"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात. आठवड्यात एक दिवस तरी शिजवलेला ब्रेकफास्ट खायला नको का त्यांनी! रोज कॉर्नफ्लेक्सचं खातात ना! आणि तू त्यांना खायला सांगायचं सोडून..." आता तिने आधी मोठ्या मुलाकडे, आर्यनकडे मोर्चा वळवला. तिने दामटून त्याला बसवलं आणि एक एक घास करत अक्खा डोसा भरवला .
"बॉल वगैरे काय घ्यायचं ते घे तोपर्यंत मी विहानला भरवते." विहानला भरवायला तिने घास घेतला खरा पण विहानने तोंड घट्ट मिटून घेतलं. शेवटी कंटाळून तिने तो नाद सोडून दिला. नाश्या ऐवजी विहानला एक ग्लास दूधच देण्यात आलं.
"तू त्यांना नेतेयेस खरी पण आपल्याला दुपारी राजीवकडे जायचंय ना? उशीर नाही का होणार?"
"हो रे, आम्ही येतो एक दीड तासात. तोपर्यंत तू आंघोळ वगैरे आटपून घे." तिने पटापट मुलांचे कपडे बदलले. बॉल, पाण्याच्या बाटल्या, सायकली गोळा केल्या आणि ती दोन्ही मुलांसोबत जवळच्या पार्ककडे निघाली.
स्प्रिंग (वसंत) नुकताच सुरु होत होता. रस्त्याच्या कडांना पिवळी डॅफोडिल्स उमलली होती. इंग्लंडमधल्या त्या लहानश्या शहरातला उबदार उन्हाचा छानसा दिवस होता.
छोटा विहान झूम.... झूम ..... करून त्याची तीन चाकी सायकल चालवत होता. आर्यन थोडा शांत वाटत होता. त्याने सायकल बाजूला टाकली होती. बॉल पायांनी ढकलत तो गवतावर फिरत होता. कोवळ्या उन्हात त्या दोघांना तसं खेळताना बघून तिला बरं वाटलं. लग्नानंतर तीन वर्ष थांबून त्यांनी चान्स घेतला होता. आर्यन झाला आणि राजाराणीचे एकदम मम्मी डॅडी झाले. मुलं वाढवताना काय काय करावं लागतं याचा शोध दोघांना नव्यानेच लागत होता. "म्हणजे आपल्या आईवडलांनीसुद्धा इतक्या खास्ता खाल्ल्या असणार" हेसुद्धा आत्ता जाणवू लागलं होतं. आर्यनला भावंडं असावं म्हणून पुन्हा मुलाचा विचार सुरू झाला आणि आर्यननंतर बरोबर दोन वर्षांनी विहान आला.
विहान होण्यापूर्वी त्यांना दोघांनाही आर्यांची इतकी काळजी वाटत होती! नवीन बाळामुळे आर्यनकडे दुर्लक्ष होता कामा नये हे त्या दोघांनी एकमेकांना आणि स्वतःला हजारेक वेळा बजावलं होतं. त्यात आर्यनचा स्वभावही शांत. मनातलं सगळं सांगतो की नाही असा तिला कधी कधी प्रश्न पडायचा. त्या मानाने विहान मात्र लहान असूनही बिनधास्त. पहिल्या मुलाला वाढवताना आईवडलांच्या मनात जी अतिरिक्त काळजी, भीती असते, ती मुलांच्या स्वभावातही दिसून येते असं तिने इंटरनेटवर एका लेखात वाचलं होतं. झालंच म्हणजे.... आपण फार काळजी करतो हीसुद्धा एक काळजी करण्याची गोष्ट आहे तर! असं तिला वाटलं होतं. पण पुढे त्यात असंही म्हटलं होतं की हेच आईवडील पुढची मुलं होईपर्यंत पालकत्वाला बर्यापैकी सरावलेले असतात त्यामुळे तेवढी काळजी केली जात नाही. परिणामी मुलंसुद्धा तशी रिलॅक्सड असतात...... असं बरंच काही सांगितलं होतं . बालसंगोपनाबद्दल ती बरंच वाचत असे. दोन आयुष्य आपल्याला घडवायची आहेत, केवढी मोठी जबाबदारी! आयटी मधली स्वतःची नोकरी, त्यात परदेशामधलं डू इट युअरसेल्फ (स्वतःची कामे स्वतः करा) कल्चर आणि मुलं ..... तारेवरची कसरतच होती खरी!
तिच्या डोक्यात असे वेगवेगळे विचार चालू होते. परत तिची नजर मुलांकडे गेली. विहान मजेत सायकल चालवत होता. आर्यन मात्र नुसताच उभा होता. "सायकल नाही का चालवायची आज?" तिने त्याच्या जवळ जाऊन विचारलं.
"नाही"
"बरं मग बॉलने खेळूया का आपण?"
"ओके" म्हणून मग ते दोघे बॉलने खेळू लागले. पण आर्यनचा काही खेळण्याचा मूड दिसत नव्हता. "काय झालंय? थकलायस का तू?"
"आय अॅम बोअर्ड" 'बोअर्ड' ऐकल्यावर तिला इतका संताप आला. काय अर्थ आहे या वागण्याला. एवढा छान दिवस आहे. या थंड देशांमध्ये हिवाळ्यात महिनोन्महिने मुलांना थंडी पावसामुळे बाहेर खेळायला नेता येत नाही याचं तिला किती वाईट वाटायचं. मग काय आयपॅडस, कॉम्प्युटर्स आहेतच. जरा चांगला दिवस असेल तर मुलांना बाहेर खेळायला नेण्याचा त्यांचा आटापिटा असे. आतासुद्धा घरची आवराआवर, इस्त्री अशी कितीतरी कामं टाकून ती मुलांना पार्कमध्ये घेऊन आली होती आणि हे महाराज म्हणतायत "बोअर होतंय" त्याला ओरडायला ती तोंड उघडणार इतक्यात आर्यनचा एक मित्र आणि त्याची आई त्यांच्याच दिशेने येताना दिसले. मित्राची आई - तिची मैत्रीण, तिच्याशी बोलू लागली. आर्यनचा मित्र त्याला सोबत खेळायला बोलवू लागला. पण आर्यन अजिबातच खेळायच्या मूडमध्ये नव्हता. "काय झालं ग? आज हा खेळत का नाही?" तिच्या मैत्रिणीने सहजच विचारलं. "काय माहीत! आत्ता घरी बरा होता. पार्कमध्ये जाऊया, जाऊया चाललं होतं. म्हणून सगळी कामं ठेऊन मी यांना खेळायला घेऊन आले तर बघ ना...... निघूच आम्ही आता. हा खेळतच नसेल तर काय उपयोग...." मैत्रिणीचा निरोप घेऊन ती निघाली.
मुलांचे हात पकडून ती घरच्या दिशेने निघाली. आर्यनचा हात जरा घट्टच पकडून तिने विचारलं , "काय झालंय तुला? का नुसतं तोंड पाडून ठेवलंय ? घाईघाईने तयारी केली, सगळी कामं सोडून मी तुम्हाला खेळायला घेऊन आले, तो विहान बघ कसा खेळतो. तुझाच काय प्रॉब्लेम आहे! नंतर बाहेर जायचंय, तुम्हाला खेळायला वेळ मिळावा म्हणून मी ब्रेकफास्ट सुद्धा केला नाही, तशीच आले. मला थँक यू नकोय कोणाकडून पण तुम्ही तरी नीट खेळा. सगळं करून तुझं तोंड असं पडलेलंच रहाणार असेल तर कशाला करायचं मग! आता परत कशाला आणेन मी तुला पार्कमध्ये!" आर्यनचे डोळे डबडबायला लागले होते. ती गुश्यात , तो रडवेला आणि मम्मी दादाला नेमकी का रागावतेय ते कळत नसल्याने गोंधळलेला, दादाकडे काळजीने बघणारा विहान, तिघे घरी पोहचले.
त्यांचे चेहरे बघून काहीतरी बिनसलंय याची नवर्याला कल्पना आली. "तू डोसा खाल्लास का?" त्याने तिला विचारलं. "नाही. घेते आता" "मला वाटतं की ते...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बाहेरच्या खोलीतून आर्यनचा आवाज आला. त्याने खाल्लेलं सगळं उलटलं होतं. डोसा पचला नव्हता.
"मी तुला तेच सांगणार होतो. डोश्याचं पीठ जास्तच आंबलंय बहुतेक. तू चव नव्हती पाहिलीस का?"
"नाही रे!" तिने धावत जाऊन आर्यनला उराशी कवटाळलं. त्याचं तोंड धुतलं. कपडे बदलले. त्याला साखर दिली. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. "सॉरी रे पिल्ला. मीच जबरदस्ती तुला डोसा खायला लावला. त्यामुळे तुला अन्ईझी वाटत होतं म्हणून तू शांत होतास आणि मी तुलाच ओरडले..... आय अॅम सो सॉरी"
"इट्स ओके मम्मी" आर्यनने चिमुकल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. उरलेला दिवस छान गेला.
संध्याकाळी तिने आईला फोन केला. आईला तिने काय झालं ते सांगितलं. आपण किती वेड्यासारख्या वागलो या विचाराने तिची तिलाच लाज वाटली. एवढ्याश्या मुलाला अनाठायी एवढं ओरडलो म्हणून वाईट तर इतकं वाटलं ..... आईला सांगताना पुन्हा तिचे डोळे भरून आले, "माझ्याकडून इतक्या चुका होतात गं आई! मी खूप प्रयत्न करते सगळं नीट करायला, त्यांना सगळं बेस्ट द्यायला, जसं तू माझ्यासाठी केलंस, पण माझं सारखं सारखं चुकतं .... काय माहीत उद्या आर्यन आणि विहानला माझ्या काय आठवणी रहाणार आहेत, सारखी सारखी चुकणारी आई असं त्यांना माझ्याबद्दल वाटेल का गं!"
"अगं वेडे किती विचार करतेस! आर्यनच्या जन्माआधी तू, तू होतीस, इंजिनिअर होतीस पण आई होतीस का? नाही ना? फक्त मूल जन्माला येत नाही. मुलाच्या जन्माबरोबर आईसुद्धा जन्मत असते. मूल शिकत असतं आणि आईसुद्धा शिकत असते, कधी मूल चुकतं आणि कधी आईसुद्धा चुकत असते. पण नंतर पुढे जाऊन काय लक्षात रहातं माहितीये , फक्त प्रेम! आणि मी चुका केल्या नाहीत म्हणून कोणी सांगितलं. पण चुकांहून अधिक तुझ्या लक्ष्यात काय राहिलं की मी 'कित्ती ' केलं . कारण बाळा, कोणत्याही केलेल्या गोष्टीपेक्षा त्या मागचा हेतू हा जास्त महत्वाचा असतो. हेतू चांगला असेल तर कृतीमधली लहान सहान चूक चालून जाते. आणि तू जे काही करत्येस ते प्रेमापोटीच ना. त्यांना प्रत्येक गोष्ट बेस्टच मिळावी म्हणून स्वतःची दमछाक होईल एवढा आटापिटा नको करत जाऊ. तुझ्या बाळांची काळजी घेतेसच, माझ्या बाळाचीसुद्धा काळजी घेत जा." आईशी बोलून तिच्या मनावरचं मळभ गेलं. आर्यन आणि विहानच्या पावलांचा दडा दडा धावल्याचा आवाज तिच्या खोलीच्या दिशेने यायला लागला. "मम्मी कॅच " म्हणून तिला कळायच्या आत, आर्यनने तिच्या दिशेने बॉल फेकला. एका हातात मोबाईल धरलेल्या तिने झपकन दुसर्या हाताने कॅच पकडला. "ये ऽऽऽऽ...." आर्यन आणि विहान खूष होऊन ओरडले आणि तिला येऊन बिलगले. चुकणार्या आईचे सगळेच कॅच काही सुटत नव्हते
आनन्दिनी
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
आवडलं!
आवडलं!
:O=
:O=
"माझ्याकडून इतक्या चुका होतात
"माझ्याकडून इतक्या चुका होतात गं आई! मी खूप प्रयत्न करते सगळं नीट करायला, त्यांना सगळं बेस्ट द्यायला, जसं तू माझ्यासाठी केलंस, पण माझं सारखं सारखं चुकतं .... काय माहीत उद्या आर्यन आणि विहानला माझ्या काय आठवणी रहाणार आहेत, सारखी सारखी चुकणारी आई असं त्यांना माझ्याबद्दल वाटेल का गं!" Khup chhan:)
"माझ्याकडून इतक्या चुका होतात
"माझ्याकडून इतक्या चुका होतात गं आई! मी खूप प्रयत्न करते सगळं नीट करायला, त्यांना सगळं बेस्ट द्यायला, जसं तू माझ्यासाठी केलंस, पण माझं सारखं सारखं चुकतं .... काय माहीत उद्या आर्यन आणि विहानला माझ्या काय आठवणी रहाणार आहेत, सारखी सारखी चुकणारी आई असं त्यांना माझ्याबद्दल वाटेल का गं!" Khup chhan:)
मस्त लिहिलेय.. पुलेशु
मस्त लिहिलेय..
पुलेशु
नेहमी प्रमाणे मस्त
नेहमी प्रमाणे मस्त
खुप छान.
खुप छान.
सुंदर. नेहमीप्रमाणे खूप छान.
सुंदर. नेहमीप्रमाणे खूप छान.
खूप छान . खूप रिलेट होता आलं
खूप छान
. खूप रिलेट होता आलं .
नेहमीप्रमाणे खूप छान.
नेहमीप्रमाणे खूप छान.
खूप आवडतात मला तुमच्या कथा. साध्या आणि मनाला भिडणार्या.
खुपच मस्त 'मॅसेज'....!!!!
खुपच मस्त 'मॅसेज'....!!!!
व्वा !! बहोत खूब !!!
व्वा !! बहोत खूब !!!
खुप छान लिहिले आहे.
खुप छान लिहिले आहे.
<< फक्त मूल जन्माला येत नाही.
<< फक्त मूल जन्माला येत नाही. मुलाच्या जन्माबरोबर आईसुद्धा जन्मत असते >> किती सहजपणे एक मोठ्ठ सत्य उलगडलेत.....
<< तुझ्या बाळांची काळजी घेतेसच, माझ्या बाळाचीसुद्धा काळजी घेत जा >> Too good !!
"& जरा हटके" या मराठी चित्रपटातला सुहास जोशींचा नातीबरोबरचा फोनवरचा संवाद जरूर पहा,तुम्हाला आवडेल !
मस्तं एकदम
मस्तं एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> कधी मूल चुकतं आणि कधी आईसुद्धा चुकत असते. पण नंतर पुढे जाऊन काय लक्षात रहातं माहितीये , फक्त प्रेम! <<<< + १११११११११
चांगले लिहिलय, सौम्य
चांगले लिहिलय, सौम्य हळूवारपणे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिले आहे, आवडले.
छान लिहिले आहे, आवडले.
खूपच छान लिहिता तुम्ही...
खूपच छान लिहिता तुम्ही... साधं सोप्प सरळ... मनाला नेहमीच भावणार
खूपच छान लिहिता तुम्ही...
खूपच छान लिहिता तुम्ही... साधं सोप्प सरळ... मनाला नेहमीच भावणार
आवडलं
आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोड लिहिलय...पाणीच आलं
किती गोड लिहिलय...पाणीच आलं डोळ्यात माझ्या टचकन...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण कधीकधी खुप आटापिटा करतो आदर्श माता वगैरे व्हायचा असं मला पण वाटतं आजकाल पण मुलांना चुकणारी आईच जास्त आवडत असेल बहुतेक. शेवटी काय तर आपण "आई" म्हणुन मुलांच्या बरोबरीनेच वाढत असतो ना.
त्यामुळे मुलांचं जे वय तेच आईच...त्यामुळे चुका करतच आई मोठी होणार
मस्त लिखाण..लिहित राहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !!!
मस्त !!!
खूप छान!! डोळ्यात पाणी आलं
खूप छान!! डोळ्यात पाणी आलं अगदी...
वा वा! तुमचा लेख दिसला आणि
वा वा! तुमचा लेख दिसला आणि लगेचच वाचायला घेतला. नेहमीप्रमाणेच अगदी नितांत सुंदर...
प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसत जातं मनाला.
भरून आलं एकदम.
मस्त!
मस्त!
इथे मिळालेल्या या छान
इथे मिळालेल्या या छान प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार .
कळावे, लोभ असावा
आनन्दिनी
छानच लिहिलंय... ! आवडलं.
छानच लिहिलंय... ! आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा! तुमचा लेख दिसला आणि
वा वा! तुमचा लेख दिसला आणि लगेचच वाचायला घेतला. नेहमीप्रमाणेच अगदी नितांत सुंदर...
प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसत जातं मनाला.
भरून आलं एकदम.+1
Pages