ऐलान-ए-जंगः एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51

ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो टोटली. पायस ने 10 management lessons I learned from Elaan-E-Jung असे काहीतरी लिहायला हवे.

काल पहायला सुरूवात केली आणि डोक्याचं भिरभिरं झालं Proud अजून तर फक्त पहिलं गाणं झालंय. बाकी पिक्चर पाहाण्याची ताकद त्या सुरूवातीच्या देवळातल्या माँ काली कडून आणायला हवी Lol

पायस ने 10 management lessons I learned from Elaan-E-Jung असे काहीतरी लिहायला हवे. >> करतो विचार Happy

बाकी यावर फ्रेम बाय फ्रेमच लिहायला हवे. ही पुढच्या सीन्स मधली निरीक्षणे
५) पुनीत इस्सारची बंदूक - पुनीत इस्सार-देवकुमार फाईटचा बिल्डअप पुढीलप्रमाणे: स.अ. च्या 'पावर इज द मेन थिंग (थिंगला थुंकी उडेल एवढा मिनिमम जोर, डावी भिवई ऐटबाजपणे टोपीच्या कुर्र्याला मॅच होईल अशी उडवणे) इन द वर्ल्ड (इथे वरलऽड असा फाजील उच्चार करू नये. काला नाग साहेबांना इंग्रजी येतं) ची सिद्धता म्हणून कॅमेराचा फ्लॅश उडतो आणि चेज सुरु होतो. बंदूकीसारखी टिनपाट हत्यारे घरून आणणे भ्याडपणाचे लक्षण असल्याने पुनीतकडे अर्थातच ती नसते. मग हाणामारीत तो स.अ.च्या माणसांपैकी कोणाची तरी हिसकावतो आणि त्या माणसाला गोळी घालतो. मग ती देवकुमार फाईट येते. इथे रसिकांनी लक्ष दिले पाहिजे कारण पुनीतला मिळालेल्या बंदूकीचे निरीक्षण करण्याची संधी आपल्याला मिळते. बंदूकीची विदेशी बनावट काला नागची पहुंच तर दाखवतेच वर 'खटका' नसलेली बंदूक त्याच्या माणसांची शस्त्रे किती प्रगत आहेत हेही स्पष्ट करते.

६) सेट डिझाईन - वाळवंटातल्या देवीच्या मंदिराचा उल्लेख झालेला आहे. बॅकग्राऊंडचे 'जय माता दी, काली मैया', पुनीतचे शेवटचे शब्द (जय भद्रकाली) व भूगोल बघता आमचे म्हणणे आहे कि हे मंदिर बिकानेरजवळचे काली मंदिर असावे. इथून जेमतेम ५०-६० मैलांवर असलेली सीमा बहुतांशी विदेशी दोस्त कुठून आले ते स्पष्ट करते. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माँ की मूर्ती! या मूर्तीला अनेक कामे साध्य करायची असल्याने, सेट डिझाईनर तिला कामाला लावून स्वतः झोपी गेला असावा असा आमचा कयास आहे. श्रने लिहिल्याप्रमाणे तो बरंच काय काय त्या मूर्तीला सांगतो आणि 'कॅसेट सही हातों मे पहुंचा दे' सांगून मरतो. मूर्तीच्या चेहर्‍यावरचे भाव - खरं तर दगडी मूर्तीला कामं सांगणार्‍या माणसाला सीबीआय ऑफिसर कोणी बनवला या प्रश्नाचं उत्तर मला आधी हवंय पण बोटाचा बोरू करणार्‍याला नाही म्हणणं जीवावर आलंय. या हावभावांमधून नंतर येणारा नाग हा देवीनेच पाठवला असणार यात शंका उरत नाही. तसेच, देवीचा खालचा जबडा आणि तुलनेने बारीक डोळे आपल्याला पुढच्या ठकुरायन (सुषमा सेठ) माँ साठी तयार करतात.

७) बेसलेस बलिदान - या सीनविषयी डिट्टेलमध्ये लिहिलेच पाहिजे.
राज शेखर (पक्षी: पुनीत इस्सार) चे घर. घरात नातेवाईक म्हणून आई, बहीण (जया प्रदा) आणि धाकटा भाऊ, बुंदीचे लाडू खायला म्हणून सारा गाव आलेला आहे. सीनच्या मध्यावर आपल्याला राजशेखर हा एक शब्द नसून दोन शब्द आहेत हे घराच्या दारावरची पाटी सूचित करते. खालची बारीक अक्षरे वाचता आली नाहीत पण ती सी.बी.आय. असावीत असा आमच्या सूत्रांचा अंदाज आहे. आज राजचा वाढदिवस आहे (जया प्रदाचा 'तुम जियो हजारो साल' वरचा १५ सेकंदाचा डेन्स, डान्स अथवा डॅन्स नव्हे; हे बारकावे नंतर कधी तरी). पण स्टेशनवर राजला आणायला जायला जयाप्रदाला अजून सुधरलेले नाही. धाकट्या भावाला 'घर पे एक मर्द होना चाहिये' म्हणून घरीच थांबायला लावून ती स्टेशनवर जाते. इथे रिक्षावाला तिच्यासाठी ताटकळत थांबला आहे हे नमूद करू इच्छितो.
यानंतर देवकुमार व सुरेंद्र पाल पोलिसाचा वेष करून येतात. इथे देवकुमारला कमिशनरचा आणि सुरेंद्र पालला एसीपीचा ड्रेस देऊन संघटनेची उतरंड स्पष्ट केली आहे. घरातली कोणी डॉली नावाची मुलगी 'आले लाडू गिळायला' समजून लाडवाचे ताट घेऊन येते. यावर ते तिला राजभैयाची लाश दाखवतात. ताट खाली पडते - ताटाच्या परिघावर २२ लाडू होते, इंटरपोलेशनने ४८ म्हणजे ४ डझन लाडू मातीत! सारा गाव लाडवांसाठी आणि पर्यायाने राजसाठी हळहळतो. यानंतर फायनली सीआरएफ (स.अ. ची गुन्हेगारी संघटना) चे लोक त्यांना धमक्या देतात - हमसे टकराने का अंजाम वगैरे वगैरे, स.अ. च्या कस्टमर केअर ट्रेनिंगमध्ये १००/१०० गुणांनी पास - आणि अंजाम दाखवायला म्हणून राज शेखरच्या घरच्यांना ठार करायचे ठरवतात व इतर गाववाल्यांना घरी जायला सांगतात. इथे हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात बेसलेस बलिदान बघायला मिळते. खाल्ल्या लाडवाला जागून गाववाले 'चलाओ गोली' चा नारा देतात. देवकुमारच्या पोटाने दाखवलेल्या दिशेला सुरेंद्र पाल गोळीबार करून सर्वांना ठार करतो. हे सर्व झाल्यावर घरात मागे सोडलेला 'मर्द' बाहेर येतो आणि प्रॉम्प्टली आपल्या वाटची गोळी खातो.
यानंतर जया प्रदा येऊन आपल्यासाठी देवकुमारने सोडलेली चिठ्ठी वाचते - तेच पुन्हा अंजाम वगैरे वगैरे, स.अ. ला कॉर्पोरेटवाले ट्रेनिंग घ्यायला का नाही बोलवत? - मग मोनोलॉग सुरु होतो. या जालिमोंसे मुक्ति दिलानेवाला कोणी आहे का या प्रश्नाचे उत्तर कोणी पुजारी शामगढ मधला ठकुरायन माँ का लाल, राजाओं के राजा, ठाकूरों के ठाकूर अर्जुन ठाकूर म्हणून देतो.

आणि तब्बल १८ मिनिटांनी श्रेयनामावली पडद्यावर झळकते !!!

कोणी पुजारी शामगढ मधला ठकुरायन माँ का लाल, राजाओं के राजा, ठाकूरों के ठाकूर अर्जुन ठाकूर म्हणून देतो. >>> हो टोटली. राजकुमार ने या ट्रेडमार्क पदव्यांच्या वापराबद्दल हरकत कशी घेतली नाही कोणास ठाउक. कारण राजाओं के राजा वगैरे राकुला म्हणण्यात येते. त्याला डबल पदवी लागते. राजा नव्हे. राजाओंका राजा. शेर नव्हे, शेरोंका शेर.

पायस, खतरनाक... बेसलेस बलिदान! Lol यावरून मला फारेंडने लिहिलेले 'कोणताही मोटिव्ह नसलेले अन्याय' आठवले. 'कलेसाठी कला' हे स अ चे तत्त्व दिसते.

पायस Lol

सुरूवातीलाच व्हीलन लोकांना घेऊन जाणार्‍या ११ बसेस दाखवल्या आहेत (एका फ्रेममध्ये इतक्याच मोजता आल्या) . पण मेन सभाग्रुहात मात्र बसेस ऐवजी कार पोहोचतात. यावरून काय बोध घ्यावा?

एका बस मध्ये ४० जण पकडले तर ११ बसेस मध्ये मिळून ४४० जण मेन सभाग्रुहात पोहोचतात. (ड्रायवर सोडून). त्या ४४० जणांसाठी किती कार लागल्या असाव्यात? एवढे सगळे काला नाग साहेबांच्यावतीने अरेंज झाले असेल तर त्यांची नक्कीच एखादी कॉर्पोरेट कंपनी असली पाहीजे असे वाटले आणि काला नाग साहेबांनी टाऊन हॉल मिटींगला वेगवेगळ्या ऑफीसवरून लोकांना बोलावले आहे असे वाटले.

धमाल धागा आहे हा. Rofl
चित्रपट पाहयला हवा.झी सिनेमा, स्टार गोल्ड वर वगैरे लागत असेल ना.

११ बसेस????
इतके व्हिलन????????? देश विघातक कारवाया करायच्यात की स्तॅम्पेड????

इथे रिक्षावाला तिच्यासाठी ताटकळत थांबला आहे हे नमूद करू इच्छितो.<<<<<
टेशणावर जायला, उशीर झायला...
बघतो रिक्षावाला.. गं वाट हिची बघतो रिक्षावाला...
शिवाय रात्री साडेआठला देखील तो व्यवस्थित मीटर टाकून, मीटरप्रमाणे, हाफ रिटर्न न मागता, 'किधर जानेका है?' वगैरे न विचारता येतो.

लाडवांचं गणित दोन लाडवांनी चुकलं असावं, कारण एक लाडू एक पार्टीत आलेला शेजारी उचलतो आणि एक लाडू सुरेंद्र पाल खातो.

देवकुमार आणि सुरेंद्र पालला राजशेखरची फॅमिली शोधून काढणे कठीण जाऊ नये, म्हणून आयकार्डवर त्याचा पूर्ण पत्ता (पिनकोडसकट) दिला असणार. शिवाय, कार्डाच्या मागे 'If found, please return to the following address' म्हणून डायरेक्ट सीबीआय हेडक्वार्टर्सचा पत्ता. हाय काय नाय काय?

इथे जोरदार number crunching सुरू आहे. Biggrin

पायस ... धन्य आहे. Happy

सिनेमा बघुनच टाकावा म्हणतेय.

होय ती आय कार्डची पण गंमतच आहे. खुफिया मिशनसाठी गेलेला पुनीत इस्सार, चुकून पकडले गेलोच तर ओळख प्रस्थापित करायला व्हिलन कंपनीला त्रास होऊ नये म्हणून साग्रसंगीत माहिती असलेले आय कार्ड घेऊन जातो.
पुढे पण लय लय मजा आहे, जरा कामातून वेळ मिळायला हवा.

'कलेसाठी कला' >>> यस! "अन्यायासाठी अन्याय" हे तत्त्व फरिश्ते मधे अन्याय करणार्‍याने व इथे अन्याय सहन करणार्‍यांनी पाळलेले आहे.

खुफिया मिशनसाठी गेलेला पुनीत इस्सार >> हो ना. तरीही ते तक्रार करतात की याच्याकडे फारसे काही मिळाले नाही. डॉन सारखी डायरी अपेक्षित होती की काय कोणास ठाउक, इतर सीबीआय वाल्यांची.

शिवाय रात्री साडेआठला देखील तो व्यवस्थित मीटर टाकून, मीटरप्रमाणे, हाफ रिटर्न न मागता, 'किधर जानेका है?' वगैरे न विचारता येतो. >>> म्हणूनच या चित्रपटानंतर अखिल रिक्षा संघटनांनी मानवजातीचे हित मनावर घेउन स्वतःला मिळणारे पैसे नाकारून भाडी नाकारणे सुरू केले. नेमके आपण न्यायचो आणि कोब्रा रिबेलियन फोर्स यायची.

याला मारल्यानंतर देव कुमार "आता यापुढे कोणी सीबीआय ऑफिसर देशासाठी जान देणार नाही" असे म्हणतो ते ओमिनसपणामधे दीवार मधल्या "अगले हफ्प्ते एक और कुली..." ला मागे टाकून नं.१ मधे आले. कारण इतर गहन चित्रपटांसारखाच "प्रेक्षकांनी आपल्याला समजेल तो अर्थ घ्यावा" असा तो संवाद आहे. म्हणजे त्याचा अर्थ "यापुढे कोणी अशी डेअरिंग करणार नाही" असा घ्यायचा, की "यापुढे कोणावर स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची वेळ येणार नाही" असा घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे.

कथा पुढे नेऊ:-

तर इतक्या जोरदार झैरातीमुळे हा 'लालों का लाल' म्हणजे सुपरमॅन, बाजीप्रभू आणि जेम्स बॉण्डचे मिश्रण असणारा कोणी नरपुंगव असेल असे आपल्याला वाटते पण तो प्रत्यक्षात म्हातारा धर्मेंद्र आणि तोही काळ्या कपड्यांतला हे लवकरच कळून चुकते. त्याची 'लाली' सिद्ध करण्यासाठी त्याने, 'दुष्मन मुल्क के जासुसों को पनाह देने वाल्या' सेठला मारणे (हे करत असताना त्याच्या येण्याची वर्दी मिळताच घाबरून भिंतीत शिरून लपू पाहणाऱ्या सेठच्या नोकराचा दोन सेकंदाचा सीन चुकवू नये तसेच ऐयाश- रंगेलपणाची हिंदी सिनेमा परमावधी म्हणजे एका हाती दारूची बाटली आणि सोबत भडक कपड्यातील बाईसोबत सेठ नोकरचाकरांच्या साक्षीने उघड्यावर लोळताना दाखवले आहे), आणि दुसऱ्या शीनमध्ये ठकुरायन का दरबार नावाचे समांतर सरकार चालवणाऱ्या आईच्या आदेशानुसार गरिबांना लुबाडणाऱ्या चौरासिया सेठ उर्फ टिकू तडफडानीयाला लुटणे (इथे एके ठिकाणी जागून घोरण्याचा अभिनय करताना टिकू तलसानीयाने ' सायमल्टीनेअस कपालभाती व प्राणायाम' अशी एक नवीन योगक्रिया शोधून काढली आहे), वगैरे दोन घटना दाखवून आपल्याला मंत्रमुग्ध केले जाते. काही कवी कुठलीही कविता एकाच चालीत गाऊ शकतात तसे धर्मेंद्र प्रेम-राग-दुःख-लोभाचे सर्व डायलॉग्ज "कुत्ते! मैं तेरा खून पी जाऊंगा!!", या चालीतच सादर करतो, हे या सिनेमाचे आणखी एक गोंडस वैशिष्ट्य.

मर्कटलीला करणारा दारा सिंग, लिलीपुट, अन्नू कपूर आणि सुधीर इत्यादी वीरांनी युक्त धर्मेंद्र उर्फ अर्जुन ठाकूरची सेना पाहून चुकून कॉमेडी के सितारे इत्यादी कार्यक्रम सुरू झालाय का अशी शंका येते.

कामगिरी फतेह करून आल्यावर धर्मेंद्र आणि सुषमा सेठच्या संवादातून त्यांची बॅकग्राउंडही उलगडते. त्याचा बाप सुधीर पांडे उर्फ मिस्टर गोलचा याने गावातील लोकांना दुर्जन नारायणशी लढण्याचे ट्रेनिंग देण्यासाठी सरकारात अर्ज करून हथियार आणि बारुद मिळवलेले असतात. त्याची खुशी म्हणून मित्राच्या घरी तो सर्दूल्या नितीन मुकेशच्या आवाजात वीरश्रीपूर्ण गाणे म्हणत असतो (हे म्हणजे नूडल्स फिरवत दांडपट्टा खेळण्यासारखं झालं). इतक्यात पोराकडून टॉफी पळवावी इतक्या सहजतेने त्याला फसवून दुर्जन नारायण त्याचे हथियार छिनून घेतो, सुधीर पांडेला दिगदर्शकाच्या आदेशानुसार लवकर मरायचे असल्याने तो थोडी बहादुरी दाखवत आणि बायको सुषमा सेठ व बाल धर्मेंद्र यांना प्रेक्षकांसाठी ठेवून मरतो. सरकारी अधिकारी ड्रॉवरमधून ठसा काढून कागदावर उमटवतात तसे दुर्जन नारायण आपली निशानी म्हणून बाल ध. वर स्वतःची मोहर उमटवतो.
फ्लॅशबॅक संपल्यावर मोठा धर्मेंद्र ये तो सिर्फ झाकी है, दुर्जन नारायण विनाश बाकी है छाप संवाद म्हणतो.

काली माँच्या बारा साल में एक बार आने वाल्या मेळ्यात अर्जुन ठाकूर येणार म्हणून पोलिसांची माणसे फिल्डिंग लावतात पण अर्थातच धर्मेंद्र त्यांना उल्लू बनवतो आणि काली माँ का आशीर्वाद घेताना त्याच्यासमोर पुनीत इस्सारच्या कॅशेटीची रक्षा करणारा नाग येतो (या सीनमध्ये नागाचा अभिनय धर्मेंद्रपेक्षा सरस वाटतो), अर्थातच धर्मेंद्रला दुर्जन उर्फ स.अ. विषयी इत्यंभूत माहिती मिळते. तातडीने तो दारा सिंगच्या भरवशावर आईला सोडून स.अ.च्या अड्ड्याकडील पहिला पडाव म्हंजेच चंदनपुर या हिल स्टेशनयुक्त गावी निघतो. जाताना माँ का खयाल रखना म्हणून दारा सिंगला सांगतो तेव्हा खरेतर "होय भावा, डोन्ट वरी", इतके उत्तर असायला हरकत नसते पण अजून आपण फारसे बोललेलो नाही हे दारा सिंगला आठवते आणि तो "ठाकूर हमारे देश की मिट्टी बेटों को एक ही बात सिखाती है, माँ की सेवा, माँ की पूजा, माँ की रक्षा और मैं भी इसी मिट्टी की पैदाईश हूं, मरते दम तक माँ पे आंच नही आने दूंगा", असा लंबा डायलॉग म्हणून धर्मेंद्रची बस ऑलमोस्ट चुकवतो.

धर्मेंद्र व कंपनी चंदनपुरात दाखल होते.

फा, पायस, श्रद्धा, अमेय आणी ईतर सर्वच जण, हे जे काही तुमचं चाल्लय, त्याला तोड नाहीये. Happy मला खरं तर ही प्रतिक्रिया आधी लिहायची होती, पण फा च्या 'डायल्यूट करू नका' ला मी बरच सिरियसली घेतलं होतं. मी हा सिनेमा बघायची शक्यता अजिबात नाहीये, पण हा धागा मात्र निवडक १० त टाकून ठेवणार हे नक्की. झक्कास!!

कारण इतर गहन चित्रपटांसारखाच "प्रेक्षकांनी आपल्याला समजेल तो अर्थ घ्यावा" असा तो संवाद आहे.

ओह, म्हणजे रन टाईम पॉलिमॉर्फिझम व लेट बायंडिंग !

पण फा च्या 'डायल्यूट करू नका' ला मी बरच सिरियसली घेतलं होतं >>> ओये फेफ, डायल्यूट करू नका म्हणजे इतर चित्रपटांबद्दलची चर्चा इथे करू नका या अर्थाने. तुम्हाला या चित्रपटाबद्दल जे लिहायचे आहे, ते मोस्ट वेलकम Happy

रन टाईम पॉलिमॉर्फिझम व लेट बायंडिंग >>> विकु, या "होय होय तसेच काहीतरी" अशी ते नक्की काय आहे ते समजले आहे की नाही याचा पत्ता न लागू देणारी प्रतिक्रिया द्यावी, की ते काय आहे समजून मग द्यावी याचा विचार करतोय. पॉलिमॉर्फिझम माहीत आहे पण ते बाकी डीटेल्स माहीत नाहीत.

अमेय, धमाल लिहीले आहे. हे सर्वात लोलः
त्याची 'लाली' सिद्ध करण्यासाठी >>>
' सायमल्टीनेअस कपालभाती व प्राणायाम' अशी एक नवीन योगक्रिया शोधून काढली आहे >>>
नितीन मुकेशच्या आवाजात वीरश्रीपूर्ण गाणे / नूडल्स फिरवत दांडपट्टा >>>
नागाचा अभिनय धर्मेंद्रपेक्षा सरस >>> Lol

शेवटचे तर कहर आहे. होय भावा... ते बस ऑल्मोस्ट चुकवतो. महान Happy

जाताना माँ का खयाल रखना म्हणून दारा सिंगला सांगतो तेव्हा खरेतर "होय भावा, डोन्ट वरी", इतके उत्तर असायला हरकत नसते पण अजून आपण फारसे बोललेलो नाही हे दारा सिंगला आठवते आणि तो "ठाकूर हमारे देश की मिट्टी बेटों को एक ही बात सिखाती है, माँ की सेवा, माँ की पूजा, माँ की रक्षा और मैं भी इसी मिट्टी की पैदाईश हूं, मरते दम तक माँ पे आंच नही आने दूंगा", असा लंबा डायलॉग म्हणून धर्मेंद्रची बस ऑलमोस्ट चुकवतो.<<<<<<<
तुफान लिहिले आहे. Lol

पण एक छोटी गोष्ट - तो टिकू तलसानिया नाहीये. बाकी तो राजस्थानातल्या रणरणत्या उन्हात त्या बाईसोबत उघड्या गच्चीवर काय लोळत असतो. कहर प्रकार!

नाही हो, लोळणारा सेठ वेगळा पहिल्या शीनमधला, पुढच्या शीनमधला 'गरीबो के मुंह का निवाला छिननेवाला' टिकू तलसानियाच आहे,
बाकी त्या 'लोळण्याला' न्याय देणे गडबडीत राहून गेले, ते आता जोडलेय वर!

सगळेच सुटलेत Lol

टेशणावर जायला, उशीर झायला...
बघतो रिक्षावाला.. गं वाट हिची बघतो रिक्षावाला... >> श्र, परफेक्ट वर्णन! तिचा तो डेन्सही मानसी नाईकच्या डॉन्ससारखाच आहे

"अन्यायासाठी अन्याय" >> हे तत्त्व अनिल शर्माच्या चित्रपटांचा कणा आहे. मोटिव्हलेस, बेसलेस, सेन्सलेस आणि सर्वात महत्त्वाची अन्यायलेस अशा अन्यायाच्या व्हरायट्या देण्यासाठी हे तत्त्व अतिशय गरजेचे आहे.

अमेय Lol खासकरून ते होय भावा... जबरी! त्याच्या सेनेतल्या गुरुबचन सिंगला विसरू नका.

रन टाईम पॉलिमॉर्फिझम व लेट बायंडिंग ! >> हे महान आहे!!

'गरीबो के मुंह का निवाला छिननेवाला' टिकू तलसानियाच आहे >> हो हो, दोन सेठ आहेत. पहिला लोळणारा सेठ बहुतेक राजन हस्कर आहे. गिअर बदलत घोरणारा सेठ टिकू तलसानिया आहे

डिटेल्स भरतो नंतर Happy

Pages