डिस्क्लेमर- ही पोस्ट मी किती भारी वगैरे लिहिण्यासाठी लिहिलेली नाहीये. जे काय शो ऑफ करायचा आहे तो वीकेंडला आधीच करून घेतला आहे.
मला नेहमीच आपल्या सामान्य असण्याचं दुःख वाटतं. शरीरयष्टी, उंची, दिसणं, शिक्षण, नोकरी, लग्न, संसार वगैरे करोडो लोकांसारखं सामान्य. अजूनही मोठ्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये जायला भीती वाटते. उगाच तिथल्या सेल्समनने मला धरलं आणि काहीतरी महागच घ्यायला लागलं तर? किंवा खूप पैसे देऊन पोटच नाही भरलं तर? असे प्रश्न मला पडत राहतात. असो. शाळेत असताना गाण्यात, रांगोळी स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन जिंकणाऱ्या मुलांचं फार कौतुक वाटायचं. आपल्यात अशा काही ग्रेट कला नाहीत याचं वेळोवेळी दुःख होतंच असतं. शाळेत असताना अगदीच बारीक असल्याने किंवा कुठल्याही खेळात भाग घ्यायची इच्छा असली तरी प्रकृतीने साथ न दिल्याने कधीही खेळले नाही. साधं वर्गातल्या खो-खो मधेही पहिली आऊट होणारी मीच असेन.
एकूण काय तर आयुष्यात ग्रेट म्हणता येईल असं काहीही केलं नाहीये आणि आता होईल असं वाटतही नाही. त्यामुळे मी जेव्हा पळायला सुरुवात केली तेंव्हा आपण कितीही ग्रेट काम करतोय असं स्वतःला वाटलं तरी बाकीच्या लोकांसमोर खुजेपणा जाणवतच असे. तरीही हिम्मत करून मी पहिल्या हाफ मॅरेथॉनला रजिस्टर केलं होतं. २०१२ मध्ये स्वनिक चार महिन्यांचा असताना या प्रवासाला सुरुवात केली होती. तेंव्हा केवळ पुन्हा मूळच्या वजनाला यायचं हे एक ध्येय होतं. आणि तेव्हा सर्वात जास्त मला स्वतःला वेळ देण्याची गरज वाटत होती. नोकरी, मुलं, घर आणि बाकी सर्व जे काही चालू होतं त्यातून स्वतःला वेळ काढायचा होता, कितीही अवघड असलं तरी. त्या रेसच्या निमित्ताने हे झालं होतं. तेव्हा मोठ्या कौतुकाने त्याबद्दल लिहिलंही होतं.
त्यानंतर रनिंग हे माझ्याचसाठी नाही तर आमच्या घरात नियमित झालं. त्यासाठी वेळ काढणं, एखाद्या रेससाठी रजिस्टर करून तयारी करणे, सरावाचे प्लॅन्स बनवणे, हे सर्व सुरु झालं. पुण्यात असताना काही रेस पळाले मैत्रिणींसोबत. आणि तेव्हाच नवऱ्याचीही पळण्याची सुरुवात झाली होती. तिथून पुढे आम्ही दोघे जवळजवळ सर्वच रेस सोबत गेलो आहे. हे सर्व करताना एकेक करत दोघांच्या घरचे आणि आमचे मित्र-मैत्रिणीही सामील होत राहिले. कधी पळायला तर कधी मुलांना सांभाळायला. आम्ही दोघेही एखाद्या रेसला जात असताना, मुलांचं कुणीतरी बघणं आवश्यक असतंच. प्रत्येकवेळी घरातलं कुणीतरी पाहत होतं किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याकडे मुले आनंदाने राहतात. अशा वेळी आपण किती नशीबवान आहोत हे जाणवत राहतं.
आमच्या दिनचर्येत पळणं अविभाज्य घटक झाल्याने मुलांनीही ते आता स्वीकारलं. आणि आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहनमिळत राहिलेय. कधी ट्रेडमिलवर १०-१५ मिनिटे पळून तर कधी आम्ही मेडल्स घेऊन घरी आल्यावर ते गळ्यात घालून मिरवूनही. मी सुरुवात केली होती तेंव्हा एकटीच पळत होते. मग हळूहळू नवरा, मित्र-मैत्रिणी सोबत आले. आवडीनुसार त्यातील अनेकांनी कधी रेसमध्ये सहभाग घेतला, काहींनी जिममध्ये. इथे बॉस्टनमध्येही दर रविवारी पळायला जाताना एकेक करत मित्र-मैत्रिणी सोबत येऊ लागले आहेत आणि हा सहभाग असाच वाढावा ही इच्छाही आहेच.
आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे, रविवारी सकाळी बॉस्टन हाफ मॅरेथॉन झाली. या वर्षातील शेवटची रेस. मागच्या वर्षी प्रमाणे, यावेळीही ३ रेस केल्या, ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि. मी. आजची ! या वर्षीची ही शेवटची रेस खास होती एका कारणासाठी. ते म्हणजे ही माझी पाचवी हाफ मॅरेथॉन होती. एकेक करत पाच मोठ्या रेस झाल्यावर जाणवत आहे की हे इथंच थांबणार नाहीये. अजूनही मी म्हणत नाहीये की खूप काही ग्रेट करत आहे. एकतर मी खूप हळू पळते, जवळजवळ चालतेच. माझ्यासमोर अनेक उदाहरणं पाहिलीत ज्यात माझ्यापेक्षा जोरात पळणाऱ्या ५५ वर्षाच्या काकूही होत्या. इथे मायबोलीवरही अनेक लोक आहेत ज्यांचे अनुभव वाचून प्रोत्साहन मिळते. पण कितीही सामान्य असलं तरी आज पाच वर्षांनी त्यात आपण किती पुढे आलो आहे हे जाणवत आहे.
पहिल्या रेसच्या वेळी खूप काळजीत होते, आजूबाजूच्या लोकांना बघून आपण किती नवखे आहोत हे जाणवत राहायचं. ते अजूनही वाटतंच. पण तेव्हा एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं की तुम्ही दिवसातून १५ मिनिट पळत असाल किंवा चालत असाल, तुम्ही ते करताय ते पुरेसं आहे स्वतःला 'रनर' म्हणवून घेण्यासाठी. त्यासाठी तुम्ही ग्रेट रनर असलेच पाहिजे असे. (तोच युक्तिवाद मी माझ्या ब्लॉगसाठीही वापरला पुढे मग. अगदी नसेल मी मोठी लेखिका, पण नियमित लिहितेय ना? मग आहे मी लेखक. असो. ) तर त्या एका वाक्यामुळे मी पुढे जात राहिले, माझ्यापेक्षा कितीतरी भारी लोक असले तरी मीही 'रनर' आहे हे स्वतःला सांगत राहिले. आज पाच वर्षांनी मागे वळून पाहताना तेंव्हा आपण माघार घेतली नाही याचा खूप आनंद होत आहे.
मी इथेही सर्वांना सांगू इच्छिते, ज्यांना खरंच काहीतरी प्रयत्न करायचे आहेत किंवा ज्यांना कुठूनतरी सुरुवात करायची आहे त्यांना. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे जमलं तर बाकीच्यांनाही सहज जमेल. अनेकदा 'ते लोक काय फार भारी असतील' म्हणून आपण माघार घेतो. पण हे सर्व एका दिवसात होत नाही. आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो किंवा छोटी ब्लॉग पोस्ट असो. पण सुरुवात करायला हवी आजच!
पाच वर्षांच्या निमित्ताने सर्व मेडल्स सोबत घेतलेला एक फोटो.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
खुप छान
खुप छान
कीप इत अप. पळणे सातत्याने
कीप इत अप. पळणे सातत्याने सुरू ठेवणे अधिक अवघड आहे. ते तुम्ही साधले आहे त्याबद्दल अभिनंदन
खरे आहे.
खरे आहे.
केल्याने होत आहे रे
आधी केलेचि पाहिजे
आपण एखादी गोष्ट जी नियमित
आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो किंवा छोटी ब्लॉग पोस्ट असो. Happy पण सुरुवात करायला हवी आजच!>>>>>>>>
+10000
टिकाऊ सुरवात करायलाच हवी ...
फारच छान! मनःपूर्वक अभिनंदन
फारच छान! मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या पळण्याच्या कारकीर्दीला शुभेच्छा
खुप छान विद्या. सगळ्या मेडल्स
खुप छान विद्या. सगळ्या मेडल्स बद्दल अभिनंदनही.
फारच छान! मनःपूर्वक अभिनंदन
फारच छान! मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या पळण्याच्या कारकीर्दीला शुभेच्छा.
अभिनंदन! कीप इट अप!
अभिनंदन! कीप इट अप!
Pages