योगात् व्यसनमुक्ति: - आसन - भाग ३ - डॉ. वैशाली दाबके

Submitted by अतुल ठाकुर on 29 June, 2018 - 07:54

yoga_0.jpg

रुग्णमित्रांनी कुठली आसने करावी याबद्दल डॉ. वैशाली दाबके यांनी जे काही सांगितले त्याची या लेखात चर्चा करण्याअगोदर आमचे एक कळकळीचे सांगणे आहे की योगाभ्यास हा निव्वळ लेख किंवा पुस्तके वाचून कधीही करु नये. तो तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. आम्ही साधारणपणे ज्या रुग्णमित्रांना योगाचा सराव करण्याची इच्छा आहे त्यांचा योगाभ्यास कशा प्रकारचा असावा याचे मार्गदर्शन या लेखाद्वारे करीत आहोत. व्यसनामुळे मधुमेह, रक्तदाब, यकृताचे विकार अशा निरनिराळ्या व्याधींनी शरीर पोखरलेले असताना योगाभ्यास करण्याआधी डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. रुग्णमित्रांना या लेखामुळे त्यांना करता येण्याजोग्या योगाभ्यासाची काहीशी कल्पना येईल आणि ते योगाभ्यासाला उद्युक्त होऊन तज्ञांचे मार्गदर्शन घेतील अशी आमची अपेक्षा आहे. दाबकेमॅडमनी योगाभ्यासाची सुरुवात सहज सोपी व्हावी याची काळजी तर आसनांची शिफारस करताना घेतली आहेच पण त्याच बरोबर सराव सर्वांगसुंदर व्हावा याचाही त्यांनी विचार केला आहे हे जाणवले. म्हणजे रोजच्या अभ्यासात उभ्याने करायची आसने, पाठिवर पोटावर झोपून करण्याची आसने, पाठीच्या कण्याला पीळ देणारी, शरीराला सुखद तणाव देणारी, दाब देणारी आसने या सार्‍यांचा समवेश रुग्णमित्रांसाठीच्या अभ्यासात त्यांनी केला आहे.

सुरुवात पवनमुक्तासन नावाने अलिकडे प्रचलित असलेल्या सरावाने करावी असे त्यांनी सांगितले. त्यात हातापायांच्या सांध्याच्या हळुवार हालचाली केल्या जातात. त्यामुळे एक प्रकारे वॉर्मअप होते. स्नायु मोकळे होतात, थोडासा लवचिकपणा येतो आणि शरीर पुढच्या योगाभ्यासासाठी तयार होते. त्यानंतर वज्रासन आणि अर्धपद्मासनाचा अभ्यास करावा. अलिकडे साधी मांडी घालून बसणे अनेकांना जमत नसल्याचे दिसून येते. मात्र पायाखाली मऊ टॉवेल घेऊन वज्रासनाचा अभ्यास करता येईल. पद्मासन लगेच येणे कठिण असते. त्यामुळे अर्धपद्मासन हा एक चांगला पर्याय आहे. ताबडतोब अंतिम स्थितीतील आसने लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सुलभ किंवा अतिसुलभ आसने सुरुवातीला आपल्या अभ्यासात हवीत अशी मॅडमची भूमिका दिसली. वज्रसनाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे हे एकमेव आसन जेवल्यानंतर करता येते. ज्यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. व्यसनाचा एक परिणाम पोटाच्या तक्रारी हा असतो. त्यासाठी हे आसन फायदेशीर ठरु शकते.

बैठकीच्या आसनांनी शरीराला आणि मनाला काहीसे स्थैर्य प्राप्त होते. सतत व्यसनासाठी मनाची तगमग होणार्‍या रुग्णमित्रांना स्थैर्याचे महत्त्व मुद्दाम सांगण्याची आवश्यकता नाही. वज्रासनातून मार्जारासन करता येते. जसे आपण आळस देताना हात वर करून, पाठ मागे वळवून आळोखे पिळोखे देतो, तसेच मांजरही एका विशिष्ट तर्‍हेने शरीर ताणते. हा आकॄतीबंध या आसनात साधला जातो. त्यामुळे आळस दूर होतो. त्यानंतर मॅडमनी पर्वतासनाची शिफारस केली. अर्धपद्मासनात बसून नमस्कार मुद्रा करून हात वर नेत शरीराला वरच्या बाजूने ताणणे या आसनात घडते. रुग्णमित्रांचे श्वसन सुधारण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर शयन स्थितीतल्या आसनांमध्ये सुरुवातीला उत्थित एकपादासन करण्यास मॅडमनी सुचवले. यामुळे पोटाचे स्नायु बळकट होतात. पचनासाठी हे एक उत्तम आसन आहे. याच्या जोडीलाच उत्तान वक्रासनाचा समावेश मॅडमनी केला. वक्रासनामुळे पाठीच्या कण्याला पीळ दिला जातो. योगाभ्यासात पाठीच्या कण्याचे महत्त्व अपरंपार आहे. मज्जातंतूचे आरोग्य त्यावर अबलंबून असते. ही सारी आसने मॅडम सांगत असताना त्यातील सोपेपणा लक्षात येत होता. रुग्णमित्रांना सुरुवातीलाच अवघड वाटणार नाही, आसनांमध्ये बराच काळ राहता येईल, आणि तत्काळ आरामही वाटेल अशीच आसने त्यांनी निवडली होती. मात्र त्यांनी सराव हा नियमित करायला हवा हे वारंवार सांगितले.

यानंतर पोटावरील आसनांसाठी त्यांनी भुजंगासन, शलभासन सांगितले. याची सुलभस्थिती ही पचनासाठी, पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. उभ्याने करण्याच्या आसनात त्यांनी सुलभ चक्रासन आणि बद्धस्तासनाचा समावेश केला. चक्रासनामुळे पाठीच्या कण्याला बाजूने ताण दिला जातो. असा ताण आपण एरवी कधीही देत नाही. तर बद्धहस्तासनाने बोटे मागे गुंफून खांदे मागे खेचले जातात. त्यामुळे श्वसन सुधारते. खांद्याचे स्नायु मोकळे होतात. आळस दिल्यावर जसे सुखावह वाटते अगदी तसेच हे आसन केल्याने वाटते. आसने सांगत असतानाच ज्यांना मानेचे विकार आहेत त्यांनी मान मागे नेऊ नये हे सांगण्यास दाबकेमॅडम विसरल्या नाहीत. प्रत्येक आसनानंतर करण्याची विश्रांतीची स्थितीही त्यांनी सांगितली. पुढे त्या म्हणाल्या, योगाभ्यास झाल्यावर उत्साह वाटायला हवा. तर तो योगाभ्यास योग्य झाला आहे असे म्हणता येईल. दम लागत असल्यास आपण काहीतरी चुकीचे करत असल्याचे ते लक्षण आहे असे समजावे आणि तज्ञाची लगेच मदत घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. सराव संपवताना मनाच्या सहाय्याने शरीराला शिथिल करणार्‍या शवासनाची शिफारस त्यांनी केली.

शवासनाची दहा मिनिटे धरून या योगाभ्यासाला ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. सकाळी किंवा संध्याकाळी, हात पाय व्यवस्थित पसरता येतील अशा जागी बसून, आधी चार तास पोट रिकामे ठेवून योगाभ्यास करावा. अर्थात तो नियमित करावा इतकेच त्यांचे म्हणणे होते. आहार संतूलित, चौरस असावा, शिळेपाके, तिखट जळजळीत खाऊ नये. पोट अर्धे भरावे, पावभाग पाणी प्यावे आणि पाव भाग पचनासाठी रिकामी ठेवावा. योगाभ्यासाला योग्य आहाराची जोड दिली तर तो जास्त परीणमकारक होतो असेही त्यांनी सांगितले. मुक्तांगणला जात असताना व्यसनामुळे अनेकांना उष्णतेचा त्रास होत असल्याचे मी पाहिले होते. त्यामुळे योगाबरोबरच त्यांनी दिलेला आहाराबाबतचा सल्ला मला अतिशय महत्त्वाचा वाटला. योगाभ्यास युवा, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधी असलेली माणसेही करु शकतात. फक्त आपल्या क्षमतेचे उल्लंघन करु नये असे सांगत त्यांनी आपले बोलणे संपवले. योगाचे प्रायोगिक अंग त्यांनी माझ्यासमोर मांडले होते. आता यानंतर प्रायोगिक अंगामागील तात्त्विक बैठक काय आहे याची चर्चा त्या करणार होत्या. त्यामुळे आपल्या प्राचिन ग्रंथांमध्ये व्यसनमुक्तीला उपकारक अशी कोणती तत्त्वे दडली आहेत याची माहिती होणार होती. माझी उत्सुकता आणखीनच वाढीला लागली होती.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users