'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १

Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 11:57

निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्‍या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य! एक मुलगी समाज प्रबोधनासाठी असे काही धाडसी प्रयोग अवलंबवते जे समाजमान्य नाही. अशी ही आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. उत्सुकता जास्त ताणून धरत नाही ही आहे श्वेता भट्टड आणि ह्या तिच्याशी मारलेल्या गप्पा:

प्रश्न: तुझं शिक्षण किती, कुठून व कसं झालं? तू नेमकं काय करतेस?

उत्तर: मी बडोद्याहून शिल्पशास्त्रात पदव्युत्तर केलंय. मी शिल्पकला शिकत होते खरी पण सारखं मनात यायचं हे आपण कोणासाठी करतोय? एक छान, सुंदर मूर्ती बनवायची ती एखाद्या सुंदर दालनात ठेवायची ....एक ठराविक रसिक वर्ग बघणार ....छान आहे ....छान आहे म्हणणार व एखादी दर्दी व्यक्ती विकत घेणार. पण मला माझी कला अश्या मर्यादित स्वरूपात किंवा चौकटीत तिला बंदिस्त करून ठेवायची नव्हती, ती जनसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे, असे वाटायचे.
आम्ही पारडसिंगाचे (महाराष्ट्र, मप्र सीमेवरचं एक खेडं). शिक्षणासाठी म्हणून नागपूरला आलो पण मला गावातच राहायला आवडायचे. गावातल्या बाल /कुमारवयीन मुलींचे लैंगिक शोषण, अत्याचार , विवाहित स्त्रियांचे छळ, व्यसनाधीनता, ध्येयहीन तरुणाई अश्या अनेक गोष्टी मला अस्वस्थ करायच्या. मी एक कलाकार म्हणून काय करू शकते? एक लेखणी तलवार बनू शकते तर माझी छन्नी हातोडी/ कला का नाही ? ह्या ज्या माझ्या आजूबाजूला शोषित मैत्रिणी होत्या त्यांच्याशी मी बोलू लागले, त्यांना जाणून घेऊ लागले. मी त्यांच्या मुलाखती छायाचित्रीत केल्या, मिक्स मीडियात व्हिडियो तयार केले आणि ते इतर महिलांना दाखवले. माझ्यासारख्या अश्या अनेक पिडीत स्त्रिया आहेत ज्यांनी हे दु:ख भोगलंय,.मी एकटीच नाहीये ..... हे त्यांना कळलं ...

प्रश्न: कुठल्या एखाद्या प्रसंगाने तुला प्रेरित केलं का?

श्वेता: नाही, असा काही ठळक प्रसंग सांगता नाही येणार पण लहानपणापासून आजूबाजूला घटना मला अस्वस्थ करायच्या, त्यात प्रामुख्याने होता तो जातिभेद! मी वडिलधाऱ्यांना विचारायची असं का? त्याच उत्तर तर मिळायचंच नाही उलट धपाटे मात्र मिळायचे. जसजशी मोठी होत गेले तसे मला वाटायला लागले ह्या ग्रामीण प्रश्नांवर मी काहीतरी करू शकेन. काय, कसं, केव्हा ते माहीत नव्हतं. कलाकार म्हणून मला ते कलेच्या माध्यमातून व्यक्त करायचे होते त्यासाठी फक्त शिल्पकला अपुरी आहे, त्याला जर इतर माध्यमाची जोड दिली तर जास्त तीव्रतेने, जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल,असा विश्वास होता.
मी वेगवेगळ्या आर्ट रेसिडेन्सीमध्ये भाग घेत होते. दिल्लीला 'खोज इंटरनॅशनल आर्ट असोसिएशन' नावाची संस्था आहे जी दरवर्षी फूड व इकॉलॉजीवर आंतरराष्ट्रीय आर्ट रसिडेन्सी भरवते. ह्यात जगभरातले वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांना खुले आवाहन केले जाते, त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी. महिनाभर चालणार्‍या ह्या शिबिरासाठी योग्य अश्या सहा कलाकारांची निवड केली जाते. खोज संस्थेची स्वतःची जी जागा आहे त्यात हे कलाकार राहतात व आपल्या सादरीकरणाची तयारी करतात. माझा जन्म शेतकरी कुटुंबातला. एकीकडे लहानपणापासून बघत होते की शेतकरी अन्न पिकवतो पण तो आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकत नाही, आत्महत्या करतो तर दुसरीकडे समारंभांमध्ये होणारी भरमसाठ अन्नाची नासाडी ! हे विरोधाभासी चित्र सतत डोळ्यासमोर यायचं. ह्या विषयाला अनुसरूनच काहीतरी सादर करण्याचा विचार केला. त्यासाठी मी तीन दिवस उपाशी राहिले ... 'भूक' म्हणजे काय असतं हे कळायला. दोन दिवस मी भूकेविषयी जे सुचेल ते लिहीले कविता, लेख . तिसर्‍या दिवशी भूकेने इतकी व्याकूळ झाले की डोकंच काम करेनास झालं. रेसिडेन्सीमध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असते. सगळीकडे अन्नाचा सुवास दरवळत होता. पण निश्चय ठाम होता. तीन दिवसानंतर असं वाटू लागलं, हा वास खाता आला तर! काय व कसं करायचं, विचार पक्का झाला. सादरीकरणाला नाव दिलं 'Three course meal n Dessert of vomit' प्रेक्षकांच स्वागत भाताच्या अत्तराने (भूक चाळवायला), न्यायाधीशाची टोपी (अशाकरिता की तुम्ही निवाडा करा ह्या अर्थाने) व जेवणाची रिकामी थाळी देऊन केलं. पहिल्या दालनात भीक मागणारे हात होते. दुसर्‍यात मी एका शवपेटीत झोपले व माझ्या तोंडातून पांढरा फेस ( आइसक्रीम सारखं) बाहेर पडतंय. ती शवपेटी उलटीमुळे हळूहळू भरतेय त्यामुळे श्वास गुदमरू लागतो.... तिसर्‍या भागात अन्न मांडलेलं होतं जे मेणापासून बनवलेलं होतं. फूड रेसिडेन्सी होती म्हणजे अन्न तर असणारच व वातावरण निर्मितीमुळे प्रेक्षक अपेक्षेने खायला आसुसलेले असायचे पण खाता काहीच येतं नव्हतं. मला त्यांना हा अनुभव द्यायचा होता की 'एक दाने की किमत' तुम जानो!ज्याचा अनुभव मी गेल्या तीन दिवसात घेतला होता. मी काही 'अन्नावरच्या' कविता डाळ-तांदुळाच्या दाण्यावर लिहिल्या ज्या भिंगाच्या साहाय्याने प्रेक्षक वाचू शकत होते . एका काचेच्या पाण्याच्या (पाणी = जीवन) जगात अन्नाची नासाडी करू नका, सांगणारा एक व्हिडियो दाखवला जात होता. हे संपूर्ण सादरीकरण एक तासाचं होतं. काही ही खाली दिलेली लिंक आहे ज्यावर तुम्ही तिथे काय केलं ते पाहू शकता.12.jpg

प्रश्न: लोकांचा प्रतिसाद कसा होता?

उत्तर: हा माझा पहिला प्रयोग होता. तासभर मी त्या शवपेटीत होते. माझी अवस्था इतकी समाधिस्थ असते की बाहेर काय चाललंय हे मला कळतच नाही. कलाकार हा संवेदनशील असतो म्हणतात पण तशी अपेक्षित संवेदनशीलता मला जाणवली नाही, हे खेदाने नमूद करते. हा एक मर्यादित वर्गाकरिता बंदिस्त प्रयोग होता. असे प्रयोग मला खुल्या मैदानात जनसामान्यांना करिता करायचे होते.
मी काही प्रयोगाच्या मालिका केल्या त्याला नाव दिलं 'FAITH' विश्वास अशासाठी की विश्वासावर जग चालतं. मला विश्वास आहे माझ्यावर, लोकांवर व समाजात नक्की चांगले बदल घडतील ह्यावर. मी नागपूरला आले. नागपुरातला गंगाजमना (रेड लाइट) भागात एक प्रयोग केला. ह्या प्रयोगापाठीमागची प्रेरणा अशी की माझ्या काही मैत्रिणी ह्या भागातल्या मुलींना क्राफ्ट शिकवायच्या व त्यांच्याकडून काही वस्तू बनवून विकायच्या, स्वावलंबी व ह्या विळख्यातून बाहेर पडाव्या म्हणून. एका स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने हा प्रयोग केला. मी चौकात चाळीस फूट उंचावर एका होर्डिंगवर फेथ, फेथ लिहीत होते मागच्याबाजूने. मी लोकांना दिसत नव्हते. लोकं थांबून पाहत होते, जाणून घेत होते. हा प्रयोग आठ तासाचा होता. माझी प्रयोगाच्यावेळी ध्यानस्थ अवस्था असते. मी लोकांशी बोलत नाही. स्वयंसेवक बोलत होते, लोकांचे विचार जाणून घेत होते. अपेक्षित असा संवाद साधल्या जात होता, जो खूप आवश्यक व महत्त्वाचा भाग होता ह्या प्रयोगातला. विशेष म्हणजे ह्या भागात तोंड लपवून जाणारा पुजारी देखील थांबून बघतोय! विविधस्तरातील लोकांना एका मंचावर एकत्र आणण्याचा हा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. ह्या प्रयोगानंतर लोकं हारतुरे घेऊन आले पण ते न स्वीकारता मी पळ काढला कारण तो (हारतुरे) माझा उद्देश्यच नव्हता, नाहीये.13.jpg
दुसरा एक प्रयोग केला तो 'स्त्री भ्रूणहत्या' काही डॉक्टरांच्या मदतीने. हा मी नागपूरच्या मध्यवर्ती भागात, रामदासपेठेत केला. एका चॉकलेट सारख्या दिसणार्‍या पारदर्शक प्लॅस्टिकच्या तंबूत मी होते अन विश्वास विश्वास असं कागदांवर लिहून त्या कागदाने मी दिसेनाशी होईपर्यंत कागद तंबूवर चिकटवत होते. आधी म्हटल्याप्रमाणे मी स्वतः बोलत नाही. स्वयंसेवक जनतेशी संवाद साधतात. हा उन्हाळ्यात केलेला प्रयोग सहा तासांचा होता. प्लॅस्टिक व चाॅकलेटचा वापरण्यापाठीमागचा उद्देश असा की नवजात मुलींना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून फेकलेलं मी पाहिलं होतं आणि चॉकलेट लहान मुलांशी संबंधित म्हणून. तिथून जाणारा एक माणूस थबकला. ते सगळं पाहून तो म्हणाला की आजच मला मुलगी झालीये आता मी एक किलोच्या ऐवजी पाच किलो पेढे घेऊन जातो. प्रतिक्रिया दोन्ही तर्‍हेच्या, सकारात्मक, नकारात्मक असतात. पण मी सकारात्मकच लक्षात ठेवते कारण मला अजूनही प्रयोग करायचे आहेत. मुख्य उद्देश्य संवाद साधणं असतो, तो नक्कीच साधल्या जातो.14.jpg

प्रश्न: तू बर्‍याच आर्ट रेसिडेन्सीज केल्या तिथल्या अनुभवांबद्दल सांग.

उत्तर: ओडिशात बार्बिल येथे खाणी आहेत. तिथे एकदा आठवडाभराच्या आर्ट रेसिडेन्सीसाठी गेले होते जी खाण मालकाची कलाप्रेमी सून व भुवनेश्वरची एक स्वयंसेवी संस्था ह्यांनी आयोजित केली होती. काही रंगकर्मी, शिल्पकर्मी आपल्या कलावस्तु तयार करून त्यांना देणार तर काही कलाकार सादरीकरण करणार होते. आम्ही तिथल्या खाणी पाहायला प्राण्या व पक्ष्यांच्या सुरेल संगतीने हिरव्यागार जंगलातून जात होतो . मन आनंदून गेले होते. पण जसे जसे आत शिरत होतो तसं तशी विरळ होत गेलेली वनराई….. पुढे पुढे तर ...ती उजाड, बंजर जमीन बघून मन विदीर्ण झाले… दूरदूरपर्यंत लाल मातीचं वाळवंट , दृष्टिपथात एक झुडुप नाही. मन इतकं खिन्न, उदास झालं की काय करावं काही सुचेनासं झालं. खरंतर कायद्याने तिथे झाडे लावायला हवी ती काही प्रमाणात लावलीही होती पण ती कोणत्या प्रकारची झाडे होती? त्यांची निगा कोण राखणार होतं? शंभर वर्ष वयाच्या झाडांची उणीव ही नवीन झाडे भरून काढू शकतील का? आपल्यालाच इतकं वाईट वाटतंय तर जी माणसं वनराईत जन्मलेली, वाढलेली त्यांना काय वाटतं असेल? हा विचार मनांत आल्याबरोबर मी त्यांना काही रोप दिली. माझ्या अपेक्षेच्या उलटच घडलं. त्यांनी ती रोप घ्यायला नकार दिला कारण त्या रोपांची निगा राखायला त्यांना वेळच नव्हता कारण त्यांच्याच मालकीच्या जमिनीवर खणलेल्या खाणीत ते दिवसरात्र राबत होते.
इथे जो मी प्रयोग केला तो दीडशे फूट खुल्या खाणीत. मी त्या आणलेल्या रोपांनी ‘F A I T H’ लिहील. त्यातलं ‘आय’ ह्या अक्षराच्या जागी पांढरी साडी नेसून, त्यावर पान रंगवून मी ध्यानस्थ (विचार करत की इथे पालवी फुटेल) झोपले. माझ्या बरोबरचे कलाकार फोटो काढत होते, चित्रण करत होते. साधारण अर्ध्या तासातच मला उठावं लागलं कारण वर उत्खनन चालू होतं. आश्चर्य म्हणजे त्या अर्ध्या तासात तिथे फुलपाखरं जमली ! हाविलक्षण अनुभव जन्मभराकरिता आनंददायी व अविस्मरणीय ठरला पण आयोजकांकरिता मात्र निराशाजनककारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी तिथे एकही शोपीस केलं नाही!11.jpgप्रश्न: खूप आवडलेला अथवा ज्या सादरीकरणाने तुला खूप समाधान मिळालं असा एखादा प्रसंग सांग.
उत्तर: प्रत्येक सादरीकरणाने मला काही ना काही शिकवले, त्यातून मी घडत गेले, छोट्या छोट्या गोष्टींवर मनन, चिंतन करायची सवय लागली…. पण मला समाधान देणारा जो प्रयोग मी केला तो ‘कोटा’ राजस्थान मधला. ही रेसिडेन्सी एका कलाकाराने व स्थानिक कलाकार एन्जीओच्या मदतीने केली होती. मी पथनाट्य सादर करायचं ठरवून गेले होते. प्रत्येक गावाची एक ओळख असते, त्याला एक चेहरा असतो. सांस्कृतिक, ऐतिहासिक …. इ. तिथल्या इमारती, लोकं, बाजार, भाषा इ. त्याची साक्ष देत असतात. मी कोटा स्टेशनवर उतरले अन् अवाक झाले… साधारणपणे स्टेशनच्या बाहेर हॉटेल्सच्या जाहिराती असतात. इथे उतरल्यावर फक्त कोचिंग क्लासेसच्या जाहिराती! कोटा शहराच्या आत अजून एक गाव वसलंय ज्यात फक्त कोचिंग क्लासेसच्या व वसतिगृहाच्या भव्य इमारती, काही बांधू घातलेल्या इमारती व ब्रँडेड फूड जॉइंट्स आहेत! मी स्थानिक लोकांशी बोलले अन मला धक्काच बसला दोन ‘दरांचा’! एक - तिथल्या जाहिरातीतील कोचिंग क्लासेसचे व वसतिगृहाचे ‘दर’ बघून व दुसरा दर ज्याने मी अत्यंत विचलित झाले तो म्हणजे तिथला आत्महत्येचा ‘दर’! महिना पंचवीस ते तीस! तिथल्या चोवीस तास सेवा देणार्‍या ‘होप’ ह्या स्वयंसेवी संघटनेची भेट घेतली अन इथल्या मुलांशी बोलायचं ठरवलं. पण अडचण अशी की ह्या मुलांपर्यंत पोचावं कसं? आजकाल सगळंच ‘महा’ झालंय… तशी ही मुलं महाबिझी! ना त्यांना पेपर वाचायला फुरसत ना टीव्ही पाहायला. मायबाप इथे सोडून गेलेत महा महागड्या फिया भरून पाल्यांना ‘महान’ बनवण्यासाठी आणि तेही महा बिझी झालेत पैसे कमावण्याचा महत् कार्यात. ठरवून आलेल्या पथनाट्याचा विचार सोडून दिला. विचारचक्र सुरू झालं ....असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हा दर कमी करता आला पाहिजे. असा काहीतरी प्रयोग केला पाहिजे जेणेकरून मुलं, पब्लिक आकर्षित झाली पाहिजे, बघण्सासाठी थबकायला हवे. मोक्याची जागा व योग्य वेळ निवडली. कोट्यामध्ये सतत बांधकाम सुरू असतं अन त्यासाठी जेसीबी वापरही. मी त्या जेसीबीच्या पंज्यावर बसून मुलांच्या नोट्सची गुंडाळी उलगडत होते व खाली कार्यकर्ते त्या कागदावर FAITH FAITH लिहीत होते. बघ्यांची गर्दी जमली ज्यात ही क्लासेसला जुंपलेली बाल मजूर मंडळीही होती. 'होप' संस्थेचे कार्यकर्ते ह्या मुलांशी बोलत होते, संवाद साधत होते. त्याचा खूप इस्टंट रिझल्ट मिळाला...'होप' ला आठवड्याला पाच दहा येणाऱ्या काॅल्सची संख्या तब्बल चारशेहून अधिक झाली होती. ह्या स्टंटबाजीमुळे मुलांपर्यंत पोचता आलं ह्याचा नक्कीच आनंद झाला पण त्यानंतर आत्महत्येचा दर घटला.... ह्याचं समाधान मात्र कुठल्याही परिमाणात मोजता येणार नाही ....अमाप आहे.10.jpghttp://www.maayboli.com/node/58942

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

व्वा! मंजु ताई पुन्हा एका वेगळ्या विषया वर लेख... अतिशय सुरेख लेख/ मुलाखात.
लकीली निसर्गायण ची ही सभा मी आणि माझ्या लेकीने अटेंड केलेली.

श्वेता भट्टड चे धाडस आणि समाज जागृतीचे तीला लागलेले वेड हे दोन्ही पाहता थक्क व्हायला होते..
श्वेताचे कौतुक करावे तेवढ कमीच पण त्याहुन तिच्या पालकांचे कौतुक करावेसे वाटते..

मंजू ताई - तुम्ही कायमच हटके विषयांवर अतिशय सुरेख लेख लिहित असतात - अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि अंतर्मुख करायला भाग पाडणारे... - त्याकरता तुम्हाला विशेष धन्यवाद... Happy

श्वेता भट्टड चे धाडस आणि समाज जागृतीचे तिला लागलेले वेड हे दोन्ही पाहता थक्क व्हायला होते.. >>>> +११११११११११११११

मंजू ताई - तुम्ही कायमच हटके विषयांवर अतिशय सुरेख लेख लिहित असतात - अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि अंतर्मुख करायला भाग पाडणारे... - त्याकरता तुम्हाला विशेष धन्यवाद... +१

प्रिती, हर्पेन, अंजु धन्यवाद! श्वेताचा प्रत्येक परफॉरमन्स एका लेखाचा विषय आहे .... दोन भागात माववणं एक आव्हानच होतं... पण तुमच्या पसंतीस पडल्याचे पाहून खूप छान वाटतंय..

मंजूताई, हे तर फारच अनोखं काम आहे सगळं.. अचंबित व्हायला झालंय!!. इथे ओळख करून दिल्याबद्दल खूप आभार.

श्वेता चं खूप खूप अप्रूप वाटतंय..

मंजूताई, हे तर फारच अनोखं काम आहे सगळं.. अचंबित व्हायला झालंय!!. इथे ओळख करून दिल्याबद्दल खूप आभार.

श्वेता चं खूप खूप अप्रूप वाटतंय..

हा लेख वाचायच राखुन ठेवलं होत गं मंजुताय..
खुप मस्त..
माझ्यासाठी हे सार काही पुर्णपणे नविन होतं.. ध्येयवेडी पोरगी.. सलाम तिला _/\_