पद्मदुर्ग.. शिवकालीन जलदुर्ग !

Submitted by Yo.Rocks on 15 June, 2016 - 16:03

'पद्मदुर्ग माहीत आहे का ??'

'नाही'

'जंजिरा ??'

'हो तर.. अजिंक्य राहीलेला किल्ला ना.. शिवाजी राजेंना पण तो किल्ला जिंकता आला नव्हता..'

'गेला आहेस कधी ?'

'हो'

'मग त्या किल्ल्यावरुन समुद्रात दुर बेटावर अजुन एक किल्ला दिसतो तो पद्मदुर्ग'

' अरे हा.. तो छोटा किल्ला... आलं लक्षात.. पण तिथे तर पाहण्यासारख काहीच नाहीये अस गाइड सांगत होता..!!'

'तो कोणी बांधला आहे माहित आहे का ?'

'नाही.. पण जंजिरा सिद्दीने बांधलाय हे नक्की'

आणि अश्या प्रकारे अजिंक्य अशी ओळख असलेला 'जंजिरा' अजुनही अजिंक्यच राहीलाय.. अलिबागला कुठला किल्ला तर सगळ्यांना 'जंजिरा' हे नाव परिचित.. पण खुद्द शिवाजी महाराजांनी बांधलेला 'पद्मदुर्ग' मात्र दुर्लक्षित.. !

मुरुडचा 'जंजिरा' किंवा राजापुरीचा 'जंजिरा' हा सुट्टीमध्ये पर्यटकांची प्रचंड वर्दळ असणारा किल्ला.. 'जंजिरा किल्ला पर्यटक मार्ग' नावाचे फलक असतील तर ह्या किल्ल्यावर जाणं फारच सोप्पे नाही का...! या किल्ल्यावर पोहोचेपर्यंत गाईडची देखील सोय केली जाते नि मग या अवाढव्य किल्ल्यापैंकी मोजकाच भाग दाखवणार्‍या गाईडचे शब्द अंतिम मानून तो जे काय म्हणेल ते सत्य समजायचे.. ! त्या काळात सिद्दीने इंग्रजांच्या मदतीवर समुद्रात स्वतःची हद्द बनवून घेतलेली.. स्वतःच्या हद्दीत दशहत होतीच.. आता तीच परंपरा हे गाईडलोक्स फक्त जंजिर्‍याचे गोडवे गाउन चालू ठेवतात... मग पर्यटकदेखील हाच तो मराठ्यांना अगदी शिवाजी महाराजांना जिंकता न आलेला 'जंजिरा' पाहिल्याचा अभिमान बाळगतात.. !!

याउलट 'पद्मदुर्ग'... ! सिद्दी नवाबचा कोकण किनारपट्टीवर वाढता उपद्रव पाहून त्याच्या समुद्रमार्गावरील हालचालींवर जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैंकी हा एक ! इथे जाण्यासाठी बोट शोधण्याच मोठ जिकरीच काम.. आधीपासुनच दुर्लक्षित राहिलेला हा जलदुर्ग काही ज्ञात-अज्ञात अश्या बेकायदेशीर घटनांमुळे कलंकित झालेला.. नंतर नेवीने ताबा घेतलेला.. कालांतराने सरकारी खात्याच्या अमलाखाली आलेला.. जायचे म्हटले तर रितसर परवानगी घेउन.. ! साहाजिकच पर्यटकांपर्यंत कधीच न पोहोचलेला ओसाड पडलेला हा पद्मदुर्ग.. ! परवानगीला न जुमानता बेकायदेशीरपणे होड्या घेउन जाणार्‍या दिड-शहाण्या स्थानिकांसाठी दारु-पार्टीसाठी अड्डा ठरलेला हा उपेक्षीत पद्मदुर्ग !

मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून खोल समुद्रात कांसा नामक खडकाच्या बेटावर बांधलेला हा जलदुर्ग 'कांसा' किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.. दर्यासारंग व दौलतखान यांना हाताशी घेऊन राजे शिवाजींनी इ.स. १६७५ मध्ये या किल्ल्याचे मोठ्या शिताफीने काम करून घेतले.. अर्थात सिद्दीच्या हल्ल्यांना तोंड देऊनच..! या 'पद्मदुर्ग' नेच मग जंजिऱ्याच्या सिद्दीवर वचक बसवली.. असे ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेला हा किल्ला अजूनही तसा अपरिचित..

मलादेखील या जलदुर्गाबद्दल पहिले कळले ते मित्र हेम च्या ब्लॉगमुळे.. तेव्हाच या जलदुर्गाला भेट द्यायची ओढ वाढलेली.. जंजिरादेखील पहायचा शिल्लक होता..पण जेव्हा या जलदुर्गाबद्दल कळले तेव्हा पहिली पद्मदुर्ग-भेट हे मनोमनी पक्के केलेलं.. पण जायचं कस हा प्रश्न होताच.. पण 'दुर्गवीर प्रतिष्ठान' या संस्थेची 'पद्मदुर्ग मोहीम' चा संदेश आला आणि जाणे पक्के झाले..

दुर्ग- संवर्धनासाठीच जन्माला आलेल्या या दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे कार्य खूप अमाप आहे.. ह्यांच्या कार्यामुळे आज अनेक गडकिल्ल्यांना संजीवनी मिळाली आहे.. तेव्हा या संस्थेबद्दल आदर होताच.. त्यांच्या कार्याचाच एक भाग म्हणून हि संस्था दरवर्षी 'पद्मदुर्ग मोहीम' राबवते.. उद्देश एकच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पद्मदुर्ग-महती पोचवायची.. ! दुर्ग- साफसफाई हा तर त्यांचा नित्यक्रमच..

६ डिसेंबर २०१५ ची सकाळ.. ! पहाटेच मुंबई-पुणेहून मुरुड कोळीवाड्यात येऊन बस थांबलेल्या.. लहान बाळापासून ते वयस्कर असा जवळपास ६० जणांचा चमू सकाळी जेट्टीच्या दिशेने निघालेला.. आमची टोळी म्हणावी तर इंद्रा, गिरी व त्याचा मुलगा, डेव्हिल, मी व बायको.. संदीप शिंपी सहकुटुंब आलेला.! धुक्याची दुलाई सूर्यकिरणांनी हळूहळू बाजूस सरत होती नि डाव्या बाजूला समुद्रात सिद्दीचा अभेद्य असा 'जंजिरा' नजरेस पडला.. काहीही असले तरी जंजिरा या किल्याबद्दलही तेवढीच उत्सुकता व आदर.. पण म्हणून पद्मदुर्गला का म्हणून कमी लेखावे..

जेट्टीवरून बोटीने आमचा ताफा निघाला.. सोबत एक छोटी वल्हव होडी जोडीला घेऊनच.. जंजिरा मागे पडला नि आता आमची नजर पद्मदुर्गला शोधू लागली.. वीस- पंचवीस मिनिटांतच आमची बोट पद्मदुर्ग जवळ काही अंतरावर येऊन थांबली.. बोट बांधण्यासाठी धक्का नसल्याने व खडकाळ भागामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी आता वल्हव होडीचा आधार..

मोटारची घरघर थांबल्यामुळे बोट शांतपणे हेलकावे खात लाटांवर डुलतेय.. समोर निळ्याशार समुद्रात दिमाखदार पद्मदुर्गचे कोवळ्या उन्हात फारच लोभसवाणे वाटतेय.. आणि त्या छोटी होडीत अर्ध्या पब्लिकला दाटीवाटीने बसवून नाविक किल्ल्याच्या दिशेने होडी नेतोय.... आणि आम्ही आपलं इतक्या जवळून मन भरुन दर्शन घेत बसलोय.. काही गोष्टी जितक्या जवळून तितक्याच ठराविक अंतर राखून देखील खूप सुंदर वाटतात.. कधी कधी दिसतं तसच असतं खरं... आणि आता चोहुबाजुंनी समुद्राने वेढलेल्या या पद्मदुर्गला ज्याप्रकारे अगदी बोटीत निवांतपणे बसून बघत होतो हे आमचे भाग्यच..!

- - -

हा पद्मदुर्ग अगदी एकसंध नाही.. एका बाजूस मुख्य किल्ला तर दुसऱ्या बाजूस पडकोट.. तर मध्ये वाळूची पुळण... आमची होडी त्याच जागेवर घेऊन गेली..कांसा बेटावर पाऊल ठेवले.. आणि उजवीकडच्या प्रवेशद्वारातून मुख्य किल्ल्यामध्ये शिरलो.. खर तर हा मागचा दरवाजा.. या दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे.. ओळखपरेड झाली.. आणि दुर्गवीरच्या गीतांजलीताईंबरोबर गडमाहिती घेण्यासाठी ग्रुप चालू लागला.. तर दुर्गवीरचे कार्यकर्ते साफसफाईच्या कामाला लागले.. !

उजवीकडचा मुख्य किल्ला

- - -

पद्मदुर्ग.. ! खर तर दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते.. मजबूत तटबंदी.. आतून तटबंदीवर घेऊन जाणाऱ्या पायऱ्या.. तटबंदीला असणारे झरोखे..नि त्यातून बाहेर डोकावणाऱ्या तोफा.. आम्ही तटावरूनच फिरायला घेतले.. अजूनही अगदी मजबूत स्थितीत असलेले बांधकाम पाहून थक्क व्हायला होते... तोफा तर आजवर मी एकाच ठिकाणी इतक्या कधी न पाहिलेल्या.. किल्ल्याच्या आत नव्याने बांधकाम झालेले दिसते ते कस्टम ने मधल्या काळात राहण्यासाठी खोल्या वगैरे बांधलेल्या.. हे मधलं सिमेंटच बांधकाम सोडलं तर बाकी किल्ला देखणीय ठरतो.. तटावर नेणार्‍या पायर्‍या, रुंद अशा तटावर बांधलेल्या खोल्या, फुलाच शिल्प असलेले झरोखे, ..

- - -

- - -

- - -


( फुलाचं शिल्प असलेला झरोखा)

- - -


(हि रचना म्हणजे इथल्या बांधकामाची एक खासियत )

- - -

- - -

- - -

याच किल्ल्याच्या एका बुरुजावरुन पडकोट खूप सुंदर दिसतो..नि पडकोटाच वैशिष्ट्य असे कि कमळाच्या आकाराचा बुरुज.. म्हणूनच कि काय पद्मदुर्ग असे नाव पडले असावे.. आजही हा बुरुज तितकाच भक्कम आहे..आम्ही मुख्य किल्ल्याला फेरी मारून आता पडकोटाकडे वळालो.. पडकोट पाहून मग पुन्हा मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जमणार होतो..

पडकोटावर जाताना मध्ये वाळूची पुळण लागते.. असंख्य शंख- शिंपल्याचा चुराडा पडलेला दिसतो.. त्यातून काही कलात्मक आकार शोधण्यात आगळीच मजा.. पडकोट बघताना साहाजिकच 'कमळ'बुरुज बोलावून घेतो.. बुरुजाच्या कडांना कमळाच्या पाकळ्यांचा आकार देऊन या बुरुजाला एक वेगळंच वलय निर्माण करून दिलय.. आणि यामुळेच पद्मदुर्ग हे नाव या जलदुर्गाला अगदी शोभून दिसत..

इथेच पुढे तटबंदी मध्ये शौचालयची व्यवस्थासुद्धा केलेली दिसते.. पुढे काही कोठार आहे नि काळाच्या ओघात बरंच काही वाळूखाली गेलेलं दिसत.. पडकोटाच्या बाहेरील बाजूने फेरफटका मारला कि लक्षात येते की किती मजबूत चुना वापरून काम केलेय..वापरलेले खडक लाटांच्या माऱ्यापुढे झिजून गेले..पण चुनाच्या रेषा मात्र अजूनही ठळक नि तश्याच.. इथेच त्या बुरुजाच्या बाहेरील बाजूस भिंतीच्या खाचेत तोफगोळे अडकलेले दिसतात..इथून जंजिरा खूपच लांब वाटत असल्याने इतक्या दुरून तोफमारा पोचत असेल याबद्दल मी तरी साशन्क आहे... पण काही म्हटलं तरी १६७५ साली बांधलेला हा किल्ला समुद्राच्या लाटा झेलत अजूनही तग धरून आहे.. सिद्दीच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठ्या कल्पकतेने बांधलेला हा किल्ला पाहून नक्कीच उर भरून येतो.. सिद्दीच्या हल्ल्यांना तोंड देत देत ह्या किल्ल्याचे मोठ्या जबाबदारीने बांधकाम पार पाडणाऱ्या दर्यासारंग व दौलतखानाचे देखील कौतुक वाटून जाते ! या गडाबद्दल अजून एक कौतुकास्पद गोष्ट सांगायची तर पद्मदुर्गावर काम करणार्‍या सोनकोळ्यांचा प्रमुख लाय पाटीलबद्दल.. या धाडशी व्यक्तीने मोरोपंतच्या सांगण्यानुसार मोठी जोखीम पत्कारुन एका रात्रीत जंजिर्‍याला शिडी लावण्याची जबाबदारी पार पाडली होती.. पण पंतांकडून दिरंगाई झाली नि पंतांचे धारकरी गेलेच नाहीत.. तेव्हा शिडया काढून उजाडण्यापुर्वीच लाय पाटील पद्मदुर्गावर परतला.. या कामगिरीबद्दल शिवाजी राजेंनी त्याला पालखीचा मान दिला.. पण लाय पाटीलने याचा आपणास उपयोग नाही म्हणुन नम्रपणे नाकारला.. तेव्हा महाराजांनी त्यास एक गलबत बांधून दिले.. त्या गलबताला नाव दिले पालखी..!

- - -

- - -


(खाचेत अडकलेले तोफगोळे)

- - -

या भक्कम तटबंदीलाच मग पार्श्वभूमीला घेउन आम्ही उडीची हौस भागवतो.. (तेव्हा कुठे आमचा ट्रेक पुर्ण होतो.. Wink )

( उडी फोटो इंद्रदेवांच्या कॅमेर्‍यातून)

पडकोटाच्या पुढे भिंतीचे काही अवशेष दिसतात.. चारही बाजूंना समुद्र त्यामुळे परिसरात फेरफटका मारणं एक वेगळाच आनंद देउन जातो.. शिवाय या किल्ल्याच्या अजस्त्र भिंती मन दडपून टाकतात.. आम्ही आता मुख्य दरवाज्यापाशी जमलेलो.. जलदुर्गाच्या इतिहासाबद्दल बरीच चर्चा झाली.. काही ऐकीव तर काही न ऐकलेल्या गोष्टी कानी पडल्या.. पण एक मात्र नक्की पद्मदुर्ग हा उपेक्षित दुर्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही.. विकीपेडिया वर गुगल केले कि पण हा किल्ला संभाजीराजेंनी बांधला अशी चुकीची माहिती सामोरी येते.. ! पण शिवाजी राजेंच्या नंतरच्या काळात शंभुराजेंनी सांभाळ केला होता खरा.. असा ऐतिहासिक महत्व असलेला हा किल्ला एकदातरी पहावाच..

- - -

पडकोटाच्या पलिकडे एका बाजूस तग धरुन उभी असलेली भिंत

- - -

फेरफटका मारताना काळ्या खडक्यात सापडलेल हे पांढरं..

- - -
पडकोटावरुन दिसणारा मुख्य किल्ला

- --

किल्ला बघून झाला.. दुर्गवीरांनी तब्बल चार-पाच पिशव्या भरून कचरा, बाटल्या गोळा केल्या.. त्यांच्या प्रथेप्रमाणे शिवप्रतिमेचे पूजन व स्तुतीवचन झाले नि गडफेरीचा कार्यक्रम समाप्त झाला..

आता प्रतीक्षा बोटीची जिचा पत्ताच नव्हता.. ! येईल म्हणत आम्ही बेटाच्या किनाऱ्यावर किल्ल्याच्या आडोश्यालाच बसलो.. समोर मुरुडचा समुद्रकिनारा तर किनाऱ्यामागे डोंगरावर सिद्दीचा राजवाडा उठून दिसत होता..

तास उलटून गेला.. सागरगोट्यांनी खेळून झाले.. वामकुक्षी घेउन झाली.. पण बेटानजिक कुठलीच बोट फिरकली नाही.. मात्र दुरवर असणार्‍या जंजिरा किल्ल्याच्या दिशेने बोटीची, शिडीच्या होडीची सुरु असलेली ये-जा दिसत होती..आमचा बोटवाला देखील तिथली भाडी घेण्यात रमला तो इथे फिरकलाच नाही.. ! यावरुन जंजिरा किल्ल्याची किती चलती आहे ते कळले.. तब्बल दोन तास वाट बघायला लावली असेल.. यानिमित्ताने बेटावर पहिल्यांदाच इतका वेळ घालवता आला.. मनात आलं एक रात्र या जलदुर्गावर... पण या सुखद कल्पनेला लागलेल्या भुकेने सुरुंग लावलेला.. दोन तासांत पुन्हा किनार्‍याला येऊ या विचाराने फारसं खाणं बेटावर येताना आणलच नव्हत.. !! शेवटी फोनाफोनी करुन तब्बल दोन तासांनी बोटवाला सोबत वल्हव होडी घेउन आला.. आता होडी महादरवाज्यासमोरच्या समुद्रात लावलेली.. खळखळत्या लाटेवर डुलणार्‍या होडीच्या मदतीने सगळा चमू बोटीत विसावला.. नि आम्ही किनार्‍याकडे निघालो ते एका अविस्मरणीय गडभेटीची आठवण घेउनच..

- - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख/ माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

पद्मदुर्गाचे निश्चित ठिकाण गुगल मॅपवर बघितले ते असे
padmadurg near janjira.jpgpadmadurg near janjira satelite.jpgpadmadurg near janjira satelite2.jpg

माझ्या माहितीनुसार, जंजिरा हा खाडीच्या तोंडावर व प्रशस्त अशा खडकावरच बांधला आहे तर पद्मदुर्ग, वर गुगल मॅपमधे दाखवल्याप्रमाणे, भर समुद्रात बांधावा लागला. त्यामुळे पद्मदुर्गाचं बांधकाम खूपच कठीण व जोखमीचं होतं. तरीही हा प्रकल्प हातीं घेण्याचा निर्णय व व पूर्ण करण्याची जिद्द हें शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा एक तेजस्वी पैलूच ! अर्थात, या आगळ्या योजनेसाठी महाराजाना आत्मविश्वास देणार्‍या त्यांच्या स्थानिक दर्यावर्दी पाठीराख्यांचही कौतुकच करायला हवं !

सुंदर फोटोज. पद्मदुर्गाविषयी, लाय पाटलाविषयी वाचलय. पण आता गूगल मॅप्स मुळे आणी तुमच्या फोटोज मुळे जास्त चांगला फील आला.

_/\_ Happy

मस्तच , उपेक्षित असा हा "कासा" उर्फ पदमदुर्ग .

अजिंक्य अश्या "जंजिऱ्या" शेजारी किल्ला बांधणे हा विचारच किती मोठा आणि धाडसी आहे.
आम्ही फक्त चार मंडळी होतो सोबत त्यामुळे होडीवाले इकडे येण्यास नकार देत होते, त्यामुळे हा किल्ला बघण्याची उच्च अजूनही अपूर्ण आहे बघूया कधी योग येतो.

Pages