दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावपूर्ण श्रद्धांजली.. खूप ओळखीचा आयडी!
इथले वैशिष्ट्य हेच की लिखाणातून माणूस इतका ओळखीचा होत जातो. प्रत्यक्ष भेटला नसला तरी. त्यामुळे जवळची व्यक्ती गेल्यासारखंच वाटतं.

_/\_

भावपूर्ण श्रद्धांजली !! पुण्यात बर्‍याच गटगांना प्रत्यक्ष भेट झाली होती. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
बातमी ऐकून वाईट वाटलं.

धक्का बसला... अकु चे सगळे धागे पुन्हा पुन्हा वाचलेत. तिचे प्रतिसाद खूप आवडायचे. भावपूर्ण श्रध्दांजली.

फार ओळख वादसंवाद नव्हता..
म्हणून आता प्रोफाईल चाळले.. जे झाले त्याबद्दल वाईट वाटले
भावपूर्ण श्रद्धांजली...

काल अकुबद्दल समजल्यापासून खूप वाईट वाटत आहे.
तिच्याशी ओळख संयुक्ता मध्ये असताना झाली होती. त्यानंतर बोलणही व्हायचं. तिची आई आजारी होती तेव्हा बोलणं झाल होत आणि नंतर कमी होत होत बंद झालं. अलीकडेच तिची आठवण झाली होती. तिला तेव्हाच फोन का केला अस वाटत आहे!
खूप हसतमुख, गुणी मुलगी होती ती! खूप जणांना चटका लावून गेली.
तिच्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना यातून सावरायचं बळ मिळो आणि तिच्या आत्म्यास सद्गती लाभो ही देवाकडे प्रार्थना.

अरूंधती ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !!

त्यांची ओळख नव्हती पण मायबोलीकर म्हणून माहित होत्या. त्यामुळे वाईट वाटले. त्यांना काय झाले अचानक? कुणाला काही माहीती आहे का?

अकु!
काय अन किती आठवणी आहेत तिच्या. अकु माहिती झाली ती तिच्या अनेक माहितीपूर्ण विविध लेखांमुळे. संगीताच्या धाग्यांवरच्या तिच्या अनेको नोंदी, इतर अनेक माहिती विचारणाऱ्या धाग्यांवरच्या तिच्या अतिशय सविस्तर अन योग्य ते संपर्क दिलेल्या अनेक प्रतिसादांमधून. पुढे सामाजिक कार्यांमधे अन संयुक्तामधे तर तिचे काम पाहून थक्क व्हायला झालेलं.
किती विविध क्षेत्रातली किती सखोल माहिती होती तिला. अन महत्वाचं हे की अगदी लगेच पुढे होऊन सगळी माहिती अत्यंत सोप्या शब्दात ती देत असे. फार आदर वाटे ते सगळं वाचताना.
पुढे अंधशाळेच्या निमित्ताने तिची प्रत्यक्ष भेट झाली अन मग तिच्या अत्यंत खेळकर, सहृदय अन आनंदी स्वभावाने एकदम मैत्रीत रुपांतर झाले. नंतर एका व्हॉस्टअप गृपवर मैत्री झाली अन मग जणु ती धाकटी बहिणच झाली. रोजचा संपर्क, नवनवीन विषयांवरची माहिती देत रहाण्याचा तिचा अभ्यासू स्वभाव, एकदम जॉली, उत्साही पणा, तिचं जीवन रसरसून जगणं, आईच्या आजारपणातली तिची धावपळ, नंतर आईला सजग ठेवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणं अन नवनवीन कल्पना लढवणं , श्लोक, पाढे, कोडी, संस्कृत काव्य, किती किती प्रकारे ती आईला जगाशी जोडून ठेवत होती.
आमच्या गृपलाही वाढवणं, टिकवणं, वेळप्रसंगी सावरणं हे सगळं सगळं तिने केलं. अन या करण्याबद्दल अवाक्षर नाही.
तिचं जरा कौतुक केलं की उजळणारा तिचा चेहरा, त्यावरचं हसू अन नंतरचं, नाही ग इतकं काही नाही म्हणून लाजून मागे सरकणं, सगळं अगदी लखलखीत डोळ्यासमोर आहे. तिच्यात एक अतिशय प्रगल्भ, आध्यात्मिक पातळीवर वरचं पद मिळवलेली अकुही होती अन लहान बाळा प्रमाणे अत्यंत खेळकर, निर्व्याज पोरही होती. अन या दोघी अतिशय लाघवी होत्या.
अगदी शेवटीही बोलताना हसतच म्हणालेली आता नाही बोलायचय. त्रास होईल, पण तेही हसतच. खरच सन्यस्त योगिनी म्हणावं तिला! सगळ्यात भरभरून असलेली अन तरीही एक सजग वैराग्य असणारी!
अकु लव्ह यु, तू नेहमी म्हणायचीस की "गरम मुगाच्या डाळीची खिचडी अन वर तूप, आहाहा स्वर्ग! " आता तिथेच विहरत असशील, तिथेही हास्याचे फुलोरे फुलवत असशील अन तुझ्या लाडक्या बाप्पाला तुझं लाडकं जास्वंद (जपाकुसुम म्हणायचीस तू... ) देऊन त्याच्याशी गहन चर्चा करण्यात मश्गुल असशील, हो न!
अकु, तुझी आठवण सतत राहिल, पुन्हा एकदा लव्ह यु गो!

अकु यांना श्रद्धांजलीसाठी वेगळाच धागा केला तर ? त्यांच्या प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या सर्वांच्याच काही ना काही आठवणी असतील.

https://marathi.itsmajja.com/marathi-actor-subodh-bhave-shared-emotional...

वरील बातमीतील इरावती कुलकर्णी म्हणजे अकू का? त्यांच्या निधनाने सुबोध भावेंनाही फार वाईट वाटले.

बातमीत लिहील्याप्रमाणे :
इरावती कुलकर्णी या चाहतीच्या निधनानंतर सुबोधने भावुक पोस्ट लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आपल्या कामावर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिक व्यक्तीचं जाणं हे फार चटका लावणार असतं. इरावती तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. यापुढे कायम एक खुर्ची रिकामी असेल”, असं म्हणत तो भावुक झाला आहे. इरावती या सुबोधच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या.

उत्तर प्रदेश : हाथरस : कोण्या बाबाचा सत्संग संपल्यावर बाहेर पडताना झालेल्या चेंगराचेंगरीत शंभराहून अधिक लोकांचा मृत्यू. मृत्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक. Sad

त्या भुशी डॅम मधे वाहून गेलेल्या परिवाराची बातमी पाहिली, फार वाईट वाटले. त्यात व्हिडिओ ही आहे त्या प्रसंगाचा ! कुणी घेतला असेल कुणास ठाऊक. फार अस्वस्थ करणारा व्हिडिओ आहे तो.

दुर्दैवी घटना आहेत या. आणि तशाच प्रकारच्या वारंवार घडत आहेत हे अजून दुर्दैवी. विशेषतः लहान मुलांचे प्रचंड वाईट वाटते Sad

Pages