पण सुरुवात करायला हवी.....

Submitted by विद्या भुतकर on 9 October, 2017 - 23:07

डिस्क्लेमर- ही पोस्ट मी किती भारी वगैरे लिहिण्यासाठी लिहिलेली नाहीये. जे काय शो ऑफ करायचा आहे तो वीकेंडला आधीच करून घेतला आहे. Happy

मला नेहमीच आपल्या सामान्य असण्याचं दुःख वाटतं. शरीरयष्टी, उंची, दिसणं, शिक्षण, नोकरी, लग्न, संसार वगैरे करोडो लोकांसारखं सामान्य. अजूनही मोठ्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये जायला भीती वाटते. उगाच तिथल्या सेल्समनने मला धरलं आणि काहीतरी महागच घ्यायला लागलं तर? किंवा खूप पैसे देऊन पोटच नाही भरलं तर? असे प्रश्न मला पडत राहतात. असो. शाळेत असताना गाण्यात, रांगोळी स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन जिंकणाऱ्या मुलांचं फार कौतुक वाटायचं. आपल्यात अशा काही ग्रेट कला नाहीत याचं वेळोवेळी दुःख होतंच असतं. शाळेत असताना अगदीच बारीक असल्याने किंवा कुठल्याही खेळात भाग घ्यायची इच्छा असली तरी प्रकृतीने साथ न दिल्याने कधीही खेळले नाही. साधं वर्गातल्या खो-खो मधेही पहिली आऊट होणारी मीच असेन.

एकूण काय तर आयुष्यात ग्रेट म्हणता येईल असं काहीही केलं नाहीये आणि आता होईल असं वाटतही नाही. त्यामुळे मी जेव्हा पळायला सुरुवात केली तेंव्हा आपण कितीही ग्रेट काम करतोय असं स्वतःला वाटलं तरी बाकीच्या लोकांसमोर खुजेपणा जाणवतच असे. तरीही हिम्मत करून मी पहिल्या हाफ मॅरेथॉनला रजिस्टर केलं होतं. २०१२ मध्ये स्वनिक चार महिन्यांचा असताना या प्रवासाला सुरुवात केली होती. तेंव्हा केवळ पुन्हा मूळच्या वजनाला यायचं हे एक ध्येय होतं. आणि तेव्हा सर्वात जास्त मला स्वतःला वेळ देण्याची गरज वाटत होती. नोकरी, मुलं, घर आणि बाकी सर्व जे काही चालू होतं त्यातून स्वतःला वेळ काढायचा होता, कितीही अवघड असलं तरी. त्या रेसच्या निमित्ताने हे झालं होतं. तेव्हा मोठ्या कौतुकाने त्याबद्दल लिहिलंही होतं.

त्यानंतर रनिंग हे माझ्याचसाठी नाही तर आमच्या घरात नियमित झालं. त्यासाठी वेळ काढणं, एखाद्या रेससाठी रजिस्टर करून तयारी करणे, सरावाचे प्लॅन्स बनवणे, हे सर्व सुरु झालं. पुण्यात असताना काही रेस पळाले मैत्रिणींसोबत. आणि तेव्हाच नवऱ्याचीही पळण्याची सुरुवात झाली होती. तिथून पुढे आम्ही दोघे जवळजवळ सर्वच रेस सोबत गेलो आहे. हे सर्व करताना एकेक करत दोघांच्या घरचे आणि आमचे मित्र-मैत्रिणीही सामील होत राहिले. कधी पळायला तर कधी मुलांना सांभाळायला. आम्ही दोघेही एखाद्या रेसला जात असताना, मुलांचं कुणीतरी बघणं आवश्यक असतंच. प्रत्येकवेळी घरातलं कुणीतरी पाहत होतं किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याकडे मुले आनंदाने राहतात. अशा वेळी आपण किती नशीबवान आहोत हे जाणवत राहतं.

आमच्या दिनचर्येत पळणं अविभाज्य घटक झाल्याने मुलांनीही ते आता स्वीकारलं. आणि आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहनमिळत राहिलेय. कधी ट्रेडमिलवर १०-१५ मिनिटे पळून तर कधी आम्ही मेडल्स घेऊन घरी आल्यावर ते गळ्यात घालून मिरवूनही. मी सुरुवात केली होती तेंव्हा एकटीच पळत होते. मग हळूहळू नवरा, मित्र-मैत्रिणी सोबत आले. आवडीनुसार त्यातील अनेकांनी कधी रेसमध्ये सहभाग घेतला, काहींनी जिममध्ये. इथे बॉस्टनमध्येही दर रविवारी पळायला जाताना एकेक करत मित्र-मैत्रिणी सोबत येऊ लागले आहेत आणि हा सहभाग असाच वाढावा ही इच्छाही आहेच.

आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे, रविवारी सकाळी बॉस्टन हाफ मॅरेथॉन झाली. या वर्षातील शेवटची रेस. मागच्या वर्षी प्रमाणे, यावेळीही ३ रेस केल्या, ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि. मी. आजची ! या वर्षीची ही शेवटची रेस खास होती एका कारणासाठी. ते म्हणजे ही माझी पाचवी हाफ मॅरेथॉन होती. एकेक करत पाच मोठ्या रेस झाल्यावर जाणवत आहे की हे इथंच थांबणार नाहीये. अजूनही मी म्हणत नाहीये की खूप काही ग्रेट करत आहे. एकतर मी खूप हळू पळते, जवळजवळ चालतेच. माझ्यासमोर अनेक उदाहरणं पाहिलीत ज्यात माझ्यापेक्षा जोरात पळणाऱ्या ५५ वर्षाच्या काकूही होत्या. इथे मायबोलीवरही अनेक लोक आहेत ज्यांचे अनुभव वाचून प्रोत्साहन मिळते. पण कितीही सामान्य असलं तरी आज पाच वर्षांनी त्यात आपण किती पुढे आलो आहे हे जाणवत आहे.

पहिल्या रेसच्या वेळी खूप काळजीत होते, आजूबाजूच्या लोकांना बघून आपण किती नवखे आहोत हे जाणवत राहायचं. ते अजूनही वाटतंच. पण तेव्हा एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं की तुम्ही दिवसातून १५ मिनिट पळत असाल किंवा चालत असाल, तुम्ही ते करताय ते पुरेसं आहे स्वतःला 'रनर' म्हणवून घेण्यासाठी. त्यासाठी तुम्ही ग्रेट रनर असलेच पाहिजे असे. (तोच युक्तिवाद मी माझ्या ब्लॉगसाठीही वापरला पुढे मग. अगदी नसेल मी मोठी लेखिका, पण नियमित लिहितेय ना? मग आहे मी लेखक. Happy असो. ) तर त्या एका वाक्यामुळे मी पुढे जात राहिले, माझ्यापेक्षा कितीतरी भारी लोक असले तरी मीही 'रनर' आहे हे स्वतःला सांगत राहिले. आज पाच वर्षांनी मागे वळून पाहताना तेंव्हा आपण माघार घेतली नाही याचा खूप आनंद होत आहे.

मी इथेही सर्वांना सांगू इच्छिते, ज्यांना खरंच काहीतरी प्रयत्न करायचे आहेत किंवा ज्यांना कुठूनतरी सुरुवात करायची आहे त्यांना. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे जमलं तर बाकीच्यांनाही सहज जमेल. अनेकदा 'ते लोक काय फार भारी असतील' म्हणून आपण माघार घेतो. पण हे सर्व एका दिवसात होत नाही. आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो किंवा छोटी ब्लॉग पोस्ट असो. Happy पण सुरुवात करायला हवी आजच!

पाच वर्षांच्या निमित्ताने सर्व मेडल्स सोबत घेतलेला एक फोटो. Happy
22308743_1774531202620847_4974970833050025819_n.jpg

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन ! कोणतीही गोष्ट सुरू करणे फार सोपे आहे पण ती कॅन्टीन्यू करत राहणे फार अवघड...
पुढील अनेक मॅरेथॉन साठी शुभेच्छा !!!

मस्तच!!
अशीच (जॉइन्ट्स सांभाळून) पळत रहा!

पण कितीही सामान्य असलं तरी आज पाच वर्षांनी त्यात आपण किती पुढे आलो आहे हे जाणवत आहे.

विद्या, फक्त हेच महत्वाचे. त्यातूनही कधी मनाजोगत्या वेळेत नाही संपवता आली रेस तरी मी एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि आपण सगळे हौशी खेळाडू आहोत आपल्याला मुख्य हेतू स्वतः ला तंदुरुस्त ठेवणे हा आहे. बाकी सगळे मिथ्या

शेवटी, अगदी खूप जोरात धावणार्‍याला जे फिनिशर्स मेडल मिळते तेच आपल्याला मिळते Proud

हार्दिक अभिनंदन....
पुढील धावपळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..... Happy

आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो किंवा छोटी ब्लॉग पोस्ट असो. >>>हे खूपच आवडले.

नेहमीप्रमाणेच छान लिहिले आहे.

अनेकदा 'ते लोक काय फार भारी असतील' म्हणून आपण माघार घेतो. पण हे सर्व एका दिवसात होत नाही. आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो किंवा छोटी ब्लॉग पोस्ट असो. Happy पण सुरुवात करायला हवी आजच!
>>
एकदम मस्त. माझ्यासारखे बरेच लोक आरंभशूर असतात. माझ्या बिल्डींगच्या समोर असलेल्या जीम मध्ये जायची सुरुवात गेल्या ३ महिन्यात मी ४-५ वेळा केली आहे. Happy
तुम्ही पाच वर्षं सातत्य ठेवले आहे याचे कौतुक.
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !

वा विद्या! चेहरा काय खुललाय तुझा ! self-motivated असणं म्हणजे काय ते सोदाहरण दाखवलं आहेस.
वर्षागणिक अधिकाधिक मेडल्स तुझ्या गळ्यात येउन पडोत यासाठी खूप शुभेच्छा !!

खूप छान अनुभव शेअर केलाय. छान लिहीलय (आता तुम्ही लेखक आहात असं सांगून टाकलय म्हटल्यावर ह्या प्रशंसेला तसा काही अर्थ उरत नाही म्हणा Wink )

छान! स्वतःसाठी काहितरी केलत आणि चिकाटीने हिच भावना मस्तय....

( आम्ही तर आजकाल, का केलं नाही कारण देत फिरतोय.. दर महिन्याला जिमचे पैसे व्यव्स्थित कापले जाताहेत, तर स्विमिंग मेंबरशिपचे पैसे सुद्धा वाया जाताहेत..आज जाउ पोहायला, उद्या जाउ पण काहीच नाही. निर्लज्ज पातळीवर( स्वतःलाच कारणं द्यायच्या) पोहोचलीय ह्याची जाणीव होतेय तरी होत नाहीये काहीये.)

पळत पळत एकदा न्यू जर्सीला या - इथे एडिसन आहे - बरेच उत्साही मायबोलीकर आहेत.
सिंडरेला, तुम्हीहि त्यांच्या बरोबर या, म्हणजे इथे येता येता तुम्ही त्यांना इथल्या लोकांबद्दल काही(च्या) बाही सांगू शकाल.

तुमचे उ.मो. बॅक पॅकमधे मावतील.

@ विद्या अभिनंदन.
सुरवात (वारंवार ) होते. पण सातत्य रहात नाही. ते राखल्याबद्दल कौतुक अन अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

सर्वांचे खूप खूप आभार. Happy माझ्या आनंदात तुम्हीही सहभागी झालात,धन्यवाद. Happy

अरे ते मोठे मेडल आहे का ढाल?>> हो ना. Happy अजून एक्दा जावं म्हणतेय तिकडे. ते शिकागोचं आहे.
हर्पेन तुमच्या समोर माझे तीन तास म्हणजे कासवच ! Happy यावेळी मागच्या वर्शीपेक्षा जोरात पळायचं ठरवूनही फक्त १ मिनिट लवकर पोचले. :)) असो. फिनिशर मेडल शेवटी सर्वांचं सेमच. Happy
पळत पळत एकदा न्यू जर्सीला या >> नक्की. मला एकदा न्यू यॉर्क्ची हाफ पण करायची आहे:)बघू कधी जमते.
कुरुडी.. Happy थान्क्यु.
अशीच (जॉइन्ट्स सांभाळून) पळत रहा!>> अनु यावेळी वाटले की पुढे काय होईल माहीत नाहि. पण बसमधे शेजारीच ५० वर्शाची बाई बसली
होती. तिचा स्पीड पण जोरदाअर होता. त्यामूले अजून काही वर्षे आहेत असे वाटते.

पुन्हा एक्दा सर्वांचे आभार. आणि ज्यांना सुरुवात करायची आहे, पुन्हा सुरुवत करायची आहे, त्यांना शुभेछ्चा. Happy

विद्या.

अभिनंदन विद्या.
काहीही म्हणा पण रनिंग ला फार मोठी मनाची शक्ती लागते.
त्यासाठी (अधिक) अभिनंदन.

<<अभिनंदन ! कोणतीही गोष्ट सुरू करणे फार सोपे आहे पण ती कॅन्टीन्यू करत राहणे फार अवघड...
पुढील अनेक मॅरेथॉन साठी शुभेच्छा !!!>> +१

Pages