एक 'न'आठवण - "आई"
जसं प्रत्येक आईला आपलं मुल सर्वात सुंदर वाटतं, तसं बहुधा जगातल्या प्रत्येक मुलाला/मुलिला आपली आईच सर्वात सुंदर आणि सुगरण वाटत असेल. आणि त्या प्रत्येक मुलाकडे/मुलिकडे आईच्या म्हणून असंख्य आठवणी असतील. पण माझ्याकडे त्या तश्या अतिशय थोड्याच आहेत.
माझी आई खूप कष्टाळू म्हणजे खरंतर कष्टाळूच्याही पलिकडची होती. वृषभ रास म्हणजे बैल, थोडक्यात ती बैलासारखं काम करायची असं म्ह्टलं तरी वावगं ठरू नये. आमचं घर तिसर्या मजल्यावर. न्हाणिघर, स्वच्छतागृह, नळ सर्वकाही कॉमन. त्यातून ती स्वच्छतेची अत्यंत भोक्ती. त्याशिवाय अतिशय महत्वाकांक्षी असावी कारण तिचं लग्न झालं तेव्हा तिचं वय अवघं १७ वर्ष होतं म्हणे आणि शिक्षण होतं इयत्ता १० वी. लग्नानंतर संसार सांभाळून तिने एम ए विथ इंग्लिश केलं आणि घरकाम सांभाळून ती स्मॉल सेव्हिंग्स ची पोस्टाची एजंट म्हणूनही काम पहात असे.
काही गोष्टींच्या बाबतीत ती अत्यंत हट्टी होती. मी आणि माझी बहिण दोघींचेही केस तिने लांब ठेवले होते आणि आम्हाला केसांना कंगवाच काय पण साधा हात लावण्याची सुद्धा मुभा नव्हती. मला आठवतंय एकदा ती अशीच वेणी घालताना मी पुर्वी मिळायचा तो पत्र्यांच्या कडा असणारा चौकोनी आरसा घेऊन सारखी त्यात पहात होते, आईने मागून तो खसकन ओढून घेतला आणि त्या पत्र्याची एक कड माझ्या कपाळावर लागली आणि ओरखडा पडला, त्यातून थोडं रक्त आलं पण आईला अत्यंत घाबरत असल्याने मी त्याबद्दल तिला काही बोलले नाही. तिच्या लक्षात आल्यावर मात्रं तिने त्यावर हळद लावली. अजून एक किस्सा म्हणजे माझ्या लांब लांब वेण्या मागच्या बाकावर जात आणि मागची मुलगी त्या सतत पुढे भिरकावे म्हणून मी बाईंकडे तक्रार केली आणि बाईंनी त्या वेण्यांचेच दोन आंबाडे घातले. मी तशीच घरी. आईने आल्यावर आंबाडे पाहून सगळी हकिकत विचारली आणि तु बाईंना केसांना हात कसा लावून दिलास असं म्हणत मला धू धू धुतले. वेणी घातल्यावर खाली उरणारे मोकळे केसही तिला आवडायचे नाहित. त्या केसांनाच नजर लागते असे तिचे म्हणणे होते त्यामुळे ती शेवटपर्यंत पेड घालून ते गुंडाळून त्याला रबरबँड् लावायची. आणि मला पोनी टेल घालायची भलती हौस. एके दिवशी शनिवारच्या सकाळच्या शाळेला आई भांडी घासायला खाली गेलेली होती ती संधी साधून मी पोनी घालून शाळेत गेले, आल्यावर आधी मिळाला तो मार मग जेवण.
स्वच्छ्तेच्या तिच्या संकल्पना अत्यंत वेगळ्या होत्या. भांडी, धुणं सर्व काही ती तळमजल्याच्या नळावर अथवा आडावर जाऊन करत असे. इतकेच नव्हे तर तिला एक आणि दोन बादल्यात आमचे केस धुणे ही आवडायचे नाही त्यामुळे स्टोव्ह, शिकेकाई, बादली कपडे घेऊन आम्ही आडावर जात असू तिथे स्टोव्ह पेटलेला ठेवून ती कमीत कमी ७-८ बादल्या प्रत्येकी अशी आम्हा दोघींनाही अंघोळ घाली.
स्वतःच्या घराची तिची ही काही स्वप्नं होतीच त्याकाळी उजळाईवाडी सारख्या ठिकाणी बावन्नशे स्क्वेअर फुटांचा आमचा प्लॉट होता तिथे घर बांधलं की ते इतकं स्वच्छ ठेविन की तुम्ही स्वछ्ततगृहात जरी जाऊन जेवलात तर तुम्हाला किळस वाटणार नाही असं ती म्हणायची.
कपडे वाळत घालण्यासाठी आमच्या घरी ३ दोर्या होत्या. त्यातही कपडे वाळत घालायची तिची पद्धत अचाट होती. सर्वात मागच्या दोरी वर ती साड्या, परकर, चादरी इ. घाले, मधल्यावर त्यापेक्षा छोटे आणि सर्वात पुढे अजून छोटे कपडे. हे असं का? तर पहिल्या दोरीवर मोठे कपडे घातले तर मागचे वाळणार नाहित म्हणून हे लॉजिक ती सांगायची.
मला लहानपणी ( तेव्हाच काय अजूनही) गोड फार प्रिय. त्यातून साय साखर, तूप साखर तर रोजचेच. दूध संपले की आई ते पातेले एक चमचा घालून मला खरवडून खायला लावायची. त्याचबरोबर मला दूध साखर पोळी सुद्धा अतिशय प्रिय. त्यात किमान चार चमचे घातल्याशिवाय मला ते गोड लागायचे नाही. एके दिवशी असंच खाताना 'आई साखर घाल ना अजून' असं म्हणत चार चमचे घातले तरिही माझे समाधान होइनासे पाहून आईने अख्खा डबा माझ्या त्या दूध आणि पोळित रिकामा करून मला ती खायला लावली होती.
तिचे पिपल स्किल जबरदस्त होते. स्वभाव एक नंबर असेच आजूबाजूचे लोक तिच्याबद्दल बोलत. पण एक नंबर स्वभाव म्हणजे काय हे मला तेव्हा उमजले नव्हते. हळू हळू उमगले की ती कोणत्याही व्यक्तिबरोबर मिक्स होऊ शकत असे आणि कायम मदतीचा हात द्यायला पुढे असे.
एकदा असेच आम्ही तिच्या पोस्टाच्या कामासाठी कोल्हापूरच्या उद्यम नगरात गेलो ( रिक्षाने) तिथे उतरल्यावर लक्षात आले की आई पैसेच आणायची विसरली होती मग रिक्षावाल्याला पत्ता देऊन उद्या पैसे घेऊन जा म्हणाली आणि येताना आपण चालत आलो तर चालेल का म्हणाली. मी हो म्हणाले आणि घरापर्यंत चालत आल्याचं तिला कोण कौतुक वाटलं होतं. २-३ दिवस ती माझं कौतुक सांगत होती लोकांना.
तिचा आवाजही खूप चांगला होता आणि ती एकेकाळी रेडिओ वर गायली होती असं ऐकिवात आहे, त्याच बरोबर कोल्हापूरच्या बीटी कॉलेजात ही तिच्या आवाजातली प्रार्थना वाजवली जायची असे ही ऐकिवात आहे.
खूप लहान वयात तिला ल्युकोडर्मा (अंगावर पांढरे डाग पडणे) हा रोग झाला होता पण त्यातून तिचा अत्मविश्वास ढळल्याचे निदान मी तरी कधी पाहिले नाही. उलट ती ते विसरून स्वतःला फक्त कामात झोकून देत असे.
दिसायला पण ती तशी छानच होती. आणि रहायची सुद्धा छान.
पण अती कष्ट आणि पित्त प्रकृती मुळे तिची तब्येत बिघडायची त्यातून तिला काविळ झाली आणि मी ४ वर्षांची असताना ती अनेक महिने मिरजच्या मिशन हॉस्पिटल मध्ये दाखल होती. तिथून बरी होऊन आली हे नवलच कारण तेव्हा ती जगणार नाही असंच सर्वांना वाटायचं.
पित्त प्रकृतीमुळे बहुधा डॉक्टरांनी तिला अनेक पथ्य सांगितली असावीत, पण हट्टी स्वभावा मुळे आणि त्यावेळी केल्या जाणार्या अनेक धार्मिक गोष्टींना तीही बळी पडायचीच. मोठया आजारपणानंतर २-३ वर्षात केव्हातरी तिने सोळा सोमवार केले आणि शेवटच्या सोमवारीच दुपारी तिची तब्येत बिघडली. तेव्हा मी ७ वर्षांची होते. पहिल्यांदा कोल्हापूरच्च्या आयसोलेशन मध्ये ठेवले. दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी आईसाठी मी चहा घेऊन जाणार म्हणून मी बाबांजवळ हट्ट धरला. त्यांनी मला हातात थर्मास देऊन अमूक बस ने जा, ति बस फिरून परत निघेल त्याच बस ने परत ये असे सांगितले. बस पोहोचली मी धावत थर्मास आईच्या बेड् जवळच्या चौकोनी टेबलवर ठेवला, बस त्याच आवारात फिरून परत स्टॉप वर आलेली पाहिली आणि धावत जाऊन पकडली. आणि घरी परतले. त्याच रात्री तिचा आजार बळावला म्हणून तिला मिरजच्या मिशन हॉस्पिटलला शिफ्ट केले. तिच्या लिव्हर मध्ये पित्ताचे खडे झाले होते. २७ ऑगस्ट चा बुधवार गेला. गुरुवारी २८ ऑगस्टला तीची प्रकृती म्हणे स्थिर होती आणि माझे थोरले काका सकाळी हॉस्पिटल मधून कोल्हापूरला आले आणि म्हणाले कांचन ला मुलिंना भेटावसं वाटतंय. आम्ही लगेच निघालो. हॉस्पिटल मध्ये आई, आजी (आईची आई) दोघी होत्या. तितक्या आजार पणात सुद्धा तिने त्या दवाखान्याच्या बेडवर बसून माझी आणि माझ्या बहिणीची केस विंचरून वेणी घातली. दुपारी ३.३० च्या आसपास आम्ही घरी जायला निघालो आणि माझी थोरली काकू आणि तिची मैत्रिण हॉस्पिटल मध्ये प्रवेश करत्या झाल्या. त्या संध्याकाळी परतल्या त्या आईच्या मृत्यूची बातमी घेऊनच. तेव्हा माझ्या आईचं वय होतं केवळ एकतीस.
आई स्वयंपाक कसा करायची? तिचे केस केव्हढे होते? तिचं आमच्या नातेवाईकांशी नातं कसं होतं? बाबांशी नातं कसं होतं? यातलं काहिएक मला आठवत नाही. इतकंच काय पण चालती बोलती साडी नेसलेली ती कशी दिसायची यातलंही मला काही एक आठवत नाही.
यावर्षी तिला जाऊन ३२ वर्ष पुर्ण होतील, पण मला आठवतो तो फक्त तिचा हॉस्पिटलच्या पांढर्या चादरीत गुंडाळलेला देह आणि चेहरा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
ता.क. - आई मला अगदीच तुकड्या तुकड्यात आठवत असल्याने, शिर्षक 'न'आठवण असे दिले आहे.
खरं सांगू तर मला तिचा चेहरा ही आठवत नाही. हे मोजके प्रसंगच आता तिची आठवण म्हणून जवळ आहेत.
विस्मरणात जाऊ नयेत म्हणून ही नोंद.
दक्षु.:अरेरे: आई म्हणले की मन
दक्षु. आई म्हणले की मन हळवं होतच. लिहायला शब्द नाहीत. या हळव्या आठवणीच बहुतेक तुला बळ देत असाव्यात. थोडक्यात पण स्पष्ट डोळ्यासमोर उभे राहील असे वर्णन केलस.
दक्षिणा....... !! शब्द सुचत
दक्षिणा....... !! शब्द सुचत नाहीत. पण छान केलंस आईला शब्दांतून जिवंत केलंस. तुझ्या आईविना गेलेल्या बालपणा बद्दल विचार केला की चटका बसल्या सारखं वाटतं!
खूप पुण्यवान असतात ती लोक
खूप पुण्यवान असतात ती लोक ज्यांना आईचे प्रेम अगदी मोठे होईपर्यंत मिळते. माझ्यामते तर आई वडील म्हणजे आपल्याला मिळालेला गोड खाऊ असतो जो पुरवून पुरवून खायचा असतो. माझी आई २०१५ च्या जानेवारीत वारली पाठोपाठ वडीलही तिच्या आठवणीत मे महिन्यात वारले. पण अजूनही आठवणीने घसा कोरडा होतो. अगदी ती वारली तेव्हा तिने घातलेली साडीतील तिची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. रात्री कधीतरी स्वप्नात दिसते आणि जीव कासावीस होऊन उठतो आणि मग झोपच लागत नाही. ती गेली आहे हे मन मानायला तयारच नाही होत. तुमच्या आईसारखाच थोडाबहुत शिस्तीचा, स्वछतेचा स्वभाव पण तो तेच जरी जाचक वाटत असला तरी आता जाणवते कि माझाही स्वभाव थोडाफार तिच्याच सारखा झाला आहे. तुमच्या आईच्या आठवणी वाचून मला मात्र खरंच फार दाटून आले.
अपर्णा तुझ्या पोस्ट मध्ये
अपर्णा तुझ्या पोस्ट मध्ये दर्द जाणवला. का आणि कसा ते नाही सांगता येणार.
मी फार लहान असल्याने आईची आठवण होऊन कासावीस वगैरे व्हायला होत नाही, पण अनेक कठीण प्रसंगात आई असती तर थोडा धीर मिळाला असता असं नक्की वाटून गेलं.
द्क्षे
द्क्षे
सुरेख लिहिल आहेस. आर्थात थोडा अलिप्त पणा वाटतो आहे, पण तो मी समजु शकते.
आज खुप दिवसान्नी माबो वर आले. आल्या आल्या हा लेख दिसला. एरवी लगेच वाचला नसता, पण आज वाचला. कारण माझी आई १५ मार्च २०१७ ला गेली आणि सासुबाई २ डिसेंबर ला गेल्या. दोन्ही आई एका वर्षात गेल्या. दोघीही माझ्याच कडे रहात होत्या. त्यामुळे त्यांच नसण फार जाणवत आहे......
आसक्ती तुझ्या असण्याची
आसक्ती तुझ्या असण्याची
हूरहूर तुझ्या नसण्याची
साथ गोठलेल्या आठवणींची!
अशी अवस्था असते आई - वडील नसले की. जीव गलबलून गेला वाचताना.
दक्षिणा....... !! शब्द सुचत
दक्षिणा....... !! शब्द सुचत नाहीत. पण छान केलंस आईला शब्दांतून जिवंत केलंस. तुझ्या आईविना गेलेल्या बालपणा बद्दल विचार केला की चटका बसल्या सारखं वाटतं!>>+१ या व्यतिरिक्त आजुन काही नाही लिहु शकत.....
दक्षिणा, सुरेख लिहिलयस!
दक्षिणा, सुरेख लिहिलयस!
दक्षिणा, तुझ्या आठवणी सुरेख
दक्षिणा, तुझ्या आईच्या आठवणी सुरेख शब्दबद्ध केल्या आहेस!!
खूप छान लिहिलं आहेस. काही
खूप छान लिहिलं आहेस. या अशा लहानमोठ्या आठणीतूनच आई भेटल्यासारखं वाटतं.
आई कधी बाळाला सोडून जात नाही
आई कधी बाळाला सोडून जात नाही जाऊ शकत नाही ती बाळाच्या प्रत्येक हालचालीत कृतीत वसते
दक्षीणा लहान पणी आईचा वियोग म्हणजे काय ह्याची मी केवळ कल्पना करू शकतो
त्यातही आईविना दोन मुलींना वाढवणारया तुझ्या बाबांचे विशेष कौतुक
फार हिमतीन वाचायला आले इथं..
फार हिमतीन वाचायला आले इथं..
आत्ताच मागच्या महिन्यात माझी आज्जी गेली..तिच्या जाण्याचं दु:ख अजुन ताजच आहे आणि हा लेख तिची आठवण करुन देणार हे माहीती होतं..
छान लिहिलयस..
खूप छान लिहिलंय. !
खूप छान लिहिलंय. !
दक्षिणा, निशब्द : ..........
दक्षिणा, निशब्द : ...........सुरेख लिहिलंस, वाचताना माझ्या नजरेत मात्र छोटी दीप्ती येत होती.....लिहीत रहा
दक्षिणा,
दक्षिणा,
गलबललं आत. निशब्द.
<<<<आईविना गेलेल्या बालपणा बद्दल विचार केला की चटका बसल्या सारखं वाटतं!>>>> +१
दक्षिणा ह्यांचे आजवरचे
दक्षिणा ह्यांचे आजवरचे सर्वोत्तम लेखन
खूप छान लिहिलंय. ! शेवटच्या
खूप छान लिहिलंय. ! शेवटच्या काही ओळी वाचणे अवघड गेले.
खूप पुण्यवान असतात ती लोक
खूप पुण्यवान असतात ती लोक ज्यांना आईचे प्रेम अगदी मोठे होईपर्यंत मिळते. +1 अपर्णा.
कदाचित आमच पुण्य कुठे तरी कमी पडल असेल.
छन लेख दक्षिणा, आठवणी जाग्या केल्यात. माझ्या आई ला जाउन यंदा 22 वर्ष पूर्ण होतील, 10 वर्षांचा होतो मी तेव्हा. माझ्याकडेही फार कमी आठवणी आहेत तिच्या आणि त्यातली एक आठवण मी नकळत हरवलीय. तिचा आवाज. कितीही ताण दिला डोक्याला तरी आठवतच नाही.
ही एक सल मला मरेपर्यंत त्रास देणारेय...
काय लिहू?
काय लिहू?
दक्षिणा ह्यांचे आजवरचे
दक्षिणा ह्यांचे आजवरचे सर्वोत्तम लेखन
Submitted by बेफ़िकीर on 8 January, 2018 - 09:30
>>>
+९९९९९९९
निशब्द झालोय.
रडवले तुम्ही .. खूप .........
रडवले तुम्ही .. खूप .......... तुम्ही मला खूप हयापी गो लकी वाटल्या होतात ..... पण ,,,,,,,,,,,,,,,,,,
बऱ्याच गोष्टी कोरिलेट झाल्या.
"तिथे घर बांधलं की ते इतकं स्वच्छ ठेविन" सेम.! बऱ्याच गोष्टी कोरिलेट झाल्या. आजच्या तुलनेत खूपच खडतर काळ होता.
"बेड् जवळच्या चौकोनी टेबलवर ठेवला"... ओह माय गॉड.... यापुढे वाचवले नाही.
>> रडवले तुम्ही .. खूप
+१११
@स्वप्निल, तुमच्या प्रतिसादात
@स्वप्निल, तुमच्या प्रतिसादात जी तीव्र खंत व्यक्त केली आहे ती वाचल्यावर मला लक्षात आलं की मला माझ्या आत्ता असणाऱ्या आईचा आवाज ऐकता येत आहे हा केवढा मोठा लाभ आहे
खूप छान लिहीलंय!
खूप छान लिहीलंय!
दक्षि , नि:शब्द.
दक्षि , नि:शब्द.