चंदा कि किरनोंसे लिपटी हवायें, सितारों की महफिल जवां, आके मिल जा….!

Submitted by अतुल ठाकुर on 24 June, 2018 - 00:27

chanda_ki_kirno_se.jpg

दिवस १९७३ चे होते. जीवन आजच्या तुलनेने साधे होते. अंगभर साडी नेसलेली, एक वेणी घातलेली आणि ती वेणी उजवीकडून पुढे आणलेली तरुणी साधी असली तरी नायिका म्हणून शोभत होती आणि सुंदरही दिसत होती. बलदेव खोसाचा भोळा भाबडा चेहराही नायक म्हणून पडद्यावर स्विकारला जात होता. आणि या सर्वात माधुर्य आणत होते ते त्याकाळचे संगीत. चित्रगुप्त यांना नौशाद, सी रामचंद्र, मदनमोहन यांच्याप्रमाणे नावाजले गेले नसले तरी त्यांनी जी मोजकी गाणी दिली ती मात्र जबरदस्त होती. "चंदा की किरनोंसे" हे त्यातीलच एक गीत.

“चंदा की किरनोंसे” गाणे संगीतकार चित्रगुप्त यांच्या शिरपेचातला एक मानाचा तुरा म्हणूनच शोभावे असे. अतिशय गोड आणि सतत गुणगुणाविशी वाटणारी चाल. किशोरच्या तरुण, हरहुन्नरी आणि खट्याळ वाटणार्‍या आवाजाने या गाण्याचे सोने केलेले. त्यामुळे बलदेव खोसाचा भाबडा चेहरा, त्याने घातलेला लुंगी कुडता हा वेश आणि त्यात हातवारे करत म्हटलेले गाणे हे सारेच छान वाटु लागते.

आता हे गाणे पाहताना बलदेव खोसाचा अभिनय गमतीशीर वाटतो. पण एकेकाचे नशीब असते. किशोर आणि रफी यांची उत्तम गणली गेलेली एकदोन गाणी या माणसाला पडद्यावर गायला मिळाली. रफीचे "अपनी आंखोंमें छुपाकर" हे ठोकरमधील गाणे पडद्यावर बलदेव खोसाच म्हणतो.

आकाशी निळसर साडीत पद्मिनी कपिला मस्त दिसली आहे. सुरुवातीच्या दृश्यात शिसवी पलंगावर ती पहुडत असताना शिसवी कोरीव चौकटीतून कॅमेराने तिला सुरेख टिपले आहे. नायकाच्या गाण्याने घातलेली साद तिला बाहेर ओढून आणते. काही क्षण ही दोघे सज्जामध्ये एकमेकांसमोर असतात. पुढे तर बलदेव खोसा कल्पनेच्या राज्यात तिला पाहतो ते राणी कलरच्या साडीत. तेव्हा करड्या रंगाच्या मैदानावरुन निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमिवर ही राणी कलरची साडी घालून धावणारी नायिका एखाद्या ज्योतीसारखी लवलवताना दिसते. स्वप्नरंजन संपताना बलदेव खोसा नायिकेला आपल्या बाहुपाशात घेतो आणि ती एकदम गुप्त होते. त्याचवेळी प्रत्यक्षात ही नायिका भरभर आपल्या खोलीत परतताना दाखवली आहे. एडिटिंगचे एक सुरेख उदाहरण. दोन्ही दृश्य अचूक जोडली गेलीत.

बाकी गाणे आहे ते किशोर आणि चित्रगुप्त यांचेच. किशोरकुमारची नक्की ताकद काय आहे हे अशा गाण्यांतून नेहेमीच दिसून आले आहे. अशा गाण्याला आणि अशा चालीला तोच आवाज हवा. एकदम तारुण्याने निथळणारा. शब्दाशब्दात तरुणाईचा जोष दाखवणारा. “तेरे नैन कहते है तेरी कहानी, के छुपते नही चढके चांद और जवानी” असे शब्द असलेले वर्मा मलिक यांचे गीतही या तरुणाईला चपखलपणे साथच देणारे. शेवटी त्याने किंचित काळ केलेले हमिंगही मस्तच. ही अशी गाणी ऐकली कि वाटतं टाईममशीनमध्ये बसून पुन्हा त्या काळात जावं आणि संगीताचा तो सुवर्णकाळ अनुभवावा.

अतुल ठाकुर

गाण्याचा विडियो येथे पाहायला मिळेल.
https://www.youtube.com/watch?v=w3qN49_nm7U

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गाणे आहे हे - ऐकायला. धन्यवाद याची आठवण करून दिल्याबद्दल. अधूनमधून कधीतरी ऐकले होते पण सलग कधी ऐकायला मिळाले नव्हते, आणि मग गेली अनेक वर्षे आठवलेच नाही.

मात्र कलाकारांचा अभिनय अगदीच नवखा आहे. तेव्हा राजेश खन्ना किंवा शशी कपूर ने मस्त काम केले असते या गाण्यात. हीरॉइनही अगदी वूडन आहे. ती पद्मिनी कपिलाच आहे का? क्लिप वर रिंकू जैस्वाल नाव आहे. भुताचा रोल करत असल्यासारखी बेड वरून उठून बाहेर येते Happy

भुताचा रोल करत असल्यासारखी बेड वरून उठून बाहेर येते
Happy Happy Happy

हिरो रझा मुराद आणि तरुणपणीचा किरणकुमार यांचे कॉम्बो आहे.
येस

अशा वेगळ्या गाण्यांवर लिहावंसं वाटतं. Happy

असंच दिल तो है दिल , दिलका ऐतबार क्या कीजे वर लिहा.......

अनुपम राखी , विनोद खन्ना आणि अमिताभ........

माझ्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी हे एक!

>> हे गाणे अनेकदा ऐकलेय पण कधीच पाहिले नाही +१

धन्यवाद!