साधनेचे विविध मार्ग
त्रयी सांख्यं योग: पशुपतिमतं वैष्णवमिति ।
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद: पथ्यमिति च ॥
रुचीनां वैचित्र्याद्रृजुकुटिलनानापथजुषां।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥ (श्री शिवमहिम्नस्तोत्र – ७)
अर्थ - वेद,सांख्य,योग,शैवमत, वैष्णवमत अशा वेगवेगळ्या पंथांत आपलाच मार्ग हितकर आहे, असे रुचिवैचित्रयामुळे म्हणणार्या, सरळ किंवा वक्र अशा नाना मार्गांनी जाणार्या सर्व लोकांचे अंतिम ध्येय ; जसे सर्व नद्यांचे अंतिम मीलन महासागरात होते, ; तसे तूच केवळ आहेस.
परमात्म्याला भक्तांचे ,साधकांचे,मुमुक्षूंचे साधनेचे सगळे मार्ग प्रिय असतात.गीतेत सांगितले आहे की जे मला ज्या प्रकारे भजतात, त्यांना मी त्याचप्रमाणे फळ देतो. हे पार्था, कोणीकडून झाले तरी मनुष्ये माझ्याच मार्गाला येऊन मिळत असतात. –
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश:॥ (भगवद्गीता ४/११)
साधनेचे असे विविध मार्ग साधकाच्या आवडीवर, पात्रतेवर,त्याच्या दैनंदिन कर्माच्या , व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असतात.रुचि किंवा आवड ही पूर्वजन्मीच्या संस्कारांवर अवलंबून असते. पात्रता ही त्याच्या बुद्धीवर,बाहुबलावर,सामर्थ्यावर,सहनशक्तीवर, आचरणावर,भावनांवर, सर्वभूतात्मकतेवर, परोपकारवृत्तीवर अवलंबून असते. पात्रता ही तशी कोणाची मिरासदारी नसते. ती अभ्यासाने प्राप्त होऊ शकते व ती प्राप्त झाल्याखेरीज कळत नाही.त्याचप्रमाणे नित्याचे कर्म ज्या परकारचे असते, त्याला सोयीची अशी साधना अंगिकारावी लागते.सर्व कर्मांचे,व्यवसायांचे ढोबळ अशा चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करता येते. त्या अशा – १) बुद्धिजीवी, २)क्षत्रधर्मप्रधान/ शक्तिजीवी ३) व्यवसायप्रधान, ४) सेवाप्रधान.
याच श्रेणींना प्राचीन काळात वर्ण म्हणून संबोधिलेगेले आहे.त्या त्या श्रेणीचे स्वभावधर्म वेगवेगळे असतात व त्याप्रमाणे साधनेचे मार्गही भिन्न असतात. याशिवाय कोणत्याही श्रेणीतील साधकाला जो मोकळा वेळ मिळत असेल, त्याच्या भोवतालची सामाजिक परिस्थिती जशी असेल, त्यावर त्याची साधना अवलंबून राहील.
साधनेचे प्रमुख मार्ग –
१)ज्ञान, २) ध्यानयोग,३) योगमार्ग(अष्टांगयोग), ४) भक्तिमार्ग (नामस्मरण,पूजा,अर्चा,जप,भजन,कीर्तन,प्रवचन,पठण) ५) कर्मयोग, ६) मंत्रयोग, ७)महायोग, ८) लययोग, ९) हठयोग, १०) क्रियायोग.
स्पष्टीकरण थोडक्यात असे –
१) ज्ञानमार्ग - ब्रह्मस्वरूप पहिल्यापासून अव्यक्त,निराकार व केवळ बुद्धिगम्य म्हणजे ज्ञानमय आहे.यावरच ध्यान करून, त्या रूपात तल्लीन होऊन जाण्याच्या मार्गाला ज्ञानयोग किंवा अव्यक्तोपासना म्हणतात.
२) ध्यानयोग – परमेश्वराच्या निर्गुण व सगुण स्वरुपावर चित्त केंद्रित करून त्याचाच सातत्याने विचार करणे व त्याखेरीज अन्य विषयाचा विचार न करणे म्हणजे ध्यान.
३) योगमार्ग – (अष्टांगयोग) चित्तवृत्तीचा निरोध करून शरीर,मन,बुद्धी; यम,नियम,आसन,प्रत्याहार,प्राणायाम,धारणा, ध्यान व समाधि या साधनांनी कैवल्यपद प्राप्त करून घेणे,स्वरूपशून्य होऊन जाणे.
४) भक्तिमार्ग – परमात्म्याच्या सगुण,मूर्त स्वरूपावर ध्यान करणे, त्या रूपाची अनेकविध (नऊ) मार्गांनी भक्ती करणे.
५) कर्मयोग – अनासक्त किंवा निष्काम बुद्धीने , मनात फलाशा न ठेवता नियत व विहित कर्म यथायोग्य प्रकारे
करणे.
६) मंत्रयोग – गुरुकडून मिळालेल्या अक्षराचा (बीजाक्षराचा) किंवा अक्षरसमूहाचा (मंत्राचा) काही विशिष्ट हेतू मनात धरून,संकल्प करून केलेला अनेकवार उच्चार व अशा पद्धतीने परमात्मप्राप्ती करून घेणे.
७) महायोग – गुरूकडून शक्तिपात करवून ज्ञानप्राप्ती व आध्यात्मिक उन्नती घडवून आणणे
८) लययोग – मनाचा परमात्मस्वरूपावर किंवा आंतरिक सूक्ष्म ध्वनीवर, ॐ कारावर लय घडवून आणणे.
९) हठयोग – आसन,प्राणायाम,मुद्रा,बंध वगैरे साधनांनी इंद्रियजय मिळवणे व आध्यात्मिक विकासासाठी योग्य असा सिद्ध देह करणे.
10) क्रियायोग – काही एका विशिष्ट योगप्रक्रियेने प्राण व अपान वायूंचे समरसीकरण घडवून आणणे.हा योग अष्टांगयोगांतर्गत आहे.
यानंतर कोणता मार्ग समाजाच्या कोणत्या घटकांना त्यांच्या अभिरुचीला सुसंगत ठरू शकतो,याचा विचार करू.
बुद्धिवादी, बुद्धिजीवी व तर्कनिष्ठ ज्ञानी लोक ज्ञानमार्ग पसंत करतात. ध्यान हे भक्ति,ज्ञान, योग, मंत्र, लय यांचे एक मुख्य अंग आहे. योगमार्गाचा अवलंब करणार्यास सुदृढ प्रकृतीची, सोशिकतेची, व्यायामाची आवड असावी लागते. योगमार्गातही शरीरकष्ट सोसण्याची तयारी असावी लागते. भक्तिमार्ग हा सर्वसाधारण लोकांकरिता अशासाठी, की त्याकरिता गाढ विद्वत्ता, प्रखर बुद्धिमत्ता यांची फारशी जरूरी नाही (असले तर चांगलेच). आपला उद्योग,व्यवसाय सांभाळून बहुसंख्य लोकांना हा मार्ग मोकळा आहे. मात्र पूर्ण आस्तिक्यबुद्धी व शुद्ध भावना हवी.या मार्गातील साधना भावनिक / मानसिक असते. देहदंडनाची गरज नसते.
जन्मास आलेला प्रत्येक माणूस काहीतरी कर्म करीतच असतो.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै:॥ (भगवद्गीता ३/५)
अर्थ – कोणीही एक क्षणभरसुद्धा कर्म सोडून केव्हाही राहत नाही. कारण कर्माच्या अधीन असलेलाच प्रत्येक प्राणी , प्रकृति- पराधीन असलेल्या प्रत्येक जीवाकरवी, ईश्वराच्या अचिंत्य शक्तीपासून झालेल्या सत्त्व-रज-तम गुणांकडून कर्म करविले जाते.
श्वासोच्छ्वास सतत करीत राहणे हेही एक कर्मच आहे. कर्म सुटलेले आहे, असा एक क्षणही जात नाही. कर्म करीत राहूनही त्याच्या फलाविषयी आसक्ती मनात न धरणे हीदेखील एक साधनाच आहे व ती आचरण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. संसारात, व्यवहारात मनुष्याला नाना तर्हेची कर्मे करावी लागतात. काही कर्मे अशी असतात की त्यांचा उद्देश साध्य होईल की नाही याची खात्रीनसते. तरीही ते काम करावे लागते अशी स्थिती असते. अशा कर्माचे आचरण करताना अनासक्त, निर्हेतुक कर्म अपरिहार्यपणे करावे लागते. अशी कर्माची व्यवहारातली खूप उदाहरणे देता येतील. एखाद्या वकिलाला कोर्टात अशिलाचे किंवा एखादे अवघड काम करावे लागते तेव्हा ते यशस्वी होईल की नाही, हे तो प्रथम सांगू शकत नाही. शल्यविशारदाचेही तसेच आहे. तरीही ते आपापले काम अनासक्त वृत्तीने करत असतात.
कर्म मार्गाचे वैशिष्ट्य असे आहे की निष्कामबुद्धीने कर्म करीत असताना वेगळी अशी साधना करण्याची गरज राहत नाही. त्याद्वारेच त्यास परमेश्वराचे दर्शन होऊ शकते. सावता माळ्याला बागायतीचे काम तन्मयतेने करताना विठूमाऊलीचे दर्शन होत असे.
अहो कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी॥
लसूण मिरची कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरी॥
मोट नाडा विहीर दोरी। /वगी व्यापिली पंढरी॥
सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायी गोविला गळा॥ - सावता माळी
अशा अनासक्त कर्मानेच जनकादिक सिद्ध योगी झाले.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय:॥ (भगवद्गीता 3/20)
मंत्रयोगातील थोडेच मंत्र स्वानुभूतीपर आहेत. बाकीचे काम्य वा ऐहिक हेतू साध्य करण्यासाठी योजिलेले असतात. साधनेकरिता स्वानुभूतीपर मंत्राचाच विचार करणे हिताचे .
महायोग / शक्तिपात हा एक तांत्रिक मार्ग आहे.कुंडलिनीयोग हा त्याच्यात अंतर्भूत असून हठयोगाशीही त्याचा संबंध आहे. कारण काही आसने,मुद्रा,बंध यांच्या अभ्यासाने कुंडलिनी जागृत व्हावयास मदत होते.
कोणत्याही एका योगमार्गाचा दुसर्याशी संबंध असतोच.तसेच वेदान्तातील मूलभूत अशी जीव – परमात्मा भूमिकादेखील सर्व साधनामार्गांमध्ये अभिप्रेत आहे. भक्तिमार्गात – जप,भजन,नामस्मरण,कीर्तन,पूजा,प्रवचन इ. चा अंतर्भाव होतो.
साधनेचे आणखी काही मार्ग म्हणजे – सत्संग,होम,उपवास, व्रते,तीर्थयात्रा, प्रदक्षिणा, दान,परोपकार,सेवा,इ.
सत्संग – सज्जनांच्या, सात्विक प्रवृत्तीच्या माणसांच्या संगतीत राहणे.
कोणत्याही प्रकारची मनोवृत्ती ही चुंबकीय स्वरुपाची असते. सर्वच मनोविकार,विचार हे सौम्य असे स्थायी विद्यत् प्रवाह असतात व त्यांच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. (विज्ञानात ह्याला पॉझिटिव्ह/निगिव्ह एनर्जी म्हणतात) त्यामुळे त्या प्रभावातील लोकांच्या मनातही तसेच विचार/प्रेरणा उत्पन्न होतात.
हरि प्राप्तीचा उपाय। धरावे संतांचे पाय॥
तेणे साधती सर्व साधने।तुटती भवाची बंधने॥
एका जनार्दनी संत। पूर्ण करिती मनोरथ॥ (संत एकनाथ)
सुसंगति सदा घडो। (मोरोपंत)
मथुरा जावै द्वारका, भावे जावै जगन्नाथ॥
साधुसंग हरि भजन बिन, कछु न आवै हाथ।
कोटि कोटि तीरथ करै,कोटि कोटि करै धाम।
जब लग संतन सेवई, सरै एकहू काम॥ (संत कबीर)
संतांच्या संगतीमध्ये मनोवृत्तीत सकारात्मक बदल होतो. हाच सत्संगतीचा महिमा आहे.
(क्रमश:)
स्त्रोत - दिवंगत परिचित व्यक्तीच्या नोंदी व टिपणे
साधना - २ : साधनेचे मार्ग
Submitted by प्राचीन on 9 March, 2019 - 04:47
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला अपेक्षीत असल्याप्रमाणे ही
मला अपेक्षीत असल्याप्रमाणे ही लेखमाला नाही असे म्हणनार होतो पण तुम्ही
स्त्रोत - दिवंगत परिचित व्यक्तीच्या नोंदी व टिपणे
हे सांगीतल्यामुळे जास्त काही लिहित नाही.
हा ही भाग छान आहे.
धन्यवाद शाली. मी तसं पहिल्या
धन्यवाद शाली. मी तसं पहिल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे ना.
तरीही मला वाटते की तुम्ही
तरीही मला वाटते की तुम्ही अजुन विस्तृत लिहिले तर खुप छान वाटेल वाचायला. या लेखात प्रत्येक विषयाची फक्त तोंडओळख करुन दिली आहे असे वाटते. प्रत्येक गोष्टींचे सहज भाषेत विवेचन असेल तर लेखमाला अजुन सुंदर होईल असे मला वाटते. पुढील भागांसाठी शुभेच्छा.
मला हे अपेक्षीत आहे असे वरच्या प्रतिसादात मी म्हटले आहे. गैरसमज नसावा.
नोटेड, शाली.. जिज्ञासा व्यक्त
नोटेड, शाली.. जिज्ञासा व्यक्त केली त्याबद्दल खरंच धन्यवाद.
सुंदर लिहिलंय! पुढील
सुंदर लिहिलंय! पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
परमात्म्याला भक्तांचे
परमात्म्याला भक्तांचे ,साधकांचे,मुमुक्षूंचे साधनेचे सगळे मार्ग प्रिय असतात<<<<
१. त्यामुळे कोणत्याही साधकाला, कोणताही साधनेचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य असावं, साधनेचा मार्ग हा वर्गीकरणावर अवलंबून नसावा.
ध्यानयोग – परमेश्वराच्या निर्गुण व सगुण स्वरुपावर<<<<<
२. परमेश्वर स्वरूप मुळात निर्गुण आणि साकार आहेच, त्यामुळे परमेश्वराच्या निराकार स्वरुपावर ध्यान असावे
३. ध्यानयोगात, निर्विचारिता मध्ये ध्यान होणे गरजेचे आहे, कारण विचार/मन या संकल्पना मानवनिर्मित असून त्या ध्याना आड येतात.
४. गुरुकडून मिळालेल्या अक्षराचा<<<<
गुरू या शब्दजागी परमेश्वर हा शब्द असावा.
कारण सर्व काही परमेश्वरनिर्मित आहे, परमात्मा हाच गुरु आणि गुरु हाच परमात्मा आहे. मनुष्य फक्त साधक बनू शकतो.
चैत्यन्य, योग्य मुद्दे.
चैत्यन्य, योग्य मुद्दे. साधकाला साधनेचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य असतेच. किंबहुना बऱ्याचदा साधकाने कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे ठरलेले असते.
परमेश्वर जरी निर्गुण, निराकार असला व प्रत्येक साधना अद्वैताकडेच जात असली तरी साधकाचा कल निर्गुणाकडे आहे की सगुणाकडे हे लक्षात घेऊन गुरु साधनामार्ग सुचवतात. दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे घेऊन जात असले तरी साधकाचा कल पाहुन मार्ग निवडल्यास त्यात त्याला गतीने प्रगती करता येते. आणि तसेही निराकारावर ध्यान केंद्रीत करणे अवघड असते त्यामुळे सगुणापासून सुरवात करुन निर्गुणाकडे प्रवास करणे सुलभ असते.
गुरु हा शब्द योग्य आहे. परमात्मा हाच गुरु आणि गुरु हाच परमात्मा आहे हे जरी खरे असले तरी ते ज्ञान साधकाला नसते. (ऐकून माहित असले तरी अनुभव नसतो) जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोवर साधकाला गुरु हे इश्वरापेक्षा मोठे वाटतात. ते तसे वाटणे हाही साधनेचाच एक भाग आहे. जेंव्हा साधक साधनेच्या अंतीम पायरीवर पोहचतो तेंव्हा सद्गुरु परमात्म्यात विलिन होतात.
१. मी फक्त परमेश्वर मानतो,
१. मी फक्त परमेश्वर मानतो, मनुष्य स्वरूपातला गुरु मानत नाही.
२. जर साधनेचं ज्ञान नसेल, तर त्याबद्दल वाचून, ध्यान धारणा करून ते वाढवावे, आपल्याइथे पुष्कळ अध्यात्मिक साहित्य आहे, पण त्यासाठी पैसे देऊन, कोणत्याही गुरुकडे जाणे योग्य वाटत नाही.
३. साधकाचा कल हा साधकानेच ठरवावा, ध्यानाची सुरुवातच निर्विचारीतेमध्येच होते, तो मार्ग किती अवघड असला तरी शिकून घेऊन त्याचा नियमित सराव करणे मला आवडेल.
४. ज्या साधकाला, त्याचे गुरु परमेश्वरापेक्षा मोठे वाटतात, तो साधक योग मार्गातून भरकटला असं मी म्हणेल
आपणा दोघांचीही थोडी गल्लत होत
आपणा दोघांचीही थोडी गल्लत होत आहे. मी भक्तीमार्गाविषयी बोलत असुन तुम्ही योगमार्गाविषयी लिहित आहात.
एकवेळ भक्तीमार्गात गुरू नसतील तर चालेल. प्रगती हळू होईल. पण योगमार्गात मात्र शंभर टक्के गुरुंची आवश्यकता असते. योगसाधना कधीही वाचीव किंवा ऐकीव माहितीवर करू नये.
राहता राहीला गुरुंचा प्रश्न तर मी सद्गुरुंविषयी बोलतो आहे. पैसे घेणाऱ्या भोंदू गुरुंबद्दल नाही. ईश्वरप्राप्तीचा कोणताही मार्ग अनुसरत असताना, तुम्हाला गुरुंची जेंव्हा आवश्यकता असते तेंव्हा ते स्वत: तुमच्याकडे येतात. तुम्हाला त्यांना शोधायची किंवा त्यांच्याकडे जायची आवश्यकता नसते.
अज्ञातवासी जी तुम्हाला
अज्ञातवासी जी तुम्हाला धन्यवाद देते.
शालीजी व चैतन्य जी तुमच्या चर्चेमुळे माझ्या दृष्टीने अधिक तत्त्वबोध होत आहे..अशी अभ्यासपूर्ण मतमतांतरे आवश्यकच असतात. धन्यवाद
मी आजवर भरपूर संतसाहित्य
मी आजवर भरपूर संतसाहित्य वाचलं. अनेक प्रकारच्या साधना करायचा उद्योग करुन पाहिला पण साधना घडण्यास काही तरी पुर्वपुण्य गाठीस पाहिजे , किमान जन्म तरी सात्त्विक वृत्तीच्या आईवडलांपोटी हवा.
सरतेशेवटी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर श्रीमहाराज यांच्या चरित्राचे वाचन , त्यांनी सांगितलेले विचार यांनी पुर्ण मन:शांती मिळाली. सद्गुरू कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण ते आहेत. शालीजी आपण त्यांचे चरित्र जरुर वाचावे. चमत्कार सोडून द्या फक्त उपदेश लक्षात घ्या. धन्यवाद.
शशिराम विपू पहा कृपया.
हो हे अगदी खरे आहे. म्हणूनच 'पुर्व सुकृतांची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी' असं म्हटलय.
माऊलींनी नवव्या अध्यायात सद्गुरुंचे वर्णन करताना म्हटले आहे:
जयांचे वाचे पुढां भोजे। नाम नाचत असे माझें।
जें जन्मसहस्रीं ओळगिजे। एकवेळ मुखासि यावया॥
हजारो जन्मांचे पुण्य असेल तेंव्हा कुठे मुखात एकवेळ नाम येते. नामस्मरण दुरची गोष्ट आहे, नामस्मरण करायची इच्छा होणे हे देखील फार दुर्लभ आहे. शशिराम विपू पहा कृपया.
धन्यवाद शाली जी
धन्यवाद शाली जी
छान लेख !
छान लेख !
Submitted by शाली on 9 March, 2019 - 18:45>>>
शाली काकांच्या ह्या प्रतिसादाशी सहमत.
>>त्यासाठी पैसे देऊन, कोणत्याही गुरुकडे जाणे योग्य वाटत नाही>>>
पैसे घेणारा 'गुरू' कसा होईल !
पैसे घेऊन आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या सो कॉल्ड सदगुरुच्या पार्श्वभागावर जोराची लाथ मारून त्याची तथाकथित आध्यात्मिक लायकी त्याला दाखवून द्यायला हवी !
आता हळूहळू रेकी, भानामती,
आता हळूहळू रेकी, भानामती, इंद्राजल, मेलेल्या माणसांना जिवंत करणे या साधना येऊ द्यात. म्हणजे मस्त मजा येईल.
आता हळूहळू रेकी, भानामती,
आता हळूहळू रेकी, भानामती, इंद्राजल, मेलेल्या माणसांना जिवंत करणे या साधना येऊ द्यात>>>>
बस्स ! एवढंच माहीती आहे ?
मग तुम्ही फाsssर मागे आहात ब्वॉ !
आणि हो, तुम्ही वर लिहीलेल्या साधना नाहीत !
मी आजवर भरपूर संतसाहित्य
मी आजवर भरपूर संतसाहित्य वाचलं. अनेक प्रकारच्या साधना करायचा उद्योग करुन पाहिला पण साधना घडण्यास काही तरी पुर्वपुण्य गाठीस पाहिजे , किमान जन्म तरी सात्त्विक वृत्तीच्या आईवडलांपोटी हवा >>>> हे खरं आहे . तुम्ही बेलसरेंची अध्यात्म संवाद हि पुस्तके वाचली असतीलच.
तुम्ही बेलसरेंची अध्यात्म
तुम्ही बेलसरेंची अध्यात्म संवाद हि पुस्तके वाचली असतीलच.
--- नाहीत. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला फक्त श्रीमहाराजांचेच साहित्य आवडते. बेलसरे वगैरे महात्म्यांनी सांगितलेले उच्छिष्ट वाटते.
देवानेच प्रुथ्वि निर्माण केलि
देवानेच प्रुथ्वि निर्माण केलि , विश्व निर्माण केले . त्यामुळे गुरु कोणिहि असु शकत. नदि , वारा , निसर्ग अगदि काहिहि. त्यहि पलिकडे देवानेच मनुश्याला तयार केल. आप्ल्या सगळ्यान मध्ये पण देव आहे. तोच जर अनुभवला तर बाहेर गुरु शोधन्याचि गरज रहणार नाहि.
ज्ञान सर्वत्र आहे त्यासथि फक्त आपल. मन मोकळ पाहिजे.