'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग २

Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 12:19

प्रश्न: राजस्थानातलाच मुलींच्या बाबतीतला अनुभव सांग.
उत्तर: हा अनुभव आहे जेतपुर गावातला जिथे फक्त आठवीपर्यंतच शाळा आहे. इथे वेगवेगळ्या तेरा देशांतून तेरा कलाकार आले होते. तिथल्या मुली आश्चर्याने, प्रश्नार्थक चेहर्‍याने आमच्याकडे बघत होत्या. त्यांना आश्चर्य वाटत होते की एवढ्या दूर ह्यांच्या आईबाबांनी कसं काय पाठवलं, ह्या आठवीच्या पुढे कशा काय शिकल्या? मी मारवाडी भाषिक असल्याने एक फायदा झाला की स्थानिक मुलींशी माझी चटकन गट्टी जमली. मी तिथल्या मुलींशी बोलले अन मी अवाकच झाले. तिथल्या काही मुली नेमबाजीत राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या होत्या तेहीकुणाच्या मार्गदर्शकाशिवाय आणि आज त्या गोवर्‍या थापत होत्या. त्यांना मी आमच्या इथे बोलावलं. गोवर्‍यांवर चाळीस मुलींच्या पदठसे घेतले. त्यात काही बहिणी तर काही मैत्रिणी होत्या. त्यांना आपलं नांव, त्यांना काय करायला, बनायला आवडेल असं सगळं लिहून घेतलं. हे लिहिलेले कागद घेऊन त्यांच्या घरी गेले. जेव्हा त्यांच्या घरी त्या चिठ्ठ्या वाचल्या तर घरच्यांना/मैत्रिणींना त्यांची स्वप्नं ऐकून आश्चर्यच वाटलं. आजपर्यंत ह्या मुली कधी कुणाजवळ व्यक्त झाल्याच नव्हत्या. रंग लावूनत्या पदचिन्हांकित गोवर्‍या आकर्षक बनवल्या व त्यांनाच भेट म्हणून परत केल्या. आजही त्यातल्या काही मुली माझ्या संपर्कात आहेत.9.jpg

प्रश्न: तैवानाला कशी काय गेली होती अन तिथला अनुभव कसा होता ?

उत्तर: ही रेसिडेन्सी होती ‘तायपे’ तैवानाची राजधानी जिथे मी ‘खोज’ तर्फे गेले होते. तिथे असताना मी एक प्रदर्शन बघायला गेले होते अन परतायला रात्रीचा दीड वाजला होता त्यात भर म्हणजे भाषा अनोळखी माझी भितीने गाळणच उडाली होती. माझ्या आजूबाजूच्या मुली मात्र बिनधास्त वावरताना दिसत होत्या. मनात विचार आला फक्त भारतातच मुली असुरक्षित आहेत का ? तिथे मुली सुरक्षितच आहे, कुठे शंकेला वाव नव्हता तरी पण मी तिथल्या वास्तव्यात बिनधास्तपणे वावरू शकले नाही, कायम मनावर अनामिक दडपण असायचं. स्वातंत्र्य म्हणजे काय? हळुहळू त्याचा मी आनंदानुभव घेऊ लागले आणि तेच मी तिथे प्रस्तुत केलं . मी भारतमातेच्या वेषात, श्रृखंल्यांनी जखडलेली.... अन मी त्या शृंखलेची एकएक कडी कापत.... स्वतःला बंधमुक्त करतेय…त्या कड्या होत्या ....सामाजिक, परंपरा, रुढी, मानसिक.... अश्या अनेक कड्या ..... ही अशी बंधमुक्त होण्याची इच्छा फक्त भारतीयच नव्हे तर जगातल्या अनेक स्त्रियांची इच्छा आहे…. तो सुदिन येवो लवकरच येवो त्यासाठी मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न!16.jpg

प्रश्न: एक रेसिडेन्सी तुझ्या गावात पारडसिंग्याला केली त्याबद्दल सांग
उत्तर: हो, एक रेसिडेन्सी मी माझ्या गावात केली. हे खरंतर ‘शिवधन्युष्य’ च होतं. वेगवेगळ्या रेसिडेन्सीजमध्ये भाग घेतल्याने अनेक कलावंतांशी माझी ओळख झाली, काहींशी मैत्र जुळले. देशविदेशातून अनेक कलावंत सहभागी झाले होते. मुख्य अडचण भाषेची वाटत होती. पण आश्चर्य म्हणजे 'ह्या ह्रुदयी ते त्या ह्रुदयी' मध्ये भाषेचा अडसर कधी गळून पडला कळलंच नाही. साधा झाडू बनवणारा कलात्मक झाडू बनवू लागला, किफायतशीर बांबूचे शौचालय बनवले, मुलांसाठी खेळाचे मैदान बनवले असे अनेक शिकणे-शिकवण्याचे कार्यक्रम घेतले आणि खूप अभिमानाने सांगावेसे वाटते की हे सगळं शक्य झालं गावकर्‍यांच्या उत्साहपूर्ण सक्रिय सहभागाने!

प्रश्न: शेतीविषयक एक प्रोजेक्ट केला होता त्याबद्दल सांग.
उत्तर: कॅनडातल्या Vancouver biennaleह्या संस्थेने ऐंशी कलाकारांना आमंत्रित केलं होतं. I Have A Dream Project – A Global Art – Peace Project हा कार्यक्रम २०१४-१६ ह्या काळात राबवल्या जाणार आहे आणि ह्यात बावीस देश सहभागी झाले आहेत ह्यात शेतकरी, कलाकार व काही नैसर्गिक शेती वा सेंद्रिय शेती करणार्‍या समाजसेवी संस्था सहभागी झाल्या आहेत. ह्यासाठी मी एक प्रस्ताव मांडला तो असा की जगभरातले शेतकरी एकमेकांशी जोडल्या गेले पाहिजे त्यासाठी काही बियाणे ह्या शेतकऱ्यांना वाटायचे व त्यांनी ते अश्यारितीने रुजवायचे, फुलवायचे की त्यातून 'I HAVE A DREAM' अशी अक्षरे दिसली पाहिजे व शेतकऱ्याचा समस्या, मनोगतावर एक चित्रफीत बनवायची. मी हे एका लाकडाचं बनवलंय ज्याच्यावर ह्या चित्रफिती सांगता समारंभात दाखवता येतील. हे सगळं करत असताना एक लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या समस्या थोड्याफार फरकाने सगळ्या ठिकाणी आहेत. मी जेव्हा काही शेतकऱ्यानं बोलावले होते पण ते येऊ शकले नाही कारण शेतकरी आहेत म्हणून व्हिसा नाकारण्यात आला होता. तरुणाई शेती व्यवसायाबद्दल उदासीन आहे.17.jpg
प्रश्न: तू नुकतीच पॅरिसहून परतलीयेस तिथला अनुभव नक्कीच वेगळा असेल, हो ना?
श्वेता: हो, नक्कीच वेगळा होता, अविस्मरणीय होता. मी गेल्या दीड वर्षापासून मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्रामध्ये काम करतेय जिथे दळणवळणाची, संपर्काची साधन चोवीस तास उपलब्ध नाहीयेत. मी नागपूरला आल्यावरच मला पॅरिसला जायचंय हे कळलं. वेळ खूप कमी होता. मी त्यांना सुचवले की नागपूरमध्ये प्रयोग करते व त्याची चित्रफीत पाठवते. पण ते मान्य झालं नाही. तिथे जगभरातले कलाकार, कार्यकर्ते येणार होते व माझं जे प्रत्यक्ष सादरीकरण असेल ते नक्कीच खूप जास्त प्रभावित करणारं ठरणार होतं ... शेवटी पॅरिस नक्की झालं. तिथे परफाॅर्म करायचं तर होतंच पण स्वामीनाथन कमिशन बद्दलही बोलायचे होतं.
अनेक अडचणी सोबत पॅरिसला पोचले व त्यांनी तिथे साथ सोडली नाही. नावात काय आहे? 'FAITH IN PARIS' हे नाव प्राॅब्लेमदायक आयोजकांना वाटलं.... जागेचा प्रश्न होता..... वेळेची कमतरता..... इ. इ.1.jpg
दोन जागांची निवड करण्यात आली त्यातील एक world kitchen space (जिथे जगभरातले शेफ्स व शेतकरी मिळवून तीन हजार माणसाचं जेवण बनवणार होते ) व दुसरी कम्युनिटी फार्म्स. विचारांती पहिली जागा नक्की केली. भाषेचा प्रश्न ... कसंबसं त्यावर मात करत अखेर शवपेटी बनवली. ती कशीबशी ती एका किचन व्हॅनमधून संकेतस्थळी पोचवली. पण ही जिथे पुरायची होती ती इतकी खडकाळ होती की गड्डा करणं मुष्किल! आयुधं शोधण्यात दोन तास पायपीट करून परतलो तो काय ! गड्डा तयार होता! अमेरिकेत जन्मलेली व सध्या फ्रांसमध्ये काम करणारी एलिसन म्हणाली की मला नेहमी वाटतं की बदल व्हायला पाहिजे सगळ्याच बाबतीत ... पण मी काही करू शकले नाही. मला काहीतरी करण्याची संधी गमवायची नव्हती. तिच्या कष्टाला तोड नाही! मी प्रयोग सुरू केला ... संध्याकाळ होऊ लागली .... पारा घसरू लागला... डाॅक्टर व आॅक्सीजनची सोय नव्हती झालेली.. भिती दाटू लागली ... अतुलप्राजक्ता एक कार्यकर्ती आहे जिने त्या शवपेटीत पंख्याची सोय करू दिली जेणेकरून ताजी हवा खेळती राहील पण अतिशय थंड हवा! अनेक अडचणींवर मात करत अखेर प्रयोग झाला. लोकांनी खूप उत्स्फूर्त व छान प्रतिसाद दिला. प्रयोग पाहून काही खूप भावुक झाले होते तर काहींच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या. काही लोकांनी गाणी म्हटली अर्थात मला हे मी त्या शवपेटीतून बाहेर आल्यावर कळलं. ललित विक्रमशी, राजश्री व मी असा तिघांचा मिळून हा परफाॅर्मन्स होता.ललित सगळ्यांशी बोलत होता त्याच रेकाॅर्डिंग करत होता.
जो खड्डा खोदला होता त्याच्या काही भागात किचन वेस्ट टाकून त्याच खत केलं. एक कार्यकर्ता सायकलवर एक झाड घेऊन आला त्याला त्याने 'peace tree' नाव दिलं होतं ते त्या खड्ड्यात लावलं, तो म्हणाला पीस ट्री ला योग्य जागा मिळाली. अमेरिकेतील काही कलाकारांनी लोकांचे ड्रीम लिहून घेतले व ते त्यांनी शवपेटीला रंगवून त्यात टाकले व त्या स्वप्नांचं वाचन पुढच्या काॅप २२ मध्ये करणार आहेत. हे सगळं आम्हाला भारतात परतल्यावर कळलं व आम्ही जे केलं त्याची ताकद व महती किती स्तरावर, किती दूरवर पोचली ते ही! विलक्षण अनुभव !15.jpg

शेतकऱ्यांच्या जीवनात 'काळा' दिवस येऊ नये म्हणून 'श्वेता'ने नैसर्गिक 'हरित' क्रांतीची वाट धरली आहे तिला ह्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा !

श्वेताचे काही व्हिडियोच्या लिंका
My performance in paris
https://www.youtube.com/watch?v=MWPA8uA7n48

Performance in taiwan
https://www.youtube.com/watch?v=PA4xBUlWRk0

Performance at jnu Delhi
https://www.youtube.com/watch?v=55R4phjiGfo

After our performance what happened with coffin - in Paris
https://www.youtube.com/watch?v=TSW39D22T9A

All performance at delhi, rajasthan, barbil, nagpur etc in this video
https://www.youtube.com/watch?v=eCcRm_BDcQg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय भारी गोष्टी करत असतात कलाकार लोकं! श्वेताला खूप शुभेच्छा आणि मंजूताई तुमचे आभार ही मुलाखत इथे प्रसिद्ध करण्यासाठी!

मंजूताई - बहुतेक माझी बुद्धी तोकडी पडत असेल, पण मला जरा हे विस्कळित का वाटते आहे ??

श्वेता वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करीत आहे हे कळले - पण एखादा ठोस मुद्दा घेऊन का वेगवेगळे विषय (ज्याची ज्यावेळेस जास्त निकड भासते ते) घेऊन ???

यामागे ती एकटी आहे का तिचा एखादा ग्रुप आहे ??

बहुतेक माझी बुद्धी तोकडी पडत असेल, पण मला जरा हे विस्कळित का वाटते आहे ??>>>> काहीही हं ! जवळपास सहा महिन्यापूर्वी मुलाखत लिहली होती आणि तो पोचवण्यात कमीच पडतोय असं वाटत होतं .... अखेर प्रसिध्द केला ..... असो! बार्बिल ,ओडिशा मध्ये आयोजकांची नाराजी ओढवून घेतली ,काही ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं,पारडसिंगात श्वेताच आयोजक होती , काही तिने स्वतंत्रपणे केले , फुड व इकॉलॉजीमध्ये विषय फुडच होता तर कोट्यातील परिस्थीती बघून वेळेवर सादरीकरणात बदल केला ... कधी एकटी तर कधी ग्रुपबरोबर केले...

मुलाखत छान्च झाली आहे..
तरी आणखी सविस्तर वाचायला आवडेल..
मला स्वतःला तिला ऐकायला सुद्धा आवडेल..
कारण खरतर मला यातुन इची नेमकी दिशा कुठली याचा बोध नाही झाला Sad ..
वाचते आणि लिंका पाहते परत..
अश्या छान ओळखीबद्दल धन्यवाद मंजुताय Happy _/\_