आमचे ज्येष्ठ स्नेही अशोकराव पाटील जेव्हा जीएंवर लिहितात तेव्हा ती माझ्यासाठी महत्त्वाची घटना असते. याची काही कारणे आहेत. ते फार कमी लिहितात त्यामुळे त्यांनी एखाद्या विषयावर सविस्तर लिहिणे हेच मुळी दुर्मिळ असते. माझ्यासारख्या वाचकांना त्यांचे लेखन ही एक पर्वणी असल्याने आम्ही अधुनमधुन त्यांना लिहिण्याचा आग्रह करत असतो. मात्र जीएं वर अशोकरावांनी लिहिणे याला फार वेगळे महत्त्व आहे. सर्वप्रथम म्हणजे अगदी कोपर्यात राहणार्या, आपले एकटेपण कटाक्षाने जपणार्या जीएंचा सहवास अशोकरावांना लाभला आहे. जीएंबरोबर त्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. पत्र व्यवहार झाला आहे. दुसरे म्हणजे जीएंचे इंग्रजी वाचन अफाट होते. अशोकरावांचाही इंग्रजी साहित्याचा रसिक व्यासंग आहे. त्यामुळे जीएंच्या लेखनात पाश्चात्य साहित्याच्या पाऊलखुणा कुठे आढळतात याचा अचुक मागोवा ते घेऊ शकतात आणि माझ्यासारख्यांचे बरेच शिक्षण घडते. जीएंशी असलेला स्नेह, त्यांच्या साहित्याचे सतत वाचन, मनन आणि चितंन, त्याचबरोबर पाश्चात्य साहित्याचा अभ्यास या त्रिवेणीतुन घडलेला अशोकरावांचा लेख शेलॉटवर काही नवीन प्रकाश टाकणार अशी जर अपेक्षा कुणी ठेवत असेल तर ती गैरवाजवी म्हणता येणार नाही. आणि अशोकरावांनी ती अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण केली आहे असे मला वाटते. लॉर्ड टेनिसनच्या "द लेडी ऑफ शेलॉट" या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेवर काही प्रमाणात आधारलेल्या पारवा कथासंग्रहातील आपल्या कथेला "शेलॉट" हे नाव देऊन जीएंनी याचा स्रोत काय आहे याबद्दल कसलिही संदिग्धता ठेवलेली नाही. अशोकरावांनी हाच धागा पकडुन आपल्या लेखाची सुरुवात केली आहे. लेखाच्या सुरुवातीला त्यांनी टेनिसनच्या मूळ काव्याची सफर त्याच्या इतिहास भूगोलासकट वाचकाला घडवुन त्यातील महत्वाचे तपशील सांगितले आहेत जेणेकरुन वाचकाला अलगदपणे जीएंच्या कथाविश्वात उतरता यावे.
एकाकीपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास अंत होईल असा दुर्दैवी शाप असलेली युवती शेवटी प्रेमात पडते आणि तिचे हृदय ज्याने हरण केले अशा उमद्या सरदाराला पाहण्याचा तिला मोह होतो. शापात सांगितलेल्या अटीचा भंग होण्याची वेळ येते आणि तिचा अंत होतो. नियतीने काहीतरी पदरात टाकले आहे. त्याचा मर्यादा अवघ्या आयुष्याला पडल्या आहेत. त्यातुन बाहेर पडायचं आहे. मात्र बाहेर पडण्यासाठी जे पहिलं पाऊल उचललं जाणार आहे तोच क्षण जीवनाचा अंतिम क्षण असणार आहे. हे गारुड जेव्हा आपण या कवितेत पाहतो तेव्हा जीएं नीटपणे माहित असलेल्या वाचकांना या कवितेचे जीएंना आकर्षण का वाटले असावे याचा अंदाज नक्की येऊ शकतो. अशोकरावांनी अचूकपणे नेमके याच मर्मावर बोट ठेवले आहे. जीएंच्या शेलॉटबद्दल लिहिताना हाच धागा पकडुन अशोकराव लिहितात "जीवन तर हवेच पण ते आरशातील प्रतिबिंबापुरतेच मर्यादित ठेवण्याची जीवघेणी अट". पुढे अशोकरावांनी जीएंच्या याच मार्गावरील काही कथांची उदाहरणे देखिल दिली आहेत. नियतीने कपाळावर लिहिलेले अटळ भोग भोगणारी माणसे. त्यावर भाष्य करताना अशोकराव टेनिसनची कविता पार्श्वभूमी म्हणुन वापरतात. किंबहुना अशोकरावांनी टेनिसनच्या कवितेच्या भिंगातुन जीएंच्या शेलॉटचे दर्शन वाचकाला घडवले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आणि त्यामुळे मला हा लेख अतिशय उद्बोधक तर खराच पण अत्यंत आकर्षक व श्रीमंत झाला आहे असे वाटते. दोन पूर्णपणे भिन्न संस्कृतीतील कलाकृती, त्यात नुसत्या संस्कृतीचेच नव्हे तर काळाचेही अंतर पडलेले, त्यातील व्यक्तिरेखाही अगदीच वेगळ्या आणि तरीही तीत वावरणार्या माणसांच्या दु:खात असलेले विलक्षम साम्य. जणुकाही वसुधैवकुटुंबकम या संकल्पनेतील हे विश्वची माझे घर वाटायला लावणारी दु:ख ही एक अशी गोष्ट असावी जी सर्व ठिकाणी, सर्व काळात तेवढ्याच प्रभावाने वावरत असावी. ज्यामुळे काळाचा कुठलाही कप्पा उघडुन पहा, बाकी काही ओळखिचे असेल नसेल पण नियतीचे भोग आणि त्यामुळे होणारी परवड सगळीकडेच आहे. मग ती लॉर्ड टेनिसनच्या शेलॉटमधील लेडीच्या वाट्याला आलेली असो कि जीएंच्या शेलॉटमधील काशीच्या वाट्याला आलेली असो.
अशोकरावांच्या लेखात जीएंच्या शेलॉटचे विचेचन आहे ते अशा तर्हेचे. जे मला भावले आहे. मात्र याव्यतिरिक्त काही मुद्दे मला जीएंच्या कथेची चर्चा करताना या लेखाच्या अनुषंगाने मांडावेसे वाटतात जे अशोकरावांना अस्थानी वाटणार नाहीत अशी आशा आहे. पहिला मुद्दा हा कि शेलॉटमधल्या काशी सारख्या व्यक्तीरेखा किंवा बापु काळुसकरसारखी माणसे ही कुठल्याशा शारिरीक व्यंगाने पछाडलेली किंवा गुन्ह्याच्या सावलीखाली जगणारी आहेत. ती नियतीचे भोग भोगताहेत यात नवल नाहीच. पण लौकिकार्थाने यशस्वी असलेले जीएंचे कथानायकदेखिल हे भोग, ही वेदना भोगत असतात. पारध मधला वकिल दादासाहेब किंवा पडदा मधला प्रिंसिपॉल ठकार हे अयशस्वी नाहीत. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यावर कसलाही डाग नाही. पुरुष कथेतला प्राध्यापक निकम तर गरीबी, मानहानी सारे सोसून पुढे आला आहे. ही सर्व माणसे समर्थ आहेत. आपापल्या आयुष्यात यशस्वी आहेत. पण तरीही शेलॉटचा शाप त्यांनाही आहे. पुढे जीएंच्या कथेने पूर्णपणे रुपककथेचे वळण घेतले. रमलखुणामध्ये तिचे विकसित स्वरुप दिसून आले. त्यातील नायक तर कुठल्याही अर्थाने हतबल नाही. आणि त्याला समाजाची, पापपुण्य अशा संकल्पनाची भीती किंवा दडपणही नाही. आयुष्यातील उपभोग त्याला हवे आहेत.आणि ते मिळवण्यात तो यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होते देखिल.पण तेथेही नियती या नायकाची पाठ सोडत नाही. इस्किलारमध्ये नायकाच्या समोर "सेरेपी इस्कहार एली" या शब्दाने भीषण भवितव्य समोर उभे राहते आणि तो दिग्मुढ होतो. तर प्रवासीतल्या नायकाला शेवटी झालेला सत्याचा साक्षात्कारच त्याचा तुरुंग बनतो. जीएंच्या कथासृष्टीतल्या माणसांवर ही सावली सतत पडलेली दिसते. कधी तिचे स्वरुप कुरतडणारे वाटते तर कधी भीषण. मात्र जीएंच्या कथेत या स्वरुपातील नियती हीच खरी नायिका असते अशी माझी समजूत आहे.
दुसरा मुद्दा हा कि अनेकदा असे वाटते कि टेनिसनची लेडी निदान सुंदर तरी होती. कुणास ठावुक, तिच्या मनात स्वतःविषयी कसलाही गंड नसेल. तिचा भवताल देखिल शांत, सुरेख असेल. छोटेसे बेट, बाजुने वाहणारी नदी असले मन शमवणारे दृश्य तिच्या समोर असेल. सर्व तर्हेची भरभराट असलेल्या माणसाला दु:ख असले तरी त्याची टोचणी कमी करणारी साधनेही जवळपास असतात असा एक विचार माझ्या मनात नेहेमी येतो. हे खरे नसेलही पण डोक्यावर असलेले ओझे कधीही फेकुन देता येईल ही भावना आणि मरेपर्यंत यातुन सुटका नाही या भावनेतुन येणार्या दु:खाची तीव्रताही वेगळीच असे वाटत राहते. येथे जीएंच्या कथेतील पात्रांना कसलाही विंडफॉल मिळत नाही. कसलिही सवलत त्यांना नसते. शारिरीक कुरुपता, मानसिक अपमान, हातुन घडलेल्या गुन्ह्यामुळे सतत शरमेने जळत असलेले मन, वाट्याला सतत येत असलेली वंचना आणि त्यातच भरीस भर म्हणुनच कि काय आसमंत देखिल तसाच उदासवाणा आणि त्यापासुन दूर जाण्याची शक्यता नाही आणि ऐपतदेखिल नाही. आसमंताला गडत गहिरं करीत आपल्या पात्रांची मनस्थिती रेखाटणे हे तर जीएंचे फार मोठे वैशिष्ट्य. त्यामुळे कथेचा बाज जरी टेनिसनच्या शेलॉटचा असला तरी पारवातली शेलॉट ही अस्सल जीएंच्या मुशीत घडलेली आहे. टेनिसनच्या लेडीला मृत्युमुळे सुटका आहे. जीएंच्या काशीला तो मार्ग नाही. मरेपर्यंत आपल्या कुरुप पायांमुळे तिच्या आयुष्यावर तिच्या भयंकर बापाची गिधाडछाया पडणार आहे. जीएंच्या कथेतील ही करामत पाहिली की त्यांच्या कथा वाचताना श्वास जड होऊन दम का लागु लागतो हे लक्षात येते. कुठेही जा, काहीही करा, सुट्का नाही. नियती समोर येऊन उभी ठाकणार आहे.
शेवटचा मुद्दा मला आपल्या परंपरेतील उ:शापाशी जोडावासा वाटतो. मिळालेल्या आयुष्याचं इतकं ओझं व्हावं कि शापाने येणारा मृत्युसुद्धा दाहक न वाटता उ:शापाप्रमाणे शीतळ वाटावा अशी परिस्थिती टेनिसनच्या लेडीच्या बाबतीत वाटते. एकाकीपणाचा शाप आहे पण मृत्युमुळे त्यातुन सुटकादेखिल आहे. आणि तो मृत्युदेखिल अवचितपणे घाला घालणारा नाही तर डोळसपणे, जाणीवपूर्वक स्विकारलेला आहे. जीएंच्या काशीला अशा तर्हेचा उ:शाप नाही. तिचं संपूर्ण अस्तित्वच एखाद्या शापाप्रमाणे आहे. डोळसपणे पुढे जाऊन आपल्याला हवे तसे जीवन स्विकारुन आपला अंत होईल तसेही तिच्या बाबतीत घडणार नाही. तसा ती प्रयत्न करते. बाप मेल्यावर ती कधी नव्हे ते घराबाहेर पडते. सिनेमा थियएटरकडे येते. मात्र तेथे तिला आलेले अनुभव तिचं दु:ख जास्त गडद करतात. अतिशय हताश होऊन काशी आपल्या खुराड्यात परत येते. जोपर्यंत ते सरड्यासारखे पाय आपल्या शरीराला चिकटलेले आहेत तोपर्यंत मेलेल्या बापापासून आपली सुटका नाही हे तिच्या लक्षात येते. कारण ते कुरुप पाय, बापाने त्यावरुन तिला नेहेमी हिणवणं, आईला त्याने लालभडक सळईने दिलेले डाग, काशीच्या गळ्यातुन खस्सदिशी संतापाने ओढलेली प्लास्टीकच्या मण्यांची माळ, त्याचा अनेक वर्षे टिकलेला आजार आणि त्याने बांडगुळाप्रमाणे शोषलेले काशीचे आणि तिच्या आईचे आयुष्य हे सर्व एकमेकांना जोडलेले आहे. जीएंची माणसे मरेपर्यंत एका अदृष्य तुरुंगात वावरत असतात. आणि या तुरुंगातुन सुटका होण्याचा कुठलाही मार्ग त्यांच्या कडे नसतो. हा मार्ग तर त्यांना कधी मिळत नाहीच पण येणारा प्रत्येक दिवस मनातील जखम जास्त हिरवी जास्त गहिरी करत जातो ही जीएंच्या पात्रांची शोकांतिका आहे.
अशोकरावांनी शेलॉटवर लिहिताना जीएंना काय करायचे आहे ते नेमकेपणाने हेरले आहे अशी माझी समजुत आहे. त्यांच्या लेखात ज्या गोष्टी "बिटविन द लाईन" आहेत असे मला वाटले ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. जीएंच्या कथा म्हणजे एखाद्या महासागराप्रमाणे अथांग आहेत. खोलवर जावे तितके पुढे जाता येते. तळ लागत नाही. अशोकरावांसारखी माणसे काही एक दिशा देतात आणि माझ्यासारख्यांच्या विचारांना चालना मिळते. वर मी मांडलेल्या मुद्द्यांचे मुख्य श्रेय अशोकरावांच्या विचारांना चालना देणार्या लेखाकडेच जाते हे मान्य करताना मला आनंदच वाटतो आहे.
अतुल ठाकुर
(अशोकरावांच्या ज्या लेखावरुन हा लेख लिहावा असे वाटले तो मूळ लेख जिज्ञासुंना http://www.maayboli.com/node/59332 तेथे वाचता येईल.)
या महान कवितेतलं वेदनेचं
या महान कवितेतलं वेदनेचं आख्यान जी.एं.नी कुरूप वास्तवाच्या स्तरावर आणलं आणि त्या आख्यानाचं आव्हान गडद केलं.
अशोक आणि तुम्ही, अतुल, त्या दोन्ही वातावरणांचे -क्लासिक, समकालीन अर्थबहुल प्रत्यय नव्याने जागवलेत .. धन्यवाद!
श्री.अतुल ठाकुर सध्या
श्री.अतुल ठाकुर सध्या त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये गुंतले आहेतच शिवाय अन्य सामाजिक कार्य उपक्रमामध्ये केवळ कार्यकर्ता नव्हे तर संचालक पातळीवरील जबाबदारी पेलणे यात खूप मग्न असतात. अनेक व्यवधाने सांभाळत असताना एखाद्या आवडलेल्या साहित्य लेखाबद्दल केवळ "मला आवडले" अशी पोच न देता (तो त्यांचा स्वभावही नाहीच) आवडीचे फ़ूल किती प्रभावीपणे ते फ़ुलवितात याचे सुंदर उदाहरण म्हणजे हा जी.ए.कुलकर्णी यांच्या "शलॉट" कथेवरील लेख. ते जरी म्हणत असले की अशोक पाटील यानी लिहिलेल्या लेखावरील त्यांची ही प्रतिक्रिया आहे तरी मीच नव्हे तर त्याना ओळखणारे अन्य वाचकही म्हणतील की अतुल ठाकुर यांच्या लेखाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे (आणि जे माझ्या लेखापेक्षाही कैक पटीने उच्च दर्जाचे आहे, हे मी स्वत: मान्य करत आहे.)
लेखक आणि कलावंत त्याच्या गुणांना विकसित करत जातो तेव्हा प्रारंभीच्या काळात ती प्रतिभा विविध अंगांनी व्यक्त होणार्या अनेकविध जीवनाचा शोध घेत असते. जी.ए. यानी प्राथमिक ते पदव्युत्तर काळातील सारे शिक्षण बेळगाव इथे पूर्ण केले...१९२८ ते १९४५ या दरम्यान. शिक्षणाच्या बरोबरीनेच त्यांची चौकस बुद्धी आजुबाजूला जी काही सामाजिक परिस्थिती होती, त्यात घडत असलेल्या अगणित अशा घटनांची नोंद आपल्या स्मरणी ठेवत. मित्र परिवार नव्हता असे म्हटले तरी चालेल....अगदी कॉलेजजीवनातदेखील. एकमेव छंद म्हणजे वाचन, वाचन आणि पुन्हा पुन्हा वाचनच. त्याना वाचनाची (तेही इंग्रजी प्राधान्याने...) इतकी खोलवर आवड की बी.ए. वा एम.ए. च्या अभ्यासक्रमाशी संबंधित नसलेलीदेखील अनेक पुस्तकांच्या त्या जगात भारावल्यासारखे ते जात आणि पुन्हा नवीन लेखक. अशा काही लेखकांची ते नावे घेत असत की "जास्वंद" कार माधव आचवल तर म्हणत यातील काही लेखक खरेच अस्तित्त्वात होते की नव्हते हाच मोठा प्रश्न आहे.
माझी भटकंतीची आवड त्याना माहीत होती (पत्रातून उल्लेख होत असत). जुन्या बाजारातून त्याना हवी असलेली पुस्तके शोधण्याचे त्यानी मैत्रीखातर काम माझावर सोपविले होते (सक्ती नव्हती, सहज भेटली तर घ्यावीत या सूचनेने). त्यातील पुस्तकांची नावे राहू देत, पण लेखकांची नावे वाचताना मी कोड्यात पडत असे. तर असेच एका पत्रात त्यानी विनंती केली..."तुम्हाला कशीही तसदी दिलीच आहे, तेव्हा आणखी एका पुस्तकांची यादीची भर घालतो. मिळाली तर लागलीच घ्या आणि पाठवा. 1. Vision de Anahove - Alfonso Reyes....2. Confessions of a justified sinner - James Hogg....3. Autobiography by Pierre Loti, 4. Books by Lafcadio Hearn, 5. Critical Biography of Leopardi. (अजूनी आहेत, पण वानगीदाखल ही पाचच पुरेत). लेखकांच्या नावावरूनच समजून येते की सर्वसामान्य वाचकाने कदाचित कधीच ऐकली वा वाचली नसलेल्या व्यक्तींची ही पुस्तके आहेत आणि त्यात नेमके काय आहे ते तर पुस्तक हाती आल्याशिवाय समजलेही नसते. अशा छंदात आकंठ बुडालेले जी.ए. व्यावहारीक पातळीवर अतिशय एकलकोंडे होते, त्याना घरी कुणी आलेले आवडत नसे तर तेही कुणाकडे जात नाहीत...असे अनेक प्रवाद (साहजिकच) साहित्य आणि वाचक वर्तुळात निर्माण झाले.... ते फारसे चुकीचे जरी नसले तरी त्यात त्यानी आत्यंतिक टोक गाठले होते असेही म्हणता येणार नाही. वाईट इतकेच खुद्द जी.ए. यानीदेखील हा भ्रम दूर करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला नाही. मला लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, "मंगळवारी मी तुमची वाट पाहिली व घरी बहिणीला त्याबद्दल सांगूनही ठेवले होते. तुमच्या इथल्या (धारवाडमधील) कामातून गडबडीतून वेळ मिळणे कठीण झाले असेल हे खरे....पण तासभर तुम्हाला वेळ मिळाला असता तर बरे झाले असते. काही असो, पुढील खेपेला मात्र जरूर या...." ~ जी व्यक्ती सार्या महाराष्ट्रात "कुणाला भेटत नाही" अशा एका प्रवादाने प्रसिद्ध होती तीच व्यक्ती माझ्यासारख्या अत्यंत सामान्य अशा वाचकाला आग्रहाने "पुढील खेपेला मात्र जरूर या..." असे लेखी म्हणते त्यावरून लक्षात येईल की तेही तुमच्यामाझ्यासारखेच सर्वसाधारण प्रवृत्तीचे होते. (असो...हा विषय खूप मोठा होईल.)
अतुल ठाकुर यानी टेनिसनच्या शलॉटच्या नायिकेची आणि जी.एं.च्या काशीचे जे रेखाटन केले आहे त्यावरून त्याना दोन्हीही व्यक्ती अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या वाटल्या आहेत. समाजशास्त्र हा ठाकुरांचा विषयच असल्यामुळे त्यानाही त्यांच्या अभ्यासातून आणि ज्ञान संपदा शोधकार्यातून अशा वर्णनाचे स्त्रीपुरुष या ना त्या निमित्ताने भेटत राहिले असणार. काशीसारखी अनेक पात्रे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घुसमटून जगत राहिलेली होती (स्वातंत्र्यपूर्व काळात) आणि त्यांच्या जीवनधारेला कसलीही दिशा नसायची. आलेला दिवस ढकलायचा आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे जे काही न्याय असो वा अन्याय असो ते मुकाटपणे सोसत राहणे हे त्यांच्या भाळी अटळ होते. काशी त्यापैकीच एक आणि तिला नव्हती सुटका. शलॉटच्या नायिकेला शापामुळे मरण आले आणि सुटली त्या वेदनेतून एकदाची....पण काशीला मरण मिळणार नाही. तिच्यासारख्या दुर्दैवी मुली त्या काळात जीव शरीरात ठेवूनच मरण भोगत असत.
जी.ए.कुलकर्णी यांच्या अत्यंत समर्थ अशा लेखणीने तो भोगभंडारा तीव्रतेने शब्दबद्ध केला. त्याबद्दल अतुल ठाकुर यानी त्यांच्या भावना आणि स्वतःचे विचार मांडले ते प्रशंसनीयच...माझा लेख केवळ निमित्तमात्र आहे हे मी नम्रपणे इथे पुन्हा सांगत आहे.
अशोकरावांचा लेख आल्यावर
अशोकरावांचा लेख आल्यावर इतक्या सुंदर लेखावर नुसतंच सुरेख लेख आहे म्हणुन मला चालणार नव्हतं, दीर्घ प्रतिसाद द्यायचा होता. मात्र तेव्हा वेळ मिळु शकला नाही. बरेच दिवस गेल्यावर पुन्हा तो धागा वर आणणे मला बरे वाटले नाही. म्हणुन त्या लेखावर आधारित एक स्वतंत्र लेख लिहावा असे वाटले.
अनेक दिवसांनी उसंत मिळाल्यावर जीएंचे पारवा माझ्याकडे नाही हे लक्षात आले. मग पुस्तक विकत आणुन कथा पुन्हा वाचली तेव्हा लेख पूर्ण करता आला. अशोकरावांच्या प्रतिसादाने लेख लिहिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
बाकी अशोकरावांसारखी दिलदार व्यक्ती मित्रांबद्दल बोलताना हात राखुन बोलत नाही हे त्यांच्या प्रतिसादात माझ्याविषयी लिहिताना दिसते आहेच. जीएंचीच उपमा वापरायची झाली तर अशोकरावांचा हात सूपासारखा होऊन ते पशा पशाने दान देतात. प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार अशोकराव. आपल्या प्रतिसादाने आपली जीएंशी किती जवळीक होती ते पुन्हा एकदा दिसुन आले. आणि पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने आपल्याला जीएंबद्दल आणखि लिहिण्याचा आग्रह करीत आहे.
सुंदर लेख आहे, अतुल.
सुंदर लेख आहे, अतुल. मामांच्या आणि मूळ लेखातलेही पदर छान उलगडून दाखवलेत. माझ्यासारख्या, जीएंशी फारसे सूर न जुळलेल्या वाचकांसाठी ते मदतीचं आहे.
अनेकदा जीएंची पुस्तके, त्यांच्या कथांबद्दलच्या आणि खुद्द जीएंबद्दलच्यादेखिल चर्चा वाचून पुन्हा पुन्हा जीएंना समजून घेऊन वाचण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण इन व्हेन! त्यामुळे असे लेख आले की जीएंजवळ पोचण्याची थोडीशी आशा वाटते.
त्यांची पुस्तकं वाचताना मला सतत जीएंना सौंदर्यवाद आणि प्रसन्नतेचं इतकं वावडं का असा प्रश्न पडत रहातो. औदासिन्यानं भरलेली वर्णनं, वातावरणं, अत्यंत तीव्र व्यक्तीरेखा वाचताना नैराश्य येतंय की काय अशी भिती वाटते. मग ते भावतही नाही. [आधी मुळात अशी धडपड करावी का असाही संभ्रम असायचा, नाही समजत, भावत तर नाही. पण इतक्या जणांना जीएंनी इतक्या टोकाचं भारावून टाकलेलं पाहिलं, की 'आखीर ये है किस खेत की मूली' अशी अस्वस्थता येते आणि सोडून दिलेला प्रयत्न पुन्हा केला जातो ]
मामा, तुमच्या प्रतिसादाने माहितीत मोठी भर घातली. खुप मोलाचे अनुभव आहेत तुमच्याकडे. तुम्ही, अतुल, ह्यांच्यामुळे जीएंकडे बघण्याचा एक दृष्टीकोन मिळतो, आणि माझ्या मते जीएंना समजून घेण्यासाठी मुळात तोच आवश्यक आहे.
तुमचा 'पारधी' या कथेवरचा लेख
तुमचा 'पारधी' या कथेवरचा लेख वाचून केवळ त्यासाठी मी 'डोहकाळीमा' विकत घेतलंय.
जी.ए. प्रथमच वाचतोय. बहुतेक मला ते झेपेना झालेत. प्रत्येक कथेनंतर येणारी विषण्णता नको नकोशी आहे. चार पाच कथा वाचून झाल्यात. (रोज एक या प्रमाणे).
'रात्र झाली गोकुळी' वाचली आणि पार पोखरुन गेलो. पुस्तक मिटून टाकलंय. वाचवत नाही असं नाही. पण पंधरा दिवस भ्रमिष्टासारखा झालोय. पुस्तकाला हात लावायची इच्छा नाही. ४०० रुपयात आयुष्यभराचं दु:ख विकत घेतल्यासारखं झालंय.
जी.ए. पासून चार हात लांब राहिलेलेच बरे. हा माणूस एखाद्याला उध्वस्त करुन सोडेल.
""पुढील खेपेला मात्र जरूर
""पुढील खेपेला मात्र जरूर या..."
भारी. नुसत्या गुदगुल्या होताहेत.आणखी लिहित नाही.