करून किंचित सूड की वरच्या केसमध्ये आहे तसे आर्थिक परावलंबन? मग एकरकमी किंवा दर महिना ठराविक रक्कम मिळण्याची कायदेशीर सोय करून वेगळं झालेलं चांगलं ना? एकत्र राहून चडफडत राहण्यापेक्षा किंवा लग्नबांधनात राहून दुस्वास करण्यापेक्षा वेगळं होणं योग्य.

मी कितीही विचार केला तरी वरच्या केसमधील मुलीला तिच्या नवऱ्याला जबरदस्तीने लग्नबांधनात अडकवून ठेवण्याची लॉजिकल कारण दिसत नाहीत.

लॉजिकल नाही सामाजिक कारणं असतात. काही शक्यतांचा मी विचार/अंदाज करू शकते. पण निल्सननेच 'काय कारणे आहेत?' सांगितलं तर बरं राहील.

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार.

परस्परसंमतीने घटस्फोट घ्यावा हाच कल बर्‍याचजणांचा दिसतोय आणि मलाही तेच पटतयं पण मुलीच्या आईला मात्र सो कॉल्ड समाजासाठी आणि आपल्या नाकासाठी? अजूनही तिने नवर्यासोबतच रहावे असे वाटत आहे. यामुळे त्यांच्या घरात सारखे वाद सुरू आहेत. मुलीने दोन्ही बाजूने मनाची तयारी केली आहे. तिचे म्हणणे आहे की जर घटस्फोट झाला तर माहेरी राहणे कठीण होईल त्यामुळे तिला एकतर सासरी राहून जे आहे ते स्विकारावे अथवा किमान ती एकटी राहून स्वतःचे भागवू शकेल एव्हढी तरी पोटगी मिळावी असे वाटते. (पण तिला एकटी राहून देणारच नाहीत हे नक्की त्यामुळे रोजची भांडणे किंवा टॉर्चर) कदाचित जास्त रक्कम हाती आली तर भांडणे कमी होतील Sad
या केसमध्ये प्रत्येकजण आपआपल्या जागी थोडा चूक तर थोडा बरोबर आहे, सगळेच मी इथे नाही सांगू शकत पण मुद्दा हा आहे की ती आता सासरी घरात शिरू शकते का? तिचे म्हणणे आहे की ती स्वतःहून नाही जाणार कारण त्यामुळे तिला सर्व स्विकार आहे असाच अर्थ निघेल त्यामुळे कोर्टाकडून किंवा इतर कोणी तिला सासरी नेण्यास तिच्या नवर्‍याला बंधनकारक करेल का?

कबाली, लिन्क बघते. धन्यवाद

तिचे सासर माहेर एकाच गावात आहेत. सासरची माणसे अराजकारण मध्ये आहेत (मोठा घर पोकळ वासा टाईप) त्यामुळे एकदम पोलिस वैगरे सासरी गेले तर तिला व तिच्या माहेरच्यांना त्रास होऊ शकतो. एक उदाहरण देते त्यांच्या पॉवरचा, या सहा महिन्यात तिच्याकडे पैसे नसायचे म्हणून तिने गावातच कामासाठी मुलाखत दिली, मालकाने उद्यापासून ये असे सांगितले. नंतर रात्री फोनकरून सांगितले की ५ दिवसांनी ये, पुन्हा सांगितले की पुढच्या महिन्यापासून ये असे करून टाळत राहिला. मग तिने ज्याने रेफरन्स दिला होता त्याला विचारले तेव्हा त्याने तू ****** ची सून आहेस म्हणून तो घाबरतोय तुला कामावर ठेवायला आणि नको येऊ सांगायला पण.
आता या अशा परिस्थितीत काय करावे हे समजत नाहिये तिला.

म्हणजे कोर्टाने किंवा पोलिसांनी किंवा सरकारने तिच्या सासरच्यांना आज्ञा द्यायची की हिला नांदवा. सासरी काहीही त्रास न देता त्यांनी मग निमूट नांदवावे अशी मुलीची अपेक्षा आहे.

तिला माहेरी जागा नाही, एकटी राहू शकत नाही तर सासरी शांतपणे का राहत नाही? तिथे राहून नवऱ्यावर संशय, पहारा वगैरे सुरू. नवऱ्याचे वागणे चूक आहे पण जग तरी कुठे आदर्श आहे? आपण आपली गरज ओळखून तडजोड करायला हवी. सासरचा आधार हवा तर नवऱ्याच्या वागणुकीकडे दुर्लक्ष कर. ते जमत नसेल तर स्वतंत्र राहण्याइतके बळ अंगी बाणव. सगळेच तुमच्या मनासारखे होत नाही ना...

बाकी कायद्याचा धाक दाखवून नांदवणे शक्य करता येते का माहीत नाही. पण बहुतेक शक्य असावे. त्रास होतो म्हणून पोलीस तक्रार केली तर पोलिस सासरच्यांना समज देऊ शकतात. पोलिसांना हिचे सासर कितपत भिक घालेल शंका आहे. महिला आयोग वगैरे ठिकाणी तक्रार केली तर फरक पडेल. पण सासरचे अशा तक्रारखोर सुनेला कितपत सुखाने नांदवतील हा प्रश्न आहेच.

तिला कुठलाही आधार नसल्याने अटी न ठेवता सासरी जाणे हा मार्ग दिसतोय. निदान आयुष्य शांतपणे जगता येईल.

सेटलमेंट म्हणून ५ लाख आणि नंतर नोकरी मिळवण्यास+ टिकवण्यास मदत (किंवा कमीतकमी नोकरीत अडचण न आणणे) यासाठी सासरचे सहमत होतील का?

घटस्फोट घेताना पती पत्नीचे वय हे ही महवाचे असते. स्त्री मध्यमवयीन ४०च्या आसपास असेल आणि मुलं बाळं असतील तर तिथे व्यवहार थोडा महत्वाचा ठरतो.
बर्‍याचदा पुरूषाचे वय कितीही असले तरिही त्याला दुसरी बायको मिळते. पुरुषांच्या (दुसर्‍या लग्नाच्या) बाबतीत बायका बर्‍याच ब्रॉड माईन्डेड असल्याने कोणतीही परिस्थिती स्विकारताना दिसतात. कित्येकदा अशा पुरूषांना अविवाहित मुली सुद्धा मिळून जातात लग्नाला.
तेच स्त्रीच्या बाबतीत होईल असे दिसत नाही. यालाही अनेक कंगोरे आहेत. स्त्रीकडे मुलान्ची कस्टडी असेल तर बर्‍याचदा मुले ही आईला लग्नाला विरोध करतात. कित्येकदा त्या स्त्रीलाच लग्नाची (दुसर्‍या) इच्छा नसते. अशा वेळी तिच्या भविष्याची तरतूद हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे एकरकमी परतावा, महिन्याला पोटगी ही मिळालिच पाहिजे.

बाकी वरच्या केस मध्ये जर मुलिला पर्याय च नसेल आणि सासरी राहणे अपरिहार्य असेल तर त्या घरात एकमेकान्शी सौदार्ह दाखवून गरजेनुसार राहणे उत्तम.

चांगला पर्याय ॲमी >+११११

वरती त्या मुलीच्या सासरच्या बद्दल लिहिलेला किस्सा वाचून मला एक प्रश्न पडलाय

त्या मुलीने सासरच्या मनाविरुद्ध तिथे परत जाण्याने ती तिथे नक्की सुरक्षित असेल का???
हा ही विचार करायला हवा

बाकी, अजून थोडे लिहायचे आहे

नंतर लिहिते सवडीने

Pages