हिंजवडी चावडी: मिटिंग बिटिंग

Submitted by mi_anu on 22 June, 2018 - 07:40

"अरे पण तू केली होती ना मीटिंग रुम बुक?"
"केली होती.पण ती पलीकडच्या टीम ची परदेशी बाई 2 आठवडे तिथे बसणार आहे बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन.सो दुसरीकडे जावं लागेल."
"पण मग तू त्याना बदली रुम नाही मागितली का?"
"आपण रूट कॉज अनलिसिस मध्ये टाकलं होतं ना त्यांनी इन्फ्रा सेटअप लवकर दिला नाही म्हणून टोयोटाचा इश्यू उशिरा गेला..तेव्हापासून ते लोक असेच करतात."

"पेराल तेच उगवते" "मध पाहिजे असेल तर मधमाश्याच्या पोळ्यावर लाथ मारू नका" वगैरे जुन्या म्हणी नव्याने मांजराच्या डोळ्यासमोर तरळल्या. अचानक त्याच्या शेजारचा दुसऱ्या टीम चा भिडू बाळंतपणाच्या 5 दिवसाच्या रजेवर गेल्याचं त्याला आठवून त्याने झटपट त्याची आज रिकामी असणार असलेली मीटिंग रूम गाठली.'छोट्या लढाया जिंका, युद्ध आपोआप जिंकले जाईल' वगैरे इंग्लिश म्हण मनात बनवत मांजर आणि त्याचा टीम रुपी कळप मीटिंग रुमात शिरला.

काचेच्या दाराबाहेरून एक फोनवर बोलणारा गगनभेदी आवाज जवळ जवळ येत होता.
"अगं गुटखा नाही, सातारी जर्दा मागायचा कडक.एकदम किक येईल असा द्या म्हणून सांगायचं.नाही नाही, मशेरी भाजलेली असते.ती नाही चालणार."
मांजर आणि त्याचे टीम मेट्स दचकून बाहेर बघायला लागले.
"हां, घेतला ना, 111 मिळाला का, तो बेस्ट.आता नीट मगभर पाण्यात मिसळायचा, आणि न्हाव्याकडे केसांवर पाणी मारायचा स्प्रे असतो ना त्या बाटलीत टाकून झाडावर मारायचा.सगळी कीड गायब."
मांजर आणि टीम मेट्स नी सुटकेचा निःश्वास टाकून परत एक्सेल मध्ये डोकी खुपसली.या आमच्या टीम मधल्या पर्यावरणवादी ताई.या कोणत्या वस्तूंचा कश्यासाठी उपयोग करतील सांगता येत नाही.मायक्रोवेव्ह ने कँसर होतो ऐकल्यावर यांनी आपल्या जपानी उच्चतंत्र मायक्रोवेव्ह चं बरण्या ठेवायचं शेल्फ बनवलंय.यांच्या घरात गेल्यास खापरात केलेली पोळी मातीच्या ताटात वाढलेली ट्रक च्या टायर ने बनलेल्या मोढ्यावर बसून तुम्हाला खायला मिळेल.काच पण नै.काच पर्यावरणात 400 वर्षं राहते.त्यामुळे ताई दुकानावर जाऊन कडक किक येणारा सातारी जर्दा आणतात ही मानसिक किक टीम ने सहजपणे पचवली.

"आपण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे.वेब सर्व्हिस लिहून काय कोणीही करेल.पण आपण यात मशीन लर्निंग इंटिग्रेट केले तर उद्या वेअरेबल डिव्हायसेस ला आपण बेस्ट प्रॉडक्ट असू."
गीक दादा म्हणाले.हे दादा रात्री 2 पर्यंत घरी वेगवेगळी ट्युटोरियल वाचतात.बस मध्ये कर्णयंत्र लावून लिंडा(या बाई खऱ्या नव्हेत,त्या एका अभ्यास आणि ऑनलाइन शिक्षण वेबसाईट चे नाव आहे) ची प्रवचने ऐकतात.हे कलियुगात असतात तेव्हा त्यांची कंपनी अजूनही त्रेता युगातल्या टेक्नॉलॉजी वापरत असते.त्यामुळे यात बदल घडवून आणण्यासाठी 'रामाने सोन्याचा हरीण आणायला जाताना कुटीच्या दरवाज्याला बायोमेट्रिक स्कॅनर व सीतेच्या नुपुरामध्ये gps ट्रॅकर लावून जावे' अशी व्यवस्था स्वतःच्या कामात ते नेहमीच करत असतात.पण त्यांच्या मांजराची सर्व वरची मांजरे रावण असल्याने त्यांना सीता पळवण्यात येणारे हे अडथळे मुळीच पसंत नसतात व ते 'त्रेता युगातील लक्ष्मणरेषा सध्या पुरे, तुझ्या आयडिया पुढच्या रिलीज ला वापरू' म्हणून गीक दादांना जमिनीवर आणतात.पण तरीही गीक दादा आपला अविरत अभ्यास चालूच ठेवतात.

"जरा विसावू या वळणावर" ताई वादळी वेगाने पर्स सहित आत शिरून खुर्चीत सांडल्या. ताईंना दीड वर्षाचे बाळ असल्याने आणि नवरा परदेशी असल्याने ताई बाळाचे आवरणे, सासू सासऱ्या साठी नाश्ता, जेवण,बाळाचे अमुक प्रमाणात तमुक व्हिटामिन, आयर्न,मॉलिब्डेनम आणि मेंडलेयेव्ह च्या सारणीतले सर्व धातू थोड्या थोड्या प्रमाणात देणारे भाजी पाला फळे फुले घातलेले बाळाचे 3 खाऊचे डबे बनवून येतात.घरी इतके केल्यावर ऑफिस हा औट घटकेचा जीवाला थंडावा वाटणे हे चकोर पक्ष्याला चंद्राचा आसरा वाटण्याइतकेच नैसर्गिक आहे.ताई नोकरी सोडून नवऱ्याघरी सातासमुद्री सुरक्षित पोहचण्याची वाट ऑफिसात आणि घरी सर्व चातकाप्रमाणे पाहत आहेत.

"सब मोह माया है" दादा चेहऱ्यावर मख्ख भाव आणून खुर्चीत मागे रेलून बसले होते.अमिताभ च्या 'सरकार' चे पोस्टर दादांना खुर्चीवर बसलेले पाहूनच सुचले अशी हापिसात वदंता आहे. हे दादा आधी मनुष्य प्राण्या प्रमाणे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षड्रिपू बाळगून उत्साहाने कामावर चिकटले होते.पण त्यांच्या पहिल्या पगारवाढीला कुंडलीत रिसेशनयोग, दुसऱ्या वाढीला कंपनी मर्जरयोग, तिसऱ्या वाढीला टीम बदल योग आडवा आल्याने दादा "सब मॅच फिक्स है, क्या हार क्या जीत सब झूठ और फरेब का रिमिक्स है" भाव चेहऱ्यावर आणून काहीही नवी योजना कानावर पडण्या पूर्वी "नाही वर्क करणार हे" म्हणायला तोंड उघडून तयार असतात.

या सर्व रत्नांना दरबारी बाळगणारा हा मांजर जुन्या पिक्चर मधील नूतन,निरुपा रॉय, आणि बाकी अनेक तत्ववादी शाळामास्तरांच्या पतिव्रता आणि इंटर्व्हल पूर्वी गोळी लागून मरणाऱ्या बायकांप्रमाणे अमेरिका, फ्रान्स आणि भारत अश्या 3 भूतलावरील साहेबांना सांभाळत कोंड्याचा मांडा करून टीम चा संसार काटकसरीने चालवत असतो.मांजराने फ्रान्स च्या भल्या सकाळी त्यांना फोन करून समजून घेऊन आपल्या टीम ला कळवळून पटवलेले काम आणि कामाची पद्धत आणि त्यानुसार झालेले अर्धा दिवस काम भारतातले लोक घरी गेल्यावर अमेरिकेच्या लोकांनी कॉफी चे घोट मारत मिटिंग घेऊन केलेल्या चर्चा आणि बदलांमुळे दुसऱ्या दिवशी 15% निकामी झालेले असते.असं अनेक वेळा झाल्यावर मांजराला सर्व देशी विदेशी साहेबमनांचा अंदाज येऊन तो दारी आल्या पाहुण्यांना कोडरूपी पॅटिस वाढताना आता ओट्यापाशी दुसऱ्या अप्रोच च्या अभ्यासरूपी शिऱ्याची कच्ची तयारी करून ठेवतो.

"आज पासून आपल्या टीम मध्ये अजाईल वापरणार आहोत आपण."
"अजाईल?" (पर्यावरणवादी ताई अजून त्यांच्या घरातल्या झाडांवर जर्दा मारण्यातून मानसिक दृष्ट्या बाहेर पडलेल्या नाहीत.)

"अजाईल.आता आपण वॉटरफॉल मॉडेल वापरतो.काम स्पेसिफिकेशन, प्लानिंग, डिझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टिंग, मेंटेनन्स अश्या पायऱ्यावरून धबधब्यासारखं खाली कोसळतं. ते आता पाणवठयावर 5 नळ सोडून पाच बादल्या भरायला ठेवायच्या आणि एकत्र भरून न्यायच्या." (मांजर सध्या तो घेत असलेल्या अनेक अजाईल सेशन्स मुळे डोक्यात साठलेले बुडबुडे साबणाच्या फुग्याप्रमाणे भराभरा सोडायला लागला.)
"आणि या धबधब्यात दर अपरेजल सायकल ला कोणीतरी घसरून पडून दात पाडून घेतं."('सब मोह माया है' दादा पर्यावरण वादी ताईंच्या कानात कुजबुजले.)

"मेल पाठवायची नाहीत.सगळं रोज 15 मिनिटाच्या स्टँड अप मिटिंग मध्ये तमाम करायचं." ('मेल पाठवायची नाहीत' या वाक्याला गीक दादा सरसावून बसले.एरवी ते दिवसभरात हापिसात जास्तीत जास्त पाच वाक्यं बोलतात आणि बाकी मजकूर शेवटी eom(एन्ड ऑफ मेल) येणाऱ्या रिकाम्या मेल मध्ये विषयात एक लांबलचक वाक्य लिहितात.)

"आपण बसून घेऊया स्टँड अप मिटिंग.मला जास्त उभं राहिलं की चक्कर येते." ('जरा विसाऊ या वळणावर' ताई घरी 'बाळ सांभाळ, खाणं सांभाळ, इनलॉ सांभाळ,बाळ सांभाळ' वाला गरबा खेळत असल्याने हापिसात त्या जास्त हालचाल करत नाहीत.दीड इंच हिल वाले फॉर्मल शूज घातले असले तर कँटीनपर्यंत पण नाही.)

"मेल पाठवायला नको का?बाकी अजाईल बिजाईल चालूदे पण मॉम(मिनिट ऑफ मिटिंग) मेल पाहिजेत.नंतर लोक 'तुला हे सांगितलं तू केलं नाहीस मी तोंडी बोललो होतो' म्हणून भलत्या गोष्टींवर फटके टाकतात." ('सब मोह माया है' दादांच्या मनावर जुन्या जखमांचे व्रण अजून ताजेच आहेत.आयुष्यात प्रत्येकाशी घडलेल्या प्रत्येक संभाषणाचा आपल्याकडे मोबाईल स्क्रीनशॉट/रेकॉर्ड/साक्षीदार/मेल/एक्सेल यापैकी एका स्वरूपात लेखी पुरावा असलाच पाहिजे अश्या सावध पवित्र्याने हे वावरत असतात.मागे एकदा बायकोने सकाळी लाजत गोड बातमी सांगितल्यावर यांनी 'मला एक मेल टाकून ठेव.आय विल गेट बॅक टु यु ऑन धिस बाय eod टुडे.' म्हटल्याने घरात झालेली खडाजंगी अजूनही अधून मधून त्यांना टाचण्या टोचायला वापरली जाते ही गोष्ट वेगळी.)

"आपण अजाईल ला थोडं बदलून घेऊ.सध्या आपण फक्त नवीन आलेलं काम अजाईल ने करू.ऐन वेळी येणारी मेंटेनन्स कामं वॉटरफॉल ने करू." (मांजर नेहमी प्रमाणे टीम मधले सगळे अडथळ्याचे दगड जवळ आणून सेतू बांधण्यात बिझी.)

"मी डेव्ह ऑप प्रॅक्टिसेस वापरून परवा एक प्रोग्राम लिहिला होता.सगळ्या टीम ला पाठवला होता.तुम्ही कोणीच पाहिला नाही का?" (गीक दादा एप्स च्या ग्रहावर आलेल्या एकट्या प्रगत मनुष्यप्राण्याच्या भावना मनात बाळगत म्हणाले.)

"अरे बाबा तुला कितीदा सांगितलं असे प्रोग्राम वगैरे मेल वर पाठवत जाऊ नको? तुला माहीत आहे ना आपल्याकडे आयपी राईट्स ची किती बोंब होते?आपण एका खूप मोठ्या महागाच्या गोष्टीवर काम करतो.आपली लायसन्स लोक एक कोटी मध्ये विकत घेतात.आपल्याला आपल्या डोक्यातून जन्मलेल्या आणि कॉम्प्युटर वर उतरलेल्या 2 ओळी पण कंपनी बाहेर नेण्याची परवानगी नाही.आणि तू प्रायव्हेट आयडी वरून मेल पाठवतोयस.उद्या कोणा कॉम्पिटेटर ला गेला म्हणजे?"
(मांजर प्रेमळ असले तरी अत्यंत नियम प्रेमी आहे.कोणतेही वळण नसलेला एक सरळ वन वे रस्ता पुढे वेडा वाकडा वळत असला तरी त्यावर इंडिकेटर दाखवुनच जायचं या सवयीनं त्याने मागच्या बऱ्याच चक्रधारींच्या शिव्या खाल्ल्या आहेत.नियम म्हणजे नियम.वळलं म्हणजे इंडिकेटर.)

"आपला भला मोठा कोड बेस, सर्व्हर, डॉक्युमेंट इतकं असून आपल्याच्याने आपला कोड रन करताना घाम फुटतो, शत्रू टीचक्या 15 लाईन घेऊन काय करणार?अश्या शत्रूला तर आपल्या कंपनीने स्वतःकडे ठेवलं पाहिजे." (पर्यावरण प्रेमी ताई दुसऱ्या ताईंच्या कानात खिदळल्या.)

बाहेर एक माणूस नाकाला आठ्या घालून घड्याळ बघतोय.गीक दादांनी बाहेर येऊन 'काय' विचारलं.
"मी मुंबई ऑफिसहून आलोय.या रूम चं बुकिंग त्याने मला दिलंय तो पॅटरनिटी लिव्ह वर आहे.मी घरी फोन करून त्याचं बुकिंग माझ्या नावावर घेतलंय."
मिटिंग रूम ची 'झोपडपट्टी पुनर्वसन पर्यायी घर योजना' प्रमाणे होणारी परस्पर सौदेबाजी बघून मांजर कळवळला.पण 'नियम म्हणजे नियम.' त्यामुळे सगळ्यांनी मिटिंग गुंडाळायला घेतली.

"बाकी स्टेटस एक्सेल मध्ये टाका.तू उद्यापासून स्टँड अप मिटिंग ला रूम बुक कर रे.सकाळी कितीचा पण स्लॉट चालेल.पण ही खोली मिळायलाच पायजे.इथून आवाज जात नाही."
नेहमी प्रमाणेच स्टेटस पासून बरेच सांधे बदलून मिटिंग संपली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय. पंचेस भारी आहेत.
नूतन,निरुपा रॉय, आणि बाकी अनेक तत्ववादी शाळामास्तरांच्या पतिव्रता आणि इंटर्व्हल पूर्वी गोळी लागून मरणाऱ्या बायकांप्रमाणे>>>> हा भारी आहे.

माझा रूम मेट पोहे असे बनवतो की उपमा बनतो. आम्ही त्याला पोह्याचा उपमा म्हणतो.
बिलकुल अंदाज नाही त्याला किती वेळ पोहे भिजवायचे याचा.

एकच नंबर!!
इतक्या सोप्या शब्दात अजाईल सांगीतलेत तुम्ही...मान गये!

सांगितलं खरं :):)
बरोबरच सांगितलं असा दावा आपण नाय करणार

फारच मस्त ! मीटिंग रूमच्या शोधात अक्खे ऑफिस तुडवायची वेळ येऊ शकते.. आणि रूमात बसूनही पदच्युत होण्याची वेळ येते पण कधी तरी. ! खूप काळ मांजर रोल मध्ये वावरल्यामुळे फारच आवडले. काटकसरीने संसार आणि कोंड्याचा मांडा सुद्धा !!

मस्त लिहिलंय.त्यातलं बरेचसं माहित नसूनही लिखाण आवडलं.
रामाने सोन्याचा हरीण आणायला जाताना कुटीच्या दरवाज्याला बायोमेट्रिक स्कॅनर व सीतेच्या नुपुरामध्ये gps ट्रॅकर लावून जावे' अशी व्यवस्था स्वतःच्या कामात ते नेहमीच करत असतात.पण त्यांच्या मांजराची सर्व वरची मांजरे रावण असल्याने त्यांना सीता पळवण्यात येणारे हे अडथळे मुळीच पसंत नसतात व ते 'त्रेता युगातील लक्ष्मणरेषा सध्या पुरे, तुझ्या आयडिया पुढच्या रिलीज ला वापरू' म्हणून गीक दादांना जमिनीवर आणतात. >>>>मस्त मस्त.

Pages