पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३०. उडन खटोला (१९५५)

Submitted by स्वप्ना_राज on 11 March, 2019 - 12:45

udan1.jpg

मला गोल्डन एरामधली गाणी ऐकायचं आणि पाहायचं वेड लहानपणी नक्की कधी लागलं ते आठवणं आता कठीण आहे. असली वेडं कधीच बरी होत नाहीत ते एक बरं आहे. कधीतरी असंच गाणी पाहताना एका गाण्यात आकाशातून उडत जाणारं विमान आणि त्याकडे पहात जमिनीवर घोड्यावरून दौडत गाणं म्हणत जाणारा बायकांचा जथ्था दिसला. पुलं.च्या लेखातल्या पानवाल्याच्या ठेल्यावरच्या बाहेर वेलकम पाटी असलेल्या राजवाड्यात वरून विमान उडत जाताना कृष्ण-राधा नृत्य करताना दाखवलेल्या चित्राची आठवण व्हावी असंच हे दृश्य. कुठला बरं हा चित्रपट? आणि काय असेल त्याची कथा? उत्सुकता वाढली. पण तेव्हा गुगलबाबांचा जन्म झाला नसल्याने आईवडिलच गुगलचं काम करीत. मातेचरणी शरण गेल्यावर ‘उडन खटोला’ हे चिवित्र नाव असलेल्या ह्या चित्रपटाची थोडी माहिती मिळाली. ‘उडन’ म्हणजे उडणारा हे लक्षात आलं तरी हिंदी पाचवी ते सातवीच शिकल्याने (नाही, तशी सातवीच्या पुढे शिकलेय मी. गैरसमज नको. आठवी ते दहावी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृत निवडलं त्यामुळे हिंदी सुटलं) ‘खटोला’ हे प्रकरण काही झेपलं नाही. आपल्या ‘खटारा’ ह्या मराठी शब्दाशी साधारण साम्य असलेला हा शब्द ‘रथ’ किंवा 'वाहन' अश्या काहीतरी अर्थाचा असेल अशी समजूत करून घेतली. आता एका टिचकीसरशी माहिती मिळायच्या काळात हे ‘समजूत करून घेणं’ कालबाह्य झालंय. असो. एकूणात हे सगळं कथानक विमानामुळे घडत असणार हे मातोश्रींनी सांगितलेल्या माहितीवरून पक्कं झालं. पुढे कधीतरी पाहू चित्रपट असंही वाटून गेलं. तो योग मागल्या वर्षी येता येता हुकला. ज्या लॅपटॉपवर चित्रपट डाऊनलोड करून घेतला होता त्याने राम म्हटला. मग गेल्या विकांताला चित्रपट बघायच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली. ती इच्छा यथावकाश फलद्रूपही झाली. तेव्हा आता ह्या चित्रपटाबद्दल.....

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा तुफान समुद्रात उंच उफाळणाऱ्या लाटांवर हेलकावे खाणारी एक नाव दिसते. नावेतले लोक कसेबसे जीव वाचवायचा यत्न करत असतात. पण शेवटी नाव काही तगत नाही हे लक्षात येताच त्यांचा कप्तान त्यांना समुद्रात उडी घेऊन जीव वाचवायला सांगतो. ते तसं करतातही. त्यातला एक किनार्याला लागतो. आपण कुठे आलोय ह्याची काहीही कल्पना नसलेला तो माणूस निवार्याच्या शोधात दाट जंगलात इथेतिथे फिरत असताना त्याच्या कानांवर गाण्याचे सूर येतात. इथे कुठेतरी माणूस आहे हे जाणवून तो उत्साहाने पुढे जातो तर त्याला एक झोपडी दिसते. आत एक अतिशय ‘जख्ख’ ह्यां एकाच शब्दाने वर्णन करता येईल असा म्हातारा असतो. तो माणूस त्या म्हातार्याला आपल्यावर आलेला प्रसंग सांगून फक्त एका रात्रीपुरता निवारा द्यायची विनंती करतो. म्हातारा त्याला रहायची परवानगी देतो. पण विश्रांतीसाठी आतल्या खोलीत गेलेला तो माणूस आतलं दृश्य पाहून थोडा भेदरतोच. अस्ताव्यस्त पडलेलं सामान, चित्कारणारे पक्षी, कोळीष्टकं, अंधार ह्यांचं साम्राज्य पाहून तो जीव मुठीत धरून पलंगावर लवंडतो खरा. तेव्हढ्यात त्याला पुन्हा त्याच गाण्याचे सूर ऐकू येतात – पण ह्यावेळी ते सूर असतात एका स्त्रीचे. तो खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पहातो तेव्हा त्याला आकाशमार्गे येणारा घोडे ओढत असलेला एक रथ दिसतो. त्या रथाचं सारथ्य एक तरुण स्त्री करत असते आणि तीच ते गाणं म्हणत असते. रथ पृथ्वीवर टेकतो तेव्हा ती स्त्री धावत झोपडीपाशी येऊ लागते. हे विलक्षण दृश्य पाहून त्या माणसाची पाचावर धारण बसते. घाबरून तो त्या म्हातार्याला हाका मारू लागतो. त्याचा आवाज ऐकताच ती स्त्री दचकते, मागे फिरून पुन्हा रथावर स्वार होते आणि बघता बघता रथ आकाशमार्गे अदृश्य होतो. ती स्त्री निघून गेलेली पाहून तो म्हातारा त्या खलाश्याला मारायला लागतो. पुन्हा पुन्हा म्हणायला लागतो की ती आता पुन्हा कधीच येणार नाही. त्या खलाश्याला काय चाललंय काही कळतच नाही. तो म्हातार्याला ह्या सगळ्याचा खुलासा विचारतो. म्हणतो की मी माझा जीव देऊनसुध्दा त्या स्त्रीला परत आणेन. तेव्हा म्हातारा त्याला एक गोष्ट सांगतो.....चाळीस वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट.

गोष्टीत असतं एक विमान. उंच आकाशातून जाणारं. ज्या प्रदेशावरून ते उडत असतं तो बाकी जगापासून काहीसा तुटलेला असा असतो. ह्या प्रदेशावर सत्ता असते ती बायकांची. ही जमात संगा नावाच्या दैवताची आराधना करत असते. विमान चालवणाऱ्या वैमानिकाला खरं तर ह्या गोष्टी माहित झाल्याही नसत्या कदाचित पण आपल्या मार्गाने नीट जाणारं त्याचं विमान अचानक सूर मारतं आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळतं. हे दृश्य पाहणारा बायकांचा एक जथ्था त्या वैमानिकाला विमानाच्या अवशेषातून बाहेर काढतो. त्यातली सोनी नावाची तरुणी त्याला आपल्या घरी घेऊन जाते. तिचा भाऊ हिरा वैमानिकावर उपचार करतो. शुद्धीवर आल्यावर त्या वैमानिकाला, काशीला, समोर सोनी दिसते खरी पण ती त्याच्या सगळ्या प्रश्नांना खुणांनी उत्तरं देते. काशीचा गोंधळ पाहून हिरा खुलासा करतो की त्यांच्या प्रदेशात कोणतीही स्त्री परपुरुषासमोर बोलत नाही. अपवाद फक्त त्यांचा ज्यांची तिने आपल्या स्वयंवरासाठी निवड केली आहे. हिरा त्याला हेही सांगतो की सगळे रस्ते बंद असल्याने त्याला सध्या त्यांच्या नगरातून बाहेर पडता येणं शक्य नसलं तरी त्यांच्या कायद्यानुसार त्याला आठ दिवसांच्या वर तिथे राहताही येणार नाही.

ते दोघे बोलत असताना तिथे राज्यातला मुख्य सरदार शानू येतो. तो हा परदेशी इथे राहू शकणार नाही असं हिराला सुनावतो. हिरा वैमानिकाला आपले वडील महाशक्ती, जे तिथल्या राणीचे गुरु असतात, त्यांच्याकडे घेऊन जातो. ते सगळी हकीगत ऐकून घेऊन राणीच ह्याचा फैसला करेल असं सांगतात. त्यानुसार वैमानिक - ज्याला सगळे परदेशी अशीच हाक मारत असतात – राणीला भेटायला जातो. पण त्याने तिथे काही दिवस राहू द्यायची परवानगी मागताच राणी त्याच्याकडे न पाहताच ती मिळणं अशक्य असल्याचं सांगते. परदेशी लोक विश्वास ठेवायला लायक नसतात असं त्या सगळ्यांचं मत असतं. राणी तिच्या सेवकांना त्याला घेऊन जायला सांगते तेव्हढ्यात तिचं त्याच्या चेहेर्याकडे लक्ष जातं. ती त्याच्यावर बेहद्द खुश होते आणि त्याला रहायची परवानगी देते. पण इथल्या तरुण स्त्रियांपासून लांब राहा अशी तंबीही त्याला द्यायला ती विसरत नाही. त्यांचे कायदे ह्याबाबतीत परदेशी लोकांसाठी फार कडक असतात म्हणे.

अर्थात हा कायदा तिला स्वत:ला लागू होत नसावा कारण तिथे रहायची परवानगी देणारं राणीचं फर्मान घेऊन आलेला शानू त्याला राणीने राजवाड्यात बोलावलं असल्याचं सांगतो. राणी परदेशीवर खुश आहे हे लक्षात येताच सोनीचा जळफळाट होतो. कारण तीही त्याच्यावर लट्टू असते. त्या तिरमिरीत पुरुषी वेश परिधान करून आपलं धनुष्य घेऊन ती लपतछपत राजवाड्यात प्रवेश मिळवते. राणीला परदेशीसोबत बसलेली पाहून रागाने ती बाण सोडते तो नेमका राणीच्या डोक्यावर असलेल्या खांबात घुसतो. संतापून राणी तिचे हात तोडायची शिक्षा देते. पण परदेशी मध्यस्थी करतो. हा माझा मित्र शिबू आहे आणि त्याने माझे प्राण वाचवले आहेत असं तो राणीला सांगतो. शिबूसुध्दा मी माझ्या लाडक्या पोपटाला ससाण्याच्या तावडीतून वाचवायला बाण मारला असं सांगतो. राणीचा विश्वास बसतो आणि ती शिबुची शिक्षा माफ करते. त्यानंतरही अश्या काही घटना घडतात ज्यामुळे राणी आणि परदेशी दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे असा सोनीचा गैरसमज होतो. पण परदेशी तो दूर करून त्याचं तिच्यावरच प्रेम आहे हे तिला पटवून देतो. सोनी हिरालाही आपल्या प्रेमाबद्दल सांगते.

पण राणी काही परदेशीची पाठ सोडायला तयार नसते. ती शानूकरवी आपली अंगठी परदेशीकडे पाठवते. तर सोनी शिबुच्या रुपात जाऊन परस्पर ती परत करून येते. भडकलेली राणी परदेशीला देश सोडून जायचं फर्मान काढते. मग मात्र सोनीचा नाईलाज होतो. ती शिबुच्या रुपात परदेशीला स्वत: राणीकडे घेऊन येते. परदेशीसोबत शिबुलाही राजवाड्यात रहायची परवानगी मिळते. आणि मग ‘रानीके नांकके नीचे’ परदेशी आणि शिबुच्या रूपातली सोनी दोघांची प्रेमकहाणी बहरत जाते.

udan2.jpg

परदेशीला आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायचे राणीचे प्रयत्न चालूच राहतात. सोनी ते यथाशक्ती परतवून लावायचा प्रयत्न करते. एकदा ह्या प्रयत्नात तिला शिरच्छेदाची शिक्षा होऊ नये म्हणून तिला चाबकाचे फटके मारायची वेळसुध्दा परदेशीवर येते. वैतागलेली राणी शेवटी शिबू उर्फ सोनीला राजवाड्यातून हाकलून लावते.तरीही ती आणि परदेशी भेटतच राहतात. ते पाहून सोनीवर डोळा ठेवून असणारा शानू गावकर्याना दोघांविरुध्द भडकावतो. ते निर्दोष असल्याची खात्री असलेले महाशक्ती राणीने गावकर्यानी दोषी ठरवलेल्या एका जोडप्याचा निवाडा करावा अशी तिला विनंती करतात. ते जोडपं म्हणजे परदेशी आणि सोनी आहेत हे माहित नसलेली राणी राजी होते. पण जेव्हा ती त्या दोघांना बघते तेव्हा शिबू = सोनी हे समीकरण तिच्या लक्षात येतं. ह्या विश्वासघाताने चवताळून ती सोनीला अग्निपरीक्षा द्यायची आज्ञा करते. ती ह्या परीक्षेत यशस्वी होऊ नये अशीही तजवीज करते. तरीही परदेशीवर खरं प्रेम असणारी सोनी ह्या अग्नीपरीक्षेतून तावूनसुलाखून सुखरूप बाहेर पडते. त्या दोघांवरचा आरोप खोटा असल्याचं आपोआप सिद्ध होतं. पण.....

पण पुढे काय होतं? सोनीला तिचं प्रेम मिळतं? का परदेशीला तो देश सोडून जावा लागतो? ह्या गोष्टीचा झोपडीतल्या त्या म्हातारयाशी काय संबंध असतो? रथातून पृथ्वीवर येणारी ती स्त्री कोण असते? ती कोणासाठी आलेली असते? हे प्रश्न पडले असतील तर उत्तरं मिळवायला हा चित्रपट पाहायला हवा. पण पाहायला हवा’च’ असंही काही नाही. म्हटलं तर ही कहाणी कोण्या एका आटपाटनगराची, त्या नगरातल्या कोणा दोन प्रेमी जीवांची अन त्यांच्या प्रेमात बिब्बा घालणाऱ्या दुष्ट राणीची. शतकानुशतकं ह्या जगात कोणा ना कोणासोबत घडणारी. हां, आता हिंदी चित्रपटांच्या नेहमीच्या कथानकांच्या मानाने गोष्ट थोडी वेगळी आहे हे कबूल. पण चित्रपट ’५५ सालचा आहे हेही लक्षात घ्यायला हवं बरं का. अर्थात प्रेमाच्या आणि राजाराणीच्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही तो पाहणारच म्हणा. पण मग पुढला लेख वाचू नका म्हणजे झालं. Happy

चित्रपटातल्या मुख्य व्यक्तिरेखात ओळखीचे चेहेरे मोजकेच. वैमानिकाची भूमिका दिलीपकुमारने केलीय. ह्याचं नाव ‘काशी’ असतं हे विकिपीडिया वाचून मला कळलं. नाहीतर चित्रपटभर हे नाव ऐकल्याचं मला तरी आठवत नाही. सगळे आपले त्याला परदेशीच म्हणत असतात. “What’s in a name?” म्हणणाऱ्या शेक्सपियरचं आणि ह्यांचं चांगलं जमलं असतं नाही? आता ‘दिलीपकुमार’ ह्या विषयावर माझं मत फारसं बरं नाही - अनेक वर्षांपूर्वी आलेला त्याचा रंगीत मुघल-ए-आझम पाहून आल्यापासून. तो चित्रपट अर्धवट टाकून निघून आले नाही ते माझ्या लाडक्या मधुबालामुळे. पण ह्या चित्रपटात तो चक्क अभिनय करताना दिसतो. हसायचं तिथे हसतो (आणि चक्क क्युट दिसतो!), रडायचं तिथे रडतो. कधी गोंधळतो, कधी मिश्कील होतो, कधी वैतागतोदेखील. फक्त त्या शेवटच्या भयानक वाढलेल्या दाढी-मिशांत थोडा उपरा वाटतो. अर्थात तो नेहमीप्रमाणेच तोंडातल्या तोंडात बोलून आपल्याला डायलोग कळू नयेत ह्याची पुरेपूर दक्षता घेतोच. सोनी झालेली निम्मी दिसलेय छान. पण कधीकधी तिचा अभिनय थोडा वेडगळपणाकडे झुकतो असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. राणीची महत्त्वाची भूमिका सूर्याकुमारी नावाच्या कोणा तेलुगु अभिनेत्रीने केली आहे. High cheekbones असलेली ही नटी राणी म्हणून अगदी शोभलेय. राणीचा ठसका, रुबाब, ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ ही वृत्ती, परदेशीच्या प्रेमात पडल्यावरचा तिचा नखरा तिने झक्कास साकारलाय. पण तिच्याही अभिनयात कधीकधी खास दाक्षिणात्य बटबटीतपणा डोकावून जातो. शानुच्या बेरकी भूमिकेत खलनायक जीवन आपलं ब्लडप्रेशर वाढवतात. आगा (हिरा) आणि टुणटुण (हिराच्या मागे लग्नासाठी हात धुवून लागलेली स्त्री) ह्या दोघांकडे चित्रपटाची विनोदी बाजू सांभाळायची जबाबदारी आहे. महाशक्तीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचं नाव विकीपिडियावरही स्पष्ट दिलेलं नाहीये.

गाण्यांबद्दल म्हणाल तर संगीत नौशादका, बोल शकील बदायुनीके, आवाज लता मंगेशकर और मोहम्मद रफी.  गाणी बरीच आहेत पण माझी खास आवडती म्हणजे उडत्या चालीचं टायटल सॉंग मेरा सलाम ले जा, हमारे दिलसे न जाना, मोहब्बतकी राहोमें चलना संभलके, मोरे सैय्याजी उतरेंगे पार आणि ओ दूरके मुसाफिर. पैकी टायटल सॉंग आणि ओ दूरके मुसाफिर सोडल्यास बाकीची ३ पाहून ‘ही ह्या पिक्चरमधली आहेत?’ अशी माझी रिएक्शन झाली.

आधी म्हटल्याप्रमाणे चित्रपट ’५५ सालचा आहे. तेव्हा आजच्या चित्रपटांच्या तुलना करून त्याच्याकडे पाहणं अन्यायकारक ठरेल. तरीही काही त्रुटी टाळता आल्या असत्या असं वाटतंच. उदा. चित्रपटाचा नक्की काळ आणि स्थळ स्पष्ट होत नाही. राणी काशीला ‘तू कुठून आला आहेस’ असं विचारते तेव्हा तो ‘हिंदुस्थानहुन’ असं उत्तर देतो. ह्याचा अर्थ ते नगर भारतात नसतं. पण तरी तिथे लोक स्वच्छ हिंदी बोलत असतात. आणि एका संवादात तर चक्क कबड्डीचाही उल्लेख होतो Happy तसंच ह्याचं विमान त्या भागातून उडत जात असतं म्हणजे तो प्रदेश अगदीच अज्ञात नसावा. रस्ते बंद झाल्याने काशीला तिथून निघता येत नाही असा उल्लेख येतो पण रस्ते बंद असल्याचं कारण कळत नाही. आकाशात उडणारं विमान सुपरइम्पोज केलं असल्यामुळे फारच मोठं दिसतं. त्या ऐवजी एखाद्या विमानाचा आकाशात उडताणाचा स्टोक शॉट वापरायला हवा होता. तिथल्या स्त्रिया परपुरुषाशी बोलत नाहीत असाही उल्लेख येतो पण सोनी नंतर काशीशी बिनधास्त बोलताना दिसते. बाकी स्त्रियाही उदा. राणीची दासी परपुरुषाशी बोलताना दिसतात. तसंच नावांत बसून गाणी गाणारे स्त्रिया-पुरुष एकत्रच बसलेले दिसतात. महालाचा सेट छान असला तरी एका ठिकाणी चक्क फिश टँक मध्ये मासे ठेवलेले पाहून मी चमकलेच. काशीच्या मृत शरीरातून त्याचा आत्मा बाहेर पडतो तोही म्हातारा असतो. मला त्यातून तरुण आत्मा निघेल असं वाटलं होतं Happy सोनीला दगड मारायला निघालेल्या नागरिकांना महाशक्ती ‘ज्यांनी पाप केलं नाहीये त्यांनीच फक्त दगड मारा’ असं सांगतात ते पाहून ह्यांनी बायबल वाचलं होतं का काय अशी शंका येते. सोनी काशीला न्यायला यायला इतकी वर्षं का लावते तेही कोडं उलगडत नाही.

एक जमेची बाजू म्हणजे देशाचे कायदेकानू राज्यकर्त्यांना लागू नसतात, फक्त जनसामान्यांसाठी असतात हे त्रिकालाबाधित सत्य इथेही पाहायला मिळतं. राणी खुलेआम काशीला भेटतेय ह्याबाबत कोणीही आक्षेप घेत नाही. मात्र सोनीला अग्निपरीक्षा द्यायला लावली जाते तेव्हा कोणी विरोध करत नाही. अमिरोंका खून खून, गरीबोंका खून पानी! सोनीला दगड मारायला निघालेले लोकच ती अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर पडते तेव्हा तिला खांद्यावर घेऊन नाचतात. हेही जनरीतीला धरूनच.

आभासी जगाच्या दुनियेत असे वास्तव जगाचे तुकडे दिसणं अपरिहार्यच. शेवटी काय तुम्ही आम्ही जे जगतो तेच आपल्यासाठी आयुष्य असतं. हो ना?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो अमिताच. नाव विसरले होते.

> अमिताबद्दल फारच कौतुकाचे बोल होते सौन्दर्यवती म्हणून! > तुमसा नही देखा मधे तशी छान दिसलीय ती. किंचीत चकणेपणा असेल तर क्युट दिसतात कधीकधी. सौंदर्यवती म्हणण्यासारखी नाही पण.

ती घुंगटमधली बिना राय आहे सुंदर आणि नाजूक चेहरेपट्टीची.

बिना राय म्हणजे अनारकली.
यह जिंदगी उसीकी है...

मला आवडला होता मेरे महबूब.
फक्त अशोककुमार नवाब म्हणून कसातरीच वाटतो. यात अभिनयापेक्षा डोक्यात ठसलेल्या इमेजचा वाटा अधिक आहे.

हो अनारकली. त्यातपण प्रदीपकुमारच होता ना सोबत? कि तो ताजमहाल?? गोंधळ आहे सगळा माझ्या डोक्यात Lol एनिवे दोन्ही बघितले नाहीयत.
(अपडेट: गुगलून पाहिलं, दोन्हीत तेच आहेत, एक ५३ चा आणि दुसरा ६३चा)

पण घुंगट खेरीज तिचा अजूनेक सिनेमा मी पाहीला आहे त्यात देवानंद हिरो आणि दिलीपकुमार साईड हिरो होते. त्यातपण छान दिसलीय. हिच्यात आणि मधुबालात काहीतरी साम्य आहे. पण हि शांत सोज्वळ वाटते तर ती अकडू/ खट्याळ वगैरे...

{{{ बहारोंका मौसम - धर्मेंद्र, मीनाकुमारी, रहमान. रहस्यमय आणि हटके स्टोरी आहे. }}}

प्लीज करेक्ट - बहारों की मंझिल >>>>

हो हो तो बहारोंकी मंझिलच आहे. निगाहे क्यो भटकती है हे त्यातलं लताचं गाजलेलं गाणं. मीनाकुमारीच्या शेवटच्या चित्रपटांपैकी तो होता. तिच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका आहे.

घुंघटमधे भा भू सुटाबुटात वावरला आहे आणि चक्क त्यात चांगला दिसतो आणि बराच सुसह्य आहे. सुदैवाने त्याला चित्रपटात दर्दभरी गाणी नाहीत.

गॉसिप - अनारकली बीना रायचा नवरा प्रेमनाथ . तो आधी मधुबाला वर लट्टू होता. पण मधुबाला दिलीपकुमारच्या प्रेमात आहे, हे पाहून मागे सरला.

साबिया खिलाडी मध्ये पण होती.आयेशा झुल्का ऐवजी जी मैत्रीण चुकून मारली जाते तिचा रोल तिने केला होता.
बिना रॉय तोंड वाकड्ं करुन हसते.तिच्याही अभिनयत मला कधी कधी थोडी वेडाची झाक दिसते.तसंही प्रेमनाथशी लग्न झाल्य्वर काही काळ ती मनोरुग्णालयात होती म्हणे.मधुबालाला आपल्या सहनायकना गुलाबफ़ुल द्यायची सवय होती.तसं तिने प्रेमनाथला पण दिलं.तो सातवे आसमानपर पोचलेला पाहुन अशोककुमारने त्याच्या फुग्याला टाचणी लावलीकी मधुबाला सगळ्या सहनायकाना फ़ुल देते.मधुबाला मिळाली नाही म्हणुन दुसर्या अनरकलीशी लग्न करुन त्याने दुधाची तहान ताकावर भागवली.अर्थात मी हे सगळं कुठेकुठे वाच्लेल्ं आहे

एमी :-)राजेंद्र कुमार ला विकत घेणं म्हणजे वेस्ट ऑफ़ मनी आहे.मागच्या वर्षी लोकसत्तात दादरच्या प्रीतम हॉटेल च्या मालकाची लेखमाला होती त्यात भाभू वरही एक लेख होता.त्यात तो सूटबूटात होता आणि चक्क छान दिसत होता.

खरंच स्मार्ट दिसतोय या फोटोत.
मी भरत भूषणचे दोन चित्रपट पाहिलेत.

पण भगवान दादाचा एकही चित्रपट पहायची हिंमत झाली नाही.

बहारोंकी मंझिलमधले ते गाणे छायागीतात खूप वेळा बघितले होते. मीना कुमारी भिंतीवरील फोटो बघते आणि त्या फोटोत ती स्वतःच गाताना तिला दिसते याचे कोडे तेव्हा उलगडले नव्हते. त्या गाण्यात तिने गळ्यात घातलेल्या नेकलेसचे मला तेव्हा खूप आकर्षण वाटले होते.

ह्या असल्या गोड पूर्वस्मृतीनी हल्लीच मला हा चित्रपट यु ट्यूबवर शोधायला भाग पाडले. उत्साहाने चित्रपट पाहायला घेतला खरा पण त्याच्या कथेने मला हतबुद्ध केले..... त्यात भर म्हणजे धरम-मीना ही विचित्र जोडी. कसे कास्टिंग करायचे देव जाणे.

"धरम-मीना ही विचित्र जोडी. कसे कास्टिंग करायचे देव जाणे." - आणखीन एक गॉसिप - धर्मेंद्र वर मीनाकुमारी भाळली होती आणी त्याचा उपयोग करून धर्मेंद्र ने तिचा स्टेपिंग स्टोन केला म्हणे.

हो हे मीही वाचलंय.मीनाकुमारी प्रेम ह्या संकल्पनेच्याच प्रेमात होती.असं असलं की फरपट होणारच.मी कुठल्याश्य लेखात असंही वाचलं होतं की एकदा मीनाकुमारी महमूदच्या घरी राहत होती.तो तिच्या बहिणीचा नवरा.तेव्हा धर्मेंद्रने तिथे दारु पिउन येउन खूप तमाशा केला होता.मीनाकुमारी ला त्याला भेटायचं नव्हतं.शेवटी महमूदला त्याला निघुन जायला सांगावं लागलं.

मागच्या वर्षी एक दिवाळी अंक गोल्डन एरातल्या नायिकांवर होता.नाव आठवत नाही.पण मी ह्या लेखांसाठी उपयोगी पडेल म्हणून जपुन ठेवलय.त्यात निम्मीवरही एक लेख आहे.तिची फिल्म इंडस्ट्रीत एण्ट्री कशी झाली ह्यावर माहिती आहे त्यात.तेव्हढ्या माहितीचा फोटो लेखकाच्या नावसकट इथे टाकला तर चालेल का?

ह्या असल्या गोड पूर्वस्मृतीनी हल्लीच मला हा चित्रपट यु ट्यूबवर शोधायला भाग पाडले. उत्साहाने चित्रपट पाहायला घेतला खरा पण त्याच्या कथेने मला हतबुद्ध केले>>>
actually त्या काळाच्या मानाने फारच progressive स्टोरी होती Happy ज्या काळात नायिका सती सावित्री, त्यागमूर्ती, पती परमेश्वर मानणारी, नायिकेची अब्रू म्हणजे फुटकं भांडं वगैरे मनोवृत्तीची (मीनाकुमारीच्या जवळजवळ सर्व भूमिका या छापाच्या होत्या), त्या काळातच या चित्रपटातली नायिका परपुरुषाच्या प्रेमात पडलेली, पती आणि मुलीसाठी कुठलाही त्याग करण्यास तयार नसलेली, त्याबद्दल अजिबात अपराधी किंवा खंत न करणारी म्हणजे त्या काळापुढचीच होती की Happy

मीनाकुमारी आणि धर्मेंद्रच टॉरीड अफेअर होतं.
पाकिझा मध्ये धर्मेंद्रच होता पण परत शुटिंग सुरू झालं तेव्हा त्यांच फाटलं होत म्हणून राजकुमार आला.
तोरा मन दर्पण कहलाऐ... गाण्याचा चित्रपट कोणता? त्यात हे दोघे भावंड आहेत. इतकी किळस आली होती त्यांचा अभिनय पाहून. धर्मेंद्र बरोबर चांगली पद्मिनी होती. त्या काळाशी विसंगत असा त्यांचा सुहागरातीचा सिन होता आणि चक्क दुरदर्शनने तो दाखवला होता.

स्वप्ना
निम्मीबद्दलचा लेख दे. ती तवायफ होती.
बहुतेक इसाक मुजावरांनी लिहीलं होत की नर्गीस निम्मी सारख्या तवायफ घराण्यातील मुलींनी लग्न करून चांगला संसार केला.

तोरा मन दर्पण कहलाऐ... गाण्याचा चित्रपट कोणता? त्यात हे दोघे भावंड आहेत. इतकी किळस आली होती त्यांचा अभिनय पाहून. धर्मेंद्र बरोबर चांगली पद्मिनी होती. त्या काळाशी विसंगत असा त्यांचा सुहागरातीचा सिन होता आणि चक्क दुरदर्शनने तो दाखवला होता>>>

काजल. मीनाकुमारीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता त्याच्यासाठी बहुतेक. कायच्या काय सिनेमा होता. आणि मीनाकुमारी भयानक डोक्यात गेली होती.
पद्मिनी छान दिसली होती आणि तो सुहागरातीचा सीनही चांगला कलात्मक घेतला होता. ती आणि धरम एकत्र शोभून दिसले होते.
याउलट चंदन का पलना मधे धरम मीनाचा सुहागरातीचा सीन आहे तो बघताना यक्क होतं Sad

त्या काळातच या चित्रपटातली नायिका परपुरुषाच्या प्रेमात पडलेली, पती आणि मुलीसाठी कुठलाही त्याग करण्यास तयार नसलेली, त्याबद्दल अजिबात अपराधी किंवा खंत न करणारी म्हणजे त्या काळापुढचीच होती की>>>>

अहो चिकू, काहीतरी काय, चित्रपट एकदा बघा आणि मग लिहा.

मुंबईच्या बंदरात झालेल्या बॉम्बस्फोटात मुंबईतील कित्येक माणसे मेली. त्यात मिनाची बहीण व तिचे इतर कुटुंबीय मरतात, मीनाची स्मृती जाते. तेव्हा बहिणीचा नवरा रेहमान मीनालाच आपली बायको म्हणून घरी आणतो व मीनाही त्याला आपला नवरा मानून 16 वर्षे संसार करते. 16 वर्षांनी तिची स्मृती परत येते व ती नवऱ्याला जिजाजी म्हणून हाक मारायला लागते ही कथा आहे. जिजाजी बहुतेक जिजा झाला त्या दिवसापासून सालीच्या प्रेमात असते असे नंतरचे डायलॉग ऐकून वाटते. बॉंबस्फोटाअधिचा फ्लॅशबॅक नाही, त्यामुळे कल्पना येत नाही.

मी हतबुद्ध यासाठी झाले की मीनाचे ठीक होते, तिचा मेंदू बंद पडला, म्हणून रहमान तिला 'मी तुझा नवरा' म्हटल्यावर ती मानून घेते. पण नवऱ्याच्या घरी, बाहेर कुणीच नाही जे रहमान, त्याची दोन मुले व बायकोला ओळखत नाहीत?? मुळात हा प्रेमाईस मला कैच्याकै वाटला. कुठल्यातरी पाश्चात्य चित्रपटावर आधारित असेल असे वाटले जिथे लोक आपली ओळख लपवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊन सहज राहू शकतात. भारतात नातलगांचे इतके मोठे लेंढार असते की त्यांना चुकवून, ओळख बदलून राहणे शक्य नाही.

निम्मीबद्दलचा लेख दे. ती तवायफ होती.
बहुतेक इसाक मुजावरांनी लिहीलं होत की नर्गीस निम्मी सारख्या तवायफ घराण्यातील मुलींनी लग्न करून चांगला संसार केला.>>>

या मुली तवायफ नव्हत्या तर त्यांचे खानदान तवायफांचे होते. त्यांच्या आया तिथून चित्रपटसृष्टीत आल्या व नाव कमावले. त्या जोरावर या आयांनी स्वतःच्या मुलींना चांगले शिक्षण दिले. कुठल्याही चांगल्या घरातील मुली जशा वाढल्या असत्या तशाच या मुलीही वाढल्या. चांगल्या घरातल्या कित्येक मुली चित्रपटसृष्टीच्या नादाने बरबाद झाल्या पण या मुलींनी अभिनेत्री म्हणून नावही कमावले व चांगले जोडीदार निवडून संसारही चांगले केले.

त्या काळातच या चित्रपटातली नायिका परपुरुषाच्या प्रेमात पडलेली, पती आणि मुलीसाठी कुठलाही त्याग करण्यास तयार नसलेली, त्याबद्दल अजिबात अपराधी किंवा खंत न करणारी म्हणजे त्या काळापुढचीच होती की>>>>

अहो चिकू, काहीतरी काय, चित्रपट एकदा बघा आणि मग लिहा.>>>

मला म्हणायचं होतं की ज्या काळात नायिका खानदान, घराने की इज्जत खातिर मुकाट्याने चूप राहून त्याग करीत, त्याकाळात या चित्रपटातली नायिका तिची स्मृती परत आल्यावर खूप assertively ती मी नव्हेच हे ठासून सांगते. प्रेम करणारा नवरा (म्हणजे जीजाजी), जिला १६ वर्षं मायेने सांभाळलं ती मुलगी, बाकीचे परिचित कोणीही तिला समजावायचा प्रयत्न केला तरी ती दाद देत नाही. समाजाच्या दृष्टीने ती विवाहित, मुलीची आई असते पण त्याला ती जुमानत नाही. तिला मदत करणार्‍या डॉक्टरच्या प्रेमात पडते, तो ही तिच्या प्रेमात पडतो (त्यावेळी त्याला सत्य माहीत नसूनही), ही त्यामानाने बरीच हटके स्टोरी होती. नाहीतर दुसरी typical नायिका सत्य कळूनही नवरा, मुलगी, समाजाच्या भीतीने गप्प राहिली असती.

असेलही. मला तरी असे वाटले की तिची मूळ स्मृती परत आल्यावर मधल्या काळातील स्मृती जाते. त्यामुळे पती, मुलगी ही नाती ती ओळखत नाही. ना तो पती तिचा असतो, ना ती मुलगी तिची असते, ती बहिणीची असते. ती मुलीला नंतर म्हणतेही की मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते पण तुला मुलगी म्हणून जवळ घेण्यासाठी मनात जे प्रेम हवे तेच माझ्याकडे नाही तर मी काय करू... ज्याला जिजाजी म्हणून ओळखायचे तो नवऱ्याचा हक्क दाखवायला लागला तर कोण सहन करेल...

अजून एक चित्रपट पाहिलेला, दिलने फिर याद किया.. त्यात धर्मेंद्रची स्मृती जाते किंवा येते. ती असते किंवा नसते त्या काळात बरीच उलथापालथ झालेली असते पण आता ती उघडकीस आली तर धर्मेंद्रचे कोमल हृदय तुटेल म्हणून रहमानशी विवाहित असलेली नूतन धर्मेंद्रची मंगेतर असल्याचे नाटक करत राहते, तेही रेहमानच्या संमतीने.... शेवटी मला असह्य झाला हा चित्रपट. मात्र गाणी चांगली होती..

अर्रर्रर्र......मला तो चित्रपटपहायचा होता .....आता रहस्य कळलं.....पाहण्यात अर्थ नाही Sad

पाहण्यात अर्थ नाही>>
मी हेच सांगणार होतो. आता नको लिहूस.

साधना
तू म्हणतेस तितक सोप नव्हतं त्यांच आयुष्य. भयंकर होत.
आयांच्या भानगडी आणि त्यातून निर्माण झालेले नातेवाईक सांभाळताना मेटाकुटीला आल्या होत्या.
नूतनने का केस टाकली आईवर.
नर्गीस अक्षरशः घरदार सोडून सुनील दत्त बरोबर निघून गेली.
तिला राज कपूर इतकच घरच्यांनीही फसवलं.
तू सुधीर मिश्राचा खोया चांद नावाचा चित्रपट पहा. सोहा अली खानची भुमिका म्हणजे नर्गीस, मीनाकुमारी मधुबालाच मिश्रण आहे.

तसे असणार.. कारण नातेवाईकांचे इश्यूज होतेच. त्यांना आयते खायला मिळायला लागलेले, यांच्या जीवावर...

नूतनचा नवरा खूप अब्युसिव्ह होता, नूतनवर त्याचा खूप कंट्रोल होता. केस टाकण्याचे प्रकरण त्यामुळे निर्माण झाले असे वाचले होते. नूतनचे संजीवकुमार बरोबर फाटले त्यामागेही तोच होता. नूतन पडद्यावर समर्थ स्त्रीच्या भूमिका करत असली तरी प्रत्यक्षात ती नवऱ्याच्या मुठीतली मुकी
बाहुली होती असे जितके वाचले त्यावरून वाटते.

निम्मी, नर्गिस नशीबवान निघाल्या की त्यांना खंबीर जोडीदार मिळाले व त्या पाठिंब्यावर त्यांनी आयुष्य बदलून टाकले. सुरेय्या, मधुबाला त्या बाबतीत कमनशिबी निघाल्या.

आता दीपिकासंदर्भातही जे वाचायला मिळतेय त्यावरून ती ह्या रिलेशनशिप प्रकरणांमुळे नैराश्याची शिकार झाली होती व रणवीरच्या रूपाने तिच्या आयुष्यात एक चांगली आशा दायक सुरवात झालीय असे वाटतेय.

स्वप्ना, सॉरी ग, सस्पेन्स फुटला. बहरोंकी मांझील त्यातल्या त्यात बरा होता, तू अजूनही बघू शकते, कामे चांगली झालीत. धर्मेंद्र तर डोळ्यात बदाम आहेच पण फरीदा जलालही गोड दिसलीये. तिचा पहिला किंवा तसाच चित्रपट असावा.

पण दिल ने फिर... नको नको नको असेच म्हणेन.
त्यातले शीर्षक गीत व आजारे, प्यार पुकारे, दो नैना रो रो हारे ही दोन गाणी यु ट्यूबवर बघून घे. बाकी वेस्ट ऑफ टाइम.

तू नागीण बघ व लिही. खूप मटेरीयल।आहे लिहिण्याजोगे. वैजयंती व प्रदीप. आणि दोघेही लहान असल्यामुळे बोजड नाहीत. छान दिसते जोडी. मी थेटरात बघितलेला. रुप टॉकीजला असले भन्नाट जुने पिक्चर यायचे..खूप जुने पिक्चर बघितलेत तिथे. गेले ते दिवस.... Happy Happy

Pages