नमस्कार मायबोलीकर! मी मायबोलीचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.
अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल.
( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता. कवितेचं नाव आहे "कविराज" )
अहो भाग्य हे तया लाभले
सारे श्रोते अधीर जाहले
उत्साहाने कविता करण्या
टाकुनी कामे टाक उचलले
बालकवी ते गदिमा स्मरले
कल्पिताच मग बाहू स्फुरले
अजरामर हे काव्य करूया
असे मनाशी पक्के ठरले
प्रयासांच्या सरी बरसल्या
शब्दांच्या मग फैरी झडल्या
यमका मागूनी आली यमके
पंक्ती तरीही फिक्या वाटल्या
गण मात्रा अन यतिभंग
याचा काही नसेच गंध
मनासीच मग म्हणे आपुल्या
बरा आपुला मुक्तछंद
कागदांचे ढीग जाहले
दौतीनेहि तोंड वासले
कविराजांचे यत्न बापुडे
सारेच्या ते सारे फसले
म्हणे कवी मज प्रतिभा खाशी
परी लेखणी आहे कलुषि
कविते लायक कागद मिळता
सुचेल कविता चुटकीसरशी
कविराजाला सांगा कोणी
आडातच जर नसेल पाणी
पोहऱ्यात मग येई कोठूनी
पोहऱ्यात मग येई कोठूनी