जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_4

Submitted by अन्नू on 2 April, 2018 - 11:31

तशी मी कोणतीही गोष्ट जर ती- तितकीच महत्त्वाची नसली तर, लक्षात ठेवत नाही. त्यावेळीही मिसने सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरुन गेलो होतो. पण ती विसरली नव्हती.
रात्री तर रात्रीच.
बरोबर आठच्या सुमारास फोनची रिंग वाजली. घरच्यांनी फोन उचलला तर पलिकडून- एका मुलीकडून माझी चौकशी करण्यात आली. आश्चर्य आणि धक्का काय असतं हे एकाच वेळी आमच्या घरच्यांच्या चेहर्‍यावर दिसून आलं (हे मुलींच्या घरी होतं ना? छे! आमच्याइथची गणितच वेगळी आहेत!)

‘माझ्यासाठी एका मुलीचा फोन- तोही इतक्या रात्रीचा??’ नसत्या शंका कुशंकांनी वातावरण ढवळून निघत असतानाच कोणीतरी मला बेडरुममध्ये फोन आणून दिला.

“हॅलो..” झोपेत डिस्टर्ब केल्याने मी जरा वैतागतच बोललो. (हो- आठला मी झोपेतच असायचो. बाहेर जायचा जाम कंटाळा यायचा म्हणून मी आठ ते नऊ या वेळेत छान ‘डुलकी’ काढून घ्यायचो)

“प्रणित का?” मुलगी?? खाडकन् माझी झोप उडाली. कोण ही? माझं नाव कसं विचारतीय?

“हो!....” मी दबकत उद्गरलो

“मी वृषाली पाटील” माझ्या डोक्यात आणखीनच कालवाकालव. माझी अवस्था ओळखून तीच पुढे म्हणाली-

“मराठी मिसने मला तुमचा नंबर दिला होता. तुम्ही ठाण्याला जाणार आहात ना!” डोक्यात पटकन लाईट पेटली.

‘अच्छा ती कॉम्पिटीशनवाली वृषाली!’

“हो, हा-हा” मी गडबडत उद्गरलो.

“मग उद्या आपण भेटायचं का? म्हणजे जायचं प्लॅनिंग करायला”

“हो” मी बावळटासारखा सूर ओढत मान डोलावली

“कुठे भेटायचं?”

“स्टाफरुममध्ये?”

“नको!” ती ताबडतोब ते ठिकाण बाद करत म्हणाली,

“शिक्षकांच्या तिथे कशाला, बाहेरच भेटू” यावेळी ती जरा अवघडल्यासारखी वाटली.

“लायब्रेरीत?”

“तिथे खुप मुलं असतात”

“मग, लायब्रेरीच्या बाहेर उभं राहू का? पुस्तकं घेतात ना- त्या विंडोजवळ?”

“अं.. चालेल, किती वाजता येणार?”

“कॉलेज सुटल्यावर- साडेदहाला”

“अहो- आमचं कॉलेज दुपारचं असतं! इतक्या लवकर कसं येऊ मी? अकराला आले तर चालेल का?”

“हो चालेल की. या अकराला. मी थांबतो तिथे” पुन्हा मी बावळटासारखा काहीतरी अर्धवट बरळलो.

“हो पण- मी ओळखणार कशी तुंम्हाला?” शेवटी तिनेच अडचण बोलून दाखवली.

अरे-हो! हे तर लक्षातच आलं नाही. ना मी तीला बघितलं- ना तीनं मला बघितलं. ओळखणार कसं?

“माझ्या हातात आयडी असेल!” मुर्खपणाचा कळस म्हणतात तो हाच का! कॉलेज म्हटलं की हरेक विद्यार्थ्याकडे आयडी असणार, मग इतक्या मुलात मलाच कसं ओळखणार ती? की जीवन गौरव पुरस्कार दिल्यासारखं कॉलेजनं मलाच तेवढं नवलाचं आयडी बहाल करुन सन्मानित केलं होतं?
पण माझ्या भाबड्या उत्तराने तिला हसू फुटलं. मलाही माझ्या बावळटपणावर हसायला आले.

“राहू द्या. मी येते अकराला, तुम्ही लायब्रेरीजवळ- तिथेच थांबा”

अरे देवा! पहिल्याच मिटींगला हि अवस्था? काय विचार करत असेल ती आपल्याबद्दल काय माहीत! डोकं खाजवत मी फोन ठेवला आणि त्यावेळी मला जाणवलं-

घरचे एकूण एक जण माझ्याकडे टक लावून रोखून बघत होते!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++

“तो ये.. भांगडा है?!!” मी हताशपणे तीच्याकडे बघितलं आणि मला खरोखरंच तिला खुर्चीसकट उचलून आपटावसं वाटलं!!

मघापासून सांगतोय बये- ‘हा महाराष्ट्रीयन डान्स आहे. तो मराठ्यांत फेमस आहे’ आता ते सांगताना, फक्त उदाहरण म्हणून मी पंजाबी भांगड्याचं नाव घेतलं- तर काय याला भांगडा म्हणायचं!!??

मला उगीच चापूनचोपून नऊवारी घातलेल्या बायका हातात भला मोठा लस्सीचा ग्लास घेऊन घोट घोट घेत-

‘हैय..’ ढिंक टाका- ढिंक टाका- करत एक पाय उडवून पुढचीच्या पायात अडकवत नाचत असल्याचं महाभयंकर दृश्य दिसलं आणि मी शहारुन गेलो!

“नैय नैय- ये..” च्यायला ह्या मराठमोळ्या शब्दाला हिंदीत काय म्हणतात? विचार करत असतनाच मी हिंदी-मराठीच्या धरुन एकसाथ चिंध्या केल्या!

“मराठमोला डान्स है!”

तीनं न समजून माझ्याकडे बघितलं. मोडक्या गाडीच्या बोनट सारखं तोंड केलं.

“ये मराट... मोला(!) क्या होता है?”

बोंबला! आता काय सांगायचं?

“वो सिर्फ मराठीही होता है!” हाण तिच्यायला हिंदीं!

“लेकीन होता क्या है ये?”

“अं.. साऊथ में कथ्थक पता है? वो सांस्कृतिक डान्स करते है- ऐसे ऐसे करके...” मी उगीच मला समजत असल्यासारखं हात उडवत म्हणालो. यावेळी बयेची चांगलीच करमणुक होऊन- ती गुदगुल्या झाल्यासारखी खुदूखुदू हसायला लागली.

“हं..हं..”

“वैसे ये, मराठी में करते है- डान्स!” हुश्श.... वाचलो बाबा!

“अच्छा.. तो ये कथ्थक कर रही है!”

“कथ्थक नही, लावणी”

“लाव-... क्या?”

“ला- व- णी?(!!)”

“ला-व..” छोट्या बाळानं मोठ्या माणसांच्या तोंडाकडे बघत एखाद्या अवघड शब्दाचे उच्चार हळुहळू अनुकरण करत बोलावे, तसे ती माझ्या ओठाकडे बघत एक एक शब्द उच्चारु लागली.

“णी”

“न्यी(!!)”

“ह!”

“लाव.. न्यी!... मतलब?” फॉट्टकन् फुगा फुटावा असा मी तिच्याकडे बघायला लागलो. परत फिरुन तेच!!!

“हिंदीं में क्या बोलते है इसे?” आता तर पार भंजाळून गेलो मी. लावणीला हिंदीपण लावणीच म्हणणार ना- का दुसरं काय म्हणणार!!

माझी मनस्थिती समजून ती दुसर्‍या विषयाकडं वळली-

“अच्छा-अच्छा तो ये आदमी..” म्हणत ती परत माझ्या पुढ्यात- पोस्टरवर झुकली आणि मला कससंच व्हायला लागलं.

अगं, ए बये ओळख ना पाळख तू मला खेटून बसलीस इथपर्यंत ठिक. पण वेळीअवेळी अशी माझ्या तोंडाजवळ झुकून पोस्टर काय बघतेस? तुझे केस माझ्या तोंडाजवळच...
तो रोमँटीकपणा गेला खड्ड्यात!
इथे तुझे केस माझ्या तोंडावर वळवळताहेत ते अगोदर बघ.
त्या झाडूच्या शेंड्यासारख्या केसांनी माझ्या तोंडावर अन् मानेवर खाज सुटायला लागलेय.

हायला! हे केस म्हटलं की प्रत्येक पोरीला तिचे केस रेशम मुलायम वाटायलाच पाहिजे का?- कि प्रत्येक मुलाच्या तोंडावर असं पसरवायला!

“..बजा क्या है?” तुतारीवर बोट ठेवत तीनं विचारलं-

“प्रणित?”

मध्येच डोकं खुपसत कोणीतरी मला मागून आवाज दिला आणि त्या ब्रम्हसंकटातून माझी सुटका केली!
मी मागे वळलो. बाजुची हीरोईनही मागे बघत माझ्यापासून जरा बाजुला सरकली.

“प्रणितच ना?”

तीनं पुन्हा एकदा विचारलं

“हो?!!”

“हाय- मी वृषाली आणि ही माझी मैत्रीण विनिता”

मी तिच्याकडे बघितलं उगीच डोक्यात ‘ही दोस्ती तुटायची नाय’ च्या लिरिक्स वाजु लागल्या.
छे!
मी डोकं झिडकारलं. परत दोघिंकडे प्रश्नार्थकपणे बघितलं

“रात्री फोन केलेला?- कॉम्पिटीशनसाठी?” माझ्या डोक्यात लेट लाईट पेटली. (ह्या लेट करंटच कनेक्शन कधी नीट होणार काय माहीत!)

“ओह, हा!”

“मग? जायचंय ना ठाण्याला”

“मग काय!” मी अनाहूतपणे उद्गरलो.

ती मनापासून हसली.

मुलगी अस्सल मराठमोळी होती. आणि मुख्य म्हणजे मराठी असूनही ती इतर टीपिकल मुलींसारखी मिळमिळीत नव्हती. चांगला जिन्स लूझर घालणारी मॉडर्न मुलगी होती. बोला-चालायला खमकी होती.

वा! हिच्याबरोबर ठाण्याला जायला मजा येईल. काही अवघडलेपणा तरी राहणार नाही.

“पण तुम्ही ओळखलं कसं काय मला, मीच आहे म्हणून?” मध्येच माझ्या डोक्यात आश्चर्ययुक्त गोंधळ दाटला.

“मराठीच्या मिस’ना विचारलं तर त्या बोलल्या, आत्ताच लायब्रेरित गेलाय- मी त्याला ‘मराठी वाड़:मय मंडळाचं’ पोस्टर तयार करण्याचं काम दिलंय. इथं येऊन बघितलं तर तूच एकटा पोस्टर तयार करताना दिसलास!” किती सहज उत्तर?

“हेच का ते पोस्टर” म्हणत तीनं पुर्ण पोस्टरभर भारावल्यासारखी नजर फिरवली.

“वॉव!! मस्तच रे- ड्रॉईंग छान आहे तुझं” मला उगीच लाजल्यासारखं झालं.
इतक्यात बाजुचीनं ती मराठी असल्याचं बघून झटक्यात तीच्यावर झेप घेतली!- (ही मागच्या जन्मी भूत बीत होती की काय?)

“महाराष्ट्रीयन हो?”

“हा”

“तो ये बताव नं, ये क्या है?” पदर वर धरुन ठेका देणार्‍या स्त्रीकडे बोट करत तीनं विचारलं.

“डान्स!”

“नही मतलब कौस सा- जैसे हम में- हिप हॉप होता है, झाज होता है, ब्रेक डान्स होता है, बॅलेट होता है- वैसे ये क्या है?”

“ये तो कल्चरल डान्स है। क्या बोलते है उसे- हा! फोल्क डान्स!”

“ओह! हा..” हेच भवाने मी शुद्ध हिंदीत सांगत होतो तेव्हा समजलं नाही आणि आता ‘ओह हा’ का?

“तो इसे हिंदी में क्या बोलते है?”

“हिंदी में?” वृषालीही जरा गोंधळली-

“मराठी में तो हम सब इसे ‘लावणी’ ही कहते है” तीनं विचार करत उत्तर दिलं.

“वो पता है, लेकीन हिंदी! हिंदी क्या बोलते है?”

“हिंदी में? नही... हिंदी में तो पता नही.. शायद...” तिघिंच्या या अगाध ज्ञान आणि त्याच्यावर चाललेल्या गंभीर चर्चेकडे बघून मला जाम हसू येत होतं.

मनात म्हणत होतो, ‘महामायांनो- ‘लावणी’ हे त्या डान्सच नाव आहे तर- कोणत्याही भाषेत त्याला तेच म्हणणार ना? कि प्रत्येक भाषेनुसार ते नाव बदलत जाणार?’

इतक्यात त्याचंही या विषयावर एकमत झालं असावं- एखादं विधेयक सर्वसंमतीने पास व्हावं तसं तिघी डुलू डुलू माना डोलवायला लागल्या. वृषाली म्हणाली-

“हा.. बराबर है- हिंदी हो या मराठी, नाम तो वही रहेगा” म्हटलं, ‘धन्य हो बायांनो!! इथं भेटलात वर तरी भेटू नका!’
+++++++++++++++++++++++++++++++

एसएनडीटी- म्हणजे खास मुलींचं कॉलेज. हे मला तिथं गेल्यावर उमजलं. त्यातही वृषाली आणि माझं कॉम्पीटीशन ऐन वेळी कॅन्सल करुन मॅनेजमेंटने आमची चांगली फजिती केली होती. वृषालीच्या मैत्रिणीचं सिंगिंग तेवढं चालू होतं. त्यामुळे ती जायला निघाली. जाताना वृषालीनं आपल्या ‘सखी’ची चांगली गळाभेट वगैरे घेऊन तीला बेस्ट विश केलं. ती गेल्यावर आम्ही कॉलेजच्या आत एका बाजुला लावलेल्या बेंचवर बसलो. समोर काही कार्यक्रम चालू होते.

“आपण फिरुन येऊया का- बघू अजुन कायकाय आहे” आजुबाजुच्या उल्हासित वातावरणाकडे बघत मी जरा एक्साईट होत विचारलं.

“नको रे- मला खुप कंटाळा आलाय. बस इथेच!” (एखाद्याचा विचका कसा करायचा हे या सैतानी कडून शिकावं!)

तीच्या उत्तराने मीही हिरमुसला झालो. तीची मर्जी नाही तर आपण तरी फोर्स का करावा? आणि तिला एकट्याने सोडून जाणं- तेही शोभण्यासारखं दिसलं नसतं. शेवटी मनाचा हिय्या करत मी तिच्या बाजुला बसलो.

“ए चल- वरुन येऊया!” मध्येच बॅग उचलत ती उत्साहात म्हणाली,

“मस्तपैकी विनीचं सिंगिंग बघू- मजा येईल!” डोक्कं फ़ोडावं असल्या मुलीसमोर!
मघापासून काय हिब्रुमध्ये सांगत होतो हीला? इथं धूळ खात्या टेबलावर बसून बोअर होण्यापेक्षा चल म्हणालो तर नाही म्हणाली आणि आता?

राग आवरत मी तिच्या मागे चालू लागलो.

तिच्या सखीला शोधत आम्ही पहिला माळा पालथा घातला. शेवटी दुसर्‍या माळ्यावरच्या, टोकाला असलेल्या एका क्लासरुममध्ये तिची सखी आढळली. पलिकडच्या बाजुला पार मागच्या बाजुला ती बसलेली होती. तीच्या आजुबाजुला पाच जणी चिकटल्या होत्या. त्यांच्यात काहीतरी गॉसिप चालू झालं होतं.

मनात म्हटलं, ‘हायला या मुली म्हणजे छत्रपतीच असतात. एक मिनिटही हीला वर येऊन झाला नसेल, पण एवढ्यात हीनं- स्वत:चा कंपुही तयार केला?!!!

स्टेजवर एक मुलगी नुसतीच गुणू-गुणू गुणगुणत होती. चोरट्या पावलांनी आंम्ही आत डोकावलं. तीनेही पुढे होत अगोदर मान उंचावून आत बसलेल्या कॉम्पिटीटर्सवरुन नजर फिरवली.

“तीचा नंबर यायचा आहे रे- असं वाटतंय तीचा नंबर यायला खुप उशीर लागेल” आत बघत ती हताश स्वरात पुटपुटली.

“चल मग आत-” मी क्लासमध्ये जायला लागलो तोच तिने माझ्या शर्टाच्या बाहीला धरुन जोरात मागे खेचलं!

“शूक्!- आत नको!” हळू आवाजात तीनं मला दटावलं

“कंटाळा यायला कशाला जातोस? त्यापेक्षा दुसरीकडे जाऊ, चल!”

मघापासून जिच्यासाठी तंगडतोड करत इथपर्यंत आली, त्याच मैत्रिणीच्या सिंगींगला जायला ती आता नकार देत होती..?
मी तोंडाचा आ वासून तिच्याकडे बघतच बसलो.
++++++++++++++++++++

एका मुलीबरोबर- एकट्याने- तेही संपुर्ण दिवस स्पेंड करायला भेटला- म्हटल्यावर तुमच्या मनात काय-काय विचार आले असतील त्याची मला कल्पना आहे. पण खरं सांगायचं तर, आमच्या बाबतीत पटणं हा शब्दच मुळात (बस्तान) ऊठणं असा येत असेल तर त्याला मी तरी काय करणार!
हो. खरंय हे!

दिवसभर! ती वृषाली नामक चेटकीण माझ्याबरोबर वावरत होती. वावरत कसली पिडत होती. छळायची एक संधी सोडत नव्हती! अट्रॅक्शन वगैरे खुप लांबच्या गोष्टी, पण साधं बोलायला लागली तरी काहीतरी वडा करुन ठेवायची!

इतर वेळी मुलं मुलींची टर खेचतात पण इथं ती माझी खेचत होती आणि तीची सखी तिला साथ देत जोरजोरात खिदळत होती!

नंतर, स्टॉप जवळ पोहोचल्यावर तर म्हणे- ‘माझे बाबाच येणार होते आमच्याबरोबर- उगीच कशाला कुठल्यापण अननोन मुलावर विश्वास ठेवायचा?’
अरे? मग मी काय आमंत्रण दिलं होतं का, की- ये बये माझ्याबरोबर! की मला हौस होती म्हणून दोघींना बरोबर घेतलं? (छे! कित्ती सेलफिश असतात या मुली?)
असं होतं तर बाबांनाच बरोबर आणायचं ना. मधल्या मध्ये मला का बकरा बनवायचा?

अस्सं डोकं पिकवलं त्या वृषडीनं की शेवटी असल्या मुलींसाठी जराही जिव्हाळा दाखवायचा नाही असं मी ठामपणे ठरवून टाकलं. आणि तिथेच आमच्या यादवीला सुरवात झाली!

शेवटी-शेवटी सकाळी एक्साईट मध्ये गेलेलो आम्ही मुक्कामाला पोहोचेपर्यंत बॉयज व्हर्सेस गर्लस अशा विरुद्ध पार्टीच्या महाभयंकर आणि कट्टर शत्रूपक्षात मोडलो गेलो होतो!
एकदाचं त्यांना स्टॉपवर सोडून मी जबाबदारीतून मोकळा झालो आणि दिवसभराचा थकून भागून घरी आलो...

आजच्यानंतर मुली हा विषय माझ्यासाठी कायमचा संपला होता.
आणि मुली मुलांमध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाहीत याची खात्रीही पटली होती.

दॅट्स ऑल!!!
==============================================================
क्रमश:

भाग=>> 5

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलंय हे पण. सहज लिहिल्यासरखं पण मजा येते वाचताना.
कॉलेजच्या दिवसांची आठ्वण येते.
<<<<साधं बोलायला लागली तरी काहीतरी वडा करुन ठेवायची!>>> इथे फिस्स करुन हसु आलं. Lol

आजच्यानंतर मुली हा विषय माझ्यासाठी कायमचा संपला होता.>>> आणि तरीही क्रमशः आहे का? Lol