फेणीची अख्खी बाटली रिचवून तर्र झालेल्या अस्सल बेवड्यासारखी बेताल झोकांड्या घेत मी त्या करड्या गुळगुळीत डांबरी रस्त्याशी अचानक फारकत घेउन तोर्यानं मागे वळून तरातरा खाली दरीत उतरू लागते तेंव्हा माझी मलाच मी कुणी ’वेगळी’ आणि ’छानदार’ असल्यासारखं वाटतं. मी मोकळी हसते त्या वळणापाशी. खिदळते म्हणाना...!
फार भारी वाटतं मला. त्या डांबरी रस्त्याची सोबत तुटणं तसं बरंच. म्हणजे खरंतर तो रस्ता तसा अगदिच काही वाईट नाही... दिसायला कसा राजबिंडा! चालणं डौलदार... वळणं सुद्धा झोकदार! डोंगरदर्यांतून लांबून सुद्दा अगदी उठून दिसायचा बेटा! रानावनातून गर्द झाडीतून जाताना उंच उंच झाडं त्याच्या राजेशाही चालीवर छत्रचामरं ढाळत पानाफुलांचा सडा टाकत असल्यासारखी वाटायची. अस्सा राजा वाटायचा तो!
नागिणीसारखी नक्षिदार नागमोडी वळणं घेत कित्येक डोंगर वळसे-वेढे घालत आम्ही एकत्र बांधले आणि सोडले. आमच्या अंगाखांद्यावरून कित्येक दर्या-टेकड्या चढल्या आणि उतरल्या. कित्येक धबधबे मी त्याच्या साथीनं मातीशी परतवून लावले....!
त्याच्या शरीराला चिकटून वाहिलेले कित्येक चिकट तांबडे रक्ताचे बेचव गरम ओघळ मी जवळून हुंगले.....! कित्येक किंकाळ्या ऐकल्या, आचके ऐकले! कित्येक मुके हंबरडे सुद्धा जवळुन ऐकले! बरेचदा उगाच रेंगाळायचे मी तिथे त्या हुंदक्यांपाशी. तो मात्र तसाच तटस्थ! नाक वर ठेऊन पुढे पुढे चालत रहायचा. जराही चलबिचल नाही. कुतुहल नाही. रेंगाळणं नाही.
गरगरणार्या लहान मोठ्या कित्येक काळ्याशार चाकांना आम्ही कधी सुळ्ळकन् कधी अलगद त्यांच्या त्यांच्या मुक्कामांना सोडलं. रबरी, कातडी, मऊ, टणक, टोकदार, भेगाळलेली, रक्ताळलेली, नाजुक, चिमुकली, रांगडी, रुतणारी, धावणारी, रेंगाळणारी, जडावलेली, थकलेली... आम्हाला अशी तुडवणारी पावलं तर लक्षावधी!
तसं मला काही त्याच्या त्या राजेपणाशी आणि थाटमाटाशी फारसं घेणं-देणं नसतं कधी. तो एक साधीशी निमुळती खडकाळ वाट होता तेंव्हापासून आहे मी त्याला बिलगुन. त्याच्या सोबत त्याच्यात एकरूप असले तरी माझी मी असतेच की माझी माझी वाट चालत! मी तशी जन्मत: स्वतंत्र! त्याची माझी वाट कुठल्यातरी अश्याच झोकदार वळणावर एकमेकांना चिकटली असली तरी... आणि त्याची सोबत नाही म्हटलं तरी काही काळ मला भावली असली तरी... मी खरंच काही ’तो’ झालेले नसते! पण नेमकं हेच कळत नाही नं कुणाला! कसं कळेल? मी दिसते कुठे कुणाला त्याच्याहून वेगळी? त्यालातरी कुठे जाणवतं माझं त्याच्यातलं ’वेगळं’ कुणीतरी असणं? तो कधी आणि कुठल्या वळणावर माझ्यासाठी रेंगाळला? खडक वाटा उतरताना मीही देतेच की त्याला हात कधीकधी.... त्याचं श्रेय त्यानं कधी मला दिलं?
मधूनच मग मला त्याच्या तटस्थपणाची भीती वाटायला लागते. धुक्यानं भरलेली दरी असो की अक्राळ दरडींखाली चिरडून चिकट चिपाड झालेलं एखादं चिमुकलं माकडाचं पिलू.... सगळं सगळं अक्षरश: एकाच विरक्त कोरड्या नजरेनं कसंकाय झेलू शकतं कुणी? म्हणजे विरक्त असण्याला तसा माझा काहीच आक्षेप नाही... पण विरक्तपण निदान मनस्वी तरी असावं! स्वत:च्या मनमर्जीनं बेभान तरी असावं! किमान विरक्तीचं तरी दडपण असू नये ना! विरक्ती ओली असावी... त्यावर प्रेमानं विसावलेली एखादी नजर, एखादी सावली, एखादी आठवण त्यात अलगद रुजायला काहीच हरकत नसावी... मग त्यातून काहीही कधीही उगवलं नाही तरी चालेल! खोल स्वत:च्या आत असं ओलंशार आत्ममग्न विश्व रुजलेलं विरक्तपण किती सुंदर असतं! त्याला सुंदर ’दिसण्यासाठी’ मग वेगळं काही करावं लागणार नाही. गुळगुळीत चालावं लागणार नाही की झोकदार वळणं घेत स्वत:चा ताठा प्राणपणानं जपावा लागणार नाही! असं आपलं मला वाटतं.
मी सांगत असते त्याला... काही क्षण पुढं-मागं रेंगाळलं तरी चालतं अरे! दर्यांमध्ये डोकावताना थोडं वाकावं लागलं तरी चालतं! एखादी उडी मारावी मधेच निमुट चालताना, कडेचं एखादं रानफुल येताजाता कुरवाळलं तरी चालतं, लांबलचक पिसारा घसटत एखादा मोर जातो अंगावरून तेंव्हा त्या पिसांनी होणार्या गुदगुल्यांनी हसावं खुद्कन् जरासं... त्याला तर इतकी वाट चालूनही लाजाळूच्या झाडाची आणि स्पर्शाची गंमत माहीत नाही! छे!
फार समजवलं मी त्याला. तो स्वत:च्याच पावलांचा करकरीत आवाज ऐकल्यासारखा मला मुक्या तटस्थतेनं ऐकत राहतो. मग जरा उशीराच माझ्या लक्षात आलं की आमची भाषा सुद्धा वेगळी आहे. त्याला समजत नाही माझं बोलणं. मग मी निमुट मुकाट चालत राहते आणि अश्याच त्या वळणापाशी पोचताना मला त्या हिरव्यागच्च दरीत विसावलेलं ते टुमदार गाव दिसतं. कुणीतरी प्रेमळ आग्रहानं हाताला धरून बोलावल्यागत मी माझ्याही नकळत कित्येक मैलांची त्याची साथ सहज सोडून देऊन तिथं त्या आंधळ्या वळणापाशी नकळत वळते. तो माझ्यासाठी तेंव्हाही रेंगाळला नसेल याची खात्री असते. ती खोटीही असेल कदाचित.... मी ओळखलं आहे त्याला असं आजही वाटत नाही! ते असो.
तर.... मी फार म्हणजे फारच सुंदर आहे असं आपलं त्या वळणावर वळल्यापासून माझं मलाच वाटत रहातं. दरीत उतरून हिरव्यागच्च राईत लपलेल्या त्या आडगावात मी टुण्णकन उडी मारून उतरते आणि तिथेच रुतल्यागत काही क्षण थबकून राहते. समोर उभा असतो प्रेमळ अदृष्य खोल डोळ्यांचा एक वयोवृद्ध लालेलाल चिराच्या दगडांचा धीरगंभीर वाडा! प्रचंड, कौलारू आणि ऐसपैस! गाई-गुरांच्या शेणाच्या कुबट ओलसर मायाळू गंधानं अंगणभर रितसर माखलेला. मला थेट खेटून त्याचं लाल दगडांचं आखूड कुंपण आणि सताड उघडं लाकडी फळ्यांचं कुबट वासाचं फाटक! मी सहज डोकावते आत. दारापुढच्या वृंदावनातली तुळस मला बघून हिरवंगार हसते आणि मला आणखिनच सुंदर असल्यागत वाटायला लागतं.
मग मी स्वत:शीच हसत तशीच पुढं जाते. मनाला येईल तिथं उनाडक्या करत, चढत-उतरत, पडत-धडपडत, उड्या मारत कधी एखाद्या टुमदार सावलीशी रेंगाळत गावभर हिंडते. छोट्या-मोठ्या चिराच्या, झावळ्यांच्या, लाल-पिवळ्या घरांच्या पडवीत, अंगणांत बिनधास्त धसमुसळी मस्ती करते. गावातल्या छोट्या-मोठ्या लेकरांशी दंगा करते. गोट्यांच्या खेळासाठी ’गली’ खणता यावी आणि सूरपारंब्या खेळताना, धावताना धडपडणार्या चिमुकल्या ढोपरांना फारसं लागू नये म्हणून मी मऊ मऊ, लुसलुशीत होते. पावसाळ्यात चिंब घसरणीवर मी लालेलाल निसरडी होते तेंव्हा मुलं माझ्या पाठीवर घसरगुंडी खेळतात. त्यांच्या मनभर खिदळण्यानं मी कणकण शहारून जाते. गावातल्या कातडी चपला, भेगाळलेले राठ पाय, लगबग नाजूक पावलं, सोवळ्यातल्या पायघोळ नऊवारी पातळाचे नाजूक ओरखडे आता माझ्या चांगलेच ओळखिचे झालेत. प्रत्येकाची स्वतंत्र लगबग मला बिलगून चालू राहते दिवसभर. गोठ्यांतली गुरं मला प्रेमळ तुडवतात. त्यांच्या शेणामुताचा गोडसर गंध मला चिकटून दरवळत राहतो. डेरेदार झाडं माझ्यावर छानदार गारेगार सावली धरतात... निजलेल्या लेकरावर माऊलीनं गोधडी टाकावी तशी!
या टुमदार गावानं मला ’मी’ म्हणून आपलंसं केलं. आपुलकीच्या गहिवरात निथळत मी त्या वाड्याला लडिवाळ वळसा घालून मागची आमराई, केळीची बाग, फणसाची झाडं, नारळी-पोफळी ओलांडत, नागमोडी नाचत धावत, मिरवेल हुंगत, लाजाळूला डिवचत, पाटाच्या वाहत्या पाण्याला सोबत करत दिवस ढळता ढळता थकून दमून काहिशी कातर होते. दिवस ढळताना फणसाच्या झाडांत खोल दडलेल्या थंडगार दगडांतून पाझरणार्या नितळ झरीच्या गोडसर पाण्यात मी काही क्षण पाय सोडून शांत बसते.
सांज चढत जाते. मी तिच्यात हरवत, विरघळत जाते. ओलसर आर्द्र होत जाते. माझा लालसर रंग केशरी होतो आणि मग हळूहळू काळसर जांभळा होत जातो. मऊसर लुसलुशीत दंवानं सजलेल्या हिरव्या-पोपटी गवताला पोक्त मायेनं कुरुवाळत माडांच्या पलिकडे शांत वाहणार्या मांडवी नदीत मग मी हळूवार स्वत:ला अलगद सोडून देते. रोजच्या रोज... गेली अनंत शतके हे असंच होत राहतं.
नेमक्या त्याच हळव्या वेळी नदीकाठी उपड्या ठेवलेल्या लाकडी नावेवर शांत शून्य नजरेनं बसलेली गुब्बी मला हमखास निरखत असायची तेंव्हा. दररोज! माझी तिची नजरानजर व्हायची तेंव्हा ती हमखास खुद्कन् ओळखिचं हसायची. मीही हसायचे. आताही ती तशीच हसते. पण असत नाही.
_______________________________________
"कमे... भीतर चल गोSSS जेवपाक चल बयोSSS"
रोज दुपारी आमराईत ही हाक घुमायची. गुब्बीच्या कानावर पडलीच तर ती शांतपणे गाठोडं बांधून उठून तिच्या नेहमीच्या संथ चालीनं घसटत वाड्याकडे चालू लागायची. कधी फारच तंद्री लागलेली असली तर अश्या कित्येक आरोळ्या तिला ऐकूच यायच्या नाहीत. मग खोचलेल्या नऊवारी पातळात मानेवर घट्ट अंबाडा घातलेली हाडकुळी बुटकी उमाक्का झाडीतून मला तुडवत तुरूतुरू गुब्बीपाशी यायची. गुब्बीला गदागदा हलवत म्हणायची, "कमे चल गे बयों. जेऊपाचें नांय कां? चल चल भीतर चल. तुजों बापुस येतलों आन माका वरडतलों. माका मेल्या म्हातारिक किदें इतके छळतंसं? उठ उठ चल भीतरी चटदिशीन."
पावशेराची उमाक्का... तिला अवाढव्य गुब्बी काय झेपणार? ती विनवण्या करत रहायची. मग गुब्बी अर्ध्या उघड्या झोपाळल्या डोळ्यांनी उमाक्काकडे बघायची. सावकाश उठायची. संथपणानं तिचं गाठोडं आवरायची आणि धीम्या धीम्या पावलानं घासत ओढत वाड्याच्या मागिल दारी मी तिला सोडून यायचे. मग ती संध्याकाळची उन्हं कलल्यावरच पुन्हा बाहेर यायची. रोजचं ठरल्याप्रमाणे संथ चालत नदिकाठी यायची. तिथल्या उपड्या टाकलेल्या लाकडी शेवाळलेल्या होडीवर शांत शून्य सून्न बसून रहायची. तिचे बारीक अर्धे उघडे झोपाळलेले डोळे नदीकडे एकटक पहात सगळ्या जगासाठी शून्य होऊन जायचे. त्यावेळी वेगळीच सुंदर दिसायची गुब्बी. लहान वाटायची. आम्ही चौघीही तिथं एकमेकांच्या रंगानं, मुक्या सून्न नात्यानं माखून जायचो. शांत व्हायचो. न बोलता एकमेकांना बरंच काही सांगायचो. मी, सांज, मांडवी आणि गुब्बी!
गुब्बी फार फार माझी वाटायची मला. गुब्बीला अख्खं गाव ’गुब्बी’च म्हणायचं. वाड्यातली सगळी माणसं मात्र म्हातार्या घनामामाच्या धाकानं तिला निक्षून ’कमू’ किंवा ’कुमूद’ म्हणायचे.
मळक्या विटक्या मळखाऊ रंगाच्या सहावारी पातळात अस्ताव्यस्त गुंडाळलेली वेडीवाकडी अजस्त्र वाढलेली गुब्बी सगळ्या गावाची विद्रुप जखम होती. थट्टेचा कायमस्वरूपी विषय होती. हे माझ्या लक्षात आलं तेंव्हा विचित्र वाटलं खरंतर. गावाच्या वेशीवरचा तो प्रेमळ पोक्त वाडा सोडला आणि कधीकधी घनामामा सोडला तर आख्ख्या गावात गुब्बीकडे मायेच्या जिवंत कुतुहलानं बघणारी... मुळात ’बघणारी’ फक्त मीच! बाकी सगळ्या गावासाठी ती असून नसल्यासारखी! खरंतर दखलच घेण्याची काही गरज नसलेली एक अनावश्यक गोष्ट! तिचं असणं उगाचच! काळ्या कागदावर काळ्या शाईनं उमटलेल्या निरर्थ अक्षरांसारखं...! असून दिसत नाही, न दिसल्यानं काही अडत नाही आणि दिसली तरी कळत नाही. न कळल्यानेही काही बिघडत नाही!
घनामामा आणि उमाक्का सोडली तर इतरांच्या दृष्टीनं अस्तित्वातही नव्हती जणू गुब्बी. कुणीच कधीच स्वत:हून बोलायला जायचं नाही गुब्बीशी. घनामामा मात्र दुरून, अधून-मधून का होईना... लक्ष ठेऊन असायचा तिच्यावर. तिच्याशी बोलायचाही कधीतरी. त्यातही कावायचाच फार. पण तरिही ते बरं वाटायचं. निदान ’ती आहे’ याची दखलतरी घेतली जायची थोडीफार! अर्थात गुब्बीला त्याचं फारसं काही नसायचंच! तिची ती तिच्या मुक्या विश्वात मग्न असायची. गुब्बी खरंतर मुकी नव्हती... पण तिचं बोलणं अचानक आटल्यासारखं जणू संपून गेलं होतं. जणू जे बोलायचं ते सगळं बोलून झालं होतं... आणि आता काही बोलण्यासारखं उरलंच नसल्यागत ती शांत झाली होती. तिचे ओठ हलायचे, उघडायचे, पण बोलायचे मात्र काहीच नाहीत. कधीही नाहीत. कदाचित असंही असेल की कसल्याश्या प्रचंड आक्रस्ताळ्या गलक्यानं मुकं मुकं केलं होतं तिला. कधी कधी सहन न होऊन ती दोन्ही कान हातांनी घट्ट मिटून घेतानाही पाहिलंय मी तिला.
रोज सकाळी भरपूर तेल चोपडलेल्या दाट केसांची पाठीवर घट्ट वेणी घालून, पावडर-टिकली करून त्याच त्या विटक्या दोन चार साड्यांमधली एखादी अंगभर लपेटून गुब्बी चारी बाजूंनी लोंबणारं एक ठिगळलेलं भडक रंगांचं, मळकं गाठोडं गच्च छातीशी धरून वाड्याच्या मागल्या दारातून संथ चालत मागल्या आमराईत यायची. गच्च बांधलेल्या केसांमधून तिचे अर्धे-अधिक पांढरे करडे केस डोकावत रहायचे. विकृत दिसायचे. हनुवटीच्या दोन्ही बाजूंनी काहिसे ओघळलेले गोरेपान गुलाबी, लोण्यासारखे मऊसूत गाल आणि दोन्ही खांद्यांच्या मधल्या बेचक्यात रुतून गायब झालेली मान! वेडंवाकडं वाढलेलं बेढब पोक्त सुस्त शरीर. कपाळाखालच्या दोन खोबणींत खोल रुतलेले अत्यंत बारीक सतत भिरभिरणारे काळेभोर बालिश डोळे! शेंड्यापाशी काळं झालेलं नाक. गोरं, बेढब आणि स्थूल शरीर. घामानं सतत चिकटसर अंग. गुब्बी तशी वयानंही बरीच वाढलेली होती.
धडधाकट कुणाही ’शहाण्या’ माणसांपेक्षा वेगळी दिसायची आणि वेगळी होतीच गुब्बी. कदाचित कुरूपही.
आमराईत गुब्बीचं खास असं एक मोठ्या बुंध्याचं आंब्याचं झाड होतं. त्याच्या गर्द सावलीत ती तिचं गाठोडं सोडायची आणि आतल्या रंगित रेशमी चिध्यांमधले धागे ओढून त्याची छानदार जाळी तयार करत रहायची. चार धागे मोजून चार धागे ओढायचे. उभे-आडवे. हे करताना तिच्या गुलाबी जिभेचा टोकदार शेंडा ओठांच्या एका कडेला मजेशीर रित्या बाहेर आलेला दिसायचा. डोळे आणखी बारीक व्हायचे. जाळीदार छान कापड तयार झालं की ती रेशमाच्याच रंगित धाग्यांना सुईत ओवून फुल्या-फुल्यांच्या विणकामानं फुला-पानांची, वेलबुट्टीची नक्षी त्या कापडावर भरायची. तासन्-तास तशीच आणि तेच करत रमायची ती त्या एकाच जागी बसून. मी मुद्दाम तिच्याशेजारून जायचे. तिच्यापाशी रेंगाळायचे. ती कधी रेशमाच्या दोर्यांमध्ये रंगित मणी ओवत असायची. कधी रंगिबेरंगी कागदांचे बोळे करून ते दोर्यांत ओवायची. एकदा तर पेनांच्या संपलेल्या रिफिलींचे तुकडे दोर्यात ओवून काहीतरी करत होती ती. किती सुंदर जादू होती तिच्या हातात! फक्त मला ठाऊक होती ती जादू. कारण ती तिचं ते गाठोडं गच्च बांधून घट्ट छातीशी सतत जीवापाड धरून ठेवायची. तिचा एकमेव अमुल्य खजिना होता तो! मला वाटत नाही तिनं कधी तो कुणापाशी खुला केला असेल. नाहीतर ती वेडी आहे असं कुणालाही वाटलं नसतं.
माझ्यात आत्ता, या क्षणी रुजलेली, बिंबलेली गुब्बीची प्रतिमा ही अशीच! मांडवी नदीत ती आणि मी एकत्र विरघळलो ती सांज...तो प्रहरही अजून अवकाशात रेंगाळणारा तसाच! ठसठशीत!
______________________
तो वाडा घनामामाचा. म्हणजे सगळं गाव त्याला तसंच हाक मारायचं. घनामामा संपूर्ण पिकलेला पांढराशुभ्र म्हातारा. दणकट, चिवट आणि कमावलेल्या काळसर सावळ्या कातडीचा! उघड्याबंब पांढर्याशुभ्र कुरणासारख्या हुळहुळणार्या छातीवर रुळणारं मळकट जानवं आणि खाली पांढरं शुभ्र धोतर नेसून घनामामा पोफळीत, आंब्या-फणसांत सकाळपासून घामाघूम होऊन येरझारा घालत रहायचा. नारळ उतरवणार्या, आंबे पाडणार्या, सुपारी फोडणार्या उघड्यावाकड्या मजुरांवर बेंबिच्या देठापासून दिवसभर ओरडत रहायचा. घरातल्या बायका-पोरासोरांवर चौफेर डाफरत रहायचा. वाड्यात नांदणार्या भरगच्च कुटुंबाचा तो कर्ता पुरूष! आणि ’गुब्बी’ नावाची भळभळणारी जखम काखेत बाळगणारा तो एक शापित बाप!
घनामामा घनगंभिर वटवृक्षासारखा होता तर गुब्बी म्हणजे वेडावाकडा वाढलेला फड्या निवडुंग! ओलाव्याचीही गरज आणि अप्रूप ओसरलेला!
पण गुब्बी पहिल्यापासून अशी नव्हती. तिला जन्म देऊन तिची आई लगेचच मरून गेली. सगळा वाडा ते अभूतपूर्व सुंदर बाळ बघून हरखून आणि हळहळून गेलं होतं त्यावेळेस. कमळाच्या देठासारखी सुंदर आणि नाजूक होती ती. अत्यंत रेखिव, हळदीच्या सोनसळी गोर्यापान कांतीची. काळेभोर टप्पोरे बोलके डोळे, धारदार सरळ नाक.... हातापायांची बोटंसुद्धा नाजूक लांबसडक. माझ्यावरून अल्लड निरागस धावपळ करायची तेंव्हाही तिच्या पावलांच्या गुलाबी ठश्यांच्या नाजूक रांगोळीनं बहरून जायचे मी. नंतर तिच्या चालीत एक निराळीच बेफ़िकीर मादक अदा आली आणि तिच्या तळपायांची माझ्यावर उमटलेली रांगोळी ठसठशीत खोल दिसू लागली. गोष्टीच्या पुस्तकातल्या परीगत दिसायची गुब्बी. तळपायाच्या घोट्यापर्यंत रुळणारे लांबसडक केस... वाड्याच्या मागल्या परसदारी केस विंचरत बसायची तेंव्हा घनगर्द काळ्याभोर आकाशानं पावसाची एक दाट सर अलगद खाली सोडल्यागत वाटायचं! अंबाडा घालायला तासभर लागायचा तिला. आणि अंबाड्याच्या ओझ्यानं तिची मान दुखू लागायची.
पण दिसायला नाजूक असली तरी अत्यंत उफाड्याची, धाडसी, बेफिकीर आणि स्वतंत्र होती गुब्बी! घनामामाच्या घनघोर धाकाखाली सुद्धा बेबंद उद्धट होती ती. सगळ्या वाड्याला तिच्या आगाऊ उद्धट स्वभावाची जरब वाटायची. तिचं स्वातंत्र्य तिला कुणी बहाल केलेलं नव्हतं! ते ती आईच्या गर्भातून बाहेर पडतानाच स्वत:सोबत घेऊन आलेली होती जणू. ती जन्मजात स्वतंत्र होती. माझ्यासारखीच. कुणालाही न जुमानणं जणू अंगभूत स्वभाव होता तिचा. तिच्याही हातात नसलेला. घनामामासारख्या कुलिन ब्राम्हण घरात गुब्बीसारखा जळता पेटता निखारा जाळ बनत चालला होता.
तिला घनामामानं एकदा पोफळीत चक्क बिडी ओढताना पकडलं. बागेत काम करणारे गडी कित्येकदा बिडी ओढायचे. त्यांना कुणी काही बोलायचं नाही. गुब्बिनं विडी ओढली म्हटल्यावर मात्र गहजब झाला! गुब्बीनं फार म्हणजे फार मार खाल्ला त्या दिवशी घनामामाचा. पण त्यानंतरही ती अनेकदा बिडी ओढायची. लपून. तिची अशी कित्यीक रुपं... बेभान, विकल, तेजस्वी, आतूर... फक्त मी पाहिलेली! फक्त मी अनुभवलेली! मी तिच्या काळजातून आरपार जाऊन कुठल्याश्या अद्न्याताला भिडून आलेली. एकमेव!
तिचा आताचा हा विद्रुप अवतार तिचं ते जन्मजात स्वतंत्र अस्तित्व जरबेनं, धाकानं जबरदस्तीनं तिच्याकडून हिरावून घेतलं गेल्यामुळे आहे. हो! माझाच आरोप आहे हा! कवच कुंडलं दान केल्यावर तुमचा तो कर्ण कसा दिसला असेल? त्यानं किमान ती स्वत:च्या मर्जीनं आणि इच्छेनं काढून दान केली होती!
गावातले लोक म्हणतात गुब्बी स्वत:च्या कर्मानं हे असलं दरिद्री आयुष्य जगते आहे. तिच्याच एके काळच्या बेबंद, उनाड, बेलगाम जगण्याच्या वाईट सवयीनं तिला हे दिवस दाखवले आहेत. नियम, संस्कार, निती... समाजाची प्रस्थापित कुंपणं उल्लंघल्याची शिक्षा भोगते आहे गुब्बी. आणि तेच योग्य असंही वाटतं अनेकांना. कदाचित घनामामालाही.
मला विचाराल तर मला मात्र तसं वाटत नाही. मुळात गुब्बी जे आयुष्य जगते आहे ते दिनवाणं वाटत नाही मला. कुणाचंही आपल्याकडे लक्ष असण्याची गरजच न उरणं या स्वातंत्र्याच्या वेगळ्याच अफाट उत्तुंग पातळीवर पोचली होती गुब्बी. ती मुक्त होती. स्वत:त, स्वत:सोबत, तिनं तिच्यापुरत्या निर्मिलेल्या जगात धुंद निर्मळ आणि प्रामाणिक... कसलेही दु:ख, मागणी, इच्छा नसलेलं एक निवांत आयुष्य ती जगत होती. ती शाप असेल त्या गावासाठी, वाड्यासाठी, घनामामासाठी.... तिच्यासाठी मात्र तिचं ते जगासाठी आणि तिच्याहीसाठी बेदखल असलेलं आयुष्य वरदान होतं नक्कीच! याहून चांगलं गुब्बीसाठी काही असूच शकलं नसतं कदाचित.
गोपीच्या सोबत तेंव्हा ती गेलीही असती... तिला जाऊही दिलं असतं... तरी.... त्याच्या किंवा कुणाहीसोबत ती अशीच बेबंद राहिली असती.
गोपीनं कदाचित तिचं हे बेबंद स्वातंत्र्य तिच्या लांबसडक बोटांसोबत, तिच्या रक्तरंगी ओठांसोबत, तिच्या बेंबीवरल्या तिळासोबत जपलं असतं. जोपासलं असतं. कदाचित.... कोण जाणे!
_______________________________________
आंब्याखाली बसून पाठीला रग लागली की अवघडलेली गुब्बी थोडीशी हलायची. क्वचित कधी ती तिचं गाठोडं पुन्हा नीट व्यवस्थित बांधून घट्ट छातीशी धरून घनामामाच्या बागेतून कुंपण ओलांडून बाहेर गावात यायची. तिची चाल घसटत फरफटणारी. पावलं अनवाणी! तिची पावलं आताशा आकारबद्ध उमटायचीच नाहीत माझ्यात कधी. नुसतेच वेडेवाकडे फराटे. गाठोडं छातीशी गच्च धरलेली गुब्बी गावभर माझ्यासोबत हिंडायची. मी तिच्यासाठी तिच्यासोबत संथ चालीनं चालू लागायचे. गावात शिरलेली गुब्बी दिसली की खेळणारी गावातली पोरं चेकाळायची. त्यांना जणू नविन खेळणं मिळाल्यासारखी! त्यांच्या धटिंगण गलक्याची गुब्बीला पहिल्यापहिल्यांदा गंमत वाटायची. ती हसायची. पण मग ती पोरं तिचं गाठोडं खेचू लागायची, तिची वेणी खेचू लागायची. मग मात्र गुब्बी चिडायची. मग भेदरून जायची. तशात तिच्याभोवती आडदांड फेर धरलेलं कुणी द्वाड पोरगं किंचाळायचं - "गुब्बे गुब्बे तो पळें गोपी आयलों!" आणि आधीच भेदरलेली गुब्बी भांबावून लुकलुकत्या डोळ्यांनी इकडे-तिकडे पहात रहायची. कुणीच दिसायचं नाही. मग ती रडवेली व्हायची. तोवर गावातल्या कुणातरी पोक्त माणसाला हा प्रकार दिसायचा आणि मुलांना हुसकवून गुब्बीची सुटका व्हायची. हातोहात घनामामाला निरोप जायचा आणि मग तिला फरफटत वाड्याच्या मागच्या बाजूच्या खास तिच्यासाठीच्या अंधार्या खोलीत आणून डांबलं जायचं. फार झालं तर घनामामा फाडकन् कानाखाली वाजवायचा तिच्या. मुळुमुळु वाहणार्या लालबुंद डोळ्यांनी मग गुब्बी तिच्या अंधार्या खोलीच्या खिडकीत बसून लोखंडी गजांमधून माझ्याकडे केविलवाणं पहात रहायची. मला मग सगळ्याचाच प्रचंड राग यायचा. त्या गावाचा, तिथल्या लोकांचा, त्या द्वाड मुलांचा आणि घनामामाचा तर फारच! पण मीही काय करू शकत होते? कुणाच्या चार भिंतींच्या आत मी कशी डोकावणार?
त्या संध्याकाळी नदीच्या काठी ती भेटायची नाही मग. मला माझं वाहून जाणंही कोरडं वाटायचं अशावेळी.
घनामामाच्या बागेबाहेर जाण्याची परवानगी नव्हती गुब्बीला. पण तिचं जन्मजात हट्टी स्वातंत्र्य तिला पुन्हा पुन्हा बागेचं कुंपण ओलांडायला भाग पाडायचं. शेवटपर्यंत ती हट्टानं ते कुंपण ओलांडत राहिली. दुर्देवानं ते स्वातंत्र्य जपण्याची आणि उपभोगण्याचीही ताकद नव्हती आताशा तिच्यात. पराभूत होऊन, नव्यानं जखमी होऊन पुन्हा पुन्हा ती तिच्या कुंपणाच्या आत निमुट परतायची. तरिही पुन्हा तिथून निसटायची. मला छंद जडला होता तिचा. तिचं ते वेड आवडू लागलं होतं.
वेड? मला विचाराल तर आधी जी कुमुद होती ना... वाड्यातलं जिवंत घुमणारं वादळ.... ती वेडी होती! अस्सल वेडी! जगण्याचं रसरशीत बेफाम वेड असलेली! गुब्बी म्हणजे कुमुदमधलं ते बेफाम वेड वजा झालेलं एक नुस्तंच मुर्तिमंत लाचार हतबल निव्वळ शहाणपण! संपूर्ण शहाणं असण्याइतकं भयाण आणि विक्षिप्त या जगात काहीच नाही!
आणि जग तिला आता वेडं म्हणायचं. वेडं कोण? मला अजूनही समजलेलं नाही.
त्या वेड्या कुमुदला उत्कट प्रेम म्हणजे काय ते अनुभवायला, अजमावायला मिळालं. आयुष्य स्वत:च्या निकषांवर जगून पहायला मिळालं. शहाण्यासुरत्या कुणीही जे मुर्तिमंत साक्षात प्रेम रितीभातींच्या, समाजनियमांच्या, धर्माधर्माच्या, नीती अनितींच्या दडपणाखाली नक्कीच धुडकावून लावलं असतं ते प्रेम कुमुदनं खुल्या दिलानं धाडसानं स्वीकारलं. मन मारून, इच्छा आकांक्षा दडपून अश्या वेळी मनाची दारं घट्ट बंद करून आतल्या आत हुंदके देत बसण्याचा करंटेपणा... जो तिच्या जागी असणार्या शहाण्यासुरत्या कुणीही केला असता.... तो करणं तिला जमलं नाही इतकंच. मनाच्या हट्टापुढं हतबल होणं, शरण जाणं, स्वीकारणं, समर्पित होणं यातला निराळाच बेधुंद आनंद तिला समजला. कुलिन घरातली घरंदाज स्त्री असूनही, आणि तसं असल्याची सगळी कर्तव्यं नेमानं, उत्साहानं पार पाडूनही... जे आणि जसं आयुष्य ती जगली....! त्याचा पुरुषांनाही मोह पडावा आणि स्त्रीयांना हेवा वाटावा!
ती खरंच सुंदर होती की तिच्या जातिवंत अस्सल जगण्याची धुंद तिला तेजोमय करायची कोण जाणे. कारण सुंदर, सर्वगुणसंपन्न आणि त्यासोबतच बेफ़िकीर, बेफाम वृत्तीची निराळीच सहज भुरळ पाडणारी अदा तिच्याकडे असूनही तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची कुणा पुरुषाची कधी हिंमत झाली नाही. ती त्यांना कुणी अप्राप्य वाटायची बहूदा.
अडनिड्या वयातच काहीश्या लवकरच घनामामानं तिचं लग्न लावून दिलं होतं. असं रत्न फारकाळ उशाशी बाळगणं धास्तीचं वाटलं बहूदा त्याला. फार थाटामाटात लग्नं झालं कमुचं. सगळं गाव जेवलं आणि वाजत गाज्त कमु तिच्या सासरी गेली. जाताना माझ्याकडे पाहून कमु खुदकन् हसली. तेंव्हाच समजलं मला की हे बेबंद पाखरू तिच्या हक्काच्या रानात परत येणार! हे कुणाच्याच पिंजर्यात फार काळ अडकणार नाही.
आणि तसंच झालं. पहिल्याच दिवाळसणासाठी म्हणून कमू नवर्यासह परत आली ती परत न जाण्यासाठी. दिवाळसणाचं सगळं हक्काचं मानपान घेऊन, आदरातिथ्य घेऊन कमूचा नवरा परतला तोही परत कधी कमूला न्यायला आला नाही. सगळं घरदार कमूच्या विवंचनेत पडलं. घनामामाची झोप उडाली. कमू अवघी अठरा वर्षांची होती तेंव्हा. नवर्याकडे जायचे नाही असं तिनं सगळ्यांना ठणकावुन सांगितलं. ’का?’ या प्रश्नाचं ’त्याला मातीचा वास आवडत नाही! आणि पावसाला घाबरतो तो.... पाऊस आला की गांधिलमाश्या अंगावर धावुन आल्यागत बावरतो येडा...’ असलं उत्तर ऐकून घनामामाचेही हातपाय गळाले. अखेर तिला सासरी पुन्हा धाडण्याचे सगळे प्रयत्न फसले आणि कुमुद तेंव्हापासून इथंच वाड्यात राहिली. त्यानंतर कुमुदची गुब्बी होऊन मग ती मांडवीत विरघळून जाण्यापर्यंतचा सगळा प्रवास मी प्रत्यक्ष पाहिला. इतर अनेकांनी पाहिला. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र फक्त मीच होते तिच्यासोबत!
____________________________________________
वाड्यातला गणेशोत्सव म्हणजे दहा दिवसांचा भरगच्च सोहळा असायचा. वाड्याच्या सगळ्या प्रतिष्ठेचा सर्वोच्च मानबिंदू! सगळं गाव दहा दिवस वाड्यावर हजर असायचं. जेवणाच्या पंगती संध्याकाळपर्यंत उठायच्या. गणपतीबाप्पाच्या पाहूणचाराची प्रचंड कडक बडदास्त ठेवली जायची. घरातल्या लेकी-सूना नैवेद्याच्या स्वयंपाकात, आल्यागेल्याच्या पाहूणचारात दिवसभर लगबग करत रहायच्या. गणपतीची आरास दरवर्षी कमू स्वत:च्या हातानं सजवायची. परसदारात, अंगणात रांगोळी काढायची. घरदार झाडून, घासून पुसून स्वच्छ ठेवायची.
दहा दिवस गणपतीसमोर निरनिराळे कार्यक्रम सादर व्हायचे. त्यासाठी दुरून दुरून नामवंत कलावंतांना, गायकांना रितसर आमंत्रणं महिना-महिनाभर आधी जायची. दहाही दिवस भजनं, किर्तनं, प्रवचनं, शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक असे निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम नियमित सादर व्हायचे. ते पहायला दुरून लोक यायचे. पाहुण्यारावळ्यांनी वाडा गजबजून जायचा. सगळं गाव रात्ररात्रभर नृत्यगायनात गुंगून जायचं!
अश्याच एका वर्षी कलावंतांच्या मेळ्यासोबत गोपी गावात दाखल झाला. दिसायला रांगडा, भक्कम, रुबाबदार गोपी तितकाच नाजूक आणि दैवी गळा बाळगून होता. त्या गणेशोत्सवात त्याच्या अभूतपूर्व मंत्रमुग्ध गायनानं त्यानं सगळ्या गावाला जिंकून घेतलं. त्यानं पहाटेच्या गार ओल्या वेळी छेडलेला ’अहीर भैरव’ धुक्याची गडद घोंगडी पांघरून निजलेल्या मलाही अंगभर शहारून गेला होता!
दाराच्या चौकटीत रात्रभर पाजळल्या डोळ्यांनी त्या स्वरांची बेधुंद नशा सार्या देहाचे कान करून झेललेली कमू तेंव्हा गोपीच्या गायनानं वेडी झाली यात काही आश्चर्य नाही. पण त्याचवेळी तिच्या नेमक्या दादीनं बेफ़ाम होऊन आणखिन अचाट सुंदर गायकी अविष्कार पेश करत जाणारा गोपी शेवटी शेवटी नकळत फक्त तिच्याचसाठी गात होता हे मात्र कुणाच्याच लक्षात आलं नाही. कुमुद सोडून.
त्या वर्षी सगळे कलावंत यथासांग पाहूणचार घेऊन समाधानानं परतले तरी गोपी मात्र बरेच दिवस मागे रेंगाळला. गणपती त्यांच्या मुक्कामाला गेल्यावरही महिनाभर गोपीचा पाय गावाबाहेर निघाला नाही. वाड्यातली, गावातली रसिक माणसं त्याला हक्कानं गाण्याचा आग्रह करू लागली. तोही मनसोक्त गायचा. पण त्याचा खरा स्वर फक्त आणि फक्त कुमुदच्या कानांना शोधत रहायचा.
हळूहळू सांज ढळून जाताना मांडवी नदीच्या काठी उपड्या टाकलेल्या होडीला टेकून कमूची आणि गोपीची स्वतंत्र मैफल जमू लागली. गोपी फक्त तिच्यासाठी गायचा. कमू फक्त गोपीसाठी उरायची. त्याहीपुढे जाऊन नंतर त्या मैफलीला स्वरांची आणि शब्दांचीही गरज उरली नाही. आसूसलेले कोवळे स्पर्ष वेगळ्याच पातळीवरचे सूर छेडायचे. बेधूंद होऊन दोघे मैफलीच्या अथांग नशेत कित्येक प्रहर तरंगत रहायचे. प्रेमाच्या, अधिकाराच्या, स्पर्षाच्या, असोशीच्या, आसक्तीच्या आणि अनावृत्त निराकार पवित्र वासनेच्या प्रवाहात स्वत:ला सोडून देत रहायचे. मी अंधारत जाणार्या गूढ संदिग्धतेत त्यांचे बेधूंद बेफाम एकमेकांत मिसळणे भारावून पहात रहायचे.
एकदा मात्र सगळा वाडा किर्तनाच्या रंगात दंग झालेला असताना मांडवीच्या किनारी बेभान रंगलेली ती गुप्त मैफल झाडांच्या काळ्यासावळ्या भेसूर सावल्यांच्या दाटीवाटीत फ़ेणीच्या नशेत तर्र होऊन अस्ताव्यस्त सांडलेल्या एका बेवड्या मजूराच्या नजरेला पडली. त्याची नशा झर्रकन उतरली. नोकर असल्याच्या अंगभूत लाचारीनं नकळत त्याला सर्वकाही त्याच्या मालकाला सांगायला लावलं असावं....
त्या एका रात्रीत वाडा घमासान पेटला. गोपीच्या बंद दबल्या किंचाळ्यांनी वाड्यामागची सगळी बाग हादरून गेली. वाड्याच्या मागच्या खोलीत कमूला फरफटत नेऊन कोंडलं गेलं. तिचं ओरडणं, रडणं गावात कुणाला ऐकू जाऊ नये म्हणून तिचं तोंड बांधून ठेवलं होतं. आतल्या आत जिरणार्या जिवघेण्या हंबरड्यांनी त्या रात्री तिची वाचा कायमची संपवली. त्यानंतर ती कधीही बोलली नाही.
एका रातीत गोपी गायब झाला. कायमचा.
कमू त्याच रात्री संपली. तिची स्वत:वरली आसक्ती उडाली. तिच्यातलं तेज, तिचा रंग अक्षरश: विरून गेला.
त्या रात्रीनंतर कमूला कधी कुणी पाहिलं नाही. तिच्याजागी उरली ती गुब्बी! जी गेली तीस वर्षे त्याच एका रात्रीला भोगत सोसत एका गाठोड्यात रोज बांधत, सोडत जगत राहिली. प्राणांपलिकडे जपत राहिली.
गणपती वाड्यात दरवर्षी येत-जात राहिले. उत्सवाची शान मात्र ओहोटी लागल्यागत उतरतच गेली.
________________________________________________
त्या ओलसर पावसाळी दुपारी गुब्बी नेहमीसारखी तिच्या आंब्याखाली तिनं कुठूनश्या गोळा केलेल्या सिगरेटच्या रिकाम्या पाकिटांचे लांबुडके गोल तुकडे कापून ते एकमेकांत गुंफत बसली होती. वाड्याच्या मागच्या दारातून चक्क घनामामा तिच्यासारखाच संथ घसटत चालत तिच्यापाशी आला. मीही बर्याच दिवसांनी पाहिलं त्याला. खूपच बारिक आणि अशक्त दिसला. काठी टेकत खूप संथ पावलं टाकत चालत होता. मी त्याला आधारा आधारानं हळूवार गुब्बीपाशी नेलं. तो अगदी जवळ येईपर्यंत गुब्बीला काहीही कळलं नाही. जवळ आल्यावर घनामामाने गुब्बीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या शेजारी बसला. त्याच्या थरथरत्या दाबानं गुब्बी दचकली. किंचित बाजूला सरकली. संकोचली. मलाही हा प्रसंग नविन. मी थांबले तिथेच. कान देऊन ऐकू लागले.
"किदें करतां गों? माका दावपाचें ना?" घनामामानं खोल गेलेल्या आवाजात बळेंच हसू आणत विलक्षण हळव्या स्वरात विचारलं. गुब्बी पहिल्यांदा गोंधळली. मग मात्र हसून उत्साहानं तिनं घनामामाला तिनं गुंफलेली सिगरेटच्या रिकाम्या पाकिटांच्या गोल गोल तुकड्यांची सुंदर माळ दाखवली. मला क्षणभर वाटलं आता घनामामा रागवणार! सिगरेटची पाकिटं अशी गोळा केल्याबद्दल गुब्बीला शिक्षा होणार. तिची रवानगी पुन्हा कोंडवाड्यात होणार!
पण घनामामा रागवला नाहीच. क्षणभर थोडासा गंभीर झाला. मग हसला. त्याच वेळी त्याचे डोळेही दंव पडल्यागत चमकले. सुरकुतलेल्या गालांवर किंचित ओले सांडले. गुब्बीच्या मस्तकावर त्यानं त्याचा थरथरता हात संथ फिरवला.
"गुणाची माझी बाय ती..."
गुब्बी आता थेट घनामामाकडे पहात होती.
"बयो.... माजों आता जाऊचो टाईम इल्लों. माका जाऊचे पडतलें. तुझेंवांगडा जरूरीचे उलपांचे आसां माका. ऐकशीला मागों?"
गुब्बी थेट डोळ्यांत पाहू लागली तसा घनामामा सैरभैर झाला. त्यानं तिची नजर टाळली आणि माझ्यात गच्च रुतवली. तो बोलू लागला. गुब्बी आणि मी.... ऐकत होतो.
"कमें, तुजों गोपी येऊपाचो ना आता. तो मेला." घनामामानं एक संथ श्वास घेऊन डोळे गच्च मिटले.
"बयो... माज्यामागिर कोन पुसणार नाय तुका. मी मरायच्या आधी तू मर बयो. तुझ्यापायी एक पापी जीव घेउन घुटमळतो आहे. मला मुक्ती नाही.
सोडिव माका!"
मी थेट गुब्बीच्या बारक्या मिणमिणत्या डोळ्यांत पाहिलं. तिथं पाणी नव्हतं. कसलीही चमक नव्हती. काहीही भाव नव्हते. घनामामाने सांगितलेलं तिच्या कानांत शिरून मेंदूपर्यंत पोचलंय तरी का असं वाटून गेलं मला. मीच ओलेत्यानं गच्च शहारले होते. हुडहुडी भरल्यागत भारावले होते. कासाविस आभाळागत आतल्या-आत घुसमटत होते.
घनामामा एवढेच बोलून ओढत घासत संथ पावलांनी वाड्यात निघून गेला.
त्याही दिवशी नेहमीसारखी गुब्बी संध्याकाळची नदीकाठी भेटली मला. एक शून्य निराकार, निरभ्र आयुष्य! एक शून्य अवकाश. एक शून्य कुमुद नावाची पोकळी! एक शून्य गुब्बी.
त्या दिवशी तिचं ते गाठोडं छातीशी धरून तीही माझ्यासोबत हळूवार उतरली नदीत. नंतर परत कधीही काठावर परतली नाही.
___________________________________________
त्या डांबरी रस्त्याशी अडकलेलं माझं एक टोक मात्र मला अजूनही सोडवून घेता आलेलं नाही. थकून भागून कधीतरी सहज लहर आल्यागत दरी चढून जाते मी वर. त्या वळणावर निर्लेप संन्याश्यागत उभी राहते. मनात उचंबळून आलेलं रस्त्याला काही सांगत नाही. त्याला कळणारं काही नसतंच त्यात. मी दरीला, त्यातल्या टुमदार गावाला, कौलारू घरांना, नऊवार पासून जीन्सपर्यंत, धोतरापासून बर्म्युडापर्यंत, अनवाणी पावलांपासून चमकदार टोकेरी बुटांपर्यंत... आता गावातही उतरलेल्या चार चार चाकांच्या मोटारींपर्यंत बदलत चाललेल्या गावाशीही मी काही बोलत नाही. भंगलेला वाडा आता केविलवाणा वाटतो. तिथं आता गणेशोत्सव पुर्वीसारखा गाजत नाही.
वाड्याची मागची बाजू एका पावसात कोसळून गेली. वाड्यात आता फारसं कुणी रहातही नाही. देखरेखिविना सुकत चाललेल्या बागेत आता जाववत नाही.
आंब्याचं ’ते’ झाड वठून गेलं कधीच. तिथं मी आता कधीच रेंगाळत नाही.
या वळणावर उभी राहून तटस्थ वैराग्यानं मीही विचार करतेय आता. जन्मजात लाभलेल्या या स्वातंत्र्यांचं ओझं घेऊन आता कुठं जाऊ?
___________________________________________________
-मुग्धमानसी.
___________________________________________________
पुर्वप्रसिद्धि 'माहेर' दिवाळी अंक २०१५.
आवडली कथा!
...
बयो, सगळं डोळ्यासमोर उभं केलस
बयो, सगळं डोळ्यासमोर उभं केलस गं !!
छान लिहिलेय कथा.
छान लिहिलेय कथा.
सगळं डोळ्यासमोर उभं केलस गं !! + १
अप्रतिम शब्दचित्र.
अप्रतिम शब्दचित्र.
अंगावर काटा आला .........
अंगावर काटा आला .........
अप्रतिम !!
अप्रतिम !!
मनाला भिडलं...
मनाला भिडलं...
छानचं...
छानचं...
अप्रतिम! खरंतर शब्दच नाहीत.
अप्रतिम! खरंतर शब्दच नाहीत. अफाट लिहिलंय.
चांगलं लिहिलेय
चांगलं लिहिलेय
खूपच सुंदर. अंगावर शहारा आला.
खूपच सुंदर.
अंगावर शहारा आला.
काय सुरेख लिहीले आहे हे.
काय सुरेख लिहीले आहे हे. मस्तच. उपमा तर नितांतसुंदर आहेत. आवडले.
(No subject)
अफाट, बेफाट, अप्रतिम
अफाट, बेफाट, अप्रतिम.
.
बादवे कन्नडमध्ये गुब्बी म्हणजे चिमणी.
छोट्या मुलीला गुब्बी म्हणायची प्रथा आहे.
<<<अफाट, बेफाट, अप्रतिम>>>>
<<<अफाट, बेफाट, अप्रतिम>>>> +१००
खुपच मस्त....!! खुपच चांगले
खुपच मस्त....!! खुपच चांगले चित्र रेखाटलय 'गुब्बी' चे...!! पण प्रत्येकवेळी गुब्बी बरोबर सोबतीला, तिच्या सुरवातीपासुन शेवट पर्यंतच्या प्रवासाचा 'एकमेव' साक्षीदार कोण आहे....??? हवा, पाणी की माती...????
अब्दुल हमीद, ती पायवाट आहे.
अब्दुल हमीद, ती पायवाट आहे. अप्रतिम!खिळवून ठेवणारे लेखन! सुंदर!
खूपच छान लिहिले आहे
खूपच छान लिहिले आहे
पायवाट होय? मला वाटले नदी आहे
पायवाट होय? मला वाटले नदी आहे.
पण डिप्रेसिंग आहे. तो 'बायो'
पण डिप्रेसिंग आहे. तो 'बायो' चित्रपट पाहिलेला तेव्हाही असेच वाटलेले
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
धन्यवाद!
धन्यवाद!
काटा आला अंगावर हे वाचून
काटा आला अंगावर हे वाचून
रड्ले मी... ;(
रड्ले मी... ;(
आपल्या समाजात कुमु ल अन्धार कोठ्डीच मिळ्ते... मग उरते ति गुब्बि...
कीती सुन्दर लिहिल आहे... सलाम तुमच्या लेखनाला....
फेणीची अख्खी बाटली रिचवून तर्र झालेल्या अस्सल बेवड्यासारखी बेताल झोकांड्या घेत मी त्या करड्या गुळगुळीत डांबरी रस्त्याशी अचानक फारकत घेउन तोर्यानं मागे वळून तरातरा खाली दरीत उतरू लागते तेंव्हा माझी मलाच मी कुणी ’वेगळी’ आणि ’छानदार’ असल्यासारखं वाटतं. मी मोकळी हसते त्या वळणापाशी. खिदळते म्हणाना...!
फार भारी वाटतं मला. त्या डांबरी रस्त्याची सोबत तुटणं तसं बरंच. म्हणजे खरंतर तो रस्ता तसा अगदिच काही वाईट नाही... दिसायला कसा राजबिंडा! चालणं डौलदार... वळणं सुद्धा झोकदार! डोंगरदर्यांतून लांबून सुद्दा अगदी उठून दिसायचा बेटा! रानावनातून गर्द झाडीतून जाताना उंच उंच झाडं त्याच्या राजेशाही चालीवर छत्रचामरं ढाळत पानाफुलांचा सडा टाकत असल्यासारखी वाटायची. अस्सा राजा वाटायचा तो!
नागिणीसारखी नक्षिदार नागमोडी वळणं घेत कित्येक डोंगर वळसे-वेढे घालत आम्ही एकत्र बांधले आणि सोडले. आमच्या अंगाखांद्यावरून कित्येक दर्या-टेकड्या चढल्या आणि उतरल्या. कित्येक धबधबे मी त्याच्या साथीनं मातीशी परतवून लावले....!
त्याच्या शरीराला चिकटून वाहिलेले कित्येक चिकट तांबडे रक्ताचे बेचव गरम ओघळ मी जवळून हुंगले.....! कित्येक किंकाळ्या ऐकल्या, आचके ऐकले! कित्येक मुके हंबरडे सुद्धा जवळुन ऐकले! बरेचदा उगाच रेंगाळायचे मी तिथे त्या हुंदक्यांपाशी. तो मात्र तसाच तटस्थ! नाक वर ठेऊन पुढे पुढे चालत रहायचा. जराही चलबिचल नाही. कुतुहल नाही. रेंगाळणं नाही.
गरगरणार्या लहान मोठ्या कित्येक काळ्याशार चाकांना आम्ही कधी सुळ्ळकन् कधी अलगद त्यांच्या त्यांच्या मुक्कामांना सोडलं. रबरी, कातडी, मऊ, टणक, टोकदार, भेगाळलेली, रक्ताळलेली, नाजुक, चिमुकली, रांगडी, रुतणारी, धावणारी, रेंगाळणारी, जडावलेली, थकलेली... आम्हाला अशी तुडवणारी पावलं तर लक्षावधी!
तसं मला काही त्याच्या त्या राजेपणाशी आणि थाटमाटाशी फारसं घेणं-देणं नसतं कधी. तो एक साधीशी निमुळती खडकाळ वाट होता तेंव्हापासून आहे मी त्याला बिलगुन. त्याच्या सोबत त्याच्यात एकरूप असले तरी माझी मी असतेच की माझी माझी वाट चालत! मी तशी जन्मत: स्वतंत्र! त्याची माझी वाट कुठल्यातरी अश्याच झोकदार वळणावर एकमेकांना चिकटली असली तरी... आणि त्याची सोबत नाही म्हटलं तरी काही काळ मला भावली असली तरी... मी खरंच काही ’तो’ झालेले नसते! पण नेमकं हेच कळत नाही नं कुणाला! कसं कळेल? मी दिसते कुठे कुणाला त्याच्याहून वेगळी? त्यालातरी कुठे जाणवतं माझं त्याच्यातलं ’वेगळं’ कुणीतरी असणं? तो कधी आणि कुठल्या वळणावर माझ्यासाठी रेंगाळला? खडक वाटा उतरताना मीही देतेच की त्याला हात कधीकधी.... त्याचं श्रेय त्यानं कधी मला दिलं?
मधूनच मग मला त्याच्या तटस्थपणाची भीती वाटायला लागते. धुक्यानं भरलेली दरी असो की अक्राळ दरडींखाली चिरडून चिकट चिपाड झालेलं एखादं चिमुकलं माकडाचं पिलू.... सगळं सगळं अक्षरश: एकाच विरक्त कोरड्या नजरेनं कसंकाय झेलू शकतं कुणी? म्हणजे विरक्त असण्याला तसा माझा काहीच आक्षेप नाही... पण विरक्तपण निदान मनस्वी तरी असावं! स्वत:च्या मनमर्जीनं बेभान तरी असावं! किमान विरक्तीचं तरी दडपण असू नये ना! विरक्ती ओली असावी... त्यावर प्रेमानं विसावलेली एखादी नजर, एखादी सावली, एखादी आठवण त्यात अलगद रुजायला काहीच हरकत नसावी... मग त्यातून काहीही कधीही उगवलं नाही तरी चालेल! खोल स्वत:च्या आत असं ओलंशार आत्ममग्न विश्व रुजलेलं विरक्तपण किती सुंदर असतं! त्याला सुंदर ’दिसण्यासाठी’ मग वेगळं काही करावं लागणार नाही. गुळगुळीत चालावं लागणार नाही की झोकदार वळणं घेत स्वत:चा ताठा प्राणपणानं जपावा लागणार नाही! असं आपलं मला वाटतं.
मी सांगत असते त्याला... काही क्षण पुढं-मागं रेंगाळलं तरी चालतं अरे! दर्यांमध्ये डोकावताना थोडं वाकावं लागलं तरी चालतं! एखादी उडी मारावी मधेच निमुट चालताना, कडेचं एखादं रानफुल येताजाता कुरवाळलं तरी चालतं, लांबलचक पिसारा घसटत एखादा मोर जातो अंगावरून तेंव्हा त्या पिसांनी होणार्या गुदगुल्यांनी हसावं खुद्कन् जरासं... त्याला तर इतकी वाट चालूनही लाजाळूच्या झाडाची आणि स्पर्शाची गंमत माहीत नाही! छे!
फार समजवलं मी त्याला. तो स्वत:च्याच पावलांचा करकरीत आवाज ऐकल्यासारखा मला मुक्या तटस्थतेनं ऐकत राहतो. मग जरा उशीराच माझ्या लक्षात आलं की आमची भाषा सुद्धा वेगळी आहे. त्याला समजत नाही माझं बोलणं. मग मी निमुट मुकाट चालत राहते आणि अश्याच त्या वळणापाशी पोचताना मला त्या हिरव्यागच्च दरीत विसावलेलं ते टुमदार गाव दिसतं. कुणीतरी प्रेमळ आग्रहानं हाताला धरून बोलावल्यागत मी माझ्याही नकळत कित्येक मैलांची त्याची साथ सहज सोडून देऊन तिथं त्या आंधळ्या वळणापाशी नकळत वळते. तो माझ्यासाठी तेंव्हाही रेंगाळला नसेल याची खात्री असते. ती खोटीही असेल कदाचित.... मी ओळखलं आहे त्याला असं आजही वाटत नाही! ते असो.
तर.... मी फार म्हणजे फारच सुंदर आहे असं आपलं त्या वळणावर वळल्यापासून माझं मलाच वाटत रहातं. दरीत उतरून हिरव्यागच्च राईत लपलेल्या त्या आडगावात मी टुण्णकन उडी मारून उतरते आणि तिथेच रुतल्यागत काही क्षण थबकून राहते. समोर उभा असतो प्रेमळ अदृष्य खोल डोळ्यांचा एक वयोवृद्ध लालेलाल चिराच्या दगडांचा धीरगंभीर वाडा! प्रचंड, कौलारू आणि ऐसपैस! गाई-गुरांच्या शेणाच्या कुबट ओलसर मायाळू गंधानं अंगणभर रितसर माखलेला. मला थेट खेटून त्याचं लाल दगडांचं आखूड कुंपण आणि सताड उघडं लाकडी फळ्यांचं कुबट वासाचं फाटक! मी सहज डोकावते आत. दारापुढच्या वृंदावनातली तुळस मला बघून हिरवंगार हसते आणि मला आणखिनच सुंदर असल्यागत वाटायला लागतं.
मग मी स्वत:शीच हसत तशीच पुढं जाते. मनाला येईल तिथं उनाडक्या करत, चढत-उतरत, पडत-धडपडत, उड्या मारत कधी एखाद्या टुमदार सावलीशी रेंगाळत गावभर हिंडते. छोट्या-मोठ्या चिराच्या, झावळ्यांच्या, लाल-पिवळ्या घरांच्या पडवीत, अंगणांत बिनधास्त धसमुसळी मस्ती करते. गावातल्या छोट्या-मोठ्या लेकरांशी दंगा करते. गोट्यांच्या खेळासाठी ’गली’ खणता यावी आणि सूरपारंब्या खेळताना, धावताना धडपडणार्या चिमुकल्या ढोपरांना फारसं लागू नये म्हणून मी मऊ मऊ, लुसलुशीत होते. पावसाळ्यात चिंब घसरणीवर मी लालेलाल निसरडी होते तेंव्हा मुलं माझ्या पाठीवर घसरगुंडी खेळतात. त्यांच्या मनभर खिदळण्यानं मी कणकण शहारून जाते. गावातल्या कातडी चपला, भेगाळलेले राठ पाय, लगबग नाजूक पावलं, सोवळ्यातल्या पायघोळ नऊवारी पातळाचे नाजूक ओरखडे आता माझ्या चांगलेच ओळखिचे झालेत. प्रत्येकाची स्वतंत्र लगबग मला बिलगून चालू राहते दिवसभर. गोठ्यांतली गुरं मला प्रेमळ तुडवतात. त्यांच्या शेणामुताचा गोडसर गंध मला चिकटून दरवळत राहतो. डेरेदार झाडं माझ्यावर छानदार गारेगार सावली धरतात... निजलेल्या लेकरावर माऊलीनं गोधडी टाकावी तशी!
या टुमदार गावानं मला ’मी’ म्हणून आपलंसं केलं. आपुलकीच्या गहिवरात निथळत मी त्या वाड्याला लडिवाळ वळसा घालून मागची आमराई, केळीची बाग, फणसाची झाडं, नारळी-पोफळी ओलांडत, नागमोडी नाचत धावत, मिरवेल हुंगत, लाजाळूला डिवचत, पाटाच्या वाहत्या पाण्याला सोबत करत दिवस ढळता ढळता थकून दमून काहिशी कातर होते. दिवस ढळताना फणसाच्या झाडांत खोल दडलेल्या थंडगार दगडांतून पाझरणार्या नितळ झरीच्या गोडसर पाण्यात मी काही क्षण पाय सोडून शांत बसते.
सांज चढत जाते. मी तिच्यात हरवत, विरघळत जाते. ओलसर आर्द्र होत जाते. माझा लालसर रंग केशरी होतो आणि मग हळूहळू काळसर जांभळा होत जातो. मऊसर लुसलुशीत दंवानं सजलेल्या हिरव्या-पोपटी गवताला पोक्त मायेनं कुरुवाळत माडांच्या पलिकडे शांत वाहणार्या मांडवी नदीत मग मी हळूवार स्वत:ला अलगद सोडून देते. रोजच्या रोज... गेली अनंत शतके हे असंच होत राहतं.
.
.
.
.
.
मातिचे हे ईतक सुन्दर वर्नन मी आज परयन्त कुठेहि वाचल नाहि.... सलाम....
अंगावर काटा आला, खूपच छान
अंगावर काटा आला, खूपच छान लिहिलंय !!!!
मी परत वाचल,
मी परत वाचल,
माती की पायवाट????
ती पाऊलवाट आहे. धन्यवाद
ती पाऊलवाट आहे. धन्यवाद सर्वांना.
काही क्षण पुढं-मागं रेंगाळलं
काही क्षण पुढं-मागं रेंगाळलं तरी चालतं अरे! दर्यांमध्ये डोकावताना थोडं वाकावं लागलं तरी चालतं! एखादी उडी मारावी मधेच निमुट चालताना, कडेचं एखादं रानफुल येताजाता कुरवाळलं तरी चालतं, लांबलचक पिसारा घसटत एखादा मोर जातो अंगावरून तेंव्हा त्या पिसांनी होणार्या गुदगुल्यांनी हसावं खुद्कन् जरासं... त्याला तर इतकी वाट चालूनही लाजाळूच्या झाडाची आणि स्पर्शाची गंमत माहीत नाही! छे!>>>>अप्रतिम खुपच सुंदर लिहिता तुम्हि हि ओळ खुपच आवडलि अगदि सुरात लिहिता तुम्हि मंत्रमुग्ध झालो संपुर्ण वाचताना.
धन्यवाद!
धन्यवाद!
अप्रतिम कथा...
अप्रतिम कथा...