१.

Submitted by हणमंतअण्णा रावळ... on 27 December, 2017 - 04:30

कार्तिकातल्या पहाटे
म्हैस विते,
इनकॅन्डेसन्ट पिवळ्या उजेडात
कडब्यावर पडलेलं
ओलसर वासरू दिसतं, ते
अप्रूप डोळ्यात साठवतो मी दोन तीन क्षण
सैरभैर म्हशीच्या उष्ण उछ्वासानं भंगते ती तंद्री,
पाठीवर थंडीच्या चांदण्या शिरशिरतात.
अचानक आठवतात ते पाच दहा सेकंद
हातसन डेअरीच्या बॅलन्सशिटा चाळता चाळता

ओठांवरच्या कोवळ्या लवेत
कविता पाच दहा सेकंद थांबली फक्त
आणि सगळंच राठ होत कधी गेलं
हे कळलंच नाही.
जोखमीचे हिशोब मांडता मांडता
त्या क्षणांची हमी कधीच पुरणार नाही
हे पक्कं ठाऊक नव्हतंच,
पण तशाच शुभ्र आठवणींमुळेच
सरत्या पावसाळ्यातली एखादी सेपिया संध्याकाळ
तुझ्या डोळ्यांना जाणवते आणि तुला वठू देत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults