रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सिम्बॅ ची 10 मिनिटं बघून तो या यादीत टाकावा वाटू लागला आहे.रंग आणि ओव्हर अकटिंग बघून गरगरतंय.
पण मुलांना खूप आवडळाय त्यामुळे माफ ☺️

म्हणजे कुणी चित्रपट बघायला गेलंय आणि तिथून माबोवर पोस्ट करत आहे म्हणजे चित्रपट खास नाही, त्या व्यक्ती करता असं.

असं असुन तुम्ही मत बनवू नका चांगलाही असेल असे सांगताय, हा प्रांजळपणा आवडला.

खरंच मत बनवू नका.स्वतः पहा, वाटलं तर आधी 5 चांगल्या रिव्ह्यूअर चे रिव्ह्यू वाचा.
अभिनय वाईज रणवीर नेहमी प्रमाणे चमकतोय.आशुतोष राणा पण.
घरी सर्वांना आवडलाय.
बाय द वे त्यातला रणवीर चा चंद्रा बद्दलचा एक डायलॉग खूप गाजणार आहे.इथे खूप शिट्ट्या पडल्या.

बाजीराव मस्तानी. सुरुवात इतकी प्रॉमिसिंग वाटली पण चित्रपट पुढे अशक्य संथ आणि बोअर होत गेला. थेटरमध्ये बघितला नाही इतकंच काय ते समाधान.
अजून एक म्हणजे राजवाडे अँड सन्स. हापण शेवटपर्यंत बघितला. समस्त जगावर सूड घेणं या एकमेव उद्देशाने हा मुव्ही काढला असावा.

चटपटीत संवाद,
√√√√
जो देतो मला त्रास त्याचा घेतो मी क्लास ..
हा त्यातलाच डायलॉग का? गाजतोय सध्या...

...

चांदपे बरफ और पाणिका खोज हो गयेला है,
बस दारू ले जाना बाकी है!,
>>>>
हा एक व्हॉटसप जोक आहे. ओरिजिनल डायलॉग नाहीये.

ओह हो का
मला कधी व्हॉटसप वर आला नाही त्यामुळे ओरिजिनल वाटला.
बाकी प्रतिक्रिया चित्रपट कसा वाटला धाग्यावर.

हा एक व्हॉटसप जोक आहे. ओरिजिनल डायलॉग नाहीये.>>>>>>>>
तुम्ही व्हॅटसप वर आहात? मला नं विपु कराल प्लिज. हल्ली मायबोलीवर तुम्ही फार दिसत नसतात, व्यक्तिशः आपल्याला संपर्क करायला आवडेल. तुमचं लेखनही खूप काळजाला भिडतं. आणि प्रतिसाद तर मूळ लेखनाला लाजवतील असे असतात.
( चला याचा नंबर मिळाला ना, कळेल तरी नेमका कोण आहे)

बघितला दुनियादारी. पूर्ण. ते जिंदगीका साथ निभाता चला गया गाणं वगळून - ते पकाव आहे- FF केलं.
ठीक वाटला मला.
टिक टिक वाजते काही खास नाही पण डोक्यात जाणारंही वाटलं नाही, मला ते विशेष जाणवलंही नाही, पार्श्वसंगीता सारखं विरून गेलं.

राजवाडे अँड सन्स+१
हा सिनेमा रटाळ नाही वाटला ( कारण तगडे अभिनेते), पण बंडल आहे नक्की. शेवटी हाती काहीच लागलं नाही.

हो गुलाबजाम आवडला. 'गंध' पाहण्याचा प्रयत्न केला पण खरंच रटाळ वाटला. बाकी कुठले बहुतेक पाहिले नाहीत. तसा ' न्यूड' पण खूप अपेक्षा ठेवून पाहिल्यामुळे असेल, पण बंडलच वाटला. थिएटरमधे बसल्यामुळे शेवटपर्यंत पाहिला.

न्यूड रवी जाधवचा आहे ना?
बघितला नाही, बघणारपण नाही. हल्ली डोक्याला भुंगा लावणारे चित्रपट नको वाटतात!

'गंध' पाहण्याचा प्रयत्न केला पण खरंच रटाळ वाटला. >>>>. गंध पार्शली रटाळ आहे. मला अमृता सुभाष आणि मिलिंद सोमणच्या कथा ठीक ठीक वाटल्या, पण 'बाजूला बसलेली बाई' मला उच्च आवडली. कोकणची पार्श्वभूमी, सतत पडणारा खराखुरा पाऊस, कथा, अभिनय सगळंच अतिशय सुंदर. नीना कुलकर्णीनी तर कमाल काम केलं आहे. या एका कथेमुळे आणि नीना ताईंच्या कामामुळे मी अमृता सुभाष आणि मग इरिटेटिंग सोनाली कुलकर्णी दोघींना माफ केले. तुम्ही गंध रटाळ वाटला म्हणून पूर्ण पहिला नसेल तर शेवटची कथा पहाच. Happy

सकुंचे गंध आणि गुलाबजाम दोन्ही आवडलेत.
<<<<<मला अमृता सुभाष आणि मिलिंद सोमणच्या कथा ठीक ठीक वाटल्या, पण 'बाजूला बसलेली बाई' मला उच्च आवडली. >>>>> मीरा + १००
मला अमृता सुभाष आणि मिलिंद सोमण दोघेही आवडले. खरंतर या दोघांमुळे त्य त्या कथा आवडल्या.
पण नीना कुळकर्णी आणि यतीन कार्येकरनी अतिशय उच्च काम केलंय.
शिवाय कोकण, ते घर, आणि बॅकग्राउंडला पावसाची संततधार यामुळे जो कथेला फील आलाय तो भारी आहे.

गंध बघा.(मी पाहिलेला नाही पण मिसो साठी बघेन.)
अय्या अजिबात बघू नका.आपण का पाहिला हा विचार करून डोक्याला खूप त्रास होतो.

असाच एक मराठी चित्रपट पाहिला होता, टीव्हीवर.
चाळीतील दोन मित्र, एक पैसे कमावून फ्लॅटमध्ये राहायला जातो. पॉश एरिया, स्टॅटस वगैरे.
तिथे त्याला रात्री हृदय विकाराचा झटका येतो. त्याची बायको शेजाऱ्यांना मदत मागायला जाते तर सगळे शेजारी तिच्यावर खेकसताना दाखवले आहेत, "मग आम्ही काय करू, आमची झोप मोड का करतेस? कसली बाई आहे ना!"टाइप. Lol>>>>>>>

हे असं कोणीही करत नाही. माझा मुलगा latch jam हो ऊन रुम मधे अड्कला होता तेव्हा सगळे शेजारी आले होते मदतीला. तसंच शेजार्यांचा मुलगा झोपून गेला आणि शेजारी रात्री उशिरा घरी आले. मुलगा गाढ झोपलेला. त्याला जागं करुन दार उघडायला लावायला सुद्धा आम्ही सगळे फ्लॅटवाले शेजारी जमलो होतो. हृदय विकाराचा झटका ही तर किती गंभीर गोष्ट आहे! अशावेळी कुणी शेजारी मदत करणार नाहित का?
चाळ कित्ती कित्ती चांगली आणि फ्लॅट सिस्टिम कित्ती कित्ती वाईट हे ठसंवण्यासाठी काहिही दाखवायचं. मला पुर्वीचे कौटुम्बिक सिनेमे आठवले ज्यात आधुनिक रहाणीच्या मुली /सुना कित्ती कित्ती वाईट आणि पारंपारिक रहाणीच्या मुली/सुना कित्ती कित्ती चांगल्या असं दाखवायचे.

नवीन Submitted by अस्मानी on 1 January, 2019 - 18:15. >>>> Perfect ! Same as my thoughts फक्त एवढं सगळं टाइप करायचा कंटाळा आला होता.
फ्लॅट्स मधले शेजारी सुद्धा एकमेकांचे मित्र असतात, अडचणीला मदतीला येतात आणि छान धमाल सुद्धा करतात. आणि हे मध्यमवर्गीय लोकॅलिटी बद्दल नाही तर कॉस्मो हाय सोसायटी बद्दल बोलते आहे. चाळ भारी दाखवायची म्हणून वाट्टेल ती आचरट कथा लिहिलेली दिसते.

कालरात्री प्रवासात जागे रहायचे होते सो टाईमपास म्हणून ललित चा TTMM बघितला.

खूप खूप बोरिंग मूव्ही, त्यात नेहा महाजनची ऍक्टिग पण बकवास

Pages