चिमणी

Submitted by स्वप्नील रसाळ on 17 January, 2019 - 13:35

किलबिलाट सारा आज शून्य होता,
दुडदुडत्या पैंजनाचा आवाज संथ होता
कोपऱ्यातून हुंदक्याच्या आवाज आला कानी,
व्याकुळ झाला तो, पाहता रडती चिमणी

उंबऱ्यात दिसता बाबा, आता उधाण आले
भरले तुडुंब डोळे, गाली काजळ ओघळले
त्याने पसरता हात, चिमणी धावत आली
पैंजनांचे मौन तोडीत ती, बाबाला बिलगली

डोळे पुसता पुसता, त्याला हुंदक्यात बोलली
मलाही हवा शालू, चिमणी हट्टाला पेटली
मिळाला नवा शालू, नटली नवरी लाडकी
गालावर खळ पेरीत चिमणी आनंदून हसली

हसता हसता बाबा आता भानावरी आला,
लग्न मंडपात लेकीच्या पुन्हा हळवा झाला
साऱ्या आठवणींने घेरले, शब्द सारेच हरवले,
आणि बाबाच्या डोळयांत अश्रू तराळले

नांदण्या निघाली सासरी, लेक शालूत नटलेली
नव्या संसारासाठी चिमणी घरटं सोडून गेली..

- स्वप्नील बाळासाहेब रसाळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users