भुलाबाई

Submitted by @Shraddha on 22 October, 2018 - 15:07

महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात. महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला, हादगा विदर्भात भुलाबाई च्या रूपात साजरा होतो.
भुलाबाई म्हणजे देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते.
शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात.
पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पुर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे.

भुलाबाईची पुजा करून मुली लोकगीते म्हणतात. विशिष्ट लयीत टाळ्या वाजवत ही गाणी म्हटली जातात.
"ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा" म्हणत गाणी सुरु होतात.
भुलाबाई च्या निमित्ताने स्त्रिया आपली सुख दुःख एकमेकींशी वाटतात."अस्सं सासर द्वाड बाई" म्हणतं सासरचे वर्णन करतात तर "अस्सं माहेर सुरेख बाई" म्हणत माहेरच्या आठवणीत रममाण होतात. सासरचे हेवेदावे सांगताना " कशी घेऊ दादा घरी नंदा जावा करतील माझा हेवा, हेवा परोपरी नंदा घरोघरी" म्हणत मनातले सल बोलुन दाखवतात.
सासुरवाशीणीच्या मनातली माहेरची ओढ "कारल्याचं बी पेर ग सुनबाई मग जा अपुल्या माहेरा" म्हणणार्‍या सासुला "कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई आता तरी धाडा ना" या आर्जवातुन आपल्या पर्यंत पोहचते.

माहेरी आलेल्या भुलाबाई ला घ्यायला येणाऱ्या सासरच्या मंडंळींवर ती" चारी दरवाजे लावा ग बाई, झिपरं कुत्रं सोडा गं बाई" अशा आविर्भावात रूसुन बसते.
मग तिचा रुसवा" यादवराया राणी रुसुनी बैसली कैसी, माहेरवाशीणी सुन घरासी येईना कैसी" म्हणत एक एक जण तिला दागिना देऊ करत रूसवा काढायचा प्रयत्न करतो. या सर्वांना नकार देणारी भुलाबाई नवर्‍याने देऊ केलेलं अर्धं राज्य मात्र आपल्याला हवं म्हणते.
भुलाबाई चे डोहाळे" पहिल्या मासी सासु की पुसे सुनबाई सुनबाई डोहाळे कसे" म्हणत कुटुंबातील सर्व सदस्य तिचे डोहाळे पुरवतात.
माहेरवाशीण भुलाबाई बाळंत होते. तिचा बाळंतविडा " साखरेच्या गोण्या बाई लोटविल्या अंगणी भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस" म्हणत अकरा दिवस केला जातो. बाराव्या दिवशी " अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता" म्हणत बारसं केलं जातं. बारशाला दोन मुली हाताचे पंजे एकमेकात गुंफून पाळणा करतात. त्यात बाळाचं प्रतिक म्हणून हळकुंड ठेवतात. आरती झाली की मग खिरापतीचा कार्यक्रम होतो. खिरापत ओळखताना आम्ही 'श्री बालाजीची सासू कांदेखाई' म्हणून मोकळ्या होतो.
आणखी बरीच गाणी थोड्याफार फरकाने म्हटली जातात.
आता भुलाबाई उत्सवाचं प्रमाण कमी झालयं. पण तरीही या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. गाण्यांमधे भुलाबाईच्या रूपात स्वतः ला बघतात.
जिवनातल्या ताणतणावांचा विसर पडून थोडावेळ तरी आनंद उपभोगता यावं, हाच खरा तर या उत्सवाचा उद्देश.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

From WhatsApp
कोजागिरी पोर्णिमा जवळ आली. त्यानिमित्त वऱ्हाडात घरोघरी भगिनी मंडळी गात असलेल्या भुलाबाई चे गाणे, जे माझ्या database मध्ये आहे ते सादर करीत आहे. ह्याचा आनंद लुटावा ही विनंती. धन्यवाद.
१….
पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ
ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली
सरपा आड लपली
सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय
चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली
तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या
जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे
२….
आपे दूssध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुssलाबाई
साखळ्यांचा जोड
कशी लेऊ दादा
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा कssरपली
नंदा गं लपली
नंदाचा बैल
डोलत येईल
सोन्याच कारलं
झेलत येईल
३….
घरावर घर बत्तीस घर
इतका कारागीर कोणाचा
भुलोजी च्या राणीचा
भूलोजीची राणी
भरत होती पाणी
धावा धावा कोणी
धावतील तिचे दोनी
दोनी गेले ताकाला
विंचू चावला नाकाला
४….
नंदा भावजया दोघी जणी
दोघी जणी
घरात नाही तिसर कोणी
तिसर कोणी
शिक्यातल लोणी खाल्ल कोणी
तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी
आता माझे दादा येतील गं येतील गं
दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं
दादाची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव काठी
घरा घराची लक्ष्मी मोठी
५….
काळा कोळसा झुकझुक पाना
पालखीत बसला भुलोजी राणा
भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले
सारे पिंपळ एक पान
एक पान दरबारी
दुसर पान शेजारी
शेजाऱ्याचा डामा डुमा
वाजतो तसा वाजू द्या
आम्हाला खेळ मांडू द्या
खेळात सापडली लगोरी
लगोरी गेली वाण्याला
वाण्या वाण्या सोपा दे
सोपा माझ्या गाईला
गाई गाई दुध दे
दुध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
(गोंडे माझ्या राज्याला)
तेच गोंडे लेऊ सासर जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे
६….
नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेल
बाई तोडून नेल
सईच्या अंगणात टाकून दिल
बाई टाकून दिल
सईन उचलून घरात नेल
बाई घरात नेल
कांडून कुंडून राळा केला
बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली
बाई बाजारात गेली
चार पैशाची घागर आणली
बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली
बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला
बाई विंचू चावला
७….
आला गं सासरचा वैद्दय
हातात काठी जळक लाकूड
पायात जोडा फाटका तुटका
नेसायचं धोतर फाटक तुटक
अंगात सदरा मळलेला
डोक्यात टोपी फाटकी तुटकी
तोंडात विडा शेणाचा
कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी
गं बाई म्हायरावाणी
आला गं माहेरचा वैद्दय
हातात काठी पंचरंगी
पायात जोडा पुण्यशाई
नेसायचं धोतर जरीकाठी
अंगात सदरा मलमलचा
डोक्यात टोपी भरजरी
तोंडात विडा लालेला
कसा गं दिसतो बाई राजावाणी
गं बाई राजावाणी
८….
सा बाई सू sss सा बाई सू sss
बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू
कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी
खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी
काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय
कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर
डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल माझ्या पार्वतीलाss पार्वतीला
९….
काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी
जाईच तेल आणू कशी आणू कss शी
जाईच तेल आणल आणल
सासूबाईच न्हाण झाल
वन्साबाईची वेणी झाली
मामाजीची शेंडी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
रानोबाचा पाय पडला
सासूबाई सासूबाई अन्न द्या
दुधभात जेवायला द्या
आमच उष्ट तुम्ही खा
विडा घेऊन खेळायला जा
१०….
आमचे मामा व्यापारी व्यापारी
तोंडात चिक्कण सुपारी सुपारी
सुपारी काही फुटेना फुटेना
मामा काही उठेना उठेना
सुपारी गेले गडगडत गडगडत
मामा आले बडबडत बडबडत
सुपारी गेली फुटून फुटून
मामा आले उठून उठून
११….
अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई
जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई
गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई
रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई
करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई
तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई
शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई
खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई
कोंडू कोंडू मारीते …
१२….
कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला
मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला
दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला
जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला
वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला
भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला
पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही
आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा
१३….
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
सासू गेली समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासरे गेले समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझी घोडागाडी देतो तुम्हाला
तुमची घोडागाडी नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
………………………….
………………………
………………. …………………
पतीराज गेले समजावयाला
चला चला राणीसाहेब अपुल्या घराला
माझा लाल चाबूक देतो तुम्हाला
तुमचा लाल चाबूक हवा मजला
मी तर यायची अपुल्या घराला
यादवरा या राणी घरात आली कैसी
१४….
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या
सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला
हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या
..................................................
.................................................
१५….
झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई
चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
………………………………
.........................................
झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई
चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
पतीराज पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
१६….
पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
चिंचा बहुत लागल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।१।।
...........................................
दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
पेरू बहुत लागले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।२।।
.................................................
तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
संत्री बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।३।।
..................................................
चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा
सरता सरता नंदन घराच्

मस्तच स्नेहा...

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी>> हे खरतर यादवराया राणी रुसुन बैसली कैसी असे आहे..
आपण चालीत म्हणायचे म्हणुन शब्दाचीपन फोड करुन टाकतो..
अगदी पुस्तकात सुद्धा वर दिल तसच लिहितात Biggrin

जळगांव खान्देश आणि बुलडाणा जिल्ह्यान्च्या सीमेवरच्या गावात मी वाढले, त्यामुळे भुलाबाई हा लाडका प्रकार आनि लहानपणीच्या आठवणींचा महत्त्वाचा भाग!

मज्जा आली हा धागा वाचून.

एक लिंबु झेलु बाई, दोन लिंबु झेलु.. असंहि एक गाणं म्हणायचो आम्हि!

आम्ही आजोळी जायचो तेव्हा भुलाबाई करायचो. माझं आजोळ बुलढाणा जिल्ह्यातील.
टीना, ते यादवरायाच आहे.

DShraddha धन्यवाद!
माझीही नाळ बुलढाणा जिल्ह्यातील. त्यामुळे लहानपणी मोठ्य बहिणीचा हात धरून 'खिरापती' ची मजा लुटलीय!
असो! गेले ते दिवस...राहिल्या त्या आठवणी.

Thanks Happy

फारपूर्वी डीडी वर रानजाई कार्यक्रम येई त्याच्या शीर्षक गीतामध्ये 'भुलाबाई' शब्द होता >>>>>> दऱ्या खोऱ्यात फुलते ती ग रानजाई, भोळा शंकर भूलोबा त्याची भुलाबाई....
सुंदर कार्यक्रम
अंधुकस आठवतोय, सरोजिनी बाबर व शांताबाई शेळके
याच्या काही लिंक मिळतील का?
शाळेत पण एक धडा / वर्णन होत या भोंडल्याच्या गाण्यांचं
राणी...निळा घोडा असंच काहीतरी

मस्त आहे हा धागा..
मला जास्त गाणी पाठ नाहीत.. पण एका गाण्याच्या काही ओळी आठवताएत..

अक्कण माती
चिक्कण माती
अशी माती
सुरेख ग बाई..

श्रद्धा काय सुंदर लिहीलयस गं.
----------------------------------

यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासूबाई गेल्या समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
अर्धा संसार देते तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासरे गेले समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
तिजोरीची चावी देतो तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

दीर गेले समजावयाला
चला चला वहिनी अपुल्या घराला
नवीन कपाट देतो तुम्हाला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

जाऊ गेली समजावयाला
चला चला जाऊबाई अपुल्या घराला
जरीची साडी देते तुम्हाला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

नणंद गेली समजावयाला
चल चल वहिनी अपुल्या घराला
चांदीचा मेखला देते तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

पती गेला समजावयाला
चल चल राणी अपुल्या घराला
लाल चाबूक देतो तुजला
मी येते अपुल्या घराला
यादवराया राणी घरास आली कैसी
सासूरवाशीण सून घरास आली कैसी

@सामो >> हे गाण must च भुलाबाई ला
खूप छान आठवणी आहेत लहनपणी च्या.
भुलाबाई गाणी खिरापत

@ सामो,
हे गाणं भुलाबाई ला रोजच म्हटल्या जायचं.
फक्त प्रत्येक कडव्यात आणखीन एक ओळ असायची.
जी कुठली वस्तू असेल ती , जसं

तुमचा संसार नक्को मला...

...
चांदीचा मेखला देते तुजला
तुमची मेखला नक्को मला
मी नाही यायची तुमच्या घराला.

आणि ही ओळ खूप ठसक्यात म्हणायचो आम्ही.

आमच्या कड़े या गाण्यात दागीन्यांची नावे घेतात जसे बांगड्यांचा जोड, पाटल्यांचा जोड ई.
शेवटी नवरा म्हणतो अर्धे राज्य देतों Happy

आमच्या कड़े या गाण्यात दागीन्यांची नावे घेतात जसे बांगड्यांचा जोड, पाटल्यांचा जोड ई.
शेवटी नवरा म्हणतो अर्धे राज्य देतों>> आमच्याकडे पण दागिन्यांची नावं असायची. सासूने कधी अर्धा संसार देऊ केला नाही.
पण नवऱ्यानेही अर्धे राज्य नाही दिले. तो लाल चाबूकच द्यायचा. नवऱ्याने मारणं हे समाजमान्य अन बायको मान्य होतं तेव्हा.
लहानपणी ऐकलेल्या काही गोष्टींमध्ये पण नवरा मारायचा.
एक कथा आठवली-
एकदा एक नवरा आपल्या मित्राकडून काही खाऊन येतो. पण घरी येईपर्यंत तो त्या पदार्थांच नाव विसरतो. मग बायकोला फक्त वर्णन करून तो तिला ते करायला सांगतो पण तिला कळत नाही की नक्की काय हवय त्याला म्हणून तो तिला खूप मारतो. दुपारी शेजारणीशी बोलतांना ती म्हणते, ' ह्यांनी मारून मारून माझ्या पाठीचं अगदी धिरड केलं.' तर त्याला एकदम आठवतं, त्याला धीरडच हवं होतं.

होय, लाल चाबूक.

“एक काठी लगाव पाठी; घराघरातली लक्ष्मी मोठी” असे बायकोला म्हणजेच गृहलक्ष्मीला काठीने झोडपण्याचे संदर्भही आहेत गाण्यातून.

Normalising domestic violence. 👎

My फेवरेट song
कोणे एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला
त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले
सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले
सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले
कांडून कांडून राळा केला बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली
त्याच पैशाची घागर आणली बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका-तुटका
डोक्याला पागोटे फाटके-तुटके
पायात वहाणा फाटक्या-तुटक्या
कपाळी टिळा शेणाचा
तोंडात विडा घाणेरडा किडा
हातात काठी जळकं लाकूड
दिसतो कसा बाई भिका-यावाणी बाई भिका-यावाणी

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे भरजरी
पायात वहाणा कोल्हापूरी
कपाळी टिळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
हातात काठी चंदनाची
दिसतो कसाबाई राजावाणी बाई राजावाणी

“एक काठी लगाव पाठी; घराघरातली लक्ष्मी मोठी” असे बायकोला म्हणजेच गृहलक्ष्मीला काठीने झोडपण्याचे संदर्भही आहेत गाण्यातून. >>> तसं नाहीये. भोंडल्याच्या गाण्यात तरी नाहीये. बहीण भावाकडे वहिनीची तक्रार करते तेव्हा भाऊ तिला काठी मारून, बायकोला मान देतो. आमच्याकडे भोंडला असतो, भुलाबाई नसते. गाणी बरीचशी सेम आहेत.

नणंदा भावजया दोघीजणी,
घरात नव्हतं तिसरं कोणी,
शिंकयावरचं लोणी खाल्लं कोणी,
मी नाही खाल्लं, वहिनीने खाल्लं.

आता माझा दादा येईल गं.
दादाच्या मांडीवर बसेन गं.
दादा तुझी बायको चोरटी.
असेल माझी गोरटी.
घे काठी घाल पाठी.
घराघराची लक्ष्मी मोठी.

आम्ही जरा हे गाणं वेगळं म्हणायचो, वरचे जास्त बरोबर असावं. शेवटच्या काही ओळी वेगळ्या म्हणायचो पण अर्थ फार बदलत नव्हता.

आम्ही असुदे माझी चोरटी,
घे काठी लाग पाठी,
घरादारातील लक्ष्मी मोठी. असं म्हणायचो.

एकंदरीत भाऊ बहिणीची कागाळी न ऐकता, तिचं खोटं असणार हे माहिती असेल त्याला, त्यामुळे तिला काठी मारून बायकोचा सन्मान करतो. असा अर्थ आहे.

भोंडल्याच्या गाण्यात तरी नाहीये. बहीण भावाकडे वहिनीची तक्रार करते तेव्हा भाऊ तिला काठी मारून, बायकोला मान देतो. आमच्याकडे भोंडला असतो, भुलाबाई नसते. गाणी बरीचशी सेम आहेत.
>>
Right भुलाबाई च्या गाण्यात ही अस नाहीये काही
पण सासर माहेरचे वर्णन आहेत..
अस सासर द्वाड बाई अस काहीतरी

आणि ते एके बारा बलुतेदारांचे गाणे होते. अमक्या गावातून शिंपी आला, सोनार आला वगैरे आठवत नाही. पण तेव्हाचे जीवनमानच गाण्यांत स्वच्छ दिसत असे.

नाच ग घुमा, कशी मी नाचू ?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

बहीण खोटं सांगत असली तरी, बहिणीलाही झोडपणे चूकच पण तुम्ही लिहिलं आहे गृहलक्ष्मीला काठीने झोडपणे आहे गाण्यात तर ते तसं नाहीये असं फक्त सांगायचं होतं.

बाकी सासरी छळ होणं, माहेर चांगलं असणे अशी खूप गाणी भोंडल्यात आहेत, ते बहुतेक त्यावेळेचे प्रतिबिंब होतं. त्यामुळे मला सासर माहेरपेक्षा जरा हटके गाणी जास्त आवडतात.

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली.

शिवाजी आमुचा राणा, किल्ला तो त्याचा तोरणा यासारखी भोंडला गाणी जास्त आवडतात.

Pages