ग्रीष्माच्या कविता....

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 May, 2017 - 12:26

तपता अंबर, तपती धरती,
तपता रे जगती का कण-कण!

त्रस्त विरल सूखे खेतों पर
बरस रही है ज्वाला भारी,
चक्रवात, लू गरम-गरम से
झुलस रही है क्यारी-क्यारी,

चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन!

डॉ. महेंद्र भटनागर...

या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते.

वरील कविताच पाहा ना. सरळ सरळ जर तापलेल्या रणरणत्या उन्हाने धरा तप्त झालेली आहे. शेते सुकून चालली आहेत. उन्हाच्या वावटळींनी थैमान मांडून ठेवले आहे. त्यामुळे सगळीकडे प्रचंड ऊष्मा पसरून शेतातील वाफे सूकत चाललेले आहेत. ...
या ओळी कुणी इतक्या मनापासून वाचल्या असत्या का? मुळात त्यातून जाणवणाऱ्या धगीने तो परिच्छेद टाळुन कुणी पुढे गेले तरी त्याला दोष देता येत नाही. पण तोच आशय पद्यात मांड़ला की त्याची दाहकता आपोआप कमी होवून जाते आणि नकळत आपण त्यातले सौंदर्य अनुभवण्याचा प्रयत्न करायला लागतो.

मुळात या विषयावर विचार करायला लागलो तेव्हा डोळ्यासमोर अनेक कवि होते, कविता होत्या. पण पुन्हा मनात एक विचार आला की अरे मराठीतील कवितेवर, कविवर आपण नेहमीच लिहीतो, बोलतो. काय हरकत आहे , यावेळी हिंदी भाषेतल्या कवि, कवितांचा संदर्भ घेवून पाहिला तर? आपल्या मराठीप्रमाणेच हिंदी कवितासुद्धा अतिशय समृद्ध आहे. कवितेचे विभिन्न प्रकार, वेगवेगळे छंद, बिविध विषय हिंदी कवितेने खुप व्यापक स्तरावर हाताळलेले आहेत. माझ्याकडे बरिचशी पुस्तके आहेत, त्यात आंतरजालावर कविता कोशासारखा खजिना उपलब्ध आहे. हे सगळे पुन्हा वाचताना नकळत एक प्रचंद खजिनाच सापडत गेला. खरेतर मुळ हेतु बाजूला राहून मी त्या चक्रव्यूहातच गरागरा फिरत राहीलो, पण यातून बाहेर पडायची मात्र इच्छा होत नव्हती. पण मग निग्रहाने मोह बाजूला सारला आणि स्वतःला समजावले की आपल्याला फक्त ग्रीष्माच्या, उन्हाळ्यावरच्या कविता शोधायच्या आहेत. गंमत म्हणजे या रुक्ष विषयावर सुद्धा भरपूर साहित्य उपलब्ध आहे. कविवर्य राम सनेहीलाल शर्माजीनी ग्रीष्माला मानवी नात्यामध्ये बांधुन टाकलेय. आपल्या नर्मविनोदी शैलीत ग्रीष्माची दाहकता मांडताना ते बारीक चिमटे काढतात.

तपे दुपहरी सास-सी, सुबह बहू-सी मौन
शाम ननद-सी चुलबुली, गरम जेठ की पौन

छाया थर-थर काँपती, देख धूप का रोष
क्रुद्ध सूर्य ने कर दिया, उधर युद्ध उद्घोष

आहे की नाही मज़्ज़ा? कविता अशीच असते, असावी. साधी, अगदी सहज समजेल, सहज पोहोचेल अशी. मी अगदी सुरुवातीला जेव्हा लिहायला लागलो तेव्हा भरपूर वाचन होतंच. त्यामुळे लिखाणात ते डोकवायचं. जड़ भाषा, जड़ संस्कृतप्रचुर शब्द, भड़क नाट्यमयता ... शब्दबंबाळ व्हायचं ते सगळं. तेव्हा मायबोलीवरच्या काही मित्रांनी, मैत्रीणीनी त्यावर कोरडे ओढून ओढून ते कमी करायला लावलं. त्यावेळी त्या लोकांचा राग यायचा, पण आता जाणवते आहे की ते बरोबर होते, त्यामुळेच मी स्वतमध्ये सुधारणा करु शकलो. असो. असं भरकटायला होतं बघा. तर आपण शर्माजींच्या कवितेबद्दल बोलत होतो.

महाकाव्य-सी दोपहर, ग़ज़ल सरीखी प्रात
मुक्तक जैसी शाम है, खंड काव्य-सी रात

आँधी, धूल, उदासिया और हाँफता स्वेद
धूप खोलने लग गई, हर छाया का भेद

किती सुंदर ओळी आहेत पाहा. गझलेसारखी (सुरु झालीय म्हणेपर्यंत संपून जाणारी , छोटीशीच पण त्यामुळेच हवीहवीशी वाटणारी कोमल, मृदुल सकाळ. तर एखाद्या महाकाव्यासारखी कधी संपतेय, संपतेय की नाही अशे वाटायला लावणारी ग्रीष्माची उष्ण, तप्त, कोरडी दुपार.

जसजसा दिवस वर चढायला लागतो तसतसा ऊष्मा वाढायला लागतो. उष्म्याचे परिणाम फक्त माणसांवरच होतात असे नाही बरं. सृष्टीतली प्रत्येक सजीव गोष्ट याने प्रभावित होत असते.

झर रही है
ताड़ की इन उँगलियों से धूप
करतलों की
छाँह बैठा
दिन फटकता सूप
बन रहे हैं ग्रीष्म के स्तूप।

उंचच ऊंच वाढलेली ताडाची झाड़े उन्हाळ्याच्या माराने शुष्क होवून जातात तेव्हा जणु काही सृष्टीने तप्त ग्रीष्माचे शुष्क स्तंभ उभे करून ठेवले आहेत की काय असे भासायला लागते. अशा वेळी गेल्या पावसाळ्यातल्या किंवा हेमंताच्या आठवणी काढत बसणे एवढा एकच मार्ग ग्रीष्माचा तड़ाखा, त्याचा दाह कमी करण्याच्या कामी येतो आणि मग पूर्णिमा वर्मन यांच्यासारख्या संवेदनशील कवयित्री लिहून जातात..

पारदर्शी याद के
खरगोश
रेत के पार बैठे
ताकते ख़ामोश
ऊपर चढ़ रही बेलें
अलिंदों पर
काटती हैं
द्वार लटकी ऊब
बन रहे हैं ग्रीष्म के स्तूप।

चहकते
मन बोल चिड़ियों के
दहकते
गुलमोहर परियों से
रंग रही
प्राचीर पर सोना
लहकती
दोपहर है खूब
बन रहे हैं ग्रीष्म के स्तूप।

मलिक मोहम्मद जायसीच्या 'पद्मावत' काव्यामध्ये एक सुंदर प्रकरण आहे. षट रुतु वर्णन खंड या नावाचे. त्यात जायसीने अतिशय सुंदर शब्दात राणी पद्मावतीची ग्रीष्माच्या दाहकतेने झांलेली नाजुक अवस्था वर्णिलेली आहे.

ऋतु ग्रीषम कै तपनि न तहाँ । जेठ असाढ कंत घर जहाँ॥
पहिरि सुरंग चीर धनि झीना । परिमल मेद रहा तन भीना॥
पदमावति तन सिअर सुबासा । नैहर राज, कंत-घर पासा॥
औ बड जूड तहाँ सोवनारा । अगर पोति, सुख तने ओहारा॥
सेज बिछावनि सौंर सुपेती । भोग बिलास कहिंर सुख सेंती॥
अधर तमोर कपुर भिमसेना । चंदन चरचि लाव तन बेना॥
भा आनंद सिंगल सब कहूँ । भागवंत कहँ सुख ऋतु छहूँ॥

कविता हे सर्व सुखांचे आगर आणि सर्व समस्यांचे समाधान जरी नसले तरी त्या त्या क्षणी काही काळ का होईना पण त्या समस्येचा, त्या वेदनेचा विसर पाडण्याची क्षमता कवितेत नक्कीच असते. त्यातुनही बच्चनजीसारखा एखादा रसिक कवि असेल तर तो ग्रीष्माच्या कड़क उन्हाळ्यात सुद्धा सकारात्मकता शोधतो. बच्चनजींची एक कविता आहे, 'गरमी में प्रातःकाल'. यात ते म्हणतात ...

गरमी में प्रात:काल पवन,
प्रिय, ठंडी आहें भरता जब
तब याद तुम्‍हारी आती है।
गरमी में प्रात:काल पवन
बेला से खेला करता जब
तब याद तुम्‍हारी आती है।

अर्थात कविता आहे म्हणून त्यात ग्रीष्माचे सगळे कौतुकच यायला हवे असे थोडीच आहे. बहुतांश कविंनी कवितेमधुन उष्म्याला, ग्रीष्माला सुद्धा हळुवारपणे गोंजारलेच आहे. एखादाच कुणी शकुन्त माथुर असतो जो तितक्याच परखडपणे उन्हाळ्याच्या तापही व्यक्त करून जातो.

गरमी की दोपहरी में
तपे हुए नभ के नीचे
काली सड़कें तारकोल की
अंगारे-सी जली पड़ी थीं
छांह जली थी पेड़ों की भी
पत्ते झुलस गए थे
नंगे-नंगे दीघर्काय, कंकालों से वृक्ष खड़े थे
हों अकाल के ज्यों अवतार !

महत्वाचा माणुस राहीलाच. आमचा खोडकर, मिस्किल पण गोड, #गुलझार म्हातारा ग्रीष्माच्या खोड्या चव्हाट्यावर टांगताना मिस्कीलपणे सांगतो...

गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !

‘प्रचंड उकडतय’ या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलंय.

तेव्हा एकंदरीत काय, तर सद्ध्या सूर्यदेव हट्टाला पेटलेले आहेत. त्यांना माहीती आहे की अजून दोन महिन्यांनी वर्षा ऋतु सुरु झाला की त्यांचा प्रभाव कमी होत जाईल काही महिन्यांपुरता. म्हणून हातात आहे तो वेळ आपले नाणे वाजवून घेताहेत झालं. सद्ध्या डोक्याला टोपी, डोळ्याला गॉगल वापरायला सुरुवात केलीय. तुम्हीही वापरत जा. बॅगेत चार पाच रुमाल , गमछे ठेवत जा. भरपुर पाणी प्या. (रंगीत पाणी कितीही चिल्ड असले तरी दुपारची वेळ टाळाच.)

दिवस वैऱ्याचे ( उन्ह आणि उकाड्याचे) आहेत, तेव्हा स्वतःला जपा. पावसाळा सुरु झाला की या पनवेलला. जावुयात पाठीशी सॅक बांधुन कुठेतरी कच्च भिजायला. तेव्हा ( काही सुज्ञ तज्ञाना आवडत नसले तरी) पावसाच्या कविता ऐकू, पावसाशी गप्पा मारू. त्यालाही दोन ग्रीष्माच्या कविता ऐकवू आणि सगळे मिळून उन्हाला टुकटुक करु. काय म्हणता?

© विशाल विजय कुलकर्णी
दि. ०२-०५-२०१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर.....
मस्त वाटत होतं वाचताना....