भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालकांची चूक असंही नसेल.बऱ्याच जणांना ताटातलं सगळं संपवणे हे गरिबीचं लक्षण वाटतं.>> दिल्लीला काही लग्नात हा प्रकार पाहिला. याबाबत नॉर्थवाले विशेषतः पंजाबी लोकांच्या लग्नात तर फार उतमात दिसतो. दारूसुद्धा पेगमध्ये थोडी शिल्लक ठेवावी असा काही संकेत असतो बहुदा. सगळी दारू ढोसल्यास गरीब मानत असतील. मी नाय घेत पण एवढ्या महागड्या मद्याची उधळपट्टी मी तर नसती केली.

वरच्या वादावरून एक किस्सा आठवला. पुण्यात राहणाऱ्या तेलगू कलीगची गोष्ट. भावाचा पगार गलेलठ्ठ पण पहिला लॉकडाऊन लागला त्यावेळी घरातला किराणा संपला होता. खाणारी चार तोंडे. त्यातली दोन चिल्लीपिल्ली. भाताशिवाय त्याच्या नोकरी करणाऱ्या बायकोला इतर काही येत नव्हतं. सोसायटीने मग प्रत्येक घरातून सामानाची यादी मागवली. याने त्यात पाच किलो तांदूळ मागवला. जेव्हा सामान पोचलं तेव्हा याला फक्त दीड किलो तांदूळ मिळाला. कारण काय तर *सर्वांना पुरायला हवा म्हणून प्रत्येक घरात झालेले वितरण मागणीपेक्षा बरेच कमी करण्यात आले होते.* स्थानिक असल्याने आम्ही काही मदत करू या अपेक्षेने बिचाऱ्याने फोन केला तेव्हा फार वाईट वाटलं. पुण्यात नसल्याने काहीही करता आले नाही. मला नाही वाटत महिन्याला लाखाच्या वर कमाई करणाऱ्या त्या कुटुंबाने त्या प्रसंगानंतर कधी अन्न वाया घातले असावे. शिवाय अन्न वाया गेल्याने पुरावठ्यापेक्षा मागणी वाढते, परिणामी महागाई वाढते. आपण वाया घातलेल्या भांडभर भातामुळे दोन कुटुंबे उपाशी झोपतील असा विचार मनात यायला हवा.

आपली कुवत, व्यक्तिस्वातंत्र्य अमर्याद असले तरी उत्पादनक्षमतेला मर्यादा आहेत. जेवढे लागेल तेवढेच बनवा/ घ्या. अर्थात हे optionalच आहे, बळजबरी नाही.

अर्थात हे optionalच आहे, बळजबरी नाही. >> Happy आवडलंच. हल्ली काही सुचवायचं तरी घाबरायला होतं. लगेच बळजबरी करताय म्हणतात. हे असं डिस्क्लेमर आवडलंच!!!!!

बळजबरी करू नये, हे बरोबर आहे. पण मग असे पण म्हणू नये की रोज पुरणपोळी खायचं सोडून आमटीभात काय खात बसलाय? ज्याला/जिला जे आवडेल ते करावे.

महत्त्वाचे म्हणजे, लेख आवडला.

बऱ्याच जणांना ताटातलं सगळं संपवणे हे गरिबीचं लक्षण वाटतं>>>

मी_अनु हा प्रकार माझ्या सासरी आहे. चपाती किंवा भाकरी चा तुकडा मुद्दाम टोपलीत ठेवणे.

सुंदर संवाद. मलाही थोडं लिहावं वाटलं.

मला वाटतं अन्न वाया घालवण्यामागची कारणं विस्तृत आहेत.
मी असा माजोरा होतो. कॉलेजला असताना होस्टेलला रहात होतो. सुट्टी लागली आणि घरी आलो की आई समोर बसून आग्रह करून खाऊ घालायची. मला राग यायचा आग्रहाचा. मी मुद्दाम उष्टं टाकून उठायचो.

एकदा पैसे संपले. 'ठीकाय' म्हटलं. वडील टाकतीलच अकाऊंटला. नेमकं वडीलांना त्या दिवशी जमलं नाही. मी दोनेक दिवसांपूर्वीच खानावळ बदलली होती. अकाऊंटमध्ये खडखडाट असल्यानं आगाऊ पैसे भरले नव्हते. मी जेवायला खानावळीत गेलो. पहिला घास हातात घेतला. खानावळीच्या मालकानं तितक्यात विचारलं, “पैसे आणलेस का?” मी “नाही” एवढं म्हणेपर्यंत हातातला तो घास हातात राहिला आणि मालकानं समोर वाढलेलं ताट उचलून नेलं. मी तडक उठून खोलीत गेलो आणि लहान मुलासारखा रडलो. अपमान झाला म्हणून नाही, वाईट वाटलं म्हणून नाही. मला प्रचंड भूक लागली होती पण खायला काही नव्हतं. त्या असहाय अवस्थेत मी दाराची कडी लावून हुंदके देऊन रडलो. त्या दिवशी मला समजलं अन्नाची किंमत (price) काय आणि मूल्य (value) काय असते.

एकदा एका प्रसंगी अक्षरश: भूक आवरेना. जवळ अन्न नाही. खिशात पैसे होते, पण अन्न मिळेल अशी व्यवस्था कुठं नव्हती. तेंव्हा आंब्याची आणि जांभळाची कोवळी पानं खाल्ली, कच्चे बटाटे खाल्ले.

एकदा गंमत म्हणून आम्ही दोघं मित्र तीन तास सायकल हाणत एका जत्रेला गेलो. काय काय खायचं, कशी कशी मजा करायची. पोहोचल्या-पोहोचल्या आधी उसाचा रस प्यायला गेलो. दोन ग्लास ऑर्डर केले आणि मित्रानं खिशात हात घातला..... पैसे कधीतरी रस्त्यात पडून गेले होते. आम्ही तसंच उठलो. आता परगावात कोण जेऊ घालील? सूर्यास्त होत आला होता. तसेच पाय ओढत परतीच्या वाटेला लागलो. एका ठिकाणी विहीरीवर मोटर चालू होती. पोटभर पाणी पिऊन घेतलं. भूक मरेना. भीक कशी मागावी समजेना. दोनदा धाडसानं कोणाला तरी जेवण मागू असं ठरवलं, पण असं एखादं शेतातलं घर दिसलं की जायला पाय वळेनात, बोलायला जीभ धजेना. उसाचे ट्रक जात होते रस्त्यानं. एखादा अर्धा ऊस कुठं कुठं दिसे. पण गाडीखाली चिरडलेला. चांगला मिळाल्यावर खाऊ म्हटलं. ऊस चांगला मिळेना. पायातलं बळ सरत चाललं होतं. शेवटी असे चिरडलेले ऊस घेऊन बरा भाग खायचा असं करत रात्री १० वाजता होस्टेलला पोहोचलो. अन्नानं आमची जागा आम्हाला परत दाखवून दिली होती.

एकदा आम्ही चार मित्रांनी २-३ एकर शेतात लावणी केली. आठ दिवस कमरेत वाकून चालत होतो. अन्न कसं येतं त्याची जाणीव झाली.

आईनं गहू निवडले. नंतर चुकून खाली सांडलेले अर्धाभर मूठ गहू तिनं काडीकच-यातून वेचून घेतले. मला कवडी कमवायची अक्कल नव्हती, पण ज्ञान गरजेपेक्षा जास्त होतं. मी चेष्टा केली. “आपल्याला काय भीक लागली आहे का?” असं म्हणून मी ते गहू अक्षरश: उधळून दिले. आई चिडली. वडील शांतपणे बोलले. दोनेक दिवसांनी त्यांनी मला बोलावलं आणि दाराबाहेर बोट दाखवलं. रेशनच्या दुकानाची गाडी आली की रस्त्यावर धान्य सांडायचं. गाडी आताच येऊन गेली होती. त्याकाळी लखपती असणारे वयस्कर गृहस्थ मातीसकट ते धान्य धोतराच्या सोग्यात भरून घेत होते. केवळ त्यांचे चार पैसे वाचावेत म्हणून नाही. त्यांचं म्हणणं होतं, “ते अन्न आहे. त्यामुळं आपण जगतो. ते असं कोणाच्या पायाखाली का यावं? ते फुकट येत नाही. म्हणून ते वायाही घालवायचं नाही.”

केवळ दोन वेळच्या जेवणासाठी काम करणारी माणसं पाहिली. त्याच्या नजरेतून अन्न पाहिलं आणि मला लाज वाटू लागली.

माझा माज कोणी सांगून उतरला असता का? हा प्रश्नच आहे.

तीन वर्षांपूर्वी पायी चाललो होतो. तरुणाई त्या भागात जमा होऊन संध्याकाळी कारणी लावते. एक वाढदिवस होता आज. मित्रांनी मोठा केक आणला. कट्ट्यावर ठेवून त्यानं कापला असं झालं आणि ज्यानं आणला त्यानं पूर्णच्या पूर्ण केक उचलून कापणा-याच्या चेह-यावर मारलाच. इतरही मुलं मुली पुढं झाले आणि केकचे हाताला लागतील ते तुकडे ओरबाडून त्याला चेह-याला, केसांना थापून टाकले. टिश्यू पेपरला हात पुसत ते सारे समाधानानं पार्टीसाठी रवाना झाले. एक घास केकचा कोणी खाल्ला नाही. तिथं २-३ लहान मुलं फिरत होती. त्यांनी ते केकचे तुकडे वेचून खायला सुरुवात केली.
मी फक्त पाहत रस्त्याच्या पलीकडं उभा होतो. कदाचित हा रस्ता कधीच ओलांडता येणार नाही इतका रुंद होता.

वाया घालवणं आणि न घालवणं यातली कोणती गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना अभिमानानं शिकवायला आवडेल?

थोडं अवांतर. असंच आठवलं म्हणून.
आम्हाला इतिहासाचे शिक्षक होते. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्नाला गेले. सोलापूर की उस्मानाबाद असं काही तरी. उन्हाचा तडाखा. लग्नसराई. रस्त्यावरून शिक्षकांच्या समोरून डुलत चालणा-या गटापैकी एकजण वाकला आणि भडा-भडा ओकला. दारुसोबत खाल्लेले शेंगदाणे दारुसोबत खाली डांबरी रस्त्यावर पडले. बस. फक्त दारु आणि शेंगदाणे. शिक्षक लग्न लावून, जेवून खाऊन, आप्तेष्टांच्या गाठी-भेटी गप्पा आटोपून नातेवाईकांसोबत परत निघाले. तेच ठिकाण. उन्हं तापून उतरली होती. पालातली लहानशी पोरं रस्त्यावर भटकत होती. त्यांना रस्त्यावर शेंगदाणे सांडलेले दिसले. त्यांनी त्यातले मोठे मोठे शर्टला पुसून खायला सुरू केले.

अरिष्टनेमी,
सुंदर !

अन्नाची किंमत (price) काय आणि मूल्य (value) काय असते. >>>>> + ११११११.....

अरिष्टनेमी, बापरे! सुन्न करणारा प्रतिसाद.
रवींद्र पिंगे यांच्या एका पुस्तकात असाच एक लेख वाचला होता. ते कुठल्यातरी गेस्ट हाऊसला उतरले होते. सोबत आणलेला शिरा खराब झाला म्हणून त्यांनी पानात घालून बाहेर झाडाखाली ठेवून दिला. तिथे काम करणारे गडी होते, त्यातल्या एकाने आनंदाने दुसऱ्याला सांगितलं.. हा बघ शिरा मिळाला मला..शिरा Sad पिंग्यांनी सांगितलं, अरे त्याला बुरशी आलीय. तो म्हणाला, मला चालतं. Sad

प्रथमतः, कुमार यांचे म्हणणे पूर्ण मान्य आहे, खाण्याची गरज न ओळखता खाणे मागवणे हे पूर्ण पणे अयोग्य आहे. ह्याचे स्वातंत्र्य असावे का ? तर हो. आपल्याला हवे तसे पैसे उधळण्याचा हक्क असावाच, आणि अन्न वाया घालवण्याचा हक्क सुद्धा असावा, म्हणजेच कायद्याने काही शिक्षा बिक्षा देऊ नये.
पण असे न करण्यास प्रोत्साहन द्यावे का ?- १००% द्यावे. त्याकरिता "माजलेले" हि उपाधी काही अयोग्य नाही. आणि माझ्या दृष्टीने एखादी गोष्ट व्यापक पातळीवर अयोग्य गोष्ट असेल तर जजमेन्ट होणारच.

पण अन्नपदार्थाची चणचण हे जगातल्या उपासमारीची कारण आहे का ?

नाही. उपलब्ध अन्न विकत घेण्याइतपत पैसे नसणे हे उपासमारीचे मुख्य कारण आहे. सर्वांना पुरून उरेल इतके अन्न आपण निर्माण करतोच, सध्यातरी.

मागे यूट्यूबवर एका हॉटेलाची माहिती पाहिली होती. ते जर रिकामे ताट आणले तर ते डिस्काउंट देतात. मला ऐकून पण छान वाटलं होतं...
https://youtu.be/AHoABEdAFmQ?t=965

पुर्वी राजे, जहागीरदार यांच्या जेवणाच्या टेबलावर असेच जास्तीचे जेवण मांडुण ठेवलेले असायचे.
विशेषतः युरोपातील चित्रपट / चित्र वगैरे बघितले तर लगेच लक्षात येईल.
राजाला भेटायला आलेल्या प्रजेचा, ईतर पाहुण्यांचा व राजवाड्यात काम करणा-अयंचा असा विश्वास दृढ व्हावा की आपला राजा खुप श्रीमंत आहे, त्यांच्या नजरेत ती श्रीमंती भरावी म्हणुन असे केले जात असे.
जेवणाच्या टॅबलावरची श्रीमंती -> capable of ruling -> powerful

सर्वांचे प्रतिसाद छान. मी लहान असताना ते वर्षाचं धान्य वाळवताना सांडलेलं धान्य आम्ही भावंड कायम गोळा करायचो बाबा करताना त्यांचं बघून. आणि पानात काही टाकायचं नाही ही शिस्तच होती घरात.
माझा मुलगा लहान असताना पानात उरली भाजी की नको म्हणायचा . पण सांगितलं की खायचा , खरं दर वेळी सांगायला लागायचं. आणि सारखं पनीर, ग्रेव्हीवल्या भाज्या कर , नेहमीच जेवण काय सारखं सारखं करतेस असं म्हणायचा.
तो 12 वर्षांचा असताना संभाजी भिडे मोहिमेला गेला त्याच्या बाबांबरोबर.
तिथे रोज 25 - 30 किमी डोंगरातून चालायला लागतं ,स्लीपिंग बॅग आणि 4 दिवसांची शिदोरी बरोबर घेऊन. अर्थात टिकणारेच पदार्थ दिले होते मी. पण त्याला कडक भाकरी वगैरे आवडत नव्हती. गुळपोळी, दशम्या, मेथीचे पराठे बरेच दिले होते आवडतात म्हणून. डोंगरात असल्याने काही खायला मिळत नाही आणि आंघोळ ही झरा, तलाव लागल्यावरच मिळायची. तर 3 ऱ्या दिवशी त्या मेथीच्या पराठ्यांना बारीक वास यायला लागलेला. पण दिवसभर चालून त्याला इतकी भूक लागलेली की ते वास येत असलेले पराठे त्याने खाल्ले, कधी नव्हे ते कडक भाकरी खाल्ली.
मग घरी आल्यावर परत केव्हातरी पानात भाजी उरलेली पण मला स्वतःहूनच म्हणाला मोहिमेत असं जेवण पण किती छान लागतं ना? आणि मी न सांगता तेव्हापासून ताट स्वच्छ व्हायला लागलं.

आमच्या इन्स्टिटुटच्या मेसमध्ये दररोज ब्रेकफास्ट-लंच-डीनर साठी प्रत्येक वेळी अंदाजे 250-270 मुले-मुली जमतात. पण कधीही उष्टे अन्न टाकत नाहीत, कारण तसे केल्यास रू. 50 दंड भरून द्यावा लागतो. त्यात कोणत्याही प्रकारची ढिलाई दाखवली जात नाही. दर महीन्याच्या सुरूवातीला प्रत्येक वर्गातील 2 अश्या एकूण 10-12 जणांना महीनाभर मेस सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते. तर हा माझा मित्र किंवा मैत्रीण आहे म्हणून त्याने/तिने उष्ट टाकले तरी सोडून दे असे मुळीच चालत नाही. नवीन विद्यार्थ्यांना पहील्याच दिवशी ह्याची कल्पना दिली जाते. त्यामुळे तिही वचकून असतात, आणि पुढे लागेल तेवढेच घेण्याची सवय लागते. ह्यात काही महाभागही असतात, पण वाद घालणार्यांना रू. 500 दंड असतो. ह्या सर्वाचा परीपाक म्हणजे मेसमधील अन्न अजिबात वाया जात नाही.

मागील काही प्रतिसादांतील अतिशय आवडलेली वाक्ये :

“आपली कुवत, व्यक्तिस्वातंत्र्य अमर्याद असले तरी उत्पादनक्षमतेला मर्यादा आहेत. जेवढे लागेल तेवढेच बनवा/ घ्या.”

“वाया घालवणं आणि न घालवणं यातली कोणती गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना अभिमानानं शिकवायला आवडेल?”

“एखादी गोष्ट व्यापक पातळीवर अयोग्य गोष्ट असेल तर जजमेन्ट होणारच.”

“व्यक्तिस्वातंत्र्याला विवेकाची जोड आवश्यक आहे.”

कधी कधी restaurants मधील जेवण अतिशय तिखट किंवा मसालेदार असतं. जर तुम्ही रोज इतके मसालेदार/ तिखट जेवत नसाल तर ऑर्डर केलेला पदार्थ सगळा संपवणे कठीण होऊन बसते. आता ह्यावर उपाय म्हणजे 'कधी restaurants मधे जेवायला जाऊच नये' हा नाही. अनेकदा इच्छा नसतानाही केवळ गरज म्हणून restaurant मधे जावेच लागते. आम्ही दरवेळेस वेटरला ऑर्डर देण्यापुर्वी 'हा पदार्थ फार तिखट नाही ना?' असा प्रश्न विचारतो. 'तो तिखट नाही' असं वेटरने खात्रीपूर्वक सांगितले तरी अनेकदा आम्हाला तो तिखट वाटू शकतो. अश्यावेळेस केवळ आपल्यावर "माजलेले" असा शिक्का बसू नये म्हणून तो तिखट पदार्थ संपवणे ही एक मोठीच शिक्षा ठरते.

इच्छा आहे तिथे मार्ग निघतो.
** सोय / गरज / अडचण म्हणून आपण जनरली जवळपास जातो बाहेर जेवायला, आवडत्या ठिकाणी पुन्हा जातो. तिथल्या चवी / खास पदार्थ / आपल्याला जमणारे आयटम माहीत असतात.
** हौस, नावीन्य, लाँग ड्राईव्ह, food joint explore करणे, एकाच ठिकाणी पुन्हा न जाणे -- यात तुम्ही म्हणताय ते होऊ शकते.
** काही ठिकाणी मेन्यू कार्डवर तिखटपणाची लेव्हल दर्शवितात.
** हॉटेलवाल्यांना धंदा हवा असतो. वेटरपेक्षा वरिष्ठ स्टाफला विचारल्यास जास्त खात्रीची उत्तरे येतील?
** निवडलेल्या पदार्थांची सँपल टेस्ट मागावी, मूळ ऑर्डरपूर्वी?
** आपण खाऊही शकणार नाही इतके जहाल हॉटेलवाले क्वचितच बनवतील. कारण पाणी पिऊन पोट भरल्यावर लोक पुढची डिश मागवायची शक्यता कमी.
** अर्धे पदार्थ फिके, अर्धे तिखट / अज्ञात मागवले तर दोन्ही एकमेकाना सावरून नेतील.
** सोबत सॅलड, ताक, दह्यातले रायते असल्यास जीभ कमी हुळहुळेल.
** त्यातून उरलेच तर पार्सल घेता येईल. घरी सुधारून खाता येईल.
** पार्सल मिळते की नाही माहीत नसेल तर जाताना आपले डबे घेऊन जाता येईल.
** मला अन्न वाया घालवायचे नाहीये हे मनाशी पक्के असले की अजूनही मार्ग सुचतील.
प्रश्न बाह्य शिक्क्याचा नाही तर आतल्या जाणिवेचा असतो.

प्रश्न बाह्य शिक्क्याचा नाही तर आतल्या जाणिवेचा असतो.>>> हे पटलं

आपली कुवत, व्यक्तिस्वातंत्र्य अमर्याद असले तरी उत्पादनक्षमतेला मर्यादा आहेत. जेवढे लागेल तेवढेच बनवा/ घ्या. अर्थात हे optionalच आहे, बळजबरी नाही.>> मतितार्थ

कारवी, आपण सुचवलेले बरेचसे उपाय मला माहित आहेत. पण तरीही अलीकडे ही समस्या वारंवार येतेय.
त्यातून उरलेच तर पार्सल घेता येईल. घरी सुधारून खाता येईल >> घरी करायचा कंटाळा आला/ वेळ नाही म्हणून हॉटेल ला गेलो तर अजून हॉटेल मधून पदार्थ आणून काम का वाढवून घ्यायचे? पार्सल घरी आणून मग तसेच मोलकरणीला देणे हे करतो कधी कधी. पण हल्ली मोलकरणींनाही उरलं-सुरलं अन्न नको असतं हा अनुभव बर्‍याच वेळा घेतला आहे.
शिवाय बर्‍याच वेळा Outing साठी बाहेर गेल्यावर/ सहली साठी ४-५ दिवस बाहेर असताना हॉटेल मधे जेवण होते. तेव्हा हा पर्याय गैरलागू ठरतो.
सॅलड, ताक, दह्यातले रायते >> हे खाल्ले तर तिखटाची जाणीव कमी होते पण भूकही कमी होते मग पुन्हा ऑर्डर केलेली भाजी उरतेच.
वेटरपेक्षा वरिष्ठ स्टाफला विचारल्यास जास्त खात्रीची उत्तरे येतील>> अनेकदा वरिष्ठ स्टाफनेही चुकीची माहिती पुरवली आहे.
निवडलेल्या पदार्थांची सँपल टेस्ट मागावी, मूळ ऑर्डरपूर्वी>> हा चांगला उपाय आहे. पण सर्व हॉटेल अस करू देतील असे वाटत नाही.
प्रश्न बाह्य शिक्क्याचा नाही तर आतल्या जाणिवेचा असतो.>> ' कोणी अन्न टाकून देत असेल तर ती व्यक्ती माजलेली नसून कदाचित नाईलाजाने अन्न टाकत असेल', ही जाणीव ठेवाल अशी आशा करते.

>>>>** पार्सल मिळते की नाही माहीत नसेल तर जाताना आपले डबे घेऊन जाता येईल.
>>>
गेली ४ वर्षे मला फिरतीमुळे एका लहान गावात दरसाल जावे लागते. तिथे एक छोटी खानावळ आहे. पहिल्या वर्षीच माझ्या लक्षात आले की त्यांची थाळी मला काही संपत नाही. त्यात ३ मोठ्या पोळ्या व भात असतो. पुढच्या वेळेस मी त्यांना भात नको म्हणून सांगितले. त्याचे त्यांनी पैसेही कमी केले. मला २ च पोळ्या पुरतात. म्हणून मी एक छोटा डबा जवळ ठेवतो आणि त्यांच्या ताटातील १ पोळी आधीच डब्यात ठेवतो. तीच संध्याकाळी घरी खातो.

एखादे वेळेस डिश तिखट लागली म्हणून टाकली तर ठीक असू शकते.स्वतःच्या तब्येतीला झेपत नसताना तिखट खाल्ले नाही तरच बरे.पुढच्या वेळेपासून ही डिश अशी आहे ही आठवण नीट ठेवून दुसरे काही मागवता येईल. हॉटेल मध्ये स्टार्टर आणि नंतर मेन कोर्स मागवताना जास्त लोक असले तर हॉटेल वाले जास्त भाज्या घ्यायला सांगतात.नारिंगी पनीर तेल काजू ग्रेव्ही ने माखलेल्या भाज्या स्टार्टर नंतर त्या प्रमाणात खाल्ल्या जात नाहीत.
अश्यावेळी स्टाफ च्या आश्चर्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम कमी भाज्या मागवतो.कधी अगदीच भूक नसली तर फक्त 3 स्टार्टर मागवून 6 जणात खाऊन परत येतो.
हैदराबाद हाऊस ची बिर्याणी काय प्रकार आहे हे माहीत नसताना ऑफिस लंच मध्ये प्रत्येकी 1 बिर्याणी ऑर्डर केली होती.मग पार्सल घेऊन हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांनी रात्री डिनर म्हणून तेच खाल्ले.(कँटीन च्या फ्रीज मध्ये दिवसभर ठेवले).
एकंदर कधी तरी चुकीने वाया गेले तरी ठीक आहे.पण जे मुद्दाम पानात जास्त घेऊन नंतर टाकतात त्यांचा वैताग येतो.

Submitted by soha on 3 November, 2020 - 14:09 >>>>
मी घरीच - असते, शिजवते, खाते. बाहेरचे जग फारसे पाहिलेले नाही. त्यामुळे,
खाद्यविषयक अडचणींनी इतके चहूबाजूंनी गांजलेले लोकही असू शकतात हे माझ्या लक्षातच आले नाही हो.

बाकी अशा नित्यनेमाने, एकजात सगळ्या डिश, जहाल तिखट बनवणार्‍या २-३ हॉटेल्सची नावे द्याल का? कधी कामानिमीत्त त्याबाजूला गेले तर खाता येईल. मला डोळ्यातून पाणी कानातून कळ येईल असे तिखट आवडते.

एकंदर कधी तरी चुकीने वाया गेले तरी ठीक आहे.पण जे मुद्दाम पानात जास्त घेऊन नंतर टाकतात त्यांचा वैताग येतो.

नवीन Submitted by mi_anu>>अगदी बरोबर

प्रश्न बाह्य शिक्क्याचा नाही तर आतल्या जाणिवेचा असतो.>> ' कोणी अन्न टाकून देत असेल तर ती व्यक्ती माजलेली नसून कदाचित नाईलाजाने अन्न टाकत असेल', ही जाणीव ठेवाल अशी आशा करते.

नवीन Submitted by soha>>
*एखाद्या वेळी* नाईलाजाने अन्न टाकले तर ती व्यक्ती माजलेली नसते पण नेहमीच / रोजच अन्न टाकले तर ती व्यक्ती माजलेली आहे असेच म्हणावे लागेल.

आम्ही मंदिरात जायचो एका , रविवारी लंगर प्रसादासाठी , मुलं लहान होती तर माझं माझं ताट पाहिजे म्हणून मोठं ताट घ्यायची आणि तिथे सगळ्यांना सारखचं वाढायचे , लाइन आणि गडबड असल्याने सांगता यायचे नाही तर मुलं टाकून द्यायची आणि मला ते सहन व्हायचं नाही तर मी बरेचदा झिप lock bags न्यायचे , त्यात काढून घरी आणायचं. सगळ्या अन्नाला प्रसादासारखे समजावे , हे वाचलयं. पण तेव्हापासून कायम झिप lock bags पर्स मध्ये ठेवते ... ओझे पण होत नाही. कधी कधी टाकण्याशिवाय पर्याय नसतो मात्र.

प्लॅस्टिक टाळण्यासाठी आता बरेच स्टीलने/काचेच्या डब्यांनी रिप्लेस केलेयं/ करतेय. गरम अन्न नको वाटते त्यात , बहुतेक ठिकाणी टेक अवे चे डबडे प्लॅस्टिकचे /स्टायरोफोमचे असतात. फार अस्वस्थ होते. माझ्या माझ्या पायरेक्स/स्टील मध्ये द्या म्हणायला लाजणार नाही. काही पर्याय नाही आता. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व पर्यावरणासाठी , दोन्हीसाठी.

*एखाद्या वेळी* नाईलाजाने अन्न टाकले तर ती व्यक्ती माजलेली नसते पण नेहमीच / रोजच अन्न टाकले तर ती व्यक्ती माजलेली आहे असेच म्हणावे लागेल. >> धन्यवाद कमला. आता प्रश्न असा उरतो की लग्न समारंभात किंवा restaurant मधे अन्न टाकताना तुम्हाला एखादी व्यक्ती दिसली आणि तुम्ही त्या व्यक्तीला personally ओळखत नाही तर ती व्यक्ती रोजच अन्न टाकते असा निष्कर्ष तुम्ही कसा काढणार?
कधी कधी टाकण्याशिवाय पर्याय नसतो मात्र. >> धन्यवाद अस्मिता.

आता प्रश्न असा उरतो की लग्न समारंभात किंवा restaurant मधे अन्न टाकताना तुम्हाला एखादी व्यक्ती दिसली आणि तुम्ही त्या व्यक्तीला personally ओळखत नाही तर ती व्यक्ती रोजच अन्न टाकते असा निष्कर्ष तुम्ही कसा काढणार?...

अन्न टाकतेवेळी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावावरून!
जर नाईलाजाने टाकावे लागत असेल तर चेहऱ्यावर थोडेसे दुःखी किंवा अपराधीपणाचे भाव असतील आणि रोजच टाकत असेल अपराधीपणाची भावना औषधालाही नसेल!!!

धन्यवाद वि_मु
प्रश्न तुम्ही आम्ही निष्कर्ष काढण्याचा नाहीये, तर अन्न टाकणे हे चूक आहे असे आतून वाटण्याचा आहे. ज्यांना असे वाटते ते नक्कीच पुढच्या वेळी अन्न टाकावे लागणार नाही यासाठी प्रयत्न करतील.

इथे व्यक्तींच्या खाण्याचे निरीक्षण करून कोण माजलेले कोण नाही याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
इच्छुकांनी लाभ घ्यावा.

Pages