याआधीचे भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १
_____________________________
पूर्वभाग-
आम्ही तर आमच्या डोळ्यांवर त्याच्यावरच्या आम्ही ठेवलेल्या विश्वासाची आणि कृतज्ञतेची पट्टीच बांधली होती. या हतबलतेमुळेच तर या पट्टीच्या अलिकडे असलेला त्याच्या डोळ्यांतील मुळचा क्रूर आणि लोभी भाव आम्हाला दिसलाच नाही!
×××××××××××××××××××××××××××××××××××
आता पुढे-
×××××××××××××××××××××××××××××××××××
धोंडूशेटने आम्हाला आमच्याकडे जमलेले पैसे आणि जवळचे काही पैसे दवाखान्यात त्यादिवशी जमा करायला सांगितले. दुसर्या दिवशी तो बाकीचे पैसे जमा करेल असं म्हणाला, आणि निघून गेला. आम्हाला त्याक्षणी तर तो देवाचा अवतार वाटत होता. आम्ही दवाखान्यात आमच्याकडचे पैसे जमा केले. दुसर्या दिवशी सकाळी तो आला, आणि जेव्हा म्हणाला की त्याने बाकीचे पैसे भरले आहेत; तेव्हा अक्षरशः त्याच्या पाया पडलो होतो आम्ही. माझ्या बापाचा जीव वाचवायला आलेला देवदूत वाटत होता तो. आता काही चिंता नव्हती. बाप लवकर बरा होईल, ही आशा आमच्या मनात मूळ धरत होती. माझा बाप लवकर शुद्धीवर येणार होता. ठणठणीत बरा होणार होता. मी आणि माय खूप खूश होतो. बापाची काळजी घेत होतो. तो कधी शुद्धीवर येतोय, हीच धाकधुक मनात होती. डाॅक्टरही म्हणाले होते, की बाप लवकर बरा होईल.
आणि एकेदिवशी बाप शुद्धीवर आला. प्रेमळ नजरेने बघितलं त्याने माझ्याकडे आणि मायकडे. आम्हाला तर आनंद गगनात मावत नव्हता. त्याने उठून बसण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला अडवलं. त्याला बोलायचं होतं. थोड्यावेळाने त्याचा कंठ फुटला. त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजी घालत आहेत. तो बोलू लागला-
"पोरा, तुला तुजा बा लय वंगाळ वाटत आसल ना? मी मानतू, मी दारूच्या नादी लागून चूक क्येलीय. पण गावात तुज्या फीसाठी मी कोन्तीच चूक केली नवती रं! तो रंग्या बोलला, ही पोती गावच्या येशीपासला नेयला मदत कर, पैसं देतो म्हून. तुजी फी भरायची व्हती, मी काय गेलू त्याच्या संगं. मला संशय आलता, पण मी पैक्यासाटी गप रावून काम केलं. तेला तिकडेच ती पोती पुरायलाबी मदद केली. तुज्या फीचं पैकं घेतलं, न निघालू. तो मला तेचं नाव कोनला सांगू नको म्हनला. गावात मला पोत्यांसंगं बगितल्यालं, म्हून मला अडकावलं. तेनं वर आनखी पैकं दिलं, गप रावून जेलात र्हायला. हे तेच पैकं, जे आपन मुंबैत येऊन आदी वापरलं! वर तेनं तुमाला मारायची धमकीबी दिलेली. मला काय म्हायती नवतं रं! मी दरोडा नवता घातला रं! मी दोषी नाय! देवाची आन घेतू!"
माझ्यासाठी हा धक्का होता! ज्या प्रसंगामुळे बाप माझ्या नजरेतून उतरला होता, तो प्रसंगच मुळी माझी शाळेची फी भरायला, नि नंतर माझा नि मायचा जीव वाचवायला घडला असावा! माय ला हे माहीत असावं. तिच्या चेहर्यावरून मला जाणवलं. आयुष्य पण कसं असतं ना! ज्या गोष्टीसाठी मायला, बापाला एवढं सोसावं लागलं, ती माझी शाळा तर सुटली होतीच, पण सोबत हे असले दिवस आले होते. माझ्या बापाला व्यसन जडलं होतं, नि आता कुठे त्याला उपरती आली होती; तर नेमका आताच त्याचा हा अपघात झाला होता. मायला तर भरपूर मनःस्ताप सहन करावा लागला होता. मलाही वाईट संगतीत वाईट सवयी लागल्या होत्या. मलाही वाटायचं शाळेत जावंसं, पण जाऊ शकायचो नाही. इथे खायला धड पैसे नव्हते, तर मी कुठल्या तोंडाने मायला शाळेत जायची परवानगी विचारू; असाच विचार दरवेळी मनात यायचा. यामुळे माझ्या मनाची कोंडी व्हायची, भवितव्य अंधारलेलं दिसायचं, नि त्यामुळे प्रचंड निराशा यायची. कधीकधी आकाशात वीज लखकन चमकावी, असा विचारही मनात यायचा, या सर्वाची सुरुवात माझ्या शाळेच्या फीपासूनच झालीय, तर मला, मायबापाला शाळा करायची दुर्बुद्धीच सुचली होती का! पण एकीकडे दुसरं मन हा विचार पुसूनही टाकायचं नि मला बजावायचं.
बाप हळुहळू बरा होत होता. पण त्याच्या पायाचं हाड तुटल्याने त्याला परत कधीच चालता येणार नव्हतं. स्वतःच्या पायावर उभंही राहता येणार नव्हतं. याबद्दल बाप दुःखी वाटत होता, पण याबाबतीत कोणीही काहीही करू शकणार नव्हतं. अन् एके दिवशी बापाला घरी जायची परवानगी दिली. आम्ही बापाला घरी आणलं. पुन्हा एकदा बापाला बघायला आमच्या झोपडीत सारी वस्ती लोटली. जो तो हळहळ व्यक्त करून जात होता. स्वतःच्या अवस्थेची बापाला खूप लाज वाटत असावी. असं अचानक आलेलं अपंगत्व त्याला पटत नव्हतं. त्याला हालचालींसाठीही आता आयुष्यभर दुसर्यावर अवलंबून रहावं लागणार होतं. असं एकदोनदा बोलूनही दाखवलं होतं त्याने. मला तेव्हापासून हा एक प्रश्न छळायला लागला-'गरिबाच्या वाट्यालाच सगळी दुःखं असतात का?' बापाला घरी आणलं, तरी त्याची औषधं सध्यातरी चालूच राहणार होती. भंगार वेचून पदरात पडतील त्या पैशांत घर चालवणारी माझी माय कशी आणणार होती ही औषधं! मी त्या दिवशी असा विचार करत असतानाच कातरवेळी धोंडूशेट आला झोपडीत. त्याने बापाची विचारपूस केली. बोलता बोलता मायने बापाच्या औषधांचा विषय काढला. धोंडूशेट बहुतेक अशाच संधीची वाट पाहत होता.
तो म्हणाला- " तुम कायकू चिंता करता है! मै है ना! देखो, इतना पैसा तो मै नही दे सकता. पर एक रास्ता है. ये तेरा लडका, अब बडा हो गया है. इसके वास्ते, मेरापास एक काम है. तुमकोभी कुछ पैसा मिलेगा और मैभी मेरे पैसा वसूल कर सकता है. क्या?"
माय हतबल होती. तिला हा निर्णय ऐकावाच लागणार होता. आणि वर घरातही काही पैसे येणार, हे ऐकून तिला हे पटलंही होतं. मग घाईघाईतच तिनं धोंडूशेटला परस्पर यावर हो म्हणून टाकलं. धोंडूशेटच्या चेहर्यावर लोभी भाव दिसत होते. पण ते लक्षात न यायला कारणीभूत केवळ आमची हतबलता होती. नाहीतरी लक्षात येऊन आम्ही काय दुसरं करणार होतो. धोंडूशेटचे पैसे घेऊन आम्ही एकप्रकारची लाचारी पत्करली होती. तो जे सांगेल ते आम्हाला ऐकावंच लागणार होतं. नशीबाचे अजब खेळ. माझी जणू काही मतंच नव्हती माझ्या आयुष्याबद्दल. मला अजून शाळा शिकायची होती, खूप शिकायचं होतं, मोठा साहेब व्हायचं होतं, पण आता माझ्या नशीबात काबाडकष्ट करून धोंडूशेट देईल ते काम करणंच होतं. मनातलं दप्तर धूळ खात पडणार होतं, कायमचं!
पुस्तकांच्या गंधाला मी
कायमचा मुकणार होतो
आयुष्याच्या गणितात मी
पुनःपुन्हा चुकणार होतो
दुसर्या दिवशी सकाळी धोंडूशेटने मला बोलवलं. मी त्याच्याकडे गेलो. मी गेलो, तेव्हाच माझ्या जुन्या मळकट कपड्यांवरून माझ्यावर खेकसला. तो मला स्टेशनलगतच्या एका हाॅटेलात घेऊन गेला. त्या हाॅटेलचा मालक धोंडूशेटचा मित्र असावा. या दोघांत माझ्याबद्दल आधीच बोलणं झालं असावं, असं मला एकंदर त्यांच्यातल्या संभाषणातून जाणवलं. हाॅटेल मालकानं मला त्याच्याकडे ठेवून घेतलं. मी नव्या ठिकाणी बुजलो होतो, किंचित घाबरलो होतो, इथली लगबग, घाई, प्रत्येकाची कामं उरकण्याची सफाई बघता माझा इथे कसा निभाव लागायचा, हाच विचार सारखा येत होता. यासोबतच सोबतीला अजून एक इच्छा चाळवली गेली होती, भुकेची. घराल्या शिळ्या, कडक झालेल्या भाकर्या कुठे, अन् इथलं स्वादिष्ट जेवण, नाष्ता कुठे! खाद्यपदार्थांचा खमंग सुवास सुटला होता. तोंडाला पाणी सुटलं होतं. आता कोणीतरी आपल्याला एका टेबलावर बसवून हे सर्व खायला देईल, तर किती बरं होईल; या विचारानेच जठराग्नी अजून भडकत होता. सकाळी सातला इकडे येऊन रात्री आठपर्यंत थांबायचं होतं. कधीकधी जास्तवेळही थांबावं लागणार होतं. इथे मला सांगतील ती कामं करायला लागणार होती. दुपारचं जेवण काय ते मिळणार होतं म्हणा.
त्या दिवशी मला तिकडे नुसतं राहून कामं कशी करायची, याचं निरीक्षण करायला सांगितलं. पण सायंकाळी जेव्हा गर्दी वाढली, तेव्हा नकळत मलाही कामाला लावलं गेलं. कुठल्या टेबलावरून फडका फिरव, पाण्याचे जग फिरव, अशी साधी कामं. जेव्हा गर्दी ओसरली, तेव्हा मालकाने मला हाॅटेलच्या मागच्या बाजूला पिटाळलं. तिकडे उष्टी ताटं, वाट्या, पेले, मोठी भांडी पडली होती. मी आणि आणखी एकदोघांना हे काम लावलं. ती भांडी पटापट घासायला, विसळायला खूप कष्ट पडत होते. मालक मध्येमध्ये आमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी फेर्या मारत होताच! माझ्या धिम्या चाललेल्या हातांकडे बघून माझ्यावर ओरडतही होता. मी भेदरलो होतो. काही वेळाने सगळी भांडी धुवून झाली. मला मालकाने घरी जायला सांगितलं. तसा मी निघालो. मला हे काम अजिबात आवडलं नव्हतं. टेबलावरून फडकं फिरवायचं, पाण्याचे जग फिरवायचे, कोणाला कुठला पदार्थ हवा आहे ते विचारायचं, प्रत्येक गिर्हाईकाला बरोबर हवा तोच पदार्थ नेऊन द्यायचा, भांडी घासायची आणि वर बोनस म्हणून मालकाचा ओरडा, शिवीगाळ ऐकायचा, माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या सहकार्यांची दादागिरी सहन करायची, हेच होतं का माझ्या नशीबात! हे सर्व कुठेतरी थांबावं असं मनापासून वाटायचं. पण मी हतबल होतो, माझा नाईलाज होता.
तिकडे माझ्यासोबत काम करणारे माझी मजा उडवायचे, टपलवून जायचे, विनाकारण मारायचे, त्यांच्याकडून झालेल्या चूका माझ्यावर ढकलायचे आणि मला मालकाचा ओरडा ऐकायला लागायचा. सुरुवातीला हे सगळं मनाला खूप लागायचं. डोळ्यातून आसवं गळायची. हे लोक माझ्याशीच असं का वागतात, हे सगळं माझ्याचसोबत का घडतंय, मी इथे खरंच एवढा नकोसा आहे का यांना, यांना फक्त माझ्याशी नीट वागण्यात काय त्रास होतो, हे मला समजायचं नाही. माझी घुसमट होत होती. आपण मन लावून नीट काम केलं, तर हे लोक मला त्रास देणं थांबवतील, अशीच माझी धारणा होती. पण कितीही मन लावून कष्टाचे डोंगर उपसले, तरी माझ्या वाट्याला मनःस्तापच यायचा. हा मानसिक त्रास तर होताच. पण दिवसाचे तेरा चौदा तास इथं खपून अंग अगदी दुखून यायचं. कधीकधी अंगातली शक्तीही संपलीय, आपण उभेही राहू शकत नाही, असं वाटायचं, पण कधी दोन मिनिटं शांत बसू शकायचो नाही. भांडी घासून घासून हात सुजून यायचे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दिवसभर ये-जा करून पायांतून कळा यायच्या. पाठ दुखून यायची. कधी घरी जातोय, असं व्हायचं. माय ला सुरुवातीला मी हे सगळं सांगायचो, ती बिचारी कधी माझे हात-पाय चेपून देऊन, कधी थोपटून मला आराम द्यायची. जर कधी तीच वैतागलेली असली, तर त्रागाही करायची. पण हळुहळू माझा त्रास सांगणं मीच कमी केलं. रोज मरे त्याला कोण रडे!
बघता बघता काही महिने सरले. मी सरावलो होतो या कष्टाला, त्रासाला, कुचंबणेला. आपल्याला कितीही त्रास झाला, तरी तो डोळे मिटून निमुटपणे सहन करायचा,हेच शिकलो होतो मी. माझ्या स्वप्नांचा, आकांक्षांचा चुराडा झाला होता. वर या सहन करण्यामुळे मी अबोल झालो होतो, भेदरलो होतो. माझं मन कधी कधी मला सांगायचं, की हे सगळं झुगारून दे! मन कधी कधी बंड पुकारायचं. पण बापाची हतबल अवस्था, धोंडूशेटकडून घेतलेले पैसे आठवायचे, नि मी शांत व्हायचो. पण मला शाळेच्या वाटेवर परत चालायचं होतं. फाटकी, जुनी का होईना, पण पुस्तकं जवळ करायची होती. अभ्यास करायचा होता. गणितं सोडवायची होती. कविता पाठ करायच्या होत्या. गुरूजींच्या छड्याही खायच्या होत्या. नवेनवे मित्र जमवायचे होते. पण माझ्या वाट्याला काय आलं होतं! हे जुनाट मळकं टेबलावर फिरवायचं फडकं, खरकटी उष्टी भांडी, दुपारी मिळणारी कसलीशी पातळ आमटी आणि शिळा भात, खूप सारे कष्ट आणि वरकडी म्हणून मालक आणि सोबत काम करणार्यांचा ओरडा सहन करणं! आयुष्याच्या वाटा धुसर दिसत होत्या.
मला वाटायचं, की आता आपली शाळा सुटली ती कायमचीच. आपण कधीही शाळेत शिकू शकणार नाही. आयुष्यभर हेच काम करत रहायचं. आजकाल मला ते नदीकिनारी अक्षरं लिहित असल्याचं स्वप्न पडायचं. यावेळीही मी मन लावून 'गणेश शाळेला जातो' वाळूत लिहायचो, मात्र यावेळी माझे कपडे मळके असायचे, खांद्यावर ते मळकं टेबलं पुसायचं फडकं टाकलेलं असायचं, चेहरा काळवंडलेला असायचा, आणि अशा अवस्थेत मी वाळूत वेडीवाकडी अक्षरं काढायचो. मी या अक्षरांकडे अगदी आशेने पहायचो. एखाद्या चार दिवसांच्या उपाशी माणसाने अन्नाकडे पहावं तसं! तितक्यात ती अक्राळविक्राळ लाट माझ्या दिशेने येते, मी मनात नसतानाही अक्षरं वाचवायला पुढे ढकलला जातो. मी घाबरतो. ती लाट जणू माझ्याच अस्तित्वाला आव्हान देत असते. काही क्षणातच ती माझ्यावर जोरात थडकते, मी लांब फेकला जातो, नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरतो. ती लाट संधीचा फायदा घेऊन माझी अक्षरं क्रौर्याने पुसून टाकते. मला रडू कोसळतं. एका बेसावध क्षणी ती लाट माझ्यावर झडप मारते आणि मला तिच्यासोबत घेऊन जाते, कायमची. नंतर सगळा अंधार दिसू लागायचा नि माझं स्वप्न मोडायचं.
घरीची परिस्थिती अजून बिघडतच चालली होती. बाप पूर्णतः परावलंबी झाला होता. त्याने आता दारू सोडली होती. पण तो आता या हतबलतेमुळे अजूनच दिनवाणा दिसू लागला होता. त्याला मनातूनच कुठेतरी आपल्या हतबलतेचा, परावलंबी असल्याचा न्यूनगंड वाटत असावा. तो काही बोलायचा नाही, पण त्याचा उदास चेहरा सर्वकाही सांगून जायचा. आतून पोखरला होता तो. अस्वस्थ वाटायचा. मला बापाची दया येत होती. त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं. माय ला आणि मला त्याचं सर्वकाही करावं लागत होतं. जास्तकरून मायच करायची. आजकाल मायची चिडचिडही वाढत होती. बापाचा खर्च, बापाची सेवा, दिवसभर उन्हातान्हात भंगार वेचत राबणं, यात ती चिणून जात होती. पैसे कमवताना तिची दमछाक होत होती. पण यावर मी काय करू शकत होतो? मीही हतबल होतो तिच्याचसारखा. पण मायची फरफट मला बघवत नव्हती, हे खरं! मीही स्वतःच्या स्वप्नांना कायमचं दूर सारून पोटासाठी काम करतच होतो.
काही दिवस उलटले. बाप हल्ली जरा खूश दिसायला लागला होता. तो रात्री त्याच्या बालपणीच्या गोष्टी सांगायचा. आठवणीत रमायचा. त्याला आधीपेक्षा खूश बघून मला, माय ला किंचीत हायसं वाटत होतं. बाप वरवर खुश दाखवायचा प्रयत्न करत होता. पण तो आतून अजूनच उदास होत चालला होता. हे मात्र आमच्या लक्षात येत नव्हतं. तो कशाततरी मन रमवायचा प्रयत्न करायचा. याचा उद्देश त्याचं मन रमावं, हा नसून 'तो कशाततरी मन रमवतोय', हे आम्हाला भासवणं, हा असायचा. पण हे आम्हाला दिसत नव्हतं. बाप बरा होतोय, अशी समजूतच आम्ही मनाला घालून दिली होती. बापात असा अचानक बदल कसा झाला होता, याचा विचार आम्ही करायचो. त्याने आपला दृष्टिकोनच बदलला होता. आजकाल तो म्हणायचा-
"पोरा! मान्साची जिंदगी म्हनजे इजेच्या परकाशावानी! फटकन संपती बग. कदी संपती कळत बी नाय! कदी आखरीचा स्वास असंल कोनाला माहित नस्तं येका देवासिवाय. म्हून मान्सानं जगून घितलं पायजे. खुसीत आसलं पायजे!"
बाप बदलला होता. तो आजकाल 'तुजा बा लवकर बरा होनार बग' असंही म्हणायचा. आम्हाला वाटायचं, की बाप लवकर बरा होणार. त्याच्याकडे आलेली पूर्णपणे बरा होण्याची ईच्छाशक्ती पाहून वाटायचं, बाप लवकर चालायला, उठायला लागेल. पण हा आमचा भ्रम होता. बापाच्या आणि आमच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं होतं, याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो.
_____________________________
-जुई नाईक.
द्वादशांगुला
सर्व हक्क सुरक्षित.
जबरदस्त भाग !
जबरदस्त भाग !
खाद्यपदार्थांचा खमंग सुवास
खाद्यपदार्थांचा खमंग सुवास सटला होता..... सुटला होता.
छान भाग....
भारीच लिहिलंय ! सगळं चित्र
भारीच लिहिलंय ! सगळं चित्र प्रत्यक्ष पाहतोय असे वाटते. पुढे अजुन काय वाढून ठेवलय ह्या छोट्या नायकाच्या आयुष्यात ह्याची उत्सुकता लागलीय. लवकरच त्याला शाळेत जायची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सापडु दे.
पुभाप्र.
भारीच लिहिलंय ! सगळं चित्र
भारीच लिहिलंय ! सगळं चित्र प्रत्यक्ष पाहतोय असे वाटते. पुढे अजुन काय वाढून ठेवलय ह्या छोट्या नायकाच्या आयुष्यात ह्याची उत्सुकता लागलीय. लवकरच त्याला शाळेत जायची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सापडु दे.
पुभाप्र.+१११११११११११११११११११
मस्तच झालाय हा भाग . पुभाप्र
मस्तच झालाय हा भाग . पुभाप्र .
हा पण भाग भारीये... मस्तच...
हा पण भाग भारीये... मस्तच... उत्सुकता आहे पुढे काय होणार याची
खाद्यपदार्थांचा खमंग सुवास
खाद्यपदार्थांचा खमंग सुवास सटला होता..... सुटला होता>>>>>> टायपो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! सुधारणा केलीय!
च्रप्स, प्रवीणजी, अंबज्ञजी, किल्लीताई,अधांतरीजी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद!
लवकरच त्याला शाळेत जायची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सापडु दे.>>>> हो. सापडेल.
पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करते.
धन्स सिद्धी!
धन्स सिद्धी!
खुप छान जमलेय... पुढचा भाग
खुप छान जमलेय... पुढचा भाग लवकर टाक
धन्यवाद उमानुजी! पुढचा भाग
धन्यवाद उमानुजी! पुढचा भाग लवकर टाकायचा प्रयत्न करते!
तू बहुतेक लघु-कादंबरी किंवा
तू बहुतेक लघु-कादंबरी किंवा संक्षिप्त-चरित्र लेखनाचा प्रयत्न करत आहेस... तुझ्या लिखाणात खूप उत्साह भरलेला असतो, ह्या कथेतूनसुद्धा तो जाणवतो आहे... अशीच लिहीत रहा!
तू बहुतेक लघु-कादंबरी किंवा
तू बहुतेक लघु-कादंबरी किंवा संक्षिप्त-चरित्र लेखनाचा प्रयत्न करत आहेस.>>>> हो! ब्युटी पार्लरच्या वेळी दीर्घकथालेखनाचा अनुभव घेतल्यावर जरा अजून वेगळं लिहिण्याचं ठरवलं. 'संघर्ष' ला लघु-कादंबरी किंवा चरित्रलेखन म्हणू शकता. 'संघर्ष' मागे एका व्यक्तीची प्रेरणा आहे. जीवनप्रवास मांडण्याचा पहिलावहिला प्रयत्न करतेय. तो कितपत जमतोय, हे पाहू. पण मी निराश नक्कीच करणार नाही!
तुझ्या लिखाणात खूप उत्साह भरलेला असतो, ह्या कथेतूनसुद्धा तो जाणवतो आहे... >>>> तुम्हाला ज्या अर्थी कथेतल्या शब्दांतून भावभावना जाणवताहेत, त्यानुसार तुम्ही ही कथा मनापासून वाचलेली समजते. त्याबद्दल खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद!!
स्फुर्ती येते, लिहिण्याची उर्मी येते, मनात शब्दांचं, विचारांचं काहूर माजलेलं असतं, भावना मांडाव्याशा वाटत असतात, तेव्हाच लिहायला सुरूवात करते. कथेत मांडायच्या भावनांनी आधी आपलं मन व्यापावं, याकडे माझा अट्टहास असतो. तेव्हाच अगदी उत्साहाने मी लिहित सुटते.
तुमच्या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद!! तुमच्या बोलण्याने लिहिण्याची उर्मी मिळाली आहे.
खूप छान सुरू आहे. पु.भा.प्र.
खूप छान सुरू आहे. पु.भा.प्र.
धन्स परीताई!
धन्स परीताई!