एकदा एका माकड आजोबांनी सर्व माकडांची सभा बोलावली. हनुवटी आणि तोंडाचं बोळकं हालवीत ते म्हणाले, " माझ्या प्रिय मुलांनो, नातवंडांनो , पतवंडांनो आपली जात ही माणसाच्या जवळची जात आहे. कालच मी जंगलात आलेल्या काही माणसांच्या तोंडून ऐकले की आपण त्यांचे पूर्वज आहोत. पण मला तर तुमच्याकडे पाहून असं अजिबात वाटत नाही. कारण माणसांनी पाहा केवढ्या मोठाल्या इमारती उभारल्या आहेत आणि आपण अजून झाडांच्या शेंड्यावर झोपतो. यःकश्चित चिमणीलाही घरटे असते. ती बांधते ते. आणि आपण संध्याकाळी दमल्यावर आपल्या घरात जाऊ शकत नाही , कारण आपण कधी घर बांधण्याचा प्रयत्नच केला नाही . आपल्यात काहीही कमी नाही. मग हे असं का ? " जमलेल्या माकडांनी डोके खाजवून पाहिले. आणि आपसात म्हणू लागले . आजोबा म्हणतात ते खरच आहे. यावर आपण काहीच करू शकत नाही असं आहे का ? असे ते आपसात विचारू लागले. मग त्यांनी आजोबांना विचारले, " आजोबा उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही आम्हाला घर बांधायला मदत कराल का ? तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच चांगले घर बांधू शकू. " त्यावर आजोबांनी होकार भरीत म्हंटले, " का नाही ? तुमच्या जिद्दीचे मला कौतुक वाटते. उशिरात तर उशिरा पण आपलं घर नक्कीच होईल. फक्त एकच सकाळ झाली की टणाटण उड्या मारीत फळं शोधण्यासाठी जंगलात जायचं नाही. दिवस भर खादाडी करायची नाही. तर घर बांधायला घ्यायचं . म्हातारपणामुळे आता माझी पाठही धरली आहे. लक्षात ठेवा घर नसल्याने रात्रीचा वाघोबा आला तर घाबरून आपल्यापैकी काही जण तरी झोपेत असताना खाली पडतात आणि वाघोबाचं काम होतं. यापुढे असं व्हायला नको. चला झोपू या आता. " असं म्हंटल्यावर आजोबा आणि सगळीच माकडे स्वतःच्या घराचे स्वप्न रंगवीत झोपायला गेली.
दुसरा दिवस उजाडला. सूर्याची पिवळी सोनेरी किरणं पडली. झाडाच्या फांद्यांतून माकडांनी डोळे किलकिले करून पाहिलं. आजोबा अजून झोपले होते. त्यांना न उठवता. त्यांनी घर बांधायचे ठरवले. पण सध्या थोडाफार नाश्ता तर केला पाहिजे असे वाटून ते सगळेच जंगलात निघून गेले. नाश्ता झाल्यावर एकत्र येण्याचे ठरवले. पण कसलं काय आणि कसलं काय , जो तो खाण्या पिण्यामध्ये मश्गुल झाला. आणि त्यातच संध्याकाळ झाली. तेव्हा चिमण्या आणि इतर पक्षांना घरट्यांकडे जाताना पाहून त्यांना आपल्या घराची आठवण झाली . पण उपयोग झाला नाही. सगळेच मग घाबरले, आजोबांना कसं तोंड दाखवायचं त्यांना समजेना. इकडे आजोबांनी जवळच्याच झाडाची फळे खाऊन भूक भागवून घेतली. आणि ते आपले जात बंधू आपल्याला नवीन घरात घेउन जाण्यासाठीचे स्वप्न पाहू लागले. थोड्या वेळाने
संधिप्रकाश पडल्यावर सगळीच माकडे आजोबांकडे परत आली त्यांची अपराधी तोंडॅ पाहून आजोबा समजले. घर काही बांधून झाले नाही. मग त्यांनी सगळ्यांना फैलावर घेतले. मग सगळ्यानीच शपथ घेऊन उद्या सकाळी घर बांधण्याचे ठरवले. आजोबा निराश झाले. दुसऱ्या दिवशीही तेच झाले. माकडांचे घर काही बांधून झाले नाही. ते अजून पर्यंत घर बांधू शकले नाहीत.
तात्पर्यः एकाच विचाराने प्रेरित झालं तरी प्रलोभनांना बळी न पडता आपलं ध्येय साधावे.
------- --------------------------------------------------------------------------------------