आसनांचा प्रायोगिक भाग सांगितल्यावर दाबके मॅडमनी जेव्हा पातंजल योगसूत्रात आसनांविषयी जे काही म्हटले आहे त्याबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवले की व्यसनमुक्तीसाठी अतिशय उपयुक्त अशा काही सूचना यात दडलेल्या आहेत. कुठलेही व्यसन सोडण्याच्या मार्गात येणारे जे प्रमुख अडथळे आहेत त्यांत व्यसनाविषयी सतत मनात येणारे विचार हा एक अत्यंत महत्वाचा अडथळा आहे. अनेक वर्षे व्यसन केलेले असते. त्यासाठी पैसा कसा मिळवायचा याचा विचार केलेला असतो. कारस्थाने केलेली असतात. त्यामुळे व्यसनाविषयी विचार करण्याची मनाला जणु सवयच जडलेली असते. विचारांचा वेग वाढला आणि त्यावरच लक्ष केंद्रित होऊ लागले म्हणजे विचारांकडून आचाराकडे येण्यास वेळ तो कितीसा लागणार? अशावेळी आसनांचा अभ्यास मदतीला येतो. याचा अर्थ जेव्हा व्यसनाचे विचार त्रास देतात तेव्हा हवे तेथे आसनांचा अभ्यास करता येतो असा नसून मनाला व्यसनाव्यतिरिक्त वेगळा विचार करण्याची सवय आसनांच्या अभ्यासामुळे लागु शकते असा आहे. यासंदर्भात दाबके मॅडमनी भगवान पतंजलींच्या "आसन स्थिर आणि सुखमय असावे" या सूत्राचा प्रथम परामर्ष घेतला.
स्थिरता आणि सुखमयता हे ध्यानासनाचेच गुणधर्म आहेत हे त्यांनी पहिल्यांदाच सांगून टाकले. मात्र हे गुणधर्म काहीवेळा इतर आसनांनादेखील लावले जातात. कारण आसने करताना ते स्थिर राहणे आणि त्यात अनावश्यक ताण नसणे अत्यंत महत्त्वाचे असते. आसने करताना आपली क्षमता ओलांडली की ताण वाढतो. कुठेतरी दुखु लागते. अशावेळी स्थिर आणि सुखमय आसनाचा सल्ला हा महत्त्वाचा असतो. व्यसनमुक्तीच्या पथावर चालणार्या रुग्णमित्रांनी आसने करताना आपली क्षमता ओळखणे महत्त्वाचे आहेच. कारण सर्वसामान्य साधकापेक्षा त्यांची प्रकृती ही व्यसनाच्या दुष्परिणामांमुळे जास्त नाजूक झालेली असण्याची शक्यता असते. दाबके मॅडम पुढे म्हणाल्या कि निव्वळ पदमासन, वज्रासन, स्वस्तिकासन, सिद्धासन यांसारख्या ध्यानासनांमध्ये बसण्याचा सराव केला तरी स्थैर्य आणि सुखमयता काय असते हे आपण अनुभवू शकतो. त्यात पाठ सरळ आणि शरीर संतूलित राहते. हे सारे साध्य करीत असतानाच आपली क्षमता ओळखण्यासाठी आपण विचार करु लागतो आणि त्यामुळे मन आपोआपच आत वळण्यास सुरुवात होते. त्यांचे हे म्हणणे ऐकताना मला आठवले की व्यसनाच्या विचारांपासून दूर होण्यासाठी मनाला आत वळवणे हे मुक्तांगणच्या उपचारांमध्येही केले जाते.
पुढे त्यांनी आसनाबाबतचे दुसरे सूत्र ज्यात महामुनी पतंजलींनी प्रयत्नाच्या शैथिल्याबाबत सांगितले आहे त्याचे स्पष्टीकरण केले. याचा एक अर्थ आसने करताना शरीराची ओढाताण करु नये हा आहेच. शिवाय याचा दुसरा अर्थ आसनांमध्ये शरीराचे जे अवयव वापरले जात आहेत त्याव्यतिरिक्त शरीराचे इतर भाग सैल सोडणे असाही आहे. हे म्हणजे आसने करताना मन आणखी खोल नेण्याची प्रक्रिया आहे. आसन लावल्यावर माणसाने स्वतःच स्वतःच्या शरीराचे निरिक्षण केले पाहिजे. त्यावेळी कुठे अनावश्यक ताण, दाब आहे का ते पाहिले पाहिजे. असल्यास तो भाग सैल, शिथिल केला पाहिजे. आसनात सुखमयता यामुळेच येणार. दाबके मॅडम हे सांगत असतानाच व्यसनाच्या विचारांमुळे सैरभैर होणारे रुग्णमित्र डोळ्यांसमोर आले. व्यसनाच्या दरम्यान स्वतःच्या शरीराची कधीही काळजी न घेणार्या या मित्रांना आसनाचा अभ्यास आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास भाग पाडेल ही गोष्ट मला महत्वाची वाटली. पुढे मॅडमनी आसनाच्या अंतिम स्थितीत अनंत सागर, अनंत आकाश अशासारख्या गोष्टींवर लक्ष दिले की चित्ताची चलबिचलता कमी होते हे सांगितले.
यावरून असे वाटले की व्यसनी माणसाच्या मनाची होणारी सततची घालमेल कमी करण्यासाठी आसनाचा अभ्यास उपयोगी होऊ शकेल. दाबके मॅडमनी जे पुढचे सूत्र स्पष्टीकरणासाठी घेतले त्यात या मनाच्या चंचलतेचाच विचार केला होता. आसनांच्या अभ्यासाचे फळ म्हणून मनाची चंचलता कमी होते असे जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा मला क्रेव्हींग येणारे रुग्णमित्र आठवले. अशावेळी आसनामुळे होणारा मनाच्या स्थैर्याचा अभ्यास उपयोगी पडू शकेल. आसनांच्या योग्य, निरंतरच्या अभ्यासाने विचारांचा ओघ कमी होतो, मन शांत होऊ लागते. त्यामुळे विवेकशक्ती वाढू शकते. योग्य निर्णयक्षमता येण्यास मदत होते. अर्थात त्यासाठी अभ्यासाचे सातत्य आवश्यक आहेच हे त्या पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक वेळी सांगत होत्या. आसनांबद्दल हे सारे सांगत असतानाच ज्याला अगदी "प्रॅक्टीकल" म्हणता येईल अशा सूचना देण्यासही त्या विसरल्या नाहीत. आसनांचा अभ्यास निव्वळ शारीरिक कसरतीचा नको. त्यात मनाचा समावेश हवा तरच त्याला "योगासन" म्हणता येईल. लवचिक शरीर अनेकांचे असु शकते आणि ही मंडळी आसने करुही शकतील पण त्याला "योगासन" म्हणता येणार नाही. मग "योगासन" कशाला म्हणावे?
दाबके मॅडम म्हणाल्या योगाची अपेक्षा वेगळी आहे. आसने करताना सजगता अत्यंत महत्त्वाची. त्यामुळेच ताण, दाब, सुखमयता, दु:खणे खुपणे हे सारे ओळखता येते. आसनाचा अभ्यास सुरु आहे आणि मन भलतीकडेच हिंडत आहे असे योगाभ्यासात चालत नाही. आसनात मन आसनवर ठेवण्याची मानसिक क्रिया अपेक्षित आहे. पुढे आसन विषयाचा समारोप करताना त्या म्हणाल्या की मोजकीच आसने केली तरी चालतील पण त्या आसनांमध्ये "क्वालिटी" हवी. आसनांच्या अभ्यासाने काही अंशी शरीरावर नियंत्रण आणल्यावर आता मनावर नियंत्रण आणण्यासाठी योगाने ज्याची शिफारस केली आहे त्या "प्राणायामा"बद्दल बोलण्यास त्यांनी सुरुवात केली. योगाच्या जास्त सूक्ष्म अंगाबद्दल आता त्या स्पष्टीकरण करणार होत्या. व्यसनाचे मूळ मनात असते. बहुतांशी उपचार हे मनावरच केले जातात. शरीर मनाचा एकमेकांवर होणारा परिणाम तर सारे जाणतातच. अशावेळी त्या व्यसनाच्या संदर्भात प्राणायामाबद्दल काय सांगणार आहेत याबद्दल माझी उत्सुकता वाढली.
अतुल ठाकुर