फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - ऋषिकेशला परत..

Submitted by साधना on 13 February, 2018 - 09:42

मागचा भाग :
https://www.maayboli.com/node/65219

जोशीमठावरून बद्रीनाथला ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने आता परत निघालो. अर्ध्या तासात दरडीच्या जागी पोहोचलो. गाडीतून उतरून समोर पाहिले तर रस्ता गायब.. तिथे दगडमातीचे डोंगर पसरलेले. माती उचलणारे जेसीबी होते, काम सुरू होत होते.

सामान गाडीतून काढून घेतल्यावर ते उचलून नेण्यासाठी पोर्टर आले. तेवढाच त्यांना धंदा. आम्हाला भेटला तो पोर्टर म्हातारा होता, त्याला सामान द्यायला मला जीवावर आले होते.
पण दिले नाही तर त्याचे पोट भरणार नाही आणि आम्हाला उचलवणारही नाही अशी द्विधा परिस्थिती. त्यामुळे निमूट सामान देऊन चालू लागलो. जायचे कुठून त्याचा पत्ताच नव्हता.

वो देखो, लोग जा रहे है, वहासे जानेका। तो म्हणाला.

त्याने दाखवल्या दिशेने रस्त्याच्या बाजूला एक पायवाट वर जात होती. थोडी वर जाऊन ती दरडीच्या दिशेने वळली होती. आम्ही होतो तिथून फारसे उंच नव्हते, तीसेक फूट असेल फारतर. तिथवर जायचे, मग तिथून दरडीला समांतर रस्ता असेल, त्यावरून चालत गेलो की येईल त्या बाजूचा रस्ता. फारतर दहावीस मिनिटात पोचू त्या बाजूला असा विचार करून मी चालायला सुरुवात केली.

वर जाण्यासाठी पायऱ्या व धरण्यासाठी एका बाजूला लोखंडी आधार अशी व्यवस्थित तयारी करून पायवाट दगडात बांधली होती. म्हणजे हा रस्ता आता दरड कोसळल्यावर तयार झाला नव्हता तर वर डोंगरावरून खाली यायचा नेहमीच्या वापरातील रस्ता होता हे चढताना लक्षात आले.

पायऱ्या चढून गेल्यावर तशीच दगडी पायवाट पुढे जात होती. त्यावर बऱ्यापैकी रहदारी होती. सकाळचे सात साडेसात वाजले होते. शाळेच्या गणवेशातली मुले होती, स्वेटर घातलेल्या स्त्रिया होत्या. सामान घेऊन जाणारे पुरुष होते व त्यांच्यात आम्ही. आमचा दुसरा ग्रुपही सोबत होता. सगळे मागे पुढे चालत होते. रात्री पाऊस पडून गेल्याच्या खुणा होत्या पण आता मात्र कोवळे ऊन पडले होते.

दरडीकडे जाणारे वळण मागे पडल्यावर मागचे दिसायचे बंद झाले. आता दोन्ही बाजूला फक्त झाडी व पायवाटेवर चालणारे लोक इतकेच राहिले. चालता चालता समोर पाहिले तर पायाखालची वाट चक्क साठ डिग्रीचा अंश करून वर निघालेली. माझ्या पायाखालची जमीन सरकतेय की काय असे क्षणभर वाटले. आमचा ग्रुपलिडर महेश लक्ष ठेऊन होता सगळ्यांवर.

त्याला विचारले, ही वाट कुठे जातेय? आपण कसे जाणार? तो शांतपणे म्हणाला, मॅडम, ट्रेक अजून संपला नाही. ही वाट अशीच वर जाणार. ह्या डोंगराच्या वर टोकाला एक गाव आहे, आपण तिथवर चढून जाणार. गावातून खाली उतरायचा रस्ता आहे. तिथून खाली उतरलो की गेलो पलीकडे.

मला काय बोलायचे सुचेना. मी हतबुद्ध होऊन त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले.

मॅडम, सह्याद्रीतले ट्रेक्स केलेत ना तुम्ही? मग करा सुरवात चालायला.

काय बोलणार आता. मी असे कितीसे केलेत सह्याद्रीतले ट्रेक्स? आमची पारसिक टेकडीच माझे कळसुबाई. पण आता बोलण्यात शक्ती घालवून काही उपयोग नव्हता. काल बिछान्यात पडून राहिले ते बरे केले म्हणत चालायला सुरुवात केली.

हा रस्ता त्या वरच्या गाववाल्यांसाठी होता बहुतेक. नागमोडी वळणे घेत वर जात असला तरी बरेच ठिकाणी खूप कच्चा होता. फक्त काही ठिकाणी दगड टाकून पक्का केला होता. गेले तीन दिवस आम्ही चालत असलो तरी ते रस्ते याच्यापेक्षा चांगले होते. दिवसभर रस्ते साफ केले जात होते. इथे चिखल, पाणी, दगड, धोंडे, शेण.. हरे राम!!

माझा अंत पाहणारा चढ मी अगदी हळू हळू चढायला सुरवात केली. सतत धाप लागत होती. मुलीही सोबत होत्या. त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. मलाच सगळे प्रॉब्लेम्स घेरायला आले होते. शेवटी वैतागून प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष केले व आजूबाजूला लक्ष द्यायला लागले.

इतका सकारात्मक निसर्ग व इतके आशावादी लोक परत भेटले तर इथे डोंगरातच भेटतील, शहरी लोक सदा वैतागलेले असतात हा अनुभव परत एकदा आला Happy

परत चालायचे म्हणून मी वैतागले होते पण आजूबाजूच्या जनतेला हे रोजचेच होते. खाली दरड कोसळून रस्ता बंद झालाय याचे त्यांना काहीही वाटत नव्हते कारण त्यांच्यासाठी डोंगर चढउतार रोजचाच होता, दरड कोसळो अगर राहो. खाली जायला गाडी रस्ता असा नव्हताच. इमरजन्सी खाली जायचे तर घोडे व पिट्टू. अन्यथा पायी जायचे हेच आयुष्य. कुणाला मेडिकल इमरजन्सी आली तर? पण असले प्रश्न फक्त आपल्या डोक्यात गर्दी करतात. तिथे हिमालयात जशी परिस्थिती उद्भवेल तसे लोक उपाय करतात, आपल्यासारखे उद्याचे मरण आज चिंतुन डोके फिरवून घेत नाहीत. लोकांचे रोजचे व्यवहार नेहमीसारखे चालू होते.

वर चढताना पाहिले की जिथे जागा मिळेल तिथे काही ना काही पेरलेले दिसत होते. बहुतेक ठिकाणी धान्यात मका, भाज्यांत राजगिरा, कोबी, फ्लॉवर वगैरे लावले होते. जागा किती असावी? दोन्ही बाजूच्या जंगलात जरा सपाट असलेली जागा मिळाली की ती साफ करून त्यात शेती. उपलब्ध जागा जेमतेम 10 बाय 12 फुटाच्या आसपास. जितकी उपलब्ध होईल तितकी घ्यायची व पेरायचे. लोकांनी होत्या परिस्थितीत स्वतःची सोय करून घेतली होती.

मला चढ खूप जड जात होता. जितके चढतेय तितकेच उतरायचे हे माहीत असल्यामुळे उतरणसुद्धा तितकीच जड जाणार याचा अंदाज आलेला, मानसिक तयारी होत होती, पर्यायच नव्हता.

पण या निमित्ताने इथे यायचे तर फिटनेस किती महत्वाचा आहे याची परत एकदा नव्याने जाणीव झाली. आजचा ट्रेक पूर्णपणे अनपेक्षित होता. तरी आम्ही ट्रेकच्या नावाखाली आलो होतो. भरपूर चालायचे आहे हे माहीत होते. पण जे धार्मिक यात्रा म्हणून येतात, तेही साठी उलटल्यावर, त्यांचे अशा वेळी काय होत असेल? असे अस्मानी संकट ओढवले तर काय तोंड देणार याला? मी तर म्हणेन की चारधाम यात्रा करायची असेल तर ती जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर करा, अंगात ताकद आहे तोवर. अनपेक्षित संकटे आली की यात्रेचा आनंद संपतो व नसता त्रास मागे लागतो.

डोंगर पूर्ण चढून गेल्यावर गाव आले. फारतर तीस चाळीस घरे असतील. पण नीटनेटके, स्वच्छ गाव. दगडी लाद्यांनी बांधून काढलेला रस्ता पूर्ण गावातून फिरवला होता. बहुतेक सगळी घरे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागून होती. गावातून जात असताना वाटेत शौचालये बांधलेली दिसली. काही सार्वजनिक असावीत. आमच्या ग्रुपमधल्या एकाने एक वापरूनही पाहिले Happy नळाने पाण्याची सोय, गावात वीज वगैरे सगळे होते. शाळा गावात होती की खाली ते कळले नाही पण शाळेची मुले ये-जा करताना वाटेत भेटत होती. एकूण इतके वर उंचावर असूनही मला वाटले होते तसे गाव मागास वगैरे काही नव्हते. नीटनेटके लोक, नीटनेटके खेडे.

गावातून बाहेर पडून खाली उतरणीला लागलो. उतरणीचा रस्ता तितकासा चांगला नव्हता. आम्ही चढून आलो तो रस्ता बहुतेक जास्त वापरात होता, त्या बाजूला जवळच बद्रीनाथ होते, जिथे सगळ्या सोयी होत्या. या बाजूला गोविंदघाट, जिथे फारशा सोयी नाहीत. त्यामुळे बहुधा हा रस्ता फारसा वापरात नव्हता.

रस्ता ठिकठिकाणी अरुंद होता व मोठे दगड, शिळानी भरलेला होता. त्यात माती ओलसर, त्यामुळे पाय ठेवताच ढासळते की काय अशी भीती. अशा स्थितीत आजूबाजूच्या फांद्यांचा, मोठ्या दगडांचा आधार घेत मी खाली उतरायला लागले. चढताना मी फोटो काढत होते पण आता मात्र ऐशु ओरडायला लागली. फोटो काढायच्या नादात पाय घसरला तर.... शेवटी मोबाईल बॅगेत टाकला. वरून कोसळलेली दरड दिसत होती. दगडमाती बाजूला करून नवीन रस्ताबांधणीचे काम जोरात सुरू होते. मी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उगीच विचारले किती दिवस लागतील, तुमचा काय अंदाज? आज संध्याकाळपर्यंत रस्ता खुला होणार याबद्दल कोणालाही संदेह नव्हता.

आम्ही उतरायला लागलो तो आम्हाला विरुद्ध बाजूने चढणारे लोक भेटायला लागले. त्यात लोकल कमी होते आणि गोविंदघाट/जोशीमठावरून निघून बद्रीनाथला जाणारे भाविक जास्त होते. घोडेवाले व पिट्टू त्यातल्या त्यात धंदा करून घेत होते. पिट्टू शेजारून जाताना काही भीती नव्हती. पण घोडा समोरून आला की माझी वाट लागायची. नेमका वळणावर जर तो समोर आला तर मग सत्यानाशच! खाली जाताना एका बाजूला डोंगरी भिंत किंवा झाडे व दुसऱ्या बाजूला जंगलाने भरलेली दरी हाच सिन कायम होता. घोडे आले की मी त्या झाडांना किंवा भिंतीला पालीसारखी चिकटून उभी राहायचे. Happy Happy ज्यांना घोडे मिळाले नाहीत ते दमले भागले जीव पायी चढत होते. वयोवृद्धांना असे थांबत थांबत चढताना बघून होणारा त्रास कळत होता, वाईट वाटत होते.

हळू हळू आम्ही खाली उतरलो एकदाचे. या बाजूलाही रेलिंगसकट पायऱ्या बांधल्या होत्या. म्हणजे दरड बरोबर अंदाज घेऊन वरून येणाऱ्या दोन रस्त्यांच्या दरम्यान कोसळलेली. Happy आणि ती जरी अशी कोसळली नसती, एखादा रस्ता घेऊन कोसळली असती तरी वर राहणाऱ्यांना काही फरक पडला नसता. त्यांचा पर्यायी रस्ता तयार असणार हे नक्की. फक्त आमच्यासारख्या शहरी लोकांचे अजून थोडे हाल झाले असते.

खाली गाड्यांची बरीच गर्दी होती. वरून उतरणारे लोक गाड्या करून निघत होते. आम्ही खाली आलो तर आमच्या ग्रुपचे बरेच लोक एका मिनीबसच्या मागे उभे असल्याचे दिसले. ही बस युथ हॉस्टेलची नव्हती तर आमच्या ग्रुपने ठरवली होती. माणसी पाचशे रुपये काढून. आम्ही सामान डिकीत टाकून गाडीत स्थानापन्न झालो. गाडीत अजून तीनचार सीट्स खाली होत्या. एका जोडप्याने विनंती केल्यावर आम्ही त्यांनाही सोबत घेतले. उतरताना मला खूप कंटाळा आलेला पण आता मी ठीकठाक झाले होते. हिमालयातली हवा खूप जादुई आहे. तुम्ही कितीही दमला तरी ते तेव्हढ्यापुरतेच. थोडी विश्रांती घेतली की परत ताजेतवाने वाटते. आणि मी तशीही त्या हवेच्या प्रेमात होतेच.

इथे मुंबईत कायम एक धुळीचा करडा पडदा हवेत टांगलेला असतो. कधी अवकाळी धो धो पाऊस पडला तर त्यानंतरचा एक दिवस हा पडदा दूर झालेला असतो. बाकी पावसाळ्याचे थोडे दिवस सोडले तर उरलेले महिने धुरकटच असतात, स्वच्छ वातावरण नसतेच. त्यामुळे मुंबई/महाराष्ट्राबाहेर गेले की मला बरे वाटते. जोशीमठ गाठले तेव्हाच ऐशु म्हणाली होती, इथे सगळे फुल्ल HD दिसतेय. गेले चार पाच दिवस आम्ही फुल HD फोटोजिनिक दृश्ये सभोवती पाहात होतो, स्वच्छ हवा फुफ्फुसात भरत होतो.

आम्ही सकाळी साडेसहाला निघालो होतो. तिथून अर्ध्या पाऊण तासात दरडीच्या जागी पोचलो. तिथून पदयात्रा करून ह्या बाजूला पोचायला साडेदहा अकरा वाजले. बस लगेच पंधरा मिनिटात सुटली. आता थेट ऋषिकेश गाठायचे होते. आज जवळ जवळ तीनशे किमीचा प्रवास करायचा होता. बद्रीनाथ सोडल्यावर जोशीमठावरून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने परत ऋषिकेशला जायचे होते. या रस्त्यावर अनेक देवस्थळे आहेत, ज्यांचे उल्लेख आपल्या पुराणांमध्ये येतात. उत्तराखंड ही खरेच देवभूमी आहे. इथे जागोजागी पुराणकालीन संदर्भ विखुरलेले आहेत. इतके की आपण थकेहारे एखाद्या शिळेला टेकून थोडा विश्राम घ्यावा आणि नंतर कळावे की त्याच शिळेला पांडवांपैकी कुणाचेतरी चरणकमल लागले होते. असो. मला असली शिळा सापडली नाही पण अजून थोडे फिरले असते तर नक्कीच सापडली असती.

बद्रीनाथ ते ऋषिकेश वाटेवर पंचप्रयाग लागतात. गाडी थांबणे शक्य नसल्याने सगळ्या प्रयागांचे मी गाडीतुनच जाता येता दर्शन घेतले. प्रयाग म्हणजे नदीचा संगम. गंगामैय्या वरून निघते ती अनेक रूपे घेऊन निघते. अलकनंदा, भागीरथी, पुष्पावती, धौली गंगा, नंदाकिनी, मंदाकिनी अशा अनेक नावांनी वाहात ती शेवटी गंगा होते.

जोशीमठजवळ प्रथम विष्णूप्रयाग आहे. इथे नारदाने विष्णूची उपासना केली होती. या जागी अलकनंदा व धौली गंगा एकमेकींना मिळतात व अलकनंदा नावाने एकत्रित वाहू लागतात.

तिथुन पुढे गेले की नंदप्रयाग. नंदराजाने इथे तप केले होते म्हणून याचे नाव नंदप्रयाग पडले म्हणे. इथे अलकनंदेला नंदाकिनी येऊन भेटते. तिचे पाणी घेऊन अलकनंदा अजून मोठी होत पुढे निघते. जगप्रसिद्ध अभिज्ञान शाकुंतलम मधले कण्व ऋषी इथेच तप करत होते व नंतर दुष्यंत-शकुंतलेचा विवाहही या स्थळी पार पडला.

कर्णप्रयागला अलकनंदेशी पिंडर नदी संगम पावते. दुष्यंत-शकुंतलेची भेट इथेच झाली व रोमान्स इथेच कर्णप्रयागच्या निसर्गरम्य स्थळी फुलला असे कालिदासाने लिहून ठेवले आहे. कालिदास त्याच्या गोष्टींमध्ये खरी स्थळे वापरत होता असे दिसते. हल्ली वास्सेपूर, सज्जनपूर असली खोटी नावे वापरतात. आयटेमला भेटायचे तर आपल्या एरियापासून थोडे लांब जायला हवे हे ज्ञान आश्रमकन्या असली तरी शकुंतलेला होते. तिचे घर नंदप्रयागला पण दुष्यंताला भेटायला जायची कर्णप्रयागला. पूर्ण उत्तराखंड सुंदर आहेच पण विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पंचप्रयाग खूप निसर्गरम्य दिसतात. कालिदास उगीचच प्रेमात नव्हता पडला या भागाच्या! मेघदूतातही कर्णप्रयागाचा उल्लेख आहे.

चौथा प्रयाग रुद्रप्रयाग. इथे अलकनंदेला मंदाकिनी येऊन मिळते. शंकराने त्याचे तांडव इथे केले होते. म्हणून रुद्रप्रयाग. शंकराची त्याची आवडती रुद्रविणा वाजवून त्याने विष्णूला मोहात पाडले तेही इथेच.

याच्यापुढे येतो देवप्रयाग. इथे अलकनंदेला गंगेची सगळ्यात मोठी उपनदी भागीरथी मिळते. भागीरथी व अलकनंदेचा हा संगम खूप पवित्र मानला जातो. वेगाने धावत, उसळत येणारी भागीरथी व शांतपणे वाहणारी अलकनंदा एकत्र येतात तो पॉईंट खूप सुंदर आहे. पावित्र्यात अलाहाबादच्या त्रिवेणी संगमानंतर देवप्रयाग संगमाचे स्थान आहे. बऱ्याच पौराणिक आख्यायिका या स्थळी घडल्याचे उल्लेख आहेत.

या संगमानंतर गंगा या नावाने गंगामैय्या वाहते व त्याच नावाने शेवटी समुद्राला मिळते.

हे सगळे संगम मी गाडीतून पाहिले. प्रत्येक ठिकाणचा संगम तितकाच सुंदर दिसतो. दोन बाजूने धावत येणाऱ्या हिरव्या पाण्याच्या नद्या एकत्र झाल्यावर पांढऱ्या फेसाने चमकायला लागतात आणि अजून वेगात धावायला लागतात. इकडे सगळीकडे नदीचे पाणी लकाकत्या, चमकत्या पाचूसारखे दिसते. तरीही काही ठिकाणी दोन नद्यातला फरक खूप ठळक दिसतो. प्रत्येक प्रयागाच्या भरपूर आख्यायिका आहेत, त्या ठिकाणी पुरातन देवळे आहेत. ही सगळी देवळे पहायची माझी इच्छा आहे. त्यासाठी परत एकदा तिकडे जाऊन ह्या कामासाठी वाहन बुक करून फिरावे लागणार. पंचप्रयागाव्यतिरिक्त अन्य छोटे मोठे खूप संगम आहेत.

तर आता आपण थेट ऋषीकेश गाठणार हा विचार करत मी बसमध्ये बसले, बस सुरू झाली. जाताना जे काही दिसले होते ते परत दिसते का हे मी बघत होते. डोळा लागावा अशी इच्छा होती पण सहसा मोटार गाडीने प्रवास करताना मला झोप लागत नाही. असाच तास दीड तास गेला आणि बस परत थांबली. पुढे दरड कोसळलेली व गाड्यांची भली मोठी रांग लागलेली. आधी आम्ही सगळे गाडीतच बसून राहिलो. मग चुळबुळ करत दोन चार लोक खाली उतरले, मग अजून थोडे उतरले असे करत माझ्यासारखे तिघे चौघे सोडून पूर्ण बस खाली झाली. माझ्या पोरी तर आधीच पसार झालेल्या. मग काही लोक दरड कुठे पडली ते पाहायला पुढे गेले व तीन चार तास काहीही हलत नाही हा दुःखद समाचार घेऊन परतले. आमची बस नेमकी एका हॉटेल कम ढाब्यासमोर थांबलेली. तिथे राजमा चावल, प्राठा वगैरे रोजचे पदार्थ होते असे बोर्डावरून कळत होते. डब्बे सोबत होते तरी ग्रुपमधले काहीजण तिथे जेवायला गेले. मला गाडीतून उतरायची अजिबात इच्छा नव्हती. मी बसल्या जागेवरूनच विचारले; हॉटेलात कढी चावल नव्हते. मी मग माझा डब्बा खाऊन गप्प पडून राहिले. थोड्या वेळाने शामली आली. ती नेहमीसारखी गरमागरम बातमी घेऊन आलेली. आमच्या सोबतचा युथ होस्टेलचा दुसरा ग्रुप आमच्या मागेच दुसऱ्या बसमध्ये होता. त्यांना म्हणे युथ हॉस्टेलची बस मिळाली, आमच्यासाठीसुध्दा हॉस्टेलने बस पाठवलेली पण आम्ही आधीच बस करून निघालो असल्याने आमची चुकली. माझे डोकेच फिरले हे ऐकून. बस पाठवणार हे बद्रीनाथलाच आम्हाला सांगितले असते तर काय बिघडले असते? आमच्या सगळ्यांचे फोन नंबर व आमच्या नातलगांचेही फोन नंबर इमरजन्सी कॉन्टॅक्ट म्हणून यांनी घेऊन ठेवले होते, ग्रुप लीडर, सब लीडर सगळ्यांची नावे यांच्याकडे होती. यापैकी कुणालाही एक फोन करून सांगितले असते तर काय बिघडले असते? उगीच आम्ही माणशी पाचशे रुपये फुकट घालवले. युथ हॉस्टेल असा गलथानपणा कधी करत नाही. पण बद्रीनाथपासून त्यांना काय झाले होते देव जाणे....

मुलींना हॉटेलात किंवा डब्बा खाण्यात रस नव्हता. त्यांना नूडल्स खायच्या होत्या. चांगले हॉटेल शोधुया म्हणत मुली परत कुठेतरी गडप झाल्या, सोबत माझी पाण्याची बाटली घेऊन गेल्या. मी डोळा लागतो का याचे प्रयत्न करत बसले. साधारण अडीज तीनच्या सुमारास अचानक सगळीकडे गलका सुरू झाला. दरड साफ होऊन वाहतूक परत सुरू झाल्याने रस्त्याच्या जान मे जान आली होती. आमच्या बसवाल्याने बस सुरू केली तसे इतस्तत: पसरलेले बसचे उतारू गाडीत चढायला लागले. पण आमचे दोन पॅसेंजर्स त्या गर्दीत नव्हते. मी आरडाओरडा करून महेशला दोघींना शोधायला पिटाळले. दहा मिनिटांनी तो त्यांना शोधून घेऊन आला. शामलीने आल्यावर एक चांगली व एक वाईट बातमी आहे म्हणत खूपच चांगल्या नूडल्स मिळाल्या ही चांगली बातमी म्हणून सांगितली व महेशने येऊन त्यांना घाईघाईत हॉटेलातून बाहेर काढल्यामुळे माझी पाण्याची बाटली तिथेच राहून गेल्याची दुःखद बातमी सांगितली. आता यावर काहीच करता येण्यासारखे नसल्याने तुम्ही वेळेत भेटलात हेच थोर नशीब म्हणत मी गप्प बसले.

यानंतर पुढे फक्त एकच कोसळलेली दरड भेटली व तिने फक्त अर्धा पाऊण तास वेळ घेतला. या वेळेस आम्ही कुठल्यातरी शहराच्या मार्केटात होतो. तिथे आम्ही काकडी वगैरे फलाहार केला. सहा साडेसहाच्या सुमारास आम्ही ऋषिकेशपासून साधारण शंभर दीडशे किमी दूर होतो. काही लोकांना चहापानाची हुक्की आल्यामुळे बस परत थांबली. चहा, बिस्कीट, भजी वगैरेचा आस्वाद घेणे आलेच. काही मेम्बर्स मात्र चुळबुळ करत होते. वाटेवर कुठेतरी एक गेट आहे म्हणे, ते पावणे आठला बंद होते. त्यानंतर रस्ता बंद. त्यामुळे ऋषिकेशला जायचे तर ती जागा पावणेआठ आधीच पार करणे गरजेचे आहे. आम्ही असे सगळीकडे थांबत मजा करत गेलो तर वेळेत कसे पोचणार? हे गेट बहुतेक देव प्रयागच्या थोडे आधी होते. गेट वगैरेचे ऐकून परत सगळेजण घाई करून गाडीत बसले व एकदाचे निघालो. मी गेट कुठे दिसते का पाहात होते पण मला कुठेही असे गेट दिसले नाही.

अजून शंभर दीडशे किमी म्हणजे ऋषिकेशला पोचायला दहा अकरा वाजणार. दिवसा जे रस्ते मला धडकी भरवतात त्या रस्त्यांवरून रात्रीचा प्रवास करायचा या कल्पनेने मला अस्वस्थ वाटायला लागले. अर्थात गाडी मी चालवत नव्हते. पण हा असला प्रवास मला खूप खतरनाक वाटायला लागला. या भागात परत कध्धी कध्धी पाय ठेवायचा नाही हे मी तेव्हाच ठरवले.

हळूहळू काळोख पडला. दोघी पोरी झोपलेल्या. बसमधले इतर लोक अंताक्षरी, सामुदायिक गाणी, सोलो गाणी, थोडीफार बाचाबाची वगैरे सगळे प्रकार हाताळून दमली व पेंगायला लागली. माझ्यासारखे जागे लोक फार थोडे होते. मला झोप येणे अशक्य होते. समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश व आपल्या गाडीचा प्रकाश एवढेच काय ते प्रकाशाचे स्त्रोत रस्त्यावर होते. बाकी डिप्प काळोख. सोबतीला खोल दरीत वाहणाऱ्या नदीचा दुरून ऐकू येणारा खळखळाट. समोरून गाडी आली की दोघेही गाडी संभाळून चालवायचे. एका ठिकाणची दरड आम्ही पोचण्याआधी साफ करून झालेली पण त्यामुळे रस्ता खराब झाला होता. तिथे एक गाडी फसली होती. ती निघावी यासाठी आमच्या गाडीला थोडे रिव्हर्स घ्यावे लागले. माझा जीव जायचीच वेळ आलेली. खरेतर माझी भीती पूर्णपणे अनाठायी होती. तिथल्या बसचालकांना पुरेसा अनुभव असतो. स्वतःच्या जीवाची काळजी त्यांनाही असतेच. आणि दुर्दैवाने तसाच काही प्रसंग तुमच्यासाठी लिहिला असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. जीव जेव्हा जायचा तेव्हा जाणारच. पण मी असले सुविचार डोक्यात आणायच्या मूडमध्ये तेव्हा नव्हते. गाडी पडलीच तर पडत्या गाडीत माझ्या डोक्यात काय विचार येतील हा विचार डोक्यातून हुसकावून लावत मी ऋषिकेश कधी येतेय याची वाट पाहात बसले.

साधारण अकराच्या सुमारास ऋषिकेश आले व दहा पंधरा मिनिटात आम्ही बेस कॅम्पच्या गेटबाहेर पोचलो. मी शारीरिक व मानसिकरित्या इतकी दमले होते की कधी एकदा गादीवर अंग टाकते असे झाले होते. मुलींना जागे करून सामान गोळा करायला सांगितले व मी गेटच्या दिशेने चालायला लागले. गेटच्या आत कुठली नौटंकी आमची वाट पाहात होती हे तेव्हा कळले असते तर...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला, मस्त जमलाय.
तू अगदी तुला जे वाटलं, जाणवलं आणि अनुभवलं तेच लिहिलयस. त्या तिकडे प्रवास हा एक वेगळाच अनुभव आहे. आपण काय ऐशारामात राहातो ते तिकडे गेल्यावर कळतं.

मस्त!
साधना तुझ्या लेखाचे शेवट अगदी सिरिअल च्या शेवटासारखे असतात, पुढील भागाची उत्कंठा वाढवणारे.
आता पुढला भाग उद्याच टाक (सिरिअलसारखा) Wink

मस्त झालाय हाही भाग. बाप रे पण या ठिकाणी जाण्यासाठी उत्तम फिटनेस ची गरज फारच अधोरेखित होते आहे तुझ्या सगळ्या वर्णनांमधे. ट्रिप संपता संपता ती दरड पार करायला अनपेक्षित रित्या २-३ तासाचे चढ उताराच्या रस्त्यावर चालावे लागणे हे वाचूनच मला थकायला झालं! तिथल्या लोकल लोकांना अगदी रोजचे असल्यासारखे दिसतेय! इतक्या लहान गावात सार्वजनिक टॉयलेट्स वगैरे वाचूनही फार नवल वाटले.

मस्त भाग. तू ह्या ट्रेकला जाण्यापूर्वी चालायची, चढाउतरायची सवय व्हावी म्हणून लोकल ट्रेक्स करायला लागली नव्हतीस का?
मलाही त्या तिथल्या घाटांची, नागमोडी रस्त्यांची भिती वाटते रात्रीच्या वेळी. अजिबात झोप लागत नाही.

काय वर्णन आहे....
म्हटलं तर अगदी साधं, सहज... आणि कदाचित म्हणूनच अजिबात न थांबता वाचावसं वाटणारं...
खरंच.. साधेपणात किती खुमारी आहे....
आणि सिरियल सारखा शेवट हे शेवटची ओळ वाचल्या वाचल्या लिहिणार होतो- पण झेलम यांनी आधीच म्हटलेलं... So अनुमोदन...

दुष्यंत-शकुंतलेची भेट इथेच झाली व रोमान्स इथेच कर्णप्रयागच्या निसर्गरम्य स्थळी फुलला असे कालिदासाने लिहून ठेवले आहे. कालिदास त्याच्या गोष्टींमध्ये खरी स्थळे वापरत होता असे दिसते. हल्ली वास्सेपूर, सज्जनपूर असली खोटी नावे वापरतात. आयटेमला भेटायचे तर आपल्या एरियापासून थोडे लांब जायला हवे हे ज्ञान आश्रमकन्या असली तरी शकुंतलेला होते. तिचे घर नंदप्रयागला पण दुष्यंताला भेटायला जायची कर्णप्रयागला.>>>>> Proud खूपच सहज लिहीतेस साधना. पण खरच आधी फोटोत पाहीलेला हिमालय तुझ्या वर्णना मुळे डोळ्यासमोर येतोय. असे वाटतेय की तुझ्या बरोबर आमची पण चढ उतर होतेय तिथे.

दुर्दैवाने तसाच काही प्रसंग तुमच्यासाठी लिहिला असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. जीव जेव्हा जायचा तेव्हा जाणारच. पण मी असले सुविचार डोक्यात आणायच्या मूडमध्ये तेव्हा नव्हते.>> इथं हसू कि रडू कळेना.. तुझ्या वर्णनाचेच माझा जीव हितवर आलाय..
फारच अवर्णनिय झालाय प्रवास.. तुझ्यासाठी अन आमच्यासाठीही..
शेवटाला परत जीव टांगणीवर लावला काय घडलं असेल म्हणुन..
पटपट नवा भाग टाक बर..

इतक्या लहान गावात सार्वजनिक टॉयलेट्स वगैरे वाचूनही फार नवल वाटले.>> अगं मैत्रेयी, मला वाटत टुरिस्ट भाग असल्यामूळे ते सार तश्या रितीने डेव्हलप झालं असणार.. छानच आहे ना..

टीना, तिथे वर टुरिस्टसाठी म्हणून सफाई वगैरे काही नाही. आम्ही तिथे गेलो दरड पडून आमचा रस्ता बंद झाला म्हणून.
नाहीतर इतकी पायपीट करून टुरिस्ट तिथे जातील असे काहीही तिथे नाही.

पण इन जनरल, उत्तराखंड तेवढे प्रगत आहे. हिमाचल, उत्तराखंड ही राज्ये स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहेत. प्लास्टिकचा वापर सुद्धा खूप कमी आहे. वर डोंगरातून वाहात येणारे पाणी स्थानिक लोक बिनधास्त पिण्यासाठी वापरत होते. वाटेत कुठे खराब होणार नाही याची त्यांना खात्री असते.

घाअंगरिया ते बद्रीनाथ व तिथून ऋषिकेशचे भरपूर फोटो होते. पण ते कसे उडाले माहीत नाही. मोबाईलमध्ये काहीच फोटो सापडत नाहीत. थेट ऋषिकेश शहराचे फोटो आहेत.

साधना......मस्त झालाय हा ही लेख.....फुल एचडीची उपमा फिट्ट आहे अगदी. आणि प्रत्येक लेखाचा शेवट वर बाकीच्यांनी लिहिलंय तसा सुरेख करतेस. फक्त सिरियलमध्ये अनेक वर्षं पहात असल्याने पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार ह्याची कल्पना येतेच. म्हणजे दोन लोक पिस्तूल घेऊन मारामारी करत असतील आणि गोळी उडाली तर ज्याने चेहेरा वेडावाकडा केलाय तो ठीक असून दुसर्‍याला गोळी लागलेली असते किंवा रहस्याचा पर्दाफाश होत असेल तर दुसर्‍या दिवशी ते कोणाचं तरी स्वप्न निघतं. तुझ्या लेखात मात्र पुढे काय आहे ह्याचा मागमूस लागत नाही Happy