शिकलेली माणसं सूर्याला आवडत नसत. त्याच्या मनात येत राहिलं हा काका आला आणि आपल्या टोळीचे ग्रह फिरले. हा माणूस आपल्या लाइनमधला नाही असा इशारा त्याने किशाला कैकदा दिला होता. पण किशाने काकावर विश्वास ठेवला. आज सगळी टोळी या एकाच माणसामुळे बरबाद झाली . हा येण्यापूर्र्वी सगळं कसं ठीक होतं. त्याने एक दोन वेळा किशाला हेही सांगून पाहिलं की पेरियरवर विश्वास ठेव , पण शिकलेल्या माणसावर ठेवू नकोस. पण किशा वेगळा होता. तो माणसाला एकदम टाकून देत नसे. त्याच्यातलं जे उपयोगी आहे ते शोधून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. किशा शिकलेला नसला तरी माणसं सांभाळण्याचं त्याला ज्ञान होतं. त्याला टोळी चालवायची होती..... असो. संध्याकाळ होत आली . काका कंटाळले होते. त्यांच्या मनात आलं ,अजून पोलिस चौकशी पूर्ण का करीत नाहीत . म्हणजे त्यांना नीट सांगता येईल . डोक्यावरचं ओझं तरी उतरेल. एकदाचं प्रकरण कोर्टात गेलं की जामीन वगैरे मिळून तात्पुरती का होईना सुटका होईल. आपण पहिल्यापासूनच या टोळीच्या विरोधात होतो. पण ते पुढे वाहवत का गेले याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हतं. कोणीही हे विचारलंच असतं. त्यांना उत्तर सुचेना. पोलिसांना बहुतेक, चौकशीत जास्त रस नसून सगळ्यांना मारण्यात आहे असं त्यांना वाटू लागलं. ते निराश झाले. आपला मोबाईल पाहणार एवढ्यात त्यांना राजासाबने दबक्या आवाजात सांगितले, " देख काका, पुलिस हमेशा हरामी होती है. कुछ नही बताना,.... वरना ये साले कुत्ते सब कुछ उगल लेंगे और चार्जेस भी लगायेंगे. .....अब तू हमारे साथही रहेगा. पडनेवाला मार सह लेना. अब तू बाकी जिंदगी अंदरही काटेगा.... अदालत किसीकीभी नही सुनती. " पण काकांनी लक्ष दिलं नाही. एक शक्यता मात्र दुणावली की ते साधारण ताण विरहित आयुष्य कधीही जगू शकणार नाहीत. ते निराश झाले. खरंतर कधीही या शब्दाला अर्थ नसतो. कधीही असं काही नसतंच मुळी . कोणतीच गोष्ट जगात कायम नाही, असा विचार करून काकांना निदान मानसीक आंदोलनांतून थोडं सुटल्यासारखं वाटलं. ते आता गुडघ्यात मान घालून बसले. विचार थांबायला तयार नव्हते. ..... सुटून तरी आपण जाणार आहोत कुठे ?.....उद्या हे पेपरात आलं की नीता आपल्याशी कशी वागेल ? फार कशाला घरी एवढ्या उशिरा गेलं की तिच्या तोंडाचा पट्टा आपल्याला सहन करावा लागेल किंवा तिची पूर्वीची दुर्लक्षित वागणूक ती आपल्याला देईल . का , कोण जाणे... . त्यांना नीताची धास्तीच वाटू लागली. आईपेक्षाही जास्त. त्यांची आई फार शिस्तबाज होती. पण ती आई होती. नीता आपल्याला घरात ठेवणार नाही हे नक्की. खरंतर हे प्रश्न त्यांना उगाचच भेडसावीत होते. का ते स्वतःला भेडसावून घेत होते ?म्हणजे तोंडावर एक प्रकारच्या मजबूरीचा भाव येतो . आणि पाहणारा जास्त त्रास देत नाही. अशा वागण्याने आयुष्यातल्या प्रमुख समस्या थोडावेळ तरी दुर्लक्षित करता येतात असा त्यांचा समज असावा. असो. काकांची तरी अशी पद्धत होती. सध्या तरी ते पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित होते. ही एकच जमेची बाजू होती. निदान इथे नीता, रमेश आणि आता साधनासुद्धा त्रास देऊ शकणार नव्हत्या. साधना सुद्धा आपल्याला पक्की धरून नाही. रोहिणीसारखी. उगाचच डोक्यात रोहिणी आली.... ती जगली असती तर बाहेर आल्यावर आपल्याला तिने असं वागून दिलंच नसतं. काकांनी हे सगळं विसरायला काय हरकत होती. कारण अजून तरी ते घरी गेलेले नव्हते. आणि केव्हा जातील याची त्यांना कल्पना नव्हती. ........ वेळ जात राहिला.
बाहेरून साहेब लोकही जेवून आले. पण चौकशी काही होत नव्हती. नेटकेंनी दबक्या आवाजात विचारलं " साहेब यांना आत घेऊ या का ? " डावले कंटाळले होते. नाकाजवळचा कपाळाचा भाग चिमटीत पकडून ते विचार करू लागले. निदान आज रात्री तरी घरी जायला मिळावं. सखारामचं स्टेटमेंट बेंजामिन घेणार आहे म्हणजे निदान त्याला अनुसरून गेलं तर काही रिकाम्या जागा भरता येतील. काका हा खरंच कच्चा दुवा आहे की बाकीच्यांनी त्याला पढवलेला आहे? त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. सगळ्याच लांबण लावणाऱ्या गोष्टी . एखादी केस सुटणं आणि योग्य ते पुरावे समोर येणं , हे निव्वळ नशीब आहे. नाहीतर आपण लाल तात्याच्या केसमध्ये एवढे कष्ट घेऊनही क्रेडिट सुकाळेच घेऊन गेला. त्याचं नशीब चांगलं. श्रीकांतसर असते तर त्यांनी प्रश्न कुंडली मांडून योग्य उत्तर दिलं असतं. .... हळूहळू ते वास्तवात आले. समोर बसलेल्या नेटकेंना ते म्हणाले, " साडेनऊ दहा वाजेपर्यंत घेऊ सगळ्यांना आत " मग ते केस फाइल पाहू लागले. फाइलमधली माहिती आणि सद्यपरिस्थिती यांची ते सांगड घालू लागले. अचानक त्यांना प्रसंगांची मालिका जाणवू लागली. मुख्य म्हणजे ताराबाई सरडेंचं नाहीसं होणं, त्यांचा फ्लॅट बरोबर बँकेच्यावर असणं, त्यात त्यांचं मृत शरीर सापडणं, आणि फाइलमध्ये वर्णन केलेले मागचे प्रसंग यांत त्यांना थोडंसं सूत्र दिसू लागलं. पण फार विचार केल्यावर एखाद्या भिंतीवरून ते परत यावेत असं वाटू लागलं. आरोपींना आत घेऊनच विचारावं लागेल. त्यातल्या प्रत्येकालाच माहीत असणार. आपण कोअर माणसं पकडलेली आहेत यांना पिळल्याशिवाय काही उपयोग नाही. त्यामुळे रिकाम्या जागा भरून निघतील...... आरोपींना सडवणं ही त्यांची पद्धत होती. पण वरिष्ठांचा दबाव असेल तर काळाच्या मर्यादा पडतात आणि घाईघाईत सगळं उरकावं लागतं. मग नशीब आपला भाग दाखवू लागतं. त्यांना सगळे विचार सहन होईनात. उद्या पेपरासाठी वृत्तांत बनवून पाठवणं आवश्यक होतं. त्यांनी नेटकेंना मुद्दे सांगायला सुरुवात केली.
अर्ध्या तासात त्यांचं लिखाण तयार होत आलं. ते जरा थांबले. अचानक त्यांना या केसचा कंटाळा येऊ लागला. कदाचित अतिश्रमांमुळे असेल असा विचार करून त्यांनी कपाळावर बोटं टेकवली. आज तरी घरी जायला मिळणार का ? निदान आजची रात्र तरी घरी झोपायला मिळावं. पण अजून सखारामचं स्टेटमेंट येणार होतं. बेंजामिन ते काम करणार होता. म्हणजे एकूण प्रसंगांवर वेगळा प्रकाश पडेल. का कोण जाणे ते एकदम म्हणाले, "चला नेटके घ्या सगळ्यांना आत " ...... नेटके उठणार तेवढ्यात फोन वाजला. तो डावलेंनी घेतला. त्यांना डीसीपींचा फोन वाटला. पण लाइनवर खबरी होता. दमलेल्या आवाजात ते म्हणाले, " बोलो. .... " साबजी , एक जबरदस्त खबर है . किशाकी टोली बच्चोंकी खोपडी बेचनेवाली है. आज रात तीन बजे , जुहू बीचपर , जॉनी बीच हटके सामने डिलिव्हरी होगी . डिलिव्हरी कौन करनेवाला है और कौन लेनेवाला है , वो थोडी देरमे बता दूंगा. " फोन बंद झाला. डावले सावध झाले. पण त्यांनी मुलांच्या खोपड्या कुठे आहेत त्याचा विचार केला नाही . ते ऑफिसला गेले असते तर त्यांना त्या मिळाल्या असत्याच. पण इतर बरीच कामं असल्याने त्यांना ते सुचलेच नाही. त्यांचा थकवा त्यांनी बाजूला सारला. आणि उठणाऱ्या नेटकेंना म्हणाले, " चला पथक घेऊन रात्री जुहू बीचची सफर करावी लागेल. कधी गेला होतात का बायकोला घेऊन , निदान दिवसातरी. त्यावर उत्तर नेटकेंनी उत्तर दिल नाही. तेवढ्यात बेंजामिन सखारामचं स्टेटमेंट घेऊन आला. डावले म्हणाले, " आता चार्जरूममध्ये रंग भरेल. बघू हा काका अगदी साळसूदपणाचा आव आणतोय , तो काय सांगतोय ते. जरा बसा. आपल्याला आता वृत्तांत बदलावा लागेल का ते पाहावं लागेल. मग ते दोघे परत बसले. आणि सखारामच स्टेटमेंट आणि इतर प्रसंग यांची ते सांगड घालू लागले. काका पाहत होते. पण त्यांना त्या दोघांचं बोलणं ऐकू आलं नाही. पण काहीतरी शिजतंय, हे त्यांना समजलं. म्हणजे कदाचित आज चौकशी पुरी होईल. लवकरच जेवण आलं. पुन्हा दुपारचंच कदान्न फक्त वासात फरक. म्हणजे वास आणखी वाईट होता. तरीही काका आणि इतर चौघे जेवले. सूर्याने जेवण आणणाऱ्यालाच शिव्या घातल्या. सूर्या बांधलेल्या अवस्थेत असल्याने जेवलाच नाही. अर्ध्या तासात बाकीच्यांचं जेवण झालं. मग दहा वाजता नेटके डावले देखणे आणि इतर दोन पो. कॉन्स्टेबल्स कोठडीत आले.
दहा वाजत होते. आल्या आल्या सगळ्यांना लाथेने उडवीत उठायला सांगितले. डावले भडकून म्हणाले, " उठा रे ए कुत्र्यांनो. चला , तुम्हाला मेजवानी देतो. " असं म्हंटल्याबरोबर सगळे उभे राहिले. सूर्याला नेटकेंनी सोडला. त्याबरोबर सूर्याने त्यांच्या एक थोबाडीत लगावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सूर्याचा दुखरा हात पिरगाळला. तो गुरासारखा ओरडत राहिला. त्याची कॉलर पकडीत ते म्हणाले, " याला जरा जास्तच पक्वान्न खायला घालू या. " ..... मग सगळ्यांचीच एका गॅरेजवजा अंधाऱ्या रुममध्ये रवानगी झाली. रूम नक्की किती मोठी होती. कळत नव्हतं . मध्ये मध्ये एक दोन ठिकाणी दोरखंड आणि साखळदंड लोंबत होते. ते पाहून काकांना थरथर सुटली. असल्या गोष्टी काकांनी केवळ सिनेमात पाहिलेल्या होत्या. प्रत्यक्षात इथे यावं लागेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आत आल्या आल्या एकेकाला दोरखंडाने बांधीत वेगवेगळ्या प्रकारे दम आणि शिव्या द्यायला सुरुवात झाली. जवळ जवळ तासभर सगळ्यांनाच यथेच्छ तुडवल्यावर ते थांबले.काही अर्धवट माहिती मिळाली. त्यातून काकाही सुटले नाहीत. आणि प्रत्येकाने वेगवेगळी माहिती दिली. सूर्या सोल्याची शिक्षा पचवलेला माणूस असल्याने त्याने काहीच माहिती दिली नाही. त्याचा दुखरा हात दाबूनही त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही. उलट तो म्हणाला, " देखो साब, आप हमारी जान लेगा तो भी कुछ भी नही बताउंगा" तो त्याच्या उक्तीला जागत होता. तो लवकर मोडणाऱ्यांपैकी नव्हता. मग दुसरी काहीतरी शक्कल लढवून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याचं डावलेंनी ठरवलं. त्याची एखादी कमजोरी शोधणं आवश्यक होतं. तो अनुभवी गुन्हेगार होता. त्याची फाइल पाहावी लागणार होती. दुसरे अर्धवट का होईना माहिती देत होते. ........काकांना बाजूला काढून त्यांना मग डावले आणखी एका लहानशा रूममध्ये घेऊन गेले. तिथे फक्त एक टेबल आणि एक खुर्ची होती. डावले थोड्या नरम आवाजात म्हणाले, " हे बघ तू सगळं सांगायला तयार आहेस ना ? " काकांनी मान डोलवली.... " मग तू सांग सगळं .फक्त एकच. आम्ही आता तुला मारणार नाही पण या टेबलावर मारू आणि तू जोराने ओरड. म्हणजे बाकीच्यांना आम्ही तुला मारतो आहोत असं वाटेल. " त्यांनी एका कॉन्स्टेबलला पॅड आणि पेन घेऊन बोलावले. काका बोलत होते. अधून मधून मार खाल्ल्यावर ओरडतात तसे ओरडत होते. पण काका बोलत राहिले. लहान शिरं नक्की कुठे ठेवली होती काकांना माहीत नव्हते. त्या तिघांना काकांची स्टोरी ऐकून आश्चर्य वाटलं. हा बोलतोय हे खरं कशावरून ? काकांनी सांगण्याचे काहीही शिल्लक ठेवले नाही.अगदी अथ पासून इति पर्यंत सगळं सांगितलं. त्यातून त्यांना जास्त तपशील मिळाला. एक म्हणजे , अजून पेश्तू, दिवाणजी , मिस्चिफ, साधनाच्या घरी आलेला माणूस , (काण्या, काकांना तो कोण आणि त्याचं नाव माहीत नव्हतं) बूढा चाचा ,डॉक्टर आणि सोल्या बाहेर असल्याचं कळलं. त्यांना फोटो दाखवण्याचं ठरलं. पण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने कोर्टात हजर करायचं होतं. म्हणून मग डावले नेटके, देखणे आणि इतर दोघे कॉन्स्टेबल्स बाहेर आले. तेव्हा बारा वाजत होते. मात्र काकांना दम दिला गेला. जर हे खरं नाही निघालं तर मात्र तुमची खैर नाही. आता त्यांनी इतरांना एकेकटे दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरवलं. तरीही सगळ्यांना एकत्रच बंद केलं. सूर्याला आता मोकळा सोडला होता. त्याची बडबड चालूच होती. पण अंगात ताकत नसल्याने काका वाचले होते. पण किती दिवस वाचणार ? अजूनही माफीचा साक्षीदार म्हणून ते घोषित झालेले नव्हते. काकांनी सांगताना त्यांची झालेली चौकशी आणि शिक्षा याबद्दलही सांगितले. अचानक त्यांना आपल्या मोबाइलची आठवण झाली. अंगात त्राण नसतानाही त्यांनी सरकत जाऊन हळूच मोबाइल बाहेर काढला. चालू झाल्या झाल्या मोबाइलवर संजीव दिनानाथ जांभळे याचे मेसेज दिसले. . ते घाबरले. त्याच्या बद्दल आणि भारताबाहेर जाण्याच्या योजनेबद्दल त्यांनी काहीच सांगितले नव्हते. तसेच साधना आणि नीताचे मेसेजही आल्याचे दिसले. त्यांनी परत बंद करून मोबाइल जागेवर लपवला.
डावलेंनी विचार करून काकांनी सांगितलेल्या माहितीचा वापर करून तपास करण्याचं ठरवलं. पण सध्या काहीही न बोलण्याचं व अहवालात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची नोंद केली नाही. परंतू एका गोपनीय अहवालातून त्यासंबंधी वरिष्ठांना कळावं म्हणून मात्र उल्लेख केला. . काका पूर्ण नावाने प्रसिद्ध नव्हते. म्हणूनच काकाजी असं नाव लिहिलं नाही. उगाचच अजून बाहेर असणाऱ्यांना कशाला कल्पना द्या. अहवाल पाठवला गेला. अहवाल थोडा अर्धवट असला तरी हरकत नाही असं डावलेंना वाटलं. आणि शेवटी नक्की काय काय वृत्तांत पाठवायचा हे वरिष्ठच ठरवणार. असो. अजून पहाटे तीन वाजता जायचंच आहे. म्हणून त्यांनी काकांनी दिलेली माहिती परत परत वाचून पाहिली. सोमवारी आरोपींना कोर्टासमोर पेश करून रिमांड घेण्याचं महत्त्वाचं कामही होतच. पुन्हा एकदा डावले साहेबांचं स्क्वाड जुहू बीचला जायला तयार झालं. म्हणजे आजची झोपही गेली , असं त्यांच्या मनात आलं. तसं सध्या काहीही करण्यासारखं नव्हतं म्हणून डावले साहेब खुर्चीत थोडे रेळले. त्यांना डुलकी येऊ लागली. आत्ता फक्त बारा वाजत होते. अजून दोन तास तरी काढायचे होते.थोडं तरी आधी जायला पाहिजेच. म्हणजे कारवाई कशी करायची ते ठरवता येईल. आता डिलिव्हरी द्यायला कोण येणार आहे ते तरी कळेल. बाहेर असलेल्यांपैकीच कोणीतरी येईल काकांना किक्ला कोण ते माहीत नव्हतं. त्यामुळे डावलेंना फक्त डॉक्टर , पेश्तू , काण्या, दिवाणजी ,मिस्चिफ आणि सोल्या हेच माहीत होते. . अर्थातच त्यांना पाहिलेले नव्हते. मग त्यांच्या मनात आले , काकाला बरोबर घेऊन जाण्यात सध्या तरी काही अर्थ नाही. ..........
इकडे किक्ला आणि काण्या सूर्याच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते. ते पोहोचले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. ऑफिसबाहेर उभ्या असलेल्या हवालदारांना पाहून आत जाण्याची काहीतरी युक्ती शोधण्याचा प्रयत्न चालू होता. किक्ला तर काण्याने त्याला थांबवलं होतं म्हणून उभा होता. त्याचा हिशोब एकच होता. एवढं हवालदारांना काय घाबरायचं , सरळ जाऊन त्यांना पकडून आत नेऊन ठेवायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. शेवटी काहीच न सुचल्याने काण्या फारसं कोणालाही दिसणार नाही अशा रितीने मुख्य दरवाज्याजवळ पोहोचला. त्याची उंची पण फार कमी होती . मागे त्याला कव्हर करण्यासाठी किक्ला होताच. काण्याने मांजराच्या पावलाने मागून जाऊन ज्या हवालदाराची पाठ त्याच्याकडे होती त्याच्या पाठीशी पिस्तूल लावून त्याला दम दिला. " ए, हालचाल करू नकोस फुकट मरशील. सांगतोय तसं वागलास , तर जिवंत ठेवीन. " दुसऱ्या हवालदाराने पटकन जवळची रायफल उचलण्याचा निष्फळ प्रयत्न केला .
त्यासरशी किक्लाने पुढे होऊन त्याचा हात पिरगाळला. दोघांच्या हातातल्या रायफली खेचून घेत तिथे दरवाज्याजवळ ठेवून त्यांना सील तोडायला भाग पाडलं आणि ते चौघे आत घुसले. आत फोन वाजत होता. प्रथम त्या दोघा हवालदारांना बाधणं जरूर होतं. थोड्याफार प्रयत्नाने त्यांना एक प्लास्टिक वायरचे मोठे सापडले. दोघांना केबिन मधल्या दोन खुर्च्यांना बांधून त्यांनी एकूण वातावरणाचा अंदाज घेतला. सगळं सामान इतस्ततः पसरलेले होते. आतला फोन न उचलल्याने बंद पडला. मग काण्याने कॉलर आय डी पाहून आलेला नंबर पुन्हा फिरवला. त्या सरशी पलीकडून दिवाणजीचा चिडलेला आवाज आला. " अरे दादा, तुम हो किधर यार ? कभी काम करेगा? " काण्याला कोण बोलतंय आणि त्याचं काय काम आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे किक्लाने फोन घेऊन दिवाणजीला विचारले. सगळं समजल्यावर अजून बरेच पैसे येणं आहे हे त्याला कळलं. तेव्हा तो म्हणाला, " हम आपको दस मिनीटमे फोन करते है. " पण दिवाणजींचा विश्वास नव्हता. तरीही ते ठीक आहे म्हणाले, आणि फोन बंद झाला. झालं आता लहान मुलांची शिरं कुठे शोधायची ? त्यांना कळेना. पण त्यांचं नशीब जोरावर होतं . त्यांनीही मग सामानाची फेकाफेक करून पाहायला सुरुवात केली. शेवटी निराश होऊन ते बसले. अचानक किक्लाला ड्रिंक घ्यावं आणि थकवा घालवावासा वाटला. तसंही शिरं सापडली नसली तरी पैसेही सापडले नाहीत. किक्लाने मग रागाने फ्रीज उघडला. व्हिस्कीच्या बाटलीला हात घालणार तेवढ्यात एक निळ्या पिशवीतले अतिजड पार्सल त्याच्या पायावर पडले. त्याने शिवी देऊन ते लाथेने उडवायचा प्रयत्न केला.
ते फक्त थोडं सरकलं. त्याने बाटली तशीच तोंडाला लावीत काण्याला खूण करून पार्सल उघडून पाहण्यास सांगितले. काण्याने कसंतरी वरची गाठ सोडवली. पण दुसरी मारलेली गाठ सुटेना. त्याने मग नखाने पिशवी फाडली आत घट्ट बर्फ जमला होता. एवढा मोठा बर्फ दारू साठी किशा जमवून ठेवतो असे पाहून त्याला हसू आलं. तशी किक्ला ओरडला, "अबे सुवर , हसता क्या है, खोल जलदी." पण घट्ट बर्फ फोडणं खायचं काम नव्हतं. काण्याने आजूबाजूला पाहिलं. लाकडाच्या फळ्यांशिवाय तिथे काहीही नव्हतं. त्यातलीच एक फळी घेऊन त्याने ती तोडली. त्यातून निघालेल्या अणकुचीदार तुकड्याने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. फोडायला जवळ जवळ अर्धा तास गेला मग अचानक खोलीतल्या उष्णतेमुळं आणि प्रयत्नांमुळे म्हणा त्या, बर्फाच्या कवचाला तडा गेला आणि त्यातून ओघळत एका मुलाचं शीर काण्याच्या पायाकडे आलं. त्याचे डोळे पूर्णपणे उघडे आणि थिजलेले होते. ते पाहून काण्याला भीती वाटली. किक्लाची थोडी उतरली. पण अजून त्याला आलेला फोन आणि मुलांची शिर यांचा संबंध समजेना. आपण कुठे फसलो असच वाटत राहिलं. पैसा आणि पंधरा नंबर लॉकरमधला माल त्याला मिळत नव्हता. तो अपसेट झाला. त्या शांततेत फोनची बेल परत सैरटा सारखी वाजली. किक्लाने फोन घेतला. दिवाणजी म्हणाले, " अरे कब भेजेंगे खोपडिया ? किसीभी हालतमे आज रात तीन बजे लेकर आ जाओ. हम जुहू बीचपर आने वाले है. तुम जॉनी बीच हटके बाजूमे खडे रहना. " फोन बंद झाला. आता उरलेली शिरं बाहेर येऊ लागली. किक्लाच्या मनात आलं साला ये बंबईमे कुछ भी बेचा जाता है. पैसे मिळण्याची शक्यता किक्लाला जरा समाधान देऊन गेली. त्याने परत एकदा दिवाणजींना फोन केला. पण त्यांनी तो घेतला नाही. आता त्यांना माल हवा होता. किक्लाचा फोन आला तेव्हा ते त्यांच्या सहकाऱ्यासहित लाँचची पाहणी करीत होते. आता फक्त दोन तीन घंटेच राहिले होते. अचानक केबिनच्या दरवाज्याशी हालचाल दिसल्याने किक्लाने आपलं पिस्तूल दरवाज्याकडे वळवलं . बाहेरून दरवाज्या उघडला जाऊ लागला. आत येत मिस्चिफ हातातलं पिस्तूल रोखून उभा राहिला. त्याला पाहून किक्ला म्हणाला, " क्यूं बे तू कौन है ? " काण्या त्याला ओळखत असल्याने किक्लाला त्याने दादाचा शूटर असल्याचे सांगितले. मग किक्ला म्हणाला, " देख अब ये टोली मै चला राहा हूं. अगर मेरा साथ देगा तो तुझे मालामाल कर देगा. मेरेको फालतूका खून खराबा पसंद नही .जलदी बोल वरना मरनेके लिये तयार हो जा. " मिस्चिफने काही वेळच विचार केला. मग पुढे होऊन त्याने आपलं पिस्तूल डाव्या हातात घेऊन उजवा हात मिळवण्यासाठी पुढे केला. किक्लालाही आत्ता कोणताही पंगा नको होता. तो, पैसे आणि किशाने मिळवलेल्या कागदपत्रांच्या मागे होता. समोरच पडलेली मुलांची शिरं पाहून मिस्चिफला हा व्यवहार आठवला. किक्लाने ते ताडलं असावं. त्याने त्याला खुणेनेच विचारले , ये क्या है ?. मग मिस्चिफने पैशाची खोटा हिशेब पेश केला. एकूण तीन कोटीचा व्यवहार ठरला होता. दादाला दीड कोट घ्यायचा होता. किक्लालाही तो खोटं बोलत असल्याचं जाणवत होतं. पण तो काही बोलला नाही. सध्या त्याने त्याच्या कलाने घेण्याचे ठरवले. परत एकदा दिवाणजींना फोन लावला. त्यांनी किक्लाचे बोलणे ऐकून घेतलेच नाही. माल वेळेवर न मिळाल्याने ते खफा होते. आता वेळ घालवणं त्यांना परवडणारं नव्हतं. निदान एखाद
तास आधी तरी त्यांना सांगितलेल्या जागेवर जाणं भाग होतं. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते आवश्यक होतं. किक्ला ने मग मिस्चिफ आणि काण्याला गुड्डीला बोलावून घेण्यास सांगितलं. गुड्डीला फोन केला. तो मस्त झोपेत होता. मध्येच आलेल्या फोनला असंख्य शिव्या घालीत त्याने फोन उचलला. त्याला अजूनही किशाचं काय झालंय हे माहीत नव्हतं. फोन किशाचा पाहून तो म्हणाला, " हुकूम करो, दादा. "
मात्र आवाज किक्लाचा होता. " ए, जनाने ऑफिस आ जा. फोरन. " गुड्डी किक्लाला ओळखत नसल्याने म्हणाला, " फोन रख दे कुत्ते. " असं बोलून गुड्डीनेच फोन ठेवला. त्यांना ड्रायव्हिंग कोण करणार असा प्रश्न होता. तसं ड्रायव्हिंग सगळ्यांना येत होतं. पण फालतू जबाबदारी कोण घेणार ? प्रत्येकाला महत्त्वाचा रोल हवा होता. किक्ला गुड्डीला ओळखत होता. परत परत फोन केला तरी तो फोन उचलेना. मग मात्र किक्ला मिस्चिफला म्हणाला, " तु गाडी चलाएगा . देख पहले होटल डिलाइट चलते है. वहां से गुड्डीको लेते है . फिर कान्या और ये गुड्डी जगाका मुआयना करेंगे. जैसे अपने को खबर है वैसी पुलिसको भी जानकारी हो सकती है. हमे कही भी फसना अब खतरेसे खाली नही होगा. " किक्लाचा अंदाज बरोबर होता. जो दुसऱ्याला आधी बघेल तो यशस्वी होणार याची किक्लाला कल्पना होती.
एक वाजायच्या आसपास ते तिघे निघाले. नखरे करणाऱ्या गुड्डीला मिस्चिफ आणि काण्याने बरोबर घेतले. त्याने किक्लाला पाहिलं आणि आपलं काही खरं नाही असं त्याला जाणवलं. गाडी चालवणं तसं त्याला बोअरिंग होत असे. आता फक्त या किक्लाला गुल्टी देऊन कसं सटकायचं ते तो मनात ठरवू लागला. आणि या कामात उरलेल्या दोघांची मदत होणार नाही याची त्याला खात्री होती. काहीतरी मोठं नुकसान झालेलं असावं असा गुड्डीला आता संशय येऊ लागला. दादा कुठेच दिसत नव्हता.... आणि सूर्याही. त्याचा संशय बरोबर होता. पण त्याला सांगणार कोण ? आता ते जुहूच्या रस्त्याला लागले. तशी किक्ला म्हणाला, " जरा धीरे चलना और सतर्क रहना कही पुलिसकी गाडी दिख रही है क्या देख . " त्यांचा होरा बरोबर होता. पण अजून पोलिस गाडी दिसत नव्हती. साल्यांनी दूर कुठेतरी पार्क केली असणार हे किक्लाच्या लक्षात आलं. गाडीत ठेवलेली पाच मुलांची बर्फातली मुंडकी बर्फाच्या विरधळलेल्या पाण्यात डुंबत होती. गाडीतल्या सिटांच्या पायाशी पाण्याचं तळं जमू लागलं होतं. गुड्डीला अजून गाडीत काय आहे याची कल्पना नव्हती आणि कशासाठी ते जातायत ते त्याला जाणून घ्यायची इच्छा पण नव्हती. नवीन आलेल्या फातिमा नावाच्या डान्सरबरोबर त्याचा रोमान्स चालू होता. त्यातून त्याला जबरदस्तीने उठवून इथे आणलेलं होतं. आता समुद्राचा थंड गार वारा आणि तुरळक पावसाच्या सरी यांमुळे वातावरण थंड आणि मादक झालेलं होतं. आकाशात चंद्र दिसत नव्हता. कदाचित तो ढगांनी झाकला गेला असेल. असो . डावले , नेटके, देखणे , आणि इतर शस्त्रधारी पोलिस किनाऱ्यावरच्या अंधारातून एकेक करीत वाट कापीत होते. लांबून डावलेंना एकमेव बीच हट दिसली. म्हणजे जमिनीवरचा एकत्र झालेला अंधाराचा पुंजका . ती अजून तरी बरीच लांब होती. मग त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांच्यात दोन वेगवेगळे तट पडले. एक तट सरळ बीच हटकडे सरकत होता. दुसरा पलीकडच्या बाजूला जाऊन त्यांना कव्हर करणार होता. त्यांना अगदी लांबून एक कार बीच वर वळलेली दिसली. त्यांनी नेटकेंना दाखवलं. देखणे ज्या गटाबरोबर विरुद्ध दिशेला गेले होते, त्यांना फोन करून कळवलं आणि सावध राहण्यास सांगितलं. किनाऱ्यावरची नारळाची झाडं वाऱ्याबरोबर चांगलीच मस्ती करीत होती. पाऊसही सगळ्यांचीच परीक्षा पाहत होता. वळलेली कार तिथेच थांबली. डावलेंचा गट आता बीचहट जवळ पोहोचला. तशी दहा पंधरा फुटाचं अंतर ठेवून ते चौघे पाच जण नारळांच्या दाट वाढलेल्या झाडांमागे मोर्चे बांधून बसले. ते आणि दुसऱ्या गटाचे सर्वच बीच हटवर नेम धरून बसले. फक्त दुसऱ्या गटाच्या लोकांना लपायला जागा नव्हती. त्यांनी तिथेच असलेल्या एका खडकाच्या आधाराने दबा धरला. दूरवरून किक्ला मिस्चिफ आणि काण्या खाली उतरले. किक्लाने आपली सावध नजर सबंध बीचभर फिरवली. तो पोलिसांचा वास घेत होता. काण्याला त्याने मुंडक्यांचं पार्सल घेण्यास सांगितलं. मग किक्ला पुढे, मध्ये काण्या आणि शेवटी मिस्चिफ अशी रचना करून ते निघाले . संरक्षणासाठी काण्याकडे फक्त धारदार लांबलचक सुरा होता. ते तिघे पावसात भिजत सावकाश चालत निघाले. ते एक दोन पावलं पुढे गेल्यावर किक्लाने गुड्डी जवळ जाऊन त्याला धमकावले, " देख , भागनेका नाटक करेगा ना , तो खडे खडे चीरके तेरे डान्सरके पास भेजूंगा. हम तुम्हे काम पटनेके बाद सिग्नल देंगे समझे ? तबतक सामनेवाले नारियलके पेडके नीचे गाडी खडी रखना. " मग ते निघाले.
अधून मधून ते तिघे दोन्ही पोलिस पार्टीला दिसत होते. चालता चालता ते तिघे समुद्राकडे बघत होते. पण अजून सिग्नल दिसत नव्हता. आत्ता कुठे सव्वा दोन वाजत होते. अजून तीन वाजेपर्यंत वेळ काढणं भाग होतं. बीच हटजवळ न जाण्याचे किक्लाच्या मनात आलं. तिथेच जवळपास पोलिस दबा धरून बसले असण्याची शक्यता होती त्याने मिस्चिफला आहे तिथेच थाबायला सांगितलं. "हम और थोडे आगे जानेके बाद तुम्हे आना है. अब तुम पीछे जाकर दूसरे बाजूसे आगे आना. ताकी पुलिस चकमा खाएगी. " मिस्चिफने तसे केले. लांबून या तिघांना पाहणारे आश्चर्यचकित झाले. काही चाल तर नाही, म्हणून ते स्थिर नजरेने पाहत राहिले. सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावर केंद्रित झाल्याने समुद्रावर दूरवर असलेल्या लाँचचा कमी जास्ती होणारा लाइट त्यांच्या नजरेतून सुटला. किक्लाचा फोन वाजला . अतिशय बारीक आवाजात असलेल्या रिंगटोन मुळे तो वाजल्याचं त्यालाच कळायचं. तो दिवाणजींचा फोन होता. " माल तय्यार है ? " त्याने होकार दिला. "तो लाइट जलाके इशारा क्यूं नही करते.? पुलिस है क्या ? " ...... किक्लाने कंटाळून उत्तर दिले, " तुम मालसे मतलब रखो. तुम हटके बाजूमे किसीकोभी मत भेजना. हम किनारेपे खडे है. तुम सौ गज दूरीपर आनेके बाद तुम्हे मोबाइलका फोकस लाइट दिखेगा. फिर लाइट मत जलाना हम मालका पार्सल फेकेंगे तुम पैसेकी बैग फेकना. ज्यादा होशियारी करनेकी जरुरत नही है. फोकटमे मर जायेगा. "
लाँचचा आवाज येतो हे किक्लाला माहीत होतं. पण दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पोलिसांकडून गोळीबार होणार हे त्याला माहीत होतं. त्यांच्या गोळीबाराला आपल्यापैकी कोणी बळी पडू नये आणि बीचहटमध्ये घेरले जाऊ नये म्हणूनच त्याने बीचहटजवळ जाण्याचे टाळले. मेली तर दिवाणजींची माणसं मरतील. त्याने हळूच मागे पाहिले. मिस्चिफचं हालणारं डोकं तेवढं त्याला दिसलं. शंभर एक फुटांवर वाळूचा लहानसा डोंगर उभा केला होता. त्याच्या आडून मिस्चिफ कव्हर करून बसला होता. पावसाला आता जोर चढला होता. पावसाचा आणि वाऱ्याचा फायदा नक्की कोणाला होणार होता कोण जाणे. बीचवर असलेले सगळेच पावसाच्या माऱ्याला कंटाळले होते.
डावलेंनी त्यांच्या दुसऱ्या गटाला फोन करून लाँचवर लक्ष ठेवण्यास आणि जवळ आल्यावर फायर करण्यास सांगितले होते. कारण लाँचमधले लोक पार्सल घेऊन ताबडतोब निघून जातील. मग त्यांनी किक्ला आणि काण्या यांच्यावर लक्ष केंदित केले. या भडव्यांची काळजी आपण घेऊ. तसंच नेटकेंना लाँचवर लक्ष ठेवून दुसऱ्या गटाला फायरचा हुकूम देण्याचं सांगितलं होतं. हा हरामखोर
पाऊस थांबत का नाही , त्यांच्या मनात आलं. सगळी कडे लक्ष ठेवून कारवाई करणं तितकसं सोपं नव्हतं. आता दूरवर त्यांना लाँच दिसली. अंधुक असा तिच्या इंजिनाचा आवाज ऐकू येऊ लागला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्यांना आत्ताच उडवावं असं त्यांना वाटू लागलं. पण जेवढी जिवंत माणसं सापडतील , तेवढा तपास कार्यात पुरावा मिळेल असं ते समजत असत. असो. आता लाँच सगळ्यांच्याच दृष्टिपथात येऊ लागली.
लाँचवर एकून पाच सहा माणसं होती. तिच्या इंजिनाचा आवाजही स्पष्ट ऐकू येऊ लागला. कुणीतरी फेटेवाला पुढेच उभा होता. पण अजून त्याचा चेहरा दिसत नव्हता. लाँचमधल्या लोकांनीही पिस्तुलं सरसावलेली होती . अचानक पाण्यावर मोठ्या लाटा उसळू लागल्या. समुद्राला काय झालंय कोणालाच कळेना. बऱ्याच अंतरावर दिसणारी लाट अचानक किनाऱ्याजवळ आली. तीनचार फुटांवर आल्यावर किक्लाने अंधारातच दिवाणजींना बॅग फेकायला सांगितली. त्यांनी बॅग फेकली. काण्याने शिताफीने पार्सल लाँचवर फेकले. ते लाँचमधे जाऊन आदळले. . तरंगणाऱ्या बॅगेवर काण्याने झडप घातली. स्वतःकडे खेचली. पण पोलिसांच्या दोन्ही गटांकडून फायरिंग सुरू झालं. शिताफीने लाँच वळली . आणि अंधारात वेगाने पाणी कापीत निघून गेली. पण झालेल्या गोळीबारामुळे लाँचवरचे दोघे जण जखमी झाले. आणि काण्याने खेचलेली
बॅग त्याला लागल्यामुळे पुन्हा पाण्यावर तरंगू लागली. आता किक्ला आणि मिस्चिफ दोघांचाही बेधुंद गोळीबार चालू झाला. दोघेही पोलिसांना घाबरणारे नव्हते. पण ते स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात किनाऱ्यापासून दूर जाऊ लागले. बॅग मात्र तशीच तरंगत राहिली. मागे पाहत गोळीबार करीत दोघेही कसे बसे जिथे ते गाडीने उतरले होते तिथे आले. किक्लाच्या हाताला गोळी लागल्याने तो ओरडू लागला. गुड्डीच्या नावाने तो शिव्या देत होता. त्यांना आता गाडी नक्की कुठे उभी होती. कळेना. पण मोठ्या शिताफीने गुड्डीने गाडी पुढे आणली. कसे बसे ते गाडीत शिरले. शिरले कसले , लुढकले. गाडी वेगाने विरुद्ध दिशेत धावू लागली. तरीही मिस्चिफने फायरिंग चालूच ठेवलं. त्याच्या गोळीबारात एक दोन पोलिस जखमी झाले. डावले पाण्यावर तरंगणाऱ्या बॅगेकडे धावले. त्यात नक्कीच पैसे असणार. त्यांनी बॅग घेतली. उघडली. पण ..... ती रिकामी होती. म्हणजे किशाच्या टोळीला फसवायचा त्यांचा विचार असावा. बहुतेक किशाच्या लोकांना कशाला पैसे द्या ? किंवा किशाने
त्यांना आधीच लुटले असावे, म्हणूनही असेल. मग सगळेच जण गाडीत बसले. प्रथम जखमी पोलिसांची व्यवस्था केली. आणि ते पोलिस स्टेशनकडे निघाले. किक्ला आणि मिस्चिफ दोघेही डिलाइटला पोहोचले , तेव्हा पाच वाजत होते. त्यांनी प्रथम टोळीच्या डॉक्टरला बोलावले. मग बिछान्यावर पडल्या पडल्या किक्लाने गुड्डीला यथेच्छ शिव्या दिल्या. एवढ्या प्रयत्नांचा शेवट काहीही न मिळण्यात झाल्याने त्याला निराश आली. सध्या तरी सूर्याच्या ऑफिसपासून त्यांनी दूर राहण्याचे ठरवले.
*********** *************** ************* **************** ******
सोमवार उजाडला. नवीन मोठी बातमी घेऊन . प्रत्येक पेपराच्या पहिल्या पानावरच गडद मथळ्याखाली श्रीकांत सहकारी बँकेवर पडलेल्या दरोड्याचे तपशीलवार वर्णन आणि ताब्यात घेतलेल्या किशाच्या टोळीतील सगळ्या गुन्हेगारांची नावं आली होती. त्यात काकांचंही नाव होतं. पण त्यांना ओळखणारे फार थोडे होते. तसंही बाकीच्यांना ओळखणारे फार होते असं नाही. पण गुन्हेगारी जगतात ते
प्रसिद्ध असल्याने तिथे त्यांनी खळबळ उडवून दिली. किक्ला, मिस्चिफ , सोल्या आणि काण्या आता सावध झाले होते. आदल्या रात्रीच्या अपयशानंतर त्यांनी नवीन प्लानला सुरुवात केली. त्यात मिस्चिफला मजा वाटेना. दाखवत होता , तेवढा काही किक्ला हुशार नव्हता. दादासारखा तर मुळीच नव्हता, असं त्याची कल्पना झाली. अजून सोल्याला संपर्क होत नव्हता. साधनाला धक्का बसला नाही. पण वाईट वाटलं. तरीही बँकेतले पैसे आता गेल्याने तिला काकांचा राग आला. त्यांनी टोळीचा आश्रय का घेतला तिला समजेना . नरेश गडा कडे तिने त्यांना नक्कीच सांभाळून घेतलं असतं. पण असतं एकेकाचं नशीब . पण आपलं नशीब मात्र बिघडलं असं तिला वाटू लागलं. काका कसे होते याचा तिला अनुभव होता. मात्र पोलिसांना खबर कशी मिळाली याचं तिला आश्चर्य वाटत होतं. सोनाला अर्थातच तिने काही सांगितलं नाही. नाही म्हणायला एक दोन वेळा तिने काकांची आठवण काढली होती. पण दोष मात्र साधनाला दिला होता. मम्मी काहीतरी बोलली असेल म्हणूनच ते आले नाहीत असं तिला वाटत होतं. साठे मामा , कापसे बाई आणि इतर रहिवासी यांना चांगलाच धक्का बसला होता. पण आपण तक्रार केली हे बरं झालं, असं मामांना वाटत राहिलं.ते लहानसहान धागे जोडत राहिले. पोलिसांनी बोलावलं तर त्यांना पूर्ण मदत करण्याची त्यांनी तयारी ठेवली. जाणारा येणारा बँकेच्या सील केलेल्या दरवाज्याकडे पाहू लागला. नीताने मात्र रमेशला ताबडतोब फोन करून सगळी इत्थंभूत माहिती दिली. म्हणजे काकांचं त्याच्या जाण्यानंतरचं वागणं , दोन तीन दिवसांपासून अदृश्य होणं आणि पेपरातली बातमी . आता तिला पक्की खात्री झाली , की काकांना घरी यायला तोंड नाही. म्हणजे त्यांचा मित्र आणि त्याची मुलगी वगैरे सर्व खोटं होतं तर. त्यांना कोणत्याही प्रकारे इथे ठेवून पाठिंबा देणं घातक होतं. श्रेयाच्या दृष्टीनेही ते चांगलं नव्हतं. ती अधून मधून आठवण काढीत होती ,पण नीताने तिला काहीबाही सांगून गप्प बसवली. आणि ते आता कामानिमित्त दुसऱ्या गावी गेले असल्याचे तिने सांगितले. रमेशच्या बिल्डींगमध्ये कोणी चौकशी केली नाही. कारण बहुतेक सगळे नवे होते. रघुमलला मात्र आश्चर्य वाटलं. तसा नीताला काही त्रास झाला नाही. सोमवारी रात्री मात्र एक फोन आला . बोलणारा कोण होता काही कळलं नाही . त्याने फक्त एवढंच विचारलं काकाजी है. ती नाही म्हणाली. इथेच ती चुकली. बोलणाऱ्याला कोण काकाजी असं विचारलं असतं तरी त्याला संबंध जोडता आला नसता. बोलणारा किक्ला होता. आता त्याची खात्री झाली की हा काकांचाच दूरध्वनी आहे. त्याने पत्ता शोधून काढला. त्याचा पुढचा विचार काय असेल ते नीतासारख्या साधारण स्त्रीला काय कळणार ?
इकडे, घरी थोडी फार झोप काढलेल्या डावलेना सकाळी लवकरच पो. स्टेशनला जावं लागलं. डीसीपी गर्दम साहेबांकडे मीटिंग होती. ताराबाई सरडेंची केस फाइल तयार करून खंडागळे, डावले आणि नेटके साहेबांपुढे उभे राहिले. सगळं ऐकून घेतल्यावर आणि चर्चा पूर्ण झाल्यावर गर्दम साहेब म्हणाले, " ठीक आहे, आज रिमांडसाठीचा प्रयत्न करा आणि जरा लक्ष ठेवा. किशाच्या विरोधात असणाऱ्या पेरियरच्या टोळीत काय बदल होतोय आणि किशाची जागा घेणारा कोणी नवीन तयार होतोय की काय तेही पाहा. "
मग डावले न राहवून म्हणाले, " सर त्या कामथेचं काय करायचं? " ...... मग सर म्हणाले, "आधी रिमांड तर मिळवा. आणि त्याला आणखीन सडवा जरा. एकदम त्याच्यावर विश्वास ठेवून कारवाई करू नका. पण तो सांगतोय ते प्रत्यक्ष त्याला बरोबर घेऊन जाऊन तपासून पाहा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ऍप्रूव्हर करायला हरकत नाही, पण सावधानतेने सर्व करा. खंडागळे साहेब तुम्ही पण जरा डावलेना मदत करा. त्यांना थोडी तरी विश्रांतीची गरज आहे. नाहीतर फोर्सवर त्यांच्या तब्येतीची जबाबदारी येईल. आजच्या पेपरात आलेली बातमी पुष्कळच संतुलित होती. मिडियाने प्रथमच पोलिसांवर दोषारोपण केलेलं नाही. डावले साहेबांचं काम ठीक चाललंय. इन्स्पे. श्रीकांतनाही बरोबर घ्या. पण त्यांचं ज्योतिष बरोबर घेऊ नका. "...... सगळेच जण बेताने हसले आणि बाहेर आले. खंडागळे जरा नाराज दिसले. वरिष्ठांनी कनिष्ठांबरोबर काम करायचं मग ह्यांनीही बरोबर यायला हवं, असं त्यांच्या मनात आलं. पण ते काहीच बोलले नाहीत. ते आपल्या केबिन मध्ये गेले..... डावले, नेटके आरोपींना घेऊन कोर्टात गेले. पुढचं सगळं उरकणं भाग होतं. एकदा का श्रीकांत सर आले की जरा तरी विश्रांती मिळेल याची डावलेना खात्री वाटू लागली. काका आणि इतर आरोपी वेगवेगळ्या कारणाने निर्धास्त होते. काका सोडून इतर सगळेच पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असल्याने त्यांना ते सगळं दैनंदिन वातावरण वाटलं. त्यांचा जन्मच मुळी पोलीस, कोर्ट, जेल यासारख्या संस्थांशी निगडित होता. काकांचं तसं नव्हतं. काकांना थोडी आशा होती. पण माफीचा साक्षीदार होणं याची काय प्रक्रिया आहे ते त्यांना माहिती नव्हतं. त्यांना वाटत होतं की आजच्या आजच कोर्ट हे मंजूर करील आणि ते सुटून घरी जातील. पण कोर्टात फक्त,प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार मिळाल्याचा उल्लेख मात्र सरकारी वकिलाने केला होता. परंतु पुढील तपासावर ते नक्की ठरेल असं कोर्टाला मोघम सांगण्यात आलं. अर्थातच नावं सांगीतलं गेलं नाही. पण त्यासाठी पंधरा दिवसाचा रिमांड मात्र मागितला होता. तो कोर्टाने दहा दिवसांचा दिला. आणि नंतर तपासाची गरज पाहून तो वाढवला जाईल असही म्हंटलं. त्यामुळे पोलिसांना बरं वाटल्याचं दिसलं. काकांच्या लक्षात आलं की अजून निदान दहा दिवस तरी सुटका नाही. घरचं कोणीही भेटायला येण्याचा प्रश्नच नव्हता. साधनाचा अधिकृत रित्या संबंध नव्हता आणि नीता संबंध असूनही तो ठेवू इच्छित नव्हती. जगण्याला काही अर्थच नव्हता. सगळा प्रकार साधारणपणे चार वाजेपर्यंत चालला. जेवण खाण मिळालं नाही. मग ते सगळे पो. स्टेशनला पोहोचले. मात्र काकांनी आणखी एक चांगलं काम केलं. रात्री जेवण झाल्यावर ( आता त्यांना ते कदान्न सुद्धा हवं हवंसं वाटू लागलं. भुकेला कोंडा हेच खरं. ) त्यांनी डावले साहेबांची भेट मागितली. पण नेटकेंनी त्यांना काय सांगायचंय ते आपल्यालाच सांगावं असं म्हंटल्याने काका गप्प बसले. ते अर्थातच नेटकेंना आवडलं नाही. पण ते सध्या काहीही बोलले नाही. रात्री दहाच्या सुमारास डावले आले तेव्हा सगळ्यांनाच पुन्हा चार्जरूममध्ये घेण्यात आलं. त्यात काका नव्हते. बाकीच्यांची चौकशी नेटके आणि इतर दोघा तिघांना करावयास सांगून काकांना डावलेंनी बोलावले. तेव्हा काकांनी त्यांना संजीव दीनानाथ जांभळे याच्याबद्दल सांगून किशाचा देशाबाहेर जाण्याच प्लान आणि त्याचा वाळकेश्वरला असलेल्या फ्लॅट संबंधी सांगितले. तेव्हा डावले जरा रागावून म्हणाले, " हप्त्या हप्त्याने माहिती सांगतोस काय ? परिस्थितीचा अंदाज घेतोस आणि मग सांगतोस की काय ? " तेव्हा काका हात जोडून म्हणाले, " तसं नाही सर, पण जेव्हा जे जे आठवतंय ते तस तसं सांगतो. " मग डावले म्हणाले , " साधारण किती पैसे दिले रे तुला ह्या किशाने ? म्हणजे आमचा तपास चुकीच्या मार्गाने होऊन आम्ही गोंधळात पडावं यासाठी " मग मात्र काका पाय धरून म्हणाले, " सर तसं काही नाही, मला खरंच आठवतंय तसं सांगतोय. " ...... थोडावेळ जाऊन देऊन ते म्हणाले, " बरं बरं. समोर त्या खुर्चीवर उभा राहा. मी उतर सांगे पर्यंत. " ते आज्ञाधारकपणे उभे राहिले. आतून होणारा आरडाओरडा ऐकू येत होता. डावले आज जरा विचार करणार होते. हे सगळं श्रीकांत सरांशी चर्चा करून ठरवावं असं त्यांना वाटू लागलं.
डावले साहेब वाचण्यासाठी फाइल काढणार एवढ्यात त्यांचा फोन वाजला. तो खबरीचा फोन होता, "साबजी खबर है, लेकीन पीछे की बक्षिशी बाकी है, वो कब मिलेगी? " डावले वैतागून म्हणाले, " खबर देनी है तो दे, नही तो रह्ने दे. पैसा कही नही जाएगा. जलदी बोल और बंद कर. " ते ऐकून खबरी म्हणाला, " सर किक्ला छूटके आया है और कहां छिपा है इस जानकारी के लिये आप मिलिये. " फोन बंद झाला. " किक्ला "! डावलेंनी स्वतःशी नाव उच्चारलं. मग त्यांना तो आठवला, लाल तात्याचा साथीदार. ते जरा विचलित झाले. हा तर किशाची जागा घेणार नाही ना? मग तर सगळंच वाईट. आपल्याला खबरी कडून त्याच्या बिळाची माहिती करून घेतली पाहिजे. कोणत्या बिळात लपलाय साला, कोणास ठाऊक. तो आणखी कोणाकोणाबरोबर आहे तेही कळलंच पाहिजे. स्वतः जाण्यापेक्षा त्यांनी बेंजामिनला जायला सांगितलं. साडेबारा एकच्या सुमारास सगळ्यांना परत कोठडीत ठेवण्यात आलं. अजूनही काका त्या सगळ्यांमध्येच होते. सूर्याला अधूनमधून ताव येत होता. काका सोडून बाकी सगळेच विव्हळत होते. आज मात्र सूर्या सोडून इतरांकडून बरीच माहिती मिळाली होती. काकांच्या डोळ्यांमध्ये झोप तरळत होती. ते सगळेच मग झोपेच्या आधीन झाले....... सकाळ झाली, पेपरातली बातमी आता शिळी झाली होती. आता या नंतर येणाऱ्या संबंधित बातम्या फार धुरळा उडवणार नाहीत. याची काकांना कल्पना आली. अर्थातच पेपर पाहिला मिळालेला नव्हता........ पण आपलं काय? पुन्हा प्रश्नोत्तरांचा तास मनाने सुरू केला. आजूबाजूला बसलेल्यांशी काही बोलण्याची सोय नव्हती. पोलिसांचं लक्ष खूप होतं. काकांना आपल्याला वेगळं ठेवावं असं वाटत होतं. पण तशी शक्यता कमी होती. नाही म्हणायला एक वेगळीच घटना घडली. परमेश्वराला जुन्या गोष्टी पुनरुज्जीवित करण्यात काहीतरी समाधान मिळत असावं, असं काकांना वाटलं. सकाळी दहाच्या सुमारास इन्स्पे. डावले दुसऱ्या केसेस पाहत होते. तेवढ्यात एका करड्या आवाजाच्या व्यक्तीने त्यांना अभिवादन केले. " गुड मॉर्निंग, डावले साहेब. " असं म्हणत एक कणखर हात डावलेंच्या हातात घुसला. ते होते. एसीपी वागळे. काकांना चेहरा दिसला नाही पण आवाज ओळखीचा वाटला. डावले साहेब उभे राहिले. आणि वागळे साहेबांना बसण्याची खूण करीत बसले. आज तुम्ही इकडे कसे काय, असं विचारणार एवढ्यात वागळेच म्हणाले, " मी उद्या रिटायर होतोय. संध्याकाळी पार्टी ठेवली आहे. तुम्हाला यायचंय आणि श्रीकांतनाही. ते दिसत नाहीत कुठे? " असं म्हंटल्यावर डावले एका केस मध्ये फार व्यग्र असल्याचे म्हणाले. मग त्यांनी वागळे सरांना किशाच्या केसचा तपशील सांगितला. त्यावर थोडं इकडचं तिकडचं बोलणं झालं. तरीही वागळे सरांनी त्यांना पार्टीला येण्याचा आग्रह केला. आणि खातं कसं आपल्या बाबतीत दुर्लक्ष करतं हे त्यांनी डावलेना सांगितलं. नाहीतर त्यांना पुढची बढती केव्हाच मिळाली असती. आणि आहे त्या पदावर निवृत्त व्हावं लागलं नसतं. तेवढ्यात फोन आला. तो गर्दम साहेबांचा होता. " डावले, त्या ऍप्रुव्हरचं नाव काय म्हणालात? " डावले म्हणाले, " रामचंद्र भास्कर कामथे " त्यावर साहेब म्हणाले, " ठीक आहे त्याला घेऊन जाऊन तपासाचे धागे नीट जुळवा म्हणजे लवकर काम होईल. आत्ताच कमिशनर साहेबांचा फोन आलाय त्यांनी दोन तीन केसेस मध्ये लवकर कारवाई करायला सांगितली आहे. बँकेवर खातेदारांनी पैशासाठी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यात पोलिसांचा तपास पूर्ण झाला की नाही ते लागेल. "... डावले येस सर म्हणाले. फोन बंद झाला. पण वागळे म्हणाले, " हा कामथे आरोपी आहे, त्याला मी चांगलाच ओळखतो. कुठे आहे तो? बोलवा. " डावलेना आश्चर्य वाटलं. पण त्यांनी काकांना बोलवून घेतलं. (अंग दुखत असल्याने )कसे तरी उभे राहत काका आले. त्यांना पाहून वागळे कडकपणे म्हणाले, " काय रे चार वर्ष आत जाऊन आलास तरी अजून तुझे धंदे चालूच आहेत? " मग डावलेंकडे वळून ते म्हणाले, " याला मी चांगलाच ओळखतो. याच्या नम्र बोलण्यावर जाऊ नका. सावध राहा. " मग डावलेंनी काकांना घेऊन जाण्यास सांगितले. काकांना घरी आलेल्या रेडची आठवण झाली. हेच वागळे घरी आले होते. आणि नाही नाही ते बोलले होते. काकांची उरली सुरली आशा संपली. आता काय कपाळ सुटका होणार? ते डोक्याला हात लावून बसून राहिले. थोड्या वेळाने वागळे गेले. अजूनही बाकीचे सगळे लोळत पडले होते. काकांनी कोणाचही लक्ष नाही असं पाहून लपवलेला मोबाइल काढला आणि चालू केला. पाच सहा मेसेजेस तरी होते. एक दोन साधनाचे , एक दोन नीताचे एक दोन संजीव जांभळेचे होते. आणि एक गुड्डीचा पण होता. त्यांनी मेसेज वाचला आणि काढून टाकला. काका कुठे आहेत हे त्याने विचारले होते. बहुतेक मेसेज बातमी पेपरात यायच्या आधीचा असावा. त्यांनी परत फोन बंद करून ठेवला. एका लहानश्या उंदराच्या बिळात ते मोबाइल ठेवीत होते. दिवस कसातरी जात होता. बारा वाजून गेले होते. थोड्याच वेळात श्रीकांत सर आले आणि डावलेना आनंद झालेला दिसला. इकडची तिकडची खुशाली झाल्यावर डावले म्हणाले, " मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय पण आपण जेवायला जाऊ तेव्हा बोलू..... " एवढ्यात आरोपींसाठी जेवण आलं. काकांना आश्चर्य वाटलं. आता कुठे साडेबारा होत होते. आता कुठे कोठडीतले सगळे उठले होते. जेवणाची ताटं उठताक्षणीच पाहता त्यांनाही जरा आश्चर्य वाटलेले दिसले. एक वाजेपर्यंत त्यांची जेवणं झाली. सूर्या अजून विचारात होता. तेवढ्यात नेटके कोठडीत डोकावून काकांना म्हणाले, " भरपूर जेवून घे. रात्री तुला आत घ्यायचंय. " ते ऐकून बाकीच्यांना बरं वाटलं. मग ते सूर्याकडे वळून म्हणाले, " फार जोर आहे नाही तुझ्यात? काय रे ए पाटील. साला पाटीलचा कटील झालास काय? तुला काय वाटलं आम्ही विसरू? पण तुझ्या सारख्यांची जन्मकुंडली असते आमच्याकडे. भेटू रात्री. " मग ते गेले. थोड्या वेळात श्रीकांत आणि डावले पण बाहेर गेले. एवढ्या मरम्मत झालेल्या शरीराने पण अकडा आणि राजासाब आगपेटीच्या काड्यांचा जुगार खेळत होते. कसं ते त्यांनाच माहीत. ती त्यांची वेळ घालवण्याची नेहमीची पद्धत असावी. ते पाहून सूर्या करवादला, " ए बंद कर दे यार...... " त्यावर अकडा म्हणाला " ये तेरा हापिस नही सरकारी जेल है. चूप कर भोसडीके. तेरी वजहसे सब हुवा है. " हे ऐकल्यावर सूर्या उठला आणि आपला दुखरा हात सांभाळीत त्याने अकड्याला एक कानफटात मारली. " त्या बरोबर बाहेर उभा असलेला हवालदार ओरडला, " चुप बसा ए *****नो, लाथ घालू का एकेकाच्या **वर? " मग ते थांबले.
अजूनही पोलिसांना किशाच्या वाळकेश्वरच्या फ्लॅटचा पत्ता मिळालेला नव्हता. आणि इतरही माहिती अर्धवट होती. रात्र झाली. काहीच वेगळं घडत नव्हतं. पोलिस स्टेशनातलं रूटीन चालू होतं. डावले जेवून आले होते. त्यांना श्रीकांतसरांनी बरीच माहिती दिली होती. केसकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी सांगितला होता. हळू हळू रात्रीचे दहा वाजत आले. बहुतेक जण आता पेंगायला लागले होते. राजासाब, अकडा आणि इतर जुगार खेळण्यात मग्न होते. काकांना झोप येत होती. तेवढ्यात नेटके आणि
देखणे आत आले आणि जुगार खेळणाऱ्यांना बेदम मारहाण करू लागले. " तुम्हाला काय तुमचा अड्डा वाटला का रे? मग पुन्हा काकांना सोडून बाकीच्यांना चार्जरूममध्ये घेऊन गेले. दहा पंधरा मिनिटातच त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. विशेषतः सूर्याच्या. त्याला उलटा टांगून त्याची मरम्म्त चालू होती. त्याच्याकडून त्यांना वाळकेश्वरच्या फ्लॅटचा पत्ता पाहिजे होता. बाकीच्याकडून सोल्या, डॉक्टर, गुड्डी, मिस्चिफ यांचे
पत्ते तर मिळाले. सूर्याला मारता मारता नेटके म्हणाले, " चल, तुला नाही ना सांगायचं, नको सांगूस. पण या तुझ्या पायाला काय झालंय रे? कोणी सोलला होता का जळला होता.? " सूर्याने त्यावर उत्तर न दिल्याने त्याला परत मारायला सुरुवात केली. एकीकडे त्यांची बडबड चालली होती. " साला तू पाटील ना रे? मग कधीपासून कटील झालास? शाळेत तरी गेला होतास का? वकील झालास? हरामखोर लेकाचा
दुनियेला फसवशील रे पण आम्हाला नाही. " शेवटी कंटाळून वाळकेश्वरच्या फ्लॅटचा अर्धवट पत्त्ता त्याने सांगितला. तशी नेटके म्हणाले, " अरे वा सुधारलास की तू. आता सगळंच सांग की भाड्या " पण सूर्यापेक्षा नेटके दमल्यामुळे त्यांनी आजच्यापुरता नाद सोडला. मग त्याला आणि इतरांना बाहेर काढून कोठडीत डांबीत म्हणाले, " स्साला तुमची मरम्म्त केली की परत जेवायची गरज भासते. तुझा बाप पैसे देणार का रे ए
पाटला? " असे म्हणून त्याला त्यांनी लाथ मारली. मग काकांना बाहेर बोलावले.. थरथरणाऱ्या काकांचे डोळे भीतीमुळे मोठे झाले. डावले म्हणाले, " हे बघ उद्यापासून तू आमच्या बरोबर यायचं आणि जे बोललास ते सगळं दाखवायचं. खोटं निघालं ना तर पाटीलची अवस्था जी झाली, ती तुझी करू. मग तू काढशील उरलेलं आयुष्य जेलमधे. "... त्यावर काका अजिजीने म्हणाले, " नाही सर, मी नक्की सगळं सांगीन आणि दाखवेन सुद्धा. "
........... .................. ................. ................ ................... ......................
साधनाने बँकेकडे इतर खातेदारांबरोबर स्वतःचे पैसेही मागितले. मग सगळ्यांनी मिळून बँकेवर केस केली. न्याय मिळायला बराच वेळ लागेल याची तिला कल्पना होती. काकांच्या एकूण वागण्याचा ती विचार करीत होती. पहिल्यापासूनच ते किशाच्या टोळीत सामील झालेले होते. दरोड्याचीही त्यांना कल्पना होतीच. म्हणून तर ते पळून जाण्याची भाषा करीत होते. बरं झालं असली
काही अवचट कृती त्यांच्या नादी लागून आपण केली नाही ते. त्यांना भेटायला जाण्याचा प्रश्नच नव्हता. पेपरातली बातमी सोनाने कधी वाचली कुणास ठाऊक. पण ती त्यांना निरपराध समजत होती. ते नक्की घरी परत येतील याची तिला खात्री होती. पण काका माफीचा साक्षीदार का होत नाहीत याचं साधनाला आश्चर्य वाटलं होतं. पेपरातल्या बातमी प्रमाणे प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती पोलिसांना सापडली होती. मग ती कोण होती? याचा तिला प्रश्न पडला होता. खरंतर काका असायला हवे होते. किंवा हा पोलिसांचा गुगली असावा. कोणावरही भरवसा ठेवणं कठीण होतं. साधनाला आता अधांतरी वाटत होतं. काकांना भेटायला जायला हवं हे एकदा तिच्या मनात येऊन गेलं. पण "एकदाच". मन तिला बहकवू लागलं. काय हरकत आहे गेलीस तर. सोनालासुद्धा ते निरपराध वाटतात. तू ते निरपराध असल्याचं समजून का नाही विचार करीत? हळू हळू विचार प्रबळ होऊ लागला. पण त्यांना भेटायला न जाण्याचं तिने ठामपणे ठरवलं. अगदी सोना हट्टाला पेटली तरी. कशीतरी ती
ऑफिसमधलं काम उरकत होती. दुपारचे चार वाजत होते. तिचा कामात मूड लागेना म्हणून तिने गडाची परवानगी घेऊन लवकर घरी जाण्याचं ठरवलं.......... आणि ती निघाली. तसं घरी जाऊन काही काम होतं असंही नव्हतं. तिने सोनासाठी काहीतरी नवीन बनवायचं म्हणून वेगवेगळ्या गोष्टी विकत घेतल्या. आपले सुरक्षित ठेवलेले पैसे आता गेले असल्याचे तिच्या लक्षात आलं. सुरुवातीला तिला त्याचं काही वाटलं नाही. पण आता तिला भविष्याची काळजी वाटू लागली. तिला हे नुकसान काकांमुळेच झालं असं मन सांगू लागलं. निराश मन:स्थितीत तिला ते खरं वाटू लागलं. ती घरात शिरली आणि सोनाने तिला विचारले, " काय म्हणाले काका? केव्हा येतील? " तिला साधना त्यांना भेटून आली असच वाटत होतं. मग साधनाने उत्तर न देता नवीन पदार्थ करण्याची तयारी करीत म्हंटले, " अगं आज ना मी एक वेगळीच रेसिपी वाचल्ये ती करणार आहे. बघ तुला आवडते का. " तिने काकांचा विषय टाळला. पण सोना तशी सोडणार नव्हती. ती चिडून म्हणाली, " आधी हे सांग तू काकांना भेटायला गेली होतीस का नाही? " .......... आता मात्र साधना तुटकपणे म्हणाली, " नाही. मला नाही वाटत त्यांना भेटावं. आपण त्यांना विसरावं हे बरं. ते नव्हते तेव्हा राहत होतो ना आपण? " तिचा तुटकपणा पाहून सोना स्वतःच्या खोलीत जाऊन दार बंद करून झोपून राहिली. तिला मात्र काकांचा चांगलेपणा आठवत होता. वडिलासारखी पुरूष व्यक्ती तिला हवी हवीशी वाटत होती. मम्मीला काय माहीत आहे? ती स्वतः शी म्हणाली. दोघीच जणींमध्ये घरात काय मजा येणार? इतर मित्र मैत्रिणींचे बाबा त्यांना शाळेतून घेऊन जात असत. किंवा निदान ते शाळेत त्यांना सोडायला तरी जात असत. आपण एकट्याच शाळेत जातो आणि येतो. आता ती मोठी होत होती. तिला आपल्याला वडील नसल्याचं जाणवत होतं. वडलांच्या अस्तित्वात ती काकांना पाहत होती. तसं तिची आणि काकांची ओळख फार जुनी नव्हती. पण प्रेम लागायला काही दिवसही पुरे होतात. याचा विचार साधनाने केला नाही. सोनाने त्यांना सहजपणे विसरावं असं तिला वाटत होतं. पण लहान मुलांना त्यांच्या भावविश्वातून एकदम कोणालाही काढून टाकायला किंवा सामावून घ्यायला जमत नाही. ती त्यांना चिकटून होती. तिला त्यांचा स्वभाव आणि तेही आवडले होते. नेहमी मायेने वागणारे ते तिच्या मनातून जायला तयार होईनात. साधनाने तिला आवडणारा पदार्थ तयार तर केला. साधारण तास दीड तास त्यात गेला. मग तिने तिला समजावण्याचे ठरवले. ती दरवाज्या उघडून आत आली. आणि सोनाच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. तिचा हात झिडकारून सोना म्हणाली, " चल ना मम्मी आपण काकांना भेटून येऊ. ते खूप चांगले आहेत ग. " ..... ती ऐकत नाही असे पाहून साधना म्हणाली, " ते नक्की कुठे आहेत हे माहीत नाही. ते आधी पाहावं लागेल. मग जाऊ केव्हातरी. आणि हो कदाचित त्यांच्या सुनेला माहीत असेल, पण माझ्याजवळ तिचा नंबरही नाही आणि पत्ताही. फक्त नाव आहे. त्याचा फारसा उपयोग होणार नाही. " तिला वाटलं सोना थांबेल. पण तिने वेगळाच पवित्रा घेतला. अगं आपण त्यांच्या ऑफिसमधून चौकशी करून पाहूया ना. "...... आता मात्र साधना वैतागली. " हे बघ सोना जर आपल्याला कोणाकडून त्यांचा राहण्याचा पत्ता मिळाला तर आपण नक्कीच जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू शकतो. आता तू जेवून घे बरं. " ती उठली. पण सोना तिच्या मागे जायला तयार होईना. तिला समजावून सांगणं कठीण आहे लक्षात येऊन तिने दोघींची ताटं वाढली. आणि ती स्वतः जेवायला बसली. थोड्यावेळाने सोनापण आली. जास्त संवाद न होता त्यांची जेवणं झाली. खरंतर काहीच घडत नव्हतं.
साधनाला माहीत होतं जे घडायचं ते घडून गेलेलं आहे. आता फक्त परिणाम पाहायचं तिच्या हाती होतं. तेही ती विसरली असती. पण तिचे पैसे अडकले होते. ज्या ज्या वेळी तिला आपल्या पैशांची आठवण होईल त्या त्या वेळी तिला काकांची आठवण होणारच होती. फार विचार न करता तिने झोपण्याची तयारी केली. तेवढ्यात सोना आली आणि म्हणाली, " मम्मी, पेपरात बातमी आली होती
म्हणजे काकांना कोणत्या पोलिस स्टेशन मध्ये ठेवलेलं आहे ते कळेल ना. थांब मी पेपर आणते. " ती पेपर आणायला गेली. मग मात्र साधना ओरडली, " काय चाललंय तुझं, आपल्याला काही करायचंय, त्यांना कुठे ठेवलंय ते शोधून. तुला माहीत आहे, पोलिस फार विचित्र असतात. ते विचारायला गेलं तर आपल्यालाच पकडतील. " सोनाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, " जाऊ दे चल. तुला काका नकोच आहेत. " आणि ती झोपायला गेली. मात्र मनोमन स्वतःच जाऊन काकांना शोधण्याचा तिने निर्धार केला. रात्र चुळबुळत गेली. सकाळी दोघी उठल्या. सोनाने कोणताही हट्ट न करता शाळेची तयारी केली. त्या दोघी शाळेत जाण्यासाठी निघणार एवढ्यात बेल वाजली. साधनाने दरवाज्या उघडला. दारात साठे मामा होते. तिला का कोण जाणे हा माणूस आवडत नसे. ते बऱ्याच लोकांना आवडत नव्हते तसंच तिलाही. आपण तर सोसायटीचे पैसे वेळेवर दिलेत. मग हे कशाला आलेत. ते आत येत म्हणाले, " मेहता मॅडम, मी सोसायटीच्या कामासाठी आलो नाही. पण आपल्या सगळ्यांचेच पैसे बँकेत अडकलेत त्या बाबत तुमची एका अर्जावर सही हवी होती. कोर्टाला तो सादर करायचाय. त्यांनी कागद पुढे केला. साधनाने न वाचताच सही केली. तेव्हा ते म्हणाले, " कशाबद्दल ते नाही विचारलंत? अशी न वाचता सही करत जाऊ नका. " त्यावर ती म्हणाली, "तुम्ही लिहिलंय ना मग तुम्ही थाडेच फसवणार आहात? मला सध्या वेळही नाही. " .... त्यावर साठे म्हणाले, " एक विचारू का? असं म्हणून तिच्या रुकाराची वाट न पाहता ते म्हणाले, " तुमच्याकडे गेले काही दिवस एक गृहस्थ येत असत त्यांचं काय नाव हो? " त्यांना एक दोन वेळा दरोडा पडण्याच्या आदल्या रात्री सरडे बाईंच्या दरवाज्याकडे बराच वेळ पाहताना पाहिलंय म्हणून विचारलं. " आता मात्र ते काकांबद्दल विचारीत होते हे तिला कळलं. पण आपण त्या गावचेच नाही, असं दाखवून ती म्हणाली, " मामा, येणारा माणूस इथून बाहेर पडल्यावर कुठे पाहत बसतो हे पाहण्या इतका मला वेळ नाही. निघा तुम्ही. मला हिला शाळेत पोहोचवायचंय. " असं म्हंटल्यावर मामा
निघाले. पण त्यांच्या डोक्यातला वळवळणारा किडा थांबला नाही. काहीतरी त्या माणसाचा संबंध आहे. तो माणूस हिच्याकडे बऱ्याच वेळा आलेला त्यांनी पाहिलेला होता. ते निघून गेले. मग साधना सोनाला शाळेत सोडण्यासाठी निघाली. तिला बसमध्ये बसवून ती घरी परत आली. खरच काकांना शोधलं तर काय हरकत आहे, असं तिला वाटू लागलं, वातमी वरून तरी ते लॅमिंगटन रोड पो. स्टेशनाच्या ताब्यात असावेत असं तिला वाटलं .
दहा दिवसांचा रिमांड असल्याने आजकाल रात्री सगळ्यांना आत घेत असत. आणि काकांना मात्र दिवसभर भटकवीत असत. ते पहिल्यापासून जसं आठवेल तसं दाखवीत होते. त्यांनी मुंब्रा येथील जवाबी चाचाची जागा पण दाखवली. आता फक्त त्यांना सापळा रचून उरलेल्या सगळ्यांना पकडण्याच ठरलं होतं. काकांनासुद्धा पोलिसांबरोबर भटकणं एवढं सोपं जात नव्हतं. पण आता त्यांची पोलिसांशी चांगलीच दोस्ती झाली होती. जेवणामध्ये आता हळू हळू फरक पडत होता. मग एक दिवस त्यांनी उरलेल्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र त्याचा तपशील काकांना सांगण्यात आला नाही. आता फक्त तो पूर्णत्वास नेणं बाकी होतं. पोलीस आता निमित्त पाहतं होते. आणि त्यांना ते लवकरच सापडलं. दहा दिवसांचा रिमांड पुन्हा वाढवून मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे जे करायचं ते लवकर करावं लागणार असा अलिखित दबाव पोलिसांवर होता. पण ते आपल्या कामात निष्णात होते. अचानक एक दिवस किक्ला, सोल्या, गुड्डी,
मिस्चिफ यांच्या एका मीटिंगची खबर पोलिसांना लागली. काकांबद्दल कमिशनर साहेबांकडे मीटिंगही झाली. आणि आता जवळजवळ पक्कं ठरलं की काका हे माफीचे साक्षीदार होतील. रोज या केसवर डावले साहेब आणि त्यांच्या ग्रुपच्या मीटिंगा खंडागळे साहेबांकडे होऊ लागल्या.
अजूनही काकांना त्याच कोठडीत ठेवलं जात होतं........
.
एक दिवस नीताला रमेशचा फोन आला की तो काही दिवसांसाठी घरी येणार होता. आता तिला काकांच्या बाबतीत काय ते कायमचं ठरवता येणार होतं. पेपरात आता बातम्या येणं बंद झालं. तसंही नीताला आजूबाजूची माणसं नवीन असल्याने कोणीच काही विचारलं नाही. आणि अचानक निलूचा फोन आला की ती इतक्या वर्षांनी येणार आहे. नीताला समजेना काय प्रतिक्रिया द्यावी.
(क्र म शः )
ब्रेकीन्ग न्युज......, कामथे
ब्रेकीन्ग न्युज......, कामथे काकाना पुन्हा एकदा जिवनदान मिळेल का....?? पोलिसापासुन पुन्हा त्यान्ची सुटका होइल का...?? सुटका झालीच तर त्यान्च्या घरचे त्याना माफ करतील का...?? का निलु, काकाची एकमेव मुलगी, हिच्यामुळे काही चित्र पालटेल का...?? उत्सुक्ता शिगेला....!!! नविन भागाच्या प्रतिक्षेत....!!!
१६वा भागही लगेच टाकल्याबद्दल
१६वा भागही लगेच टाकल्याबद्दल खुप खुप धंन्यवाद
उत्सुक्ता शिगेला...नविन
उत्सुक्ता शिगेला...नविन भागाच्या प्रतिक्षेत....!
मस्त.. नेहमीप्रमाणे.
मस्त.. नेहमीप्रमाणे.
मस्त भाग. मला वाटलेले काहीतरी
मस्त भाग.
मला वाटलेले काहीतरी मिरॅकल होवून काका सही सलामत बाहेर पडणार, पण हे पुन्हा अडकले
मस्त नेहमीप्रमाणे. सनसनाटी
मस्त नेहमीप्रमाणे.
सनसनाटी भाग चालु आहे ... नविन भागाच्या प्रतिक्षेत....
मस्त
मस्त
एखादी कथा सुरु करून वाचकांची
एखादी कथा सुरु करून वाचकांची उत्सुकता मरेस्तोवर न ताणता कशी भराभर पुढे न्यावी ह्याचा बेंचमार्क सेट केलायत तुम्ही!
ह्यबद्दल विशेष अभिनंदन!
(No subject)
Kupe chan katta aahe
Kupe chan katta aahe manapasun aavadli.
भानुला अनुमोदन पु.ले.शु.
भानुला अनुमोदन
पु.ले.शु.
प्रतिसादाबद्दल सर्वांचेच
प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार. ही कादंबरी तयारच असल्याने मला लवकर लवकर पाठवता आली. मूलतः मी जेव्हा ती लिहिली तेव्हा मलाही उशिर होत असे. पण कथानक चांगले असल्याने वाचकांनी मला सांभाळून घेतले. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. असो. आजच सतरावा भागहि रात्रीच पाठवलेला आहे. त्याचाही आस्वाद घ्यावा ही विनंती. आपण आणि इतर सर्वांनी कथानकात एवढा इंटरेस्ट दाखवला त्याबद्दल आभारी आहे.