श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या रक्षबंधन, गौरी गणपती नवरात्र, दसरा अशा सणांची, उत्सवांची सांगता होते दिवाळीने . पण गावाकडे जिथे स्वतःची घरं असतात, घरांपुढे अंगण असत आणि अंगणात तुळशी वृंदावन असतंच असत तिथे दिवाळी झाली तरी सणाचा माहौल टिकून असतो कारण दिवाळी नंतर वेध लागतात तुळशीच्या लग्नाचे . कोकणात आमच्याकडे ही तुळशीचं लग्न फार थाटामाटात साजरं होत दरवर्षी.
मुख्य खळ्याचाच भाग असलेलं पण दोन पायऱ्या उंचावर असलेल्या खळ्यात आमचं वृंदावन आहे आणि म्हणून त्याला तुळशीचं खळं असंच नाव पडलं आहे. चार हत्तीनी तोलून धरलेल्या कमळावर तुळशी वृंदावन विराजमान झालं आहे . प्राजक्त, नागचाफा अशी सुगंधी फुलं तुळशीवर वर्षाव करून रोज तिची पूजा करतात. जनरली दर पावसाळ्याच्या सुरवातीला आम्ही नवं तुळशीचं रोप लावतो म्हणजे लग्नापर्यंत शेलाटी , अटकर बांध्याची, हिरवा पानांचा साज आणि मंजिऱ्याचं वैभव अंगावर मिरवणारी तुळस एखाद्या तरुण, रूपवान नववधू सारखी तेजस्वी दिसु लागते. दररोज सकाळी तुळशीसमोर रांगोळी, तुळशीला पाणी, तिची पंचोपचारी पूजा, संध्याकळी तुळशीपुढे दिवा हे सगळे ही घरातल्या एखाद्या लाडक्या मुलीप्रमाणे होतच असतं. पूर्वी घरातल्या सगळ्या स्त्रिया रोज तुळशीला पाणी घालत असत, तेवढंच जरा खळ्यातली मोकळी हवा मिळवायचं एक निमित्त. असो. सहाजिकच तुळशीचं लग्न ही थाटामाटातच साजरं होत दरवर्षी.
कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमे पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने एक दिवस निश्चित केला जातो. तुळशीचं लग्न नेहमी गोरज मुहूर्तावरच लावलं जात . तरी ही सकाळपासूनच घरात लग्नाची धामधूम सुरू असते. तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी केली जाते, खळं धुवून स्वच्छ केलं जातं . वृंदावनाभोवती सुबक रांगोळीचे रेखाटन केलं जातं. वठारात लग्नाची अक्षत देऊन आग्रहाचं निमंत्रण केलं जातं. घरात गोडाधोडाच जेवण बनवलं जात. जनरली लग्न म्हणून जिलबीचाच बेत असतो. तुळशीला भक्तिभावाने दुपारी त्याचा नैवेद्य ही दाखवला जातो.
मुहूर्तापर्यंत लग्नाची सगळी जय्यत तयारी केली जाते. घरातली सगळी मंडळी नवे कपडे घालून तयार होतात. तुळशीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवले जातात . तुलसी विवाहानंतरच चिंचा आवळे खायला सुरवात करतात अजून ही आमच्या कडे. कोकणात पूर्वी ऊस मिळत नसे त्यामुळे ऊसाचा मांडव करण्याची प्रथा नाहीये आमच्याकडे.
तुळशीच्या पुढ्यात काटक्या रोवून त्याला साडी चोळी नेसवली जाते . गळ्यामध्ये मंगळसूत्र, हार असे दागिने घालून नवरी मुलगी सालंकृत लग्नाला उभी राहते. गुरुजी येऊन लग्नाच्या विधीना सुरवात करतात. देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ताम्हनात घालून नवरदेव म्हणून अत्यंत भक्तिभावाने आणला जातो. ह्या दोघात अंतरपाट धरून अगदी मंगलाष्टक वैगेरे म्हणून थाटामाटात हा विवाह संपन्न होतो. आमच्याकडे मावळतीची किरण रोजच तुळशीवर पडतात पण आज त्या सोनेरी किरणांच्या प्रकाशात नववधूच्या तेजाने चमकणारी तुळस आणखीनच तेजस्वी भासते . मुलं दिवाळीतले मुद्दाम राखून ठेवलेले फटाके उडवतात . वऱ्हाडी मंडळींना लग्नाचा म्हणून लाडू चिवडा आणि पान सुपारी दिली जाते आणि हा विवाह सोहळा संपतो. हळू हळू अंधाराचं साम्राज्य पसरू लागतं पण आज तुळशीचं खळं अनेक पणत्यानी प्रकाशित झालेलं असत. पणत्यांच्या प्रकाशात ती तुळस एखाद्या समाधानी आणि आनंदी गृहलक्ष्मी सारखी दिसते मला . सकाळी रूपवान युवती, संध्याकाळी नववधू आणि रात्री समाधानी गृहलक्ष्मी .. एकाच दिवशी तीन तीन रूप दिसतात तुळशीची.
आपलं जीवन सुखकर, आनंदी, आरोग्यदायी करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पूजनीय मानल्या आहेत. निसर्गावर कुरघोडी न करता त्याच्या हातात हात घालून पुढे जाण्याची आपली परंपरा आहे . आपण वड, नाग, गाय, बैल, चूल, जातं, मुसळ, उखळ,अग्नी, दीप या सगळ्याचं पूजन करून त्यांच्याप्रती आपली असलेली कृतज्ञता व्यक्त करत असतो . परंतु मला सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे तुळशी सारख्या उपयोगी आणि औषधी झाडाची पूजा तर आपण करतोच पण साक्षात भगवंताची पत्नी होण्याचा मान आपण तिला दिला आहे म्हणून तुळशीचं लग्न हा माझा खूप आवडता सण आहे.
महादेश्वर हे आमच्या गावचं ग्रामदैवत. अजून ही नवीन लग्न झालेली मुंबईची मुलं ही महादेश्वराच्या पाया पडायला आवर्जून जातात . नवीन गाडी वैगेरे घेतली की त्याचा आशीर्वाद हवाच घ्यायला इतकी श्रद्धा आहे सगळ्या ग्रामस्थांची महादेश्वरावर. हे देऊळ आहे गावच्या सीमेवर . देवळात जाण्यासाठी एक छोटीशी घाटी उतरावी लागते. देऊळ म्हणाल तर टिपिकल कोकणातल्या देवळसारखं कौलारू . छोटासा सभामंडप आणि छोटासा गाभारा . सभामंडपात भिंतीवर पौराणिक चित्र रंगवलेली आहेत . गाभाऱ्यातली शंकराची पिंड बहुतेक वेळा तगरीच्या फुलांनी सजवलेली असते. काळ्या भोर पिंडीवर ती पांढरी फुलं फार खुलून दिसतात. समईचा मंद प्रकाश गाभारा उजळून टाकत असतो . कोकणातल्या इतर देवळांसारखं हे देऊळ ही आहे शांत आणि स्वच्छ ! तिथे गेल्यावर फार प्रसन्न वाटत. आपल्याशिवाय कोणी ही नसत देवळात . गुरव ही आपण गाऱ्हाणं घालायला बोलावला तरच येतो . देवळाबाहेर एक भला मोठा पुरातन पिंपळ आहे . त्याच्या पानांची सळसळ हाच काय तो शांतता भंग करणारा आवाज. अशी फार प्रसिद्ध नसलेल्या कोकणातल्या खेड्यातल्या देवळात मनाला हवी असते ती शांती मिळते म्हणून मला तिथे जायला फार आवडत. देवळातून निघताना एक आवर्जून करायची गोष्ट म्हणजे गुरवाकडून कळशी घ्यायची, विहिरीचं पाणी काढायचं आणि ते हाताच्या ओंजळीने पोट भरेपर्यंत प्यायचं. असं थंडगार गोड पाणी मी जगात इतर कुठे ही प्यायलेलं नाहीये.
चला, नमनाला घडाभर तेल घालून झालं आहे, आता मुद्द्याकडे येते. तर ह्या देवळाच्या प्रांगणात पाच छोट्या छोट्या दीपमाळा आहेत आणि म्हणून त्रिपुरी पौर्णिमेला महादेश्वराचा तीन दिवस मोठा उत्सव साजरा होतो. गावकऱ्यांची कार्यकारी समिती दोन महिने आधीच स्थापन झालेली असते उत्सव नीट पणे संपन्न व्हावा म्हणून. दरवर्षी उत्सवाच्या निमित्ताने देवळाची डागडुजी, रंगरंगोटी केली जाते. देवळावर विजेच्या दिव्यांची रोषणाई केली जाते.
त्रिपुरी पौर्णिमा हा मुख्य दिवस असतो उत्सवाचा . भरपूर फुलं, हार आणले जातात कोल्हापूर आणि देवगड हुन. सारं गाव झटत असत उत्सव चांगला व्हावा यासाठी. संध्याकाळी कथा आणि कीर्तन असतं. घाटीच्या दोन्ही बाजूला जत्रेची दुकान बसतात. गावातला प्रत्येक जण ह्या दिवशी महादेश्वराच्या दर्शनाला देवळात हजर असतो . जत्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील लोकं ही येतात. कथा झाली की दीपमाळा उजळण्याचा कार्यक्रम होतो. पाचपैकी एक दीपमाळ आमची आहे . दीपमाळेवर सर्वात वरती कोहळा कोरून त्यात मोठी वात लावलेली असते. बाकी ठिकाणी मेणबत्त्या लावतात. कोणाची दीपमाळ सर्वात आधी उजळली जाते ह्याचा छोटासा खेळ रंगतो. आमच्या कडे माणूस बळ भरपूर असल्याने बहुतेक वेळा आमचाच पहिला नंबर लागतो. एका रांगेतल्या असलेल्या त्या उजळलेल्या पाच दीपमाळा फार सुंदर दिसतात. रात्री साडे अकरा बारा पर्यंत कीर्तन, भजन चालते. भाविक ही दर्शनाला येतच असतात. बोललेले नवस भक्तिभावाने फेडले जातात. तान्ह्या बाळांना महादेश्वराच्या पायावर घालून त्याचा आशीर्वाद घेतला जातो. रात्री बारा नंतर देवाचे तरंग देवळाच्या आवारातून अत्यन्त मानाने फिरवले जातात. त्यावेळी फटाके, वाजंत्री असा थाट असतो. हे सगळं होईपर्यंत सकाळ होते . पण मी मात्र रात्रीच घरी यायला धडपडत असते कारण त्या पौर्णिमेच्या रात्री, बेताच्या थंडीत, चंद्रप्रकाशात शांतपणे पहुडलेलं आमचं गाव घरी येताना फार छान दिसत. नशीब फारच बलवत्तर असेल तर गोठयाच्या पत्र्यावर दवाचे थेंब पडत असतात आणि अक्षरशः पाऊस पडतोय असा टपटप आवाज येत असतो. सकाळ पर्यंत देवळात थांबलं तर ह्याला मुकतो आपण. दुसऱ्या दिवशी रात्री दरवर्षी नाही पण दोन तीन वर्षातून एकदा गावातली हौशी मंडळी महादेश्वराच्या देवळा मागे असलेल्या शेतात नाटकाचा प्रयोग सादर करतात. कोकणी माणसं मुळात नाटक प्रेमी. भरपूर मेहनत घेऊन बसवलेलं नाटक पहायला आणि ते सुध्दा मोकळ्या शेतात खूपच मजा येते. आमच्या घरात ही माझ्या एका दिरांना गाण्याची, नाटकाची खूप आवड होती . आणि त्याना ह्या सगळ्यात गती ही होती. त्यानी आपली खूप हौस पुरवून घेतली आहे ह्या नाटकाच्या निमित्ताने. नाटक झालं की दुसऱ्या दिवशी मिसळ, उसळ पाव किंवा वडा पाव असा काहीतरी झणझणीत बेत असतो श्रमपरिहार म्हणून. तो कार्यक्रम झाला की मगच त्रिपुरी उत्सवाची सांगता होते.
अशा तऱ्हेने आमच्या गावी हा त्रिपुरीचा उत्सव झाला की मगच श्रावणा पासून सुरू झालेली सणांची मालिका संपते .
! बर्याच दिवसांनी आलीस
! बर्याच दिवसांनी आलीस षटकारासहित
नैहमीप्रमाणे मस्त लेख
आज माझा पहिला नं
मंजू, किती सुंदर प्रतिसाद .
मंजू, किती सुंदर प्रतिसाद ..आवडलाच . खूप खूप आभार.
वाह! काय सुरेख, ओघवतं आणि सहज
वाह! काय सुरेख, ओघवतं आणि सहज लिहिलय. मस्तच!
वाह वाह, सुरेख. सर्व
वाह वाह, सुरेख. सर्व डोळ्यासमोर उभं केलंत.
फोटो असतील तर द्या. नसतील तर ह्यावर्षी नक्की काढा किंवा काढायला सांगा, तुम्ही गावी गेला नसाल तर, दोन्ही उत्सवांचे फोटो. इथे दाखवा आम्हांला.
वाह! काय सुरेख, ओघवतं आणि सहज
वाह! काय सुरेख, ओघवतं आणि सहज लिहिलय. मस्तच÷1
ममो, तुझ्या या लेखनाने दिवाळी
ममो, तुझ्या या लेखनाने दिवाळी अगदी नव्याने साजरी झाली. अप्रतीम लिहीलस. काय छान दैवी देणगी मिळालीय तुला लिखाणाची. जियो !!
सुरेख लिहिलयं.
सुरेख लिहिलयं.
सुंदर लेख
सुंदर लेख
अतिशय सुरेख, चित्रदर्शी वर्णन
अतिशय सुरेख, चित्रदर्शी वर्णन...
खूपच आवडलं..
सुरेख वर्णन!
सुरेख वर्णन!
महादेश्वरासारखी शंकराची जी अशी थोडी दूर असलेली, झाडीने वेढलेली शांत देवळं असतात तिथे गेल्यावर फार छान, प्रसन्न, शांत वाटतं
खूप सुरेख लिहिले आहे ग. तू
खूप सुरेख लिहिले आहे ग. तू खरी भाग्यवान, शहरात राहून नोकरी केलीस, आधुनिक तंत्रज्ञान वापरलेस पण त्याचबरोबर कोकणाची नाळही तुटली नाही. तिथले व इथले दोन्हीकडच्या आयुष्याचा आस्वाद घेतलास.
आपलं जीवन सुखकर, आनंदी, आरोग्यदायी करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पूजनीय मानल्या आहेत. निसर्गावर कुरघोडी न करता त्याच्या हातात हात घालून पुढे जाण्याची आपली परंपरा आहे . आपण वड, नाग, गाय, बैल, चूल, जातं, मुसळ उखळ,अग्नी, दीप या सगळ्याच पूजन करून त्यांच्याप्रती आपली असलेली कृतज्ञाता व्यक्त करत असतो . परंतु मला सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे तुळशी सारख्या उपयोगी आणि औषधी झाडाची पूजा तर आपण करतोच पण साक्षात भगवंताची पत्नी होण्याचा मान आपण तिला दिला आहे म्हणून तुळशीचं लग्न हा माझा खूप आवडता सण आहे.>>>>>>>
+11111, आपले सगळे सण निसर्गपूजेभोवती गुंफलेत.
केवळ अप्रतीम वर्णन!
केवळ अप्रतीम वर्णन!
सगळ्या तुळशीच्या लग्नाच्या आठवणी जाग्या झाल्या!
आईचे त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाच्या देवळात जावून त्रिपुर जाळण्याचे आठवले!
पण यंदाचे फोटो द्याच तुम्ही!
ह्या लग्नाच्या फोटोंची आम्हाला उत्सुकता आहे!
सुंदर लेख
सुंदर लेख
खूप खूप धन्यवाद सगळयांना ...
खूप खूप धन्यवाद सगळयांना ...
फोटो नाहीयेत , ह्यावर्षीचे सांगते सेंड करायला आणि मग दाखवते इथे.
ममो. किती सुंदर वर्णन. वाचता
ममो. किती सुंदर वर्णन. वाचता वाचता समोर दिसलं बघ सगळं. अंगावर काटा आला आणि डोळे भरून आले, सगळया आठवणींनी.
फोटो नक्की दाखव बाई. तेवढीच मनाला शांती.
ममो, किती सुन्दर लिहिता!!
ममो, किती सुन्दर लिहिता!! अगदी भारावलेले वातावरण असणार हे.
आख्ख गाव जेव्हा अस एखाद्या उत्सवात सहभागी होते तेव्हा सोहळा नक्कीच अवर्णनिय होत असणार.
फोटो नक्की द्या.
Santacruz ला आमच्या
Santacruz ला आमच्या बिल्डिंगीत सुद्धा लग्ने होत. एक शेजारी दरवर्षी त्यांच्या तुळशीचे लग्न लावत आणि दुसऱ्या एका शेजाऱ्यांच्या मुलाला नवरा करत. दरवर्षी नवरा ठरलेला एकच... खूप धमाल यायची चिडवा चिडवि करायला.
तुलसी विवाह नावाचा हिंदी सिनेमा सुद्धा मी दोन तीनदा रस्त्यावर पाहिलाय. नाव हेच का आठवत नाहीय पण वृंदा, तिचा राक्षस नवरा, विष्णू वगैरे सर्व लक्षात आहे. काय भारी वाटायचे असले पिक्चर आपले आईबाबा, शेजारीपाजारी यांच्यासमवेत पाहताना.
फारच सुंदर लिहिलंय....एव्हढी
फारच सुंदर लिहिलंय....एव्हढी डिटेल माहिती न्हवती...पण आता सगळं डोळ्यांनी पाहिलंय आणि स्वतः अनुभवलंय अस वाटतंय...
नेहमीप्रमाणेच छान लिहिलयस ममो
नेहमीप्रमाणेच छान लिहिलयस ममो..
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय
तुलशीचे लग्न म्हणने एखाद्या
तुलशीचे लग्न म्हणने एखाद्या खर्या लग्नासारखे लग्न व धावपळ आठवली आईची. आता तिच्या वयामुळे झेपत नाही आणि मला करायची पद्धती व आवड नाही.
पण आंब्याच्या पानाच्या करवल्या, त्यांना नेसवलेल्या साड्या , तुळशीला काढलेला रंग, त्या अक्षता , कोणा चुलत वा मावस भावाला आमिष दाखवून नवरा बनवायचा आणि चिडवून छळायचे आणि ती एकुण एक तयारी आठवतेय. आता वाटतेय हे शिकुन घ्यावे. त्यावेळे फम्त मजा आवडायची पण तयारी वा मदत करायला आवडायचे नाही. थकलेली आई तरीही सुंदर दिसायची. आता वाईट वाटते की, आईला कधी मदत केली नाही.
खूपच नॉस्टल्जिक करता ममो तुम्ही...
सुरेख !
सुरेख !
फोटो असतील तर द्या. नसतील तर ह्यावर्षी नक्की काढा किंवा काढायला सांगा, तुम्ही गावी गेला नसाल तर, दोन्ही उत्सवांचे फोटो. इथे दाखवा आम्हांला. >+१
मस्त लिहिलंयत मनीमोहोर.
मस्त लिहिलंयत मनीमोहोर.
आमच्याकडे आज आहे तुळशीचं लग्न. कालपासूनच गडबड चालू झालीय. काल तुळस रंगवली. अक्षता रंगवल्या. आज मांडव, रांगोळी, चिंचावळे पाडून आणले नि बाकीच्या तयारीची गडबड चालू आहे.
जरासा टाईमपास म्हणून माबोवर डोकावले तर हा धागा दिसला.
मनाला विरंगुळा देणारी ,
मनाला विरंगुळा देणारी , निसर्ग - समाज - नाती - प्रथा यांची सांगड किती सुंदर सहज पणे घातली गेली आहे आपल्या या सणांच्या रूपाने !
मागे एकदा नरक चतुर्दशीच्या सुमारस हरिहरेश्वरला गेलो होतो. तिथे खूप छान उत्सव असतो. तुम्ही पहिला नसेल तर जरूर अनुभवा आणि आमच्यासाठी असाच एक छान लेख लिहा !
अमावास्येचे काळोखी आकाश , नीरव शांततेच्या साथीने ऐकू येणारी समुद्राची गाज ! दिवट्यांच्या प्र्काशात - चौघडा - वाजंत्रीच्या स्वरात मिरवत निघालेली पालखी ... मला तर आठवतानाही रोमांच उभे रहत आहेत... केवळ मंत्रमुग्ध करणारे चलत चित्र...
नेहमीप्रमाणे मस्त.
नेहमीप्रमाणे मस्त.
फोटो हवेतच. ह्या वर्षीचे नक्की टाका.
व्वा ! अगदी जसंच्या तस्स
व्वा ! अगदी जसंच्या तस्स वर्णन ! खूप छान .. मनीमोहोर खूप आवडलं! मी खूप मिस करते तुळशीचं लग्न आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव .. आमच्या घरात नाहीये हा कुळाचार पण एक खूप जवळचे आहेत त्यांच्याकडे जायचे मी नेहेमी केवढी धामधूम आणि तयारी असायची खऱ्या खऱ्या लग्नासारखी
.. अगदी सेम टू सेम हेच सगळं !
रात्री त्रिपुर लावल्यावर झळाळणाऱ्या दीपमाळा फार मोहक दिसतात!
हेमा ताई, तुमचे लेख वाचलेत
हेमा ताई, तुमचे लेख वाचलेत की मन खुप शांत होतं. लेख खुप खुप आवडला.
आमच्या कडे (माहेरी) उद्या आहे तुळशीच लग्न.
उसाचा मांडव घलुन, तुळशी वृंदावन सजवुन थाटामाटात लग्न करतात.. बाकी तुम्ही सांगताय तीच पद्धत आहे ईकडे ही.
हेमा ताई, तुमचे लेख वाचलेत की
हेमा ताई, तुमचे लेख वाचलेत की मन खुप शांत होतं. लेख खुप खुप आवडला.>>>>> सायुला प्रचंड अनुमोदन. आयुष्य आनंदाने आणी निर्व्याजपणे कसे जगावे हे ममो कडे पाहुन शिकावे. ममो माझ्या आयुष्यात मी तुला नक्कीच एकदा तरी भेटेनच. मान न मान, मै तेरी मेहेमान.
खुपच सुंदर लिहिले आहे, आवडले
खुपच सुंदर लिहिले आहे, आवडले
अतिशय सुरेख, चित्रदर्शी वर्णन
अतिशय सुरेख, चित्रदर्शी वर्णन...
खूपच आवडलं.. >>>>>> +999999
केवळ सुंदर....
Pages