ट्रेक दरवेळी प्रायवेट गाडी घेउनच का करावा.. कधीतरी एसटी,ट्रेन अश्या पब्लिक ट्रांसपोर्टची मदत घेत ट्रेक करण्याची मजा काही औरच असते.. मग त्यासाठी वेळेच गणित मांडा आणि जरा इकडे तिकडे झालं किंवा होउन नये म्हणून होत असणारी धावपळ चांगलीच लक्षात राहते... आम्हाला या पारंपारिक पद्धतीचा शिरस्ता मोडायचा नसल्यामुळे अधुन- मधून असे ट्रेक करतच असतो... अशीच खुमखुमी मित्र रोमाला आली.. या मागचं खर कारण तर नेमका शनिवारी त्याला कामावर मिळालेला ऑफ नि थंडीचा ऑन सिझन... माझं म्हणाल तर मी बर्यापैंकी ट्रेक फ्लो मध्ये होतो.. आधी अंजनेरी मग पद्मदुर्ग नि आता रोमाचा संदेश.. चलो हरिहर.. !! सलग तीन आठवडे ट्रेक..! याहून भाग्य कुठले..! म्हटलं चलो.. ! मागच्याच आठवड्यात पद्मदुर्गला जाउन आलेल्या आमच्या सौ. पण अगदी शेवटच्या क्षणी सॅक भरताना म्हणाल्या मी पण येणार.. म्हटलं चल.. !! तीसुद्धा सोप्पा आहे की अवघड हा विचार न करता फक्त माझ्याबरोबर चलायच म्हणून आली.. !
पण शेवटच्या क्षणाला 'येते' म्हटले तरी स्मिताकडे चांगले बुट वा सँडल नव्हती.. आणि आता घेण्यास वेळही नव्हता.. तेव्हा चप्पल घालूनच आता ट्रेक करु म्हणत ठाण्याला पोचलो.. ठाण्याहून उशीरा उशीरातली इगतपुरीला थांबणारी मेल वा एक्प्रेस पकडायचे ठरवलेले.. ऐनवेळी ट्रेक-ठराव होता तेव्हा जनरल डबा जिंदाबाद.. बर्यापैंकी घुसखोरी करुन उभे रहायला जागा मिळवली.. ! आता फक्त घडयाळ्याचे काटे.. ट्रेकच्याच इथल्या तिथल्या गप्पा... नि मोबाइलशी चाळे करत... इगतपुरी स्टेशन यायची वाट पहायची...! अडीच-तीन तासाचा प्रवास.. डोळा लागेस्तोवर इगतपुरी आले..!
रात्री अडीचची वेळ.. रेल्वेस्थानकावरच दोन तास काढायचे ठरवलेले.. पहाटेची स्टँडवरुन एसटी असते अशी तोकडी माहिती नेटवर मिळवलेली.. तेव्हा अगदी जाऊ पहाटे म्हणत रेल्वेस्थानकावर पसरण्यासाठी जागा बघू लागलो... वेटींग रुम फक्त रिजर्व तिकीटधारकांसाठी होता नि त्या खोलीत अगदीच अंधार असल्याने आम्ही स्थानकावरच बाकडे अडवले.. इगतपुरी थंड हवेचे ठिकाण.. त्यात डिसेंबर महिना.. अजुन जाणवत नसली तरी थंडीने आम्हाला लपेटण्याआधीच आम्ही जाकीट, स्वेटर्स घातलेले.... अजुन २-३ मेल येउन गेल्या.. त्या मेलच्या इंजिनच्या भसाडया आवाजातदेखील स्मिता व रोमा मस्त झोपलेले.. तिघांनी झोपुन देणे धोक्याचे म्हणुन मी आपला गुरखा..! रेल्वेस्थानकावर अगदी शस्त्र वगैरे घेउन आर्मी लोक रेल्वे पोलिस लोक्स घिरट्या घालत होते.. आम्हाला हटकवले नाही हे विशेष.. मागून आलेल्या एका मेलमधून ६-८ जणांचा ग्रुप उतरला नि समजुन गेलो हे पण हरिहर !
पहाटे एसटी कितीची होती हे माहित नव्हते म्हणुन तासभर विश्रांतीनंतर बाहेर पडलो.. पहाटे चारच्या सुमारास एसटी स्टँड गाठला.. तिथल्या गाडी सुटण्याच वेळापत्रक बघून मात्र चक्रावून गेलो.. आम्हाला हवी असणारी वैतरणा- त्र्यंबक गाडी थेट सकाळी साडे आठ वाजता..!!! कल्याणमस्तु ! इतका वेळ करायचे काय हा मोठा प्रश्ण होता.. साडेआठ म्हणजे सगळंच 'कट टू कट' होणार हे समजून गेलो.. बर तिघच होतो तेव्हा प्रायवेट गाडी करण्याचा वगैरे प्रश्ण नव्हता.. त्या दुसर्या ग्रुपने 'हरिहर' चा नाद सोडून पावणेसहाची भंडारदरा गाडी पकडण्याचे ठरवले..! आम्ही मात्र झोपुन दिले.. विनाकारण रात्रीचे निघालो असे वाटून गेले.. तब्बल चार-पाच तास स्टँडवर काढले.. सकाळच्या गारव्यात भज्जीवर भज्जी व वडयावर वडा खात चहापानाचा कार्यक्रम आटपून घेतला.. थंडीचा गारवा कमी होउन उकडायला लागले नि एसटी हजर झाली..!
त्र्यंबक परिसर सुरु झालेला.. वेडीवाकडी वळण घेत आमची एसटी बेफाम वेगानं डांबरी रस्त्यान धावत होती.. मोकळ्या ओसाड वाटणार्या या प्रदेशात 'हरिहर' चा डोंगर मी मी म्हणत होता.. निरगुडपाड्याला उतरलो नि दहाच्या सुमारास 'हरिहर'कडे वळालो... रस्त्याच्या डाव्या बाजूला दिमाखात उभा असलेला हा हरिहर... या वाटेला येउनही करायचा राहिलेला.. ह्या गडाच्या पायर्या हे खास आकर्षण पावसातच थरारक चढाई करुन अनुभवाव अस ठरवलेल.. पण मुहुर्त पाहुन आमचे ट्रेक कधीच होत नाही.. !
शेतमळ्यामधून वाट काढत आम्ही 'हरिहर'च्या दिशेने चालू पडलो.. शनिवारची स़काळ त्यामुळे जाणारे आम्ही तिघच.. शेतमळे मागे सरले नि दोन वाटा फुटल्या.. अंदाज घ्यायचा म्हणून पुढे सरकलो तर पलिकडून कातकरी बाईने आरोळी दिली.. इकडून या म्हणून.. ती व तिचा नवरा.. त्यांना आमच्या रुपाने गिर्हाईक भेटले होते.. ! म्हणूनच की काय खूप जनावरं आहेत.. वाट चुकालं तर शोधत बसाल.. आमच्याबरोबरच चला.. वगैरे वगैरे सांगून गळ घालू लागली.. आम्ही एकदा- दोनदा सांगून पाहिले.. पण व्यर्थ.. जबरदस्तीच.. ! शेवटी 'आम्ही देउ तेच स्विकारले पाहिजे..' म्हणत मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला.. खर तर वाट सरळ होती... पावसाचे दिवस नव्हते.. चुकण्यासारखं काही नव्हतं.. पण म्हटलं जाउदे.. 'चला ओ पटापट' अशी बडबड करणार्या त्या बाईकडे दुर्लक्ष करत आम्ही अगदी फुरसतमध्ये चढत होतो.. 'तुम्हाला घाई आहे तर जा पुढं' अस म्हणूनदेखील ती जात नव्हती..
उनाचा तडाखा वाढतच होता.. बायको प्रत्येक टप्प्याला थांबत होती.. हवासुद्धा नव्हती.. पाण्याची बाटली रिकामी होत चाललेली.. एकदाचे पठारावर आलो नि वार्याची झुळूक आली.. जीव सुखावून गेला.. डावीकडचा फणीचा डोंगर आता मस्त उठून दिसत होता.. आमच्यामागे भास्करगडाचा पसारा आसमंतामध्ये विस्तारलेला... आता हरिहर अगदी नाकासमोर आला... डावीकडच्या दरीत हर्षेवाडी नावाची वाडी दिसत होती.. इथून येण्यास कमी चढ व कमी वेळ लागतो म्हणे... या वाडीतलेच ते कातकरी होते.. तेव्हा इकडून सरळ गडावर जाल म्हणत अपेक्षेप्रमाणे निरोप घ्यायला लागले.. आम्ही स्मितहास्य करुन त्यांना छोटा मोबदला देउन मार्गी लागलो.. !!
- - -
- - -
(मागे फणीचा डोंगर, भास्करगड)
आता सरळसोट चालू लागलो.. छोट्या चढणीची वाट संपली की कातळकडयाला भिडणार होतो.. इथवर येइपर्यंत कळले की दोन -तीन ग्रुप गडावर आधीच पोहोचले होते.. एक थोडा सोप्पा कातळटप्पा पार करुन आम्ही या गडाचे खास आकर्षण असलेल्या पायर्यांपाशी पोहोचलो... ८० च्या कोनात असलेल्या उभ्या कातळात अंदाजे शे दोनशे फुटापर्यंत कोरलेल्या पायर्या चढणे म्हणजे थरारच.. या पायर्या चढता याव्यात म्हणून अगदी पायर्यांना खोबणी केलेल्या.. गडाच्या या सुंदरतेमुळे का माहित नाही पण ब्रिटीशांनी जाताना उध्वस्त न केलेल्या गडापैंकी हा एक दुर्मिळ गड अस म्हणतात खर..
- - -
- - -
पायर्या संपल्या की दरवाजा.. मग कातळाच्या कपारीतून जाणारी वाट.. तत्पुर्वी शेंदुर फासलेला गणपती.. मग पुढे डावीकडे खोल दरी नि समोर निमुळती वाट... मग पुन्हा धारदार वळण घेत कोरलेल्या मजबूत पायर्या.. त्या पायर्यांमध्ये खोदलेल्या खोबण्या हाच काय तो आधार चढताना.. एकावेळी जेमतेम दोन माणस चढून जातील इतकीच जागा.. हे सगळ कातळात खोदताना परिश्रम घेणार्या त्या कारागिरांना सलाम.. ज्या कुणाला अस हे अवघड बांधकाम सुचल असेल त्याला सलाम..
- - -
हा सगळा टप्पा माझी बायको पार करेल की नाही शंका होती.. सुरवातीला दचकली खरी.. पण मग गेली बर्यापैंकी चढून.. खरी धास्ती उतरताना होती कारण तिने मागे वळून पाहिलेच नव्हते.. !!
- - -
- - -
बघू पुढच पुढे म्हणत वर सरकलो.. पुढे तर अगदी भुयारातून पायर्या कोरत वरती नेल्या होत्या.. शेवटी मुख्य दरवाज्यातून आम्ही पठारावर आलो तर स्वागतासाठी गिधाडं घिरट्या मारत होते.. !! इतक्या जवळून त्यांना उडताना पाहून दिल खुश हुआ...
- - -
पुढ थोडया वाटचालीनंतर किल्ल्याचा उंच भाग नजरेस पडतो.. तिथे निशाण फडकवलेलं दिसल.. तिथेही चार -पाचजण दिसले.. एकंदर शनिवार असुनही गडावर येणारे बरेच होते.. !! आम्ही हनुमान मंदीराजवळ आलो.. या मंदीराच्या पुढ्यात खराब पाण्याच टाक आहे.. तर मागच्या बाजूस बांधून काढलेले छोट तळ आहे.. तर तळ्याकाठी महादेव व नंदी !!
- - -
- - -
त्या छोट्या तळ्याकाठी एका कोपर्यात चुलीचे आयते दगड दिसले नि स्मिता, रोमा यांना भूका लागल्या.. मॅगी करुन घेउ म्हणत दोघांनी गळ घातली.. इथवर येण्यास दिड वाजले होते नि निरगुडपाड्याहून परतीसाठी ३.३० ची एसटी होती.. त्यामुळे मी सहमत नव्हतो.. पण मग पोटोबा महत्वाचा मानत काटयाकुट्या टाकून चुल पेटवून दिली.. रोमाने टोप व मॅगी बाहेर काढली.. स्मिताने चूलीचा ताबा घेतला.. ! फटाफट पेटपुजा आटपून रोमा व मी गडाच्या दुसर्या टोकाकडे निघालो.. तर बायको मंदीरापाशीच थांबली.. या मारुती मंदीराच्या मागे असणार्या तळ्याच्या उजव्या बाजूस पिण्याच्या पाण्याच टाक आहे.. पाणी अगदी मधुर.. ! एव्हाना बाजुच्या गावाकडून दोन- तीन कुटुंब आलेली.. !
- - -
आम्ही गडावरच्या उंच टेकाडावर जाण्यास उत्सुक नव्हतो.. तेवढा वेळ हाताशी नव्हता.. पण दुसर्या बाजूस असलेली इमारतीचे अवशेष अगदी भक्कम अवस्थेत.. फक्त एक खिडकी असलेल्या या छोट्या इमारतीमध्ये दोन खोल्या आहेत.. इथे सुद्धा आतून सगळया भिंतीवर गिरपटवून अडाणी लोकांनी आपली बिनअकलेची छाप सोड्लीय.. ! या खोलीच्या जवळच दोन- तीन छोट्या टाक्या आहेत.. याच टोकावरुन समोरचा ब्रम्हगिरी पर्वत नि त्या डोंगराला संलग्न असलेला भंडारदुर्ग अगदी ठळक दिसतो.. ब्रम्हगिरी डोंगरावरील गोमुख मंदीर, जटाधारी मंदीर हा सारा परिसर बघून फार वर्षापुर्वी नकळतपणे झालेल्या भंडारदुर्ग ट्रेकची आठवण झाली.. त्याचवेळी खरेतर हरिहर ट्रेक करायचा होता.. आता तब्बल सहा-सात वर्षांनी 'हरिहर' भेट झालेली.. !!
- - -
आता उतरायला घेतले.. आम्ही ऑलरेडी वेळेच्या बाहेर आहोत हे समजुन चुकलेलो.. हाताशी तासभर होता पण स्मिताला आमच्यासारखी उडया मारत उतरायची सवय नव्हती.. शिवाय पायात साध्या चप्पला ..! आम्ही परतायला घेतले नि अजुन दो-न तीन मोठे ग्रुप आले.. बहुतेक सगळे जवळच्या हर्षवाडीतून चढून आलेले.. पण मला मात्र खूप आश्चर्य वाटलं.. शनिवारीच इतकी वर्दळ मग रविवारी नकोच यायला..!!
आता पायर्या उतरण्याची वेळ.. काहिसा अवघड टप्पा.. थेट दरीची खोली दाखवणारा.. .साहाजिकच स्मिता गांगरलेली.. पण नशिबाने समोरुन एक ग्रुप आलेला.. 'वन -वे' असल्याने तो ग्रुप आम्ही उतरण्यासाठी थांबलेला.. नि या गरदोळात ती पटापट उतरुन गेली.. पथ्यावर पडले.. आम्ही आता दरवाज्यापाशी आलो.. पाहिले तर आता दरवाज्याला शेंदुर फासलेला.. इथेच एक सेल्फी क्लिक घेउन मुख्य पायर्या उतरायला घेतल्या...
- - -
- - -
आता थांबायच नाही या इराद्याने वेगाने उतरायला घेतले खरे.. पण मग अपेक्षेप्रमाणे बायकोची चप्पल कच खाउ लागली.. मातीच्या उतरावर कितीवेळा घसरली.. पडली.. रडली..! आणि एकदा विश्वास गमावला की गमावला.. मग माणूस सेटल होतच नाही.. जल्ला परत ट्रेकच नाव काढणार नाही अशी हालत झालेली.. ! म्हटल जाऊ हळुहळू.. !
नाही म्हटले तरी पोचायला चार वाजले.. नि फक्त १५-२० मिनिटांनी एसटी हुकली.. आता काय करायचे प्रश्ण होता.. येथून बाहेर पडण्यास वाहन पण पटकन मिळत नाही.. भिवंडी मार्गे पालघर ला जाणारी एक एसटी पावणेपाच च्या सुमारास होती.. पण तोच एक गावकर्यांना घेउन जाणारी एक गाडी आली. तुडुंब भरलेल्या त्या गाडीत आम्ही देखिल दाटीवाटीनं बसलो.. पुढच्या घोटी- त्र्यंबक रोडला मिळून जाणार्या फाट्यावर उतरवतो तिथून घोटीला जाणारी एसटी मिळेल असे गाडीवाल्याने सांगितलेले.. वाटलं असेल जवळच.. पण जल्ला वीसेक मिनीटाच्या त्या प्रवासात शरीर चांगलच आखडून गेलं...
आता प्रवासाचा पुढचा टप्पा घोटीला जाणार्या एसटीची वाट पहायची.. एका मोठया दगडावर आम्ही तिघ वाट पाहतोय.. समोर त्र्यंबक रांग.. त्या रांगेला बघत पोटात खजुरचा खुराक ढकलला....
पाचला येणारी एसटी पाचच मिनीटांनी उशीरा आली नि आम्ही रिलॅक्स झालो... धडधड प्रवास करत एसटी घोटी स्टँडला आली..
आता प्रवासाचा पुढचा टप्पा.. घोटी ते कसारा ! १५-२० मिनिटांनी कसारा एसटी येइल असे कळले.. ! थोडी पेटपुजा म्हणुन भेलपुरी खाण वगैरे झाल.. शेअरींगवाली जीप करुन जाऊ विचार आला.. पण ते 'कोंबून भरण.. भरल्याशिवाय जीप सोडत नाहीत..' हा सगळा विचार करुन एसटीच बरी म्हणत कसारा स्टँडवर पुन्हा आलो.. अंधार पडला.. अर्धा तास झाला.. तास लोटला. पण एसटीच नाही आली.. स्टँडवर तोबा गर्दी.. त्यात मच्छरांचा दिवस सुरु झालेला.. एकदाची कसारा एसटी आली.. बसायला एक सीट मिळाली..
आता प्रवासाचा शेवटचा टप्पा.. कसारा ते मुंबई ट्रेन.. !! बरेच वर्षांनी कसारा रेल्वे स्टेशनला आलेलो.. अन्यथा गाडी असली की हायवे टू हायवे प्रवास असतो.. इथेच तिकीट काढताना पहाटे इगतपुरी स्टँडला भेटलेल्या ग्रुपमधील मुलगा भेटला.. ते रतनगड करुन आलेले.. आम्ही 'हरिहर'च केला म्हटल्यावर त्यांना थोड आश्चर्य वाटलच.. नि आम्हाला अभिमान...!
बरेच महिन्यांनी अगदी हवा तसा ट्रेक झाला होता.. अगदी ट्रेकला उशीराने सुरवात करुनही ट्रेकमध्ये चुल पेटवून खाणं वगैरे अनुभवण म्हणजे आमच्यासाठी पुरत समाधानकारक होतं.. त्यात नाशिकमधल्या गडकिल्ल्यांच्या लिस्टमधल्या अजुन एका किल्ल्यावर शिक्कामोर्तब.. ! थोडी दगदग झाली खरी.. पण अश्या पदधतीचे ट्रेक हृदयाच्या कप्प्यात ठळक नोंद करून जातात.. त्यात एखादा किल्ला बरेच दिवस, महिने वा वर्षे करायचा राहीला आणि अचानक जाण होतं तेव्हा होणारा आनंद औरच.. ! आणि किल्लाच इतका सुंदर की जय 'हरिहर'.. _/\_
Local guide number asel tar
Local guide number asel tar share kara
Pages