समन्वय

Submitted by दिलफ on 24 October, 2018 - 08:33

सगळे गोंगाट मनातले क्षणभर मी विसरतो
समन्वय हा विस्मयकारक डोळ्यात मी साठवतो
भाग्य समजतो, विनम्र होतो, निरव या शांततेपुढे
हळूच आलेल्या झुळकेचा आवाज तरी ऐकतो

डोकावतो गवतातून पिवळ्या कभिन्न काळा कातळ
धुंदीत आपल्या धवल पक्षी विराजमान एक त्यावर
नाही बांधलेले जे दृश्य, फक्त रंग रूपाच्या बंधनात
परिभाषा या सौंदर्याची एकच नाही केवळ

विराट या सृष्टीत स्थान मानवाचे नगण्य
विस्मरण नको या सत्याचा नाद हा घुमतो
प्रकर्षाने जाणवतात सीमा मानवी स्वभावाच्या
हव्यासाच्या आधीन गुरफटलेल्या आयुष्याच्या

परत मला जावे लागेल त्याच माझ्या जगात
चढाओढीच्या जीवनात, त्याच सगळ्या हेव्यादाव्यात
पण नवी चेतना नवा उत्साह रूपातून या प्राप्त
घेऊन जाईन अभिप्रेत मला, तोच केवळ अर्थ

मनाच्या एकाच कोपऱ्यातून जीवन नाही जगणार
सगळे पैलू बघण्याची राहील माझी आस
वंचित नाही होणार मी अनुभवांच्या ठेवींना
मुक्त श्वासाने जगल्यावरच होईल जीवन पूर्ण
दिलिप

Group content visibility: 
Use group defaults