चॅलेंज - भाग १

Submitted by आनन्दिनी on 31 July, 2017 - 05:30

तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचं मला.”
“कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं.
“कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं.
“अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं.
“हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना! काहीही कारणं देत असते!” शौनकच्या बोलण्यात त्याचा वैताग अगदी स्पष्ट होता.
“तू आज जास्तच थकलायस का? मेसेज करायचा होतास, आपण पोस्पोन केलं असतं.” मीराने काळजीच्या सुरात त्याला म्हटलं.
“च्.... आपलं ठरलं आहे ना, महिन्याचा शेवटचा शनिवार, Rule is rule!” शौनक निग्रहाने म्हणाला. दिगंतकडे वळून त्याने पुढे विचारलं, “काय रे, या वेळी चलेंज तू देणार आहेस ना? ठरवलयस ना?”
“हो तर, अवनीला येऊ दे, मग सांगतो”

ज्युनिअर कॉलेजला भेटलेल्या या चौघांची मैत्री इतक्या वर्षांनीही टिकली होती. कॉलेजनंतर चौघांच्या वाटा पूर्ण वेगळ्या झाल्या. जात्याच सुंदर, चटपटीत, मोकळ्या स्वभावाची, मॉडर्न अशी अवनी, आयटी इन्जीनीअर म्हणून मल्टीनॅशनल कंपनीमधे लागली. तिच्या मानाने मीरा तशी साधी, पण आश्वासक हसरा चेहरा, मधाळ डोळे आणि शांत स्वभाव यामुळे कोणालाही चटकन आवडण्यासारखी. ती एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका होती. उंचपुरा, दणकट, आणि चेहर्यावर कुशाग्र बुद्धीमत्तेचं, आत्मविश्वासाचं तेज असा शौनक, MBBS होऊन आता सर्जरीचं प्रशिक्षण घेत होता. आणि दिगंत.... मध्यम बांधा, रेखीव चेहरा, भावूक डोळे, पाहणार्याला कवी वाटावा असा दिगंत फिलॉसॉफीमधे पी एच डी करत होता. स्वभाव आणि क्षेत्र पूर्ण वेगळी असली तरी कशी कोण जाणे यांची मैत्री घट्ट टिकून होती. दोन जणांमध्ये नक्की काय क्लिक होतं तेव्हा सूर जुळतात हे सांगणं तसं कठीणच ना! एकाच शहरात असल्याने भेटीगाठी होणं कठीण नव्हतं.

त्यात गेल्या दोन वर्षांपासून या चौघांनी एक नवीन पद्धत सुरू केली होती. ‘4 वीक्स चॅलेंज’. दर महिन्याला एकाने काहीतरी चॅलेंज द्यायचं आणि चौघांनीही ते चार आठवडे पाळायचं. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भेटायचं, गप्पाटप्पा, कॉफी आणि चॅलेंज बद्दलचे आपले अनुभव शेअर करायचे. कधी तोंडी, कधी लिहून. आणि त्याच दिवशी पुढच्याने नवीन चॅलेंज द्यायचं. चौघानांही हा खेळ आता चांगलाच आवडू लागला होता.
अवनी आली तेव्हा त्या तिघांनीही आपापले गेल्या महिन्याच्या चॅलेंजचे पेपर्स काढले होते. “मी दिलेलं चॅलेंज, रोज दहा हजार स्टेप्स चालायचं. मी मोबाईलच्या अॅप वरून रेकॉर्ड ठेवत होतो. जेजेचं कॅम्पस इतकं मोठं आहे की क्लिनिक, वॉर्ड, आणि ओपरेशन थीएटरच्या चकरांमधेच सात आठ हजार स्टेप्स होऊन जात होत्या. अजून थोडसं चाललं की झालं.” म्हणत त्याने त्याचा कागद पुढे सरकवला. त्यावर तारखा आणि आकडे होते. एकाही दिवशी आकडा दहा हजारांच्या खाली नव्हता. मग मीरा, मीराची अबोली फुलांची डायरी एव्हाना सगळ्यांच्या ओळखीची झाली होती. तिनेसुद्धा दिवसवार नोंद केली होती पण आकड्यांबरोबर अजून छोट्या छोट्या नोंदी होत्या. डायरी पुढे सरकवून ती बोलू लागली, “मी रोज शाळेत चालत जायला आणि यायला सुरुवात केली. येताना कधी कधी फार थकायला व्हायचं पण सकाळी चालून खूप फ्रेश वाटायला लागलं. आता चॅलेंज संपलं तरी सकाळी चालत जाण्याचा नियम तसाच ठेवणार आहे. माझं वजनही दोन किलो कमी झालं” तिने हसत म्हटलं.

“See.......” शौनकने स्वतःची कॉलर टाईट केली.

दिगंतने त्याची वही उघडली आणि तो बोलू लागला. “मीसुद्धा रोज रात्री एक तास चालायला सुरुवात केली, पीडोमीटर घेऊन. म्हटलं मोबाईल घेऊन जायचं नाही नाहीतर पुन्हा तोच बघत बसणं होईल. I must say, मला खूप फायदा झाला. एक तास फक्त आपण आणि आपले विचार. साठलेला गुंता शांतपणे सोडवावा तसं या एक तासाच्या शांत विचारांमुळे माझ्या मनातला कितीतरी गुंता सुटल्यासारखा वाटतोय. खूप हलकं वाटतंय , शरीराने तर आहेच पण मनानेसुद्धा, थँक्स मित्रा” म्हणत त्याने शौनकच्या पाठीवर थाप दिली. शेवटचा मेंबर अवनी, ती बोलू लागली “मी तर रोज जिमला जातेच. धावलं तर स्टेप्स जास्त होतात म्हणून मी ट्रेडमिलवर रोज धावत होते. हिअर......” म्हणत तिने तिचा Excel sheet चा प्रिंट आउट पुढे सरकवला आणि विचारलं, “आज चॅलेंज कोण देतंय?”

“मी” दिगंत म्हणाला. “पण हे चॅलेंज वेगळं असणार आहे. Nothing physical. चॅलेंज हे आहे की पुढच्या चार आठवड्यांत आपण एकदाही खोटं बोलायचं नाहीये, अगदी अजिबात नाही. आणि जेव्हा जेव्हा खोटं बोलायची वेळ येईल आणि आपण ते न बोलता खरंच बोलू तो incident, त्याचा परिणाम, आपले विचार हे सगळं नोट करून ठेवायचं” उरलेले तिघेही गोंधळले होते. “पण दिगंत, आपण कुठे उठसूठ खोटं बोलत असतो?” मीराने विचारलं. “ते आता कळेलच” दिगंत हसून म्हणाला, “कबूल आहे की आपण काही हवाला घोटाळा करत नाही. पण येता जाता लहान सहान थापा मी तरी मारतो, जसं फोन उचलायचा नसला की मी मिटींगमधे होतो, कोणाकडे जायचं नसलं की नेमका मी मुंबईत नाहीये त्या दिवशी, किंवा लेटेस्ट म्हणजे मुलगी पसंत नसली की कळवायचं की पत्रिका जुळत नाहीये. किंवा आपल्या अवनीसारखं, निघायचं उशिरा आणि सांगायचं की ट्रॅफिक होतं....” अवनीसकट सगळेच हसू लागले. “हो रे, निघायलाच थोडा उशीर झाला पण खरंच थोडं ट्रॅफिकसुद्धा होतं” अवनीने हसत म्हटलं, “तुम्ही सगळे मस्त कॉफी घेऊन बसलायत. मी ऑर्डर देऊन येते” म्हणत ती टेबलकडून उठली.

“दिगंत, मग आता तू मुलगी बघायला गेलास आणि तुला नाही आवडली की तू सरळ सांगणार की तुमची मुलगी फोटोतल्यासारखी मस्त दिसत नाहीये. म्हणून माझा नकार आहे?” शौनकने दिगंतला चिडवायला विचारलं. “पहिलं म्हणजे मी फक्त दिसण्यावरून मुलीला नकार देईन असं होणारच नाही. मी नकाराचं खरं कारण सांगेन की माझ्यां बायकोबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. तुमची मुलगी ही त्या अपेक्षांमध्ये बसत नाहीये एवढंच” मीराने मधेच त्याला थांबवत विचारलं, “पण अशा कटू सत्याने काय होणार दिगंत? म्हटलंच आहे ना, प्रियं ब्रूयात्, सत्यम् ब्रूयात्, न ब्रूयात् अप्रियम् सत्यम्”. दिगंतने उत्तर द्यायच्या आधीच शौनकने मीराला विचारलं “कोणी म्हटलंय हे? कृष्णाने का? मीरा, तुझं फक्त नाव मीरा आहे, तू त्या कृष्णाची मीराबाई नाहीयेस”
“मग कोणाची मीरा आहे ती?” दिगंतने कोपरखळी मारली. मीरा गोरीमोरी झाली. इतक्यात अवनी तिचा कॉफीचा कप घेऊन टेबलकडे परतली. “काय अवनी, रोहन काय म्हणतो? कसं चाललंय तुमचं?” शौनकने सोयीस्करपणे विषय बदलला.

रोहन हा अवनीचा boyfriend होता. वर्षभर ते एकमेकांना ओळखत होते. प्रकरण मैत्रीच्या पुढे होतं पण घरच्यांशी ओळख करून देण्याइतपत अजून नव्हतं. “रोहन बराय, इथून मी त्यालाच भेटायला जातेय. नंतर एका पार्टीला जायचंय” कॉफीचा घोट घेत तिने म्हटलं. “दर शनिवारी अश्या पार्ट्या आणि जागरणाचा तुला कंटाळा नाही येत?” दिगंतने उत्सुकतेने तिला विचारलं. “येतो ना, शनिवारी रात्री क्लबिंग, पार्टीज म्हणजे भरपूर जागरण. मग रविवारी सकाळी लवकर जाग येत नाही आणि रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे पुन्हा सोमवारी सकाळी उठायला उशीर. मग जॉबला लेट, मग थापा माराव्या लागतात.” अवनीने एका दमात सांगितलं. “अगं पण मग नाही म्हणायचं ना जायला. रोहनला खूप आवड आहे का या सगळ्याची?” मीराने विचारलं. “रोहनला सवय आहे पण फार काही आवड आहे असं नाही. थोडी फार आवड म्हटली तर मलाच. पण तीही आता कमी होतेय. पण न जावं तर आपल्या हातून काहीतरी निसटतंय असं वाटतं. आमचा बॉम्बे स्कॉटिशचा सगळा ग्रूप नेहेमी भेटत असतो. चार वेळा नाही म्हटलं तर पाचव्या वेळी आपल्याला बोलावणारच नाहीत अशी काहीतरी विचित्र इनसिक्युरिटी वाटते मला.” दिगंतकडे वळून तिने विचारलं, “दिगंत हे चॅलेंज खरं ‘बोलण्यापुरतं’च आहे की texting, facebook वगैरे सगळ्यालाच? म्हणजे फोटो आवडला नसेल तर like सुद्धा करायचा नाही का?” अवनीने काळजीने विचारलं. दिगंत खो खो हसू लागला आणि म्हणाला, “Ideally yes, सत्य किंवा honesty म्हणजे तोंडाने सत्य बोलणं ही पहिली पायरी आणि ‘ऋत’ किंवा authenticity म्हणजे प्रत्येक गोष्ट अंतर्मनाशी प्रामाणिक राहून करणं ही पुढची पायरी. आपल्याला किती जमतंय बघूया. आणि मी दिलेलं चॅलेंज आहे म्हणून मी एक टिप देतो. खरं बोलणं शक्य नसेल तेव्हा ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’”
शौनकने जोरजोरात मान हलवत अवनीला म्हटलं “या दोघांनी चोरून संस्कृतच्या ट्युशन्स लावल्यायत.” “No way.....” म्हणत अवनीने आश्चर्याने मीराकडे पाहिलं आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने “हो?” असं विचारलं. “चल् गं. त्याच्या बोलण्यावर काय जातेस! शौनक, नशीब चॅलेंज उद्यापासून सुरू होतंय नाहीतर तुझ्या या बोलण्यामुळे आजच हरला असतास तू!” मीराने शौनकला तंबी दिली.

पुढे नेहेमीप्रमाणे गप्पा छान रंगल्या. निघायची वेळ झाली. “मीरा मी त्याच बाजूला चाललोय. तुला बाईकवर ड्रॉप करू?” शौनकने निघता निघता विचारलं. “काय रे तू नेहमी बरोबर त्याच बाजूला कसा जात असतोस! कधी आमच्या बाजूला सुद्धा येत जा” दिगंत शौनकला चिडवायची एकही संधी सोडत नसे. “शौनक खरंच मला हायवे पर्यंत सोड ना. मला रोहनला भेटायला उशीर होतोय, if Meera doesn’t mind ofcourse...” अवनीने स्वतःचं घोडं पुढे दामटलं. शौनकने हसत हसत कपाळावर हात मारला. “तुम्ही निघा. मला बाजूच्या बुक स्टोअर मधे जायचय” मीराने त्यांचा निरोप घेतला. सगळे आपापल्या दिशांना निघाले पण प्रत्येकाच्या मनात चुटपूट होती की कसे होणार आहेत हे सत्याचे प्रयोग!

डॉ. माधुरी ठाकुर
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

कथेतील कल्पना छान आहे. माबोवर प्रतिसाद देणार्‍यांसाठी अस चॅलेंज सुरु करायला हव. फार नाही आठवडाभर कोणीच आधीच्या आलेल्या प्रतिसादाला उचलून धरत (+१) असा प्रतिसाद द्यायचा नाही. जे मनात असेल ते शब्दात मांडायच.

आनंदिनी ग्रेट...
अशा छान कल्पना सुचतात कश्या बुआ...

सही ओघवतं लिहिलंय.. आणि इंटरेस्टींग टॉपिक आहे.. मी क्रमशः कथा फार मोठ्या असतील तर वाचत नाही, पण उत्सुकता ताणलीय, लवकर येऊ द्या भाग Happy

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
चौघांचे अनुभव एकाच कथेत लिहिले असते तर कथा फार लांबली असती किंवा अनुभव फार छोटे करावे लागले असते म्हणून भाग करावे लागतायत. आज दुसरा भाग टाकलाय.