चमत्कार-दृष्टिकोन [संपादित]

Submitted by र।हुल on 5 November, 2017 - 10:52

जुन्या लेखाचा संपादनकाल संपल्याने हा संपादित केलेला लेख पुन्हा नविन धागा काढून टाकतो आहे. समजून घ्याल अशी अपेक्षा. Happy

पहिल्यांदा मी चमत्काराची व्याख्या करतो.
'चमत्कार म्हणजे अशा गोष्टी ज्या बघणार्याच्या जाणिवेला, बुद्धीला; ज्ञात माहितीस्त्रोत वापरून, ज्ञात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परीमाणं लावून बघितली असता अनाकलनीय असतात.'
[ व्याख्या ढोबळमानाने केली आहे. चुकल्यास कर्रेक्ट करा. Happy ]

चमत्कार!!!!!!
चमत्कार म्हटलं की सामान्य लोकांचे डोळे हे विस्फारणारच! आध्यात्मिक जगतात त्यांच स्वतंत्रपणे मुल्यमापन होणार. शास्त्रज्ञ, संशोधक वृत्तीची माणसं चमत्कारांना न नाकारता त्यांच्यापाठीमागिल दडलेलं ज्ञात-अज्ञात विज्ञान-तंत्रज्ञान शोधण्याच्या खनपटीला लागणार. आस्तिक, ईश्वरवादी मंडळी चमत्कारांना अमानवीय, अतिमानवीय, दैवी अथवा असुरी गोष्ट समजून श्रद्धेनं हात जोडणार किंवा घाबरून धास्ती घेणार तर निव्वळ नास्तिक असणारे लोक चमत्कारांची खिल्ली उडविणार, सगळी हातचलाखी आणि फसवेगिरी आहे असं सांगून मोकळे होणार. कोणी छद्मविज्ञान म्हणणार. शेवटी ज्याची जशी वैचारिक बैठक तसा तो विचार करणार.

आता माझी योगशास्त्रीय बैठक असलेली भूमिका मांडतो. थोडी क्लिष्ट जरूर आहे पण त्याला पर्याय नाही.
योगशास्त्र सुक्ष्म शारीरिक पातळीवर काम करतं. 'योग' म्हणजे निव्वळ आसनं, प्राणायाम नसून त्याबरोबरच ध्यानधारणा, जप याही गोष्टी त्यात अंतर्भूत होतात. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारे सात यौगिक चक्रे, तिन लाखांहून अधिक यौगिक नाड्या त्यांतील प्रमुख चौदा व प्रधान तिन नाड्या या सर्वांमध्ये विश्वातलं चैतन्य आत्मरूपानं सुप्तावस्थेत विखुरलेलं असतं. ज्यावेळी साधनेला सुरूवात केली जाते तेव्हा प्रथम शरीरशुद्धीनंतर, मिळालेल्या जपाच्या सहाय्यानं मुलाधारस्थित कुंडलीनीला जागृतावस्थेत आणण्यासाठीचा प्रयत्न केला जातो. यादरम्यान जसजसं शरीर यौगिक पातळीवर विकसित होत जातं, तुमचं आध्यात्मिक तेज आणि शक्ती वाढीस लागते. त्राटक, केवल कुंभक वैगरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला साध्य करता आल्या तर तुमच्याकडून चमत्कार घडणं विशेष नसतं. साधकाला, 'त्राटक' साधलं तर एखाद्याच्या भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा वेध घेणं फारसं अवघड नसतं. उदाहरणार्थ- एखादी व्यक्ती कुणा बाबा, महाराज, बापू म्हणवून घेणार्यासमोर बसते आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यातील, ज्यांची कुणालाही माहिती नाही अशा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळतील घटना, प्रसंग,गोष्टी यांची सविस्तर माहिती बाबा-महाराज वैगरेंकडून समोरील व्यक्तीला ऐकवली जाते.

'केवल कुंभक' साध्य झालं असता मंत्रोच्चारानं अनाकलनीय गोष्टी घडतात आणि घडवता येऊ शकतात. कारण नादब्रह्माचा वापर करून शक्तींना खेळवण्यासाठी हवं असलेलं साधनशील शरीर तयार झालेलं असतं. जे परीणामकारकरित्या मंत्रांचा प्रभाव दाखवून देतं.
योगसाधनेत कुंडलिनीच्या जागृतीनंतर तिच्या पुढील प्रवासादरम्यान अष्टसिद्धि तुमच्यासमोर हजर होतात. उदाहरणार्थ एखाद्यी व्यक्ती कुठलीही हातचलाखी न करता (ही शक्यता फार कमी असते) बंद मुठीतून काहीतरी वस्तू वैगरे काढून देते आणि मग समोर उपस्थित जनसमुदायामध्ये ती व्यक्ती बाबा, महाराज, बापू वैगरे म्हणून मिरवते. म्हणतात ना, 'चमत्कार तेथे नमस्कार!' तो हाच असतो. जी माणसं अशा काही गोष्टी आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी बघतात ते मग अशा बाबा, महाराज, बापूंवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यांना देवत्व बहाल करतात पण त्याना, त्यांचा हा विश्वास 'आंधळा विश्वास' आहे; हे लक्षातच येत नाही. याचं सगळ्यांत महत्वाचं कारण म्हणजे आध्यात्माविषयीचं अज्ञान किंवा अपुर्ण ज्ञान. योगसाधना करत असताना साधकाला साधनमार्गावरून बाजूला करण्यात अष्टसिद्धि महत्वाची भूमिका निभावतात. तेच त्यांच ठरलेलं कार्य असतं. एखाद्या तपस्व्याला एखादी स्त्री कामसुखाचं आमिष दाखवून त्याची तपश्चर्या भंग करते तशी सिद्धिंची किमया असते. ज्या साधकाने सिद्धींना अंगिकारलं तो साधनमार्गावरून भरकटला जातो आणि मायेत फसतो. चमत्कार दाखवून तो समाजाची, लोकांची दिशाभूल करताना दिसत असला तरी प्रत्यक्षात तो त्याची स्वत:चीच घोर फसवणूक करत असतो. जर सुरूवातीलाच तो आंतरिक स्फुर्तीने योगसाधनेकडे वळला असेल तर निश्चितच तो गतजन्मीचा योगी किंवा योगभ्रष्ट झालेला साधक असतो. आपली आध्यात्मिक -आत्मिक उन्नती करून 'पिंडी ते ब्रह्मांडी' हा प्रवास त्याला करायचा असतो पण चमत्कार करणे, लोकांवर मोहिनी घालणे, सिद्धिंचा उपयोग स्वत:ची आर्थिक प्रगती करण्यासाठी करणे यांमुळे तो पुन्हा योगभ्रष्टच होतो. साधनेतून प्राप्त झालेली आध्यात्मिक शक्ती शेवटी संपते आणि सिद्धि निघून जातात मग त्या साधकाची, कधी काळी मोठा बाबा, महाराज, बापू, सदगुरू म्हणून मिरवलेल्या व्यक्तीची अवस्था भाकड गाई प्रमाणे होते. अशा वेळी तो फक्त पोकळ गर्जना करू शकतो. तो 'योगी' न राहता 'भोगी' बनलेला असतो. पण तोपर्यंत भली मोठी आर्थिक माया जमवलेली असते. जिच्या सहाय्यानं त्याची, त्याच्या परिवाराची (?) जगण्याची सोय तर होते पण कधी काळचं आध्यात्मिक वैभव लोप पावलेलं असतं. कधीतरी अशा लोकांनी 'अंधारात' केलेल्या काही 'नाजूक', 'साजूक' गोष्टी समाजासमोर जाहिरपणे येतात, कायद्याचा जाच सुरू होतो आणि मग त्यांच्यावर अपार आंधळी श्रद्धा असलेले भक्त त्यांच्या 'देवा'वरील संकटांनी पिसाळल्यागत करतात. ज्या चमत्कार्यांना वरील चमत्कारांचा मार्ग साधत नाही ते हातचलाखीवाले चमत्कार करून लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात, कधीतरी पकडले जातात आणि मग नास्तिकांना धर्मविरोधी बळ येतं. नैसर्गिक चमत्कार हे मात्र निसर्गाची किमया म्हणून सहजपणे स्विकारले जातात.
शेवटी चमत्कार ही एक सापेक्ष गोष्ट असते! ज्याला त्यापाठीमागिल कारणं माहीत असतात त्याला 'चमत्कार' हा चमत्कार वाटतच नाही.

समाजासमोर जेव्हा आध्यात्माचा, धर्माचा ठेका घेतल्याचा आव आणणार्या बाबा , महाराज, बापू लोकांची काही चीड आणणारी प्रकरणं येतात तेव्हा समाजाच्याही आध्यात्माप्रती असलेल्या अज्ञानामुळे धर्म, आध्यात्म याच गोष्टी बदनाम होतात. हे थाबणं गरजेचं आहे. ह्या जगात आध्यात्म आहे, योगविज्ञान अस्तित्वात आहे यांच्या सहाय्यानं चमत्कार ह़ोतात, करता येतात मात्र ते अंतिम लक्ष नसतं. अंतिम लक्ष ज्ञानेश्वर सांगतात ती 'निजवस्तू' म्हणजे निर्गुण निराकार अशा परब्रह्माची निखळ आणि नि:संदिग्ध अनुभूती घेणे होय. हिच सनातन धर्मानं जगाला बहाल केलेली अमूल्य ठेव आहे जी सर्वांसाठी उपलब्ध आहे, साधनमार्गातून आणि योगसाधनेतून!

धन्यवाद!
आपलाच,
-र।हुल. / ५.१०.१७ [ ५.११.१७ ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जून्या धाग्यावरील प्रतिसाद―

Submitted by च्रप्स on 6 October, 2017 - 05:53
त्राटक, केवल कुंभक वैगरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला साध्य करता आल्या तर तुमच्याकडून चमत्कार घडणं विशेष नसतं. '
>>> मला झेपले नाही हे.. म्हणजे कळलेच नाही..
लेख चांगला आहे.. आणि चमत्कार सापेक्ष असतो हे माझे पण मत आहे...

Submitted by मेघा. on 6 October, 2017 - 07:43
मला समजून घ्यायला जरा वेळ लागेल..नंतर मग लिहिते...

Submitted by VB on 6 October, 2017 - 08:08
शिर्षकात चमत्कार पाहुन लगेच वाचायला घेतले,
पण बरेच डोक्यावरुन गेले. म्हणजे कळलेच नाही..
जरा एखादे सोपे उदाहरण देता आले असते तर कदचित थोडेफार कळले असते असे वाटले.
@ च्रप्स >>>> चमत्कार सापेक्ष असतो हे माझे पण मत आहे... + ११११११११

Submitted by कोहम् on 6 October, 2017 - 10:05
अजुन एक सोपी व्याख्या कुठं तरी वाचलेली आठवली
" जे मानवाचे प्रारब्ध बदलते तोच खरा चमत्कार "
जादूने हवेतुन कोंबडी काढली तर काय होईल ? ह्यास चमत्कार म्हणावे का हात चलाखी ! आणि अश्या गोष्टीने फारफार तर एकवेळचं जेवण करून पोट भरेल Happy पण जी सद्गुरुकृपा त्या मानवाचे नशीब बदलू दाखवते, प्रारब्ध बदलून देते तोच त्या भक्ताच्या आयुष्यातील खरा चमत्कार Happy
साईनाथ असो की ज्ञानेश्वर माऊली ह्या सर्वानी भक्ताना जीवन विकास साधता यावा म्हणून चमत्कार घडवून आणले

Submitted by प्रकाश घाटपांडे on 6 October, 2017 - 13:04
चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणार मूर्ख असतात असे अब्राहम कोवूर म्हणायचे. अंनिस त्यांचे हे वाक्य सुरवातीच्या काळात वापरत असे. चमत्कार असेल तर नमस्कार असतो म्हणून बाबा बुवा चमत्काराच्या हकीगती पसरवतात. चमत्कारा मागचे विज्ञान ज्ञात झाले की चमत्कार हा चमत्कार रहात नाही. पण जेव्हा चमत्कार अनुभूती शी निगडीत असतो तेव्हा तो व्यक्ती सापेक्ष बनतो. अनुभूती कशी दुसर्याला ट्रान्स्फर करणार? जेव्हा ही बाब बदमाशी साठी वापरली जाते त्यावेळी त्यामागचे वैज्ञानिक सत्य हे लोकांना सांगितले पाहिजे. अनुत्तरीत प्रश्न हे नेहमीच असणार त्यामुळे वर तुम्ही व्याखेत बसवलेला चमत्कार हा कायमच असणार आहे.

Submitted by mr.pandit on 6 October, 2017 - 15:38
छान लेख आवडला छान माहिती दिलीत.

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 October, 2017 - 00:26
त्राटक, केवल कुंभक वैगरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला साध्य करता आल्या तर तुमच्याकडून चमत्कार घडणं विशेष नसतं. 'त्राटक' साधलं तर एखाद्याच्या भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा वेध घेणं अवघड नसतं. 'केवल कुंभक' साध्य झालं असता मंत्रोच्चारानं अनाकलनीय गोष्टी घडतात आणि घडवता येऊ शकतात. कुंडलिनीच्या जागृतीनंतर तिच्या पुढील प्रवासादरम्यान अष्टसिद्धि तुमच्यासमोर हजर होतात
>>>>>
हे सोडून बाकी लेख पटला Happy

शास्त्रज्ञ, संशोधक वृत्तीची माणसं चमत्कारांना नाकारता त्यांच्यापाठीमागिल दडलेलं ज्ञात-अज्ञात विज्ञान-तंत्रज्ञान शोधण्याच्या खनपटीला लागणार.-->> इथे न नकोय ना?

इथे न नकोय ना?
'चमत्कारांना न नाकारता' म्हणजे 'अनाकलनीय गोष्टी असतच नाही, त्या फक्त फेक, अफवा असतात असा पूर्वग्रह न करता त्यांच अस्तित्व मान्य करतात.'

राहुल,
उत्तम विश्लेशण.
अनिरुद्ध

एखाद्यी व्यक्ती कुठलीही हातचलाखी न करता (ही शक्यता फार कमी असते) बंद मुठीतून काहीतरी वस्तू वैगरे काढून देते आणि मग समोर उपस्थित जनसमुदायामध्ये ती व्यक्ती बाबा, महाराज, बापू वैगरे म्हणून मिरवते. म्हणतात ना, 'चमत्कार तेथे नमस्कार!' तो हाच असतो. जी माणसं अशा काही गोष्टी आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी बघतात ते मग अशा बाबा, महाराज, बापूंवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यांना देवत्व बहाल करतात पण त्याना, त्यांचा हा विश्वास 'आंधळा विश्वास' आहे; हे लक्षातच येत नाही>>/++११
हा अनुभव घेतलाय मी...

हा लेख समजला ... Happy अस सोप्प करुन सांगत जा रे बाबा..
पु.ले.शु.