आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो.
==============================================================
सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर. आपण जर या ब्रह्मांडाकडे (विश्व वा यूनिवर्स या शब्दांत भारतीय भावजगतातल्या अनेक संकल्पना नसतात म्हणून ब्रह्मांड) पाहिले तर जाणिव असलेले मानव ही स्पेसिस वा तत्सम इतर सजीव वा इतर काहीही आणि ब्रह्मांडातल्या कोठल्याही जागेतले तत्सम "प्रकार" सोडले तर, म्हणजे त्यांना ब्रह्मांडातून वगळले तर, असत्य नावाचा प्रकार कुठे उरत नाही. उरायला स्कोपच नाही. सगळं असत्य या सजीवांच्या विचारांत, मनांत, मेंदूंत, आणि कंच्या, इ इ आढळून येईल. याच्याबाहेर सांडलेलं असेल कोरडंफटक, रख्ख, मृत, नियमबद्ध वा कसं, अस्ताव्यस्त, अनिरीक्षित वास्तव विश्व. हे वास्तव म्हणजेच सत्य. हे जिंकते म्हणजे काय? कोणाशी त्याची लढाई चालू असते? कोणाशीही नाही! मग सत्यमेव जयते कशाला म्हणायचे? सत्यमेव वसते म्हणा किंवा सत्यमेव अस्ते म्हणा किंवा मराठीत सत्यच असते असे म्हणा!!!
आता हे गडबड गोंधळ करणारे सजीव सिच्यूएशन मधे घेऊन पाहू. त्यांच्या मनांत, मेंदूत अनंत सत्य, असत्य संकल्पना आहेत. परंतु सत्य संकल्पनांची नेहमी एक युद्धशील खुमखुमी आढळते. त्यांना असत्याचं पृथ्वीतलावरचं, ब्रह्मांडातलं नामोनिशान मिटवून टाकायचं असतं. या खुमखुमीतच सत्यमेव जयते चा जन्म होतो. मानवाने सत्याला अवाजवी महत्त्व देऊन ठेवलं आहे. सत्य हे साध्य तर नाहीच, पण मार्ग देखील नाही. ते फक्त एक टूल,परिमाण आहे आपल्या मानवजातीच्या उद्दिष्टांच्या पूर्तींतल्या मार्गांमधलं. म्हणजे विधान सत्य नसेल तर नीट वापरता येत नाही, मग त्या विधानाचा काय उपयोग असं काहीसं सत्याचं स्थान आहे. म्हणून ती एक आवश्यक बाब आहे, किचनमधे मीठ असल्यासारखं. तसं पाहिलं तर जीवनात गंतव्य सत्य "एवढंच" नाही, जायचा तो मार्ग सत्य "एवढाच" नाही. मार्गात वाटेल तेवढ्या असत्याच्या कुबड्या चालाव्यात. एक उदाहरण देतो. एका माणसाला मोठा उद्योग प्रस्थापित करून धनसंचय करायचा आहे आणि समाजासाठी रोजगार उत्पन्न करायचा आहे. हा एक सद्दुदेश मानू यात. मात्र या प्रक्रियेत त्याला कितीतरी प्रकारचा अनावश्यक सरकारी कंप्लायन्स करावा लागतो. सत्य असं आहे कि त्या व्यक्तिसाठी कंप्लायन्स अनावश्यक आहे. पण अन्य लोक गैरफायदा घेतात म्हणून तशी कायदेशीर तरतूद करणं देखील सरकारला आवश्यक आहे. या एकाच माणसाला सहुलियत दिली तर अन्य लोकांच्या मनातील संशय आणि त्यांच्या निराकरणाची आवश्यकता देखील सत्य आहे. अशी अनेक सत्यं या उद्दीष्टात, त्याच्या मार्गात कामाला येतात. पण आपण अशी अनेक चांगली कंप्लायन्स मॉनिटरींग अनावश्यक असलेली माणसं दुर्लक्षून काटेकोर कंप्लायन्सचे कायदे बनवले आहेत. इथे वेगवेगळ्या लोकांचं सत्य काय काय आहे, ते कसं कसं जाणायचं, कुठे कुठे मांडायचं आणि निर्दोषांना त्रास कसा होणार नाही हे कसं ठरवायचं याचं पूर्ण फ्रेमवर्क बनवायचं आणि सत्याचं अचूक पालन करायचं असंभव आहे. असलं फ्रेमवर्क लोकमान्य नसेल हे वेगळं आलंच. म्हणून सगळेच खोटारडे असू शकतात असा सर्वजनपतनन्याय लावायचा!
सत्याविना जग चालतं. आणि व्यवस्थित चालतं. तुमच्या मनातलं सगळं, सगळं सगळं, सग्गळ्ळं कधी सांगीतलंय कोणाला? चार सत्य फक्त आपल्यालाच माहित असतात. कोणतं सत्य कोणासाठी आणि दुसरं कोणतं सत्य कोणासाठी याचे हिशेब असतात. तरीही "मोकळी नाती" जुडतात, "मोकळ्या मैत्र्या" होतात. मग सत्याचा अट्टाहास का? कि चारचौघांना अलाईन होणारी ऑफिशियल पोझिशन म्हणून उगाच? माणसाचं स्वतःचं असं एक असत्य जग असतं. त्यात तो बर्याच गोष्टींत मुद्दाम असत्यपणे वागत असतो. हे अचाट आहे पण कधीकधी स्वतःशीही बराच खोटारडेपणा चालू असतो. आणि अज्ञान हा तर असत्यांचा महासागर. या महासागरात वाट हरवलेली लोकं देखील सुखेनैव संसार करत असतात. बरीच सत्यं भीषण असतात आणि लपून असतात. ती तशी लपून नसली तर कल्लोळ होइल. मग सत्याचा अट्टाहास का?
विश्वाचं, पृथ्वीचं, मानवजातीचं सत्य काय आहे हे कोणालाही माहित नाही. आपण का आहोत, आपण कुठे जात आहोत, कसे जावे इ इ प्रश्न अनुत्तरीत आहेत. सत्यवादी लोकांना विश्वाचं संपूर्ण ज्ञान हवं आहे. (कल्याणवाद्यांना ब्रह्मांडाचं कल्याण हवं आहे.). सध्याला हे ज्ञान घेण्याकरिता खूप श्रम घेतले जात आहेत, खूप पैसे ओतले जात आहेत. त्यात मानवाच्या कल्याणकारणाकडे दुर्लक्ष होत आहे. मंगलयान मंगळावर जातं आणि तिथेच शेजारी ओरिसातल्या आदिवास्यांना शेजारचं, भरून वाहणारं पाणी मिळत नाही. सत्यवाद्यांचा असा दावा आहे असा होणारा खर्च ही एक उद्याची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूकीची जाहिरात बरेच दिवसापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम काय आहे तर अजून गुंतवणूकीची मागणी. समजात दोन वर्ग आहेत. या सत्यवाद्यांच्या जवळचा आणि लाभार्थी. खूप पावरफूल. सत्ताधारी. दुसरा आहे कल्याणवाद्यांचा. निर्बल. दुर्लक्षित. आपलं सरकार देखील तोंडदेखलं कल्याणवादी आहे. त्याची जास्तीत जास्त संसाधनं सत्यवाद्यांच्या सेवेतच जातात.
सत्यवाद्यांनी नवे फॉर्म्यूले बसवले आहेत. कायद्यांचे. म्हणून कायदा हेच सत्य झाले आहे. कल्याण करायचं काम कायद्याचं आहे तर आपण मधे का पडा अशी वृत्ती निर्माण झालेली आहे. कायदे एकतर जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करत नाहीत. तिथे सत्य काय ते प्रत्येकजण आपापला रँडमली ठरवत आहे आणि समाजात दुह्या, दुफळ्या निर्माण होत आगे. दुसरं म्हणजे कायदे जिथे स्पर्श करतात तिथे ते नीट राबवले जात नाहीत. प्रशासन असो वा लोक असो वा सरकार असो वा माध्यमे असो - कायदा कसा कमीत कमी पाळायचा याच्याच पळवाटा शोधत असतात. म्हणून कल्याणवाद्यांना फ्रस्टेशन आलं आहे. कायदा हा त्याच्या स्पिरिटनुसार पाळला पाहिजे पण सांगतो कोण?
आता कायद्याच्या बाजूनं विज्ञान आहे. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायची विज्ञानानं चिक्कार शस्त्रास्त्रांची निर्मिती करू ठेवली आहे. म्हणून आहे ती व्यवस्था कल्याणकारी आहे असं समजून चालायचं आणि कायद्यात बदल करायचे. पण कायद्यात बदल संसदेत निवडून दिलेले लोक करतात; लोक थेट करत नाहीत. म्हणजे लोक विषयवार मतदान करत नाहीत, उमेदवारवार मतदान करतात. आणि प्रत्येक विषयात उमेदवारांत आणि लोकांत दुमतं असतात. हे सगळं सत्य मानायचं आणि चालायचं. या आणि सामाजिक गदारोळातल्या प्रत्येक विधानावर सांगोपांग चर्चा करायची, चिकित्सा करायची जे होत आहे ते कल्याणच होत आहे असं सत्य मानायचं. हा बराच विचित्र प्रकार आहे.
सत्याचं अजून एक प्रकरण आहे, ते म्हणजे सत्य ढोबळ असू शकत नाहीत. खणखणीत पुरावा आणि वाटरटाईट वाक्यरचना पाहिजे. मी जर म्हणालो कि मी थकलोय नि ते सत्य असेल तर आणि दुसर्याला तसे मानायचे नसेल तर मला मी थकलो असल्याचे त्याला पटतील असे पुरावे गोळा करावे लागतील. हे कठीण आणि अशक्य कर्म आहे. समोरचा दुराग्रही असेल तर अजूनच कठीण. मग मोजमापं आली. प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवणं आलं. त्यातून बनणारी गणितीय मानसिकता - आयुष्य म्हणजे गणित- आली.
जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक बैज्ञानिक नसतो. नसावा. तो मूलतः कल्याणवादी हवा. माझं तुझं, सर्वाचं भलं होऊ दे, मग सत्य काही का असेना. उद्या जर सत्य असं निघालं कि सजीव सगळे निसर्गनियमांच्या कळसूत्री बाहुल्या आहेत (काहींना ते आजच वाटतं) त्या सत्याला पोचल्यानंतर काय? मृत बाहुल्यांचं काय करतात? इथे कोणीतरी कर्ता लागतो म्हणून मृत बाहुल्यांचं काय करतात ऐवजी काय होतं असं म्हणा. राहतात त्या पडून. ते निरर्थक पडून राहणं म्हणजे जीवन का? या असल्या अंतिम सत्यावर पोचल्यावर कसला जीवनविषयक दृष्टीकोन असणार आहे? आणि का म्हणे मानवी जीवनाचं सातत्य अबाधित राहावं आणि का म्हणे मंगळावर वस्ती कराणे?
सध्याला सत्य आणि कल्याण या संकल्पनांचं द्वंद्व चालू आहे. ट्रूथ वर्सेस बेनेव्होलेन्स!! बख्खळ सारी गृहितकं केली तर समाजात विवाद सत्यवादी नास्तिक आणि कल्याणवादी अस्तिक असा संघर्ष काही काळाने दिसून येईल असं मला वाटतं. सत्यवादी लोकांना पुरावा हवा असतो. पण पुराव्याला देखील त्याचा स्वतःचा पुरावा हवाच ना? मग ही साखळी कुठेच संपत नाही. शेवटी काहीतरी मानावं लागतं. निसर्ग वा वैश्विक अस्तित्व हे असम्यक आहे, त्यात ईश्वर नाही, ईश्वरीयता नाही, त्याचा कोणी कर्ता नाही, त्याचे काही उद्दीष्ट नाही, चांगुलपण आणि वाईटपण समानच आहे, आपण भौतिकशास्त्राच्या नियमांनी बद्ध आहोत, सगळ्या क्रिया, प्रक्रिया, भाव, भावना, मूल्ये ही भौतिकशास्त्रातल्या कणांच्या रिअॅक्शनचा परिपाक आहेत अशी विचारसरणी बळावत चालली. त्यात आपलं इतरांशी सदवर्तनाचं दायित्व प्रश्नांकित होण्याचा संभव आहे. "मी लोकांच्या कल्याणाची चिंता का करू?", "लोकांच्या कल्याणात माझं देणं घेणं काय?", "चांगलं आणि वाईट यापैकी चांगलं निवडावं असा शोध कधी लागला आहे??, "आपण मृत तर नाहीत ना?", "हे जग नाहीच असे नाही ना?", "कुटुंब, नाती, देश, धर्म , इ इ मूर्ख लोकांनी पुरातन काळात बनवलेली अनावश्यक ठिगळं आहेत.", "मानवाला बुद्धी गेल्या १०० वर्षांत आलीय आणि त्यामागचा सगळा काही अंधार होता (म्हणजे आता माझ्यासारखे चार आहेत म्हणून सिच्यूएशन कंट्रोल मधे आहे.) म्हणून तिथलं सरसकट सगळं भलंबुरं न पाहता टाकावं" इ इ विचार करणारी मंडळी फोफावली आहेत.
मानवकल्याणाचा विचार हा शेवटी सामान्य माणसानंच करायचा असतो नि त्यात सत्याचा विजय होईपर्यंत ताटकळत बसायची गरज नाही.
जीवनाकडे पाहण्याचा, जीवन
जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक बैज्ञानिक नसतो. नसावा. तो मूलतः कल्याणवादी हवा. माझं तुझं, सर्वाचं भलं होऊ दे, मग सत्य काही का असेना.
चांगला विचार आहे. नुसते विचार करून जग चालले असते तर हाच विचार केला असता.
स्वार्थ, अहंकार, लोभीपणा यांच्याविषयी काय विचार असावेत?
स्वार्थी लोक म्हणतात, माझा दृष्टिकोन कल्याणवादी आहे, म्हणून मी सांगतो तसेच वागा त्यातच सगळ्यांचे कल्याण आहे, असे म्हणून सत्तेवर यायचे नि मग पुनः ये रे माझ्या मागल्या! त्यातून फक्त थोड्या लोकांचे कल्याण होते, बाकीच्यांचे होत नाही.
जग हे असे चालते.
म्हणून ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या.
तर सत्य नि जग हे वेगळे वेगळे. जगात काही फरक पडायचा तर सत्यासत्यतेचा विचार महत्वाचा नाही. सत्यापेक्षा जगात इतर काही विचार असायला हवेत.
एकतर बाह्यसंकटाची
प्रतिसाद इथे अपेक्षित नव्हता. गल्ली चुकली होती.