हुषार दिनू

Submitted by मिरिंडा on 10 November, 2016 - 11:37

एक होता दिनू. त्याची आई देवाघरी गेली होती. म्हणून त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी नवीन आई आणली. दिनूला ती आवडली. पण तिला दिनू आवडला नाही. दिनूचे बाबा बाहेरगावी कामाला जात. ते आठवड्यातून फक्त रविवारी घरी येत. आले की दिनूवर खूप प्रेम करीत. त्याला अभ्यासात मदत करीत. दिनू एक हुषार विद्यार्थी होता. त्याला लवकरच सगळे विषय कळत असत. त्यांच्या घरी एक कुत्रा पण होता. त्याचे नाव होते, " टिमू " . टिमू दिनुला नेहमी शाळेत सोडायला जाई. आणि त्याच्या शाळेतून यायच्या वेळीही जाऊन त्याला घेऊन येत असे. दिनूची नवीन आई मात्र दिनूला शाळेत जाईपर्यंत काम सांगायची. आणि केलं नाहीतर रागे भरायची. खायलाही द्यायची नाही. मग दिनूला रडू येत असे. मग तो बाबांची वाट पाहायचा. ते आले की त्यांना सागण्याचं ठरवायचा. पण तो त्यांना फक्त रविवारी घरी यायला मिळायचं म्हणून त्रास कशाला द्यायचा असा विचार करून नवीन आईबद्दल तक्रार करीत नसे. असेच दिवस जात होते. नवीन आईच्या कामांमुळे दिनूला शाळेत जायला उशीर व्हायचा. मग टिमूपण त्याला उशीर झाल्याबद्दल भुंकून आठवण करून द्यायचा. पण आई ऐकायची नाही. मग कधी कधी शाळेत त्याला शिक्षा व्हायची. पण क्वचितच होत असे. कारण तो हुषार विद्यार्थी होता ना.

हळू हळू दिनूची वार्षिक परीक्षा आली. आणि होऊन पण गेली. दिनूने खूप मेहनतीने अभ्यास केला होता. तो निकालाच्या दिवशी शाळेत गेला सरांनी दिनू पहिला आल्यामुळे त्याचे पारितोषिक देऊन कौतुक केले. आनंदाने तो घर आला आणि त्याने ते पारितोषिक आपल्या आईला दाखवले. तिने ते पाहिले पण नाही, कौतुक तर दूरच राहिलं. दिनू हिरमुसला. तो थोड्या वेळाने टिमूजवळ आला. आणि त्याने आपले प्रगतीपुस्तक टिमूला दाखवले, आणि म्हणाला, " बघ टिमू मी वर्गात पहिला आलो आणि हे मला पारितोषीक पण मिळालं. टिमू उत्तरादाखल भुंकला आणि शेपूट हालवून दिनूला चाटू लागला. नेमके त्याच वेळी त्याचे वडील घरी येत होते. आज ते रविवार नसतानाच घरी आले होते. त्यांनी दिनूचे टिमूबरोबरचे बोलणे ऐकले. त्यांना गहिंवरून आले. त्यांनी त्याला उचलून मिठी मारली आणि प्रेमाने त्याची पाठ थोपटली आणि पापी पण घेतली. मग मात्र त्यांनी घरात आल्याबरोबर नव्या आईला खडसावले. तेव्हापासून ती पण दिनूला त्रास
देईनाशी झाली. दिनू सुखावला. त्याला नव्या आईने पण मिठी मारली, आणि त्याचे कोड कौतुक केले. पुढे दिनू खूप मोठा झाला आणि यशस्वी झाला. तात्पर्य, कोणी कितिही त्रास दिला तरी आपल कर्तव्य आपण नाउमेद न होता मनापासून करीत राहावं, म्हणजे यशप्राप्ती होते. आणि त्रास देणारा पण बदलतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users