'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...
हा अभंग ज्या कोणी संत श्री अमृतराय यांनी लिहिलाय त्यांना ते ब्रह्म दृग्गोचर झाले असेलही - कल्पना नाही.. पण आपल्याला स्वरब्रह्म नक्कीच भेटवेल असे हे अद्वितीय गाणे...
लहानपणी कानावर पडलेले या गाण्याचे सूर .... जसजसा मोठ होत गेलो तसतशी या सुरांची मोहिनी अजूनच गडद होत गेली.
खळे काकांनी जयजयवंती रागात बांधलेला हा श्री अमृतराय या संतांचा हा एक अगदी गोऽड अभंग. आशाबाईंनी अशा ताकदीने गायलाय की कितीही वेळा ऐकला तरी त्यातली गोडी उणावतच नाही, उलट वाढतच जाते...
अभंग सुरु होताना जी एक छोटीशी तान आहे त्यानेच या जयजयवंती रागाची ओळख होते ती अगदी यथार्थ अशीच... आणि पुढे जे स्वर कानावर येतात त्याने जीव असा काही सुखावतो की बस्स..
खळेकाकांनी जी एक मधुर चाल लावलीये त्यात - प्रत्येक चरणाच्या शेवटी आलेले शब्द - 'उभे राहिले', 'पाणी वाहिले', 'गाणे गाईले'.. असे काही लज्जत वाढवतात की क्या कहने...
आशाबाईंनी ज्या लडिवाळपणे हा अभंग गायलाय त्याला तोडच नाहीये - असा प्रसंगी लडिवाळपणा, कधी खट्याळपणा हे त्यांच्या जादूई सुरांचे गारुड बोलण्याजोगे नाही - केवळ अनुभवण्याचेच....
'शिणला नाही' यातील उच्चारावरही जो काही गोडवा आहे तो एक अनुभवच...
तसेच गाण्यातील फार अदाकारी (आलाप, मींड, इ.) न दाखवताही एखादे गाणे गोड कसे बांधायचे याचा जणू वस्तुपाठच आहे हे गाणे... 'अजि मी ब्रह्म पाहिले' याचे विविध प्रकार आणि जनीसंगे दळिता 'कांडिता' चे विशिष्ट उच्चारण सोडले तर या अभंगात फार कलाकुसरही नाहीये...
असे हे अतिशय कर्णमधुर गाणे सगळ्यात उंचीवर केव्हा जाते तर आशाबाईंच्या सुस्वर कंठातून अलगद ओघळणारे --'अमृतराय म्हणे ऐसी माऊली' - या रेशीमलडीवर .. किती वेळा मी ही ओळ ऐकतो आणि त्याची अजिबात मीमांसा न करता त्यात हरवून जाणेच पसंत करतो.... 'माऊली' या शब्दाचे उच्चारण तर जीवघेणे आहे अगदी.. अहाहा...
जास्त वेळ न घालवता हे गाणेच ऐका ना सरळ...
" अजि मी ब्रह्म पाहिले
अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी,
कटिकर नटसम, चरण विटेवरी, उभे राहिले
एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड, आवड मोठी, पाणी वाहिले
चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले
दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरली
अमृतराय म्हणे ऐसी माऊली, संकटा वारिले
रचना - संत अमृतराय महाराज
संगीत - श्रीनिवास खळेसाहेब
गायिका - आशाबाई
-------------------------------------------------------------------------------------------------
अगदी अगदी. काही रचना अशा
अगदी अगदी.
काही रचना अशा असतांत त्यांत गुंफलेले शब्द, लावलेली चाल, आणि गाणार्याचा स्वर, लय , ताल या सर्वांचे मिळून असे काही अजब रसायन बनते की ती रचना अजरामर होऊन रहाते.
गीत रामायण हे याचे एक उदाहरण ठरावे.
हे अभंगही तसेच एक. केवळ ऐकणं हा ही एक स्वर्गीय अनुभव ठरावा.
लहानपणापासून हे गाणे माझ्यावर
लहानपणापासून हे गाणे माझ्यावर जादू करतेय. अगदी शाळेच्या आठवणी वगैरे येतात, हे गाणे ऐकले कि. मला शब्दात सांगणे कठीण आहे. त्यामूळे हे वाचून खुप छान वाटले.
काल हे वाचल्यावर घरी जाऊन
काल हे वाचल्यावर घरी जाऊन गाणं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. चार पारायणं झाली.
नंतर त्याच फोल्डरमध्ये असलेल्या 'कानडा राजा पंढरीचा'ची २ पारायणं झाली. वसंतराव आणि बाबूजी! एकदम भीन्न प्रकारचे आवाज... पण त्यानेच त्या गाण्याची लज्जत वाढवली आहे. माडगुळकरांचे शब्द सुंदर आहेतच.
सुंदर वर्णन! माझे अत्यंत
सुंदर वर्णन! माझे अत्यंत आवडते गाणे! कितीही वेळा ऐकले तरी गोडी कमी होत नाही हे अगदी खरे आहे. विशेषतः चोख्यासंगे ढोरे च्या कडव्याची चाल अतिशय आवडते.
रसद पटवली - चा संदर्भ काय आहे? त्याचा अर्थ समजला नाही.
दुसरे म्हणजे ते "अगणित सूरगण" असे असायला हवे बहुधा. "देव" (सूर) ज्याचे वर्णन करतात अशा अर्थाने आहे ना ते? संगीतातील सूर व देव या अर्थाने सूर यांचे उकार वेगळे आहेत का माहीत नाही.
फारएण्ड - रसद पटवली - चा
फारएण्ड - रसद पटवली - चा संदर्भ काय आहे? त्याचा अर्थ समजला नाही. >>>>>>
संत दामाजीपंत
मंगळवेढयाचे सर्व संतापेक्षा श्री दामाजीपंतांची प्रसिध्दी फार आहे. त्यांचेच नावाने ही नगरी ओळखली जाते. इ.स. १४४८ ते १४६० ही दोन वर्षे श्री दामाजीचा दुष्काळ म्हणून ओळखली जातात. याच काळात दामाजीपंतानी मंगळवेढे येथे तहसीलदार असताना बिदर बादशहाचे अवकृपेची भिती न बाळगता सरकारी कोठारातील धान्य भुके ने व्याकूळ झालेल्या व मरणोन्मुख झालेल्यांना फुकट वाटले व लाखो लोकांचे जीव दुष्काळ समयी जगविले.
बादशहाने या गुन्ह्याबद्दल श्री दामाजीपंतांना पकडून बिदर ला नेले. पण संकटकाळी भक्तांचा पाठीराखा पंढरीचा पांडूरंग विठू महाराचे रुप घेऊन बिदर दरबारात गेला व सहाशॆ खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून पावती घेऊन आला.
त्यामूळे श्री दामाजीपंताना बिदर दरबारात हजर करताच बादशहाने त्यांचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले व तुमचे विठू महाराने तुमचे पैसे पोचते केलेचे बादशहाने सांगितले. श्री दामाजीपंतांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार व आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते याबद्द्ल त्यांना विस्मय वाटला. पंढरीच्या पांडूरंगाची ही कृपा झाल्याची त्यांना खात्री पटताच त्यांनी नौकरीचा राजीनाम तात्काळ दिला व राहीलेले आयुष्य पांडूरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळपिडीत लोकांची सेवा केली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
(http://marathi.mangalwedha.com/sri-santa-damajipanta - या साईटवरुन साभार )
अगणित सुरगण = देवगण. सुर= देव
अगणित सुरगण = देवगण. सुर= देव (देव-सुर, असुर-राक्षस)
संगीतात सूर, सू उच्चारण हे दीर्घ होते.
.
.
surekh liheelee aahe. काही
surekh liheelee aahe.
काही रचना अशा असतांत त्यांत गुंफलेले शब्द, लावलेली चाल, आणि गाणार्याचा स्वर, लय , ताल या सर्वांचे मिळून असे काही अजब रसायन बनते की ती रचना अजरामर होऊन रहाते.>> +1
>>लहानपणापासून हे गाणे
>>लहानपणापासून हे गाणे माझ्यावर जादू करतेय. अगदी शाळेच्या आठवणी वगैरे येतात, हे गाणे ऐकले कि. मला शब्दात सांगणे कठीण आहे. त्यामूळे हे वाचून खुप छान वाटले.
दिनेशदा, सेम सेम, मला पण ही अशी गाणी ऐकली की शाळेचे दिवस आठवतात. सकाळी सकाळी रेडिओच्या तालावर आवरा आवरी चालायची. भक्तीगीते झाली की शेवटी एक हिंदी गीत असायचे.
शशांक, धन्यवाद. तो "तत्वता"
शशांक, धन्यवाद. तो "तत्वता" शब्दही पहिल्यांदाच वाचला तसा. नेहमी "तत्त्वतः" असा वाचलेला आहे. पण इथे वेगळ्या अर्थाने असावा असे वाटते. तत्वता हे विशेषण आहे की काय कोणास ठाउक.
'हरीनाम मुखी रंगते' हे आशा भोसलेचे असेच अवीट गोडीचे गाणे. त्याचेही असे वर्णन वाचायला आवडेल. मीरेच्या भूमिकेतून लिहीलेले इतके प्रसन्न गाणे दुसरे आठवत नाही.
वा.. किती छान लिहीलय.
वा.. किती छान लिहीलय. प्रतिसाद ही छान्च.
अवीट गोडीचे अत्यंत आवडते
अवीट गोडीचे अत्यंत आवडते गाणे. ! खूप छान मांडलंस शशांक.
माझे खूप आवडते गाणे! लेख आणि
माझे खूप आवडते गाणे! लेख आणि नंतरचे प्रतिसाद दोन्ही आवडले.
अगदी माझ्या मनातलंच लिहिलंय.
अगदी माझ्या मनातलंच लिहिलंय. आज सकाळपासून हेच गाणं मनात घोळतंय आणि आता हा लेख इथे पाहिला. फार सुंदर संगीत आणि गायनसुद्धा तितकंच सुंदर. मलाही 'चोखोबाची ढोरे ओढिता' हे कडवं अतिशय आवडतं. कधीही फुरसतीच्या वेळी हा अभंग मनाच्या तळातून उसळी मारून वर येतो.
जाता जाता : रसीद हा शब्द हिंदीत 'पावती' या अर्थाने वापरला जातो आणि तो रिसीट या इंग्लिश शब्दावरून आला असावा असे अंदाजे वाटते. आपल्याकडच्या जुन्या मराठीतही तो पावती, हुंडी या अर्थाने वापरला गेलेला दिसतो. हुंडी पटवली म्हणजे ऑनर केली. कदाचित दामाजीने स्वतःकडे पैसे नसताना बादशहाला पैसे देण्यासाठी हुंडी काढली असेल आणि विठूरायाने त्या पोकळ हुंडीवर राजदरबारात पैसे भरले असतील. कदाचित हा सगळा हुंडीचा लटका बनाव विठू महारानेच भक्तरक्षणासाठी रचला असेल.
पण रसीद हे उघड उघड 'रिसीट'चे रूपान्तर वाटते. कान्होपात्रेच्या काळात इंग्लिश शब्दांची ओळख मराठीला झाली होती असेल का हा प्रश्नच आहे. किंवा फारसी/उर्दू मध्ये असा शब्द असेल किंवा 'रिसीट'चेच मूळ कुठेतरी दुसरीकडे असेल.
अवीट गोडीचे अत्यंत आवडते
अवीट गोडीचे अत्यंत आवडते गाणे. ! खूप छान मांडलंस शशांक >> मानुषी , + 111
सर्व मान्यवर रसिकांचे
सर्व मान्यवर रसिकांचे मनापासून आभार....
सुरेख!
सुरेख!
खुपच सुंदर पुरंदरे काका! गाणं
खुपच सुंदर पुरंदरे काका! गाणं मस्तच आहे!
उभे राहिले', 'पाणी वाहिले', 'गाणे गाईले'.. असे काही लज्जत वाढवतात की क्या कहने...>>>>> ती जयजयवंती ची स्पेशल जागा आहे. प-रे अशी!
सर्व जाणकार रसिकांना मनापासून
सर्व जाणकार रसिकांना मनापासून धन्यवाद......