माकडाचे घर
Submitted by मिरिंडा on 10 November, 2016 - 11:32
एकदा एका माकड आजोबांनी सर्व माकडांची सभा बोलावली. हनुवटी आणि तोंडाचं बोळकं हालवीत ते म्हणाले, " माझ्या प्रिय मुलांनो, नातवंडांनो , पतवंडांनो आपली जात ही माणसाच्या जवळची जात आहे. कालच मी जंगलात आलेल्या काही माणसांच्या तोंडून ऐकले की आपण त्यांचे पूर्वज आहोत. पण मला तर तुमच्याकडे पाहून असं अजिबात वाटत नाही. कारण माणसांनी पाहा केवढ्या मोठाल्या इमारती उभारल्या आहेत आणि आपण अजून झाडांच्या शेंड्यावर झोपतो. यःकश्चित चिमणीलाही घरटे असते. ती बांधते ते. आणि आपण संध्याकाळी दमल्यावर आपल्या घरात जाऊ शकत नाही , कारण आपण कधी घर बांधण्याचा प्रयत्नच केला नाही . आपल्यात काहीही कमी नाही. मग हे असं का ?