रफाल करार
पार्श्वभूमी
रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड. बनवायला अवघड व असे हे विकसित केलेले तंत्रज्ञान सहजा सहजी कोणताही देश द्यायला किंवा विकायला तयार नसतो. जर असे तंत्रज्ञान शत्रू देशाला कळले तर त्याची ते तोड काढू शकतील किंवा अशा तंत्रज्ञानाने बनलेल्या हत्यारांशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहू शकतील. हे होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगायची. बऱ्याच वेळेला असे तंत्रज्ञान गोपनीय ठेवले जाते.
हा लेख रफाल बद्दल माहिती हवी असे वाटणाऱ्यांसाठी लिहिला आहे. ह्या लेखाच्या पहिल्या भागात रफाल करार होण्या पर्यंतचे वेळापत्रक दिले आहे. दुसऱ्या भागात आपल्याला वारंवार पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. काही लोकांचे पहिला भाग व दुसरा भाग वाचून समाधान होईल. ह्यात त्यांना पडलेल्या प्रश्नांची तर उत्तरे आहेतच पण इतरांना पडलेल्या प्रश्नांची पण उत्तरे आहेत व काँग्रेस पक्षाच्या संशयी नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तरे आपल्याला वाचायला मिळतील.
वारंवार पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देताना काही अंग्रेजी शब्दांचे अर्थ व त्यांच्या आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी तिसऱ्या भागात दिलेली आहे. ज्या लोकांना संरक्षण खरेदी कशी होते, त्याचे नियम काय आहेत, संरक्षण खरेदीचे धोरण काय आहे, त्याची प्रक्रिया कशी असते हे वाचायचे असेल त्यांनी तिसरा भाग वाचावा.
भाग १ - रफाल कराराचे वेळापत्रक
भाग २ - वारंवार पडणाऱे प्रश्न.
भाग ३ –- संरक्षण खरेदी प्रक्रिया.
भाग १ - रफाल कराराचे वेळापत्रक
१. भारतीय वायुसेनेला वर्ष २००१ मध्ये असे वाटले की त्यांच्याकडे जड व हलक्या वजनाची युद्धविमाने आहेत. त्यांच्याच जोडीला मध्यम वजनाची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लिप्त अशी विमाने शामील करून घ्यावीशी वाटली (भाग ३ परिच्छेद ६(अ) वाचा).
२. अशी मध्यम वजनाची विमाने खरेदीची प्रक्रिया वर्ष २००७ मध्ये सुरू झाली. रक्षा संपादन मंडळ किंवा संरक्षण अधिग्रहण परिषद - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल (DAC) ने विनंती प्रस्ताव Request for Proposal (RFP) देण्यास हिरवा कंदील दाखवला. १२६ मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) खरेदी करण्यासाठी लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल इतक्या लोकांनी विनंतीला मान देऊन आपली विमाने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. तांत्रिकी चाचणी समिती Technical Evaluation Committee (TEC) व उड्डाण चाचणी Field/ Flight Evaluation Trials (FET) नंतर वर्ष २०११ मध्ये भारतीय वायुसेनेने रफाल व युरोफायटर टायफून ह्यांना तांत्रिकी दृष्ट्या ठीक म्हणून निवडीच्या यादीत ठेवले.
३. त्यात रफालने सगळ्यात कमी बोली लावली होती म्हणून शेवटी रफालची निवड केली गेली. बोली लावल्यावर सुद्धा वाटाघाटी होतात. त्यांनी किंमत अजून कमी होऊ शकते.
४. पण २ वर्षांच्या अथक वाटाघाटी नंतर सुद्धा वाटाघाटी पूर्णं होऊ शकल्या नाहीत. (संरक्षण खरेदीत अशा वाटाघाटी पूर्णत्वाला यायला साधारण काही महिने लागतात पण रफाल बाबत दोन वर्षानंतर सुद्धा वाटाघाटी काही कारणाने पूर्णं होऊ शकल्या नव्हत्या) त्याचे मुख्य कारण हे की रफाल चे तंत्रज्ञान हिंदुस्तान एरोनॉटीक्सला कसे द्यायचे हा वाद चालला होता. तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी (ToT) ह्याचे वेगवेगळे स्तर आहेत. काही मध्ये नुसते विमान जुळवण्याचे तंत्रज्ञान असते, काही मध्ये त्याचे भाग बनवायचे व मग ते जुळवायचे असे तंत्रज्ञान असते काहीं मध्ये कच्च्या माला पासून त्याचे भाग बनवायचे व मग ते जुळवून विमान बांधायचे असे वेगवेगळे स्तर असतात. विनंती प्रस्तावात एक कलम असे होते की जर हिंदुस्तान एरोनॉटीक्स ने जुळवून विमान बनवले तर त्या जुळवलेल्या विमानाच्या गुणवत्तेची जबाबदारी दासू (राफेल बनवणारी कंपनी) ने घेतली पाहिजे. दासूला हे बिलकूल पसंत नव्हते. त्यांच्या मते विमान जर हिंदुस्तान एरोनॉटीक्स जुळवणार असेल तर १०८ जुळवलेल्या विमानांच्या गुणवत्तेची जबाबदारी पण हिंदुस्तान एरोनॉटीक्स नेच घ्यायला पाहिजे (१८ विमाने जशी च्या तशी फ्रान्स मधून येणार होती व बाकीची १०८ येथे बनली असती - जर वाटाघाटी पूर्णत्वाला गेल्या असत्या तर! ) ह्यात परत अजून एक समस्या होती. दासू कंपनी , एक विमान बनवायला, ३ करोड मनुष्य तास लागतील असे म्हणत होती, हिंदुस्तान एरोनॉटीक्सच्या मते मात्र एक विमान बनवायला ३ करोड पेक्षा दुपटीहून जास्त मनुष्य तास लागतील असा अंदाज होता. त्यामुळे दासूचा बोलीचा अंदाज चुकणार होता व दासू घाट्यांत गेली असती. आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत
५. आता पर्यंत विमानाची खरेदी रक्षा संपादन प्रक्रिये डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP), प्रमाणे व्यावसायिक खरेदी डायरेक्ट कमर्शियल सेल्स् (DCS) च्या स्वरूपात चाललेली होती. मोदी सरकार आल्यावर सरकारला असे दिसून आले की ३ वर्षा नंतरही वाटाघाटी पूर्णत्वाला पोहचत नाहीत. सरकारने विमानांची आवश्यकता स्वीकारण्या पासून एक्सेप्टेंस ऑफ नेसेसीटी (AoN) स्वीकारण्या पासून साल २००७ पासून २०१५ पर्यंत ८ वर्ष लोटली होती. काही तरी केले पाहिजे होते. मोदी सरकारने ठरवले की हा सौदा खूप महागाचा आहे. त्यामुळे तो वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे. ही वेगळी पद्धत म्हणजे सरकार थेट विमान बनवणाऱ्या कंपनीच्या सरकारशी बोलून ह्या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. हा अंतर सरकारी करार वा सरकार ते सरकार खरेदी हा पहिल्यांदा होणारा प्रयोग नव्हता. खूप महाग सौदे खरे तर सरकार ते सरकार करारानेच केली जातात त्यात मधली लाचलुचपत घेणारी लोक टाळली जातात. त्यामुळे अशा अंतर सरकारी करारासाठी मोदी सरकार ने तेच (रफाल) विमान ठरवले जे आधी रक्षा संपादन प्रक्रियेतून ठरवले गेले होते व ज्याच्या तांत्रिकी व उड्डाण चाचण्या पार पाडून सगळ्यात कमी बोली लावल्यामुळे निवड झाली होती व ते म्हणजे रफाल.
६. मोदी एप्रिल २०१५ मध्ये फ्रांन्सीसी पंतप्रधानांना भेटले व दोन्ही सरकारे एकमेकांशी बोलून रफाल करारावर पुढे जाऊ असे ठरले गेले. अंतर सरकारी करार इंटर गोव्हरनमेंटल ऍग्रीमेंट (IGA) झाले व पुढे १६ महिन्या नंतर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCA) फ्रान्स मध्ये बांधली गेलेली अशी ३६ रफाल विमाने (१२६ विमानांच्या ऐवजी फक्त ३६ विमाने) खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
दुसरा भाग लवकरच – व तिसरा भाग त्यानंतर लागलीच
http://rashtravrat.blogspot.in
(क्रमशः)
केंद्र सरकारसाठी पर्चेस
केंद्र सरकारसाठी पर्चेस मॅनेजमेंट असते. दरवर्षी किंवा ठराविक अंतराने पुस्तकरूपाने प्रसिद्ध होऊन वेगवेगळ्या मंत्रालयांना ते पाठवले जाते. मंत्रालयाकडून विविध खात्यांना. अजूनही निविदा प्रक्रिया संबंधी नियमांमधे मुलभूत बदल झालेले नाहीत.
एकदा निविदा मागविल्या कि निविदेसोबत असणा-या तांत्रिक माहिती व वैशिष्ट्यांनुसार सौदा पक्का केला जातो. सौद्याबाबत निगोसिएशन्स होतात. मात्र त्याचे प्रमाण १० किंवा १५% जास्त नसावे. जर यापेक्षा जास्त असेल तर त्याची कारणे द्यावी लागतात. ही कारणे ऑडीट विभागाला पटली तर सौदा पुढे जाऊ शकतो. मात्र सौद्याच्या अटींमधे अगदी टोकाचे बदल होणार असतील तर पहिली निविदा रद्द करून दुसरी निविदा सूचना प्रसारीत करावी लागते. त्यानुसार पुन्हा स्पर्धा भरवावी लागते. त्यात पुन्हा आधीचीच कंपनी सर्वात कमी बोली लावणारी ठरणारी असेल तर तिला मागच्या निगोसिएशन्सची आठवण करून देऊन त्याप्रमाणे आताच्या अटींबाबत बांधून घेणे गरजेचे असते. पुन्हा निविदा मागवताना करारात बदल करता येतात. त्यामुळे बदललेल्या कराराच्या मसुद्यास कंपनीची हरकत नसेल तर सौदा करता येतो.
असे न करता जुन्याच निविदेवर संपूर्णपणे नवीन अटींचा स्विकार करणे हे ऑडीटच्या आक्षेपांना आमंत्रण ठरते. यास अनियमितता असे म्हटले जाते.
या सौद्यात अशी अनियमितता आहे किंवा नाही हे दुस-या भागात येईल या अपेक्षेत. तसेच या संबंधी पूरक संदर्भ दिले तर लेखातील दावे तपासून घेता येतील.
( सैन्यात अधिकारी असल्यास
वरील लेखात गोपनीय माहिती आलेली आहे का ?
कोणत्याही प्रकारची गोपनीय
कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती येथे दिलेली नाही.
रक्षा खरेदीसाठी डीपिपि आहे ती
रक्षा खरेदीसाठी डीपिपि आहे ती पुढच्या भागात देत आहे. इथे प्रक्रिया वेगळी असते.
ही लेखमालिका सुरु केल्याबद्दल
ही लेखमालिका सुरु केल्याबद्दल धन्यवाद चितळे साहेब. मोदी सरकरने ह्या विषयावर निर्णय घेतल्यावर २०१६ मधे बरीच चर्चा व त्या अनुषंगाने वाचन झाले होते. माबो वरच मी एक लेखही लिहिला होता. पण माझे लिखाण पुर्णपणे आंतरजाला वरून केलेल्या वाचनावर आधारित होते. तुमच्या सारख्या जाणकाराच्या लेखामुळे अजुन नवीन माहिती कळते आहे आणि माझ्याकडून आधी काही चुकिचे कळाले / लिहिले गेले असेल तर तेही कळेल.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत. धन्यवाद.
हा धागा राजकारणात हलवा, अशी अ
हा धागा राजकारणात हलवा, अशी अॅडमिन यांना विनंती.
दुसरा भाग टाकला आहे
दुसरा भाग टाकला आहे
उत्तम माहिती! दुसरा भाग अजून
उत्तम माहिती! दुसरा भाग अजून वाचायचा आहे.