१. शेरलॉक अन फाशीचा दोर
टॉक... टॉक… टॉक… टॉक
काळ क्षणाक्षणाला पुढे सरकत होता, मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येत होता. सेकंदकाटा आपल्या काळजावर आघात करतोय असं शेरलॉकला वाटत होतं. अर्थात याची त्याला सवय होती. स्कॉटलंड यार्ड त्याला बऱ्याचदा उशीराच बोलवायची. कित्येक केसेस त्याने शेवटच्या काही क्षणांत सोडवल्या होत्या. आजही तसं होऊ शकलं असतं.
त्याने डोळे उघडून समोर पाहिलं. पंचवीस वर्षांचा तरुण मुलगा त्याच्याकडे आशेने बघत होता. त्याच्या डोक्यावर फाशीचा दोर लटकत होता. कसायाने त्याचे दोन्ही हात समोर घेऊन चामड्याच्या पट्ट्याने बांधायला सुरुवात केली. ती नजर असह्य होऊन शेरलॉकने डोळे मिटले. सगळे पुरावे मुलाविरुद्ध होते पण शेरलॉकची शोधबुद्धी त्याला ओरडून सांगत होती की तो निर्दोष आहे. त्या मुलीचा अमानुषरीत्या खून झाला अन अख्खं इंग्लंड हळहळलं, लवकरात लवकर खुन्याला पकडावं असा दबाव येऊ लागला. या विचित्र केसमधून मार्ग दिसेना तेव्हा स्कॉटलंड यार्डने त्याला बोलावलं. नेहमीप्रमाणेच सायंटिफिक डिडक्शनच्या आधारे त्याने केस सोडवली अन गुन्हेगार शोधला. केस उभी राहिली पण… यावेळी पहिल्यांदा केस सोडवल्याचा आनंद त्याला झाला नाही. काहीतरी चुकत होतं. तर्कबुद्धी त्याला वेगळ्याच दिशेने खेचून नेत होती, सगळे विस्कळीत धागे जोडणारी किल्ली फक्त शोधायची होती.
मुलाच्या घोट्याभोवती चामडी पट्टा करकचून बांधण्यात आला.
शेरलॉकचं विचारचक्र जोरात फिरू लागलं. संपुर्ण केस, त्यातल्या बारीकसारिक तपशीलांसकट त्याच्या मन:चक्षुसमोर नाचू लागली. काहीतरी नजरेतून सुटलं होतं, पण नेमकं काय ?
मुलाच्या डोक्याभोवती काळा कपडा टाकण्यात आला अन मानेभोवती फाशीचा दोर अडकवण्यात आला. निरीक्षक अधिकाऱ्यांनी घड्याळाकडे पाहिलं. आता फक्त थोडेच क्षण बाकी होते.
शेरलॉकच्या डोळ्यांसमोर सगळे चित्र, घटना, कबुलीजबाब, पुरावे प्रचंड वेगात भिरभिरू लागले. सुरू झाली नजरेतून सुटलेले धागे शोधण्याची धडपड. एका निरपराध्याला शिक्षा व्हायला नको, कदापि नको. अजूनही काही सापडल्यास तो फाशी तात्पुरती रोखू शकत होता. त्याने पुर्ण कौशल्य पणाला लावलं, क्षणात आजुबाजुच्या जगाचा विसर पडला. अन अचानक विज चमकावी तशी ती गोष्ट लख्खकन त्याच्या नजरेसमोर चमकली…त्या मुलांचं निरपराधित्व सिद्ध करणारी.
कसायाने खटका ओढला
“वेट SS”
------------------------------------------------
२ .जिगसॉ
फरशीवर जिकडेतिकडे जिगसॉचे तुकडे पडलेले आहेत. ते एकत्र जोडले जात नाहीयेत. मला माहिती ये ते फिट बसतात. मीच बसवलेत ते याआधी. पण आता जोडता येत नाहीयेत.
मी उचलतो एकेक तुकडा, जोडतो दुसऱ्या तुकड्यांशी… पुर्ण ताकदीने जोडण्याचा प्रयत्न करतोय, पण कोसळतीये सगळे जोडतुकडे पुन्हापुन्हा.
हे फिट्ट का बसत नाहीयेत ? यांना वेगळंच का केलं पण मी ?? मी स्वतःला शिव्या देतो अन थरथरत्या हातांनी पुन्हा जोडू लागतो. या हातांना लागलेल्या रक्तामुळे तर ते फिट बसत नसतील ??
-----------------------------------------------
३ . संग्रह (शतशब्दकथा)
सहसा मी कुणाला माझा संग्रह दाखवत नाही. प्रत्येकाला कदर नसते रे अशा दुर्मिळ गोष्टींची. तू नशीबवान आहेस.
हे डाव्या हाताचं शोकेस आहे न, ते स्वतःच्या हातांनी बनवलंय मी. एवढ्या किमती वस्तू ठेवायच्या म्हणजे एवढं करावंच लागणार न. बघ, किती सुंदर डिझाइन्स ठेवल्यात त्यात.
नाही नाही तिकडे नको पाहू. त्या माझ्या आधीच्या कलाकृती होत्या. तेव्हा नवीन होतो म्हणून जमल्या नाहीत. पण आपण मार्गदर्शन नाही घेतलं बरं कुणाचं. चुकत गेलो, शिकत गेलो, हळूहळू प्राविण्य मिळवलं.
आता शांत बसून रहा, अज्जिबात हलू नको. उजवा कान ते डावा कान व्हाया कपाळ पहिला कट, व्हाया मान दुसरा कट. खालपासून वरपर्यंत हळुवार खेचत न्यायचं.
अहाहा… ब्युटिफुल.
--------------------------------------------------
४. नेऊ नका न त्याला…
दादूला हे लोक घेऊन जातात तेव्हा मला खुप राग येतो, रडते मी खुपखुप. तो नसला तर मी कोणासोबत खेळणार न. कित्ती बोअर होतं. मम्मीपप्पा म्हणतात की तो बिमार आहे म्हणून हॉस्पिटलला ठेवलंय. तिथे असला की तो पटकन बरा होईल. शी : किती वाईट असतं ना हॉस्पिटल. मला अज्जिबात नाही आवडंत. पप्पा म्हणाले की वेदांतला ठेवलंय ते हॉस्पिटल खुप छान आहे. पण जुईची ताईने मला वेगळंच सांगितलं. वेदांतला एका अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलंय म्हणे. किती बोअर होत असेल त्याला. मम्मीला विचारलं तर ती म्हणाली की हे त्याच्या भल्यासाठीच आहे. तसं असेल तर ती रडत का होती ?
दादूला घरी आणण्यासाठी मी खुप खुप भांडले. आधीआधी त्यांनी माझं ऐकलं. दादू अधूनमधून घरी येऊ लागला. पण तो आला की पुन्हा तेच सुरू व्हायचं… आईच्या खोकल्याच्या बाटलीत फिनाईल भरलेलं, मांजरी मरून पडलेल्या अन त्यांचे डोळे माझ्या बाहुलीला लावलेले, बाबांचं रेझर शेजारच्या बाळाच्या पाळण्याजवळ पडलेलं.
प्रत्येकवेळी माझ्याच हट्टावरून त्याला घरी आणलं जायचं पण मग अशा गोष्टी व्हायच्या अन पांढऱ्या कपड्यांतले लोक येऊन त्याला पकडून घेऊन जायचे. मी बराचवेळ रडत बसायचे मग, सगळ्यांशी अबोला धरायचे, दादूसारखं स्वतःला अंधाऱ्या खोलीत कोंडून घ्यायचे. त्यादिवशी डॉक्टरकाका पप्पांना म्हणत होते की हॉस्पिटल मध्ये आणलं की वेदांत शांत राहतो, शहाण्या मुलासारखं वागतो. दोनतीन वेळा आम्ही त्याच्या निरागसतेला भुलालो. तो सुधरलाय असं समजून डिस्चार्ज दिला. पण आता लक्षात येतंय की हा मुखवटा आहे त्याचा. सॉरी पण आम्हाला शॉक ट्रिटमेंट सुरू करावी लागणार.
डॉक्टर काहीही म्हणो, मम्मीपप्पा काहीही म्हणो दादूला घेऊन जातात तेव्हा मला खुप राग येतो सगळ्यांचा.
तो परत येईपर्यंत मला खोटंखोटं, शहाण्या मुलीसारखं वागावं लागतं.
----------------------------------------------
----------------------------------------------
जबरदस्त आहे
जबरदस्त आहे
Pages