शेतकरी वाचवा….

Submitted by तेजूकिरण on 30 November, 2017 - 19:49

हा लेख New Jersey च्या रंगदीप या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे
-------------------------
२०१५ चा हॉलिडे सिझन. जवळजवळ रोजच पार्ट्या चालू होत्या. अश्याच एका पार्टीत, संगीताच्या तालावर धुंद नाचून दमलेली मंडळी जेवायला बसली होती.

“अगं, शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीचा व्हिडिओ पाहिलास की नाही? कित्ती वाईट वाटतं ना ग त्यांची छोटी छोटी मुलं आणि म्हातारे आईवडील बघून?”

पार्टीत भरभरून घेतलेल्या आणि संपवता न आलेल्या अन्नाने भरलेली प्लेट तशीच कचऱ्यात टाकत मैत्रीण बोलत होती. दुसऱ्या मैत्रिणीनेही सहानुभूतीची री ओढत ऐकीवात आलेल्या गोष्टी मोठया चवीने सांगायला सुरवात केली, मग आजूबाजूचे सगळेच चुकचुकत चर्चेत सामील झाले.

आणि मग विदर्भाचा शेतकरी, कोकणातला शेतकरी, निकामी सरकार, पर्यावरणाची लागलेली वाट, शेतकऱ्यांनी उगीचच खर्च करायचा का?, त्यांना कशाला हवी आहे छानछोकी ? कर्जच का काढावं? त्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी की नाही अश्या अनेक विषयांवर, तुडुंब भरलेल्या पोटावर हातातले डिझर्ट चे बाउल्स सांभाळत जोरात चर्चा सुरु झाली.

हे सगळं पाहताना ,ऐकताना उगीचच खूप अपराधी वाटायला लागलं. मीही काही यांच्याहून वेगळी नव्हते, रोजच्या वाचनात येणाऱ्या बातम्या वाचून जरासे हळहळून आपल्या कामाला लागत होते. कोण कुठला शेतकरी, बापडा कंटाळला असेल जीवाला आणि केली असेल आत्महत्या, जाऊदे, आपल्याला काय करायचा आहे त्याचं, आपण काय करू शकणार आहोत? असाच विचार आपल्यातले बहुतेक करतात आणि काही करता येत नाही असं मानून नुसतीच चर्चा करत बसतात.

पण आज काहीतरी वेगळच वाटलं, काहीच न बोलता मी तिथून हळूच काढता पाय घेतला. घरी पोचले तरी मन थाऱ्यावर नव्हतं. झोपच येईना, मग उठून इंटरनेट वर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मिळेल ती माहिती वाचायला सुरुवात केली. रात्रभर वाचत राहिले, मन अगदी सुन्न झाले होते. ही एवढी मोठी समस्या आपल्या देशाला गेली कित्येक वर्ष भेडसावत आहे आणि आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती असू नये?

ही निव्वळ भारताचीच नाही तर अख्ख्या जगाची समस्या आहे. अनेक देशांमध्ये शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. पृथ्वीवरचे वाढते तापमान, अनियमित येणारा पाऊस, प्रमाणाबाहेर केलेली जंगलतोड, प्रदूषण ही सगळी कारणे खरंतर आपणा सर्वांना चांगली माहिती आहेत. पण दिवसेंदिवस बिघडत जाण्याऱ्या या परिस्तिथीने आज केवळ शेतकरीच जीवाला कंटाळलेला दिसतोय आणि म्हणून आपण समजतोय की हा आपला प्रॉब्लेम नाही. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आपल्या जगण्यासाठी ज्या तीन गोष्टी अगदी अपरिहार्य आहेत त्यातही पहिल्या दोन आहेत “अन्न आणि पाणी”. मग जो शेतकरी अन्न पिकवतो, त्याचंच जगणं कठीण करणारी परिस्थिती आली असताना तो आपला प्रॉब्लेम नाही असं कसं शक्य आहे?
माझ्या मते, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारण केवळ बिघडलेला निसर्गच नसून, असंवेदनशील झालेला समाजही आहे. माणूस हा समाज-प्रिय प्राणी समाजाला जातो, मग जेव्हा एखादा माणूस जगणं झिडकारतो तेव्हा तो त्याचा एकट्याचा पराभव नसतो तर तो त्या समाजाचा पराभव असतो. कोणत्याही आत्महत्येच्या मागे मानसिक नैराश्य हे एक मोठं कारण असतं. आणि जर का समाजाच्या निराश झालेल्या एका घटकाला आपणच सांभाळून नाही घेऊ शकलो तर त्याच्याकडे दुसरा पर्यायच काय उरतो? त्याला वाचवणं हे आपलं कर्तव्य वाटलं पाहिजे खरं तर.

काहीतरी करायला हवे असं वाटायला लागलं. अनेक संस्था या कामात अगदी मनापासून काम करताना दिसतात. इंटरनेट वर निरनिराळ्या सेवाभावी संस्थान्च्या वेबसाईटस आहेत. काही ठिकाणी पैसे पाठवले पण तरीही मन शांत होईना. सतत एक बोचणी लागून राहिली होती.
२००५ मध्ये स्थापन झालेल्या “हिडन जेम्स” www.hidden-gems.org या नॉन-फॉर-प्रॉफिट संस्थेत, मी एक स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. निरनिराळे कलागुण जोपासण्याऱ्या मित्रांनी मिळून काढलेली ही संस्था गेली १२ वर्षे कार्यरत आहे. बॉलीवूड तसेच इतर संगीताचे कार्यक्रम करून त्यातून मिळालेलं उत्पन्न उत्तम समाजकार्य करणाऱ्या संस्थांना दान करणे हे “हिडन जेम्स” चे मुख्य उद्दिष्ट आहे. “Sing With Passion, Support a Cause” असं म्हणत, ह्या ग्रुपचे मेंबर्स , आपापला जिवितार्थ करत संसार-मुलं सगळं सांभाळून, वेळ काढून उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करत असतात. ही मंडळी आपल्या अथक प्रयत्नांनी, एखाद्या व्यावसायिक ग्रुपशीच तूलना होऊ शकेल अश्या दर्जाचे शोज, लोकांच्या करमणुकीस सादर करून त्यातून मिळालेलं सगळं उत्पन्न समाजकार्यासाठी दान करत आली आहेत.

दर वर्षीप्रमाणे, २०१६ च्या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरु होती. सर्व कलाकार दिवसरात्र तालिमी करण्यात गुंतले होते. मोठ्या कार्यक्रमाचं उत्पन्न एक किंवा दोन संस्थांमध्ये देण्याचा प्रयास असतो. त्यासाठी निरनिराळ्या संस्थांचा अभ्यास करणं एकीकडे चालू होतं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संस्थेसाठी मदत करता आली तर पाहावं म्हणून प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी “Save Indian Farmers” या ग्रुप विषयीची माहिती आम्हाला मिळाली. नेहमीप्रमाणे “हिडन जेम्स” च्या स्वयंसेवकांनी नेटाने संशोधन केलं.
“सेव्ह इंडियन फार्मर्स” ही सुध्दा “हिडन जेम्स” सारखीच स्वयंसेवी संस्था असून, काही मित्रांनी सहा वर्षांपूर्वी ती सुरु केली. याचेही स्वयंसेवक हे आपापले उद्द्योग-नोकऱ्या, घरदार सांभाळून या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला अगदी हिरीरीने तय्यार असतात. म्हणजे “हिडन जेम्स” ला आपल्यासारखेच कुणीतरी वेडे सापडले.

मग काय तर, २०१६ चा कार्यक्रम “Save Indian Farmers” [ www.saveindianfarmers.org ] साठी करायचे ठरले.
पुढचे अनेक महिने “हिडन जेम्स” आणि “सेव्ह इंडियन फार्मर्स” या दोन्हीही ग्रुप्स चे स्वयंसेवक जीव लावून काम करत होते. अर्थातच, त्यांच्या निस्वार्थी प्रयत्नांना यश आले जेव्हा प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद देऊन हा “कल्प” नावाचा कार्यक्रम अक्षरशः डोक्यावर उचलून धरला आणि “हिडन जेम्स” चा आत्तापर्यंतचा सर्वात फायदेशीर ठरला.

ठरल्याप्रमाणे “हिडन जेम्स” ने “सेव्ह इंडियन फार्मर्स” ला फंडस् देऊन मदत केलीच पण याचवेळी, त्यांच्या कामाने प्रेरित होऊन मी त्यांना मला त्यांच्या कामात सहभागी करून घ्यायची विनंती केली. जेव्हढ्या उत्साहाने “सेव्ह इंडियन फार्मर्स” च्या ग्रुप ने माझं स्वागत केलं तेवढ्याच आनंदाने माझ्या “हिडन जेम्स” परिवाराने मला त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आज मी या दोन्ही ग्रुप्स मध्ये एक स्वयंसेवक म्हणून जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतेय. “सेव्ह इंडियन फार्मर्स” च्या कामामुळे मनाला लागलेली बोच थोडीशीच, पण कमी झालीय आणि मनाला इवलंसच, पण आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतोय याचं, समाधान मिळतंय. या छोटाश्या प्रवासातच इतकी गुणी आणि निस्वार्थी माणसं भेटली की खरी मदत मी माझीच करतेय असंच वाटतय.

हा लेख मी तुम्हाला या दोन ग्रुप्स विषयी माहिती देण्यासाठी लिहीत नाहीए, या दोन्हीही ग्रुप्स बद्दल अधिक माहिती तुम्हाला त्यांच्या वर दिलेल्या वेबसाइट्स वर मिळेलच.

माझा हेतू एवढाच आहे की, जर तुमच्यापैकी कुणी माझ्यासारखा, रोजच्या बातम्या ऐकून विमनस्क झाला असेल आणि काहीतरी मदत करायची ईच्छा बाळगून असेल तर, या किंवा अश्या इतरही ग्रुप्स बरोबर मिळून खूप काही करू शकतो. “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”. मी एकटा काय करू, असं जर सगळेच म्हणाले तर कुणीच काही करणार नाही. “One person can not do everything but every person can do at least one thing“.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी माहिती हवी असल्यास इंटरनेट वर तुम्हाला अमाप अभ्यासपत्रिका, बातम्या, व्हिडिओस वगैरे वगैरे मिळेलच.
इथे थोडक्यात माहिती देत आहे “सेव्ह इंडियन फार्मर्स’ च्या चालू घाडामोडींविषयी. वेबसाईट वर प्रत्येक प्रकल्पाविषयी विस्तारित माहिती मिळू शकेल. खाली दिलेल्या कोणत्याही प्रकल्पाविषयी अधिक माहिती हवी असल्यास, किंवा तुम्हाला त्यात मदत करायची असल्यास, कृपया मला “tejoosif@gmail.com” यावर ई-मेल पाठवा.

“सेव्ह इंडियन फार्मर्स” चे प्रकल्प दोन प्रकारात मोडतात.
१. “Reactive” - एखादी घटना घडून गेल्यानंतर मदत पोचवणे
२. “Proactive” - पुढे येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी बळ देणे. स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणं.

बोरीसिन्ह गाव प्रकल्प - जिल्हा: यवतमाळ, महाराष्ट्र.
उद्धेश - गावातील गरिबी आणि बेरोजगारी कमी करणे.
भागीदार - दीनदयाल बहुद्धेशीय प्रसारक मंडळ [भारत] , Asia Initiative [USA].
समस्या - शेतीलायक परिसर नाही. उजाड परिसर किंवा अतिवृष्टीने शेतीचे नुकसान.
उपाय - गावातील २५ तरुणांना मुर्हा म्हशी घेऊन देणे. त्याने कुटुंबाचं उत्पन्न वाढेल आणि घरातील मुलांना, वयोवृद्धांना पोषक दूध मिळेल. पाणी अडवण्याचे उपाय म्हणून दगडी बांध घालणे.
तूर डाळ हे मुख्य पीक असल्याने गावात “डाळ मिल” घातल्यास शेतकऱ्याला डाळ थेट बजाटरपेठेत विकणे सोपे जाईल.
http://www.saveindianfarmers.org/borisinh_report_13august2015/

सांगाती प्रकल्प - जिल्हा: यवतमाळ, महाराष्ट्र.
उद्धेश - शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करणे
भागीदार - दीनदयाल बहुद्धेशीय प्रसारक मंडळ [भारत]
समस्या - अनेक वर्षे शेतीसाठी रासायनिक खते वापरल्यामुळे जमिनीचे नुकसान होऊन, चांगले पीक येणे कमी होते.
उपाय - शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी माहिती पुरवणे. रासायनिक कीटकनाशकाऐवजी घरी पानांपासून बनवलेला, दशपर्णी अर्क वापरणे. रासायनिक हानिकारक खतांऐवजी घरगुती खतं वापरणे. शेतकऱ्यांनी ह्या उपायानंतर १.२ ते १.६ पट जास्ती उत्पन्न मिळवल. रासायनिक खत न घेऊन २०००-३००० रुपयांची बचत केली.
http://www.saveindianfarmers.org/project-sangaati/

उडाण प्रकल्प - जिल्हा: यवतमाळ, बीड, वाशीम - महाराष्ट्र [लवकरच- बुंदेलखंड , उत्तर प्रदेश]
उद्धेश - शेतकरी सुशिक्षित व्हावा. नवीन तंत्रज्ञानातून त्याला शेतीविषयी माहिती मिळवता यावी.
भागीदार - दीनदयाल बहुद्धेशीय प्रसारक मंडळ, प्रथम, विवेकानंद सेवा मंडळ, सेव्ह इंडिअन फ़ार्मर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा
समस्या - शेतीविषयी नवीन नवीन संशोधन होत असतं , पण शेतकऱ्यांना त्याविषयी काहीच माहिती मिळत नाही. शिवाय शेतकरी बऱ्याच वेळा शाळकरी मुलांना शेतीच्या कामांसाठी घरीच ठेवतात व त्यांचं शालेय नुकसान होतं.
उपाय - प्रथम, ekstep अश्या विविध माध्यमातून अनेक विनामूल्य व्हिडिओस उपलब्ध आहेत जे मोठयांनां तसेच शाळकरी मुलांना अनेक विषयांची माहिती सहज देऊ शकतात. Tablets वर ही apps डाउनलोड करून हे व्हिडिओस हवे तेव्हा बघता येतात. आतापर्यंत शंभराहून अधिक tablets निरनिराळ्या शाळांमधून देण्यात आल्या आहेत.
२०१७-१८ मध्ये बुंदेलखंड विभागात उडाण प्रकल्प सुरु होत आहे.
http://www.saveindianfarmers.org/project/project-udaan/

जल प्रकल्प - जिल्हा: बीड - महाराष्ट्र [लवकरच- बुंदेलखंड , उत्तर प्रदेश]
उद्धेश - सुकून गेलेल्या बोरवेल्स रिचार्ज करणे आणि भूभागातील पाण्याची पातळी वाढवणे.
भागीदार - संकल्प रूरल डेव्हलोपमेंट सोसायटी [SRDS ]
समस्या - काही वर्षांपूवी शेतकऱ्यांनी बोरवेल्स खणून पाणी काढायला सुरवात केली. एक विहीर आटली कि दुसरी खणायची, अश्यामुळे जमिनीखालील पाणी नुसते उपसले गेले आणि दुष्काळी परिस्थितीत भर पडली.
उपाय - SRDS ने निवडलेल्या तंत्राप्रमाणे बोरवेल्स रिचार्जे केल्यास, सुकलेल्या विहिरींना पाणी तर लागतंच पण पावसाचं पाणी साठून आजूबाजूच्या इतर पाण्याच्या स्रोतांना देखील पाण्याची पातळी वाढायला फायदा होतो.
http://www.saveindianfarmers.org/project-jal/

शेवग्याच्या शेंगा प्रकल्प [Sticks to Grow] - महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र
उद्धेश - शेतकऱ्याला कमी गुंतवणुकीत अधिक मिळकत व्हावी.
भागीदार - वैयक्तिक मदत - श्री. मराळे, श्री. जामदार, श्री. लोखंडे, श्री. खंडाळे
समस्या - शेतकरी बियाणे घेण्यासाठी कर्ज काढतो, मग पावसाअभावी पीक येत नाही आणि तो कर्ज फेडू शकत नाही. असेच वर्षानुवर्षे होत राहून तो शेवटी कर्जाच्या डोंगराखाली बुडून जातो.
उपाय - शेवग्याच्या शेंगांचे झाड हे कमी पाण्यात जगते. त्याच्या वाढीला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. सात वर्षांपर्यंत हे झाड उत्पन्न देऊ शकते. एका वेळेच्या ६०,००० - ७०,००० रुपयांच्या गुंतवणुकीत ही झाडे दर वर्षी १-२ लाखांच उत्पन्न देऊ शकतात. शेतजमिनीच्या परिसरात ही झाडे लावल्याने शेतात पाणी मुरून राहून जमिनीची धूप कमी होते, यामुळे इतर शेतीलाही फायदा होतो.
http://www.saveindianfarmers.org/project/ongoing-projects/
हा प्रकल्प सध्या सुरु असून , यासाठी फंडस् गोळा करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क करा.

बुंदेलखंड प्रकल्प - बुंदेलखंड , उत्तर प्रदेश
उद्धेश - भारतातील कदाचित सर्वात मागासलेला प्रदेश. या प्रदेशात अनेक निरनिराळे प्रकल्प सुरु करणे.
भागीदार - परमार्थ समाज सेवी संस्थान, Asia Initiative
समस्या - गरिबी, रोगराई, अशिक्षिता, जातीयवाद, अस्वच्छता, बेरोजगारी
उपाय - आरोग्य तपासणी छावण्या, सामुदायिक भाजीची बाग, tablets वर प्रशिक्षण, गावातील स्वच्छता मोहीम. जल प्रकल्प आणि उडाण प्रकल्प या विभागात चालू केले

कर्जपुरवठा [मायक्रो फायनांसिन्ग] -
उद्धेश - शेतकरी स्त्री कुटुंबाची मोठी कर्जे फेडू शकेल
भागीदार -
समस्या - शेतकरी बियाणे घेण्यासाठी कर्ज काढतो, मग पावसाअभावी पीक येत नाही आणि तो कर्ज फेडू शकत नाही. असेच वर्षानुवर्षे होत राहून तो शेवटी कर्जाच्या डोंगराखाली बुडून जातो.
उपाय - शेतकरी स्त्रीला कमीत कमी व्याजात कर्ज मिळवून एखादा व्यवसाय सुरु करून देणे, जेणेकरून ती आपले उत्पन्न वाढवून कुटुंबाची मोठी कर्जे फेडू शकेल
http://www.saveindianfarmers.org/project/micro-financing-families/
हा प्रकल्प सध्या सुरु असून , यासाठी फंडस् गोळा करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी वरील लिंक वर जा.

आंध्रप्रदेश कुटुंबाना मदत- जिल्हा; अनंतपूरम, आंध्र
उद्धेश - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना स्वतःच्या पायावर उभे करणे
भागीदार - Rural & Environmental development society [REDS]
समस्या - महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यात वाढत जाणारी आत्महत्यांची संख्या.
उपाय - शेतकरी स्त्रीला मदत करून स्वावलंबी बनवणे.
http://www.saveindianfarmers.org/project/andhra-pradesh-families/
काही यशस्वी प्रकल्प
किसान मित्र हेल्पलाईन - मदतीसाठी गावकरी कधीही या फोन नंबर वर कॉल करून प्रश्न विचारू शकतात.
किसान अवॉर्ड - http://www.saveindianfarmers.org/project/kisan-award/
पठारी पाणपोई - http://www.saveindianfarmers.org/project/pathari-reservoir-project/
कुटुंबाना मदत - http://www.saveindianfarmers.org/project/helping-widows/
मातांना मदत - http://www.saveindianfarmers.org/project/south-asian-moms-sam/

“Save Indian Farmers” ही संस्था रजिस्टर्ड नॉन-प्रॉफिट असून, भारत मध्ये सुद्धा एक शाखा आहे. ही स्वयंसेवी संस्था असून सर्व मेंबर्स कोणताही मोबदला न घेता दिवस रात्र या कामासाठी कार्यरत असतात.
www.saveindianfarmers.org

“Hidden Gems” ही संस्था रजिस्टर्ड नॉन-प्रॉफिट ,स्वयंसेवी संस्था असून सर्व मेंबर्स कोणताही मोबदला न घेता आनंदाने गाणी म्हणत , रसिकांचे मन रिझवत समाजकार्य करत असतात.
www.hidden-gems.org
-तेजू किरण
ऑगस्ट ३१ २०१७.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults