कोल्हापुरातील बावड्याची मिसळ:- एक अनुभूती

Submitted by राजेश्री on 12 July, 2018 - 13:37

कोल्हापुरातील बावड्याची मिसळ :- एक अनुभूती

IMG_20180630_163036.jpg

मिसळ हा शब्द क्रियापद म्हणून वापरला ना तर उत्तर येईल काय काय मिसळू कोल्हापुरात आसल तर म्हणायचं "मिसळायला लागतंय"आमी कोल्हापुरात येऊन जाऊन होतो तवा "यायला लागतंय" हा शब्द सारखा कानावर पडत असायचा,कुणाला बोलायवायच म्हंटल तर,कुठल्या सभेला जायचं असेल तर,कुठला मोर्चा असेल तर यायला लागतंय हे आहेच.मराठा महामोर्चाच्या वेळा तर कोल्हापुरात सगळीकडे डिजिटल लावलेली त्यावर लिहिलेलं असायचं,"भावा यायला लागतंय" त्याचा परिणाम हा की " यायला लागतंय" हा शब्द माझ्या तोंडात कायमचा बसलाच आणि त्याआधीचा "भावा" हा शब्द ,कोल्हापूरकर झाल्यावर बघल तेला माझ्या तोंडातून भावा भावा हा शब्द जायला लागला.त्याचा पुढे जाऊन परिणाम असा झाला की माझा फेसबुक वरील मित्रगण माझ्या भावा या शब्दामूळे आधी "ही दोस्ती तुटायची नाय" आस म्हणायचा पण भावपण न परवडल्याने ती दोस्ती तोडून पसार झाला.आमी कशाला काय म्हणाय जातोय तवा जाईना का तिकडं,आमास्नी काय करायचंय .सांगायचा मूळ मुद्दा हा हुता की मिसळीत काय मिसळतात त्याला महत्व असत.हे मिसळण प्रांत,शहरच काय तर हॉटेलनिहायही वेगळं असू शकत बर का.
महाराष्ट्रात सांगली, कोल्हापुर, पुणे, ठाणे, नाशिक,या सगळ्या ठिकाणच्या मिसळीला स्वत:चा असा स्वाद आणि रंग आहे.वडापाव हा जसा पटकन हाताशी येणारा आणि छोट्या छोट्या भुकेला बाय करायला उपयोगी पडणारा पदार्थ आहे तस मात्र मिसळीच नसतंय बर का.मिसळ खायची हे घरातून निघतानाच ठरवावे लागते.मिसळ खायला जाऊया म्हंटल आणि वडापाव खाऊन आलं ते चालत असतंय.पण वडापाव खाऊया अस ठरताना अचानक मिसळ खायचं ठरलं तर मनाची पूर्वतयारी नसलं तरी ते थोडं जड जात आसतंय.मिसळ म्हंटल की,चटकदारपणा येतोच पण त्या मागून जो काही झणझणीतपणा येतो ना तो ऊभ्या ऊभ्या खाताना नाय सहन करता येत.या झणझणीतपणामुळे कपाळाला सुटणारा दरदरीत घाम आणि नाकातून वाहू पाहणार पाणी निपटायला रुमाल नाय तर मिनी टॉवेल घेऊन एका जाग्याला 'बसायला लागतंय'
देशोदेशीची झालंस तर अगदी ठिकठिकाणची मिसळ ही नवी लेखनमाला मी लिहीन कारण मिसळ म्हंटल की काय मिसळतात यावरच त्या मिसळीचा स्वाद अवलंबून असतोय.मग या स्वादानुसार,चवीनुसार तर "लिवायला लागतंय"
तर आज आपण कोल्हापुरातील बावड्याच्या मिसळीबद्दल बोलत होतो.. खरतर मिसळीचे कोल्हापुरी आणि पुणेरी असे दोनच प्रकार सांगता येतील.जातिवंत खवय्यांची व्याख्या करायची तर त्याला कोल्हापूर सोडून इतर ठिकाणी कोल्हापुरी मिसळ म्हणून जे काही दिल आहे त्याचा स्वादभेद स्पष्ट करता आला पाहिजे. कोल्हापुरात मिसळीसाठी अनेक ठिकाण प्रसिद्ध आहेत प्रत्येक ठिकाणच्या मिसळीचा डौल न्यारा कोल्हापुरी मिसळीची ही परंपरा कोल्हापुरी फेटय़ाइतकीच प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी मिसळीची नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण अनेकांना त्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. मिसळीची परंपरा जपणारी, तिची मूळ चव बिघडू न देता अधिक रंग आणणारी पारंपरिक घराणीही कोल्हापुरात आपला दर्जा टिकवून आहेत. कसबा-बावडा हे कोल्हापूरचं उपनगर. तिथला छत्रपतींचा नवा राजवाडा हा जसा सर्वाच्या परिचयाचा आणि श्रद्धेचा तशीच बावडय़ाची मिसळही जातिवंत खवय्या मंडळींच्या आकर्षणाचा विषय. छोटेखानी हॉटेलात मिळणा-या इथल्या मिसळीनं कसबा-बावडा या उपनगराची ख्याती अख्खा महाराष्ट्रात पोहोचविली आहे.
तर मग मंडळी कोल्हापूरच्या बावड्याच्या मिसळीत काय मिसळल असतय बघा, मटकीच्या मोडाची उसळ किंवा पांढरा वाटाणा, मटार यांचा चवदार आणि झणझणीत रस्सा, त्यात चिवडा, फरसाण, हवाच असेल तर भज्यांचा चुरा, त्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरव्यागार कोथिंबिरीचा साज असते.एक साजूकशी लिंबाची फोड असतेय.सोबत मग झणझणीत रश्याने पोळलेल्या जिभेला मलमपट्टी म्हणून मऊसूत पाव किंवा ताजा ताजा ब्रेड पण दिला जातो.जास्तच गारवा हवा असेल तर ताज ताज दही देखील असत.हा सगळा साज देण्याची पद्धत पण साधीच बरका.मुळात जेवढं साधं हॉटेल तेवढी फक्कड चव अस आसतंय गणित.बावड्यात पोहचल्यावर बावडा मिसळ अशी पाटी दिसण्यापूर्वी दर शुक्रवारी बंद राहील अशी मोठी शाईने काढलेली अक्षरे दिसतात ना ती बावडा मिसळ बरका.आपल्या सोयीने जी हॉटेल चालतात ना तीच हॉटेल एकदम बेष्ट असतात बघा.बावड्याच्या या छोटेखानी हॉटेल किंवा मिसळ टपरीची आणखी एक खासियत अशी की,या मिसळीची लोकप्रियता इतकी की ही मिसळ बावड्यामध्ये जाऊन चाखलेल्या मंडळींमध्ये हिंदी,मराठी स्टार आहेत,स्टार क्रिकेटपटू आहेत, धुरंधर राजकारणी आहेत,समाजसुधारक आहेत,अगदी लता मंगेशकर आणि सर्व मंगेशकर भगिनी तर आहेतच इतर प्रसिद्ध संगीतकार वर्गही आहे.सांगायच झालं तर उभ्या महाराष्ट्रात जेवढी मंडळी सेलिब्रेटी म्हणून ज्ञात होती आहेत त्या समद्यानी त्या फक्कड मिसळीची चव चाखली आहे बर का.बावड्याच्या हॉटेलात मिसळ खायला जाताना नम्र होऊन खाली वाकूनच जायला लागतंय नायतर तुळवीला कपाळ थडाकलंच बघा.आत गेल की साध्या टेबल खुर्चीवर जाऊन बसल की मग चोहोबाजुनी लावलेल्या फोटोवरून आपल्याला सेलिब्रेटी मध्ये बसून ही मिसळ खातोय असा फील येतो शिवाय ही मिसळ कशी प्रिय होती याचा अंदाज येतो.विशीच्या आसपास वय असणारा तेंडुलकर,विनोद कांबळीचा फोटो देखील इथेच पाहायला मिळेल.आणखी लय फोटू हायती तुम्ही जाऊन बघू शकताय.(हे लगिर झालं जी च्या राहुल्याच्या टोन मध्ये वाचा... मजा येईल)
तुम्ही तिथं गेला कनाय तुम्हालाही सेलिब्रेटी सारखच आदरातिथ्यही मिळेल मग तुम्हाला विचारलं जाईल कशी मिसळ हवी तिखट की मध्यम हवा तर सेमी तिखट असाही तुम्ही ऑपशन निवडू शकता.पण तुम्हाला सांगतो तिखाटजाळ मिसळ खाण्यात जो आनंद असतोय ना तो कशात नसतोय.हा तिखटपण पचवणं ही देखील एक प्रकारची अचिव्हमेंट असतेय.म्हणून मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच असायला हवी. तिखटपण झेपत नाही, म्हणून मग दही, पापड इत्यादीशी सलगी करायला हरकत नाही. कदाचित यामुळेच या मिसळीतून दही मिसळ, फराळी मिसळ, उपवासाची मिसळ असे मिसळीचे प्रकार पुढे आले असतील.
बावड्यात मिसळ खायला जायला वेळ काळ पाळायची आवश्यकता नाहीच पण तेवढं हॉटेल मात्र उघड आसल पाहिजे बघा.मिसळीची चव ही मिसळ खाऊन झाल्यावर जिभेवर रेंगाळत राहते तिथेच मिळणारा धारोष्ण दुधाचा चहा पिला की मग मिसळ खायच्या आनंदाचं एक सर्कल पूर्ण होतंय बघा.जेंव्हा केंव्हा मी या हॉटेलात मिसळ खायला जाते तेंव्हा तेंव्हा तिथं माझाबी मिसळ खातानाचा फोटू असावा असं वाटत आसतंय.झालासतर हे बावडा मिसळ पुराण वाचून कुणी बावड्याला मिसळ खायला जाणार आसल तर तिथल्या मिसळ मालकाला माझा फोटू 'लावायला लागतूय'आस सांगणार आसाल तर माझी काही ना नाही.

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
IMG_20180630_163036.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ते जाम झेपत नाही. सँडविच पावाच्या दोन स्लाइस मध्ये वडा खाणे.
वडा पाव ला लादी पावच.>>१११११११
वडापाव मागितला कि ब्रेड स्लाईसमध्ये वडा घालून देतात?? हो

अरेच्चा हा तर आमच्या सोलापूरच्या भाग्यश्री बटाटावडासारखा दिसतोय की Lol आम्ही तो तसाच सुकी शेंगाचटणीसोबत खायचो. मिरची, पाव/ब्रेड काहीच नाही.
एनिवे आपण काही फूडनाझी नाही त्यामुळे अशी डिश समोर आली तर पोळीभाजीसारखं ब्रेडवडा खाऊ. काहीच हरकत नाही.

मला स्लाईसमध्ये वडा कसा कोंबून कसा देत असतील आणि तो खाताना इकडेतिकडे सांडणार नाही का असा प्रश्न पडला होता.

खाल्ली आवडली सोडला विषय.मिसळीचे पुराण आणि मराठी आंजावर त्याचे रुपक अलंकारात केलेले वर्णन याचा आता कंटाळा आला आहे.
एका महाभागाने मिसळीला दिलेली कमनीय बांध्याच्या प्रेयसी उपमा बघून आश्चर्यही वाटले नाही.आपल्याला हा मिसळ नावाचा प्रकार कधी फारसा आवडला नाही . मिसळोत्सव भरतो कुठेतरी म्हणे आणि काय काय येईल कुणास ठाऊक.

केशव तुलसी
माझे डू आय आहात का हो?
कान मात्रा वेलांटीसह सहमत.

मिसळ आवडत नाही असे नाही, चमचमीत खायला कधीतरी बरी लागते, पण नथिंग पोएटिक अबाउट इट. ऍसिडिटी नक्की होते नेहेमी..

खरी(नुसती तर्री तिखटजाळ तेल वाडगाभर नसलेली) उकडलेली मोड वाली मटकी,थोडा उकडलेला बटाटा,फार जास्त तेल नसलेला घरगुती कट/तरी, दही आणि सोबत लादी पाव अशी मिसळ पावसाळ्यात खायला जाम कम्फर्ट फूड वाटते.
उन्हाळ्यात मिसळ खायला बोअर होते.
ज्याने ऍसिडिटी होते अशी मिसळ नक्कीच अती तेल तिखट घालून आणि बाकी पदार्थाना सुट्टी देऊन बनवलेली असू शकेल.
अर्थात सांबार पोहे न आवडण्याचा मूलभूत हक्क मला आहे तसाच मिसळ अजिबात न आवडण्याचा मूलभूत हक्क सर्वांना असू शकतो. ☺️☺️

मध्यंतरी लो काॅस्ट फरसाण कसे बनते ते टीव्हीवर पाहिल्यापासून बाहेरच्या मिसळीला पास दिलाय. घरी केलेली नेहमीची सात्विक साधी मटकीची उसळ, कां-टो- को- बटाटा व चितळेंचेच फरसाण व वरून भरपूर लिंबू अशी केलेली घरगुती मिसळही चांगली वाटली. चितळेंकडचे फरसाण चवीला कधीही कडू किंवा कडसर लागत नाही त्यामुळे ते सेफ असावे.
बावड्याची मिसळ आवडली "नाही".

Pages