चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 April, 2018 - 00:13

काही दिवसांपूर्वी बहिणाबाईने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. त्याची पार्श्वभुमी माहीत असणेही तितकेच अत्यावश्यक असते. अन्यथा लेखन संदर्भहीन , भरकटत जाण्याची शक्यता बळावते. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे. त्यामुळे चित्रपट पाहणे मस्ट झाले.

नैनितालमधील एका सधन कुटुंबातील दोन बहिणी, कमला आणि मीना. कमला आपल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली असताना तिला धाकट्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते. कमला आपल्या पतीच्या अशोकच्या मदतीने मीनाचे तिच्या प्रियकराशी राजेंद्रशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेते. पण अ‍ॅज युज्वल द ग्रेटेस्ट ट्वीस्टमास्टर ऑफ द वर्ल्ड मिस्टर समय उर्फ काळमहाशय आपली खेळी करतात आणि कमलाचा मृत्यु होतो. बहिणीच्या लेकरांसाठी म्हणून मीना तिच्या नवर्‍याशी लग्न करायचा निर्णय घेते आणि करतेही. एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे राजेंद्र आणि मीना, मीनाच्या या एका निर्णयाने एकमेकाम्पासून दूर फेकले जातात. ज्यांनी एकमेकांना एकत्र जगण्या मरण्याची वचनं दिली होती, ते एकमेकांपासून वेगळे होतात. पण नियतीबाई इथे थांबत नाहीत...

एका वळणावर राजेंद्र, अशोक आणि मीना पुन्हा समोरासमोर येतात आणि नव्या द्वंद्वाला सुरुवात होते. काहीही कल्पना नसलेला सरळ, सुस्वभावी अशोक, प्रेयसीच्या अचानक, काहीही न सांगता निघून जाण्याने अंतर्यामी दुखावलेला, तरीही आहे ते, आहे तसे स्वीकारण्याचा तयार झालेला राजेंद्र आणि प्रियकराला समोर पाहताच अपराध भावनेने कोलमडून गेलेली मीना.

काय म्हणालात ? हो हो, अक्षय कुमार आणि करिनाचा बेवफा याच चित्रपटावरून प्रेरीत होता. Wink

तर राजेंद्र गायक आहे हे समजल्यावर रसिकमनाचा अशोक त्याला गाण्याची विनंती करतो. आणि साहिर नावाचा मनस्वी, शब्दांचा विलक्षण जादुगार महेंद्रभाईंच्या टोकदार आवाजाचा आसरा घेत थेट , अगदी ऐन शुन्य अंशापेक्षा कमी तपमानाच्या अवस्थेत सर्वांगाला बर्फाच्या सुया टोचाव्यात तसा विकल करत, आपल्या काळजावर मनस्वी बोचरे वार करत जातो.

रवीसाहेबांचं हलकं फुलकं तरीही विलक्षण अस्वस्थ करत काळीज चिरत जाणारं संगीत आणि त्यात महेंद्र कपूरने लावलेला टोकदार तरीही अतिशय हळवा, भावूक आवाज. महेंद्रभाईंच्या वाट्याला अशी नजाकतभरी, हळुवार गाणी तशी कमीच आली असतील. पण जेव्हा कधी संधी मिळाली त्यांनी तिचे सोने केलेले आहे. अतिशय ताकदीचा स्वर लाभलेले महेंद्रभाई, पण बॉलीवुडचे काही मोजके संगीतकार सोडले तर बहुतेकांनी त्यांच्या कलागुणांचा फारसा वापरच करून घेतलेला नाही असेच म्हणावे लागेल दुर्दैवाने. एक विलक्षण योगायोग म्हणजे महेंद्रभाईंनी आपल्या इथल्या करियरची सुरूवात सुद्धा साहिरच्या गीतापासून केलेली आहे. १९५३ साली आलेल्या ' मदमस्त ' या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेल्या 'आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया ' या त्यांच्या पहिल्या गीताचा गीतकार साहिरच होता. आणि गुमराहसाठी गायलेल्या साहिरच्याच या गाण्याने त्यांना त्यांचा दुसरा फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळवून दिला.

" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो "

किती विलक्षण आर्त, विकल अवस्था आहे. समोर जिच्यावर / ज्याच्यावर अतिशय जिवापाड प्रेम केले अशी व्यक्ती. पण प्रेम, गिले- शिकवे तर दूरच साधी ओळख दाखवणेही शक्य नाही. अश्या विलक्षण कुचंबणेत अडकलेले मीना आणि राजेंद्र...

" न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज़ नज़रों से

आयुष्य, प्राक्तन कधी-कधी अतिशय विचित्र अशी कोडी घालतं. तिथे सुटका नसते. त्यापासून दूरही पळता येत नाही आणि सहनही होत नाही. किती कठीण अवस्था असेल ती. किती जिवघेणी विकल अवस्था. तू माझ्यासाठी काही करावेस अशी कुठलीही अपेक्षा नाहीये. पण प्लीज ते तसं व्याकुळ नजरेने, जिवघेणे कटाक्ष टाकणे बंद कर बयो.

न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये मेरी बातों से
न ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से
चलो इक बार फिर से ... "

माझ्या काळजाची आर्त, विव्हल धडधड तुझ्यापर्यंत येणार नाही याची काळजी मी घेइन. तू पण तुझी वेदना तेवढी लपवता येते का पाहा. केवढी विलक्षण कुचंबणा? किती केविलवाणी धडपड , स्वतःलाच चुकवून स्वतःपासूनच दूर पळण्याची. हे फार क्लेशकारक असतं. आतल्याआत स्वतःशीच चाललेला हा झगडा, हे अंतर्द्वंद्व प्रत्येक माणुस कधीना कधी, कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्वतःशीच लढत असतोच. एखादाच साहिर अतिशय सार्थ आणि परिणामकारक शब्दात ही भावना मांडून जातो आणि आतवर कुठेतरी चाललेला तो संघर्ष क्षणार्धात सगळं उध्वस्त करून जातो.

तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से
मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं
मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माझी की - २
तुम्हारे साथ भी गुज़री हुई रातों के साये हैं
चलो इक बार फिर से ...

त्याला कल्पना आहे की ती बेवफा नाहीये, बेइमान नाहीये. पण नियतीच्या खेळापुढे दोघेही लाचार आहेत. कदाचित कुठेतरी समपर्ण कमी पडलेय का तिचे? आपलं सर्वस्व पणाला लावण्यात ती कमी पडलीय का? कदाचित त्याच्यातही काही दोष असतील . पण यापुढे काय्म एक बोचरी जाणिव की आता यापुढे कायम अनोळखी, तिर्‍हाईताचा मुखवटा लावुन जगणे आले. तिची असहाय्यता, मनातली आर्त खळबळ , एकत्र घालवलेले ते धुंद क्षण, त्या रात्री, दिवसेंदिवस गडद होत जाणार आहेत . त्या जीवघेण्या आठवणी सतत पाठलाग करणार आहेत ... अखेरपर्यंत

" तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से ... "

मला साहिर विलक्षण आवडतो. हा माणुस खुप छळतो मला, पण ...., वही दर्द है और वहीं मेरी दवाभी. तारूफ रोग बन जाए तो उसको भुलना बेहतर, ताल्लूक बोझ बन जाए तो उसको छोडना अच्छा" असं म्हणणारा साहीर कळतो खरा पण वळत मात्र नाही. त्यामुळे अशी कित्येक अनोळखी, हवीशी-नकोशी नाती, ओळखींचे ओझे डोक्यावर घेवून आपण जगत राहतो.

कुठे थांबायचं हे सुद्धा कळायला हवं, समजायला हवं. जेव्हा कुठेतरी गुंतलेलं मन आपल्यालाच आतून पोखरायला लागतं, जिवापाड जपलेलं एखादं नातंसुद्धा जेव्हा गळफास बनू पहातं. तेव्हा त्यातून मनस्तापा खेरीज काहीच मिळणार नाही हे पक्कं होवून जातं. अश्या वेळी ते नातं तोडणं हाच उत्तम आणि योग्य पर्याय असतो. ज्या कथेचा, नात्याचा शेवट आपल्याला हवा तसा होणार नाहीये, त्यातुन सगळ्यांच्याच वाट्याला फक्त दु:ख आणि वेदनाच येणार आहे हे जेव्हा कळुन चुकते तेव्हा त्या , त्या नात्यासाठी दिशाहीन , भरकटत जाण्यापेक्षा आपणच दिशा बदलावी आणि या आयुष्याला छानसे सुरेख वळण द्यावे . जगण्याचा प्रवास नव्याने सुरु करावा हेच उत्तम.

मला साहिर आवडतो कारण साहिर जगण्याला एक विलक्षण सकारात्मक अशी दिशा दाखवत राहतो. त्याच्या लहानपणी जे त्याने भोगलय. विक्षिप्त वडील, कायम बापाच्या अत्याचाराला बळी पडलेली आई आणि अश्या परिस्थीतीत लहानाचा मोठा झालेला साहिर त्याच्या मनात एकुण आयुष्याबद्दलच कटुतेची भावना निर्माण झाली असती तरी काही वाटले नसते. पण आयुष्यभर अनेक वाईट अनुभव घेत मोठा झालेला साहिर सगळी कटुता बाजूला ठेवून जगंण्याच्या सकारात्मकतेवर भाष्य करतो. जगण्यातल्या आनंद, त्याची सार्थकता दाखवून देतो तेव्हा तो अधिकाधिक जवळचा वाटायला लागतो..

हम कहतें है ये जग अपना है, तुम कहतें हो झुठा सपना है
हम जनम बीताकर जायेंगे, तुम जनम गवांकर जाओगे

साहीर ने लिहिलेल्या या ओळी जीवनाचा अर्थ परत एकदा नव्याने सांगतात.

त्रासदायक होणार्‍या एखाद्या नात्यात गुंतून न पडता त्याकडे त्रयस्थ ज्ञजरेने पाहात त्यापासून दूर होता आलं पाहीजे. जगण्याचा प्रवास कुणासाठी थांबत नाही आणि तो थांबूही नये. फार जड होतेय, थकल्यासारखे वाटतेय असे वाटले की सरळ कात बदलून रिकामे व्हावे. मनात कसलीही खंत, कसलेही किल्मिश न बाळगता त्या जुना कातीकडे, नात्याकडे त्रयस्थपणे , नव्या औत्सुक्याने पाहात पुढल्या प्रवासाला लागणे हेच उत्तम.

स्वतःच्याच मनाला अगदी आपलेपणाने, खंत न बाळगता सांगता आले पाहीजे की....

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ...

काय , जमेल ना?

चित्रपट / Film: Gumraah
संगीतकार / Music Director: Ravi
गीतकार / Lyricist: साहिर-(Sahir)
गायक / Singer(s): महेन्द्र कपूर-(Mahendra Kapoor)

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहीर च्या गाण्यावर विशालचा लेख म्हणजे दुग्धशर्करा योग ! त्यामुळे अधाशासारखा वाचून काढला आणि रवंथ पण करून झाला. आवडला अर्थातच पण फार काही नविन मिळालं नाही रे ! लिहीता लिहीता अचानक कंटाळा आल्यासारखा आटपलास असं वाटलं.

दादा, तुमच्यासाठी नंतर सविस्तर लिहीन. हा लेख एका वृत्तपत्रासाठी लिहीला आहे. शब्दमर्यादा असल्याने गाण्याच्या रसग्रहणापुरता मर्यादीत ठेवावा लागला. क्षमस्व !